Friday, May 20, 2022

भक्तशिरोमणी भक्तश्रेष्ठ संतश्रेष्ठ सद्गुरु श्रीचोखोबांची_पुण्यतिथी🙏🌸🌺🌿☘️

 


भक्तशिरोमणी_भक्तश्रेष्ठ_संतश्रेष्ठ_सद्गुरु श्री चोखोबांची_पुण्यतिथी🙏🌸🌺🌿☘️


"ऊंस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ।।" असं परखडपणे सर्व समाजाला सांगणारे संतश्रेष्ठ भक्तशिरोमणी श्रीचोखोबारायांची आज पुण्यतिथी.वैशाख कृष्ण पंचमीला गुरुवारी चोखोबारायांनी शके १२६० इ.स.१३३८ ला मंगळवेढे येथे देह ठेवला त्याला आज ६८४ वर्ष झालेत.अतिशय लोकविलक्षण महापुरुष असलेले चोखोबा माझे व्यक्तिगत प्रिय असे संत आहेत.नामदेवरायांप्रमाणेच चोखोबांच्या ही घरात ते ,त्यांची पत्नी सोयराबाई,पुत्र कर्ममेळा,बहिण निर्मळा व मेव्हणे बंका हे सर्वच संतपदाला पोचले होते.ही खरंच लोकविलक्षण बाब आहे.

श्रीचोखोबांच्या चरित्रावर विवेकदृष्टीने जर चिंतन केले तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे भगवंतांच्या प्राप्ती करीता तुम्हाला कुठल्याही विशिष्ठ धर्म,जात,लिंग,क्षेत्र आणि समुदायाचा भाग होण्याची तिळमात्र गरज नाही.समाजात कितीही विषमता आणि जातीभेदाची पानेमुळे खोलवर रुजलेली असली तरी एका शुद्ध अंतःकरणाने , सद्गुरु प्रदत्त मार्गाने परमार्थात मार्गक्रमण करत गेले तर भगवंत ही आपल्या प्रेमाला ,भक्तीला भुलतो.दुर्दैव असे की , "आम्हां आनंद झाला आम्हा आनंद झाला । देवोची देखिला देहामाजी।।" असा आपल्या विलक्षण आत्मानुभूतीचे वर्णन करणारे ,ब्रह्मसाक्षात्कार झालेले चोखोबा मांडण्यात आम्हाला रस नसून चोखोबांनी रचलेल्या अभंगापैकी अगदी एक-दोन ठराविक अभंग निवडणूक त्यातून जातिव्यवस्था आणि समाज किती वाईट यावर काथ्याकुट करत बसण्यात आपल्याला फार आनंद धन्यता वाटते.पण मूळात हे आंब्याचा गर सोडून कोय चोखत बसण्यासारखे आहे,अमृताचे ताट दूर सारुन ताकाची वाटी जवळ करण्यासारखे आहे.चोखोबांसारखे असामान्य महापुरुष एका सामान्य अगदी शुद्र समजल्या जाणार्या घरात जन्माला येऊन कशा प्रकारे आत्मज्ञानी संत होतात,कुठल्या कारणामुळे प्रत्यक्ष वैकुंठाचे नाथ पांडुरंग त्यांच्या घरी सुईन बनून आले,ढोरं ओढते झाले.या प्रश्नांचे उत्तर शोधायला जर चोखोबांचे चरित्र अभ्यासले तर खरंच नवनित, अमृतच आपल्याला गवसेल.आज या पावन दिनी आपण याच दिव्य चरित्राचे चिंतन करुयात.

                श्रीचोखोबा हे ज्ञानेश्वर माउली आणि नामदेवरायादी संतांचे समकालीन.म्हणजे चोखोबांच्या अवताराला आज सातशे वर्ष होऊन गेलेत.चोखोबांचा जन्म वर्हाडात बुलढाणा जिल्ह्यात ,देऊळगावराजा तालुक्यातील निर्मळा नदीकाठी असलेल्या मेहुणराजा या गावात झाला.चोखोबांच्या जन्मासंबंधी एक कथा सर्वत्र प्रचलित आहे व त्याला आधार ही चोखोबांचे समकालीन असलेले त्यांचे मेव्हणे संत बंका यांची चोखोबांवरील आरती आहे.त्यातून आपल्याला चोखोबांच्या जन्म दिवसा बद्दल व जन्म कथेबद्दल कल्पना येते. बंका यांनी लिहीलेल्या आरतीत ते उल्लेख करतात की, चोखोबांच्या आई-वडिलांच्या प्रवासात त्यांना भगवंत एका गरीब ब्राह्मणाच्या वेशात येऊन भेटतात ,त्यांच्या जवळील आंबा चोखतात व तो अर्धा चोखलेला आंबा परत देऊन अंतर्धान पावतात.त्या प्रसादाचे फळ म्हणजे प्रत्यक्ष चोखोबांचा जन्म निवृत्ती व मिराबाई या दाम्पत्यापोटी झाला.या कथेला बरेच विविध रुप दिले गेले आहेत.कथा बरीच मोठी आहे शब्दमर्यादेस्तव‌ ती इथे देण्याचे टाळतो.

तसेच बंका म्हणतात की ,"शुद्ध एकादशी आंबा देवाने चोखिला । संतोषला देव जन्म चोखा पावला ।।"

म्हणजे एकादशी ही चोखोबांची जन्मतिथी. चोखोबांचे बालपण , त्यांचे शिक्षण ,त्यांना लाभलेला सहवास या संबंधी अगदी तुरळकच माहिती आज उपलब्ध आहे‌.लौकिकदृष्ट्या बघितले तर चोखोबा हे तत्कालिन मान्यतेनुसार समाजात जातिहीन असलेल्या कुळात जन्माला आले होते‌.त्यामुळे त्यांना शिक्षणाचा अधिकार,अक्षर ओळख करून,भाषेचा अभ्यास करुन ,विद्याप्राप्ती करुन घेणे अशक्यप्राय होते.तरीही चोखोबांना "संतसहवास" लाभला होता.निरक्षर असलेल्या चोखोबांच्या अभंगांवर दृष्टी जरी फिरवली तरी आश्चर्य होतं इतके ते अभंग अर्थपूर्ण ,रसाळ व गहन आहेत. चोखोबांचे आई-वडिल हे वारकरी होते.त्यामुळे बालपणापासूनच चोखोबांना पंढरी परिचीत असेल.लहानपणापासूनच पांडुरंग,चंद्रभागा व वारकरी संत यांच्या बद्दल त्यांना ओढ लागलेली असावी. चोखोबांची व संपूर्ण परिवाराची भक्तश्रेष्ठ नामदेवरायांशी ओळख ही पंढरपूरातच झाली होती.चोखोबांवर नामदेवारायांची पूर्ण कृपा होती हे नक्की आहे.श्री नामदेवरायांनी चोखोबांच्या चरित्रावर काही ओव्या लिहील्या आहेत ज्यांना आपण पंचरत्नी चोखामेळा अभंग या नावाने ओळखतो‌.यात बंका,निर्मळा व चोखोबा -सोयरा यांच्या जन्माबद्दल व समाधी बद्दल हकीकत नामदेवरायांनी उद्धृत केली आहे.

                          याच नामदेवारायांच्या अभंगात चोखोबांच्या चरित्रातील अतिशय दिव्य लिला आली आहे.ती अशी की चोखोबांच्या पत्नी सोयराबाई या गर्भवती असतात.नऊ महिने पूर्ण झालेले असल्यामुळे त्या चोखोबांना काही साहित्य आणावयास सांगतात.चोखोबा सोयराला काही न सांगताच ते साहित्य आणण्यासाठी आपल्या बहिणीकडे मेहूणराजा गावी जातात.इकडे चोखोबांना परतायला उशीर झाल्यामुळे सोयराबाई श्रीपंढरीनाथांना शरणं जातात.भक्तवत्सल विठूराया आपल्या या परमभक्त सोयराबाईंच्या हाकेला धावून जातात .भगवंत चोखोबांच्या बहिणीचे निर्मळेचे रुप धारण करुन सोयराबाईंचे बाळंतपण करतात.झालेल्या बाळाचे भगवंत स्वतः नामकरण "कर्ममेळा" असे करतात व निघून‌ जातात.हेच पुढे संत कर्ममेळा म्हणून आपल्या सर्वांना परिचित आहेत.ही सर्व हकिकत स्वतः नामदेवरायांनी आपल्या अभंगातून मांडली आहे. चोखोबांचे संपूर्ण चरित्रच एक विशाल महासागर आहे.प्रत्येक घटना ,लिला एक स्वतंत्र भक्तीचे आख्यान आहे. चोखोबांच्या चरित्राचे जे काही वर्णन संतांनी केले आहेत त्यात एक गोष्ट सर्वत्र समान बघायला मिळते ते म्हणजे त्यांच्या संपूर्ण परिवाराचा भक्तिभाव आणि संताविषयीचे अनन्य प्रेम.वारकरी लोकांबद्दल आदर ,माउली-नामदेवराय आदी विभूतींवरील प्रेम व कृतार्थता चोखोबांनी आपल्या अभंगातून व्यक्त केली आहेच. माउलींबद्दल चोखोबा म्हणतात , "महाविष्णूचा अवतार । प्राणसखा ज्ञानेश्वर ।।" आपल्या प्रिय ज्ञानदेवांंना चोखोबा प्राणसखा संबोधतात. चोखोबा एका ठिकाणी ज्ञानेश्वरी चे महात्म्य प्रकट करातांनी म्हणतात, "चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ । वाचिता सनाथ जीव होती।।" भक्तश्रेष्ठ नामदेवरायांनी चोखोबांवर माउलींच्या आज्ञेने कृपा अनुग्रह केला व परमार्थात सनाथ केले.चोखोबा नामदेवरायांच्या या कृपेचे वर्णन फार सुंदर शब्दांत करतात, 

"धन्य धन्य नामदेवा । केला उपकार जीवा।।१।।

माझा निरसिला भेवो । दाखविला पंढरीरावो।।२।।

मंत्र सांगितला सोपा । निवारलें भव तापा ।।३।।

माझी कृपेची माउली । चोखा म्हणे पान्हा घाली।।४।।"


 एका अभंगात चोखोबा नामदेवरायांचा गौरव करतात

"धन्य धन्य नामदेव।माझा निरसला भेव ।।१।।

विठ्ठल मंत्र त्रिअक्षरी । खूण सांगितली निर्धारी ।।२।।

ठेवोनी माथां हात । दिलें माझे मज हित ।।३।।

दावियेले तारुं । चोखा म्हणे माझा गुरु ।।४।।"


            चोखोबा हे जातिने महार त्यामुळे त्याकाळी समाजातील व्यवस्थेनुसार गावातील मरुन पडलेले गुरे ढोरे ओढून गावाबाहेर टाकणे , तसेच उच्चवर्णीय समजले जाणारे लोक देहकष्टाचे जे काही काम सांगतील ते करणे व त्याबदल्यात धान्य मिळवणे हेच काय ते उदरनिर्वाहाचे साधन. असेच काम करतांना चोखोबा नित्य भगवत स्मरणात स्थिर असत.कुठल्याही प्रसंगी त्यांची ही स्थिती ढळलेली दिसत नाही.एकदा असेच मेलेले जनावर खूपच मोठे असल्यामुळे एकट्या चोखोबांना ओढून टाकणे शक्य होईना.काय करावे, कोणाची मदत घ्यावी,या विवंचनेत असतांना भगवंत एका सामान्य माणसाच्या रुपात त्यांच्या मदतीला धावून आले.त्यांनी चोखोबांना ढोरं ओढण्यासाठी मदत केली. या प्रसंगाचे वर्णन अनेक संतांनी आपल्या अभंगातून केलेले आहे, 

जनाबाई महाराज म्हणतात, 

"चोख्यामेळ्यासाठी । ढोरें ओढी जगजेठी ।।"

एकनाथ महाराज म्हणतात, 

"गोरियाचे घरी स्वयें मडकी घडी । चोखियाची वोढी गुरेढोरे ।।"

तुकाराम महाराज म्हणतात, 

"नरहरी सोनारा घडू फुंकू लागे । चोखामेळ्यासंगे ढोरें ओढी ।।"

             आपल्या या परमप्रिय आणि श्रेष्ठ शिष्याचे महत्व सर्वांना कळावे यासाठी भगवंतांनी एक लिला केली.( ही आख्यायिका चोखोबांच्या व भगवंतांच्या मधूर संबंधाला दर्शवते) एका प्रसंगी स्वर्गातील इंद्रदरबारी असलेले अमृत नासले.तर सर्व देव भगवान पंढरीनाथांकडे आले व त्यांना हे अमृत पुन्हा शुद्ध करण्याचा उपाय विचारला.तेव्हा देवांनी त्यांना सदैव भक्तीत तल्लीन असलेल्या चोखोबांचा हस्तस्पर्श त्या अमृताला करण्याची आज्ञा केली व त्यायोगेच हे नासलेले अमृत शुद्ध होईल असे सांगितले.देवांनी तसे केले व अमृताचे शुद्धीकरण करुन घेतले.असे हे भगवंतांचे‌ व चोखोबांचे दिव्य प्रेम होते. चोखोबांच्या देहावसनाचा प्रसंग आपल्या सर्वांना सुपरिचित आहे.मंगळवेढ्याला गावकूसाची भिंत अंगावर कोसळून चोखोबांनी देह ठेवला होता.हा दिवस होता शके १२६० प्रयामी संवत्सर ,वैशाख वद्य पंचमी गुरुवार इ.स.१३३८.खरंतर भगवतस्वरुप झालेल्या महात्म्यांनी,आत्मज्ञानी ,देहातीत अवस्थेत स्थिर झालेल्या संतांनी देह कसा ठेवला ही बाब अगदी नगण्य आहे.या गावकूसीत ,भिंतीखाली चोखोबा आदी लोक दाबल्या गेले.पण चोखोबांचा हा विरह भगवान पंढरीनाथांना सहन झाला नाही.त्यांनी आपल्या या परमप्रिय भक्ताला आपल्या नित्य चरणांजवळ जागा दिली .त्यांचे सानिध्य सतत आपल्या जवळ असावे म्हणून नामदेवरायांना मंगळवेढ्यास धाडून ढिगार्याखाली अडकलेल्या अस्थी गोळा करुन आणण्यास सांगितले.

"देव म्हणे नाम्या त्वा जावें तेथें । त्याच्या अस्थि येथे घेऊनी याव्या ।।"

पुढे देवांनी नामदेवरायांना सांगितले की ,ज्या अस्थितून अखंड विठ्ठल विठ्ठल नाम येईल त्याच चोखोबांच्या अस्थी आहेत.नामदेवरायांनी त्या अस्थी गोळा केल्या व टाळ-मृदुंगाच्या घोषात त्या पंढरीला आणल्या.पंढरीत आल्यावर नामदेवरायांनी त्या अस्थी भगवंतांच्या स्वाधीन केल्या.तर अश्रू ढाळीत देवांनी त्या अस्थी आपल्या पितांबरात घेतल्या. त्याचे वर्णन अभंगात पुढील प्रमाणे केले आहे.

"नामदेव अस्थी उचलिता समयी । विठ्ठल नामाचा गजर वैकुंठात जाई ।।

नामदेवे अस्थी आणिल्या पारखोनी । घेत चक्रपाणी पितांबरी ।।

समाधी महाद्वारी दिली विठ्ठल चरणी । अस्थी निक्षेपण आपुलिया हाते ।।

करुनी अनंते पाषाण ठेवी । ओवाळती सत्यभामा राहिमाता रूक्मिणी ।।" 

       भगवान श्री पंढरीनाथांनी स्वतः आपल्या हाताने चोखोबांच्या त्या अस्थींना महाद्वारात वैशाख वद्य त्रयोदशी शुक्रवारी समाधी दिली.

                   चोखोबांच्या चरित्रात त्यांचे समाजव्यवस्था,जातीभेद व भेदाभेद यावर काही परखड शब्द ही आपल्याला बघावयास मिळते.ते खरंच अतिशय चिंतनीय आहेत.नारद भक्ती सुत्रांनुसार शुद्ध प्रेमयुक्त भक्ती ही सर्व योगांची ,ज्ञानाची आणि साधनेची स्वामिनी आहे आणि हेच तत्व आपल्याला चोखोबांच्या चरित्रात बघायला मिळतो.जणू हा या अमृत फळाचा गाभा आहे.

चोखोबांनी समाजातील विषमता,भेदाभेद,तथाकथीत कर्मठता डावलुन मानवतेच्या,भक्तीच्या आणि प्रेमाच्या जोरावर प्रत्यक्ष श्रीपांडुरंगालाही आपलेसे केले.शुद्ध भक्ती हाच अध्यात्माचा ,साधनेचा प्राण आहे,हेच श्रीभगवंतालाही प्रिय आहे हे सर्व जगाला दाखवुन दिलं.भक्ती विरहीत केलेले कर्म,साधन,उपासना ही कोरड्या विहीरीसारखी असते,त्याचा काहीही उपयोग नसतो.

         श्रीचोखोबाराय हे श्रीज्ञानेश्वर माउली, श्रीनामदेवराय,श्रीगोरोबा काका,श्रीसावता महाराजांचे समकालीन. चोखोबांना तत्कालिन वर्णाश्रम धर्माच्या नावाखाली भेदाभेद,अवहेलना ,द्वेष करणार्या व रुढीत जखडलेल्या समाजाने जरी दूर लोटले तरी या सर्व संतांनी चोखोबांना हृदयासी लावले.आपल्या शुद्ध भक्तीमुळे चोखोबांनी या सर्व संतमंडळींमध्ये आपले स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले .इतर संतांच्या वाङमयाच्या तुलनेत चोखोबांचे आज अवघे ३५० अभंग उपलब्ध आहेत.चोखोबा स्वत: निरक्षर होते.जर त्यांना लिहीता वाचता आलं असतं तर काय स्वानुभवाचे शब्दभंडार त्यांनी लिहुन ठेवले असते याची कल्पनाही करवत नाही.शेवटी आपलं सर्वांचं दुर्देवं..पण यातही सुदैवाने मंगळवेढ्यातील एक सज्जन ब्राम्हण कुटुंबातील आनंद भट्ट यांनी चोखोबांचा अधिकार ओळखुन हे सर्व अभंग लिहुन ठेवले.यासाठी संपुर्ण समाज त्यांचा ऋणी राहील.

      चोखोबा हे तथाकथीत अस्पृश्य समाजात जन्माला आले होते.त्यामुळे त्यांना जिवनभर अवहेलना,हेटाळणी,द्वेष,तिरस्कार यांनाच सामोरं जावं लागलं.पण चोखोबांनी व इतर संतांनी कधीही या लोकांचा द्वेष व तिरस्कार केला नाही मुळात हेच खरं संतत्व. उलट चोखोबांनी आपल्या शद्ध भक्ती व शुद्ध भावाने श्रीसंतश्रेष्ठ नामदेवरायां सारखे सद्गुरु मिळवले,प्रत्यक्ष पांडुरंगाला आपलेसे केलं.चोखोबांच्या अभंगांचा जर विचार केला तर इतर संतांच्या तुलनेत त्यात समाजातील या विषमते बद्दलची जास्त वेदना,कळकळ,दु:खाची जाणिव होते. दुर्दैव हे की आजही समाजात असे प्रकार जेव्हा घडतात तेव्हा चोखोबांच्या या अभंगातील जाणीव अजुनच जवळुन प्रखर जाणवते.


हिन याती माझी देवा | कैसी घडे तुझी सेवा ||१||

मज दूर दूर हो म्हणती |तुज भेटूं कवण्यारीती ||२|| 

माझा लागतांची कर | सिंतोडा घेताती करार ||३||

माझ्या गोविंदा गोपाळा | करुणा भाकी चोखामेळा ||४||

     ही वेदना ,ही खंत चोखोबांच्या अभंगात ठिकठिकाणी जाणवते. तथाकथीत अस्पृश्य असलेले चोखोबा प्रत्यक्ष श्रीभगवंतांचे कसे झाले ? कशामुळे भगवंतांनी चोखोबांची ढोरे ओढली ? का भगवंत चोखोबांच्या घरी सुईन म्हणुन गेले ? सुदैवाने श्रीचोखोबांनीच याचे उत्तर ही देऊन ठेवले आहे. चोखोबा म्हणतात

आमुचा आम्ही केला भावबळी | भावे वनमाळी आकळीला ||१||

भावाची कारण भावाची कारण | भावें देव शरण भाविकांसी ||२||

निजभावबळे घातिलासे वेढा | देव चहुंकडा कोंडियेला ||३||

चोखा म्हणे देव भावाचा बांधला | भक्तांचा अंकिला म्हणुनी झाला ||४||


     अशा स्वानंदाच्या सिंहासनावर आरुढ झालेल्या श्री चोखोबारायांच्या चरित्रातील हाच शुद्ध भाव आपल्या सर्व वैष्णवांच्या जिवनात कणभर का होईना पण उतरावा हीच या पुण्यतिथी दिनी श्रीचोखोबारायांच्या चरणी कोटी कोटी प्रार्थना!!!🙏🌸🌺🚩🌹

       ✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी✒️✍️

No comments:

Post a Comment

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...