करवीर संस्थानाचे राजगुरु सद्गुरु श्रीसिद्धेश्वर महाराज 🌸☘️
वैशाख वद्य सप्तमी कोल्हापूर या दक्षिण काशी क्षेत्रात आजवर झालेल्या असंख्य महापुरुषांपैकी अग्रगण्य असलेले दिव्य विभूती सद्गुरु श्री सिद्धेश्वर महाराज यांची पुण्यतिथी. श्रीमहाराजांची माहिती होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे आमचे पैजारवाडीचे दत्तप्रभु सद्गुरु चिले दत्त महाराजांच्या चरित्रातील श्री महाराजांचा उल्लेख.तसेच कोल्हापूर चे दत्त सद्गुरु श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या
चरित्रातील उल्लेख.सद्गुरु चिले महाराजांसाठी श्रीमहाराजांचे समाधी मंदिर हे अतिशय आवडते ठिकाण.महत्वाची गोष्ट अशी की अतिशय सुरवातीच्या काळात म्हणजे चिले देवांचे प्रत्यक्ष कार्य सुरु झाले तो सुरवातीचा काळ ,तेव्हा चिले देव रोज श्री सिद्धेश्वर महाराजांचे मंदिर झाडून काढत असत.झाडून झाले की तेथील पुजार्यांकडे खाण्यास भाकरी मागत.हा नेम महाराजांचा पुष्कळ वर्षे अखंड सुरु होता.पुढे महाराजांचा भक्त परिवार ,महाराजांची माहिती सर्वश्रुत झाली तेव्हा पुष्कळ लोक चिले महाराजांकडे यायचे.त्या सर्व भक्तांचे सर्व प्रश्न ,शंका चिले देव याच श्री सिद्धेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात बसून ऐकत व त्यावर मार्गदर्शन करित असत.श्रीसिद्धेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरातील कासवाच्या उजव्या हाताला चिले देव बसायचे व भक्त डाव्या हाताला बसायचे.तिथे बसले की चिले महाराज "सिद्धेश्वरा सिद्धेश्वरा पाप हारी रे सिद्धेश्वरा" हे भजन भक्तांकडून तासंतास म्हणून घेत असत.एकदा चिले महाराज आपल्या भक्तांना सिद्धेश्वर महाराजांच्या समाधीकडे हात करुन म्हटले होते की , "तो वाडीचा दत्त हा इथे सिद्धेश्वर रुपात आहे आणि तोच इथे (स्वतः कडे हात करुन) ही आहे." तसेच कुंभार स्वामी महाराज यांनी ही एका भक्ताला , "तुम्ही पंचगंगेवरील ब्राह्मणकुमारा कडे जावं तिथे तुमचे काम होईल" म्हणून पाठवल्याचे ऐकिवात आहे. त्यामुळे महाराजांचे नाव ऐकून होतोच पण नक्की महाराज कुठले ,कार्यकाळ ,चरित्र काय ? ही माहिती घेण्यास उत्सुक असतांनाच एकेदिवशी अनायसे महाराजांचे चरित्र पुण्यात मिळाले.श्री सिद्धेश्वर महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज आपण त्यांच्या दिव्य चरित्राचे स्मरण करुयात.
वेरुळ गावच्या उत्तरेकडील "निधोन बावरे" या गावातील एक सात्विक ,कृष्णात्री गोत्र कुळातील वेदशास्त्रसंपन्न रामभट व गोदावरीबाई यांच्या कठोर तपाचरणाने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भगवान श्रीकालभैरवांनी या दाम्पत्याचे पोटी शालिवाहन शके १६६५ प्रमोदीनाम संवत्सर चैत्र शुद्ध नवमी म्हणजे रामनवमी या पावन दिनी जन्म घेतला.देवांच्या दृष्टांतानुसार या जगदोद्धारक बालकाचे नाव "सिद्धेश्वर" असे ठेवण्यात आले. चंद्रकलेप्रमाणे सिद्धेश्वर बाळ हळूहळू मोठा होऊ लागला.बालपणापासुनच हे बाळ एकटेच खेळत असे.सिद्धेश्वर बाळ रुपाने , गोरापान , तेजस्वी व एकांतप्रिय होते.आपल्या आईबरोबर मंदिरात जावे,कथा किर्तन ऐकावे,मातेची देवपुजा एकटक आनंदात बघत बसायचे हाच यांचा छंद. लहानपणापासूनच त्यांना वाचासिद्धी होती.आपल्या पाचही बहिनींना त्यांनी बालपणी सांगितल्याप्रमाणेच स्थळ मिळाले होते.बाळ सिद्धेश्वरांचा अगदी थाटामाटात व्रतबंध सोहळा पार पडला.बाळाची अंतर्मुख वृत्ती कमी होऊन तो वैदिक कर्मात निष्णात व्हावा,त्याने घरातील परंपरागत असलेले ज्योतिष शास्त्राचे ज्ञान घ्यावे ,विद्याव्यासंग करुन घर सांभाळावे असे आई-वडिलांना वाटल्यामुळे त्यांचे वयाच्या पाचव्या वर्षी लग्न करण्यात आले.पण त्यांची ध्यानधारणा, अंतर्मुख वृत्ती काही कमी झाली नाही उलट "आपला दाता रघुनंदन.अयोध्यापती श्रीराम,हाचा आमचा दाता.तोच आमचा यजमान.आपले कुटुंबालाच काय तर इतरांनाही देऊन उरेल इतके तो देईल" असे अलौकिक उत्तर त्यांनी दिले.त्यांचे हे उत्तर ऐकून सर्वजन अवाक् झाले व सिद्धेश्वरास त्याच्या मार्गाने जाऊ द्यावे असे सर्वांनी ठरविले.पुढे वडिलांच्या आज्ञेवरुन सिद्धेश्वर हे वेदाध्ययनासाठी औरंगाबाद येथे गेले.तेथील नाना शास्त्री यांच्याकडे ते वेदाध्ययनासाठी जाऊ लागले.सिद्धेश्वर हे एकपाठी होते.सर्व शास्त्र ज्ञान, वेदांचा अभ्यास ते भराभर आत्मसात करु लागले पण या सर्वात त्यांचे मन रमेना.कारण त्यांना ब्रह्मकर्म ,यज्ञकर्म करुन याज्ञिकी किंवा वेदांती व्हावयाचे नव्हते.याच सुमारास त्यांची पत्नि निवर्तली. पण यानंतर एक महत्वाची घटना घडली.पत्निचे क्रियाकर्म आटोपल्यावर एक दिवस त्यांना औरंगाबादमधून निरोप आला की एक मोठा स्वाहाकार औरंगाबाद येथे आयोजित केला आहे व आपण लवकरात लवकर त्या साठी परतावे.या स्वाहाकार ची मुख्य उपस्थिती होती ती म्हणजे पैठण येथील आदरणीय व्यक्ती,थोर ईश्वर भक्त,महान संत अमृतराय.या महान विभूती ची सिद्धेश्वरांना ओढ लागून राहिली.अखेर स्वाहाकारा च्या दिनी संत अमृतरायांचे आगमन झाले.सिद्धेश्वरांनी अमृतरायांच्या चरणी मस्तक ठेवले व अश्रुंनी श्रीचरणांना अभिषेक घातला.श्रीगुरुंना आपल्या शिष्याची ओळख पटली.त्यांनी आपल्या या दिव्य शिष्याला हृदयासी कवटाळले.सिद्धेश्वर हे सामान्य व्यक्ती नाहीत तर प्रत्यक्ष भगवंतांचा अंश आहेत हे अमृतरायांनी मनोमन जाणले.पुढे सिद्धेश्वर श्रीगुरु समवेत पैठणास आले.श्रीगुरुंच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वरांची आध्यात्मिक प्रगती झपाट्याने होऊ लागली.एव्हाना उपजतच आत्मज्ञानी असलेल्या ज्ञानाला झळाळी मिळाली असे म्हटले तर जास्त संयुक्तिक ठरेल. काही दिवसांनी गुरु आज्ञा घेऊन सिद्धेश्वर आपल्या घरी परतले.आपल्या आई-वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांनी दुसरे लग्न केले.सुरंगली या गावातील गंगाधर पंत व सौ आनंदीबाई यांची कन्या वधू म्हणून घरात आली.आई -वडिलांसाठी सिद्धेश्वर पुन्हा गृहस्थ आयुष्य जगू लागले खरे.पण त्यांचे मन यात रमेना.ऐक दिवशी प्रात:काळी ते घर सोडून आपल्या सद्गुरुंकडे परतले.सिद्धेश्वरांना श्रीगुरुंनी पुढील अध्ययनासाठी , साधनेसाठी आपले गुरुबंधू श्री अद्वैतानंद स्वामी यांच्या कडे श्री क्षेत्र काशी येथे पाठविले.गुरु आज्ञा प्रमाण मानून श्री सिद्धेश्वर हे काशी क्षेत्री अद्वैतानंद स्वामी यांच्या कडे आले.स्वामी अद्वैतानंदांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धेश्वरांचा शास्त्राभ्यास व योगाभ्यास सुरु होता.लवकरच ते शास्त्र संपन्न व योगसिद्ध झाले.पुढे स्वामी अद्वैतानंदांनी "तुझे अवतार कार्य दक्षिणेकडे व्हावयाचे आहे तेव्हा आता तू दक्षिणेकडे जा" अशी आज्ञा केली.काही काळाने अद्वैतानंदानी समाधी घेतली. श्री अद्वैतानंद स्वामींच्या समाधीला नमन करुन सिद्धेश्वर हे दक्षिणेकडे जाण्यास निघाले.
प्रथम ते तिर्थयात्रा करत नाशिक क्षेत्री आले.तिथे रामराया चे दर्शन घेतल्यावर ते तुळजापूर येथे आले.श्रीक्षेत्र तुळजापूर येथे एक विलक्षण प्रसंग घडला.भगवती तुळजाभवानी चे दर्शन घेतल्यावर परततांना एक व्याधीग्रस्त जर्जर झालेला ब्रह्माण श्रीगुरु सिद्धेश्वरांच्या आडवा आला.त्याने श्रीगुरु चरणी लोटांगण घातले व "आपल्या डोळ्याला दूर्धर व्रण झाला आहे व त्याचा खुप दाह होतो आहे,आपण यातून माझी सुटका करावी" अशी विनंती केली. श्रीगुरुंनी त्याला 'सप्तशतीचे' पाठ करण्याची आज्ञा केली.हे पाठ पूर्ण होईपर्यंत श्रीगुरु सिद्धेश्वर महाराज हे तुळजापूर येथेच राहिले.तो ब्राह्मण पूर्ण व्याधी मुक्ती झाल्यावरच ते पुढील प्रवासास निघाले.पुढे पांडुरंगाच्या दर्शनाला ते पंढरपूर येथे आले.पंढरपूर ला विठूराया चे दर्शन घेऊन ते सातारा मार्गे कराड येथे आले.पुढे पुष्कळ दिवस कृष्णाकाठी श्रीगुरु रमले.कृष्णाकाठीच कुठेतरी शांत स्थान साधनेसाठी निवडावे असा विचार त्यांनी केला.अशा स्थळाच्या शोधात असतांना त्यांना कृष्णाकाठीच एक दिव्य व जसे हवे होते तसे क्षेत्र मिळाले.ते क्षेत्र म्हणजे "श्रीक्षेत्र नरसिंहपूर" ज्याला आपण कोळे नरसिंहपूर म्हणून आज ओळखतो.पुजार्यांच्या अनुज्ञेने श्रीगुरु याच नृसिंह मंदिरात वास्तव्य करु लागले.येथे एकांतात , कृष्णाकाठी त्यांनी कठोर साधना केली.श्रीगुरु सिद्धेश्वरांचे दिव्य तपाचरण,व्रतस्थ जिवन बघून आता ते नरसिंहपूर व जवळपासच्या परिसरात एक महान तपस्वी म्हणून परिचीत होऊ लागले.त्या परिसरात ते आता "भटजी बाबा" म्हणून ओळखले जाऊ लागले.या अनुष्ठान काळात त्यांच्या हातून अनेक चमत्कार घडले.एकदा श्रीगुरु ध्यानस्थ बसले होते.त्यावेळी प्रचंड गडगडाट करीत विद्युल्लता पडली ती अगदी श्रीगुरुंच्या जवळच.इतक्या जवळ पडून ती ते स्थळातून बाहेरही पडली.पण त्या विद्युल्लतेचा श्रीगुरुंना साधा स्पर्श ही झाला नाही किंवा एवढ्या आवाजाने त्यांची ध्यानावस्था, समाधी भंग ही झाली नाही. पुढे आणखीन एक विलक्षण घटना घडली.दिवसभराचे सर्व कार्य आटोपून श्रीगुरु निद्रिस्त झाले.मध्यरात्री उशा लगत असलेल्या दिपदानातील वातीवर पुष्कळ काजळी साचली व ती श्रीगुरुंच्या शय्येवर पडली.त्यामुळे ती शय्या हळूहळू पेटत गेली.सकाळी उठून सर्वजण पहातात तो श्रीगुरुंची सर्व शय्या जळून भस्मसात झाली होती.परंतु अग्नी नारायणाने त्या महासमर्थ स्वामींच्या शरीरास स्पर्शही केला नाही.वरील घटनांमुळे लोकांना कळून चुकले की हे कुणी सामान्य साधक नाहीत तर प्रत्यक्ष परमेश्वरी अवतार आहेत. पुढे एक ब्राह्मण दांम्पत्य श्रीगुरुंना शरणं आले.त्या ब्राह्मण बाईची व्याधी निरसली व त्या दोघांवर ही कृपा अनुग्रह केला.नरसिंहपूरला श्रीगुरुंचे अनेक चमत्कार लिला चरित्रात वर्णन करण्यात आले आहे. एकदा ब्रह्ममुहूर्तावर स्नानास गेले व नदीकाठी खडकावर ध्यानास बसले.सकाळी सूर्यप्रकाश पडल्यावर लोक आले आणि बघतात तर श्रीगुरु हे एक प्रचंड मोठ्या अजस्त्र सुसरीवर बसले होते.लोकांनी आवाज दिल्यावर श्रीगुरु समाधी तून बाहेर आले व बाजूला आल्यावर ती सुसरी शांतपणे निघून गेली.नरसिंहपूरला श्रीगुरुंनी अनेकांच्या व्याधी दूर केल्या,अनेकांना कृपा अनुग्रह दिला.त्यात आपल्याला शरण आलेल्या भिमाबाईंवर कृपा अनुग्रह केला व त्यांना योगात व परमार्थात एका उच्च पदावर पोचवले.अनेक अलौकिक अशा चमत्कारिक लिला श्रीगुरुंनी नरसिंह पूरी केल्या. "कुटुंबियांना भेटायला जाण्यासाठी बारा वर्ष उलटून जाऊ देऊ नये" असा शास्त्र संकेत आहे.त्यामुळे श्रीगुरु आता स्वगृही जाण्याचा विचार करु लागले. श्रीगुरु आता स्वगृही जाणार आहेत ही बातमी सर्वत्र वार्यासारखी पसरली.सर्वांनी साश्रुनयनांनी श्रीगुरुंना निरोप दिला.त्यामुळे श्रीगुरु आता आपल्या घरी जाण्याचे ठरवून मार्गक्रमण करते झाले.घरी आल्यावर आपल्या भावाची व इतर घरातील सर्वांची भेट घेतल्यावर श्रीगुरुंना कळले की आपल्या मातोश्री आपली भेट व्हावी म्हणून करवीर क्षेत्री भगवती अंबाबाईंच्या चरणी ठाण मांडून बसल्या आहेत.तिथेच आपल्या पुत्र सिद्धेश्वराची भेट व्हावी म्हणून त्यांनी अंबाबाई चरणी अनुष्ठान मांडले आहे.श्रीगुरुंनी राम भटांना आपल्या मातोश्रींना आणावयास धाडले.काही काळात सर्व लोकांच्या लवाजम्यासह मातोश्री घरी परतल्या. अतिशय आनंदाने अश्रू पूर्ण नेत्रांनी माता - पुत्राची भेट झाली.पुढे तिनं महिने स्वगृही राहून श्रीगुरु आपली पत्नी सौ.भवानीबाई व मातोश्रींसमवेत आधी काही काळ पंढरपूर येथे राहिले व नंतर नरसिंहपूर येथे आले.यावेळी श्रीगुरुंचा परिवार त्यांच्या सोबत होता.नरसिंहपुरी सर्वांनी आनंदाने त्यांची व्यवस्था केली.पंढरपूर मुक्कामी श्रीगुरुंनी योगानंद,अद्वैतानंद व वैकुंठाश्रम या तिन्ही शिष्यांवर कृपा अनुग्रह केला व त्यांना योगाभ्यासात निष्णात केले.यातले वैकुंठाश्रम स्वामी हे तर गुरु सहवासात राहून सिद्ध झाले. श्रीगुरु नरसिंहपूर येथे वास्तव्यास पुष्कळ काळ होते.याठिकाणीच त्यांना रामचंद्र नावाचा पुत्र झाला.हा पुत्र तिनं वर्षांचा झाल्यावर एकदा श्रीगुरुंनी सर्व भक्तांपुढे त्याला त्याचा पूर्वजन्मीचा वृत्तांत विचारला.तर त्या तिनं वर्षाच्या गुरु पुत्राने खडानखडा पूर्वजन्मी ची माहिती सांगितली.आपण गंगा किनारी राहणारा ब्राह्मण होतो व अनुष्ठान काळात गंगा काठी मृत्यू पावलो. या पुण्यामुळे श्री गुरुंच्या पोटी जन्म लाभला असे इतिवृत्त त्याने सांगितले. रामचंद्र पाच वर्षांचा झाल्यावर श्रीगुरुंनी त्यांचा धर्मरक्षणासाठी ,कर्ममार्गाचा लोप होवू नये म्हणून व्रतबंध सोहळा मोठ्या थाटात पार पाडला.याच प्रसंगात तूप कमी पडल्यावर श्रीगुरुंनी कृष्णामाईतून घागर भरुन आणण्यास सांगितले व त्याचे तुपात रुपांतर केले.एकदा पर्जन्यकाळात कृष्णामाईला पूर आला व प्रात:काळी कृष्णेचे जल श्रीगुरुंच्या ध्यान गुंफेत शिरले.सर्व लोक खुप घाबरले व श्रीगुरुंना आवाज देऊ लागले. पण श्रीगुरु गुढ समाधीत स्थिर बसले होते.कृष्णामाई आपल्या या बाळाचे शांत पणे अवलोकन करुन परतली व श्रीगुरु आपल्या ध्यान गुफेतून कोरडे बाहेर आले.नंतर लोकांनी आत जाऊन बघितले तर कृष्णामाई च्या जलाने संपूर्ण गुंफा ही छतापर्यंत ओली होती.
करवीर चे छत्रपती श्रीमंत श्री शिवाजी महाराज दुसरे हे श्रीगुरुंच्या वेळी गादीवर होते.एकदा त्यांच्या पाठीस फोड झाला.तो दिवसेंदिवस मोठा होऊ लागला.तिचा आकार काही काळाने आंब्याएवढा मोठा झाला.त्याचा श्रीमंतांना त्रास होऊ लागला.रात्रंदिवस ते वेदनेने तळमळू लागले.हकीम ,वैद्य ,राजवैद्य यांनी शरथिचे प्रयत्न करुन ही काही फरक पडला नाही.महिनाभर महाराज या व्याधिने पिडीत होते.अंगावरील वस्त्र फोडास लागला की प्रचंड वेदना होई.महाराजांना झोपनेही अवघड झाले होते.एक दिवशी श्रीमंत छत्रपती शयन गृहात पालथे पडले होते.महाराजांना मंद वार्या मुळे डोळा लागला होता.इतक्यात व्हरांड्यातून भव्य आणि तेजस्वी महापुरुष प्रकाशझोतात प्रवेश करता झाला.मंद सुंगंध सर्वत्र दरवळू लागला.सुवर्णकांती ,डोईस शालनामा,अंगावर भरजरी शालजोडी,कांसेला रेशीमकाठी तलम धोतर ,बाकी उघड्या अंगावर गोपीचंदानाचे तिलक,रामनामांकित मुद्रा,एक हाती पळीपंचपात्र,पायामध्ये काष्टमय चंदनी पादुका,गळ्यात पोवळ्यांची व स्फटिकाची माळ.अत्यंत दैदिप्यमान आणि तेजस्वी मूर्तीचे छत्रपतींनी दर्शन घेतले.तेव्हा छत्रपतींना त्या महापुरुषांनी "आप्पा" या नावाने हाक मारली व म्हणाले,. "हे तुला काय झाले? इतका दिनवाना व व्याकूळ का झालास? ऊठ चिंता करु नकोस मी तुझ्या पाठीशी आहे." असे म्हणून स्वामींनी आपला हात त्यांचे गळवावरुन फिरविला व छत्रपतींचे मस्तकी ठेवला आणि छत्रपतींच्या कानात काही मंत्रोपदेश केला आणि ते योगी पुरुष अंतर्धान पावले.छत्रपतींना अचानक जाग आली पाहातात तर जवळ कुणीच नव्हते.प्रवेशद्वार बंद आणि पाठीवरील गळू आपोआप फुटून वाहू लागले.आजवरचा हा प्रचंड त्रासदायक फोडाचा त्रास क्षणार्धात संपला होता. पुढे श्रीमंत श्री छत्रपतींचे सुभेदार येसाजी शिंदे व बाजीपंत यांनी श्रीगुरुंना करवीरात आणले.सुभेदार येसाजी काही दिवसांनी अचानक छत्रपतींना भेटायला पन्हाळ्यावर गेले व त्यांना एक सिद्ध महापुरुष करवीरात आले आहेत व ते सबनीस यांच्या वाड्यात आहेत अशी माहिती दिली.त्यांच्या दर्शनास येण्याची विनंती छत्रपतींना केली.छत्रपती सुर्योदयापूर्वी दुसर्यादिवशी तयार झाले.पालखीत बसून गड उतार झाले व काही वेळात येऊन श्रीगुरुंना भेटले.श्रीगुरुंना बघताक्षणीच त्यांना ओळख पटली की हेच ते महापुरुष ज्यांनी आपली व्याधी दूर केली.त्यांनी श्रीगुरुंच्या चरणी लोटांगण घेतले.श्रीगुरुंनी त्यांना उठवून हृदयाशी कवटाळले.छत्रपतींच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या.श्रीगुरु म्हटले ,"आप्पा , काय सुखरुप आहेस की ..." अचानक छत्रपती भानावर आले व त्यांच्या मनीचे सर्व संशय फिटले.छत्रपतींनी श्रीगुरुंची पाद्यपूजा केली व विनंती केली की , "आपला सहकुटुंब मुक्काम माझ्या सन्निध पन्हाळगडावर व्हावा." श्रीगुरुंनी याला संमती दर्शविली व राजे श्रीगुरु समवेत पन्हाळा गडावर परतले.पुढे छत्रपतींनी श्रीगुरु सिद्धेश्वर महाराजांकडून अनुग्रह मंत्र ही घेतला.हा सोहळा अतिशय थाटामाटात पार पडला.तसेच त्यावेळी थोरल्या राणी साहेबांनी ही मंत्रोपदेश घेतला होता. त्यावेळी छत्रपतींनी आपले सर्व राज्य श्रीगुरुना दान करण्याची इच्छा व्यक्त केली पण श्रीगुरुंनी ती विनम्र पुर्वक नाकारली.त्यामुळे छत्रपतींनी श्रीगुरुंना "महाराज" ही पदवी स्विकारण्याची विनंती केली.गुरु महाराजांनी ती स्विकारली.यामुळे आनंदीत झालेल्या छत्रपतींनी स्वतः जयघोष केला."करवीर छत्रपतींचे राजगुरु श्री सिद्धेश्वर महाराज की जय." श्रीगुरु सिद्धेश्वर महाराज आता करवीर छत्रपतींचे राजगुरु झाले होते.
पुढे श्रीगुरु महाराज आपल्या मातोश्रींच्या इच्छेनुसार सिंहस्थ कुंभमेळ्याला त्रंबकराज येथे जाण्यास निघाले.प्रवासाची छत्रपती महाराजांनी सर्व चोख व्यवस्था केली होती. प्रवासात श्रीगुरु आधी नरसिंहपूर येथे आले.तेथील भक्तमंडळी ही श्रीगुरु समवेत कुंभमेळ्याला जाण्यास निघाली.हळूहळू यात्रा पुण्यामार्गे आळंदीला आली.श्रीगुरु महाराजांनी ज्ञानेश्वर माउलींचे अतिव प्रेमाने दर्शन घेतले.अजान वृक्षाला कडकडून मिठी मारली.श्रीगुरु सिद्धेश्वर महाराज हे आळंदीत आले आहेत ही बातमी सवाई माधवराव पेशवे यांना कळले.श्रीगुरुंची किर्ती आधीच त्यांच्यापर्यंत पोहोचली होती.त्यांनी नाना फडणवीस,हरीपंत फडके आदी लोकांना श्रीगुरुंना पुण्यात आणण्यास विनंती करण्याकरिता पाठविले.पेशव्यांच्या विनंतीस मान देऊन श्रीगुरु पुण्यास निघाले.पुण्याच्या वेशीवर स्वतः पेशवे श्रीगुरुंना सामोरे झाले.त्यांनी श्रीगुरुंच्या चरणी मस्तक ठेऊन नमस्कार केला.श्रीगुरुंनी त्यांना हृदयासी लावले व ते पुण्यात आले.श्रीगुरु तिन दिवस पुण्यनगरीत होते.चौथ्या दिवशी ते नाशिक क्षेत्री आले.तिथे त्यांनी सर्व विधी सशास्त्र केले.श्रीगुरु नाशिक क्षेत्री होते त्यावेळी अनेक चमत्कार लिला तिथे घडल्या शब्द मर्यादेमुळे तो भाग गाळला आहे.परततांना तिन महिने परत श्रीगुरु महाराजांचा मुक्काम पुण्यास पेशव्यांकडे होता.काही कालावधी नंतर श्रीगुरु नरसिंहपूर येथे जाण्यास निघाले.वाटेत भोरच्या राजांनी त्यांना आपल्या कडे येण्याची विनंती केली.त्यांनी आपल्या वाड्यात श्रीगुरुंची व्यवस्था ठेवली होती.या वेळी भोरच्या राजांनी श्रीगुरु महखराजां कडून अनुग्रह मंत्र घेतला होता.तिन दिवस राहून श्रीगुरु पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले. पुढे दरमजल करीत श्री आपल्या प्रिय कर्मभूमीत म्हणजे नरसिंहपूरला आले.श्रींनी नरसिंह पूर येथे आपले मोठे चिरंजीव रामचंद्र महाराज तथा बाबा महाराज यांचे लग्न लावून दिले व करवीर छत्रपतींची इच्छा म्हणून आपले दुसरे चिरंजीव नाना महाराज यांचे लग्न करविर क्षेत्री लावले.
पुढे छत्रपतींच्या विनंतीवरून श्रीगुरु पन्हाळा गडावर राहण्यास आले.श्रीगुरुंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपतींची अध्यात्मिक बैठक दृढ होत गेली.एकदा एका व्याधीग्रस्त ब्राह्माणाने व्याधी निरसणासाठी अंबाबाईचे अनुष्ठान सुरु केले तर जगदंबेनी त्याला शिवाजी राजाचे स्नान तिर्थ घ्यावे म्हणजे व्याधी समुळ नाश पावेल असा दृष्टांत केला होता.यावरुन छत्रपती महाराजांच्या अधिकाराची कल्पना करता येईल.पुढे श्रीगुरु नसरापुरी आले तेथे त्यांनी आपल्या भक्त राधाबाई यांच्या मृत पावलेल्या पतीला तिरडीवर फक्त हाक मारुन जिवंत केले.एकदा नरसिंहपूरला असतांनाच भर मध्यरात्री खग्रास चंद्रग्रहण आले.श्रीगुरुंनी मध्यरात्री पर्वकाळात नदीत उभे राहून जपजाप्य केले पण गावातील एकही ब्राह्मण तिथे आला नाही.दुसरे दिवशी ज्यावेळी ब्राह्मण मंडळी श्रींच्या दर्शनाला आली तेव्हा श्रींनी त्यांना याबाबत विचारले. तेव्हा ब्राह्मण मंडळींनी या डोहात ,नदीतिरावर वास करीत असलेल्या सुसरीचे कारण दिले.त्यावेळी श्री गुरुंनी ब्राह्मणांना आश्वासन दिले व श्रीकृष्णा मातेला आवाहन करुन म्हणाले, "श्रीसर्वोत्तमाची आज्ञा अशी आहे की,उत्तरेस नृसिंह तिर्थापासून दक्षिणेस वैष्णव घाटाच्या खाली परीट धुणेचा घाट आहे,तिथपर्यंत या दोन्ही स्थळांचे मध्ये सुसरीने कोणासही उपद्रव करु नये.सर्वजनांनी नि:शंक मनाने स्नानादी कर्मे करावीत." अशी आज्ञा करुन ते उपस्थितांना म्हणाले , "आता तुम्हाला सुसरीचे भय बाळगण्याचे कारण नाही." आणि आश्चर्य असे की आज दोनशे वर्षं झाली तेव्हापासून आजतागायत नृसिंह तिर्थापासून परीट घाटापर्यंत सुसरी दृष्टीस पडत नाही.नरसिंहपूर येथे केलेल्या लिला अतिशय विस्तृत व विलक्षण आहेत.त्या एक एक लिला चमत्कार ,प्रत्येक घटना व भक्तांवर केलेल्या कृपेचा चमत्कार बघितला तर प्रत्येकावर एक एक स्वतंत्र लेख होईल.पण तो भाग आता इथे मांडणे शक्य होणार नाही.आपण पुढे कधीतरी तो स्वतंत्र बघूच.करवीर छत्रपतींवर अचानक सरदार परशुराम पटवर्धन तासगाव यांनी केलेला हल्ला,ते भिषण युद्ध श्रीगुरुंच्या कृपेने छत्रपतींचे हाणून पाडले.हा अतिशय विलक्षण प्रसंग आहे.तसेच करवीर छत्रपतींना पुत्र नव्हता.त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी श्रीगुरुंना विनंती केली.श्रीगुरुंनी आपल्या या लाडक्या शिष्याला तसा आशिर्वाद दिला होता.त्या आशिर्वाद फलस्वरुप छत्रपती महाराजांना दोन पुत्ररत्न लाभले होते.दुसरे पुत्ररत्न हे बुवा महाराजांचा आशिर्वाद म्हणून त्यांचे नामकरण ही श्री बोवासाहेब छत्रपती असे करण्यात आले. पुढे रामचंद्र पटवर्धन याने अचानक करवीरावर हल्ला केला त्यावेळी श्रीगुरुंनी करवीरचा किल्ला लढवून छत्रपतींची कृपा पूर्वक पन्हाळा गडावर सुरक्षीतपणे सुटका केली होती.धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य.हा प्रसंग इतका दिव्य आहे की मी जरुर यावर एक वेगळा लेख लिहीणार आहे.श्रीगुरु बुवा महाराजांनी छत्रपतींचे या बाक्या प्रसंगातुन इतक्या विलक्षण पद्धतीने रक्षण केले की कुणीही हा प्रसंग वाचला तर अवाक् होईल.अतिशय विलक्षण असा हा प्रसंग आहे.मी स्वतः वाचुन अतिशय आश्चर्यचकित झालो.सद्गुरु आपल्या शिष्यासाठी काय काय करतात याची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही .त्यातीलच एक विलक्षण असे हे उदाहरण आहे.विस्तृत व दिर्घ असा प्रसंग असल्याने इथे देता येणे शक्य नाही
आपल्या भक्तांचे रक्षण करणारे श्रीगुरु आता वयाने थकले होते.आपले तिनही सुपुत्र स्वकर्तृत्वावर उभे होते.विद्येत पारंगत होते.कन्या या उत्तम घरी नांदत होत्या.आता आपल्या अवताराचे प्रयोजन कार्य ही पूर्ण झाल्याचे श्रीगुरुंना लक्षात आले.त्यांनी दोन दिवस अन्नास स्पर्श केला नाही.फक्त कधीतरी थोडे जलपान केले.एकनिष्ठ सेवक असलेले ब्रह्मानंद स्वामी श्रीगुरु महाराजांचे सोबतच होते.श्रींचा अवतार काळ पूर्ण होत आला हे त्यांनी जाणले होते.ब्रह्मानंद स्वामींनी प्रार्थना केली की आपल्याजवळील सर्व ज्ञान हे आपले पुत्र बाबा महाराज यांना द्यावे.यावर खुप चिंतन घडल्यावर श्रीगुरुंंनी आपल्या समाधीचा विचार काही काळासाठी रहीत केला.श्रीबाबा महाराज आपल्या वडिलांना शिष्य रुपाने शरणं आले.आठ महिन्यात त्यांनी श्रीगुरुंची कृपा संपादन केली.श्रीगुरुंनी त्यांना महावाक्याचा उपदेश करुन त्यांच्याकडुन ध्यान समाधीचा अभ्यास अवघ्या सात आठ महिन्यांत पूर्ण करुन घेतला.ज्याला साधनेचा कित्येक काळ लोटावा लागतो ते फक्त काही महिन्यात श्रीगुरुंनी आपल्या शिष्याकरवी घडविले हे परमआश्चर्यच आहे.बाबा महाराजांच्या मस्तकी श्रीगुरुंनी आपल्या पूर्ण कृपेचा हस्त ठेवला ,त्यांना हृदयाशी कवटाळून या हृदयीचे गुज त्या हृदयी घातले.बाबांवर पूर्ण कृपा झाल्यावर श्रीगुरुंनी आता समाधी घेण्याचा विचार निश्चित केला.त्यांनी सर्व निरवानिरव चालवली.ही माहिती छत्रपतींना मिळताच ते तिथे हजर झाले.छत्रपतींना दु:खावेग आवरत नव्हता.सद्गुरुंच्या विरहाच्या कल्पनेने ही ते हलून गेले होते.अतिशय दु:खी आणि खिन्न अंत:करनाने ते श्रीगुरु पुढे उभे होते.डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या.श्रीगुरुंनी त्यांना जवळ घेतले.त्यांचे सांत्वन करीत बोलले, "आप्पा ! चिंता करु नकोस.जे मजपाशी होते ते सर्व महात्म्य चिरंजीव बाळापाशी आहे.त्या ठिकाणी तुमचे सेवेचे वैगेरे जे काही हेतू असतील ते पूर्ण करुन घ्या.बाळ व माझ्यात काही अंतर नाही.तुजविरुद्ध जे कपटाने वागतील ते तुझे शत्रू लयास जातील.असा माझा तुला आशिर्वाद आहे."असे बोलून छत्रपतींना श्रींनी आश्वासन अभय दिले. दुसरा अप्रिय असा दिवस अखेर उजाडला.वैशाख वंद्य षष्ठी इंदुवार शके १७२३ ला ब्राह्ममुहूर्ती सूर्योदयापूर्वी सहा घटिका असतांनाच श्रीगुरुंनी बाबा महाराज,श्रीपूर्णानंद स्वामी व छत्रपतीस आपल्या समोर बसवून स्वतः आसनस्थ झाले.श्रीमद शंंकराचार्यांच्या ग्रंथातील काही श्लोक वाचण्यास सांगितले.त्या ग्रंथात ज्ञान्याची चरमदशा म्हणजे मरण दशा काळी जी चिन्हे वर्णिली आहेत.ती सर्व या त्रिवर्ग शिष्यांना दाखवावे या हेतूने त्यांना संन्निध बसविले.त्यात योग्याने जसे देह ठेवण्याचे वर्णन केले आहे तसेच या तिन्ही शिष्यांना दाखवून श्रींनी स्वतः चैतन्यपूर्ण ब्रह्मरुप होऊन विदेह कैवल्य पावून आपला अवतार समाप्त केला.श्रींनी देह ठेवल्याची वार्ता सर्वत्र वार्या सारखी पसरली.शिष्यांच्या दु:खाचा पारावार उरला नाही.अवतार समाप्ती नंतर बाबा महाराज यांनी दहनविधी उत्तरक्रिया केली.शिवछत्रपतींनी यांनी दहनाचे स्थानी स्थल शुद्धी करुन देवालय बांधून देवालयामध्ये श्रींचा बसावयाचा पाट आणि त्यावर श्रींचे अंगावरील धोतर ठेवून वर श्रींच्या पादुका स्थापन करविल्या.श्रीगुरुंच्या या पुण्यपावन पुण्यतिथी दिनी त्यांच्या या दिव्य चरित्राचे आपल्याला स्मरण झाले ही त्यांचीच परमकृपा.अशा या अवतारी व दिव्य महापुरुषांच्या चरणी माझे शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम
✒️✍️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️


No comments:
Post a Comment