Tuesday, May 24, 2022

मुक्तपणें मुक्त श्रेष्ठपणें श्रेष्ठ । सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती ।। भगवती आदिशक्ती मुक्ताबाई माउलींचा आज ७२३ वा पुण्यतिथी सोहळा🌸🙏🌺

 


मुक्तपणें मुक्त श्रेष्ठपणें श्रेष्ठ । सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती ।।

                            वैशाख वद्य दशमी ब्रह्मचित्कला माय मुक्ताईंचा ७२३ वा पुण्यतिथी दिन.आजच्याच तिथीली जगत्रय जननी ब्रह्मचित्कला आदिशक्ती माय मुक्ताबाई तापीच्या परमपावन तिरावर गुप्त झाली.खरंतर आदिशक्ती माय मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर माउली ,निवृत्तीनाथ ,सोपानकाका या सर्वांचे वेगळे असे चरित्र नाहीच.चारही भावंडांचे चरित्र हे एकमेकांशी संलग्न आहेतच.यात शंका असण्याचे कारणही नाही.तरीही प्रत्यक्ष मुळ महामाया असलेल्या आदिशक्ती मुक्ताईंचा विलक्षण अधिकार आणि त्यांचे निरंजनी गुप्त होणे म्हणजे या सर्व चरित्रातील एक विलक्षण बाब आहे. 

निळोबाराय आदिशक्ती मुक्ताईचे वर्णन करतांना म्हणतात


"मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी । आद्यत्रय जननी देवाचिये ।।"

     

 "आद्यत्रय जननी" म्हणजे त्रिदेवांना जिने जन्मास घातले आहे अशी भगवती.देवी भागवतात या त्रिदेवांना जन्माला घातलेल्या आदिशक्तीचे विस्तृत वर्णन आहे.श्रीमद भागवतात योगमायेचे वर्णन केले आहे ,तिला भागवतात दुर्गा,भद्रकाली,विजया,वैष्णवी,कुमुदा,चंडिका,कृष्णा,माधवी,कन्यका,माया,नारायणी,इशानी,शारदा व अंबिका असे १४ नावे आहेत.त्याच योगमायेचा पूर्ण अवतार म्हणजे भगवती मुक्ताबाई आहेत .प्रत्यक्ष महाविष्णू असलेल्या भगवान श्रीज्ञानोबारायांना ज्यांनी ताटीच्या अभंगातून उपदेश केला त्या आदिशक्ती मुक्ताबाईच्या अधिकाराचे वर्णन आपण किटक कुठे करणार.तिथे तर वेद ही मौन धारण करतात. विसोबा चाट्या दहा वर्षांच्या मुक्ताबाईंचे चरण धरतो,त्यांना शरण येतो तेव्हा माय मुक्ताबाई त्याला अनुग्रह देऊन कृतार्थ करतात व त्याला विसोबा खेचर असे नाव देतात. याविषयी एकनाथ महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे , "मुक्ताबाईने बोध खेचरासी केला । तेणे नामयाला बोधियेलें ।।" चौदाशे वर्ष वयाया महायोगी चांगदेवांना चौदा वर्षांच्या मुक्ताबाईंनी अनुग्रह देऊन कृतार्थ केले. प्रत्यक्ष पांडुरंगाचे लाडके नामदेवराय यांनाही सर्व संत मंडळीत कच्चे मडके ठरविले यातच या भगवती आदिशक्तीच्या अधिकाराची जाणीव होते. नामदेवराय आपल्या एका अभंगात मुक्ताईच्या अधिकाराची जाणीव करुन देतात ते म्हणतात, "लहानशी मुक्ताई जसी सनकांडी । केले देशोधडी महान संत ।।"

   मुक्ताई वयाने जरी लहानगी पोरं दिसत असली तर ती सणसणीत सनकांडीच आहे.लहान असुन मोठी तिखट आहे.तिने मोठ्या मोठ्या संतांना देशोधडीला लावले आहे.


मुक्ताबाई ची समाधी :-

              ज्ञानेश्वर माऊलींची ,सोपानकाका,चांगदेव यांनी समाधी घेतल्यावर माय मुक्ताबाई अतिशय उदास झाल्या.आता हे शरीर ठेवू नये असे त्यांना वाटू लागले.

"मुक्ताबाई उदासी झाली असे फार । आता हे शरीर रक्षू नये ।।१।। त्यागिले आहार अन्नपाणी सकळ । निवृत्तिराज तळमळी मनामाजी ।।२।।"


मुक्ताबाई या महाकल्पापर्यंत ,महाप्रलयापर्यंत चिरंजीव आहेत.निवृत्तीनाथांनी माय मुक्ताबाईंच्या डोक्यावर हात ठेवून "चिरंजीव" होण्याचा आशिर्वाद च दिला आहे.याल प्रमाण म्हणजे एकनाथ महाराजांचा अभंग -

नाथाचे आश्रमीं समाधिरहित । मुक्तता मुक्त नाम तुम्हां ।।१।। महाकल्पावरी चिरंजीव शरीर । कीर्ती चराचर त्रिभुवनी ।।२।। आनंदे समाधी सदा ती उघडी । नामस्मरण घडोघडी मुखोद्गत ।।३।। एका जनार्दनी नाम तुमचे गोड । त्रैलोक्य उघड नाम किर्ती ।।४।।


शके १२९९ वैशाख वद्य दशमीस माध्यान्हास तापीपूर्णांच्या संगमात मुक्ताबाईस निवृत्तीनाथांनी,रखुमाई,सत्यभामा यांनी मंगलस्नान घातले‌.तेव्हा स्नान करुन मुक्ताबाईंनी सर्व पांढरी वस्त्रे परिधान केली. त्यानंतर त्यांनी पांडुरंगाचे, रुक्मिणीचे व निवृत्तीनाथांचे दर्शन घेतले.तेवढ्यात फार आभाळ उठले.विजा चमकू लागल्या.ढग वरचेवर माथ्यावर येऊ लागले.प्रलयकालच्या विजांचा गडगडाट सुरु झाला.सोसाट्याचा वारा सुटला.

याचे वर्णन नामदेवराय करतात -

प्रळयींच्या विजा वर्षती अपार । झाला धुंधकार दाही दिशा ।।१।। झुंझाट सुटला वारा कांपूं लागे धरा । नभची अंतरा कालवलें ।।२।। नामा म्हणे देवा झाली कैसी गती । पडलीसे भ्रांती अवघ्या जनां ।।३।। निवृत्तीराज म्हणे प्रळयींचा वारा । सुटला शारंगधरा ऐसे वाटे ।।४।।

          हे सर्व सुरु असता निरंजनामध्ये मोठ्याने वीज कडकडाट करुन गर्जली व त्याबरोबर मुक्ताबाई गुप्त झाली.मुक्ताबाई माय अदृश्य झाली तेव्हा एक सारखा प्रहरभर लख्ख उजेड पडला होता व वैकुंठात १ लक्ष घंटा वाजत होत्या. नामदेवराय या प्रसंगाचे वर्णन आपल्या अंभंगातून करतात -

कडाडली वीज निरंजनी जेव्हा । मुक्ताबाई जेव्हा गुप्त झाली ।। वैकुंठी लक्षघंटा वाजती एकघाई । झाली मुक्ताबाई स्वरुपाकार ।। एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी । जेव्हा निरंजनी गुप्त झाली ।। गेले निवारुनी आभाळ आभूट । नामा म्हणे कोठे मुक्ताबाई ।।

 ‌ भगवती ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताबाई ज्या दिवशी तापी तिरावर गुप्त झाली ती तिथी होती शके १२१९ हेमलंबीनाम संवत्सर वैशाख शुद्ध १० तारीख १९/५/१२९९ दुपारी १ वा.१५ मी. पण खरे पाहता मुक्ताबाई माय त्याच देहाने आजही चिरंजीव आहेत.आजच्या या परम पावन दिनी माय माउली भगवती आई मुक्ताबाईंच्या चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो आणि नाथांच्याच शब्दात ही शब्दसुमनांजली श्रीचरणी अर्पन करतो.

"जगत्रय जननी मुक्ताबाई माते । कृपा करी वरद हस्ते मजवरी ।।"

 ✒️✍️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी/वाशिम ✍️✒️

No comments:

Post a Comment

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...