Tuesday, June 28, 2022

दत्तावतार सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांची १०८ वी पुण्यतिथी 🙏🌸🌺🚩

 


आराध्य_इष्टदैवत_प_पू_श्रीथोरल्या_स्वामीमहाराजांची_आज_१०८वी_पुण्यतिथी!! 🌺🌸🙏

             श्रीदत्तसंप्रदायातील मेरुमणी प्रत्यक्ष पंचम दत्तावतार असेलल्या परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची आज १०८ वी पुण्यतिथी. श्रीस्वामी महाराजांच्या रुपात प्रत्यक्ष दत्तप्रभुंनीच पुन्हा: शास्त्रमार्गाला , वैदिक धर्माला नवसंजीवनी दिली.श्रीवासुदेवानंद सरस्वती तथा टेंबे स्वामी महाराज यांचा जन्म श्रावण वद्य पंचमी आनंद नाम संवत्सर अग्निहोत्री कऱ्हाडे ब्राम्हण कुळात १३ ऑगस्ट १८५४ रोजी कोकणातील माणगाव श्रेत्री श्रीगणेशपंत टेंबे तथा रमाबाई या थोर दत्तभक्त सतशिल दाम्पत्या पोटी झाला‌. श्रीगणेशभट्टांना प्रत्यक्ष दत्तप्रभुंनीच गाणगापुरी आधी दृष्टांत दिला होता, आपल्या अवताराची कल्पना दिली होती.प.पू. थोरल्या स्वामी महाराजांचे प्रचंड कार्य, प्रखर शास्त्रनिष्ठा , अलौकिक अशी ग्रंथनिर्मिती , अत्यंत शास्त्रशुद्ध आणि कठोर असे शास्त्राचरण सर्व काही अतिदिव्य आणि शब्दातीतच. जणु स्वामी महाराजांच्या रुपाने भगवान आद्यशंकराचार्यांच पुन्हा अवतरले असे वाटते. श्रीथोरल्या स्वामी महाराजांना काही भक्तमंडळी भगवान श्रीवेदव्यासाचेही अवतार मानतात त्याला कारण ही तसेच आहे. भगवान व्यासांनी सर्व अवतारांवर पुराण रचले आहे पण स्मतृगामी असलेल्या परब्रह्म दत्तप्रभुंवर त्यांनी पुराण रचले नव्हते जणु ही अपूर्णता भरुन काढण्यासाठीच त्यांनी वासुदेवानंद सरस्वती हा अवतार धारण करुन "श्रीदत्त पुराण" या अलौकिक ग्रंथांची निर्मिती केली व ती उणीव ही भरुन काढली. श्रीस्वामी महाराजांची ग्रंथ संपदा बघितली तर कुणालाही आश्चर्य वाटेल इतके ते दिव्य व शब्दातीत आहे. भगवान आद्य शंकराचार्यांनंतर इतके अलौकिक साहित्य निर्माण करणारे श्री स्वामी महाराज एकमात्र असतील. एखादं स्तोत्र जरी वाचायला घेतलं तरी याची प्रचिती आल्या शिवाय राहणार नाही. श्रीस्वामी महाराजांनी अतिशय विलक्षण अशी ग्रंथ निर्मीती केली आहे त्यात श्रीदत्तपुराण, द्विसाहस्त्री गुरुचरित्र, श्रीदत्त महात्म्य, समश्लोकी गुरुचरित्र , श्रीदत्तचंपु , सप्तशतिगुरुचरित्रसार , श्रीदत्तलिलामृताब्धीसार, योगरहस्य ,शिक्षात्रयी असे अनेक ग्रंथ ,प्रकरण, पदं, अभंग ,शेकडो स्तोत्र या सर्वांचा समावेश होतो.श्रीस्वामी महाराजांचे वैशिष्ट्य असे की ते एकाच पदात वा रचनेत मोठ्या खुबीने अनेक मंत्र गुंफत असतं. म्हणजे त्याचा पाठ करतांनी इतर देवतांच्या मंत्र्यांचे, सुक्तांच्या मंत्राचेही पाठ नकळत घडतात. श्री स्वामींच्या ग्रंथाचे नसुते वाचन करुनही कित्येकांना दत्त कृपेची अनुभूती आली आहे. असे हे अलौकिक आणि प्रसादीक दिव्य वाङमय आहे. या वाङमयातील श्री स्वामी महाराजांनी दिलेली सर्वात महत्वाची देणगी म्हणजे "करुणात्रिपदी" आणि "घोरकष्टोउद्धरण स्तोत्र" ज्यांचे आज घराघरात पाठ केले जातात. या दोन्हीच्या पाठानेच कित्येक दत्तभक्तांचे असाध्य आजार, कष्ट, व्याधी, दु:ख आणि इह पारलौकिक अडथळे दूर झाले आहेत. कुणीही यांचा श्रद्धापूर्वक पाठ करून अनुभव घेऊ शकतो. 

                       श्रीस्वामी महाराजांच्या चरित्राचे अवलोकन केले तर त्यातील स्वामींचे कठोर शास्राचरण, दत्तलिला बघुन कुणीही आश्चर्याने तोंडात बोट घालावी इतके ते दिव्य आहे.आजिवन श्रीस्वामींच्या सोबत फक्त दोन छाट्या,दोन लंगोट्या,एक दंड आणि कमंडलु आणि लिहायला लेखनी व काही ग्रंथ  एवढेच सामान सोबत असायचे.स्वामींनी कधीही धनाला वा पैशांना स्पर्श केला नाही. श्री स्वामी महाराजांशी प्रत्यक्ष दत्तप्रभु संवाद साधायचे, प्रत्यक्ष विग्रह रुपाने स्वत:हून त्यांच्या सोबत राहायचे हे आपल्या सर्वांना श्रुत आहेच. श्रीस्वामी महाराजांची शास्त्र निष्ठा इतकी प्रखर होती की दाक्षिणात्य ब्राम्हणाचे घर न मिळाल्याने वीस-वीस दिवस श्रीस्वामींना उपवास घडल्याचे दाखले चरित्रात मिळतात. श्रीस्वामींना संग्रहनीमुळे ब्रह्मावर्ताला असतांना  रोज २ किमी चे अंतर पार करुन दिवसातुन १२/१३ वेळा कधी कधी २० वेळाही शुद्धी आणि स्नानासाठी जावं  लागतं असे .तेव्हा भरं उन्हात श्रीस्वामी महाराज त्या तप्त रेतीतुन चालत स्नानास जात असतं हे सर्व वाचुनच अवाक् व्हायला होतं‌. एवढेच काय तर देह ठेवण्याच्या आधी पर्यंत स्वामींनी आपल्या नित्य कर्माचा त्याग केला नव्हता. जोवर पळीतुन हातात घेतलेले जल निखळले नाही तोवर कर्म सोडले नाही इतकी प्रखर कशी कर्मनिष्ठा .प्रत्यक्ष अष्ठमहासिद्धी दारी हात जोडून तिष्ठत असतांनीही थोरल्या स्वामींनी पूर्ण अवतार काळात कधीही त्यांचा उपयोग केल्याचे दिसून येत नाही .श्रीस्वामींनी आजिवन कधीही पायात पादत्राणे व शिरावर छत्र धारण केले नाही, कधीही ते कुठल्याही वाहनात बसले नाहीत. श्रीथोरल्या स्वामी महाराजांनी २४ चातुर्मास केले होते त्यांची फक्त सुची जरी डोळ्यापुढे ठेवून अवलोकन केले तर लक्षात येईल की हिमालयापासुन थेट दक्षिणेपर्यंत स्वामींनी सर्व भारत हा फक्त पायी चालत पार केला. मानवी बुद्धीला हे सर्व अशक्यप्राय वाटावं एवढे ते अलौकिक आहे.दृश्य स्वरुपात स्वामींनी तिनं वेळा संपूर्ण भारत पादाक्रांत केला होता.  मानवी देह धारण करुन दत्तप्रभुंनी ही सर्व लिला स्वत: केली . श्रीस्वामी महाराजांनी दत्तसंप्रदायातील सर्व तिर्थक्षेत्रांना नवचेतना दिली.प्रत्येक दत्तक्षेत्रांना उपासना पद्धती,पूजा पद्धती घालून दिल्या.श्रीक्षेत्र पिठापुर ,श्रीक्षेत्र कारंजा अशी अनेक दत्तक्षेत्रे शोधली , कुरवपूर सारख्या अप्रकाशित क्षेत्री चातुर्मास करुन तिथे सर्व व्यवस्था लावून पुन्हा ते क्षेत्र प्रकाशात आणले तसेच  त्या ठिकाणी झालेली दत्तलिला ,स्थान महात्म्य सर्वां समोर आणले. श्रीदत्तसंप्रदायाला "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" हा महामंत्र ही श्रीस्वामी महाराजांनीच दिला . श्रीस्वामी महाराजांच्या चरित्रातील एक एक प्रसंग घेतला आणि त्यावर चिंतन केले तर जिवनही कमी पडेल. श्रीस्वामींची समर्थ शिष्य परंपरा पाहीली तर दत्तसंप्रदायातील थोरले ही बिरुदावली कशी सार्थ आहे याची जाणीव प्रत्येकाला होईल. श्रीस्वामी महाराजांच्या शिष्यांमध्ये श्री योगानंद सरस्वती तथा गांडा बुवा, श्री नृसिंह सरस्वती स्वामी तथा दिक्षीत स्वामी महाराज, श्री योगीराज गुळवणी महाराज, श्री दत्तमहाराज अष्टेकर तथा दिवान महाराज, श्रीसिताराम महाराज टेंबे, श्रीरंगावधूत महाराज , श्रीनाना महाराज तराणेकर ,श्री गोविंद महाराज पंडित, श्रीकेशवानंद सरस्वती तांबे ,श्रीधुंडीराज महाराज कवीश्वर  अशा अनेक महत्तम विभुतींचा समावेश होतो. 

                      टेंब्येस्वामींनी संपूर्ण भारत देश पायी फिरून सनातन वैदिक धर्माला आलेली ग्लानी दूर करून धर्माची पुनर्स्थापना केली. त्यांचे कार्य इतके अद्भुत आहे की, त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. श्रृंगेरी पीठाचे तत्कालीन शंकराचार्य श्रीमत् सच्चिदानंद शिवाभिनव भारती महास्वामींनी उपस्थितांना प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराजांची ओळख "गुप्तरूपातील भगवान श्रीमद् आद्य शंकराचार्य" अशीच करून दिली होती व हीच वस्तुस्थिती आहे. ते साक्षात् भगवान श्रीशंकराचार्यच होते. प. प. टेंब्ये स्वामी महाराजांनी वयाच्या साठाव्या वर्षी, गुजराथ राज्यातील नर्मदा काठावरील पवित्र गरुडेश्वर स्थानी, आषाढ शुद्ध प्रतिपदा, दि. २३ जून १९१४ रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास नश्वर देहाचा त्याग केला. त्यांचे पावन समाधी मंदिर तेथे उभारण्यात आलेले आहे. श्री. गणेशपंत सातवळेकर यांनी प. प. श्री. टेंब्येस्वामींना एकदा विचारले होते की, आपल्यालाही पुनर्जन्म आहे का? त्यावर प. प. श्री. स्वामी उत्तरले, "हो आहे तर. हा तर केवळ अरुणोदय आहे." त्यानुसार प. प. श्री. टेंब्ये स्वामी महाराजांनी प. पू. सौ. पार्वतीदेवी देशपांडे यांना दिलेल्या आशीर्वादानुसार, समाधी घेतल्यावर लगेच दुस-या दिवशी पुन्हा त्यांच्या पोटी जन्म घेतला. तेच पुन्हा "श्रीपाद" रूपाने अवतरले. मुलाचे हे नावही स्वामींनीच आधी सांगून ठेवलेले होते. हेच श्रीपाद दत्तात्रेय देशपांडे म्हणजे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज होत. त्यांचेही अवतारकार्य  प. प. श्री. टेंब्येस्वामींसारखेच विलक्षण आहे. परवा प.पू.श्रीमामा माउलींची जयंती त्यानिमित्ताने आपण त्यांच्या ही अलौकिक अशा दिव्य चरित्राचे ओझरते दर्शन घेण्याचा प्रयत्न करु.


#अवधूत_चिंतन_श्रीगुरुदेव_दत्त🌺🙏🌺🙏

                

         ✒️✍️अक्षय जाधव आळंदी✍️✒️


जितेंद्रिय गणाग्रणीरभिरत: परे ब्रह्मणि ।

कलौ श्रुतिपथावनेऽत्रितनयोऽवतीर्ण: स्वयम् ॥

करात्तसुकमण्डलु: कुमतखण्डने दण्डभृत् ।

पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यति:॥


वासुदेव सरस्वतै भक्तानां कामधेनवे|

दत्तात्रेयावताराय टेंबे स्वामी नमोस्तुते||


श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा |

वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा ||

🚩🚩🌹🌹❤❤🙏🙏☘☘

Monday, June 13, 2022

श्रीनृसिंहवाडीचे_दत्त_परमहंस_श्रीमहादबा_पाटील_महाराजांची_आज_४०_वी_पुण्यतिथी☘️🌸🙏🌺


 श्रीनृसिंहवाडीचे_दत्त_परमहंस_श्रीमहादबा_पाटील_महाराजांची_आज_४०_वी_पुण्यतिथी:- 🙏🌺🕉️🌸☘️

           

                               श्रीदत्त संप्रदाय म्हणजे "अवधूतांची खाणच" असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही‌.भगवान दत्तात्रेय प्रभु हे विविध महात्म्यांच्या रुपात येऊन वेळोवेळी भक्तकल्याण करते झाले आहे.शेकडो वर्षा पासून आजही या दत्त संप्रदायात विलक्षण आणि अतिशय दिव्य असे महापुरुष होऊन गेले.त्याच महापुरुषांच्या मांदियाळीतील झालेले एक अतिशय विलक्षण आणि थोर महापुरुष म्हणजे सद्गुरु श्री महादबा पाटील महाराज. श्री दत्तप्रभुंची राजधानी असलेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे गेल्यावर श्रीपादुका घाटाच्या वरील बाजुस, संस्थानाच्या भक्तनिवासाच्या अगदी जवळ आपल्याला एक भव्य असं मंदिर लागतं ते मंदीर म्हणजे श्रीमहादबा पाटील महाराजांचे समाधी मंदिर आहे.दत्तसंप्रदायातील पराकोटीचे विलक्षण सिद्ध अवतारी सत्पुरुष असलेले श्री महादबा महाराज अतिशय प्रसिद्धिपराङमुख होते.कुठेही प्रगट होऊन कार्य त्यांनी केल्याचे दिसत नाही.अतिशय उन्मनी आणि बालपिशाच्चवृत्तीतील हे महापुरुष सदैव आपल्या आत्मानंदातच तल्लीन असतं. महादबा महाराजांची आज पुण्यतिथी त्या निमीत्ताने त्यांच्या चरित्राचे ओझरते दर्शन आपण आज करुयात.

                         धुळगाव (सोनी) तालुका. तासगाव,जिल्हा सांगली या गावी श्री बाबगोंडा पाटील व सौ.बायाक्का माता या दत्तभक्त दांपत्यापोटी जन्मसिद्ध असलेल्या महादबा पाटील महाराजांनी अश्विन शुद्ध त्रयोदशी सोमवार दि.९ ऑक्टोबर १९१६ साली जन्म घेतला. महाराजांच्या घराण्याला पाटीलकी आधीपासुनच होती आणि त्यांचे संपूर्ण घराणे हे पूर्वापार दत्तभक्त होते.जणु दत्तभक्तांच्या या शुद्ध बिजापोटी महाराजांसारखे सिद्ध अवतारी महात्मे फलस्वरुप त्यांना प्राप्त झाले होते. महाराजांचे वडील श्री.बाबगोंडा पाटील हे अखंड ४० वर्षे प्रत्येक पौर्णिमेला श्रीक्षेत्र नृसिंहवाडीची पायी वारी करीत असत. या सेवेचा परिपाकच जणु महाराजांसारखे सिद्ध त्यांना पुत्ररुपाने प्राप्त झाले. पुढे श्रीमहादबा महाराजांनी सुद्धा ही पौर्णिमेला पायी वाडीला जाण्याची परंपरा अखंडपणे चालु ठेवली.श्रीमहादबा महाराज हे लहानपणापासूनच वाचासिद्ध होते. एकंदर त्यांच्या लहानपणाच्या लिलांवरुन,त्यांच्या दिव्य प्रतिभेवरुन पाटील घराण्यात सिद्ध जन्माला आले याची लोकांना जाणिव होवु लागली होती.महाराज वयाच्या सातव्या वर्षापर्यंत अधूनमधून घराबाहेत जात असत.पुढे बाराव्या वर्षी त्यांनी घर सोडले ते कायमचेच.श्रीमहादबा महाराज हे नैष्ठिक ब्रह्मचारी,स्वेच्छाविहारी,पूर्ण विदेही,एकांतप्रेमी,आत्मानंदात लिन,भक्तांनी आठवण काढताच भक्ताकडे धाव घेणारे असे अलौकिक सत्पुरुष होते.अन्य सत्पुरुष,संतांप्रमाणे साधना करुन आत्मज्ञान व आत्मसामर्थ्य प्राप्त करण्याची त्यांना आवश्यकता नव्हती. ते म्हणत, `मी शिकुन आलोय' ते जन्मसिद्ध असल्यामुळे त्यांना बाह्य गोष्टींची गरज नव्हती.महादबा महाराज हे स्वयंभू सिद्ध व आत्मज्ञानी होते.

खटाव (नांद्रे) येथील प.पू.श्रीरामानंद महाराज खटावकर यांचा महादबा महाराजांवर अनुग्रह झाला होता.तरी महाराजांच्या जिवनात साधकावस्था आढळत नाही.श्रीरामानंद महाराज हे नाथ परंपरेतील असल्यामुळे पाटील महाराज हे नाथ परंपरेशी अनुबंधित असावेत.औपचारिकदृष्ट्या बघितले तर महाराजांचे शिक्षण हे मराठी चौथी पर्यंत झाले होते परंतु आश्चर्य म्हणजे ते भक्तांना दासबोध ,ज्ञानेश्वरीतील एखादा अध्याय काढायला लावून त्यांच्याकडून एखादी ओवी वाचुन घेत आणि आपण त्या ओवीचा अर्थ सोदाहरण समजावुन सांगत.त्यांना अशा सर्व ग्रंथांचे ज्ञान होते व ग्रंथातील सर्व श्लोक,ओव्या ही त्यांना माहीत असत.श्रीमहाराजांचा अधिकार फार उच्च कोटीतील होता.महाराज त्रिकालज्ञानी होते.ते भक्तांना सांसारीक,पारमार्थीक आणि भौतीक मार्गदर्शन करीत व त्यांच्या अडीअडचणी सोडवत असत.क्वचितच लोक त्यांच्या कडे अध्यात्मिक ज्ञान घेण्यासाठी येत.त्यांनाही महाराज कृतकृत्य करत.महाराजांकडे सर्व जातीधर्माचे लोक येत असत.गरीब श्रीमंत असा भेदभाव त्यांच्याकडे नव्हता.कर्मकांडाचा प्रचार त्यांनी कधीही केला नाही.महाराजांच्या भक्ताबद्दल बोलायचे झाले तर असंख्य लोकांचा ते आधार होते.भक्त त्यांना बस,सायकलवरुन,पायी तसेच मोटारसायकलवरुन किंवा बैलगाडीने महाराजांच्या इच्छेनुसार सोडत असत व त्यांना मिळेल त्या वाहनाने अगदी विमानानेसुद्धा भक्त त्यांना नेत असत. पाटीलबाबा हे योगी पुरुष होते तसेच ते राजयोगी ही होते. महाराजांच्या खिशात सदैव एक डबी ठेवलेली असे त्यात नृसिंहवाडीचा अंगारा सदैव त्यांच्या बरोबर असे.भक्तांनी आपल्या अडचणी सांगीतल्या की महाराज त्या डबीतील अंगारा काढुन भक्तांला लावत आणि त्यामुळे भक्तांच्या अडचणी दुर होत असत. महाराजांनी कधीही पैशाला स्पर्श केला नाही.ते कधीही धनाला शिवले नाही. ते देवावतारी असुन सुद्धा सामान्यासारखे राहिले.अखंड ५० ते ५५ वर्षे ते मिळेल त्या साधनाने भक्तांकडे जाऊन त्यांना आशिर्वाद व अंगारा देऊन अडचणीतुन सुटका करीत.भक्तांचे मनोरथ पूर्ण करणे हेच आपले काम आहे असे ते मानत असत.भक्तसुद्धा महाराजांच्या बरोबर राहुन त्यांची सेवा करण्यात धन्यता मानत असत.महाराज पौर्णिमेस नरसोबा वाडीला व संकष्टीला मिरजेतील थोर संत अण्णाबुवांच्या मठात नेमाने जात व राहत असत.मुंबई,पुणे,बंगळुरु,आंध्रप्रदेश,गुजरात,मध्य प्रदेश अशा लांबच्या गावी सुद्धा भक्तांनी त्यांना नेऊन यात्रा केल्या आहेत.महाराज मितभाषी होते,मोजकेच बोलत.ते शाकाहारी होते.महाराजांची राहणी अत्यंत साधी होती. धोतर,शर्ट,करवतकाठी उपरणे,वुलनचा कोट,डोक्याला लाल रुमाल असा त्यांचा वेश असायचा.त्यांच्या हातात सदैव एक काठी असायची.चेहर्यावर लहान मुलासारखी निरागसता होती.ते सदैव धोतराचा सोगा तोंडात धरुन आकाशाकडे नजर लावून आत्ममग्न स्थितीत बसलेले असत.

         त्यांनी अनेक भक्तांना आणि संतांना आपले चैतन्य स्वरुपाचे दर्शन घडविले होते.महाजांच्या समकालीन असलेले अनेक संत म्हणत , `पाटील महाराज हे त्रिकालज्ञानी व चालते बोलते ब्रह्म आहेत.विदेही असुन ज्ञानी व राजयोगी थाटात वागणारे सिद्ध पुरुष आहेत.ते साक्षात दत्तगुरुच आहेत.' महाराजांचे श्रीसद्गुरु केशवनाथ महाराज,दत्तावतारी श्रीसद्गुरु मामा महाराज  देशपांडे यांच्याशी फार प्रेमाचे नाते होते. महादबा महाराज भक्तांना नामस्मरण करायला,सदग्रंथाचे वाचन,प्रवचन-किर्तन ऐकायला सांगत असत. `सच्चाने वागा,लबाडी करु नका.कुणाला फसवु नका. फुकटचे खाऊ नका,संपत्तीचे प्रदर्शन करु नका.माणुसकीने वागा.' हाच आपल्या भक्तांना त्यांचा उपदेश असे.बुवाबाजी करणार्यांच्या अंगावर ते धावून जात.समाधी घेण्याच्या वर्षभर आधी ते स्वत: प्रत्यक्ष भक्तांच्या घरी जाऊन अगदी भक्तांना शोधुन काढून त्यांना आपल्या सेवेची संधी दिली.आशिर्वाद व अंगारारुपी सामर्थ्य दिले येथुन पुढे नृसिंहवाडीला या असा आदेश सर्व भक्तांना दिला.भक्ताच्या कल्याणासाठी मी अनंतकाळ अखंड चिरंतन वाडीत वास्तव्य करुन आहे असा भक्तांना भरवसा दिला.महाराजांनी वाडीत स्वत: मठ बांधून घेतला,पण कोणासही शिष्य केले नाही.त्यांनी स्वत: १९८१ साली ट्रस्टची स्थापना केली व मठाची व्यवस्था ट्रस्ट कडे सोपवली.मठामध्ये त्यांनी समाधीची जागा निश्चित करुन या ठिकाणी समाधीस्त करा असा आदेश दिला होता.महाराज हे महायोगी होते,इच्छा मरणी होते.त्यांनी देह ठेवला हा स्वत: ठरवून.श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे पौर्णिमेच्या आदल्या दिवशी महाराजांची तब्येत खालावली पण महाराजांच्या चेहेर्यावरील तेज हे प्रचंड वाढले होते.सहस्र सुर्याप्रमाणे महाराजांचा चेहेरा तेजस्वी दिसु लागला.आदल्या दिवशी महाराजांनी कुंभार महाराजांना ज्ञानेश्वरी वाचायला सांगितली.ज्ञानेश्वरीतील "आत्मा अमर आहे, अविनाशी आहे.तो जाळल्याने जळत नाही,भिजवल्याने भिजत नाही.ते चैतन्य अखंड राहते."महाराजांनी खुण करुन पारायण थांबविले.पुढे महाराज म्हणाले, "मी कुठेही जाणार नाही,इथेच आहे..या मठात.मला नेहमी वाडीत भेटायला या.देह दृष्टीआड होईल पण आत्मा अमर आहे.मी चैतन्यरुपाने सदैव इथेच आहे." मी महाराजांचे हे निर्वानीचे शब्द ऐकून सर्व भक्तांना हुंदकाच भरुन आला.सद्गुरु माउलींचा विग्रह आता आपल्याला होणार या विचाराने ही सर्वांना हलवून सोडले. रात्री भजन झाले व भजनानंतर सर्वांना महाराजांनी विश्रांती घेण्यास पाठवले.नाममात्र सर्व भक्त लोक पडून होते.कुणालाही झोप ही आलीच नाही.रात्री महाराजांना ताप वाढला.डॉक्टर बिपी चेक करत होते.ताप कमी होण्यासाठी गोळ्या दिल्या.आदल्या दिवशी रक्त, लघवी परिक्षणासाठी कुरुंदवाड ला पाठविल्या पण आश्चर्य असे की सर्व रिपोर्ट नॉर्मल आले.डॉक्टरांनी ही आपल्या प्रयत्नांची शर्थ केली.सकाळी चार वाजता महाराजांनी थोडी कॉफी घेतली. उपस्थीत भक्तांना ते सारखं विचारीत होते , "सहा वाजले का? देवांची घंटा वाजली का?" भक्तांनी उत्तर दिले , " महाराज झोपा,विश्रांती घ्या."  पहाटे लोक ,आलेले नृसिंहवाडीतील भक्त स्नानाला कृष्णामाईला जात होते. तेवढ्यातच देवांची पहाटेची घंटा वाजली.धुप झाला.सुर्यनारायाणाने प्राचीमुखाला डोके वर काढलेच होते.सकाळी सहा वाजून पाच मिनिटे झाली.श्रीमहाराज उठून सुखासनात बसले.चेहर्यावर विलक्षण तेज तळपत होते.त्यांनी देवांचा घंटा ऐकला व अलगद आले प्राण ब्रह्मरंध्रात खेचून दत्तचरणी विलीन केले व आपले अवतार कार्य संपविले.महाराजांनी देह ठेवल्याची वार्ता वार्या सारखी पसरली ,एकच गोंधळ उडाला.सर्वत्र भक्त दु:खाने विलाप करु लागले.पुढे महाराजांच्या दर्शनाला मोठा जनसागर उसळला.महाराजांच्या देहाची टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढली गेली.महाराजांनी आधी सांगितल्याप्रमाणे नृसिंहवाडी येथील चिंचेच्या झाडाखाली समाधी देण्याचा विचार मंडळी करतच होती तोच वाडीतील काही ब्रह्मवृंदांनी इथे आजवर कुणालाही भुगर्भ समाधी न दिल्याचा ,व तसे करण्यास आक्षेप घेतला.तसा ताम्रपट ही दाखविला त्यामुळे डी वार पाटील साहेबांचाही नाइलाज झाला.काही भक्तांनी आपली जमिन देऊ केली.पण सद्गुरुंनी सांगितले तेच ब्रह्मवाक्य.या न्यायाने श्रीपुजारी व चाफळकर यांनी महाराजांनी सांगितले त्याच जागी देहाला समाधी द्यायची हा आग्रह धरला.श्री चाफळकर यांनी दत्तगुरुंना कौल लावायचे ठरविले.देवांनी उजवा कौल दिला व समाधी चिंचेच्या झाडाखालीच द्यावी हा विचाराला परवानगी दिले. त्यामुळे सर्वांनी महाराजांना आज दीसते त्या जागेवर चिंच वृक्षाखाली भूगर्भ समाधी दिली.

दिवस व वेळ ठरवून ,सर्वांना अगोदर सांगून व टिपून ठेवून परमपूज्य सद्गुरु श्री महादबा पाटील महाराजांनी नृसिंहवाडीच्या अधिकृत मठात जेष्ठ महिन्यातील वटपौर्णिमेस  शके १९०४ रविवार दि.६ जुन १९८२ राजी सकाळी ६ वाजुन ५ मिनीटांनी दत्त मंदिरात घंटानाद होत असतांना समाधी घेतली. समाधीत असतांनाही आजही महाराज अखंड आपल्या भक्तांचे रक्षण करण्यास सज्ज आहेत.आजही मी चैतन्य रुपाने वाडीतच आहे.या आपल्या आश्वासनाचा अनुभव प्रत्येक भक्ताला देतच आहेत.

                        श्रीमहादबा महाराज आणि दत्त संप्रदायातील थोर अवतारी संत सद्गुरु श्री मामा साहेब देशपांडे महाराज यांचे अतिशय हृद्य आणि प्रेमाचे ऋणानुबंध होते.श्रीमहाराजांचा श्रीमामांवर अतिशय निस्पृह असा स्नेह होता व ते मामांना मोठ्या भावासारखा मान द्यायचे.सद्गुरु श्री मामांचे आणि महाराजांचे हे हृदय संबंध दर्शविणारे काही विशेष प्रसंग आपण बघुयात. सद्गुरु मामांनी सांगलीला आपल्या सद्गुरु माउलींच्या नावाने म्हणजे "प.पू.सद्गुरु वा.द.गुळवणी प्रतिष्ठान" या नावाने प्रतिष्ठान उभारले होते.या प्रतिष्ठानाचे बांधकाम सुरु असतांना व नंतर ही मामा वारंवार सांगलीला येत असत.त्या वेळी सद्गुरु श्री महादबा महाराज काही वेळ त्यांच्या बरोबरच असायचे. एकदा तेथे पाण्यासाठी नवी बोअर घेण्याचे होते.त्यासाठी तेथील व्यवस्था करणारे श्री कुलकर्णी यांनी प.पू.मामांना पुण्यात माउली आश्रमात फोन लावला व विचारले, "प्रतिष्ठानच्या जागेत बोअर कूठे मारायचे?" त्यावर प.पू.मामा म्हटले, "अरे,पाटील महाराज याविषयी तुला सांगतील.ते जिथे सांगतील तिथे बोअर घ्या!" कुलकर्णींनी सद्गुरु मामांचे बोलणे पूर्ण झाल्यावर मामांना नमस्कार करुन फोन ठेवला.फोन ठेवतात तोच दारावर थाप पडली.त्यांनी दार उघडले तो दारात प्रत्यक्ष दत्त श्रीपाटील महाराज उभे होते.ते कुलकर्णी कडे पाहून म्हणाले की , "अरे,मामांना कशाला त्रास देतोस? तुला हवं तिथे बोअर मार ,चांगले पाणी लागेल!" असे सांगून लगेच पाटील महाराज निघून ही गेले. खरंतर कुलकर्णी आणि प.पू.मामांचे फोनवर बोलणे, प.पू.पाटील महाराजांचे दारात दत्त म्हणून उभे ठाकणे या घटना काही मिनीटात इतक्या वेगाने घडल्या की या दोन्ही महात्मांच्या हा विलक्षण अंतरंगातील एकसुत्र भाव किंवा एकमेकांशी जोडले असलेला भाव बघून कुलकर्णी तर थक्कच झाले ‌.तसेच १९८१ साली सांगली येथे सद्गुरु श्री गुळवणी महाराजांच्या ७ व्या पुण्यतिथी उत्सवा प्रसंगी स्वतः पाटील महाराज उपस्थित होते. तसेच त्याच साली प.पू.मामांचे श्रावण अनुष्ठान हे सांगली येथेच पार पडले होते.या वेळी मामांच्या भोवती अनेक लोकांचा प्रापंचिक अडी अडचणी सोडविण्यासाठी मोठा गराडा पडलेला असायचा.श्रीमामाही आपल्या अकारण करुणामय स्वभावाला धरूनच त्या सर्व लोकांना सर्व प्रकारे मार्गदर्शन करायचे.पण यात मामांना अजिबात विश्रांतीसाठी सवड मिळत नसे.याच अनुष्ठानात एके दिवशी सद्गुरु श्री पाटील महाराज हे मामांना भेटण्यास तिथे आले.महाराज आल्याची वार्ता कळल्यावर या कामचलाऊ लोकांचा लोंढा महाराजांकडे वळला.पण पाटील महाराज कुणाकडूनही पाया पडून घेत नसत.कुणी पाया पडायला गेलाच तर ते आपल्या हातातील काठीचा प्रसाद त्याच्या पाठीवर जोरदार द्यायचे.या आपल्या कडे आलेल्या लोकांच्या लोंढ्यावर महाराज एकदम ओरडले, "साल्यांनो! नुसते मामा मामा करता आणि आपली सर्व पापे,कर्म आणून त्यांच्या डोक्यावर ओतता होय रे!कुणाला तरी चाड आहे का परमार्थाची?" पाटील महाराजांच्या हृदयात सद्गुरु श्री मामां विषयी असलेले निखळ प्रेम आणि जिव्हाळा हेच महाराजांच्या संतापाचे कारण व यामुळेच महाराज या लोकांवर संतापले. प.पू श्री महादबा पाटील महाराजांनी ६ जून १९८२ ला देह ठेवला.त्यावेळी पू.श्री मामा हे कर्हाड या गावी होते.त्यावेळी पहाटेची सामुहिक साधना झाली की मामा नित्याप्रमाणे प्रवचन सेवा करण्यासाठी शिष्यांपुढे  बसले.प्रवचन देण्याआधी नित्याच्या शिरस्त्याप्रमाणे "हरे राम हरे राम राम राम हरे ......" हा गजर मामांनी केला व प्रवचनाला सुरुवात केली.पाच-दहा मिनिटे होतात न होतात तोच मामा अचानक आपल्या पुढे बसलेल्या साधक वर्गास म्हटले, "आत्ताच आमच्या महादबा पाटील महाराजांनी देहत्याग केला आहे.त्यामुळे आज इथेच प्रवचन सेवा संपन्न करीत आहोत." हे सांगताना प.पू.मामांना गहिवर आलेला होता.या प्रसंगातून आपल्याला प.पू.श्रीमामांचा आणि प.पू‌.श्री महाराज यांचा अद्भुत स्नेहबंध लक्षात आलाच असेल.या दोन्ही दत्तावतारी महापुरुषांच्या चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏.

अशा या सिद्ध दत्तावतारी श्रीमहादबा पाटील महाराजांची आज ४० वी पुण्यतिथी .या पावन दिनी त्यांच्या चरित्राचे स्मरण करुन महाराजांच्या चरणी सांष्टांग दंडवत करुयात.सद्गुरु श्रीमहादबा पाटील महाराजांना कोटी कोटी प्रणाम करुन प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या सर्वांकडून अखंड सद्गुरु चरणांची सेवा करुन घ्यावी.खरंतर महाराजांचे चरित्र अजुन तरी प्रकाशीत झालेले नाही.ही वरील संक्षिप्त चरित्र माहिती असेच एकदा जुने कॅलेंडर चाळत असतांना मला मिळाली होती  जी मी संकलित करुन ठेवली होती व मागे दोन-तिन वर्षा आधी लेखाद्वारे मांडली होती.आज परत त्या लेखात प.पू.मामांचा महाराजांशी असलेल्या आत्मिय संबंधाची माहिती जी अलिकडेच उपलब्ध झाली ती समाविष्ट करुन हा स्वतंत्र लेख लिहीला आहे.

       ✒️✍️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️


#दिगंबरा_दिगंबरा_श्रीपाद_वल्लभ_दिगंबरा🌸🙏

#श्रीस्वामीसमर्थजयजयस्वामीसमर्थ🌸🌺🙏

#जय_शंकर🌸🌺🌹🙏

Wednesday, June 8, 2022

येहेळगाव निवासी समर्थ सद्गुरु योगीराज श्रीतुकाराम महाराज म्हणजे आपल्या सर्वांचे तुकामाय महाराजांची १३५ वी पुण्यतिथी 🙏🌸🌺🌿

 


धन्य ते तुकामाय गुरु समर्थ 🌸🌺🌿🙏 :-


                      एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या पुण्यभूमी हिंदूस्थानात होऊन गेलेल्या हजारो ब्रह्मनिष्ठ महापुरुषांच्या मांदियाळीतील एक अतिशय विलक्षण योगी,एक थोर ब्रह्मज्ञानी महात्मा,एक महान संत म्हणजे योगीराज श्रीतुकाराम महाराज.ज्यांना आपण सर्व लोकं "तुकामाय" म्हणूनच संबोधतो.श्री तुकामाय म्हटले की आपल्याला प्रथम आठवण होते ती म्हणजे नामावतार सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची.तुकामाय यांचे वर्णन श्रीमहाराजांच्या चरित्रात आलेले आपण वाचलेच आहे.श्रीतुकामाय हे इतके विलक्षण महापुरुष होते की त्यांचे स्वतंत्र चरित्र वाचले की बुद्धी स्तिमीत होते.एक थोर दिव्य नाथ परंपरेचे तुकामाय हे भाग होते.त्या दिव्य परमहंस नाथ परंपरेला साजेसे व त्या परंपरेचे चुडामणीच श्रीतुकामाय आहेत असे म्हटले तर वावगे होणार नाही.श्रीतुकामाय महाराजांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना जरी अनुग्रह देऊन रामनामाचा प्रचार करायला सांगितले  व सामान्य लोकांना नाम महात्म्य पटवून देऊन ,त्यांना समजेल ,उमजेल असा सहज, सोप्या असलेल्या भक्तिमार्गाला लावण्याचे कार्य सोपविले.पण स्वतः तुकामाय हे एक महान योगीराज होते.सर्व योगसिद्धीत ते स्वत: पारंगत होते याची जाणीव आपल्याला तुकामायचे चरित्र वाचल्यावर होतेच होते.पण तुकामाय महाराजांच्या चरित्रात त्यांनी भक्ती व योगाची विलक्षण, असाधारण सांगड घातल्याचे आपल्या सर्वांना लक्षात येईल. तुकामाय हे समाजातील प्रत्येक घटकाला हृदयाशी कवटाळून त्यांचे दु:ख दूर करतांना आपल्याला चरित्रात जागोजागी दिसून येतात.बहूजन समाजावर आईसारखे प्रेम करणारे तुकामाय "माय" या शब्दाला साजेस रुप,चरित्रच धारण करुन आले होते हे आपल्याला चरित्र वाचल्यावर लक्षात येईलच.आज ज्येष्ठ शुद्ध अष्टमी आजच्याच दिवशी तुकामाय महाराजांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला होता.आज तुकामाय महाराजांची १३५ वी पुण्यतिथी.या परमपावन दिनी आज आपण या विलक्षण लोकोत्तर आणि दिव्य महापुरुषांच्या चरित्राचे चिंतन करुयात.
                                  मराठवाड्यातील हिंगोली  जिल्ह्यातील आडमार्गावर असलेले येहेळगाव नावाचे एक लहानसे खेडे आहे.या गावात काशीनाथपंत नावाचे यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण राहत असत.अतिशय वेदशास्त्रसंपन्न ,आचारनिष्ठ व भगवदभक्त असलेले काशिनाथ हे एक चारित्रवान व्यक्ती होते.ते एका तपस्वी ऋषिप्रमाणेच आपले जिवन व्यतित करत होते.अतिशय निस्पृह आणि विचारशिल व्यक्ती म्हणून संपूर्ण गावात त्यांना मोठा मान होता.ते कुणाकडूनही दान स्विकारत नसत.त्यांनी आजन्म कधीही खोटे बोलले नव्हते.आपल्या शेतात मिळणार्या उत्पन्नावर ते आपला उदरनिर्वाह समाधानाने करित होते.ते नुसते ज्ञानी किंवा कर्मठ व्यक्ती नसुन त्यांचा योगाचाही उत्तम असा अभ्यास होता.ते दोनतीन तास ध्यान लावून बसत असतं.इतके तयारीचे साधक काशिनाथपंत होते.त्यांच्या सहधर्मचारिणी पार्वतीबाईही त्यांना साजेशा गुणांनी मंडित असलेल्या महान पतिव्रता होत्या.याच कारणाने जणू भगवंतांनी हे कुटुंब ,हे पवित्र दाम्पत्य ,ही पवित्र कुस आपल्या जन्मासाठी निवडली होती.या दोघांचाही संसार अगदी अत्री-अनसुयेसारखा धर्मपरायण पद्धतीने सुरु होता.पण यांच्या जिवनात एक शैल्य होते ते म्हणजे की यांना लग्नाच्या दहा पंधरा वर्षा नंतरही मुलबाळ नव्हते.त्यामुळे पार्वतीबाईंनी पुत्रप्राप्तीसाठी तपचं आरंभिले.त्या त्रिकाल स्नान करत,उपास व अखंड जप करत असत.भगवान दत्तात्रेय प्रभु हे त्यांचे आराध्य दैवत.तीन वर्ष त्यांचा हा नेम अखंड सुरु होता.एकदिवस दुपारी जप करत बसल्या असतांना त्यांचा डोळा लागला..तेव्हा त्यांच्या कानात शब्द उमटले की, "बाई! तुझे कष्ट पुरे झाले.मी दत्त अंशरुपाने तुझ्या पोटी जन्म घेणार आहे." काही काळ लोटल्यावर पार्वतीबाईंना दिवस गेले व शके १७३४ फाल्गुन वद्य पंचमीस मार्च १८१४ ला तिच्या पोटी प्रत्यक्ष दत्तप्रभु तुकामाय या अवताराचे प्रयोजन घेऊन जन्माला आले. जन्मताच तुकामाय हे अजानुबाहु होते.ते गौरवर्ण होते.त्यांच्या डोळ्यात विलक्षण तेज तळपत असे.डोळ्यातील तेज बघून कुणालाही त्यांच्यातील दिव्यत्वाची जाणिव होत असे.लवकर या तेजस्वी बालकाचे बारसे केले गेले व त्याचे "तुकाराम" असे नाव ठेवले गेले.पण दुर्दैवाने वयाच्या चवथ्या वर्षीच तुकारामांच्या आई चे देहावसान झाले. मुळातच विरक्त असलेल्या काशीनाथपंतांना आता अजुनच विरक्ती आली व त्यांचे संसारातील लक्ष अगदीच नगण्य झाले.त्यामुळे आता तुकाराम दिवसभर खेळात रमत असे.कुठेतरी खाणे-पिणे झाले की ते रात्री फक्त झोपायला घरी येत. तुकाराम हे जन्मताच सिद्ध होते याचा प्रत्यय देणारा एक विलक्षण प्रसंग तुकारामांच्या बालपणी घडला.एकदा तुकाराम आपल्या सवंगड्यांसमवेत नदीवर खेळायला गेले.नदीला पाणी अगदी थोडेसे होते.नदीत गड्डा करुन त्यात लपने हा या मुलांचा खेळ सुरु होता.तेवढ्यातच नदीला अचानक पाणी आले.सर्व मुले घाबरुन पटकन पाण्याबाहेर आली पण तुकाराम हे तिथेच बसून होते.सर्वांना वाटले तुकाराम पाण्यात बुडाला.मुलांनी धावत जाऊन ही वार्ता काशीनाथपंतांना सांगितली.काशीनाथपंत इतर काही जणां सोबत नदीकाठी आले.ते तुकारामांना आवाज देऊ लागले.त्यांनी आवाज दिल्याबरोबर नदीतून तुकारामांनी ओ दिला व ते पाण्यातून बाहेर आले.ही अघटीत लिला बघून काशीनाथ पंतांना लक्षात आले की हे काही तरी दिव्यच आहे.त्यांनी तुकारामांना विचारले की, "बाळ तुला पाण्याची भिती नाही का वाटली? तुझा जिव पाण्यात घाबरला नाही का?" तेव्हा तुकाराम म्हणाले , "नाही दादा! मी तेथे आनंदात होतो.प्राणनिरोध केल्यामुळे पाण्याचे भय मला वाटलेच नाही व जिवही गुदमरला नाही." हा प्रसंग घडला तेव्हा तुकाराम महाराज हे पाच वर्षांचे होते.एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे ,प्राण निरोधन करणे ही योगातील अतिशय उच्च क्रिया आहे.पुष्कळ वर्ष सद्गुरुंच्या मार्गदर्शनाखाली योगाचा अभ्यास केल्यावर एखाद्यालाच ही क्रिया साध्य होते.हा प्रस़ंग घडला तेव्हा महाराज अवघे पाच वर्षांचे होते.या वरुन लक्षात येत की महाराजांना हा योग ,ही क्रिया वेगळं शिकण्याची गरजच नव्हती ते जन्मसिद्ध असल्याने त्यांना आधीच सर्व विद्या ,ज्ञान अवगत होते.तुकाराम महाराजांचे वय हे शुद्ध पक्षातील चंद्राप्रमाणे वाढू लागले.पण तरीही त्यांची विलक्षण अवलिया वृत्ती काही ठिक झाली नाही.उलट त्यांचे अस्ताव्यस्त राहणे बघून ,त्यांचे अनाकलनीय व विचित्र वर्तन बघून गावातील लोक त्यांना "वेडा तुका" म्हणत असत.पण याला एक अजुन कारण आहे.श्रद्धाहीन,अपवित्र व लबाड माणूस जर त्यांच्या कडे आला तर अशा माणसाला ते शिव्या देऊन हाकलून लावित. तुकारामांच्या शेतात काम करणार्या एका धनगरावर महाराजांचे विलक्षण प्रेम व जिव्हाळा होता.तो धनगर ही महाराजांना साधू मानत असे.त्याच्या घरी जाऊन महाराज कधीकधी कांदा भाकर खात व चिलीम ओढित.
                      पुढे एकदा येहळगावापासून जवळ असलेल्या उमरखेड गावातील चिन्मयानंद नावाचे अतिशय थोर महापुरुष पंढरपूरची यात्रा करुन परतीच्या प्रवासाला निघाले होते.ते वाटेमध्ये येहेळगावात उतरले.जणू सद्गुरु आपल्या या अवतारी शिष्याला त्यांच्या कार्याची दिशा दाखवायला व त्यांचे कार्य सुरु करण्यासाठीच येहेळगावात दाखल झाले.सकाळी चारच्या सुमारास स्नानाला श्रीचिन्मयानंद हे नदीवर गेले.नदीकाठी एका ठिकाणी त्यांना एक व्यक्ती बसलेली दिसली. श्रीचिन्मयानंदांनी आपले स्नान ,संध्या आटोपली व ते त्या व्यक्तीकडे आले. ती व्यक्ती डोळे मिटून बसली होते.थोड्या वेळात त्या व्यक्तीने डोळे उघडले.दोघांची ही दृष्टादृष्ट झाली.दोघांच्याही नेत्रातून अश्रूधारा वाहू लागल्या.ही बसलेली व्यक्ती तुकाराम महाराजच होते.श्रीचिन्मयानंद महाराजांनी तुकारामांना हृदयाशी कवटाळले.त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना अनुग्रह देऊन आत्मज्ञान दिले .त्यांना आपल्या परंपरेची दिक्षा देऊन त्यांचे "तुकाराम चैतन्य" असे नाव ठेवले.दुसर्या दिवशी "आता आपले येथील काम झाले" असे म्हणून उमरखेडास निघून गेले. तुकाराम महाराजांची गुरुपरंपरा पुढील प्रमाणे आहे.
आदीनाथ--मच्छिंद्रनाथ--गोरक्षनाथ--मुक्ता वटेश्वर--चक्रपाणी--विमला चांगदेव--जनार्दन नरहरी--विश्वेश--केशवराज--बोपया हरिदास --कान्हया--सदानंद--कृष्णश्यामसुंदर--प्रल्हाद--नागया--एकनाथ--विठ्ठल किंकर--चिन्मयानंद--श्रीतुकाराम चैतन्य  अशी ही दिव्य गुरु परंपरा ज्यात योग व भक्तीचा दुर्मिळ आणि विलक्षण समन्वय दिसून येतो. अनुग्रह झाल्यापासून श्री तुकाराम महाराजांना भेटायला ,त्यांचे मार्गदर्शन घ्यायला व दर्शनाला अनेक लोक येऊ लागले.लोक आता त्यांना "तुकामाय" म्हणू लागले. अनेक लोक त्यांना आपले दु:ख सांगत व त्यातून बाहेर येण्यासाठी मार्ग विचारत.पुढे पुढे या लोकांचा तुकामाईंना खुप त्रास होऊ लागला.आधी तुकामाई यांना शिव्या देत,मार देत पण लोक काही त्यांचे चरण सोडत नसत. तुकामाई हे परमहंस वृत्तीत राहत.त्यांचे वागणे अतिशय दिव्य असे.ते अतिशय निष्पृह होते.त्यांच्या जवळ नेहमी एक रिकामी चिलीम असे. पण ज्यावेळी त्यांना चिलिम ओढायची असे त्यावेळी ते ती रिकामी चिलीम पुढे धरत व नुसते , "जय गरु" म्हणून मोठ्याने झुरका देत.झुरका दिल्या बरोबर त्या रिकाम्या चिलमीतून ज्वाला निघत असत.तुकामाईंजवळ टिट्या व गण्या नावाचे दोन कुत्रे होते.त्या कुत्र्यांचे व महाराजांचे एकमेकांवर विलक्षण प्रेम होते.तुकामाईंनी खायला घातल्याशिवाय ते कुत्रे काही ही खात नसत.तुकामाईंना ढोंगी , दिखाऊ लोकांचा अतिशय तिटकारा वाटत असे.ते अजिबात परमार्थाचा ढोंगी पणा करणार्या लोकांना जवळ करत नसत.त्यांचा अनुग्रह मिळणे ही अतिशय कठीण आणि अशक्यप्राय गोष्ट होती.त्यांची कठोर परिक्षेतून पार पडून अनुग्रह घेण्यास पात्र अगदी काहीच लोक झाले म्हणून तुकामाईंचे चार पाच लोकच जवळचे शिष्य झाले.तुकामाईंचे येहेळगावातील चारच शिष्य होते पण त्यांच्या वर तुकामाईंनी जी कृपा केली ती अतिशय विलक्षण होती.एक बाबा नांगरे नावाचा कुणबी शिष्य होता.तो तुकामाई बरोबर अहोरात्र असे.त्याला तुकामाई सतत शिव्या देत पण त्याने काही तुकामाईंचे  चरण सोडले नाही.सध्याच्या मठाची जागाही यानेच दिली होती.नुसतं तुकामाईंची सेवा करुन हे बाबा नागरे पुढे त्रिकालज्ञानी‌ झाले. भुजंग नावाचा एक भक्त असाच तुकामाईंचे चरणी एकनिष्ठ होता.तसेच दत्ताराम नावाचा शिष्य तुकामाईंना रात्रंदिवस सांभाळत असे.त्याला तुकामाईंनी योगात निष्णात केले‌. मारोती नावाचा एक  भक्त होता त्याचा तुकामाईंना हजार बेलपत्र वाहण्याचा नियम होता.त्याची तुकामाईं खुप परिक्षा घ्यायचे.तुकामाई लपून बसायचे आणि मारुती हताश झाला की कुठून तरी समोर यायचे व मारुतीला म्हणायचे "आण तुझा बेल" मारुती बेल वाहत असला की त्याच्या पाठीवरुन मायेने हात फिरवायचे.एकदा तुकामाईंनी त्याला विचारले, "मारुत्या! तुझी काय इच्छा शिल्लक आहे.?"  मारुती बोलला , "तुकामाय,तुमच्या मांडीवर मरण यावे एवढेच शिल्लक उरले आहे." तुकामाई बोलले, "जा तसे होईल." एक महिन्यानंतर मारुतीला ताप आला.औषधीचा काही गुण येईना.आठव्या दिवशी रात्री तुकामाई त्याच्या घरी गेले.त्याचे डोके मांडीवर घेतले आणि त्याच्या तोंडात तिर्थ घालून त्याला "राम राम राम " म्हण असे बोलले."राम राम" ऐवजी मारुती "तुकाराम तुकाराम" म्हणत आपला देह तुकाराम चरणी ठेवता झाला.मारुतीचे पुढचे सर्व संस्कार तुकामाईंनी स्वतः केले! असाच एक प्रसंग तुकामाईंच्या चरित्रात अजुन एका ठिकाणी आला आहे.एकदा तुकामाई पुसदहून येहेळगावी जाण्यास निघाले.त्यांच्या बरोबर त्यांचे गुरुबंधू गोचरस्वामी होते.वाटेत एका गावात एक म्हातारी बाई तुकामाईंकडे दर्शनाला आली .तिने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले आणि प्रार्थना केली की, "तुकामाय! मी तुला शरण आले आहे.आता या देहाचा फार कंटाळा आला आहे.हा देह कधीतरी जाणारच आहे.पण त्यावेळी हे चरण मला कोठे मिळणार? आजवर मी पुष्कळ प्रपंच केला.माझ्यावर कृपा कर ,आणि आता हा देह तुझ्या पायाजवळ पडू दे." असे बोलून ती म्हातारी रडू लागली.काही केल्या ती पाय सोडेना.तुकामाईंनी बरोबरच्या गोचर स्वामींकडे पाहिले.स्वामींनी हात जोडून तुकामाईंना विनंती केली की,"दादा भाव शुद्ध आहे.आपण म्हातारीवर कृपा करावी." त्यानंतर तुकामाईंनी त्या बाईचे डोके आपल्या मांडीवर घेतले व "राम राम" म्हणत त्या बाईने आपला प्राण तुकामाईंजवळच  सोडला. श्रीतुकामाईंच्या विलक्षण अलौकिक अधिकाराची जाणीव आपल्याला या प्रसंगातून होतेच पण या जिवाला तुकामाईंनी काय गती दिली असेल याचा आपल्याला विचार ही करता येणार नाही.
                                      तुकामाई आपल्या भक्तांची सतत परिक्षा घेत असत.एकदा असेच तुकामाई व भक्तमंडळी बोलत बसले होते.तेव्हा बोलता बोलता अरण्यातील हिंस्र प्राणी पशुंचा विषय निघाला.तुकामाई म्हटले, "जंगलातील जनावरे फार उग्र असतात.जो खरा निर्भय तोच त्यांना तोंड देऊ शकतो." यावर एकजण म्हणाला, "महाराज आपण जवळ असल्यावर आम्ही मुळीच घाबरणार नाही."या त्यांच्या वाक्यात इतरांनी ही हो ला हो मिळविले.हे बोलणे संपते न संपते तोच तुकामाई जेथे बसले होते तेथे ते नाहिसे झाले व त्याजागी एक भला मोठा वाघ बसलेला दिसला.वाघ बघताच मग काय गम्मत सर्व मंडळींची त्रेधा उडाली.सर्व लोक आपला जीव मुठीत धरुन पळत दूर गेली.फक्त या लोकांच्या गर्दीत देशमुख,त्यांची बायको आणि दत्ताराम ही तिघेच निश्चिंत बसून होती.पाच मिनीटांनी वाघ जाऊन त्याजागी पुन्हा तुकामाई प्रगट झाले.तेव्हा ते बोलले "प्रत्येक जण म्हणतो तुमच्या चरणी आमची अनन्य निष्ठा आहे.पण खरी निष्ठा ही इतकी सोपी नसते.हे समजून प्रत्येकाने ती वाढविण्यासाठी अभ्यास करायला पाहिजेत." तुकामाई हे विलक्षण अवधूत स्थितीत नित्य वावरत असत.त्यामुळे वरवर पाहता ते कधीही कर्मकांड ,शुचिता वा इतर उपचार करतांनी कुणालाही दिसले नाही.तसेच ते कधीही कुणाही कडे जायचे,खायचे व राहायचे.मुळातच ब्रह्मज्ञानी ,आत्मज्ञानी अवधूताला यांची बाधा तरी कशी होणार. पण त्यांचे वर वर चे रुप बघून कर्मकांडी लोकं त्यांना टाळत असत.
                            एकदा उमरखेड ला चिन्मयानंद स्वामींचा चैत्रातील कृष्ण पक्षातील उत्सव सुरु होता.उत्सवामध्ये वेदशास्त्रपठण, भजन , किर्तन,नामस्मरण अखंड चालू असे.एका वर्षी तुकामाई उमरखेडला उत्सवासाठी आले.दुपारी बारा वाजता ब्राह्मण मंडळी पानांवर जेवण्यास बसली.सर्व व्यवस्था गोचर स्वामी स्वतः जातीने बघत होते.तुकामाई तिथे आल्याचे पाहून त्यांना अतिव आनंद झाला.स्वामींनी तुकामाईंना साष्टांग दंडवत घातला व त्यांना जेवायला येण्याची विनंती केली.त्यांनी तुकामाईंना हाताला धरुन पानावर प्रेमपूर्वक बसविले.पण याचा उलट परिणाम पानावर बसलेल्या ब्राह्मणांना झाला.सर्व ब्राह्मण मंडळी तुकामाईला आपल्या पंगतीत बसविले म्हणून नाराज झाली.त्यांनी तुकामाईच्या पानावर बसण्याचा निषेध केला व ते सर्व लोक पानावरुन उठू लागले.ही गडबड तुकामाईंच्या लक्षात आली व ते चटकन् आपल्या पानावरुन उठले व क्षणार्धात अंतर्धान पावले.ते निघून गेल्यावर ही ब्राह्मण मंडळी पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसली.सर्व लोकांनी आनंदाने त्रिसुपर्ण सुत्र म्हणण्यास प्रारंभ केला.काही मिनीटे जातात तर काय नवल, वाढलेल्या अन्नाला पाणी सुटू लागले व त्या अन्नात किडे पडले.जिकडे तिकडे गडबड उडाली.काय करावे हे कुणालाही कळत नव्हते.ही बातमी गोचर स्वामींना कळली तेव्हा ते म्हणाले, "बरोबर आहे,येवढ्या थोर ब्रह्मज्ञानी महापुरुषांचा अपमान झाल्यावर अजुन वेगळे काय होणार!कोणीतरी जा आणि तुकामाईंना शोधून घेऊन या,म्हणजे हे संकट टळेल." इकडे तुकामाई मंडपातून गुप्त झाले ते तडक एका जैनाच्या घरी आले.हा जैन श्री सद्गुरु चिन्मयानंदांचा अनुग्रहीत होता.तो एक चांगला साधक शिष्य होता.मठामधली मंडळी तुकामाईंना शोधत जैनाकडे आली तर तुकामाई आणि तो जैन व्यक्ती कांदा भाकर खात बसले होते.आलेल्या सर्व  मंडळींनी तुकामाईंना काकुळतीने मठात येण्याची प्रार्थना केली.तुकामाईंनी त्यांची प्रार्थना स्विकारली व ते सर्वांसोबत मठात आले.मठात आल्यावर ते थेट त्यांच्या सद्गुरु माउलींच्या समाधीजवळ आले तेथे त्यांनी साष्टांग दंडवत घातला.त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या.गोचरस्वामी जवळच उभे होते.त्यांच्याकडे पाहून तुकामाई म्हणाले, "अरे, हे उत्सवाचें ढोंग कशाला माजवले आहेस !" समाधीचे तिर्थ सर्व अन्नावर शिंपडायला सांगून ते जसे आले तसे न जेवताच निघून गेले.अन्नावर तिर्थ शिंपडल्यावर ते अन्न पूर्ववत झाले आणि सर्वांची जेवणे झाली.
                             एकदा तुकामाई एका धनगराच्या घरी कांदा व शिळी भाकर खाऊन आले.त्यातील थोडी भाकर त्यांनी आपल्याबरोबर आणली आणि दर्शनास आलेल्या भक्तांमध्ये वाटली.काही लोकांनी तो प्रसाद तिथेच खाल्ला,काहींनी तो आपल्या जवळ ठेवून दिला.पण एक गृहस्थाला त्याची किळस आली.तो उठून बाहेर आला आणि "विष्णवे नमः ,विष्णवे नमः" असे म्हणत त्याने तो भाकरीचा प्रसाद कुत्र्यांपुढे टाकला.घरी जाऊन आपले शुद्धीकरण करण्यासाठी त्याने स्नानही केले.पण थोड्यावेळातच त्याचे पोट दुखायला लागले.ती पोटदुखी त्याला सहन होत नव्हती.त्याच्या घरच्यांनी त्याला तुकामाईकडे आणले.तुकामाईने त्याच्याकडे बघितले,आणि जवळ बसलेल्या मुलाकडे बोट करुन विनोदाने म्हटले, "या मुलाची लघवी पाजा म्हणजे पोट दुखी थांबेल." हे ऐकून तो गृहस्थ अगदीच ओशाळला आणि "मी आपल्याला शरण आलो आहे" असे म्हणून दया करुणा करण्याची प्रार्थना करु लागला.तुकामाईंना त्याची दया आली व त्यांनी त्या माणसाच्या पोटावरुन हात फिरवीला व क्षणार्धात त्याची पोटदुखी थांबवली.टवाळखोर,अश्रद्ध आणि दांभिक लोकांचा तुकामाई चांगला खरमरीत समाचार घेत.त्या लोकांसोबत तुकामाई पिशाच्चवृत्तीने वागत.परंतु खर्या जिज्ञासु माणसांबद्दल त्यांना अतिव प्रेम असे.ते त्याला त्याचा अधिकार बघून योग्य ते मार्गदर्शन करित.कमकुवत साधकाकडून कष्ट करून घेत व त्याची चांगली तयारी करुन घेत.त्याचा पाया चांगला मजबूत झाला की ते मगच त्याच्यावर कृपा करीत.पुष्कळ साधक त्यांच्या परिक्षेला कंटाळून निघून जात.पण जे टिकत त्यांच्यावर तुकामाई विलक्षण अशी कृपा करित. त्यांना अध्यात्माच्या उच्च पदावर पोचवत असत.सश्रद्ध आणि सरळ लोकांशी तुकामाई फार प्रेमाने बोलत ,पण वाह्यात लोकांशी ते फार तुसडेपणाने वागून त्यांना शिव्या घालून हाकलून लावत.
                                 
                        सर्वांना तुकामाईंचे एकच फार सरळ उपदेशाचे सांगणे होते.ते म्हणत भगवंतांचे नामस्मरण करा आणि त्याला शरण जा,त्याच्यावर विश्वास ठेवा.माणसाने आपले अंतरंग निर्मळ करण्यावर भर दिला पाहिजे.नाम व संतसेवा करावी म्हणजे सर्व साधते हाच एकमात्र त्यांचा सर्वांना उपदेश असे. "प्रपंचात रहा,त्यांतील सुख भोगा पण पांडुरंगाला विसरू नका" हेच एक सांगणे त्यांचे प्रत्येकाला असे. खरंतर तुकामाईंची परंपरा ही नाथपंथी होती‌.या पंथात योगसाधनेवर अधिक भर दिलेला आहे.पण गहिनीनाथांपासून ते ज्ञानेश्वर माउलींपर्यंत या नाथांनी भक्तीला जास्त महत्व व प्राधान्य दिल्याचे दिसते.हीच भक्तीची परंपरा तुकामाईंनी ही राखल्याचे आपल्याला चरित्रातून दिसून येते.नाथपरंपरेला शोभून दिसेल इतके महान योगी तुकामाई होते.त्यांच्या चरित्रातील लिला वाचल्या तर कुणालाही ते कळेल.पण उमरखेडला आपल्या सद्गुरुंच्या समाधी समोर उभे राहिल्यावर किंवा पंढरीला पांडुरंगासमोर उभे राहिले की त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत असतं. बाबा बेलसरे तुकामाईंचे वर्णन तिनच शब्दात करतात.बाबा लिहीतात की तुकामाई म्हणजे , "मूर्तीमंत विरक्ती,शांति आणि आनंद". किती सार्थ वर्णन बाबांनी केले आहे. अशा या लोकविलक्षण महापुरुषांनी आपल्या अवताराची समाप्ती शके १८०९ ला जेष्ठमासी शुक्रवारी सन १८८७ रोजी जून महिन्यात रात्रीच्या वेळेस येहेळगावातच केली.तेथे आजही त्यांचे भव्य समाधी मंदिर बघायला मिळते.आजही तुकामाई आपल्याला शरण आलेल्या भक्तांना तारतात ,त्यांच्या आर्त हाकेला ओ देतात. आजच्या या परमपावन पुण्यतिथी दिनी मी तुकामाईंच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी ही आपली कृपा करुणा आपल्या सर्वांवर करावी व आपल्या सर्वांकडून अखंड सद्गुरु सेवा करुन घ्यावी.

   ✒️✍️  त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️


Tuesday, June 7, 2022

थोर दत्तावतार सद्गुरु श्रीनारायण महाराज केडगावकर यांची १३७ वी जयंती🌺🌸🌿🌸🚩

 


तस्मै_नारायणाखिलगुरो_भगवन्नमस्ते ।।🌸🌺🙏
                               अनादी काळापासून चालत आलेला पुरातन प्राचीन असा दत्त संप्रदाय.अगदी प्रत्येक युगात दत्तात्रेय प्रभु विविध लिलांद्वारे भक्तांना तारत आले आहेत.विविध रुपात दत्तप्रभु भक्त रक्षणाचे कार्य करीत आले आहेत.या अनादी अशा दत्तसंप्रदायात आजवर असंख्य अधिकारी ,अवतारी महापुरुष ,संत,योगी अवताराला आले व त्यांनी दत्त संप्रदायाला वर्धिष्णू करण्याचे कार्य केले आहे.आजवर झालेल्या या महान अधिकारी महापुरुषांच्या मांदियाळीतील एक महापुरुष म्हणजे सद्गुरु श्री नारायण महाराज केडगावकर.प्रत्यक्ष दत्तप्रभुंचे अनुग्रहीत असलेले महाराज हे एक राजयोगी होते.आज जेष्ठ शुद्ध सप्तमी म्हणजे महाराजांची जन्मतिथी.आज सद्गुरु श्री नारायण महाराजांची १३७ वी जयंती आहे त्या निमित्ताने आपण महाराजांच्या दिव्य चरित्राचे संक्षिप्त रुपात चिंतन करुयात.
                                  महाराजांच्या चरित्राची सुरुवात ही त्यांच्या कुळातील दिव्य परंपरेचे स्मरण केल्या शिवाय होणार नाही.महाराजांसारख्या थोर महापुरुषांनी जे कुळ आपल्या जन्मासाठी निवडले ते कुळ किती थोर असेल याची कल्पना आपल्याला पुढील कुलवर्णनातून येईलच. कर्नाटक प्रांतातील विजापूर जिल्ह्यातील "शिंदगी" नावाचे एक गाव आहे.या गावात एक तेजस्वी , वेदशास्त्रसंपन्न,चारित्र्यवान असा ब्राह्मण राहत असे.परमशिवभक्त असलेला हा ब्राह्मण गावातील श्रीसंगमेश्वराचा अनन्य भक्त होता.त्याची पत्नी ही महापतिव्रता आणि शिवभक्त होती.दोघेही संसारात निस्पृह आणि समाधानी वृत्तीने जिवन व्यतित करत असत. पण एक पुत्रसंतान नसल्याने दोघेही मनोमन दु:खी होते.पुढे शिवकृपेने त्यांना एक पुत्र झाला.पण विधी लिखीत काही तरी वेगळेच होते.पुत्र झाल्याच्या दहाव्या दिवशीच तो ब्राह्मण मृत्यू पावला.त्याच्या आकस्मिक निधनाने त्या साध्वी वर वज्रघातच झाला.तिने मनोमन ठरविले की आता पतिसह सती जायचे.पतीच्या अंतिम संस्कारावेळी ती आपल्या लहान बाळासह स्मशानभूमीत आली.बाळाला एका वृक्षाखाली ठेऊन ती स्त्री सति जाण्यास सज्ज झाली पण तोच अग्नीज्वाळा बघुन ती मुर्छीत पडली.लोकांनी तिला तिच्या घरी आणले पण कुणालाही ते लहान झाडाखाली ठेवलेले बाळ दिसले नाही‌.घरी आल्यावर काही काळाने ती स्त्री सावध झाली.उठताच तिला आपल्या बाळाची आठवण झाली.तात्काळ ती स्मशानात आली व आपल्या बाळाकडे गेल्यावर ती बघते तर ते बाळ मृत झाले होते.त्याच्या त्या चिमुकल्या देहाला मुग्या ,मुंगळे चिटकले होते.ते बघताच तिने हंबरडा फोडला आणि त्या बाळाच्या शवाला आपल्या हृदयाशी कवटाळले.पूर्वपुण्याई म्हणा वा शिव उपासनेची फलश्रुती म्हणा त्याच स्मशानाजवळून "श्रीपद्मवडेर" नावाचे एक सिद्ध जात होते.त्या स्त्रीचा आक्रोश बघून ते तिच्याजवळ आले.त्यांच्या मनात त्या मातेबद्दल करुणा उत्पन्न झाली.त्यांनी त्या मृत बालकास अमृतमय दृष्टीने बघितले आणि आश्चर्य असे की त्या मृत देहाला चिटकलेल्या मुंग्या नाहीशा झाल्या.श्रीपद्मवडेर संतांनी तो देह शिवमंदिरात नेला व शिवापुढे ठेवला आणि भगवान‌ शिवांची मनोमन प्रार्थना केली.शिवशंकर प्रसन्न झाले व त्यांनी त्या बालकास प्राणदान दिले.पुढे पद्मवडेर यांनी त्या मुलाचे नाव "कट्टिरविलिंग" असे ठेवले. कट्टिरविलिंग म्हणजे मुंग्यांचा राजा.श्रीपद्मवडेर यांनी मातेला सांगितले, "हा मुलगा वेदशास्त्रसंपन्न होईल,याच्या वंशाचा विस्तार होईल व पुढे याच्या वंशात श्रीनारायणाचा अवतार होईल." त्या मातेने त्या बाळास घरी आणले.त्याचे उत्तम प्रकारे संगोपन केले.त्याचे योग्य वेळी उपनयन केले.उत्तम सुलक्षणी मुलगी पाहून त्याचे वयात आल्यावर लग्न लावून दिले.यथाकाळी या बाळाचा वेदशास्त्रसंपन्न कट्टिरविलिंग नावाने उदय झाला.यांना सात मुले व एक मुलगी झाली.कट्टिरविलिंगांच्या एका मुलाचे नाव 'मुद्गलरस' असे होते.त्यांचा पाचवा मुलगा "शंकराप्पा" या शंकराप्पांचा अतिशय मोठा अधिकार .हे थोर शिवभक्त होते.यांनी कांची क्षेत्रीचे "श्रीगुरुनाथंपय्या" या संतांकडून अनुग्रह घेतला.( हा अनुग्रहाचा प्रसंग अतिशय विलक्षण आणि दिव्य आहे.समाधी नंतर परत सद्गुरुंनी शंकराप्पांना समाधीत बोलवून अनुग्रह दिला होता. शब्दविस्तारास्तव हा प्रसंग इथे देने शक्य नाही.तरी आपण तो चरित्रात वाचाच) सद्गुरुंनी शंकराप्पांना "भीमाशंकर" असे नाव दिले.पुढे यांना गुरुकृपेने विलक्षण असे कवित्व स्फुरु लागले.त्यांनी कानडीत श्रीगुरुंवर अनेक पदे रचली.आजही काही पदं ही श्रीक्षेत्र गाणगापूर येथे पालखीच्यावेळी म्हटली जातात.भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची आरती ही श्रीभिमाशंकर यांनी रचली आहे. कट्टिरविलिंगाचे तृतीय पुत्र होते कमलरस.हे ही मोठे भगवद भक्त .यांच्या वंशात अनेक संत जन्माला आले म्हणून त्यांचे उपनाम संती असे पडले होते.कमलरसांना एक पुत्र होता.त्याला पाच मुलगे झाले.यातील पाचवा मुलगा होता कृष्णाप्पा.हा महान शिवभक्त होता.याने भगवान शिवशंकरांची कडक उपासना केली.श्रीशंकर प्रसन्न झाले व त्यांनी "तुझ्या वंशात श्रीदत्तात्रेय ,नारायण नावाने अवतार घेतील" असा आशिर्वाद दिला.पुढे कृष्णाप्पास पाच पुत्र झाले.त्यातील सर्वात धाकटे होते भीमाप्पा.याच भिमाप्पांचे पुत्र म्हणून सद्गुरु नारायण महाराज जन्माला आले होते.
                                 नरगुंद संस्थानामधील दरेकर नावाचे एक प्रसिद्ध ,शूर सरदार होते.त्यांची कन्या नरसुबाई यांच्याशी भीमाप्पांचा विवाह झाला. या सत्शिल ,भगवतभक्त ,धर्मपरायण आणि दत्त भक्त दांम्पत्यापोटी शालिवाहन शके १८०७ पार्थीव नाम संवत्सर ,मिती अधिक जेष्ठ शुद्ध षष्ठीसह सप्तमी आश्लेषा नक्षत्र ,बुधवार दिनांक  २० मे १८८५ रोजी सद्गुरु श्री नारायण महाराजांचा जन्म झाला. पण दुर्दैव असे की महाराजांना त्यांच्या आई वडिलांचे प्रेम जास्त दिवस मिळाले नाही.महाराजांच्या जन्मानंतर काही दिवसातच त्यांचे वडिल भीमाप्पा यांचे निधन झाले आणि महाराज चार वर्षांचे झाले त्यानंतर त्यांच्या मातोश्रींचे आजाराने निधन झाले.नियतीची योजनाच अशी होती की या अनाथ बालकाच्या प्रेम आश्रयाला पुढे अनेक जिव येऊन सनाथ होणार होते.महाराजांचे यापुढील संगोपन नरगुंद या गावी महाराजांच्या आजोळी आजीकडे झाले. लहानपनापासूनच महाराज ईश्वर भक्तीत तल्लीन होत,भगवंतांच्या नामात रंगून जात.लहान असतांना महाराज मुलांबरोबर विटि - दांडू, खोखो,हुतूतू ,चोर शिपाई इत्यादी खेळ आपल्या मित्रांसोबत खेळत असत.एकदा असेच खेळत असता महाराज आपल्या सवंगड्यांसमवेत एका प्रशस्त गुहेबाहेर येऊन पोचले.त्या गुहेत आत घनदाट अंधकार होता.सर्व मुलांनी आत जाऊन काय आहे हे बघायचे ठरवले व सर्व जन आत गेले.पण महाराज सोडून बाकी सर्व मुले अंधाराला घाबरून बाहेर आली. पण महाराज एकटेच आत गेले‌.पुढे पुढे गेल्यावर महाराजांना एक चौकोनी गुहा दिसली.पायर्या उतरुन महाराज आत गेले.पहातात तर आत मध्ये भव्य असे दालन होते.चार कोपर्यात चार समया शांतपणे तेवत होत्या.जवळच एका उच्चासनावर एक योगी ध्यानस्थ बसलेले होते.मध्यभागी एक झोपाळा झुलत होता व त्यावर एक मोठा भुजंग बसुन झोके घेत होता.महाराजांना पहाताच तो भुजंग खाली उतरला व शांतपणे निघून गेला.श्रीनारायण महाराज हे त्या झोपाळ्यावर बसले व झोके घेऊ लागले.काही काळ झोके घेऊन ते खाली उतरले व त्यांनी योगीराजांना वंदन केले.त्यानंतर महाराज बाहेर आले.त्यावेळी महाराजांचे वय अवघे ७/८ वर्षा चे होते.
                                     यथावकाश श्रीनारायण महाराजांची वयाच्या आठव्या वर्षी मुंज झाली. महाराजांच्या उपनयनाचे वेळी धारवाडचे वे.शा.सं.पंडित कृष्णशास्त्री उप्पिनबेट्टीगिरी हे हजर होते.मुंज झाल्यापासून महाराजांचा संध्या-गायत्री ,सूर्यनमस्काराचा अखंड नित्यक्रम सुरु झाला.नारायण महाराजांच्या मुंजीच्या सुमारास श्रीगोंदवलेकर महाराजांचा मुक्काम धारवाड येथेच होता.श्री.कृष्णशास्त्री उप्पिनबेट्टीगिरी हे त्यांचे अनुग्रहीत होते.या वेळी एक विलक्षण प्रसंग घडला.महाराजांची मुंज झाल्यावर एक दिवस आजी श्रीनारायाणांना म्हणाली, "श्रीगोंदवलेकर महाराज आले आहेत.तरी माझ्याबरोबर त्यांच्या दर्शनाला चल." त्यावर बाल नारायण म्हणाले, "आम्ही नाही कोणाकडे येणार,ज्याला वाटेल त्यांनी आमच्याकडे यावे." हे ऐकताच आजी रागावली व तिने बाल नारायणाच्या पाठीत धपाटा घातला.आजी काही वेळाने एकटीच महाराजांच्या दर्शनाला गेली.दर्शन घेताच गोंदवलेकर महाराजांनी विचारले, "काय आजी एकट्याच आलात,नातवाला नाही आणलेत?" असे विचारताच आजी शरमिंदा झाल्या व त्यांनी महाराजांना सर्व हकीकत सांगितली.त्यावर गोंदवलेकर महाराज हसून म्हणाले ,"तुमच्या नातवाला सांगा की तू आमच्याकडे येत नाहीस तर आम्हीच तुमच्याकडे येऊ बरं का." दुसर्या दिवशी महाराज श्रीनारायणाला भेटण्यास सकाळी त्यांच्या घरी गेले. महाराज नारायणास म्हणाले, "बाळ मी आलो बरं का तुला भेटायला." असे म्हणून ते श्रीनारायणांकडे पंधरा मिनिटे एक टक पाहत राहिले.श्रीनारायण महाराजांनी त्यांचे दर्शन घेतले, आशिर्वाद घेतला.नंतर गोंदवलेकर महाराज परत आपल्या मुक्कामी परतले. दुसर्या दिवशी गोंदवलेकर महाराज श्री कृष्णशास्त्री उप्पिनबेट्टीगिरी यांना म्हणाले, "शास्त्री महाराज आज तुम्ही नारायणाकडून पाया पडून घेत आहात पण त्यांच्याच पाया पडण्याची पुढे तुमच्यावर वेळ येणार आहे.मुलाच्या डोळ्यांत दैवी तेज आहे.तो पुढे फार मोठा होणार आहे." पुढे एकदा नारायण महाराज जेवायला बसले होते त्यावेळी त्यांनी आजीला भातावर साजूक तुप मागितले.एरवी आनंदाने बोलणारी आजी  पानावर बसलेल्या नारायणास रागाने बोलली की, "साजूक तुप हवे आहे काय तुला,जा,त्याऐवजी शेण खा." हे शब्द ऐकताच नारायण महाराज पानाला नमस्कार करुन तात्काळ उठले. स्वाभिमानी असलेल्या महाराजांना हे आजीचे वाक्य अजिबात आवडले नाही ते आजीला म्हणाले , "ईश्वराने जो मानव जन्म दिला आहे तो शेण खाण्यासाठी नाही." असे म्हणून महाराजांनी अंगावरच्या कपड्यावर तात्काळ घर सोडले.जणु महाराजांच्या तप:पूत अवतार कार्याची ही सुरुवातच होती.मुखाने दत्तप्रभुंचे नामस्मरण करत नऊ वर्षांचे महाराज आता घरातुन निघाले.जवळ पैसे नव्हते पण कधी कुणाच्या बैलगाडीतून तर कधी पैदल असा प्रवास करत महाराज सौंदत्तीस येऊन पोचले.इथे प्रत्यक्ष भगवती आदिशक्ती आई रेणुका माउली महाराजांना सगुण रुपात भेटली.तिने बाळ नारायणाला आशिर्वाद दिला व गुप्त झाली.तेथून पुढे महाराज उगुरगोळ गावी आले.परंतु इथे भिक्षेवेळी एक कटू प्रसंग घडला ज्यामुळे महाराज अधिकच अंतर्मुख झाले व भविष्यात कुणाकडेही कशासाठीच याचना करायची नाही असा त्यांनी निश्चयच केला.पुढे प्रवासात महाराजांना दत्त प्रभुंनी घोडेस्वाराच्या रुपात भेट दिली.हा प्रसंग ही विलक्षण आहे.यानंतर नारायण महाराज मलप्रभा नदितीरावर वसलेल्या गुर्लहसूर या गावी आले.या गावी भगवान चिदंबर महाप्रभुंनी स्थापन केलेल्या शिवमंदिरात महाराजांनी मुक्काम केला.तिथेच त्यांची एका यतीशी भेट झाली.महाराजांच्या चेहेर्यावरील हातावरील सुचिन्हे पाहिल्यावर यतिराजांनी त्यांन भविष्य सांगितले. ते म्हटले, "नारायणा,तू फार भाग्यवान आहेस.तू जेथे जाशील,जेथे राहशील तेथे अखेरपर्यंत श्रीदत्त तुझ्या मागे-पुढे बरोबर राहतील.तुझ्या सर्व इच्छा ते पूर्ण करतील.त्यांच्या आशिर्वादाने तु राजयोगी होशील.तुझ्या नावाची नगरी निर्माण होईल.तुझ्या हातून मोठे मोठे यज्ञयाग होतील.मोठे अन्नदान होईल.तू जगात सर्वांना पूज्य होशील." असे सांगून यतिवर्य निघून गेले.पुढे महाराज कुंदगोळ,बेळगाव गावात प्रवास करत शहापूर येथे आले.तेथून नारायण हुबळीस आले.नारायण महाराज मठात येणार त्यावेळी सिद्धारुढ स्वामी महाराज हे प्रवचन करत होते.महाराज मठाजवळ आल्यावर सिद्धारुढ स्वामींनी आपले प्रवचन थांबविले.नारायणाच्या स्वागतासाठी ते दारात आले.श्रीनारायण महाराज त्यांना वंदन करण्यास वाकले तोच सिद्धारुढ स्वामी महाराजांनी त्यांना वरच्यावर धरले व ते म्हणाले, "हे काय ,आपण प्रत्यक्ष देव आहात.आपण मला काय वंदन करतात?" श्रीस्वामींनी श्रीनारायणास तीन चार दिवस मठातच ठेवून घेतले. तेथून पुढे महाराज नरसोबावाडी , औदुंबरवाडी येथे दत्त दर्शनास गेले.तेथून महाराज कोल्हापूर येथे थोर दत्तावतारी महापुरुष श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज म्हणजे कुंभार स्वामी महाराज यांच्या दर्शनास गेल्याची नोंद कुंभार स्वामींचे शिष्य नामदेव महाराजांच्या चरित्रात आहे.तेथून ते दरमजल करत पुण्यास आले.पुण्यात त्यांची आपले मानस आई-वडिल त्रंबकराव व लक्ष्मीबाई यांची भेट झाली.पुढे महाराज बराच काळ आर्वी येथे या माता-पित्याजवळ राहिले.या दाम्पत्याच्या हृदयात महाराजांबद्दल अपार प्रेम माया होती.पुढे आर्वीला काही काळ राहिल्यावर महाराजांना तिथे करमेना.एक दिवशी महाराजांना रात्री यतींराजांचा स्वप्नदृष्टांत झाला आणि त्यात त्यांनी महाराजांना श्रीक्षेत्र गाणगापूर येथे येऊन अनुष्ठान करण्याची आज्ञा केली.पुढे काही चमत्कारिक घडामोडी घडल्या व महाराज दत्त कृपेने गाणगापूर येथे येऊन पोचले.गाणगापूर येथे पोचल्यावर महाराजांनी देवांचे दर्शन घेतले त्यानंतर ते संगमावर आले.संगमाजवळील भस्माच्या डोंगराजवळ एक गुफा कोरली होती त्यातच ते राहू लागले.तिथे आल्यापासून महाराजांचे कडक अनुष्ठान सुरु झाले.रोज संगम स्नान,सुर्य उपासना, गायत्री जप,ध्यानधारणा व दुपारी मठात पादुका दर्शन हा त्यांचा सकाळचा नेम.सायंकाळी मठात सेवा करणे , दत्तप्रभुंचे सुमधूर आवाजात भजन म्हणने हा नेम.पुढे महाराजांवर कृपा करुणा पूर्वक  दत्तप्रभुंनी अनुग्रह केला. "बाळंभट्ट" असे नाव सांगून प्रत्यक्ष दत्तप्रभुंनी नारायण महाराजांच्या कानात स्वतः गुरुमंत्र सांगितला.(हा प्रसंग अतिशय विलक्षण आहे.)पुढे काही दिवसांनी दत्तप्रभुंनी नारायण महाराजांना संगमाच्या पैलतिरावर विप्रवेषात दर्शन दिले.यानंतर महाराजांनी दिवस-रात्र गुरुमंत्राच्या अखंड जपाचा निजध्यासच लावला.ते त्याचेच चिंतन ,मनन करु लागले.त्याशिवाय ते कुठल्याही गोष्टीला प्राधान्य देत नव्हते.असाच काळ पुढे जाऊ लागला.पण पुढे एक अघटित घडले.जेवणाची ,शरीराची आबाळ झाल्यामुळे महाराजांना ताप येऊ लागला.हा ताप वाढतच जात होता.यावर इलाज म्हणजे देवांचे तिर्थ आणि अंगारा.पण महिन्याभरात प्रकृती अतिशय ढासाळली.शरीर क्षिण झाले.विपरीत काळ आला व या व्याधी रुपाने महाराजांवर मृत्यू चे गंडांतर आणले.त्यांच्या देहाच्या सर्व क्रिया मंदावल्या.श्रीमहाराजांचे प्राण देह सोडून निघून गेले.लोकांनी महाराजांचा देह स्मशानात आणला.चिता रचली व त्यावर देह ठेवला.श्रीनारायणांना आपण दत्तलोकात गेलो आहोत असे दिसले.तिथे आपण दत्तप्रभुंचे दर्शन घेत आहोत आणि ते आपल्याला आशिर्वाद देते आहेत असे दृश्य त्यांना दिसले.इकडे गाणगापूरात चमत्कार घडला.चलनवलन बंद पडलेल्या शरिरात चैतन्य निर्माण झाले.श्रीनारायणांचे शरीर तेजपुंज दिसु लागले.हे पाहून सर्वांनी महाराजांना घरी आणले.त्याच रात्री दत्तप्रभु महाराजांचे स्वप्नात गेले त्यांनी महाराजांना तीर्थ व एक गोळी खाण्यास दिली.दुसर्या दिवशी त्यांना जोरात एक वांती झाली.त्यातून एक मृत अंगठ्याएवढा जाडीचा व पाच वित लांबीचा सर्प बाहेर पडला.तो इतका विषारी होता की त्यावर बसलेल्या माशा ही तक्षणी मरत होत्या.या गंडांतरातून महाराजांना स्वतः दत्तात्रेय प्रभु भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी बाहेर काढले. यानंतर महाराजांचे शरीर परम तेजस्वी दिसु लागले.काही काळ गेल्यावर महाराजांना भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा दृष्टांत झाला व "नारायणा ,तू जेथून आलास तेथे परत जा.आमचा तुला आशिर्वाद आहे." असे देवांनी म्हटले.तेथून मोठ्या जड अंतःकरणाने ते आर्वीला आले.एक वर्षांच्या मोठ्या वास्तव्याने,तपानंतर महाराज आता परतले होते.महाराजांनी आर्वीला अनेक चमत्कार केले आहेत.शब्दमर्यादेस्तव‌ ते येथे देणे शक्य नाही.
                                  पुढे शके १८२६ ला नारायण महाराज त्यांच्या  एकोणिसाव्या वर्षी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी , औदुंबर येथे आले.औदुंबराहून ते सज्जनगड येथे आले.सज्जनगडावर महाराजांना प्रत्यक्ष समर्थांचे सगुण दर्शन झाले.सज्जनगडावरुन श्री नारायण परत आर्वीला आले.एक दोन वर्षे आर्वी सुपे इथे गेली.सुप्यात अनेक चमत्कार महाराजांनी केले.आता लोक महाराजांना "नारायण देव" म्हणू लागले.एक दिवस सुप्याच्या नानासाहेब देशपांडे या भक्ताबरोबर त्यांच्या शेती असलेल्या वढाणे गावी ते गेले.तेथील रम्य ठिकाण पाहून महाराज तेथेच झोपडी करुन राहू लागले.ते या ठिकाणाला "बेट" असे म्हणत.जवळच एक मोठा औदुंबर वृक्ष होता त्याचे महाराज नित्य नेमाने दर्शन घेत. एक दिवस श्रीनारायण महाराजांना दत्तप्रभुंचा दृष्टांत झाला.देवांनी त्यांना दर्शन दिले व आशिर्वाद देत सांगितले, "नारायणा,तू रोज दर्शन घेत असलेल्या औदुंबर वृक्षाचे खाली आमच्या दिव्य पादुका आहेत.हातभर जमीन उकरुन त्या बाहेर काढ.त्या पादुकांची रोज देव पूजा करीत असतात." देवांनी त्यांना जागाही दाखविली.श्रीमहाराजांनी ही हकीकत देशपांडे दाम्पत्यांना सांगितली.त्या दोघांसमवेत ते त्या जागी गेले.दृष्टांताप्रमाणे त्यांनी ती जागा हातभर उकरली.तोच एका दगडावर लहान,छोट्या व सुकुमार पादुका दिसल्या.त्या पादुकांची ताजी व सुवासिक फुले वाहून कुणीतरी नुकतीच पूजा केली होती.हे पाहून महाराजांना अत्यानंद झाला.तो दिवस होता आषाढ शुद्ध दशमी,शके १८२७ म्हणजे इ.स.१९०५. महाराजांनी त्या पादुकांची  पुजा केली व महाराजांनी आषाढ शुद्ध पौर्णिमा शके १८२७ मध्ये पादुकांची स्थापना केली.पादुकांच्या पुढे एक पडवी बांधली व तेथेच सर्व लोक पूजा,ध्यान ,भजन वगैरे करीत असत.
                             आषाढ शुद्ध पौर्णिमेस एक अतिशय दिव्य गोष्ट घडली.बेलापूर येथील बनात एक महान सत्पुरुष श्रीविद्यानंद स्वामी महाराज समाधिस्थ झाले.समाधी घेण्यापूर्वी ते आपल्या शिष्यांना म्हणाले, "यापुढे आम्ही तुम्हाला नारायणाचे रुपात दर्शन देऊ.बेटातील बालयोगी नारायण म्हणजे आम्हीच आहोत." पादुकेची वार्ता सर्वत्र वार्या सारखी पसरली .लोक आता नारायणास नारायण महाराज संबोधू लागले. पुढे दत्ताज्ञेने महाराज पुण्यातील श्रीमाळी महाराज यांच्या भेटीसाठी पुण्यात आले होते. दिवसागणिक लोकांना महाराजांच्या कृपेचे विलक्षण अनुभव येऊ लागले‌.चितोपंत जोगळेकर या नास्तिक माणसापुढे तर "दत्त" म्हणून हातातून तिर्थ काढले होते.हिंदूस्थानातील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रीमती अंजनीबाई मालपेकर यांचा गेलेला आवाज महाराजांनी आपल्या कृपेने पुन्हा त्यांना दिला.या कृपेने त्यांची महाराजांवर अनन्य श्रद्धा जडली.त्यानंतर त्यांनी आपले गाणे कायमचे बंद केले व महाराजांच्या सेवेकरीता त्या वारंवार बेटावर येत असत.मुंबईतील आपल्या घरालाही त्यांनी "श्री नारायण आश्रम" असे नाव दिले.या बेटात महाराजांनी अनेकांना व्याधी मुक्त केले,अनेकांचे दु:ख दूर केले. आपल्या बलशाली शरीरयष्टी मुळे ज्यांना "इंडियन सॅन्डो" हा किताब मिळाला होता.असे राममूर्ती हे महाराजांच्या दर्शनाला आले .त्यांचा आपल्या शक्तीचा असलेला गर्व महाराजांनी एका क्षणात उतरवीला.तात्काळ राममूर्ती हे महाराजांना शरणं आले.तसेच पुण्यातील डेक्कन कॉलेजमधील इंग्रज प्राध्यापक श्री वुडहाऊस शिकार करण्यासाठी बेटाजवळील एका डोंगरावर आले होते.त्या इंग्रजाला अतिशय तहान लागली होती व तहानेने व्याकूळ होऊन तो गर्भगळीत झाला होता.त्याच वेळी महाराज फेरफटका मारण्यासाठी त्या डोंगरावर आले.महाराजांनी तात्काळ एक लिला करुन त्यांची तृष्णा भागवली.तो महाराजांना लगेच शरणं आला.महाराजांसोबत तो बेटावर आला.तेथील दैवी वातावरण बघून तो इतका प्रभावित झाला की त्याने पुण्यात आल्यावर ताबडतोब मुंबईच्या इंग्रजी वर्तमानपत्रात बातमी छापली की , "केडगाव स्टेशनपासून आत सात-आठ मैलांवर "नारायण" नावाचा दत्तावतारी बालयोगी प्रगट झाला असून तो अनेक चमत्कार करतो." हिंदूस्थानातील अनेक प्रमुख वर्तमानपत्रात ही बातमी वाचून गावोगावचे लोक श्रीमहाराजांचे दर्शनासाठी बेटात येऊ लागली.अनेक लोक महाराजांकडून गुरुमंत्र घेण्यासाठी आता बेटावर येऊ लागले.बेटातील जागा आता भक्तांना अपुरी पडू लागली .तेव्हा महाराजांनी जवळच एक विस्तीर्ण जागा विकत घेतली.लवकरच तिथे दत्त मंदिर बांधण्याची योजना महाराजांनी आखली.इ.स.१९१२ मध्ये हे मंदीर बांधून पूर्ण झाले व महाराजांची योजना वास्तव्यात उतरली.मंदिराबरोबरच धर्मशाळा,कोठीघर, स्वयंपाकघर,अन्नपूर्णागृह व संस्थानाची कचेरीही बांधली गेली.अन्नपुर्णागृहात माता अन्नपुर्णेची सुंदर काळ्या पाषाणातील मूर्ती बसवली गेली.मंदिराजवळच एक विहीर , महाराजांना राहण्यासाठी दुमजली बंगला व इतर वास्तु बांधल्या गेल्या.अनेक लोक आता कायमचे महाराजांजवळ वास्तव्यास आले होते.लवकरच मुंबईतील  श्री.गणपतराव म्हात्रे यांनी कुणा दुसर्यासाठी घडवलेली दत्त मुर्ती महाराजां पर्यंत अगदी चमत्कारीकरित्या आली.महाराजांना ही शिवप्रधान दत्तमूर्ती अतिशय आवडली.श्रीमहाराजांनी वैशाख शुद्ध पंचमी शके १८३५ रविवार दिनांक ११ मे १९१३ साली सकाळी साडे नऊ वाजता या दिव्य दत्तमूर्ती ची स्थापना केली.या दत्तमूर्ती च्या स्थापनेकरीता महापंडित श्री.कृष्णशास्त्री उप्पिनबेट्टीगिरी हे स्वतः उपस्थित होते.त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा सर्व विधी पार पडला.आता या दत्त मंदिर परिसराला "नवे बेट" असे म्हटले जाऊ लागले.दत्तप्रभुंच्या आगमनानंतर महाराज आता नवीन बेटावर वास्तव करु लागले.यानंतर महाराजांची कीर्ती दिगंत वाढली.महाराजांचे कायमचे वास्तव्य नवीन बेटावर झाले तो काळ होता १९१३.या वेळी ख्रिश्चन मिशनरींचे लोकांना बाटवायचे काम जोरात सुरू होते.तेव्हा महाराजांनी हे जाणले व गरीब हिंदू लोकांना महाराज मोफत शिक्षण,अन्न‌ देऊ लागले.सर्वांसाठी अन्नछत्र उभारले.गरिबांना वस्त्रदान ,अन्नदान सुरु केले.या लोकांना धर्माबद्दल आदर,प्रेम निर्माण व्हावा म्हणून नैमित्तिक कार्यक्रम सुरु झाले. महाराजांनी बेटावर अनेक व्रत , अनुष्ठान केले त्यातील १९२८ साली पार पडलेला अतिरुद्र अनुष्ठान विशेष ठरले.तसेच एकावेळी १०८,११०८ सत्यनारायण महापुजा करण्यात आल्या.दत्तप्रभुंना ११ डिसेंबर १९३३ साली अतिरुद्राभिषेक करण्यात आला,तसेच गुरुचरित्राचे ५२ पारायणे,कोटीलिंगार्चन सोहळा,दर तासाला १०८ सत्यनारायण पुजा करण्यात आल्या.अशा प्रकारे महाराजांनी अनेक अनुष्ठान बेटावर केले.त्या अनुष्ठानाची उर्जा आजही बेटावर अनुभवायला मिळते.

सद्गुरु श्री नारायण महाराजांनी स्थापन केलेले शिवप्रधान दत्तात्रेय प्रभु 🙏🌸🌿🌺


                    
विविध संतांनी महाराजांबद्दल काढलेले धन्योद्गार :-

श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आपल्या एका भक्तास म्हणाले होते की, "आम्ही नुसते योगी आहोत.पण नारायण हा राजयोगी आहे.त्याचा अधिकार मोठा आहे."

साईनाथ महाराज नारायण महाराजांबद्दल म्हटले होते की, "श्री नारायण महाराज हे आमचे वडील बंधू आहेत.आमचे दादा आहेत."

उपासनी महाराज ही नारायण महाराजांच्या भेटी साठी येत.तसेच त्यांच्या उत्तराधिकारी गोदावरी माता या ही बेटावर मुक्कामी येत असत.

मेहेर बाबांनी तर आपल्या पाच परफेक्ट मास्टरांच्या यादीत श्री नारायण बाबांचाही विशेष उल्लेख केला आहे.ते महाराजांना आपले सद्गुरु असे संबोधत.मेहेर बाबांनी म्हटले आहे , "shree Narayan Maharaj is the Master of Masters."

श्री नारायण महाराजांनी लहान असलेल्या श्रीधर स्वामी महाराजांना बघून त्यांच्या शिक्षकास सांगितले होते की , "गुरुजी हा मुलगा पुढे फार मोठा होणार आहे बरं का.त्याच्याकडे लक्ष ठेवा."

भगवान रमन महर्षींच्या दर्शनाला जेव्हा नारायण महाराजांच्या शिष्या गेल्या तेव्हा भगवान रमन महर्षी त्यांना म्हटले, "बाई तुमचे गुरु श्री नारायण महाराज इतके महान महापुरुष आहेत की असा महात्मा ,असा महापुरुष शंभर वर्षात एकदाच जन्मास येतो.तुमचे फार मोठे भाग्य आहे म्हणून तुम्हाला श्री नारायण महाराजांसारखे सद्गुरु लाभले."

बेळगावचे काणे महाराज श्री नारायण महाराजांना गुरुस्थानी मानत असत.पुण्यातील थोर संत रावसाहेब सहस्त्रबुद्धे महाराज ,कलावती आई,श्रीक्षीरसागर महाराज हे ही बेटावर महाराजांच्या दर्शनाला येऊन गेले होते.पॉल ब्रंटन हा सुप्रसिद्ध पाश्चिमात्य विद्वान उटकमंड येथे महाराजांचा मुक्काम होता तेव्हा रोज दर्शनाला व मार्गदर्शन घेण्यासाठी महाराजांकडे येत असे.

इ.स १९१३ ते इ.स १९४५ ही बत्तीस वर्षे श्रीमहाराजांनी नव्या बेटात वास्तव केले.या कालात अनेक अनुष्ठाने ,महाअनुष्ठाने केली. इ.स १९४२ मध्ये श्री महाराज द्वारका -सोमनाथची यात्रा करुन परत आले व त्यांची प्रकृती क्षिण होऊ लागली.तरी त्यांच्या नित्यनेमात कसलाही फरक पडला नाही.महाराज आपल्या दर्शनाला आलेल्या प्रत्येक भक्तास सांगत "नामस्मरण करुन आनंदात रहा." १८ मे १९४५ ला महाराजांना ६० वर्ष पूर्ण होऊन गेली. त्यानिमित्ताने त्यांचा हिरक महोत्सव मोठ्या थाटात भक्तांनी साजरा केला.काही मंडळींच्या आग्रहावरुन महाराज हवापालट करण्यासाठी  उटकमंड ला जाण्यास निघाले. १५ जून १९४५ या दिवशी त्यांनी बेट कायमचे सोडले व प्रस्थान ठेवले.पण यावेळी त्यांचे वागणे हे अतिशय वेगळे होते.नेहमी ते निघतांनी दत्त प्रभुंचे दर्शन घेऊन निघत असत पण या वेळी त्यांनी दत्तप्रभुंचे दर्शन घेतलेच नाही.निघतांना नेहमी "आम्ही येतो" म्हणत पण यावेळी "आम्ही जातो" म्हटले. श्रीमहाराज नेहमी म्हणत, "हे सर्व श्रीदत्त महाराजांनी निर्माण केले आहे.त्यांची इच्छा असेल तोपर्यंत ते ठेवतील ,नको असेल तेव्हा नष्ट करतील.आमचा या कशावरही हक्क नाही.श्रीदत्तमहाराज या सर्व वैभवाचे मालक आहेत." पुढे उटकमंड चे थंड हवामान न मानवल्याने महाराज बंगलोरला आले.तिथेही महाराजांच्या दर्शनासाठी खुप गर्दी होऊ लागली.बंगलोरला महाराजांनी अतिरुद्र स्वाहाकार करण्याची इच्छा व्यक्त केली.धारवाडच्या वेदमूर्ती भालचंद्रशास्त्री उप्पिनबेट्टीगिरी यांच्या देखरेखीखाली या स्वाहाकाराची सिद्धता करण्यात आली.श्रावण वद्य द्वादशी शके १८६७  सोमवार दिनांक ३ सप्टेंबर १९४५ ला अतिरुद्र स्वाहाकार पूर्ण झाला.अतिरुद्रानंतर श्रीमहाराजांनी श्रीमल्लिकार्जुनाची महापूजा केली.त्यांस सुवर्णाची शंभर कमळे  व सुवर्णाची अकरा बिल्वपत्रे वाहिली.नंतर ध्वनिक्षेपकावरुन सर्वांकडून आपल्या खड्या आवाजात "ॐ नमः शिवाय" हा मंत्र म्हणवून घेतला.त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे रथातून श्रीमहाराजांनी यज्ञमंडपाला तीन प्रदक्षिणा घातल्या आणि पूर्णाहुतीच्या वेळी आम्हास कळवा असे सांगितले.पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे अतिशय अशक्तपणामुळे ते यज्ञमंडपात येऊ शकले नाही.त्यांनी निरोप पाठविला की, "पूर्णाहुती नंतर ताबडतोब सर्व ब्राह्मणांना भोजनास बसवा व दक्षिणा द्या.ब्राह्मण भोजनास बसले म्हणजे आम्हाला ताबडतोब कळवा." 'ब्राह्मण भोजनास बसले व त्यांना दक्षिणा दिली' असा निरोप येता क्षणी श्रीमहाराज पद्मासन घालून शांत चित्ताने पलंगावर बसले व त्यांनी आपला प्राण ब्रह्मरंध्रात खेचून दत्तचरणी विलीन केला.आपल्या नश्वर देहाचा त्याग केला.ही बातमी वार्या सारखी यज्ञमंडपात पोचली.सर्व भक्त धावतच श्रीमहाराजांच्या मुक्कामी पोचले.सर्वत्र हाहाकार उडाला.पुढे लाखो‌‌ लोकांच्या उपस्थितीत महाराजांवर बंगलोर येथेच अग्नि संस्कार करण्यात आला.महाराजांच्या अस्थी कलशात घालून रेल्वेने पुण्यात व बेटावर आणल्या गेल्या. पुढे भजन मंडपात त्या दर्शनासाठी ठेवल्या गेल्या .काही दिवसांनी महाराज आपल्या एका पारशी भक्त श्रीमती मक्काबाई  करसेटजी यांच्या स्वप्नात गेले व त्यांना म्हणाले "मक्काबाई आम्हाला किती दिवस असे कलशात ठेवणार आहात?या दत्तजयंतीचे पूर्वी आमची समाधी बांधून त्यात हा अस्थिकलश ठेवा." पुढे मार्गशीर्ष शुद्ध दशमी शके १८६७ शुक्रवार दिनांक १४ डिसेंबर १९४५ ला या पवित्र अस्थिवर विधीपूर्वक अभिषेक करण्यात आला.त्याची षोडशोपचार पुजा करण्यात आली व अस्थिकलश त्या समाधीत ठेवण्यात आला.
                                        महाराजांनी केलेले समाजकार्य ,धर्मकार्य अतिशय भव्य आणि दिव्य आहे.तसेच महाराजांनी समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीचे दु:ख दूर करुन त्यांना आनंदच दिला.बेटावर आलेला प्रत्येक माणूस हा आनंद घेऊन,तृप्ततेचा ढेकर देऊन परतत असे.खरं सांगायचे तर महाराजांनी केलेले कार्य, महाराजांनी केलेल्या अलौकिक लिला मला या एका लेखात मांडणे आता खरंच अशक्य झालं आहे.सर्वच प्रसंग वाचले तरी बुद्धी गांगरुन जाते.या चरित्रातील प्रत्येक प्रसंग दिव्य आहे.कमी अधिक करत करत लिहीलेला हा लेख, नाही नाही म्हणता इतका विस्तृत झाला की त्याने केव्हाच शब्द मर्यादा ओलांडली याची मला पूर्ण जाणीव आहे.त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण हे सर्व प्रसंग आणि घटना लिहील्याशिवाय महाराजांचे संक्षिप्त चरित्र पूर्ण होऊच शकत नाही.महाराजांचे चमत्कार ,लिला हा वेगळा विस्तृत चिंतनाचा विषयच होईल.तुर्तास आता या लेखाला विराम देतो.महाराजांबद्दल ,बेटाबद्दल माझ्या मनात नेहमीच एक विशेष आस्था आहे.बेटावरील चैतन्य,तेथील दत्तप्रभु,महाराजांच्या पाऊलखुणा इतक्या आनंद देतात की आता बेट आणि महाराज हा माझ्या जिवनाचा एक भागच झाले आहे.ही शब्दसुमनांजली श्री महाराजांच्या सुकोमल चरणी अर्पण करतो आणि प्रार्थना करतो की या देहाकडूनही आजिवन अखंड दत्त चरणांची सेवा करुन घ्यावी. 🙏🌸🌺🚩

श्रीनारायण_जय_नारायण_जय_नारायण_नारायण 🌸🙏🌺
       ✒️✍️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️


Sunday, June 5, 2022

आज भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे शिष्योत्तम,अंतरंग शिष्य श्रीआनंदनाथ महाराजांची ११९ वी पुण्यतिथी 🙏🌸🌺

 


आनंद म्हणे खूण सांगतो निधान । स्वामींपायी मन असो द्यावे ।। 🌸🌺🙏🌿
                            परब्रह्म भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ माउलींचे स्वनामधन्य शिष्य,अंतरंग शिष्य , श्रीस्वामी माउलींचे प्रतिस्वरुप असलेले सद्गुरु श्री आनंदनाथ महाराज वेंगुर्ले यांची आज ११९ वी पुण्यतिथी.जेष्ठ शुद्ध षष्ठी या पावन तिथीला सद्गुरु श्री आनंदनाथ महाराजांनी आपल्या देहाला योग मार्गाने श्रीस्वामीरायांच्या चरणी विलिन केले व ते वेंगुर्ले येथेच समाधीस्थ झाले.खरंतर महाराजांची समाधी हा जरी आपल्याला त्यांच्या दृश्य कार्याला दिलेला पूर्णविराम दिसत असला तरी, आनंदाथ महाराजांच्या कृपा करुणेची प्रचितीगंगा अखंड वेगाने आजही वाहतच आहे.भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या प्रभावळीतील या अतिशय विलक्षण आणि थोर महापुरुष असलेल्या श्रीआनंदनाथ महाराजांचे अफाट चरित्र ,त्यांनी केलेले विलक्षण स्वामीकार्य ,त्यांच्यावर असलेली स्वामी माउलींची पूर्ण कृपा,त्यांच्या ठाई नित्य वास्तव्यास असलेले स्वामी भगवंत, महाराजांनी केलेली दिव्य आणि प्रासादिक अभंग स्तोत्रादी रचना हे सर्व अगदी अफाट आणि दिव्यत्वाची प्रचिती देणारे आहे.आज आपण श्री आनंदात महाराजांच्या चरित्राची धावती भेट घेऊ कारण शब्दमर्यादा असलेल्या एका लेखात त्यावर कुणीही प्रकाश टाकू शकणार नाही.
                                 श्रीआनंदनाथ महाराज यांचे मूळ नाव गुरुनाथ एकनाथ वालावलकर.सावंतवाडी प्रांतातील बांद्याजवळच्या मडुरे-डिगेवाडी येथे त्यांचा सन १८३० साली जन्म झाला.या वालावलकर घराण्यात पिढीजात दत्त उपासना चालत आली होती. पुढे या कुटुंबाला इतरत्र स्थलांतरीत व्हावे लागले होते.आनंदनाथ महाराजांच्या बालपणाविषयी आज जास्त माहिती उपलब्ध नाही.पण महाराजांचे बालपण भक्ती उपासनेच्या मांगल्य दायक वातावरणातच गेले असेल यात शंका वाटत नाही.मुळातच दत्तभक्तीचे बिज या कुटुंबात पूर्वीपासूनच रुजले होते कारण प्रत्यक्ष दत्तप्रभु स्वामी रायांच्या कृपा करुणेच्या विशाल वटवृक्षाखाली वाढणारे एक कृपा बिज या घरात जन्मास येणार होते.त्यामुळे "शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी" या उक्ती प्रमाणे हे कुटुंब जिवन व्यतित करणारे असणार यांत तिळमात्र शंका येत नाही.पुढे गुरुनाथ तथा आनंदात महाराजांनी तारुण्यात हरड्याचा व्यापार सुरु केला.त्याकारणाने आनंदाथ महाराजांचा मुंबईशी अधीकच संपर्क वाढला जणू ही त्यांच्या अफाट स्वामी कार्याची मुहूर्तमेढ होती.कारण याच वेळी त्यांचा मुंबईतील स्वामी भक्तात अग्रगण्य असलेले बळवंतराव भेंडे तथा तात महाराज यांच्याशी संपर्क आला.मुंबई येथील प्रिन्सेस स्ट्रीट येथे तात महाराजांची व्यापारी पेढी होती.गुरुनाथांचा बर्याच वेळा येथेच मुक्काम असायचा.तात महाराज हे जांभुळवाडीत राहत असत.श्रीगुरुनाथ हे तिथेही जात असत.मुळात शिवभक्त असलेले तात महाराज हे बाबुलनाथ येथे शिवदर्शनाला जायचे त्यावेळी त्यांच्याबरोबर गुरुनाथही जात असत.याकारणाने तात महाराज व गुरुनाथ यांच्यात अगदी जिव्हाळ्याचे व जवळचे संबंध प्रस्थापित झाले.त्यांच्यात विविध पारमार्थिक विषयांवर चर्चा होत असे पण या चर्चेचा मुळ गाभा म्हणजे भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज.स्वामींचा विषय या चर्चेत वेळोवेळी निघत असे.तात महाराजांवर स्वामी कृपा झाली तेव्हा त्यांचे वय अवघे अठ्ठावीस वर्षांचे होते.स्वामींनी आपल्या जागी त्यांना प्रत्यक्ष शिवदर्शन घडविले होते.या सर्व घटनेचे गुरुनाथ हे प्रत्यक्ष साक्षीदार होते.गुरुनाथांना तात महाराजांमुळे स्वामींच्या दर्शनाची ओढ निर्माण झाली.त्यांची प्रथम स्वामी भेट ही अतिशय विलक्षण आहे.
                             स्वामी दर्शनासाठी व्याकूळ झालेले गुरुनाथ प्रज्ञापूरी अक्कलकोट येथे ज्यावेळी प्रवेश करते झाले तेव्हा स्वामी हे वटवृक्षाखाली असल्याचे त्यांना कळले.तेव्हा लवकरात लवकर शुचिर्भूत होऊन स्वामी दर्शनाला जाण्याचा ते विचार करत हात पाय धुण्यासाठी पाय-विहीरीत उतरले.पण त्यावेळीही स्वामींचे रुप कसे असेल,ते कसे बोलत असतील,त्यांच्या पुढे गेल्यावर काय बोलायचे ,ते आपल्याशी काय बोलतील या सर्व विचारांचे काहूर त्यांच्या डोक्यात माजले होते.या विचारांचा गोंधळ सुरु असतांनाच अचानक त्यांच्या मस्तकावर एक झाडाची डहाळी येऊन पडली.पण ही काही सामान्य डहाळी नव्हती.या डहाळीचा स्पर्श काही वेगळाच होता.तिचा स्पर्श होता क्षणीच गुरुनाथांच्या अंगात सळसळ निर्माण झाली.त्यांच्या मुलाधारातील सुप्त निद्रिस्त असलेली कुंडलीनी शक्ती जागृत होऊन उर्ध्वगामी झाली.एका विलक्षण अनुभवातून जात असतांनाच अचानक एक हास्याची झुळूक वातावरणात पसरली.एका नादासारखा हा हास्यकल्लोळ गुरुनाथांच्या कानी पडला.तो कुठून येतोय हे बघण्यासाठी गुरुनाथ पाठीमागे वळले तर तिथे प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती भगवान‌ श्री अक्कलकोट स्वामी माउली उभे होते.स्वामीराय माउली त्यांच्याकडे कृपा दृष्टीने बघत पुढे आली व त्यांनी आपल्या कृपा हस्त गुरुनाथांच्या मस्तकावर ठेवला.त्यानंतर मात्र गुरुनाथांमध्ये अंतर्बाह्य विलक्षण दिव्य असा बदल घडून आला.अक्कलकोट मुक्कामी गुरुनाथ स्वामी भगवंतांचे सर्व लिला चरित्र प्रत्यक्ष बघू लागले.अनेक अचाट अफाट अशा लिला त्यांनी प्रत्यक्ष तिथे बघातल्या.या कृपा प्रसादानंतर गुरुनाथांच्या मनात प्रपंच , लौकिक सर्व सुखांचा त्याग करुन अखंड स्वामी सेवा करण्याचा विचार येऊ लागला.पण स्वामीरायांनी त्यांना जो उपदेश केला तो आपल्या सर्वांसाठी आजन्म महत्वाचा व मार्गदर्शक आहे.स्वामींनी त्यांना जे मार्गदर्शन केले ते असे की ,"मला मिळविण्यासाठी काहीही सोडू नकोस.कारण मला सोडून असे जगात काही नाही.माझ्या असण्यातच सर्वत्रांचे असणे आहे.माझ्यापासून जर कोणी भिन्न नाही तर वगळणार काय.वासनेतून निर्माण झालेला वासनामयी जीव,त्याच्या देहप्रारब्धी जे असेल ते होईल.प्रवाहात झोकून दे.बुडणार नाहीस याची हमी.सर्व प्रवाह शेवटी मलाच येऊन मिळतात." हा स्वामी उपदेश हृदयात साठवून गुरुनाथ आता मुंबईत परतले. आता त्यांनी आपले 'गुरुनाथ' हे नाव बदलून 'गुरुदास' असे ठेवले.आता आपला हा जन्म स्वामी रायांच्या सेवेसाठी आहे हे त्यांनी मनोमन ठरविले.आपल्या पत्नी सौ.गंगाबाईंना त्यांनी अक्कलकोटला घडलेला सर्व वृत्तांत जसाच्या तसा सांगितला व आता हे जिवन स्वामीरायांच्या चरणी व्यतीत करायचे.आपण आता स्वामी सेवेतच अखंड राहण्यासाठी तळमळत आहोत अशी आपली अंत:करणाची स्थिती त्यांच्यापुढे मांडली.तेव्हा त्या महासाध्वीने महाराजांना सहर्ष परवानगी दिली.ही काय सामान्य बाब नव्हे.एका थोर महापुरुषांच्या चरित्रात त्यांच्या सहधर्मचारिणी त्यांच्याच इतक्या तयारीच्या व अधिकारी असतात हे पुष्कळ संत चरित्रातून आपल्याला लक्षात येतं.यानंतर ते अक्कलकोट येथे दाखल झाले.आता उठता बसता ते स्वामींच्या लिला पाहून आनंदाचा लाभ घेऊ लागले. गुरुदासांचा अक्कलकोटी वावर आता सर्वत्र झाला होता.त्यामुळे ते तेथील सर्व सेवेकर्यांचे परिचित झाले होते.स्वामीकृपेने त्यांची आता विदेही अवस्था झाली होती.कित्येकदा त्यांना देहभान राहत नसे.त्यात त्यांचे वस्त्र केव्हा गळून पडत हे ही त्यांच्या लक्षात राहत नसे.बहुदा ते लंगोटी नेसूनच असत.स्वामीकृपेने विविध स्तोत्र ,रचनांचे स्फुरण त्यांना होऊ लागले.स्वामी महाराज त्यांना जवळ बोलवीत व म्हणत, "आनंद करा,आनंदनाथ व्हा." हे ऐकून भक्तगणांनी त्यांचे नाव गुरदास ऐवजी "आनंदबुवा" किंवा "आनंदनाथ" असे केले.एकदा श्रीस्वामीरायांनी त्यांना चिमुकल्या सोन्याच्या पादुका दिल्या.त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या हातात छोट्याशा स्फटिकाकार पादुका दिल्या.सर्वात महत्वाचे म्हणजे एकदा स्वस्वरुपाचा बोध करवून दिल्यानंतर स्वामी माउलींनी त्यांना अगदी निकट बोलविले.गळा खाकरल्यासारखे केले नि मुखातून आत्मलिंग काढून आनंदनाथांच्या हाती सोपविले. जणू भगवती सरस्वती माउली स्वामी मुखातून आनंदनाथांच्या हाती आली.त्यांना जो श्रीस्वामीरुपाचा बोध झाला तो शब्दरुपे साकार होऊन पुढे त्यांच्या "आनंदलहरी" नामे ओवी ग्रंथांच्या प्रस्तावनेत दाखल झाला. ही प्रस्तावना पुढे कधीतरी वेगळ्या लेखातून देईलच तुर्तास ती येथे देणे शक्य नाही.

श्रीस्वामी समर्थ महाराजांनी आनंदनाथ महाराजांना दिलेले आत्मलिंग 🌸🙏🌿


                                आत्मलिंग प्राप्तीनंतर श्री आनंदनाथांकडे पाहण्याचा सर्व भक्तगणांचा दृष्टीकोन अगदी बदलून गेला.पुढे आनंदनाथ महाराज अफाट अशी स्तोत्ररचना करू लागले होते.पुढे श्रीस्वामी महाराजांनी आनंदाथ महाराजांना एका फार मोठ्या कार्यासाठी आपल्यापासून दूर पाठविले.ते महान आणि विलक्षण कार्य म्हणजे फकिर वेशात शिरडीत राहणारा एक महान गुरुपुत्र जो एका पडक्या जागेत राहत असे.ज्यांच्या विलक्षण अधिकाराला शिरडीकर अजुन तरी ओळखू शकले नाही.ते त्याला एक "वेडा फकीर" असेच समजत.वरवर वेडसर वाटणारे हे महापुरुष खरोखरीच अंतरंगी पुरते शहाणे असतात.अशापैकी एक असलेले हे अलौकिक साईनाथांचे रुप.सर्व धर्मियांसाठी पूजनीय ठरणारे असे हे साईस्वरुप होते.पण हे रुप सर्वांसमोर सांगणारा कुणीतरी अधिकारी महापुरुष हवा होता.या महत्वाच्या कार्यासाठी आनंदनाथांची निवड स्वामीरायांनी केली होती.आनंदनाथ महाराज त्यानंतर या कार्यासाठी नाशिक येथे आले.नाशिक येथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर शिरडी जवळील सावरगाव येथे त्यांनी आपला मुक्काम हलविला.निस्सिम स्वामी भक्त सरदार माधवराव विंचूरकर यांची सावरगाव येथे सत्ता होती. सावरगावी आल्या बरोबर तेथील मुस्लिम मामलेदारावर आनंदनाथ महाराजांनी कृपा केली.तेथील एका घोडेस्वार झालेल्या इंग्रज अधिकार्यांला आपल्या अलौकिक सामर्थ्याचा प्रत्यय महाराजांनी आणून दिला.महाराजांचा अधिकार बघून तो अधिकारी तात्काळ श्रीचरणी शरणं आला व महाराजांना काय हवे ते जातिने देण्याची व्यवस्था त्याने केली.त्यामुळे गावातील प्रत्येक घराघरात फक्त आनंदनाथ महाराजांचीच चर्चा होती.याच घटनेनंतर सावरगाव येथे समर्थांच्या मठाची पाया भरणी झाली असे म्हटले तर वावगे होणार नाही.मुस्लिम मामलेदारांनी आनंदनाथ महाराजांना लागणारी जमीन तात्काळ दिली.गावातील मारोती मंदिराजवळील प्राप्त जागेत जवळच स्वामी समर्थ माउलींचे पादुका मंदिर,ध्यान मंदिर व एका बाजुस पांथस्थांसाठी ओवर्या बांधण्याच्या तयारीस आनंदनाथ महाराज लागले.त्याच्याही आधी गावातील पाण्याची अडचण दूर करण्यासाठी महाराजांनी आपल्या हातातील चिमटा जमिनीवर  मारला व स्वामी मठाच्या जागेजवळील उजव्या बाजूला एक तिर्थ प्रकट केले.त्यानंतर त्या ठिकाणी लोकांकरवी खोदून छोटेखानी तळी निर्माण केली.लवकरच आनंदनाथ महाराजांनी सावरगाव येथील लोकांच्या मनात स्वामींच्या भक्तीचे बी पेरले.स्वामी महात्म्य घराघरात पोचवले.काही दिवसांतच समर्थांच्या पादुकांची गावभर जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली व नवीन पादुका मंदिरात त्यांची उत्साहात स्थापना करण्यात आली.सावरगावात महाराज आले तेव्हा ते फक्त लंगोटी नेसत.त्यांच्याजवळ एक चिमटा, कमंडलू,झोळी,कुबडी ,पायी खडावा , समर्थांच्या पादुका,अत्तरे,पुजा साहित्य एवढेच काय ते साहित्य होते.
                            पुढे काही काळाने शिरडीचे ग्रामस्थ माधवराव देशपांडे ,दगडू भाऊ गायके,नंदराम मारवाडी व भागचंद मारवाडी हे चौघे महाराजांच्या दर्शनास सावरगाव येथे आले. त्यांनी महाराजांचे दर्शन घेतलो तोच महाराज निरवानिरव करु लागले.ते त्या शिरडीवासीयांना म्हणाले, "आम्ही आत्ताच तुमच्या बरोबर शिरडीला येणार आहोत." शिरडीकर मंडळी आनंदली.लगेच सर्व निघण्यासाठी बैलगाडीत येऊन बसले तोच ते पाहून महाराज धावतच येऊन गाडीत बसले.'मी लवकरच जाऊन येतो' असे ते सावरगाववासीयांंना म्हणाले.एक तासात सर्व लोक शिरडीत येऊन पोचले.पोचताच आनंदनाथ महाराज विचारतात, "अरे,गुरु मंदिर कुठे आहे? साई कोठे आहे? गोंधळलेल्या भक्तांनी त्यांना साईंच्या नित्य पडक्या बैठकीजवळ आणले.आणि काय आश्चर्य ! सर्वांपासून नित्य अलिप्त ,एकाकी व एकांतात राहणार्या विदेही साईंचा अलिप्तपणा कुठल्याकुठे विरुन गेला.आनंदनाथ महाराज गाडीतुन उतरण्याची गडबड करु लागले.साई आपल्या जागेवरुन उठून उभे राहिले.दोघेही समोरासमोर येताच त्यांची गळाभेट झाली.साईंनी आनंदनाथांचा हात धरुन त्यांना आपल्या नित्याच्या बैठकीवर बसविले.दोघांचाही मुक संवाद चालला होता.दोघेही एकमेकांच्या नजरेत नजर टाकून बघत होतो.तोच आनंदात महाराज जवळच रेंगाळणाऱ्या शिरडीतील ग्रामस्थांकडे तिव्र दृष्टीक्षेप टाकत म्हणाले, "हिरा हो प्रत्यक्ष,हा साई प्रत्यक्ष हिरा आहे.आज जरी तुम्हाला तो उकिरड्यावर दिसत आहे तरी तो अतुल्य असा हिरा आहे.तुम्हा लोकांना भविष्यात माझ्या या शब्दांची आठवण येईल." आनंदनाथ महाराज शिरडीत आले तेव्हा साईनाथ हे सदतीस वर्षाचे होते.तब्बल दोन महिने आनंदनाथ महाराजांचा मुक्काम साईनाथांच्या बरोबर शिरडीतील पडक्या जागेत ज्याला साईनाथांनी द्वारकामाई म्हटले या ठिकाणी होता.आनंदनाथांच्या वक्तव्याने शिरडीकर खडबडून जागे झाले.आता आनंदनाथांनी साईंच्या अधिकारावर जणू शिक्कामोर्तब केले होतो.लोकांना ही जाणिव करुन देऊन आनंदात महाराज दोन महिन्यांनी  सावरगावला परतले.पुढे सावरगावातील आपल्या काही शिष्यांना महाराजांनी स्वामी सेवा ,मठ यांची व्यवस्था कशी ठेवायची ,काय नियम पाळायचे याचे सखोल मार्गदर्शन केले व त्यानंतर आम्ही अधूनमधून सावरगावी येत जाऊ असे आश्वासन देऊन सावरगाव सोडले.महाराजांचे सावरगाव येथील कार्य पूर्णत्वास गेले होतेच आता ते स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे जाण्यास निघाले.काही काळाने ते अक्कलकोट येथे पोचले.वासुरु आपल्या गाईला येऊन भेटले.ही भेट अवर्णनीय अशीच होती.स्वामीमाउलींच्या चरणी मस्तक ठेऊन आनंदनाथांंनी आपली हृदयातील दर्शनेच्छा पूर्ण करुन घेतली.

                          पुढे स्वामींनी आनंदनाथांना तळकोकणात जाण्याची आज्ञा केली.स्वामी आज्ञा शिरसावंद्य मानून आनंदनाथांनी अक्कलकोट सोडले.दरमजल करीत ते सावंतवाडी येथे आले.आत्मेश्वर लिंगमंदीरासमोर आनंदनाथ महाराजांनी आपला मुक्काम ठेवला.तेथेच समोर महाराजांनी समर्थांच्या पादुकांची स्थापना केली.यावेळी अन्नशांती प्रसंगी पावसाचा विलक्षण प्रसंग घडला होता.याच सावंतवाडीत आनंदनाथ महाराजांना त्यांचा प्रिय शिष्य मिळाला ज्यांनी आनंदनाथ महाराजांच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द आपल्या लेखनीद्वारे लिहून ठेवले.ते शिष्य म्हणजे दत्ताजी पंडित.दत्ताजींचीच पुण्याई की आपण आज आनंदनाथ महाराजांनी निर्माण केलेले जे उपलब्ध आहेत ते अभंग ,रचना वाचू शकतो आहोत.पुढे आपल्या या शिष्यांसमवेत महाराज वेंगुर्ले येथे जाण्यास निघाले रस्त्यातील होडावडा तेथील मुठये पै यांच्याकडे आपल्याकडील स्वामी महाराजांच्या पादुकांची (एक अंगुष्ठमात्र व दुसरी संगमरवरी) यांची स्थापना केली. महाराज आता आपल्या आवडत्या निजस्थानी म्हणजे वेंगुर्ले येथे येऊन पोचले.वेंगुर्ल्यात महाराजांनी अनंत लिला केल्या आहेत.त्यांनी आपल्या नावे वेंगुर्ले कॅंप भागात मठासाठी वेगळी जागा खरेदी केरण्याची व तेथे स्वामी मठाची स्थापना करण्याची योजना आखली.पण स्वामी भेटीस्तव आता महाराज व्याकुळ झाले होते.त्यामुळे ते आधी अक्कलकोट येथे गेले.अक्कलकोटी काही काळ वास्तव्य झाले पण त्यावेळी स्वामीरायांचा समाधी लिला करण्याचा विचार सुरु होता व त्यांची त्यानुसार सावरासावर ही सुरु होती.आनंदनाथ महाराजांनी हे हेरले व या कारणाने आनंदनाथ महाराजांनी आपला मुक्काम वाढवला.शेवटी प्रत्येकाला नको असलेला प्रसंग आलाच.स्वामी माउलींनी चैत्र वद्य चतुर्दशी या दिवशी आपली समाधी लिला केली व आपली अक्कलकोटातील सगुण लिला समाप्त केली.अगदी खिन्न अंत:करणाने आनंदनाथ महाराज मुंबई ला निघाले.तेथे येऊन ते आपले गुरुबंधू ,प्रिय मित्र तात महाराजांना भेटले.तात महाराजांनी आपले शिष्य बाळकृष्ण महाराज सुरतकर यांच्या करवी पुढील स्वामी कार्य करविण्याचे ठरविले होते व त्यासाठी त्यांना पुढेही मार्गदर्शन करण्याची विनंती आनंदनाथ महाराजांना केली.आनंदनाथ महाराजांनी वेळोवेळी बाळकृष्ण महाराजांना मार्गदर्शन केले होते.बाळकृष्ण महाराज आनंदनाथ महाराजांना काका म्हणत असत.तात महाराजांना भेटून महाराज सावरगाव येथे आले.तेथील भक्तांना भेट देऊन त्यांनी शिरडीला प्रस्थान केले.त्यावेळी साईनाथांची भेट घेऊन ते वेंगुर्ले येथे परतले.एक दशक वेंगुर्ले बंदरावर स्वामी कार्य केल्यावर वेंगुर्ले कॅंप येथे जागा घेऊन महाराजांनी मठाची व राहण्याची जागा विकत घेतली.सन १८९२ ला तेथे मठ व राहण्यास जागा बांधली.चैत्र वद्याच्या अखेरीस त्यांनी तेथे एक अघटित लिला केली.त्यांनी दूर्धर रोग ,व्याधी यांच्या शमनार्थ मठाच्या समोरच्या बाजूस डाव्या अंगाला श्रीस्वामी समर्थ नामघोष करीत हातातील चिमटा जमिनीवर मारला व तीर्थाची निर्मिती केली.पुढे अनेक लोक मुक्कामी येत व या आनंदतिर्थात स्नान करुन रोग मुक्त होत असत.याच वेंगुर्ल्यात महाराजांनी अनंत लिला केल्या ,अनेकांना दु:ख मुक्त केले,अनेकांच्या व्याधी दूर केल्या,अनेकांच्या पोट पाण्याची सोय करुन दिली.महाराजांच्या सामर्थ्याची प्रचिती शेकडो जनांना येत होतीच.एका भक्ताच्या विनंतीवरून महाराज त्रंबकेश्वर मार्गे सटाणा येथे गेले.त्रंबकराज येथे पावसाने पाठ फिरवली होती.त्यावेळी महाराजांनी तेथील ब्रह्मवृदांना तीन कुंभांनी देवांना अभिषेक करण्याचे सांगुन धो धो पाऊस पाडल्याची अतर्क्य लिला चरित्रात वाचायला मिळते.सटाणा येथे काही दिवस मुक्काम करुन ते सावरगावी आले.तेथे गुरुपौर्णिमा उत्सव करुन ते साईनाथांच्या भेटीस शिरडीस निघाले.महाराज आपल्याकडे निघाले हे जाणून तिथे आपल्या पुढे बसलेल्या लोकांना साईनाथ म्हणाले, "केवढी मोठी माणसे येत आहेत बघा." महाराज तिथे गेल्यावर साईनाथांनी त्यांना आपल्या आसनावर बसविले.पुढे काही काळ साईनाथांजवळ थांबून ते आपल्या गुरुमाउलींच्या अखेरच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे आले.स्वामींनी समाधी लिला करुन आता २५ वर्ष लोटली होती.आता आनंदनाथ महाराज सत्तर वर्षाचे झाले होते.महाराज अक्कलकोटला पोचले व व्याकूळ अंत:करणाने स्वामी माउलींना आळवू लागले.तोच स्वामी महाराज पोटावर हात फिरवत मोठ्या मोठ्याने हसत त्यांच्यासमोर अवतीर्ण झाले व महाराजांना म्हणाले, "आनंदा,तुझ्या नशिबात पोरगा आहे बरं." या अनपेक्षित आशिर्वादाने आनंदनाथ महाराज चक्रावले पण स्वामी इच्छा म्हणून दंडवत प्रणाम करुन अक्कलकोटहून परतले.स्वामींचा शब्द खोटा कसा ठरेल? पुढे सत्तर वर्षांच्या महाराजांना व पन्नास वर्षांच्या गंगाबाईंना एक पुत्र झाला ज्याचे नाव महाराजांनी  गणपती असे ठेवले.पण या प्रसंगाने मुळातच विरक्त असलेले महाराज प्रपंचाकडे वळले नाही.त्यांना आता स्वामी चरणांना भेटण्याचा नित्य ध्यास लागला होता.
                                स्वामी समाधीलिला झाल्यावर दोन दशकांहून मोठा काळ महाराजांनी स्वामीनामाचा ध्वज उंच क्षितीजावर नेला होता.पण आता ते अंतर्मुख झाले होते.आता त्यांना स्वामी चरणी विसावा घ्यायचा होता.सन १९०३ ला स्वामी समाधी लिलेला पंचवीस वर्षे पूर्ण झाली होती.स्वामी समाधी दिनाचा आनंदनाथ महाराज कुठलाही उत्सव करीत नसत.तरी त्या दिवशी ते अधिकच अंतर्मुख झाले होते.त्यांनी मठाच्या उजव्या हाताला खोदकाम करवून घेतले व भूमिगत छान खोली बनवून घेतली.हे पाहून सर्व भक्त हवालदिल झाले.लोकांना काय प्रकार चाललाय हे कळतच नव्हते तेव्हा आनंदनाथ महाराज त्यांना उद्देशून म्हणाले, "सर्वांना चिदानंद मिळवून देईल असे हे श्रीस्वामींना प्रिय असलेले गाव.यास आम्ही चिदापूर समजतो.ज्याचे भाग्य असेल तो येथे येईल.स्वामीगुरुंचे पद्यमय साहित्य निर्मीतीची आज्ञा ही आम्हास स्वामी गुरुंनीच दिली आहे.या सर्व रचना घोळवित तीन दिवस व तीन रात्र असा ध्यास धरल्यास श्रीस्वामी महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन देण्याची ग्वाही दिलेली आहे.हे लक्षात ठेवून तसा निजध्यास धरावा नि अनुभव घ्यावा." हवालदिल झाल्याला आपल्या भक्तांना उद्देशून महाराज म्हणाले, "श्रीस्वामीगुरुंचे आत्मलिंग येथे आहे.त्याला शरण जा.तुम्हास जे हवे ते मिळेल.आम्ही फक्त हा सांगावा सांगणारे आहोत.आमच्यापाशी देण्यासारखे आहे काय! श्रीस्वामी नाम जपाचा आग्रहच आम्ही धरु शकतो.आपण ज्या भक्तीने इथे वावरत आहात,ते पाहून हा स्वामीदास आनंदीत आहे.मला हे चिदापूर अत्यंत भावले आहे.येथील तिर्थाने रोगव्याधी निवारण्याची आम्ही खात्री देतो." श्रीआनंदनाथ महाराजांची ही निरवानिरव बघून अनेक लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले.आपल्या कुटुंबियांना त्यांनी पुढील मार्गदर्शन केले होतेच.पुढे त्यांना घ्यायला विशेष शिवदूत आले होते.तेव्हा त्यांना महाराजांनी ठणकावून सांगितले की, "आम्हास स्वामी सांगतील तेव्हाच आम्ही निघणार.आजपासून सहा महिने व चार दिवसांनंतर जेष्ठ शुद्ध षष्ठीला आम्ही समाधीत शिरणार" त्या प्रसंगाचे वर्णन महाराजांनी स्वतः करुन ठेवले आहे.
"नाही देखिला त्रिशूल । फोडील तुझे कोथाळ।।१।।अजुनी होई तू शहाणा । फुका भ्रमसी अज्ञाना।।२।। तुझा कैचा रे महादेव । तपी नेणती वैभव ।।३।। जाला आयुष्य निवाडा । मुका बैस की माकुडा ।।४।। सहा मास चार दिन । तेव्हा देईन ओळखण ।।५।। आनंद म्हणे आठव धरी । सोडी भ्रमाची भरारी ।।६।।
         या प्रसंगाचे वर्णन महाराजांनी आपल्या कुटुंबियांना ऐकविले होते.जेष्ठ शुद्ध षष्ठी या तिथीला फारसा गाजावाजा न करता महाराज मोजक्या भक्तमंडळी सह मठालगतच्या समाधी मंदिराकडे आले.सर्वांनी त्यांचे मनोभावे पूजन केले.महाराजांनी सर्वांचा निरोप घेतला व स्वामी माउलींच्या गुणवर्णनाची स्तोत्रे म्हणत ते समाधीत बैसले.किंचीत शांत होऊन समाधी लावली व स्तब्ध झाले.मोठ्या जड अंतःकरणाने सर्व स्वामी भक्तांनी बाहेर येऊन समाधीची शिळा बंद केली.अशा प्रकारे स्वामीरायांचे हे रत्न परत आपल्या स्वामीरायांच्या चरणी विसावले.अशा या अतिशय थोर संतांची आज पुण्यतिथी.महाराजांनी स्वामी नामाचा पताका आजिवन वर वर नेला.स्वामीरायांच्या चरणी आपली भली मोठी प्रासादिक शब्द सेवा महाराजांनी निर्माण केली.त्यांनी स्वामी महाराजांवर पाच हजार अभंग,अद्वैत बोधामृतसार व अभेद कल्पतरु  हे दोन ग्रंथ ,तसेच गुरुस्तव , श्रीस्वामी चरित्र स्तोत्र ,भक्ती ,ज्ञान,वैराग्य,विचार,स्वरुप,चिदानंद इत्यादी विषयांवर अमाप रचना केली.आजही या प्रसादिक रचनांचे वाचन करुन अनेक लोक दु:ख मुक्त होत आहेत.आपण ही या रचना जरुर वाचाव्यात...अशा या थोर महापुरुषांच्या चरणी माझे शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम.श्रीमहाराजांनी आम्हा सर्वांना श्रीस्वामीरायांना शरणं जाण्याची बुद्धी द्यावी हिच श्रीचरणांशी प्रार्थना.

   ✒️✍️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️

श्रीस्वामीसमर्थजयजयस्वामीसमर्थ🙏🌺🌸🌿

श्रीदत्त: शरणं मम🙏🌺🌸🌿


कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...