Monday, June 13, 2022

श्रीनृसिंहवाडीचे_दत्त_परमहंस_श्रीमहादबा_पाटील_महाराजांची_आज_४०_वी_पुण्यतिथी☘️🌸🙏🌺


 श्रीनृसिंहवाडीचे_दत्त_परमहंस_श्रीमहादबा_पाटील_महाराजांची_आज_४०_वी_पुण्यतिथी:- 🙏🌺🕉️🌸☘️

           

                               श्रीदत्त संप्रदाय म्हणजे "अवधूतांची खाणच" असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही‌.भगवान दत्तात्रेय प्रभु हे विविध महात्म्यांच्या रुपात येऊन वेळोवेळी भक्तकल्याण करते झाले आहे.शेकडो वर्षा पासून आजही या दत्त संप्रदायात विलक्षण आणि अतिशय दिव्य असे महापुरुष होऊन गेले.त्याच महापुरुषांच्या मांदियाळीतील झालेले एक अतिशय विलक्षण आणि थोर महापुरुष म्हणजे सद्गुरु श्री महादबा पाटील महाराज. श्री दत्तप्रभुंची राजधानी असलेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे गेल्यावर श्रीपादुका घाटाच्या वरील बाजुस, संस्थानाच्या भक्तनिवासाच्या अगदी जवळ आपल्याला एक भव्य असं मंदिर लागतं ते मंदीर म्हणजे श्रीमहादबा पाटील महाराजांचे समाधी मंदिर आहे.दत्तसंप्रदायातील पराकोटीचे विलक्षण सिद्ध अवतारी सत्पुरुष असलेले श्री महादबा महाराज अतिशय प्रसिद्धिपराङमुख होते.कुठेही प्रगट होऊन कार्य त्यांनी केल्याचे दिसत नाही.अतिशय उन्मनी आणि बालपिशाच्चवृत्तीतील हे महापुरुष सदैव आपल्या आत्मानंदातच तल्लीन असतं. महादबा महाराजांची आज पुण्यतिथी त्या निमीत्ताने त्यांच्या चरित्राचे ओझरते दर्शन आपण आज करुयात.

                         धुळगाव (सोनी) तालुका. तासगाव,जिल्हा सांगली या गावी श्री बाबगोंडा पाटील व सौ.बायाक्का माता या दत्तभक्त दांपत्यापोटी जन्मसिद्ध असलेल्या महादबा पाटील महाराजांनी अश्विन शुद्ध त्रयोदशी सोमवार दि.९ ऑक्टोबर १९१६ साली जन्म घेतला. महाराजांच्या घराण्याला पाटीलकी आधीपासुनच होती आणि त्यांचे संपूर्ण घराणे हे पूर्वापार दत्तभक्त होते.जणु दत्तभक्तांच्या या शुद्ध बिजापोटी महाराजांसारखे सिद्ध अवतारी महात्मे फलस्वरुप त्यांना प्राप्त झाले होते. महाराजांचे वडील श्री.बाबगोंडा पाटील हे अखंड ४० वर्षे प्रत्येक पौर्णिमेला श्रीक्षेत्र नृसिंहवाडीची पायी वारी करीत असत. या सेवेचा परिपाकच जणु महाराजांसारखे सिद्ध त्यांना पुत्ररुपाने प्राप्त झाले. पुढे श्रीमहादबा महाराजांनी सुद्धा ही पौर्णिमेला पायी वाडीला जाण्याची परंपरा अखंडपणे चालु ठेवली.श्रीमहादबा महाराज हे लहानपणापासूनच वाचासिद्ध होते. एकंदर त्यांच्या लहानपणाच्या लिलांवरुन,त्यांच्या दिव्य प्रतिभेवरुन पाटील घराण्यात सिद्ध जन्माला आले याची लोकांना जाणिव होवु लागली होती.महाराज वयाच्या सातव्या वर्षापर्यंत अधूनमधून घराबाहेत जात असत.पुढे बाराव्या वर्षी त्यांनी घर सोडले ते कायमचेच.श्रीमहादबा महाराज हे नैष्ठिक ब्रह्मचारी,स्वेच्छाविहारी,पूर्ण विदेही,एकांतप्रेमी,आत्मानंदात लिन,भक्तांनी आठवण काढताच भक्ताकडे धाव घेणारे असे अलौकिक सत्पुरुष होते.अन्य सत्पुरुष,संतांप्रमाणे साधना करुन आत्मज्ञान व आत्मसामर्थ्य प्राप्त करण्याची त्यांना आवश्यकता नव्हती. ते म्हणत, `मी शिकुन आलोय' ते जन्मसिद्ध असल्यामुळे त्यांना बाह्य गोष्टींची गरज नव्हती.महादबा महाराज हे स्वयंभू सिद्ध व आत्मज्ञानी होते.

खटाव (नांद्रे) येथील प.पू.श्रीरामानंद महाराज खटावकर यांचा महादबा महाराजांवर अनुग्रह झाला होता.तरी महाराजांच्या जिवनात साधकावस्था आढळत नाही.श्रीरामानंद महाराज हे नाथ परंपरेतील असल्यामुळे पाटील महाराज हे नाथ परंपरेशी अनुबंधित असावेत.औपचारिकदृष्ट्या बघितले तर महाराजांचे शिक्षण हे मराठी चौथी पर्यंत झाले होते परंतु आश्चर्य म्हणजे ते भक्तांना दासबोध ,ज्ञानेश्वरीतील एखादा अध्याय काढायला लावून त्यांच्याकडून एखादी ओवी वाचुन घेत आणि आपण त्या ओवीचा अर्थ सोदाहरण समजावुन सांगत.त्यांना अशा सर्व ग्रंथांचे ज्ञान होते व ग्रंथातील सर्व श्लोक,ओव्या ही त्यांना माहीत असत.श्रीमहाराजांचा अधिकार फार उच्च कोटीतील होता.महाराज त्रिकालज्ञानी होते.ते भक्तांना सांसारीक,पारमार्थीक आणि भौतीक मार्गदर्शन करीत व त्यांच्या अडीअडचणी सोडवत असत.क्वचितच लोक त्यांच्या कडे अध्यात्मिक ज्ञान घेण्यासाठी येत.त्यांनाही महाराज कृतकृत्य करत.महाराजांकडे सर्व जातीधर्माचे लोक येत असत.गरीब श्रीमंत असा भेदभाव त्यांच्याकडे नव्हता.कर्मकांडाचा प्रचार त्यांनी कधीही केला नाही.महाराजांच्या भक्ताबद्दल बोलायचे झाले तर असंख्य लोकांचा ते आधार होते.भक्त त्यांना बस,सायकलवरुन,पायी तसेच मोटारसायकलवरुन किंवा बैलगाडीने महाराजांच्या इच्छेनुसार सोडत असत व त्यांना मिळेल त्या वाहनाने अगदी विमानानेसुद्धा भक्त त्यांना नेत असत. पाटीलबाबा हे योगी पुरुष होते तसेच ते राजयोगी ही होते. महाराजांच्या खिशात सदैव एक डबी ठेवलेली असे त्यात नृसिंहवाडीचा अंगारा सदैव त्यांच्या बरोबर असे.भक्तांनी आपल्या अडचणी सांगीतल्या की महाराज त्या डबीतील अंगारा काढुन भक्तांला लावत आणि त्यामुळे भक्तांच्या अडचणी दुर होत असत. महाराजांनी कधीही पैशाला स्पर्श केला नाही.ते कधीही धनाला शिवले नाही. ते देवावतारी असुन सुद्धा सामान्यासारखे राहिले.अखंड ५० ते ५५ वर्षे ते मिळेल त्या साधनाने भक्तांकडे जाऊन त्यांना आशिर्वाद व अंगारा देऊन अडचणीतुन सुटका करीत.भक्तांचे मनोरथ पूर्ण करणे हेच आपले काम आहे असे ते मानत असत.भक्तसुद्धा महाराजांच्या बरोबर राहुन त्यांची सेवा करण्यात धन्यता मानत असत.महाराज पौर्णिमेस नरसोबा वाडीला व संकष्टीला मिरजेतील थोर संत अण्णाबुवांच्या मठात नेमाने जात व राहत असत.मुंबई,पुणे,बंगळुरु,आंध्रप्रदेश,गुजरात,मध्य प्रदेश अशा लांबच्या गावी सुद्धा भक्तांनी त्यांना नेऊन यात्रा केल्या आहेत.महाराज मितभाषी होते,मोजकेच बोलत.ते शाकाहारी होते.महाराजांची राहणी अत्यंत साधी होती. धोतर,शर्ट,करवतकाठी उपरणे,वुलनचा कोट,डोक्याला लाल रुमाल असा त्यांचा वेश असायचा.त्यांच्या हातात सदैव एक काठी असायची.चेहर्यावर लहान मुलासारखी निरागसता होती.ते सदैव धोतराचा सोगा तोंडात धरुन आकाशाकडे नजर लावून आत्ममग्न स्थितीत बसलेले असत.

         त्यांनी अनेक भक्तांना आणि संतांना आपले चैतन्य स्वरुपाचे दर्शन घडविले होते.महाजांच्या समकालीन असलेले अनेक संत म्हणत , `पाटील महाराज हे त्रिकालज्ञानी व चालते बोलते ब्रह्म आहेत.विदेही असुन ज्ञानी व राजयोगी थाटात वागणारे सिद्ध पुरुष आहेत.ते साक्षात दत्तगुरुच आहेत.' महाराजांचे श्रीसद्गुरु केशवनाथ महाराज,दत्तावतारी श्रीसद्गुरु मामा महाराज  देशपांडे यांच्याशी फार प्रेमाचे नाते होते. महादबा महाराज भक्तांना नामस्मरण करायला,सदग्रंथाचे वाचन,प्रवचन-किर्तन ऐकायला सांगत असत. `सच्चाने वागा,लबाडी करु नका.कुणाला फसवु नका. फुकटचे खाऊ नका,संपत्तीचे प्रदर्शन करु नका.माणुसकीने वागा.' हाच आपल्या भक्तांना त्यांचा उपदेश असे.बुवाबाजी करणार्यांच्या अंगावर ते धावून जात.समाधी घेण्याच्या वर्षभर आधी ते स्वत: प्रत्यक्ष भक्तांच्या घरी जाऊन अगदी भक्तांना शोधुन काढून त्यांना आपल्या सेवेची संधी दिली.आशिर्वाद व अंगारारुपी सामर्थ्य दिले येथुन पुढे नृसिंहवाडीला या असा आदेश सर्व भक्तांना दिला.भक्ताच्या कल्याणासाठी मी अनंतकाळ अखंड चिरंतन वाडीत वास्तव्य करुन आहे असा भक्तांना भरवसा दिला.महाराजांनी वाडीत स्वत: मठ बांधून घेतला,पण कोणासही शिष्य केले नाही.त्यांनी स्वत: १९८१ साली ट्रस्टची स्थापना केली व मठाची व्यवस्था ट्रस्ट कडे सोपवली.मठामध्ये त्यांनी समाधीची जागा निश्चित करुन या ठिकाणी समाधीस्त करा असा आदेश दिला होता.महाराज हे महायोगी होते,इच्छा मरणी होते.त्यांनी देह ठेवला हा स्वत: ठरवून.श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे पौर्णिमेच्या आदल्या दिवशी महाराजांची तब्येत खालावली पण महाराजांच्या चेहेर्यावरील तेज हे प्रचंड वाढले होते.सहस्र सुर्याप्रमाणे महाराजांचा चेहेरा तेजस्वी दिसु लागला.आदल्या दिवशी महाराजांनी कुंभार महाराजांना ज्ञानेश्वरी वाचायला सांगितली.ज्ञानेश्वरीतील "आत्मा अमर आहे, अविनाशी आहे.तो जाळल्याने जळत नाही,भिजवल्याने भिजत नाही.ते चैतन्य अखंड राहते."महाराजांनी खुण करुन पारायण थांबविले.पुढे महाराज म्हणाले, "मी कुठेही जाणार नाही,इथेच आहे..या मठात.मला नेहमी वाडीत भेटायला या.देह दृष्टीआड होईल पण आत्मा अमर आहे.मी चैतन्यरुपाने सदैव इथेच आहे." मी महाराजांचे हे निर्वानीचे शब्द ऐकून सर्व भक्तांना हुंदकाच भरुन आला.सद्गुरु माउलींचा विग्रह आता आपल्याला होणार या विचाराने ही सर्वांना हलवून सोडले. रात्री भजन झाले व भजनानंतर सर्वांना महाराजांनी विश्रांती घेण्यास पाठवले.नाममात्र सर्व भक्त लोक पडून होते.कुणालाही झोप ही आलीच नाही.रात्री महाराजांना ताप वाढला.डॉक्टर बिपी चेक करत होते.ताप कमी होण्यासाठी गोळ्या दिल्या.आदल्या दिवशी रक्त, लघवी परिक्षणासाठी कुरुंदवाड ला पाठविल्या पण आश्चर्य असे की सर्व रिपोर्ट नॉर्मल आले.डॉक्टरांनी ही आपल्या प्रयत्नांची शर्थ केली.सकाळी चार वाजता महाराजांनी थोडी कॉफी घेतली. उपस्थीत भक्तांना ते सारखं विचारीत होते , "सहा वाजले का? देवांची घंटा वाजली का?" भक्तांनी उत्तर दिले , " महाराज झोपा,विश्रांती घ्या."  पहाटे लोक ,आलेले नृसिंहवाडीतील भक्त स्नानाला कृष्णामाईला जात होते. तेवढ्यातच देवांची पहाटेची घंटा वाजली.धुप झाला.सुर्यनारायाणाने प्राचीमुखाला डोके वर काढलेच होते.सकाळी सहा वाजून पाच मिनिटे झाली.श्रीमहाराज उठून सुखासनात बसले.चेहर्यावर विलक्षण तेज तळपत होते.त्यांनी देवांचा घंटा ऐकला व अलगद आले प्राण ब्रह्मरंध्रात खेचून दत्तचरणी विलीन केले व आपले अवतार कार्य संपविले.महाराजांनी देह ठेवल्याची वार्ता वार्या सारखी पसरली ,एकच गोंधळ उडाला.सर्वत्र भक्त दु:खाने विलाप करु लागले.पुढे महाराजांच्या दर्शनाला मोठा जनसागर उसळला.महाराजांच्या देहाची टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढली गेली.महाराजांनी आधी सांगितल्याप्रमाणे नृसिंहवाडी येथील चिंचेच्या झाडाखाली समाधी देण्याचा विचार मंडळी करतच होती तोच वाडीतील काही ब्रह्मवृंदांनी इथे आजवर कुणालाही भुगर्भ समाधी न दिल्याचा ,व तसे करण्यास आक्षेप घेतला.तसा ताम्रपट ही दाखविला त्यामुळे डी वार पाटील साहेबांचाही नाइलाज झाला.काही भक्तांनी आपली जमिन देऊ केली.पण सद्गुरुंनी सांगितले तेच ब्रह्मवाक्य.या न्यायाने श्रीपुजारी व चाफळकर यांनी महाराजांनी सांगितले त्याच जागी देहाला समाधी द्यायची हा आग्रह धरला.श्री चाफळकर यांनी दत्तगुरुंना कौल लावायचे ठरविले.देवांनी उजवा कौल दिला व समाधी चिंचेच्या झाडाखालीच द्यावी हा विचाराला परवानगी दिले. त्यामुळे सर्वांनी महाराजांना आज दीसते त्या जागेवर चिंच वृक्षाखाली भूगर्भ समाधी दिली.

दिवस व वेळ ठरवून ,सर्वांना अगोदर सांगून व टिपून ठेवून परमपूज्य सद्गुरु श्री महादबा पाटील महाराजांनी नृसिंहवाडीच्या अधिकृत मठात जेष्ठ महिन्यातील वटपौर्णिमेस  शके १९०४ रविवार दि.६ जुन १९८२ राजी सकाळी ६ वाजुन ५ मिनीटांनी दत्त मंदिरात घंटानाद होत असतांना समाधी घेतली. समाधीत असतांनाही आजही महाराज अखंड आपल्या भक्तांचे रक्षण करण्यास सज्ज आहेत.आजही मी चैतन्य रुपाने वाडीतच आहे.या आपल्या आश्वासनाचा अनुभव प्रत्येक भक्ताला देतच आहेत.

                        श्रीमहादबा महाराज आणि दत्त संप्रदायातील थोर अवतारी संत सद्गुरु श्री मामा साहेब देशपांडे महाराज यांचे अतिशय हृद्य आणि प्रेमाचे ऋणानुबंध होते.श्रीमहाराजांचा श्रीमामांवर अतिशय निस्पृह असा स्नेह होता व ते मामांना मोठ्या भावासारखा मान द्यायचे.सद्गुरु श्री मामांचे आणि महाराजांचे हे हृदय संबंध दर्शविणारे काही विशेष प्रसंग आपण बघुयात. सद्गुरु मामांनी सांगलीला आपल्या सद्गुरु माउलींच्या नावाने म्हणजे "प.पू.सद्गुरु वा.द.गुळवणी प्रतिष्ठान" या नावाने प्रतिष्ठान उभारले होते.या प्रतिष्ठानाचे बांधकाम सुरु असतांना व नंतर ही मामा वारंवार सांगलीला येत असत.त्या वेळी सद्गुरु श्री महादबा महाराज काही वेळ त्यांच्या बरोबरच असायचे. एकदा तेथे पाण्यासाठी नवी बोअर घेण्याचे होते.त्यासाठी तेथील व्यवस्था करणारे श्री कुलकर्णी यांनी प.पू.मामांना पुण्यात माउली आश्रमात फोन लावला व विचारले, "प्रतिष्ठानच्या जागेत बोअर कूठे मारायचे?" त्यावर प.पू.मामा म्हटले, "अरे,पाटील महाराज याविषयी तुला सांगतील.ते जिथे सांगतील तिथे बोअर घ्या!" कुलकर्णींनी सद्गुरु मामांचे बोलणे पूर्ण झाल्यावर मामांना नमस्कार करुन फोन ठेवला.फोन ठेवतात तोच दारावर थाप पडली.त्यांनी दार उघडले तो दारात प्रत्यक्ष दत्त श्रीपाटील महाराज उभे होते.ते कुलकर्णी कडे पाहून म्हणाले की , "अरे,मामांना कशाला त्रास देतोस? तुला हवं तिथे बोअर मार ,चांगले पाणी लागेल!" असे सांगून लगेच पाटील महाराज निघून ही गेले. खरंतर कुलकर्णी आणि प.पू.मामांचे फोनवर बोलणे, प.पू.पाटील महाराजांचे दारात दत्त म्हणून उभे ठाकणे या घटना काही मिनीटात इतक्या वेगाने घडल्या की या दोन्ही महात्मांच्या हा विलक्षण अंतरंगातील एकसुत्र भाव किंवा एकमेकांशी जोडले असलेला भाव बघून कुलकर्णी तर थक्कच झाले ‌.तसेच १९८१ साली सांगली येथे सद्गुरु श्री गुळवणी महाराजांच्या ७ व्या पुण्यतिथी उत्सवा प्रसंगी स्वतः पाटील महाराज उपस्थित होते. तसेच त्याच साली प.पू.मामांचे श्रावण अनुष्ठान हे सांगली येथेच पार पडले होते.या वेळी मामांच्या भोवती अनेक लोकांचा प्रापंचिक अडी अडचणी सोडविण्यासाठी मोठा गराडा पडलेला असायचा.श्रीमामाही आपल्या अकारण करुणामय स्वभावाला धरूनच त्या सर्व लोकांना सर्व प्रकारे मार्गदर्शन करायचे.पण यात मामांना अजिबात विश्रांतीसाठी सवड मिळत नसे.याच अनुष्ठानात एके दिवशी सद्गुरु श्री पाटील महाराज हे मामांना भेटण्यास तिथे आले.महाराज आल्याची वार्ता कळल्यावर या कामचलाऊ लोकांचा लोंढा महाराजांकडे वळला.पण पाटील महाराज कुणाकडूनही पाया पडून घेत नसत.कुणी पाया पडायला गेलाच तर ते आपल्या हातातील काठीचा प्रसाद त्याच्या पाठीवर जोरदार द्यायचे.या आपल्या कडे आलेल्या लोकांच्या लोंढ्यावर महाराज एकदम ओरडले, "साल्यांनो! नुसते मामा मामा करता आणि आपली सर्व पापे,कर्म आणून त्यांच्या डोक्यावर ओतता होय रे!कुणाला तरी चाड आहे का परमार्थाची?" पाटील महाराजांच्या हृदयात सद्गुरु श्री मामां विषयी असलेले निखळ प्रेम आणि जिव्हाळा हेच महाराजांच्या संतापाचे कारण व यामुळेच महाराज या लोकांवर संतापले. प.पू श्री महादबा पाटील महाराजांनी ६ जून १९८२ ला देह ठेवला.त्यावेळी पू.श्री मामा हे कर्हाड या गावी होते.त्यावेळी पहाटेची सामुहिक साधना झाली की मामा नित्याप्रमाणे प्रवचन सेवा करण्यासाठी शिष्यांपुढे  बसले.प्रवचन देण्याआधी नित्याच्या शिरस्त्याप्रमाणे "हरे राम हरे राम राम राम हरे ......" हा गजर मामांनी केला व प्रवचनाला सुरुवात केली.पाच-दहा मिनिटे होतात न होतात तोच मामा अचानक आपल्या पुढे बसलेल्या साधक वर्गास म्हटले, "आत्ताच आमच्या महादबा पाटील महाराजांनी देहत्याग केला आहे.त्यामुळे आज इथेच प्रवचन सेवा संपन्न करीत आहोत." हे सांगताना प.पू.मामांना गहिवर आलेला होता.या प्रसंगातून आपल्याला प.पू.श्रीमामांचा आणि प.पू‌.श्री महाराज यांचा अद्भुत स्नेहबंध लक्षात आलाच असेल.या दोन्ही दत्तावतारी महापुरुषांच्या चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏.

अशा या सिद्ध दत्तावतारी श्रीमहादबा पाटील महाराजांची आज ४० वी पुण्यतिथी .या पावन दिनी त्यांच्या चरित्राचे स्मरण करुन महाराजांच्या चरणी सांष्टांग दंडवत करुयात.सद्गुरु श्रीमहादबा पाटील महाराजांना कोटी कोटी प्रणाम करुन प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या सर्वांकडून अखंड सद्गुरु चरणांची सेवा करुन घ्यावी.खरंतर महाराजांचे चरित्र अजुन तरी प्रकाशीत झालेले नाही.ही वरील संक्षिप्त चरित्र माहिती असेच एकदा जुने कॅलेंडर चाळत असतांना मला मिळाली होती  जी मी संकलित करुन ठेवली होती व मागे दोन-तिन वर्षा आधी लेखाद्वारे मांडली होती.आज परत त्या लेखात प.पू.मामांचा महाराजांशी असलेल्या आत्मिय संबंधाची माहिती जी अलिकडेच उपलब्ध झाली ती समाविष्ट करुन हा स्वतंत्र लेख लिहीला आहे.

       ✒️✍️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️


#दिगंबरा_दिगंबरा_श्रीपाद_वल्लभ_दिगंबरा🌸🙏

#श्रीस्वामीसमर्थजयजयस्वामीसमर्थ🌸🌺🙏

#जय_शंकर🌸🌺🌹🙏

1 comment:

  1. श्री गुरुदेव दत्त..पाटील बाबांचे गुरू रामानंद महाराज खटावकर यांच्या बद्दलची माहिती द्यावी, समाधी मंदिर, पत्ता, कॉन्टॅक्ट नो.

    ReplyDelete

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...