सकल_संत_चुडामणी_नामदेवरायांची_६७१_वी_पुण्यतिथी :-
आज आषाढ वद्य त्रयोदशी भक्त शिरोमणी, भक्तश्रेष्ठ, सनत्कुमारांचे,भक्तराज श्रीप्रह्लादांचे अवतार सद्गुरु श्रीनामदेवरायांची ६७१ वी पुण्यतिथी.श्रीनामदेवरायांचे वर्णन आपण काय करणार? ज्यांच्या किर्तनात प्रत्यक्ष भक्तवत्सल पंढरीनाथ टाळ घेऊन नाचत असे,ज्यांच्या हातून जेवत असे,ज्यांनी देह ठेवल्यावर प्रत्यक्ष पंढरीनाथ अश्रू ढाळत चंद्रभागेच्या वाळवंटात बसले होते.अशा भक्तश्रेष्ठाचे चरित्र वर्णन आपल्यातील कुणीही करण्यास असमर्थच आहे. तरीही या दिव्य चरित्राचे स्मरण,चिंतन घडावे म्हणून हे लिखाणाचे धारिष्ट्य करत आहे. श्री नामदेवरायांचे सर्व चरित्रच अतिशय दिव्य आणि अलौकिक असे आहे. अगदी जन्म झाल्यापासून ते त्यांची भक्ती,त्यांचे किर्तन,त्यांचा परिवार,त्यांचे माउलींवरील प्रेम,त्यांचे माउलींसोबत तिर्थाटन,त्यांच्यावर झालेली गुरुकृपा,माउली आदी सर्व भावंडांच्या समाधी प्रसंगी देवांसोबत त्यांची उपस्थिती,त्यांची व समस्त परिवाराची समाधी अशा एकमेवाद्वितीय अलौकिक घटनाक्रमाने हे चरित्र मंडीत आहे.शांति ब्रह्म नाथ बाबांनी श्रीनामदेवरायांच्या चरित्रावर बरेच अभंग रचले आहेत.तसेच अनेक ठिकाणी नामदेवरायांच्या चरित्रासंदर्भातील विविध अभंग विविध संतांनी प्रगट केले आहेत.आपण या लेखात त्यातील काही भागाचे चिंतन करण्याचा प्रयत्न करुयात.
"शुद्ध बिजा पोटी" या उक्ती प्रमाणे नामदेवरायांचे मुळ पुरुष यदुशेट परम विठ्ठल भक्त होते.नामदेवरायांच्या घरात पूर्वापारच विठ्ठल भक्तीचे बिजारोपन झालेले होते.पंढरीची वारी ही नित्य अनेक कालापासून सुरु होती.यदुशेट हे परभणी जिल्ह्यातील नरसी ब्राह्मण या ग्रामीण भागात राहत.तेथेच ते कपडे विकण्याचा व शिवण्याचा व्यवसाय करीत.यांचे पूर्ण घराणे हे वारकरी होते. यदूशेट पासुन पाचवे वंशज म्हणजे दामाशेटी.हे आपल्या नामदेवरायांचे पिताश्री.आपण बहूतेक लोकांनी काकड आरती मध्ये दामाशेटी यांचा उल्लेख ऐकलाच असेल. त्यांची पत्नी गोणाई या ही धर्मपरायण होत्या.या भगवदभक्त दाम्पत्याचे पोटी दोन अपत्य जन्मास आले.त्यात पहिली आऊबाई आणि दुसरे नामदेवराय.नामदेवरायांचा जन्म शके ११९२ प्रभवसंवत्सरी कार्तिक शुद्ध एकादशी रविवारी सुर्योदयावेळी झाला. पुढे आषाढी-कार्तिकी वार्या करता करता दामाशेटी हे पंढरपूर येथेच स्थाईक झाले. पंढरीतील महाद्वाराजवळच घर घेऊन दामशेटी आपल्या परिसरासोबत राहू लागले.बाळ नामा आपल्या पित्यासोबत राहून व सतत विठ्ठल नाम गजर ऐकून त्या नामात तल्लीन होत असे.सकाळ संध्याकाळ पांडूरंगाचे दर्शन ते आपल्या वडिलांसोबत घेत असत.गम्मत अशी की वडिलांनी नामदेवांना धुळाक्षरे गिरवायला शिक्षकांकडे पाठविले तर बाळ नामदेव त्या धूळ पाटीवर ही 'विठ्ठल' नामच गिरवीत असे.तसेच गुरुजींनी काही पाठ करायला सांगितले तर फक्त विठ्ठल विठ्ठल हेच नामस्मरण करत असे.अशाप्रकारे नामदेवांना बालपणापासूनच विठ्ठल नामाचा आणि भजन,कीर्तनाचा छंदच होता. नामदेवरायांच्या चरित्रातील सर्वात प्रसिद्ध घटना म्हणजे नैवेद्याची.ती आपल्या सर्वांना ठाऊक असेलच तरी ती लेखात घेतो आहे. दामाशेटींचा एक नियम होता,ते रोज पांडुरंगाला नैवेद्य दाखवूनच अन्न ग्रहण करीत.एके दिवशी दामाशेटींना कापड विकण्याकरिता परगावी जावयाचे होते.त्यावेळी त्यांनी नामदेवास देवांना नैवेद्य दाखवायची आज्ञा केली.आठ वर्षाचे नामदेव आईने दिलेला नैवेद्य घेऊन राऊळात आले.देवांसमोर नैवेद्य ठेवला त्यांना असे वाटले की आपले वडील रोज नैवेद्य देवांना देतात व देव तो प्रत्यक्ष खातात.ते ही तिथेच हात जोडून उभे राहिले.बराच वेळ झाला पण देव काही नैवेद्य खाईनात.म्हणून ते देवांना विनवू लागले, "देवा! माझे बाबा रोज तुला नैवेद्य देतात,तो तू खातो.आज मी लहान मुलं असल्याने तो तु खात नाहीस का ? तू जर जेवला नाहीस तर घरी कुणीही जेवणार नाही.माझी आई सुद्धा रागवेल." असे म्हणत ते स्फुंदून स्फुंदून रडू लागले.आपण जर भोजन नाही केले तर सिंहासनावर डोके आदळून प्राण देईन असा निर्वाणीचा हट्ट त्यांनी देवापुढे मांडल्याबरोबर नामदेवरायांच्या शुद्ध प्रेमासाठी प्रत्यक्ष जगन्नाथ भगवान श्रीपंढरीनाथ तिथे सगुण रुपात प्रगटले.त्यांनी नामदेवरायांना आलिंगन दिले ,त्यांची समजूत काढून देव त्यांच्या हातुन जेवले.घरी आल्यावर आईने नैवेद्याबद्दल विचारले तेव्हा नामदेवांनी जे घडले ते आईस सांगितले पण आईला ही लबाडी वाटली.गम्मत अशी की दुसर्या दिवशी दामाशेटी घरी परतल्यावर गोणाईने ही गोष्ट त्यांना सांगितली .दुसर्या दिवशी सत्यता पडताळून पाहण्यासाठी त्यांनी नामदेवरायांना आपल्या सोबत नैवेद्य घेऊन मंदिरात नेले.तिथे गेल्यावर नामदेवरायांच्या हातात त्यांनी ताट दिले पण देव त्यांना म्हणाले, "आज दामाशेटी सोबत आहेत त्यामुळे मला नैवेद्य खाता येणार नाही." तेव्हा नामदेव म्हणाले, "देवा तुम्ही कपटी आहात.कारण तुम्ही मला भेट देता व वडिलांना देत नाही.तेव्हा तुम्हाला काय म्हणावे? नंतर खरंच पांडुरंग तिथे प्रगटले व त्यांनी दामाशेटींना दर्शन दिले आणि तो नैवेद्य भक्षण केला.यावर नामदेवरायांचेच अतिशय सुंदर अभंग आहेत.शब्दमर्यादेस्तव ते इथे देता येणार नाहीत.एकवार नाही तर असे अनेक प्रसंग आहेत ज्यात पांडुरंग नामदेवांना नित्य बोलत,त्यांच्या हातुन जेवत,त्यांच्याशी भांडत जणू नामदेवरायांनी देवांना आपल्या प्रेमपाषात बांधून ठेवले होते.त्या काळाच्या पद्धतीनुसार नामदेवरायांंचे वयाच्या नवव्या वर्षी लग्न करण्यात आले.गोविंदशेट सदावर्ते यांची कन्या राजाई या नावदेवरायांच्या पत्नी म्हणून घरात आल्या. पुढे प्रपंच वाढत गेला.नामदेवरायांना चार मुले व चार मुली झाल्या.पण त्यांचे लक्ष सदैव पांडुरंगाच्या नावात ,भजनात ,कीर्तनात तल्लीन झालेले असे.नामदेवरायांच्या कीर्तनात प्रत्यक्ष भगवान पंढरीनाथ प्रगटून टाळ वाजवित असतं. नामदेवरायांच्याच काळात ज्ञानेश्वर माउली,गोरोबा काका,चोखोबाराय यांचेही अवतार कार्य सुरु होते.या सर्वांचे नामदेवरायांवर विलक्षण प्रेम होते.अनेक संत मंडळी नामदेवरायांना भेटत असत.
श्रीनामदेवरायांच्या जिवनातील सर्वात महत्वाची लिला किंवा भाग म्हणजे सद्गुरु श्रीविसोबांकडे जाण्याची देवांनी त्यांना दिलेली आज्ञा.हा प्रसंग प्रत्येकासाठी महत्वाचा आहे.एके दिवशी सर्व संत मंडळी ज्यात ज्ञानोबा आदी भावंडे, गोरोबाकाका, चोखोबा सर्व जण चंद्रभागेच्या वाळवंटात बसलेले होते.मुक्ताईंच्या प्रेरणेने सकल संतांची परिक्षा गोरोबा काकांनी घेतली. तेव्हा भगवंतांचे अतिप्रिय नामदेवरायांना गोरोबाकाकांनी कच्चे मडके ठरविले.तेव्हा नामदेवराव पांडुरंगाकडे आले व तक्रार करु लागले. त्यावर देव म्हणाले , "नामदेवा तुला सद्गुरुंचा अनुग्रह हा घ्यावाच लागेल.गुरुशिवाय ज्ञान नाही,ज्ञानाशिवाय आत्मस्वरुपाची ओळख नाही,गुरुवाचुन मोक्ष नाही." असे निर्वाणीचे शब्द देवांनी नामदेवांना ऐकविले. नामदेवांनी देवाला विचारले की गुरु कुठे मिळणार.तेव्हा देवांनी त्यांना औंढ्या नागनाथाजवळ जाऊन विसोबा खेचराला शरणं जाण्याची आज्ञा केली. विसोबा खेचरांची व त्यांची भेट ही मोठी विलक्षण होती.ती हकिकत बहूतेक लोकांना ठाऊक आहेच.त्याची पुनरावृत्ती टाळतो.विसोबा हे ज्ञानेश्वर माउलींचे अनुग्रहीत होते.या खेचर नाथांनी नामदेवरायांना अनुग्रह देऊन कृतार्थ केले.त्यांना आत्माज्ञान देऊन परिपूर्ण केले.नामदेवराय म्हणतात,
खेचरे खेचरी बुद्धि अगोचरी ।
नामा झडकरी देवो केला ।
अहं सोहं भाव हारपल्या श्रृती ।
नामयाची तृप्ती खेचरी झाली ।।
या अभंगात गुरुकृपेनंतर आलेल्या आत्मानुभवाचे वर्णन नामदेवरायांनी केले आहे.
श्री नामदेवरायांनी परिसा भागवत आणि जनाबाई सारख्या अनेक भक्तांना अनुग्रह देऊन आपली पूर्ण कृपा केली.त्यांच्यावर केलेली कृपा व त्या भक्तांच्या चरित्र लिला इतक्या सुंदर आहेत की तो एक स्वतंत्र चिंतनाचा मुद्दा ठरेल.श्रीजनाबाई यांचे चरित्र आपल्यातील बहूतेक लोकांनी ऐकलेच असेल.परिसा भागवताची कथा ही अतिशय सुंदर आहे.ती पुढे कधीतरी जरुर बघुयात.
श्रीनामदेवरायांची किर्ती सर्वदूर पोचली होती.ज्ञानेश्वर महाराज, सर्व भावंडे व नामदेवराय यांनी केलेली तिर्थयात्रा हा तर एक वेगळ्या विस्तृत लेखाचा विषय आहे.कारण तिर्थयात्रेला जाण्याआधी ज्ञानेश्वर माउली आणि नामदेवराय यांच्यात झालेले संभाषण, या यात्रेदरम्यान घडलेले विविध दिव्य चमत्कार जसे वाळवंटात कोरड्या विहिरीत पाणी प्रगट होणे,औंढ्या नागनाथाचे मंदिरच किर्तनावेळी फिरणे,तसेच विविध तीर्थ करतं जेव्हा ही संत मांदियाळी श्रीक्षेत्र काशीला पोचली तेव्हा काशीला भगवान शंकराचे एका राजाच्या रुपात या सर्वांचे स्वागत करणे,या सर्व संतांनी देवांना तात्काळ ओळखून नमस्कार करणे, तसेच काशीचे महापंडित श्री मुद्गलाचार्य यांनी यज्ञ आरंभ केला होता त्यावेळी त्या यज्ञाप्रसंगी अग्रपुजेचा मान ज्ञानेश्वर माउलींना सर्व संतांच्या संमतीने मिळाला होता.असे अनेक विविध अलौकिक घटनाक्रम या यात्रेदरम्यान घडल्या होत्या.शब्दमर्यादेस्तव आज जरी तो देता आला नसला तरी "तिर्थयात्रा" या नावे त्यावर स्वतंत्र लेख व्हावा अशी माझी इच्छा आहे.( आज आपण जे माउलींचे सर्वत्र फेट्यातील छायाचित्र बघतो ते याच यज्ञप्रसंगातील आहे )
याच वेळी श्रीनामदेवराय,श्रीनिवृत्तीनाथ ,श्रीमाउलींची भेट ही त्या काळातील थोर आणि विलक्षण महात्म्ये श्रीकबीरदास यांच्याशी झाली.तसेच पूर्वी दत्तप्रभुंनी सांगितल्याप्रमाणे निवृत्तीनाथ ,माउली आणि नामदेवरायांना दत्तप्रभु,मत्सेंद्रनाथ आणि गोरक्षनाथांची भेट झाली.त्यानंतर ही सर्व मंडळी यात्रा करीत करीत पंढरपुरास परतले. पुढे पंढरीनाथांची आज्ञा घेऊन श्रीज्ञानेश्वर माउलींनी आळंदीत समाधी घेण्याचा विचार केला.दिवस ठरला कार्तिक वद्य त्रयोदशी.या वेळी पांडुरंग आणि नामदेवराय हे हजर होते.तसेच त्यानंतर चांगदेव महाराज,सोपान काका, मुक्ताई आणि निवृत्तीनाथ यांच्याही समाधी प्रसंगी नामदेवराय स्वतः हजर होते. या सर्वांच्या समाधी नंतर नामदेवरायांना अतिव दु:ख झाले.ज्ञानदेवांच्या आठवणीने हळवे झालेले नामदेवरायांचे मन आता पंढरपूरात रमेना किंवा पंढरीचा व भगवत भक्तीचा महिमा सर्वदूर पोचवावा हा संकल्प मनी धरुन नामदेवराय पंढरीहून उत्तरेकडे निघाले असे म्हणने जास्त संयुक्तिक ठरेल.नामदेवराय एकटेच तिर्थयात्रा करत द्वारका,हरिद्वार ,मारवाड प्रांत करीत पंजाबात येऊन पोचले.तेथे ते बरेच वर्षे राहिले.तेथील लोकांना हरीभक्तीचे अमृत पान करविले.अनेक अभंग रचना केल्या.पंजाब आदी प्रांतातील लोकांच्या मनात हरीभक्तीचा असा काही अंकुर नामदेवरायांनी रुजविला की आजही त्यांची किर्ती उत्तरेकडे गर्जत आहे.आजही त्यांचे ६१ अभंग हे शिखांच्या "गुरुग्रंथसाहेब" या ग्रंथात समाविष्ट आहेत.
पण पुन्हा पांडुरंगाच्या भेटीस्तव नामदेवराय पंढरपूर येथे परतले.त्यांनी आता आपल्या समाधीचा विचार देवांना कळवीला.पुढे आषाढ कृष्ण त्रयोदशी शके १२७२ ला नामदेवरायांनी आपल्या परिवारातील त्यांच्या पत्नी राजाई,आई गोणाई,वडील दामाशेटी,नारा,विठा,महादा व गोंदा हे चार पुत्र,लाडाई ,गोडाई,साखराई व येसाई या चार सुना,लिंबाई ही कन्या व आऊबाई ही बहिण तसेच त्यांच्या स्वनामधन्य शिष्या जनाबाई असे ऐकुन पंधरा जनांनी पंढरपुरी महाद्वारात भगवान पंढरीनाथांच्या समक्ष समाधी घेतली व देवांच्या चरणी अखंड विसावले.हा जगातील आजवर झालेला एकमेवाद्वितीय चमत्कारच आहे.अशी घटना इतरत्र कुठेही घडल्याचा साधा उल्लेख देखील नाही.
श्रीनामदेवरायांनी जवळपास अडीच हजारांहून अधिक अभंगांची रचना केली आहे.त्यात भक्ती , ज्ञान,वैराग्य, ज्ञानेश्वर महाराज आणि इतर भावंडांचे समाधी वर्णन ,भुपाळ्या ,आरत्या असे अनेक विषय आहेत.त्याच बरोबर त्यांनी हिंदी पदांचीही रचना केली आहे. अशा या भक्तराजांची ,भक्तश्रेष्ठांची आज पुण्यतिथी.ही शब्दसुमनांजली श्रीचरणी अर्पन करतो आणि आपल्या सर्वांकडून नामदेवरायांनी श्री भगवंतांची अखंड भक्ती करुन घ्यावी ही कळकळीची प्रार्थना करतो.
✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️