Friday, July 8, 2022

एकमेवाद्वितीय_विलक्षण_महापुरुष_प्रज्ञाचक्षु_ज्ञानेशकन्या_सद्गुरु_श्रीगुलाबराव_महाराज यांची १४१ वी जयंती 🙏🌸🌺🚩

 


एकमेवाद्वितीय_विलक्षण_महापुरुष_प्रज्ञाचक्षु_ज्ञानेशकन्या_सद्गुरु_श्रीगुलाबराव_महाराज 🌸🌺🙏

         

         🌸🌿 ज्ञानेश्वर माउली समर्थ 🌿🌸

अलौकिक अशा या पंचलतिका गोपी अवतार असलेले श्री गुलाबराव महाराज म्हणजे गेल्या पाचशे वर्षात झालेला श्रीभगवंतांचा सर्वात मोठा चमत्कारच होते. अवघे ३४ वर्षाचे अल्प आयुष्य /अवतार कार्य .या ऐवढ्या कमी वेळात त्यांनी १३० ग्रंथांची रचना केली,जगातील सर्व नास्तिकवादाचे सप्रमाण खंडन केले, आयुर्वेद, संगीत,योग ,भक्ती, ज्ञान , मनोविज्ञान , व्याकरण,भाषा, काव्यशास्त्र, वेदांत अशा संस्कृत,हिंदी ,मराठी,वर्हाडी आणि व्रजभाषेत एकून १३० ग्रंथ आणि सहा हजार पृष्टांचे अलौकिक आणि अतिदिव्य असलेल्या साहित्याची रचना केली.        


                श्रीगुलाबराव महाराजांचा जन्म १८८१ साली अमरावती-अकोला मार्गावर असलेल्या लोणी टाकळी या आजोळी खेड्यात झाला.त्यांच्या वडिलांचे नाव गोंदुजी व आईचे नाव अलोकाबाई. सुमारे ८-९ महिन्याचे असतांना श्रीमहाराजांचे डोळे आले.तेव्हा त्यांची नीट चिकीत्सा झाली नाही.त्यांतच एका गांवठी वैद्याने चिंचेच्या पाल्याचा रस बाल गुलाबच्या तेजस्वी डोळ्यात घातला.त्यामुळे महाराजांचे डोळे कायमचेच गेले.त्यांना अंधत्व प्राप्त झाले.हे फक्त बाह्यत: आलेले अंधत्व होतं. पण महाराज आपले चर्मचक्षू नाहीसे झाले तरी आपल्या प्रज्ञाचक्षूंनी सारी विश्वरचना अगदी सहजगत्या अवलोकन करुन शकत होते.बालपनीच महाराजांना मातृ वियोग झाला. महाराजांचे पालन पुढे त्यांच्या आज्जी सौ.सावित्रीनानी यांनी केले.

महाराजांचे लौकिक शिक्षण झाले नव्हते व घरची  प्रतिकुल परिस्थीती असे असतांनाही महाराजांचे कार्य पाहता त्यांचे अवतारित्व लक्षात येतं.महाराजांना अस्खलित संस्कृत बोलता येत असे.त्यांचे संस्कृत ऐकून लोक चाट पडत असतं.श्रीमहाराजांनी भक्तीला अद्वैताची बैठक देऊन भक्तीशास्राची नव्याने मांडणी केली.त्यात त्यांनी माधुर्यभक्तीचे सर्वश्रेष्ठत्व दाखवुन दिले. श्रीमहाराजांच्या  शिष्या म्हणजे त्यांच्या पत्नि.सौ.मनकर्णिका आई.मुळातच श्रीमहाराजां सारख्या अवतारी पुरुषाची पत्नि झालेल्या मणकर्णिका मातेचा अधिकार ही कमी नव्हता. या साध्विला ही महाराजांनी नित्य उपदेश करुन मार्गदर्शन केले.सौ.मणकर्णिका आईंना सर्व लोक मायबाई म्हणत.यांनी सर्वोतोपरी श्री महाराजांची सेवा केली.पतीची गुरुभावाने सेवा,त्यांना स्वहस्ते जेऊ घालणे, त्यांच्याबरोबर गाणी,अभंग ,ओव्या वैगेरे म्हणू लागणे,उच्च व मधुर स्वरात ज्ञानेश्वरीचे नित्य प्रेमाने पठन करणे,श्रीमहाराज कितीही रागावले असता अति शांत राहून त्यांच्या वृत्यानुकुल वागणे,मंडळींची दगदग सोसणे,भजन निरुपणादिकात रात्रभर जागुन मंडळी जेथल्या तेथे झोपली ,तर त्यांच्या अंगावर पांघरुन इ.घालून काळजी घेणे,यांसारख्या गोष्टीत ही पुण्यशिल साध्वी अहोरात्र गढलेली असे. पुढे लवकरच मायबाईंनी आपला देह ठेवला व त्यांचे और्ध्वदेहिक महाराजांनी स्वत: केले.तेव्हा त्यांनी तिला ज्ञानयोग्य शरीर प्राप्त होण्याचा संकल्प करुन पिंड दिला. 

                           महाराजांच्या जिवनातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे करुणाब्रह्म, महाविष्णु संतश्रेष्ठ भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचा प्रत्यक्ष अनुग्रह.श्रीज्ञानेश्वर माउलींनी श्री महाराजांना स्वत:च्या मांडीवर घेऊन स्वनामाची मंत्रदिक्षा दिली.श्रीमाउलींनी महाराजांचा आपली कन्या म्हणुन स्विकार केला व त्यांनतर श्रीगुलाबराव महाराज हे ज्ञानेशकन्या झाले...गुलाबराव महाराज माउलींना तात म्हणु लागले. याबद्दल श्रीगुलाबराव महाराजांनी फार सुंदर अभंग रचला आहे तो असा.

"माझा सदगुरु करुणाघन | आळंदीपती कल्याणनिधान | जेणे आपुलिया नामाचा मंत्र देऊन | कृतार्थ केले मजलागी ||

कैवल्य कनाकाचिया दाना | जो न कडसी थोरसाना | द्रष्टयाचे दर्शना | पाठाऊ जो ||

या साच करावयास निजवचना | न देखोनी मम पात्रपणा | अंकी घेवोनि खुणा | सांगितल्या स्वनामाच्या ||" 

ज्ञानेश्वर माउलींच्या प्रत्यक्ष अनुग्रहानंतर महाराजांचे कार्य हे विस्तारले. महाराजांचे जीवनपुष्प लौकिक अर्थाने पूर्णपणे विकसीत अवस्थेत कुठे बघायला मिळत असेल तर ते श्रीमहाराजांच्या श्रीकृष्ण पत्नी या नात्याने केलेल्या मधुरा भक्तीत. माउलींचा अनुग्रह झाल्यापासून ते स्वत:ला ज्ञानेशकन्या म्हणून संबोधीत.पुढे त्यांच्या अलौकिक माउलीने आपल्या लाडक्या कन्येचा विवाह प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाशी करुन दिला.श्रीमहाराजांच्या प्रेमानंदाला उधाण आले. वासुदेवाची पत्नी म्हणुन त्यांनी मधुरा भक्तिला प्रारंभ केला.अविरत श्रीकृष्ण भक्तित रममान होऊ लागले.परंतु या मधुरा भक्तीबद्दल समाजात अतिशय गैरसमज होता.अनेक विद्वानांनीही याबद्दल समाजाची दिशाभूल केली होती. पुढे महाराजांनीच श्रीभगवान नारद मुनींच्या आदेशाने मधुराद्वैतसंप्रदायाची स्थापना केली. या मधुरा भक्तीचे परमश्रेष्ठत्व प्रतिपादन करण्यासाठी अमर असे अलौकिक वांङमय निर्माण केले.या मधुराभक्तीचे सुंदर मंडण त्यांनी आपल्या अनेकविध ग्रंथात केले.पुढे श्रीमहाराजांनी १९०३ साली कात्यायनी व्रताला प्रारंभ केला.मार्गशिर्ष महिन्यात श्रीकृष्ण प्राप्तिसाठी गोपींनी हे कात्यायनी व्रत केले होते.या उपक्रमानंतरच्या काळात श्रीमहाराजांच्या माधुर्यामृत आनंद सागराला भरतीच आली.विविध शास्त्राच्या रहस्यमय निरुपणांचा वर्षाव होऊ लागला. श्रीमहाराजांनी माधुर्यप्रेमाने भक्ती करण्याचे व माधुर्य संप्रदाय स्थापनेचे कारण हेच. ते म्हणत मी `पंचलतिका नावाची एक गोपी आहे.' आणि खरोखरीच स्वत: गोपी असल्यामुळे स्त्रियांप्रमाणे ते गळ्यातं मंगळसूत्र धारण करीत,वेणी घालत, कुंकू लावत.पुढे पुढे तर श्रीकृष्णपत्नित्वाला साजणारा त्यांचा गोपीवेश नित्याचा झाला. मधुराद्वैत संप्रदायाची शास्त्रानुसार सोपपत्तिक मांडणी करण्यासाठीच प्रामुख्याने श्रीमहाराजांचा अवतार होता.मधुराद्वैताची प्रतिष्ठापना करण्यासाठी ,त्या मताच्या प्रतिकूल असणार्या अवैदिक अपसिद्धान्ताचे खंडण करणे, त्यांचे मुख्य कार्य होते. एकदा निरुपणाचे वेळीही "बहुनि मे व्यतितानि जन्मानि" हे भगवदवचन श्रीमहाराजांच्या बाबतीत सार्थ ठरविणारी गोष्ट घडली.उमरावतीच्या मंडळींच्या आग्रहावरुन त्यांनी ज्ञानेश्वरीच्या निरुपनाला पहिल्या ओवीपासून प्रारंभ केला होता. 'ॐ नमोजी आद्या' या ओवीवर प्रवचन झाल्यावर "आता वाच्यवाचका | अभेदू लाहे नेटका | नामरुपें टका | तूते झाला ||" ही तिसरी ज्ञानेश्वरीतील ओवी श्रीमहाराजांनी म्हटली.ही ओवी ज्ञानेश्वरीच्या आजच्या कुठल्याही प्रतीत नाही.ही ओवी म्हणताच सर्व श्रोते टकमका आश्चर्याने एकमेकांकडे बघू लागले.ही चुळबूळ महाराजांच्या लक्षात येताच ते म्हणाले,"भावार्थ दिपीका हा माउलींचा ग्रंथ एकंदर १०,००० ओवींचा आहे.परंतु हेतुत: सध्या ९००० ओव्याच त्यांनी आपल्या हाती दिल्या आहेत." या उर्वरीत १००० ओव्या महाराजांना मुखद्गत होत्या.


            महाराजांनी आपल्या अवतार कार्यात शांकर अद्वैत व भक्ती यांचा पूर्ण समन्वय प्रतिपादन केला.भक्तीच्या नव्या १६ प्रकारांची मांडणी केली.ज्ञान,उपासना व भक्ती यातील भेद विवेचन केले.भगवदविग्रहाचे म्हणजे श्रीभगवंतांच्या सगुण विग्रहाचे अनध्यस्तविवर्तत्व  ही नविन परिभाषा जगापुढे मांडली.नाममहात्म्य अर्थवाद आहे या आरोपांचे सविस्तर खंडन केले.समन्वयाच्या नऊ प्रकारांचे विवेचन केले. उत्क्रांतिवाद,अनुवाद, अज्ञेयवाद, संशयवाद वैगेरे पाश्र्चात्य तत्वज्ञानांची भारतीय सिद्धांताशी तुलना आणि त्यांचे मुल्यमापन केले.नीतिशास्त्रातील युरोपियन मतांचे खंडन केले. पाश्र्चात्य व भारतीय मानसशास्त्रांची तुलना केली.अॅलोपॅथी व आयुर्वेद यांची तुलना करुन त्यांनी स्वत:च्या मानसायुर्वेदाची निर्मिती केली. इस्लाम,ईसाई, पारशी,बौद्ध,जैन,वैगेरे सर्व वैदिक धर्माच्या शाखा आहेत या सिद्धांताचे प्रमाण पुरस्सर शास्त्रीय विवेचन केले.लो.टिळक,विवेकानंद,रामतिर्थ वैगेरेंच्या काही मतांची परखड चिकित्सा केली. महाराजांनी बुवाबाजीचा ही वेगळा समाचार घेतला होता. महाराजांनी या बुवाबाजी विरोधात आपल्या ग्रंथात,पत्रातुन चांगलाच समाचार घेतला आहे. धर्मसंकर, धर्मसुधारणा आणि धर्मसमन्वय यातील भेदाचे विवेचन केले आहे.वेदांवर आणि पुराणांवर समन्वयात्मक सूत्रग्रंथांची रचना केली आहे. आर्य वंश नाही,आर्य बाहेरुन आले नाहीत,शुद्र वर्ण हा आर्याचाच भाग आहे या सिद्धांताचे मुद्देसूद प्रतिपादन त्यांनी केले.तीन हजार वर्षांपूर्वी आर्य संस्कृती विश्वव्यापक होती व त्यांनी या ऐतिहासिक सिद्धांन्ताची पुन:स्थापना केली. महाराजांनी पाश्चिमात्य डार्विन, स्पेन्सर ,अॅनीबेझंट वैगेरेंच्या उत्क्रांतीवादाचे ही सप्रमाण खंडन केले .सुधारणा व बहुमतवाद या संबंधी परखड विचार मांडले.तसेच शिक्षणासंबंधीही मूलभूत विचार मांडले.प्राचिन सुत्र कायम ठेवून नवीन साहित्यशास्त्राची निर्मीती केली.कौटुंबिक व सामाजिक संबंधात प्रश्नोत्तर रुपाने मांडनी केली.मुलांसाठी वेगळा उपदेश दिला,स्त्रियांसाठी खास गितांची निर्मीती केली.लोकगितातुन समाजप्रबोधन केले.नविन १२३ मात्रावृत्तांची रचना केली. महाराजांनी स्वत:ची वेगळी अशी लघुलिपीची (सांकेतिकलिपी) निर्मीती केली. त्यांनी स्वत: "नावंग" नामक भाषेची निर्मिती केली होती.तसेच नविन व्याकरण सूत्र निर्माण केले,नाटक लेखन केले,आख्यानांची रचना केली,खेळातून परमार्थप्राप्तीचा उपाय म्हणजे मोक्षपट याची निर्मीती केली.

अशा या लोकविलक्षण, एकमेवाद्वितीय, प्रज्ञाचक्षु पंचलतिका गोपी अवतार ,ज्ञानेशकन्या श्रीगुलाबराव महाराजांचे चरित्र अतिचमत्कारिक ,अतिदिव्य व एकमात्र आहे.एवढे विलक्षण चरित्र महाराजांशिवाय इतरत्र कुणाचेही नाही असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.महाराज हा एक चमत्कारच होते. अवघ्या ३२ व्या वर्षी त्यांनी आपल्या तातांजवळ पुण्यात देह ठेवला. अशा या ज्ञानेशकन्येच्या  सुकोमल चरणी अनंत कोटी शिरसाष्टांग दंडवत प्रणाम..

#ज्ञानेश्वर_माउली_समर्थ 🙏🌸🌺

#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🌺

              ✒️✍️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️

       


🌸🙏सद्गुरु श्रीगुलाबराव महाराजांचे भव्य असे वाङमय स्मारक मंदिर श्रीक्षेत्र आळंदी येथे उभारण्यात येत आहे. श्री महाराजांची ग्रंथ संपदा मागविण्यासाठी व स्मारकाला आर्थिक मदत करण्यासाठी आपण महाराजांचे वंशज ह.भ.प.श्री नारायण महाराज मोहोड आळंदी यांच्याशी खालील क्रमांकावर संपर्क करु शकता. 🙏🌸

भ्रमणध्वनी :- ९८२३२३६०६६

3 comments:

  1. उत्तम लेख , छान माहिती दिली आहे,🙏💐

    ReplyDelete
  2. Uttam lekh, parantu ek chukichi mahiti apalya post dware samor jat aahe. Narayan Maharaj Mohod he maharajanche wanshaj nahi. Madhan ya gawi sarv Mohod rahat asalyane ha sambhram jhalela asava.

    ReplyDelete
  3. shrigulabraomaharaj.blogspot.com

    ReplyDelete

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...