आज श्रावण शुद्ध त्रयोदशी वारकरी संप्रदायाचे भुषण, संतश्रेष्ठ सद्गुरु श्री नरहरी महाराजांची जयंती. मुळातच वारकरी संप्रदाय आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व संत मंडळी हे भगवान आदी शंकराचार्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानाचेच प्राप्त करणारे द्रष्टे होते असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.बरं या सकल संतांचे अभंग जर बघितले तर सर्वत्र याच तत्वज्ञानाचे प्रतिपादन केलेले दिसून येते.माउलींनी तर त्याही पलिकडे "अद्वय" सांगितले म्हणजे भेद हा नाहीच.ते एकच आहे.याच संत मांदियाळीत होऊन गेलेले असेच एक संत म्हणजे संतश्रेष्ठ सद्गुरु नरहरी महाराज. ज्यांनी हरीहर ऐक्य स्थापित केले.ज्यांनी याच अद्वैताचा संदेश दिला आणि हरी-हर हे अभेद आहे हे आपल्या चरित्रातून जगाला दाखवून दिले
महाराजांच्या चरित्राबद्दल अशी एक मान्यता आहे की ज्यावेळी परब्रह्म भगवान श्रीकृष्ण हे ज्ञानदेवांच्या रुपात कलियुगात अवतार घेण्याचे ठरवितात तेव्हा आपल्या सर्व पार्शदांना ते अवतार घेण्याची आज्ञा करतात.त्याच आपल्या एका परम प्रिय भक्त जांबुवंत यांनाही ते अवतार घेण्यास सांगतात. त्याच जांबुवंतंचे अवतार म्हणजे सद्गुरु श्री नरहरी महाराज.मुळातच ज्या ज्या कुळात अवतारी महात्मे अवतार घेतात ते संपूर्ण कुळचं श्रीभगवंतांच्या भक्तिने परम पवित्र झालेलं असतं.अशाच शिवभक्तीने न्हाऊन निघालेल्या कुळात श्रीमहाराजांचा जन्म झाला.मालुकवी हे नरहरी महाराजांचे दहावे वंशज. यांनी आपल्या "मालुतारण" या ग्रंथात आपल्या संपूर्ण कुळाची ,पिढ्यांची माहिती दिली आहे.याच वंशातील मुळ पुरुष रामचंद्र हे पैठण श्रेत्रात राहत असुन तिथे सोनार व्यवसाय करत असत.रामचंद्र हे अतिशय निष्ठावान ,धार्मिक आणि परमशिवभक्त होते.याच काळात शालिवाहन राजाचे पैठण श्रेत्री राज्य होते.शालिशाहन राजे व रामचंद्र यांची घनिष्ठ मैत्री होती.पुढे पंढरपूर आणि त्या काळातील "दंडकारण्याच्या" घोर वनात लुटारुंच्या त्रासाला कंटाळून सर्व गावकरी व यात्रेकरू लोक राजांना शरणं आले.राजा हा धर्मपरायण होता त्याने हा त्रास थांबविण्याचे आश्वासन तेथील लोकांना दिले.राजाने रामचंद्रांना सैन्य देऊन या कार्यासाठी पाठविले.रामचंद्रांनी अगदी खुबीने पंढरपूरातील व आसपासच्या परिसरातील या चोर,लुटारु लोकांना पकडून दंड दिला.विजयी होऊन परतलेल्या रामचंद्रांवर राजे अतिशय खुष झाले.त्यांनी रामचंद्रांना पंढरपूरची जमीन सनद बक्षीस म्हणून दिली.आजही "मालुतारण" ग्रंथात ही सनद आपल्याला बघावयास मिळते.पुढे रामचंद्रांनी सैन्याच्या मदतीने तिथे मोठी बाजारपेठ ,वस्ती वसवली.हे काम सुरु असताना जमिनीत त्यांना त्यांच्या आराध्य भगवान आशुतोष महादेवांचे "शिवलिंग" सापडले.आपल्या कामाच्या सुरवातीला असा हा शुभ शकुन घडला म्हणून राजा व ते दोघेही अतिशय आनंदीत झाले.पुढे या शिवलिगांची वेद मंत्राच्या जयघोषात स्थापना करण्यात आली व त्यांचे "मल्लिकार्जुन" असे नामकरण करण्यात आले.राजांनी भगवान पंढरीनाथांच्या मंदिराचाही जिर्णोद्धार केला व तिथे भव्य असे आज आपण बघतोय ते मंदिर बांधले.पुढे अशी दिगंत किर्ती करुन हे रामचंद्र देह ठेवते झाले.यांची समाधी वडवळ या गावात आहे.तसेच नरहरी महाराजांच्या सहा पिढ्या आधी ही रामचंद्र नाईक हे ही थोर शिवभक्त झाले.यांना नाथ संप्रदायातील वटसिद्धनागनाथ यांचा अनुग्रह होता.यांना अतिशय धार्मिक आणि सत्शिल भगवतभक्त एक मुलगा होता.त्याचे नाव हरीप्रसाद होते.हा थोर गणेशभक्त होते.एकदा व्यापारात साठी बाहेरगावी गेलेल्या हरीप्रसादांना चोरांनी ,लुटारुंनी गाठले.तेव्हा भगवान गणेश अक्राळ-विक्राळ नऊ गण रुप घेऊन आले व त्यांचे प्राण त्या संकटातून वाचविले.याच भगवान गणेशांनी हरी भक्तांना वर दिला व बिड जवळील आज ज्याला आपण नवगण राजुरी म्हणून ओळखतो त्या क्षेत्री नित्य वास केला.त्यांचे पुत्र मुकुंदराज हे थोर भगवत भक्त आणि थोर गायत्री उपासक होते.यांचे पुत्र मुरारी हे थोर धर्ममार्तंड व गायत्री उपासक होते.हे काशीक्षेत्री वास करत असत.हे थोर शिवभक्त होते.नित्य गंगास्नान आणि विश्वेश्वराचे दर्शन हा त्यांना नित्यनेम होता.काशीचे राजे या मुरारी महाराजांचे अनुग्रहीत होते.यांच्याच नावाने काशीराजाने काशीला "मुरारी घाट" बांधला.यांनी काशी क्षेत्रीच आपला देह ठेवला.याच मुरारी घाटावर यांची समाधी आहे.यांचे पुत्र अच्युत हे भगवान श्री गहिनीनाथ महाराजांचे अनुग्रहीत.पित्याच्या निर्वाणानंतर काशी क्षेत्री अच्युत हे पिंडदान करत होते.तेव्हा त्यांचे पिता मुरारी महाराज हे स्वतः प्रगटले.त्यांनी आपल्या हाताने तो पिंड स्विकारला व अच्युताला पंढरपूरी परत जाण्यास सांगितले.पंढरपुरात जाऊन मल्लिकार्जुन देवळा जवळ बिर्हाड थाटावे आणि सोनार व्यवसाय करावा अशी आज्ञा केली.आपल्या पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून अच्युत हे पंढरपूर ला आले.हेच अच्युत आपल्या नरहरी महाराजांचे वडिल.हे एकनिष्ठ शिवभक्त होते.पण ते विठुरायांचे नावही मुखी घेत नसत.ते कधीही देवांच्या दर्शनाला मंदिरात गेले नाही.पुढे नाशिकच्या सावित्रीबाई या कन्येशी त्यांचा विवाह झाला.त्यांची कांती अतिशय तेजस्वी होती.या दोघा दांपत्यांनी पुत्रप्राप्तीसाठी कठोर शिवार्चन केले.एकदा ते चांगदेव महाराजांच्या दर्शनाला पाटण ग्रामी आले.हे चांगदेव म्हणजे आपल्या माय मुक्ताईंचे अनुग्रहीत चांगवटेश्वर महाराजच आहे.यांचे वय चौदाशे वर्षांहून अधीक होते.त्यांनी चांगदेवांना नमस्कार केला व पुत्रप्राप्तीसाठी त्यांच्यापुढे याचना केली.श्रीचांगदेव महाराजांनी ध्यान लावले.ध्यानानंतर त्यांनी डोळे उघडले व भाकित केले की , "आपल्या पोटी महान भगवतभक्त जन्माला येणार आहेत.जे स्वतः जांबुवंताचे अवतार असतील आणि जे हरी-हर भक्तीचा थोर समन्वय साधतील.ते थोर शिवभक्त असतील पण त्यांच्या कडून भगवान पंढरीनाथांची अखंड सेवा घडेल.थोर विठ्ठलभक्त म्हणून त्यांची किर्ती दिगंत गाजेल." असे भाकित करुन त्यांना आशिर्वाद देऊन चांगदेव महाराजांनी परत पाठविले.महाराजांचे भाकित ऐकून हे दोघेही अतिशय आनंदीत झाले व पंढरीस परतले.परत आल्यावर दोघेही अखंड शिवभक्तीत तल्लिन झाले.पुढे हे दोघेही त्रंबकेश्वरी गेले.तिथे ब्रह्मगिरीवर त्यांना भगवान गहिनीनाथ महाराजांचे दर्शन झाले.दर्शन घेतांनी भगवान गहिनीनाथांनी सावित्रीमातेला "पुत्रवतीभव" असा आशिर्वाद दिला.नाथांनी श्री अच्युत व सौ.सावित्रीबाईंना आपला अनुग्रह देऊन कृतार्थ केले.( बघा काय नवल आहे.एक अवतारी सत्पुरुष जन्माला येण्यापूर्वी हे संपूर्ण कुळच किती पवित्र आणि भगवदभक्तीने न्हाऊन निघाले होते."शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी" ही संत उक्ती किती सार्थ आहे.) नाथांचा आशिर्वाद,अनुग्रह घेऊन दोघेही पंढरीस परतले.एके दिवशी अच्युतांच्या स्वप्नात भगवान आशुतोष महादेव आले व त्यांना आशिर्वाद देऊन म्हणजे, "बाळ अच्युता तुझ्या भक्तीने मी संतुष्ट झालो.माझ्या आशिर्वादाने तुझ्या पोटी थोर भगवदभक्त जन्माला येईल.त्याची किर्ती दिगंत होईल आणि तुझ्या संपूर्ण कुळाचा जो उद्धार करेल." असा आशिर्वाद देऊन देव गुप्त झाले आणि अच्युतांना जाग आली.त्यांनी हे स्वप्न आपल्या पत्नीला सांगितले.देवांच्या आशिर्वादाने दोघेही प्रसन्न झाले.पुढे देवांच्या आशिर्वादाने सावित्रीबाईंना दिवस गेले .यथाकाळी गर्भ वाढला व श्रावण शुद्ध त्रयोदशी च्या परमपावन तिथीला नरहरी महाराजांनी अवतार धारण केला.( या जन्मतिथी बद्दल बरेच मतभेद आढळतात पण बहुतेक ठिकाणी हीच तिथी एक मुखाने मान्य केली आहे.आपल्याला त्या वादात पडायचे नाही म्हणून मी जी जास्त प्रचलित तिथी आहे तीच लेखात घेतली आहे.) बाळ जन्माला आला आणि सर्वत्र आनंदी आनंद झाला.यथाकाळी जातकर्म करुन वडीलांनी गावात साखर वाटली. नामकरण विधी करण्याची तयारी केली.तोच स्वतः चांगदेव महाराजांचे आगमन घरी झाले.सावित्रीबाईंनी बाळाला महाराजांच्या चरणी घातले.महाराजांनी बाळाला आशिर्वाद दिला व बाळाचे नाव "नरहर" असे ठेवले
पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे बाळ नरहर वाढू लागले.त्याकाळी शैव-वैष्णव भेद महाराष्ट्रात विकोपाला गेला होता.त्यामुळे विठुरायांचे दर्शन तर दूर नावही मुखात येण्याचे श्रीअच्युतराव टाळीत.हेच शिव भक्तीचे संस्कार त्यांनी आपल्या मुलावर ही केले.मुळातच सात्विक गुणांनी परिपूर्ण असलेल्या बाळ नरहर ही शिवाराधना करु लागला.एकनिष्ठ शिवभक्त असलेला नरहर बाळ गळ्यात रुद्राक्ष परिधान करु लागला,कपाळी भस्म लावुन नित्य शिवपुजन ,शिवदर्शनात तल्लिन होऊ लागला.काही दिवसांनी बाळ नरहर आई वडीलांनसमवेत त्रंबकेश्वरी गेले.भगवान त्रंबकराजांचे दर्शन घेऊन ते ब्रह्मगिरीवर भगवान गहिनीनाथांच्या दर्शनाला गेले.नाथांपुढे गेल्यावर सर्वांना नाथांना शिरसाष्टांग नमस्कार केला.नाथांनी नरहर ला आपदमस्तक निहाळले व तात्काळ त्यांना अनुग्रह देऊन कृतार्थ केले.अनुग्रह घेऊन नरहर पंढरपुरी परतले.पण अनुग्रहानंतर आता ते सतत ध्यान ,योग,साधना ,पुजा यात तल्लीन होऊन गेले.अंतर्मुख झालेल्या आपल्या मुलाला बघून आई वडिलांनी त्यांचे लग्न करण्याचे योजले.पण लग्न न करण्याचा नरहर चा निर्णय होता.शेवटी सद्गुरु गहिनीनाथांच्या आज्ञेमुळे श्री नरहर ला लग्नाला होकार द्यावा लागला. त्रंबकेश्वर येथील अच्युतांचे स्नेही श्रीपतराव यांची कन्या गंगा ही सुन म्हणुन पसंत केली.त्रंबकेश्वरांच्या मंदिरात साक्षगंध पार पडला.यथाकाळी वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर त्रंबकेश्वर येथे नरहरी गंगा विवाह बंधनात अडकले. लक्ष्मी-नारायणासारखे नरहर -गंगा आता संसार करु लागले.गंगामाता या अतिशय धर्मपरायण आणि थोर पतिव्रता होत्या.लग्नानंतरही नरहरी महाराजांची साधना ,योग,नामस्मरण अखंड सुरु होते.पुढे महाशिवरात्रीच्या महापर्वावर नरहरी महाराजांचे माता पिता श्रीअच्युत आणि माता सावित्री यांनी सोबतच भगवान मल्लिकार्जुनांच्या चरणी देह ठेवला. सर्व पंढरपूरात शोक पसरला.नरहरींनी आपल्या माता पित्याचे और्ध्वदेहीक यथाशास्त्र केले.पण या आघाताने नरहरी अधिकच अंतर्मुख झाले.पुढे भगवान गहिनीनाथ नरहरींना तंत्रमार्गाचा उपदेश करतात.त्यांच्यावर शक्तीपात करुन त्यांना व त्यांच्या पत्नी गंगाबाईंना ब्रह्मचर्य व्रत पाळण्यास सांगतात.पुढे पाच वर्ष नरहरी व गंगाबाई हे या साधनेत गढून गेले.पाच वर्षांनी या कठोर तपाची सांगता झाली व हे दोघेही त्रंबकेश्वरी भगवान गहिनीनाथांच्या दर्शनास आले.नाथांनी दोघांनाही आशिर्वाद दिला व गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यास सांगितले.काही काळ गेल्यावर बेला फुलाला गाठ पडली आणि सन १२८२ ला नरहरी महाराजांना प्रथम पुत्र झाला.हा या तपश्चर्येचे फळच होते.भगवान मल्लिकार्जुनाच्या कृपेने झालेल्या या बाळाचे नाव "मल्लिनाथ" असे ठेवले गेले.यांनाच पुढे "मालु" म्हटले गेले
अशा प्रकारे उत्तम संसार करतांनाही नरहरींची साधना ,नामस्मरण आणि गुरुभक्ती अखंड सुरु होती.पण त्यांच्या मनात वैष्णव द्वेष होताच.ते कट्टर शिवभक्त होते .त्यांची ही एकांगी शिवभक्ती इतकी टोकाची होती की जर पांडुरंगाचे दर्शन घेउन कुणी यात्रेकरु त्यांच्या दुकानात आला आणि त्याने जर यांना आदराने "जय हरी" म्हटले तर हे त्याला "शिव हर" म्हणत प्रतिसाद देत.विठ्ठलाला तर ते "काळ्या" म्हणूच संबोधत असत.त्यामुळे लोकांना त्यांचा रागही येत असे. देवांचे दर्शन तर दूरच ते देवांचे नावही मुखात घेत नसत.त्यांचा हा एक गुण सोडला तर एक कुशल कारागीर व उत्तम सद्गृहस्थ म्हणून त्यांची ख्याती संपूर्ण पंढरपूरात होती.भक्तश्रेष्ठ श्री सद्गुरु नामदेवराय हे नरहरी महाराजांचे घनिष्ठ मित्र पण ते त्यांच्या किर्तनाला जाण्याचे नेहमी टाळत.नरहरी महाराजांचा रोजचा नियम म्हणजे ते रोज चंद्रभागेला स्नानास जात व मल्लिकार्जुनाच्या पुजेसाठी नदीवरुन घागर भरुन आणत.एकदा एकादशी च्या महापर्वावर पंढरपुरात गर्दी जमली सर्वत्र विठ्ठल नामाचा जयघोष सुरु होता.या सर्व वैष्णवांच्या मेळ्यात एकटे नरहरी नदीवर स्नानास गेले.मुखी "ॐ नमः शिवाय" या महामंत्राचा अखंड जप सुरु होता.या पर्वकाळात प्रत्यक्ष देवर्षी नारद महामुनी हे पंढरपुरात आले होते.नरहरी महाराजांना बघता क्षणीच नारद महामुनींना लक्षात आले की ते हे जांबवंतांचे अवतार आहेत.त्यांनी नरहरींना थांबवले.त्यांना विठ्ठल नाम घेण्यास सांगितले पण नरहरींनी त्याकडे लक्षही दिले नाही.ते शिव नामात तल्लिन होते.नारदांनी हे पंढरीनाथांना सांगितले व त्यांना स्वस्वरुपाचे ज्ञान जागृत होण्यासाठी काही तरी चमत्कार करावा अशी विनंती केली. पुढे एके दिवशी आषाढीच्या पुण्यपर्वकाळी देवगिरीचा एक सावकार पंढरपुरात आला.तो निपुत्रिक होता.पुत्रप्राप्ती साठी त्याने भगवान पंढरीनाथांना नवस केला की "जर मला पुत्र झाला तर मी तुला सोन्याचा करगोटा अर्पण करिन." पुढे वर्षभराने त्यास पुत्र लाभ झाला.आपला नवस फेडण्यासाठी तो पंढरपूर येथे आला.तेथील पुजार्यांना कुशल कारागीराबद्दल विचारल्यावर त्यांनी त्या सावकाराला नरहरी सोनार यांच्याबद्दल सांगितले.पण तो सोनार निष्ठावान शिवभक्त आहे.तो विठ्ठल दर्शन तर दुरच साधे कळसा कडेही बघत ही नाही.दुसर्या दिवशी तो सावकार नरहरींना भेटण्यासाठी त्यांच्या दुकानात गेला.सावकरा नरहरी महाराजांना म्हटला ,"माझा करगोटा देवांना अर्पन करायचा आहे.आपण तो तयार करुन द्यावा" पण विठ्ठलाचे नाव ऐकताच नरहरी महाराज रागावले व ते शक्य होणार नाही असे म्हणुन त्याला जाण्यासाठी सांगितले.पण सावकार काकुळतीला येऊन त्यांना विनंती करु लागला.शेवटी नरहरींना त्याच्यावर दया आली व त्यांनी करगोटा करण्यास होकार दिला.पण त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की , "मी त्या काळ्याचे माप घ्यायला मंदिरात येणार नाही.तुम्ही माप घ्यायचे आणि मला आणुन द्यायचे.त्यानुसार मी करगोटा तयार करुन देईल." सावकाराने पुजार्यांकरवी देवांच्या कटीचे माप घेतले व ते सावकाराला दिले.सावकाराने ते माप नरहरी महाराजांना आणुन दिले.नरहरींनी त्यानुसार रत्नजडीत सोन्याचा अतिशय सुंदर असा करगोटा बनविला.त्यांनी तो करगोटा सावकाराला दिला.करगोटा घेऊन सावकार देवांच्या महापुजेला गेला.देवांना त्याने भरजरी वस्त्रे ,हार ,तुळस आणली होती.पुजार्यांनी देवांची महापुजा बांधली आणि शेवटी तो रत्नजडीत सुवर्ण करगोटा हाती घेऊन "विठ्ठल" नाम घेऊन देवांना बांधु लागला.तोच देवांनी अतर्क्य लिला केली.देवांनी आपली कटी फुगवली आणि तोच त्यानंतर करगोटा आखुड झाला.पुजा अर्धवट टाकून सावकार नरहरी कडे आले.त्यांना सांगितले की करगोटा चार अंगुलांनी आखुड झाला.यावर नरहरी संतापले पण सावकाराने विनवणी केल्यावर त्यांनी तो करगोटा चार अंगुलांनी वाढविला.पण आता तो करगोटा देवांना सैल झाला.सावकार पुन्हा नरहरींकडे आला व त्यांना विनवू लागला की आपण स्वतः एकदा मंदिरात या व स्वतः कटीचे माप घ्या.पण नरहरींनी एक अट घातली की , "मी काळ्याला पाहणार नाही." त्यांची अट सर्वांनी मान्य केली व नरहरी महाराज डोळ्यांवर पट्टी बांधून मंदिरात आले.ही बातमी तोवर सर्व गावात विदित झाली होती.पंढरीतील सर्व लोक हे बघायला तिथे जमले.मनात "ॐ नमः शिवाय" मंत्राचा जप करित ते पांडुरंगाच्या पुढे आले.देवांच्या कटीचे माप घेण्यासाठी मुर्तीला चाचपू लागले.तेव्हा देवांच्या कटीजवळ त्यांना व्याघ्रचर्म हाताला लागले.गळ्यापर्यंत हात गेला तेव्हा तिथे शेष नाग असल्याचे जाणवले.नरहरींनी तात्काळ आपल्या डोळ्यावरची पट्टी काढली तो पुढे विठुरायांची मुर्ती होती.परत पट्टी डोळ्यावर लावली तो तिच जाणिव.असे अनेकदा झाले.शेवटी त्यांच्या लक्षात आले की हा काळा विठ्ठलच आपला शिवशंकर आहे.हरी-हर हे वेगळे नसुन एकच आहेत. विठ्ठल हेच शिव आहेत.आपल्या अंतरचक्षुला देवांच्या ऐक्यत्वाचा साक्षात्कार झाल्यावर नरहरी महाराज देवांना शरणं गेले.विठ्ठल नामाचा उच्चार करु लागले.त्यांनी तात्काळ विठुरायाच्या चरणावर आपले डोके ठेवले व देवांची महापुजा करुन स्वतः तो करगोटा देवांच्या कटीला बांधला.महाराजांच्या चरित्रातील हा एक विलक्षण प्रसंग आहे.हरी-हर ऐक्याचा हा प्रसंग वाचला तरी याची गहनता लक्षात येते.पण आज ही आपण या भेदाला हृदयाशी कवटाळून बसलो आहोत ही हास्यास्पद बाब आहे. असो पुढे नरहरी महाराज विठुरायाचे अनन्य भक्त झाले.विठ्ठलाच्या नाम ,किर्तन आणि स्मरणात तल्लीन झाले
पुढे अखंड विठ्ठल भक्तीत रममाण झालेल्या नरहरी महाराजांनी आपली सर्व अवजारे देवांच्या चरणी अर्पण करुन आपले जिवन हरीभक्तीत व्यतित करण्याचा निश्चय केला.यानंतर श्रीमहाराजांच्या चरित्रात अनेक चमत्कार घडल्याचा उल्लेख आहे.ज्यात त्यांचा प्रपंच चालावा म्हणून बागेसरीतुन सव्वा तोळे सुवर्ण येऊ लागले.पण मुळातच विरक्त झालेल्या नरहरी महाराजांनी देवांना हात जोडुन ही भेट तात्काळ नाकारली व तसे न करण्याची विनंती केली.एकदा दागिने घडविण्याचे काम करता करता नरहरी महाराज विठ्ठल नामात इतके तल्लिन झाले की त्यांना समाधी लागली.तेव्हा त्यांचे काम प्रत्यक्ष भगवान पंढरीनाथ करु लागले.तोच त्यावेळी बागेसरीतील विस्तव उडाला व देवांचा पितांबर पेटला.एकाएकी आग भडकल्यावर नरहरी महाराज भानावर आले.बघतात तर देवांचा पितांबर पेटलेला.नरहरी महाराज धावा धावा म्हणू लागले आणि लागलीच त्यांनी एक घोंगडी देवांच्या पितांबरावर घातली व आग विझवली.त्यात कुणालाही काही दुखापत झाली नाही.पण एक अघटित घडले, इकडे देवांच्या मुर्तींचे पितांबर ही पेटले होते.तसेच एकदा देव नरहरी महाराजांसाठी सोनार झाले व त्यांच्या जागेवर देवांनी दागिने ही घडविले होते.अशा अनेक अनाकलनीय आणि अलौकिक लिलांनी नरहरी महाराजांचे चरित्र भरलेले आहे.एका लेखात शब्दमर्यादा असतेच.तरी काही भाग हा लेखात आवर्जून घालावा लागला .मला पूर्ण कल्पना आहे की त्यामुळे शब्दमर्यादा कधीच पार झाली पण माझा त्याबद्दल नाईलाज झाला आहे. अशा प्रकारे नरहरी महाराजांनी आपले संपूर्ण जिवन पंढरीनाथांच्या चरणी अर्पण केले.त्यांनी संत महात्म्य,नाम महात्म्य आणि आत्मानुभूती अशा विविध विषयांवर अभंगही रचले.वयाच्या ९२ व्या वर्षी नरहरी महाराज पार्थिव नामे संवत्सरात,शके बाराशे सात माघ शुद्ध तृतीया या दिवशी श्रीपंढरीनाथांच्या समोर भजन करता करता देवांच्या कटीमध्येच विलिन झाले.त्यांनी आधी तसा वरच देवांना मागुन घेतला होता.देवांच्या कटीसाठी करगोटा बनवता बनवता नरहरी महाराज स्वतःच देवांचा करगोटा झाले.अशा या दिव्य महापुरुषांच्या चरित्राचे चिंतन आपल्याला त्यांच्याच कृपेने करता आले.श्रीमहाराजांच्या चरित्रातून आपल्या मनातीलही देव देवांमधील शुल्लक द्वेष कायमचा निघून जावो आणि आपल्याला ही अद्वैताची ,हरी हर ऐक्याची आत्मानुभूती मिळो हीच माझी भगवान श्रीपंढरीनाथांच्या चरणी शिरसाष्टांग पूर्वक कोटी कोटी दंडवत पूर्वक प्रार्थना 🙏🌸🌺🚩
✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️.. ..


No comments:
Post a Comment