भक्तवत्सल भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचे सर्वात लाडके आणि प्रिय शिष्य ज्यांना स्वामींनी अभिमानाने "माझा सुत" असे म्हणून त्यांचा गौरव केला होता अशा श्रीहरि भाऊ तावडे यांची आज पुण्यतिथी.आपल्यातील बहुतेक लोकांना स्वामीसुतांचे चरित्र माहिती आहेच कारण तो भाग स्वामी चरित्रातील अत्यंत महत्वाचा भाग आहे.तरीही आपण आज स्वामी सुतांच्या त्या एकनिष्ठेचे , अद्वितीय आणि विलक्षण स्वामी भक्तीचे स्मरण करुयात.
स्वामीसुत म्हणे,भावेची धरावे । चरण बरवे समर्थांचे ।।
स्वामीसुत महाराजांच्या जन्माची नक्की तारीख आज माहिती नसली तरी त्यांचा जन्म विल्ये गावी सन १८४० च्या दम्यानचा असावा.त्यांचे तावडे हे घराणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अतिशय शुरवीर मराठा सरदारांचे घराणे होते.याच घराण्यातील दाजीसाहेब तावडे यांच्या पोटी स्वामी सुतांचा जन्म झाला.यांना गावात बराच मान होता.घरातील आर्थिक परिस्थिती सुखाची अशीच होती.पण घरात स्वामीसुतांना म्हणजेच हरिभाऊंना आठ भाऊ व चार बहिणी होत्या. त्यामुळे नुसते शेतीवर घर चालने अवघड झाले होते. म्हणून त्यांना मुंबई शहरात जाण्याचे अगत्याचे होते.हरिभाऊंचे शिक्षण इयत्ता चौथीपर्यंत झाले व त्यांनी पुढील शिक्षणासाठी मुंबई गाठली.आपल्या एका नातेवाईकाकडे ज्यांचे नाव दाजी सुभेदार होते त्यांच्याकडे स्वामी सुत रहायला गेले.शिक्षण घेत घेत हरीभाऊ नोकरीचा शोध घेऊ लागले.लवकरच त्यांनी इंग्रजी भाषेची तयारी केली व मुंबई पालिकेत शहर-सुधारणा खात्यात नोकरी ही मिळवली.त्यावेळी मुंबई सुधारणा करण्यासाठी चाळी बांधून भाड्याने देण्याचे काम पालिकेने केले होते.त्या चाळींचे भाडे वसुलीचे काम हरीभाऊ करत असत.
हरीभाऊंचे मित्र लक्ष्मण पंडित हे व्यापारातील नुकसानामुळे तिर्थयात्रेला निघाले.या यात्रेत ते काही काळ गाणगापूर येथे अनुष्ठाना करीता राहिले.त्यावेळी त्यांना गुरु महाराजांचा अक्कलकोट येथे जाण्याचा दृष्टांत झाला.अक्कलकोट येथे काही महिने वास्तव्य करुन सेवा केल्यावर भगवान श्री स्वामीरायांनी त्यांना आपल्या चरण पादुका देऊन घरी जाऊन सेवेत राहण्याची आज्ञा केली.स्वामी पादुका घेऊन लक्ष्मण पंडित घरी आले व स्वामीसेवेत लिन झाले.पुढे स्वामीसुत व त्यांचे सहकारी गजानन खत्री यांनी सट्ट्याचा व्यापार केला होता.त्यात त्यांना मोठे नुकसान होऊन दंड होण्याचा प्रसंग ओढावला.यातुन मार्ग मिळावा म्हणून ते दोघेही पंडीतांकडे आले.पंडितांनी मनोमन स्वामीरायांच्या चरणी नवस केला व जर यातुन आम्हाला सोडवले तर येणारा नफा स्वामी चरणी अर्पण करेन अशी विनवनी केली.( पंडितांनी नवस केला कारण हरीभाऊ आणि खत्री यांनी त्यांना विनवणी केली की आपण हमी लिहून द्यावी.जर असे केले तर येणार्या नफ्यातून आपल्यावर झालेले कर्ज आम्ही फेडू) काही काळाने स्वामी कृपेने त्यांना व्यापारात मोठा नफा झाला व हरीभाऊ या बिकट संकटातून बाहेर आले.पंडितांनी आपण अक्कलकोट स्वामी भगवंतांना केलेल्या नवसाबद्दल सांगितले.त्यामुळे नफ्याच्या रकमेचा मोठा भाग स्वामी चरणी अर्पण केल्याखेरीस त्यांना हात लावायचा नाही असे हरीभाऊंना निक्षून सांगितले.त्यामुळे ते तिघेही म्हणजे हरीभाऊ (स्वामी सुत),गजानन खत्री आणि पंडित हे अक्कलकोट ला निघाले. (खरंतर ही आपल्या लाडक्या सुताला आपल्या पर्यंत आणण्याची स्वामीरायांची एक विलक्षण लिलाच होती यात तिळमात्र शंका नाही.) त्यांनी त्याकाळी अक्कलकोट ला स्वामी दर्शनाला जाण्याचा दिवस निश्चित केला.सोबत उत्तम दर्जाची फळे घेतली व अक्कलकोट ला प्रस्थान केले.तिघेही अक्कलकोट ला पोचल्यावर तेथील राजघराण्यातील राजजोशी गणपतराव जोशी यांच्या वाड्यात उतरले.विश्रांती घेऊन शुचिर्भूत होऊन तिघेही बुधवार पेठेतील चोळप्पांच्या घरी स्वामी भेटीस्तव गेले.तिथे गेल्यावर झोपाळ्यावर बसलेली तेजस्वी स्वामी मुर्ती बघून तिघेही आनंदीत झाले.तिघेही शांतपणे स्वामी रायांचे दर्शन घेऊ लागले तोच स्वामी गरजले, "व्यापार केला,तोटा झाला.मला नवस केल्यावरुन दोन हजार रुपये नफा झाला.अबी जाव साले तेरी माँकी..." स्वामी रायांचे हे शब्द ऐकल्यावर तिघेही चपापले कारण नवसाची गोष्ट तिघांशिवाय कुणालाही ठाऊक नव्हती.स्वामींच्या सर्वज्ञपणाचा अनुभव घेऊन तिघेही आश्चर्यचकित झाले.तिघेही अश्रू ढाळत स्वामी चरणी नतमस्तक झाले.मुक्कामी परतल्यावर तिघेही स्वामींच्या रुपाचे स्मरण करीत झोपले.फेब्रुवारी १८६८ साली माघ महिन्यात एक विशेष प्रसंग घडला.हे तिघेही अक्कलकोट ला पुन्हा गेले पण यावेळी त्यांचे सर्व सामान चोरीला गेले.तेव्हा पोलिसात तक्रार करुन ते अंगावरील कपड्यानिशी स्वामीरायांपुढे गेले व स्वामींना घडलेला प्रसंग सांगितला.स्वामी महाराज ताडकन म्हणाले, "सुंठीवाचुन खोकला गेला." यावर तिघेही गप्प झाले.नंतर स्वामी गजानन खत्री याला म्हणाले, "बाजारात जाऊन धोतर घे.डोईस बांध." लक्ष्मण पंडितास म्हणाले, "तू डोक्याला रुमाल बांध." त्याचवेळी मात्र हरीभाऊंचा त्यांनी हात धरला व जवळ ओढले.अगदी आपल्या जवळ घेत म्हणाले, "तू आपल्या कुळावर पाणी सोड व माझा सुत हो." अशाप्रकारे स्वामींनी हरीभाऊंच्या डोक्यावर आपल्या कृपा करुणेची गंगाच ओतली.पुढे ते हरीभाऊंना म्हणाले , "साथ में पैसा लाया है । उन पैसों का सफेदा लेके आव." हरीभाऊ ना सफेदा काय हे कळले नाही.तेव्हा त्यांनी तसे स्वामींना लागलीच विचारले तेव्हा स्वामींनी आपल्या पायास स्पर्श करुन दाखविले.हरीभाऊंना लगेच स्वामीराय पादुकांबद्दल बोलत आहेत हे लक्षात आले.तो दिवस होता एकादशीचा.दुसर्या दिवशी द्वादशी ला तिघांनीही स्वामींना नैवेद्य करुन नेला.त्यावेळी तिघांनाही स्वामींनी प्रसाद दिला व तिघांनाही तिनं श्लोक सांगितले.त्यात हरीभाऊंना "गुरुर ब्रह्मा" हा श्लोक सांगितला.आपल्याला मिळालेला प्रसाद घेऊन तिघेही परत बिर्हाडी आले.नंतर स्वामी आज्ञा घेऊन तिघेही मुंबईस परतले.मुंबईत आल्यापासून आता हरीभाऊ चिंतनात मग्न राहू लागले.सतत स्वामीरायांचेच ध्यान ते करु लागले.त्यांना आता संसार हा निरस वाटुन लागला.लवकरच आपल्याला मिळालेल्या नफ्यातून त्यांनी अतिशय सुंदर आणि नक्षिदार अशा चांदिच्या पादुका घडवून आणल्या.पादुका घेऊन कधी अक्कलकोट ला जातो असे हरीभाऊंना झाले.
यथा काळी हरीभाऊ त्या पादुका घेऊन अक्कलकोट येथे पोचले.अक्कलकोटला पोचल्यावर त्यांनी त्या सुंदर पादुका स्वामींपुढे ठेवल्या.स्वामीरायांनी लागलीच त्या आपल्या पायात घातल्या.त्या पादुका घालून स्वामी महाराज सर्वत्र फिरु लागले.बसलेले असतांनाही स्वामी त्या पादुका आपल्या जवळच घेऊन बसत.एरवी आपल्याजवळ आलेल्या सर्व गोष्टी ते वाटून टाकत हे नवल.बहूतेक सेवेकर्यांना त्या पादुका आपल्याला मिळाव्यात असे वाटू लागले.काही लोक त्याचा आग्रह स्वामींजवळ करु लागताच स्वामी उद्गारले, "हे माझे आत्मलिंग आहे.मी ते कुणासही देणार नाही." पुढे चौदा दिवस या आत्मलिंग पादुका स्वामींनी वापरल्या व चौदाव्या दिवशी स्वामीसुत दर्शनाला आले.तेव्हा त्यांना जवळ ओढले ,त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले व म्हणाले, "तू माझा सुत आहेस.तु आपला सर्व धंदा-रोजगार सोडून बंदर किनार्यावर जाऊन मोठा किल्ला बांधून ,ध्वजा उभी कर." मग त्यांनी ते आत्मलिंग उचलून आपल्या हाताला,पायाला,तोंडाला आणि अन्य अवयवांना लावून हरिभाऊंना म्हणाले, "दोन्ही हात जोडुन उभा रहा".नंतर आपल्यापुढे त्यांना तिनं उठाबशा काढण्यास सांगितले.मग म्हणाले , "हे माझे आत्मलिंग तुला त्या मुंबापुरी किल्ल्यात मांडण्याकरिता दिले आहे.आजपासून तु माझा सुत झालास.आता तू माझ्या पोटावरुन हात फिरव व पादुका मस्तकावर धारण कर." स्वामी सुतांनी तसेच केले. खरंतर ही तर पूर्ण स्वामी कृपा होती.ही कृपा होताच स्वामीसुत बेभान झाले.त्यांच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले.अंग थरथरु लागले.स्वामींनी हा स्वामीसुतावर केलेले शक्तीपातच होता.सबंध स्वामींच्या चरित्रात इतकी विलक्षण कृपा स्वामींनी कुणावरही केली नाही.( विशेष म्हणजे तु माझा सुत हो ,घरदार,कुळावर पाणी सोड म्हटल्यावर स्वामी सुतांनी शब्दशः तसेच केले ही काही सामान्य बाब नाही.हे फक्त पुस्तकात वाचायलाच तेवढे सोपे आहे.यासाठी अनंत जन्माची साधना आणि पूर्वतयारी लागते आणि मला तर वाटते स्वामी सुत हे स्वामींचे पार्शदच आहेत त्यामुळे त्यांना ते सहज साध्यही झाले.यावरुन आपल्याला स्वामी कृपा मिळवण्यासाठी काय कष्ट करावे लागतील याची पुसटशी कल्पना येईल.मला स्वामी भेटतात ,बोलतात असे सांगुन ,अनुभुती चे बाजार भरवुन धंदा करणारे कुठे आणि स्वामी सुत कूठे ही खरंच चिंतनीय बाब आहे.प्रत्येकाने अंतर्मुख होऊन याचा विचार करायलाच हवा.) हा प्रसंग झाल्यावर हरीभाऊ एका रात्री स्वामींचे पाय चेपत बसले होते.तोच मध्यरात्री स्वामी माउली उठले.त्यांनी बिछान्याखालुन एक छाटी,एक कफनी आणि माळ काढुन ती हरीभाऊंच्या अंगावर फेकली व त्यांना म्हणाले, "आपला संसार लुटवून टाक.ही वस्त्रे परिधान कर.दर्याकिनारी ध्वजा लाव." सकाळीच स्नान करुन हरीभाऊ ती वस्त्रे नेसून स्वामींपुढे उभे राहिले.त्यावेळी त्यांनी आपल्या मस्तकावर ते आत्मलिंग धारण केले होते.नंतर स्वामी आज्ञा घेऊन ते मुंबईस परतले.
घरी आल्यावर घरच्यांना आपल्याला झालेल्या स्वामी आज्ञेची कल्पना दिली व आपले घरदार लुटविण्यास आरंभ केला.आपल्याला भेटण्यास येणार्या प्रत्येकाला ते घरातील वस्तु भेट म्हणून देऊ लागले.त्यांच्या अठरा वर्षांच्या पत्नी ताराबाईंना हा तर आघातच होता.बायकोचे चौर्यांशी तोळे सोने त्यांनी वाटून टाकले.इतकेच काय तर तिच्या गळ्यातील मंगळसूत्र ही त्यांनी ठेवले नाही.घरातील गुरे ,ढोरे सर्व संपत्ती ही वाटून आता स्वामी सुत निःसंग झाले.आपल्या बायकोला स्वामी नामाचा उपदेश करुन तिला सफेद वस्त्र दिले हाती एकतारी दिली व स्वतः भगवे वस्त्र परिधान करुन टाळ-विणा घेऊन स्वामी नामात दंग झाले.घरच्यांना ,आप्तांना ,गावकऱ्यांना हा बदल म्हणजे एक आश्चर्याचीच बाब झाली. याचा बायकोनी कडाडून विरोध जरी केला तरी स्वामी सुत थांबले नाही.बायकोला वारंवार ते सावध करु लागले.स्वामीसुतांनी कामठीपुरातील आपल्या घरालाच मठ केले.तिथेच ते दिवस रात्र स्वामी नामात ,भजनात दंग असत.आता तिथे लोक येऊ लागले.मुंबईतील कुणी जर अक्कलकोट ला स्वामी दर्शनास गेले तर त्यांना स्वामी स्वामीसुतांकडे जाण्यास सांगत.स्वामीसुतांकडे आता पारशी,मराठी,सोनार,पाठारे ,प्रभू अशा विविध समाजाची लोकं श्रद्धेने येऊ लागले. कारण ही तसेच होते.स्वामी पादुका रुपात प्रत्यक्ष तिथे हजर होते.त्यामुळे प्रत्येकाला प्रचितीही येत होती. पुढे स्वामीसुतांच्या मातोश्री मुंबईत आल्या .तिथे आल्यावर त्या गोंधळल्या.आपल्या मुलाला कुणीतरी चेटूक केले आहे असे तिला वाटू लागले.किंवा कुठलेतरी ब्रह्मसंमंध हे सर्व करत आहे असा तिचा ठाम विश्वास झाला.तेव्हा कुणीतरी त्यांना सटाण्याच्या देव मामलेदारांकडे जाण्याचे सुचविले.त्या त्यांच्याकडे गेल्या व आपल्या मुलाला हे काय भुतं लागले आहे याची तक्रार करु लागल्या.आपल्या मुलाला अक्कलकोटच्या मांत्रिकाने फसवले आहे अशी तक्रार करु लागल्या.याप्रमाणे ऐकल्यावर मामलेदार हसू लागले.ते म्हटले ,"अहो काकुबाई,काय सांगू तुम्हाला.मी ज्या बळावर कार्य करतो,माझा हा जो सर्व नोकरी धंदा तो एकाच्या बळावर चालू आहे.तो म्हणजे ते अक्कलकोट चे परब्रह्मच.तुम्ही म्हणता हरीभाऊ ला भुतं लागले आहे.पण ते भुतं माझ्यानेच काय तर देवांच्या देवाने ही सोडविले जाणार नाही. तुम्ही कधी अक्कलकोट ला जा.तिथे कुणी ऐरागैरा नाही.जाऊन अनुभव घ्या .मी ही अनुभव घेतला आहे.आता पुन्हा जाणार आहे.तुम्ही तिथे गेला तर तिथेच अडकून पडाल." देवमामलेदारा़सारखा जगमान्य विभुती असे म्हणत स्वामींचे गोडवे गात आहे याचे बाईंना खुप आश्चर्य वाटले आणि त्या निराश होऊन मुंबई ला परतल्या.
स्वामीसुत हे कुणी सामान्य व्यक्ती नव्हते ते प्रत्यक्ष स्वामी भगवंतांचे अवतारातील प्रिय पार्शद होते.स्वामींचे प्रिय सखे होते.याची साक्ष प्रत्यक्ष स्वामीरायांनीच स्वामींना दिली होती.
एकदा स्वामीसुत अक्कलकोट ला स्वामी दर्शनाला गेले असता त्यांना स्वामींनी जवळ बोलावून आपल्या पोटावर हात फिरवण्यास सांगितले.अनंतकोटी ब्रह्मांडे ज्याने रचली व ज्यांच्या उदरातील पोकळीत ती सहज लिलेने प्रस्थापित झाली आहेत त्यांच्या बाह्य पदराला स्पर्श होताच स्वामीसुतांना आपल्या पूर्व जन्माचे अनेक प्रसंग दृश्य स्वरुपात दिसायला लागले.त्या दर्शनाने ,त्या दिव्य प्रकाशाने ते चक्रावून गेले.त्यांना दिसले की ते पूर्वजन्मात मध्य हिंदुस्थानातील हस्तिनापूर पासून चोवीस मैलांवर असलेल्या छेली खेडे गावात विजयसिंह नामक एक रजपुत बालक होते.एका पवित्र वटवृक्षाखाली श्री विनायक मंदिरासमोर ही अवतार लिला घडली.
विजयसिंह बालक रोज एकटाच गोट्यांचा खेळ खेळत असे.एक डाव भगवंतांचा व एक डाव स्वतःचा अशी त्याच्या खेळण्याची पद्धत होती.जवळच्या लोकांना,मुलांना हा प्रकार हास्यास्पद वाटते असे.परंतु चैत्र शुद्ध द्वितीया ,बहुधान्य संवत्सरे,गुरुवार दिनी,शालीवाहन शक १०७१ सन ११४९ या पवित्र दिनी एक अघटित प्रकार घडला.आधी 'कडकड' असा मोठा आवाज झाला.हा आवाज धरणीच्या गर्भातून येत होता.आसपासची सारी माणसे भयाने इतस्तत: पळू लागली.विजयसिंह मात्र तिथेच उभा होता.काही क्षणात धरणी दुभंगली व त्यातून एक अष्टवर्षीय सुकुमार मूर्ती बाहेर आली.श्रीस्वामी महाराज हे त्या दिवशी नुसतेच प्रगटले नाहीत तर त्यांनी विजयसिंह बरोबर गोट्याही खेळल्या.श्रीस्वामीसुतांनी स्वामी माउलींवर "स्वामी विजय" नामक एक ग्रंथ लिहीला त्याचा द्वितीय खंड म्हणजे श्रीस्वामीअवतारकांड होय.त्यात त्यांनी स्वामींच्या प्राकट्यासंबंधी सखोल वर्णन केले आहे.ते ही आपण जरुर वाचा तसेच स्वामीसुत आपल्या अभंगातून ही या लिलेचे वर्णन करतात.स्वामी सुत लिहीतात
"स्वामी अवताराचि काय सांगु मात । मध्य हिंदुस्थानात जन्म त्यांचा ।।१।। गोटी खेळामाजी अवतार हा जाला । रामशिंग भला दास त्यांचा ।।२।। गुरुवार द्वितीय चैत्र शुद्धबरी । हरी ( इथे स्वामी सुत स्वत:चा उल्लेख करीत आहेत ) होता बरोबरी खेळावया ।।३।। आश्विन नक्षत्र प्रीती योग होता । जगाचा दाता अवतरला ।।४।।"
पुढील एका अभंगात ते लिहीतात -
"दत्त माझा अवतरला ।। दीन भक्ताच्या काजाला ।।
छेलीखेड्या ग्रामामाजी ।। जाला अवतार सहजी ।। गोटी खेळण्याचा रंग ।। तेव्हा हरी झाला दंग ।।"
पुढील एका अभंगात म्हणतात -
"धर्णी दुभंगून केली दरी ।। स्वामीराज आले वरी ।।
अष्टवर्षी सुकुमार ।। रुप दिसे हे सुंदर ।।"
अशा स्वामी भगवंतांचे प्रत्येक अवतारातील सखे असणारे स्वामी सुत एक दिव्य महापुरुष होते यात शंका नाही.त्यांनीच स्वामींचा १८७० ला प्रथम प्रगटदिन आपल्या मुंबईतील मठात भव्य दिव्य प्रमाणात साजरा केला.अशा प्रकारे मुंबईची गादी स्थापन झाल्यावर तेथून स्वामी कार्य अत्यंत जोमाने सुरु झाले.स्वामीसुतांच्या निर्वाणाची कथा आपल्याला माहीत आहेच त्यामुळे ती थोडक्यात मांडतो आहे.एकदा स्वामी दर्शनाला अक्कलकोट येथे स्वामीसुत गेले असता तिथे ते स्वामींपुढे भजनात नाचु लागले.स्वामीरायांना बघता क्षणीच स्वामीसुत आपले देहभान हरपले आणि आनंदाने चिपळ्या घेऊन नाचु आगले.आत्मानंदात बेभान झालेल्या स्वामीसुतांना त्यामुळे पायातील खडावा काढण्याचे ही भान राहिले नाही.हेच तेथील मत्सरी,कपटी आणि स्वामीसुतांचा द्वेष करणार्या लोकांनी हेरले.त्यांनी स्वामीसुतांना धक्काबुक्की करत अपमान करुन त्या पादुका काढल्या.स्वामीसुतांना आपला हा अपमान सहन झाला नाही.ते तात्काळ मुंबईत परतले.स्वामींनी अनेकवार अक्कलकोटला येण्यास निरोप पाठविला पण ते काही परत आले नाही.शेवटी स्वामी़नी "आता तोफ उडवतो" म्हणून निरोप दिला व स्वामी नामात दंग असलेले स्वामीसुत श्रावण वद्य प्रतिपदेला स्वामी रुपात,स्वामी चरणी लिन झाले. स्वामीसुतांच्या आईने खुप दुःख केले ,हंबरडा फोडला तेव्हा स्वामीराय त्यांना म्हणाले , "माय रडु नको.मी तुझा लेक आहे.त्याला आम्ही उंचपदावर नेऊन ठेवले आहे." पुढे चौदा दिवस सुतकात ही स्वामीभगवंत काकुबाईंना जवळ घेऊन मुलासारखे सांत्वन करत होते. "उंचावर नेऊन ठेवले" हे खरंच महत्वाचे वाक्य आहे.आपल्या प्रिय सुताला दत्तलोकातील कुठल्या उंच पदावर नेऊन ठेवले असेल याचा आपण विचार ही करु शकत नाही. अशा या दिव्य स्वामीसुतांच्या चरणी ही माझी शब्दसुमनांजली मी अर्पण करतो.स्वामीसुतांना प्रार्थना करतो की त्यांनी आमच्या सर्वांकडून अखंड श्रीस्वामी चरणांची सेवा करुन घ्यावी.
✒️✍️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️


No comments:
Post a Comment