श्रावण वद्य द्वितीया सद्गुरु राघवेंद्र स्वामी महाराज यांचा समाराधना दिन :-
पूज्याय राघवेंद्राय सत्यधर्मरताय च ।
भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे ।।
दक्षिणेतील थोर ईश्वर अवतार प्रत्यक्ष प्रल्हादराजांचे अवतार ,एक लोकविलक्षण विभूती ज्यांचे भक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात पसरलेले आहेत,ज्यांच्या कृपा करुणेच्या सागरात स्नान करुन आजवर हजारो जिव कृतार्थ झाले आहेत असे एकमेवाद्वितीय महापुरुष सद्गुरु श्री राघवेंद्र स्वामी महाराज यांचा आज समाराधना दिन.समाराधना दिन म्हणजे आजच्याच दिवशी स्वामी महाराजांनी जिवंत समाधी घेतली व आपल्या वृंदावनात जाऊन बसले आणि भक्तांना आश्वस्थ केले की पुढील ७०० वर्ष मी या वृंदावनात बसुन अखंड कार्य करत राहिलं.माझे चैतन्य पूर्ण रुपाने या वृंदावनात कार्यरत असेल.अशा या अलौकिक महापुरुषांच्या चरित्राचे स्मरण चिंतन घडणे ही देखील त्यांची मी कृपाच समजतो.आज आपण स्वामी महाराजांच्या चरित्राचे संक्षिप्त रुपात चिंतन करुयात.
सद्गुरु श्री राघवेंद्र स्वामी महाराज यांचे संपूर्ण घराणे हे वेदशास्त्रसंपन्न आणि गायनकलेतील श्रेष्ठ साधकांचे घराणे होते.तामिळनाडू येथील चिंदबरम क्षेत्राजवळील भुवनगीरी या गावात श्री स्वामी महाराजांचे माता-पिता राहायचे.सद्गुरु श्री राघवेंद्र स्वामी महाराजांचा जन्म श्री तिम्मण्णभट्ट आणि सौ.गोपिकांबा या अतिशय धर्मपरायण,सत्शिल दांम्पत्यापोटी झाला. त्यांनी परमवैष्णव ,महातपस्वी अशा पुत्रासाठी भगवान श्री वेंकटेश्वराची अनन्य भावाने सेवा केली.या सेवेच्या फलस्वरुप भगवान श्री व्यंकटेशाने त्यांना आशिर्वाद पूर्वक परमवैष्णव अवतारी पुत्र जन्मास येईल असा दृष्टांत दिला.या आशिर्वादाच्या फलस्वरुप लवकरच आई गोपिकांबा या गर्भिणी झाल्या.दोघा दाम्पत्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.गोपिकांबेला विलक्षण डोहाळे होत होते.त्यांना घरातील गरम पक्वान्ने न आवडता दुसर्याच्या घरातील शिळे अन्न खावे वाटु लागले,चांगले रंगबिरंगी रेशमी वस्त्रे सोडून तांबड्या रंगाचे वस्त्रच त्यांना आवडुन तेच त्या परिधान करु लागल्या.अशा प्रकारे यथावकाश नऊ महिने पूर्ण होऊन इ.स.१५९५ साली श्रीमन्मथसंवत्सरातील फाल्गुन शुक्ल सप्तमी ,शुक्रवार ,मृगशिरा नक्षत्रावर अशा दिव्य तेजस्वी पुत्राचा जन्म झाला.भगवान श्री व्यंकटेशाचे प्रसाद म्हणून त्यांचे नाव "व्यंकटेश" असे नाव ठेवले. व्यंकटेश बाळाचे अतिशय सुंदर,गोंडस व विलक्षण तेजस्वी रुप बघून सर्वच लोक मोहीत होत असत.भगवान कृष्ण परमात्म्या प्रमाणे बाळ व्यंकटेशाच्या ही बाल लिला विलक्षण आहेत.यथावकाश तिम्मण्णभट्टांनी बाळ व्यंकटेशाचे सर्व संस्कार पार पाडले.त्यांची विलक्षण कुशाग्र बुद्धी बघून सर्वच आश्चर्यचकित होत.उपनयन संस्कार झाल्यावर व्यंकटेशांना त्यांच्या बहिणीकडे वेदाध्ययनासाठी पाठविले गेले.त्यांचे भाऊजी श्रीलक्ष्मीनरसिंहाचार्य हे वेदशास्त्रसंपन्न असे वैदिक ब्राह्मण होते.त्यांच्याकडे वेदाभ्यास करण्यास व्यंकटेशाने सुरुवात केली.विलक्षण बुद्धीमत्ता असलेल्या व्यंकटेशांनी अल्पावधीतच विद्याभ्यास पूर्ण केला.अशा रितीने प्राथमिक विद्याभ्यास पूर्ण करुन व्यंकटेश हे आपल्या कुलगुरु असलेल्या श्रीसुधीन्द्रतीर्थांकडे कुंभकोण येथील मठात आले.त्यावेळी त्यांची अतिशय विलक्षण अशी दिनचर्या होती.सकाळी आन्हिक संपवून वेदान्तशास्र नंतर व्याकरण व तर्कशास्त्र,दुपारी पूर्वमीमांसाशास्त्राचा अभ्यास करीत.त्यांना संगीताचे ,विणावादनाचे ज्ञान हे जन्मताच होते असे म्हटले तर वावगे होणार नाही.कारण त्यांना अतिशय सुंदर असे विणावादन करता येत असे.एकदा सुधापाठ सुरु असतांना शिक्षकांना त्याबद्दल शंका आली तेव्हा ती आपण उद्या पाहु तुम्ही या वाक्यार्थावर चिंतन करा असे म्हटले.व्यंकटेशांनी त्यावर सखोल चिंतन केले व त्यावर टाचण काढून त्याचा अर्थ ही त्यात स्पष्ट केला.हे करीत असतांनाच त्यांना झोप लागली.रात्री सुरेंद्रतिर्थ आपल्या शिक्षासोबत विद्यार्थी काय करित आहे हे बघण्यासाठी खोलीजवळ आले.त्यांनी व्यंकटेशांच्या खोलीत बघितले तर ते तसेच टाचण काढून तिथेच झोपी गेलेले त्यांना दिसले.त्यांनी ते टाचण बघितले तर ते अगदी थक्क झाले.ते इतके परिपूर्ण आणि योग्य होते की ते वाचल्यावर त्यांना बाल व्यंकटेशाच्या बुद्धीमत्तेचे कौतुक वाटले.या टाचणाला त्यांनी टिकाग्रंथ म्हणुन मान्यता दिली व त्याला परिमल असे नाव देण्यात आले.तेव्हापासुन त्यांना परिमलाचार्य असे म्हटले जाऊ लागले.
विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर व्यंकटेशांचे सरस्वती या कन्येशी विवाह झाला.त्यांच्या पत्नी ही त्यांना परमार्थात साह्यभूत होत्या.त्या अतिशय धर्मपरायण अशा पतिव्रता होत्या.लवकरच त्यांना एक पुत्र प्राप्ती झाली ज्यांचे नाव लक्ष्मीनारायण असे ठेवण्यात आले.पुढे सन १६२१ साली फाल्गुन शु.द्वादशी या दिवशी त्यांनी आपल्या गुरुकडुन संन्यासदिक्षा घेतली .गुरुंनी त्यांचे नामकरण "राघवेंद्रतिर्थ" असे केले.संन्यासदिक्षा दिल्यावर गुरु सुरेंद्रतिर्थ यांनी लवकर आपला देह ठेवला.त्यानंतर राघवेंद्र स्वामींनी अनेक ठिकाणी जाऊन विद्वानांशी शास्त्रार्थ केला व त्यांना वादविवादात पराभूत केले.तंजावर येथे अधर्म वाढून दुष्काळ पडला व प्रजा अत्यंत दु:खात होती.त्यावेळी तिथे स्वामींना तेथील राजा शरणं आला.तेव्हा स्वामींनी राजाच्या धान्य कोठारावर श्रीमूलरामाचे बीजाक्षर लिहून समस्त धान्य अक्षय केले.तिथे बारा वर्ष राहून देश सुभिक्ष केला व तेथील लोकांना सुखी केले.पुढे तेथील राजाने आपले सर्वस्व श्री राघवेंद्र स्वामींच्या चरणी अर्पण केले व त्यांचे दास्यत्व पत्करले.तेव्हा त्याने दिलेले मानपत्र आजही श्रीमठाकडे उपलब्ध आहेत.पुढे स्वामी तंजावरला परत आले.स्वामींचा अखंड संचार सुरु असे.विविध ठिकाणी संचार करुन श्रेष्ठ विद्वानांशी शास्त्र चर्चा करत व स्वतः चे ज्ञानश्रेष्टत्व सिद्ध करत.या सर्व संचारात त्यांचा नित्यक्रम ,पाठ,प्रवचन कधीही चुकले नाही.पुढे रामेश्वर ,मदुराई ,वेल्लुर असा प्रवास करीत करीत स्वामी महाराज उडुपी येथे आले.तेथे ते आपल्या परमगुरु श्रीविजयींद्रांनी संपादित केलेल्या जागेत राहिले.काही काळ उडुपीत राहुन श्री भगवान गोपालकृष्णांची सेवा केली. पुढे त्यांनी आपल्या सेवेत असलेल्या व सदैव सेवा तत्पर असलेल्या वेंकण्णा नावाच्या भक्ताला नर्वांसमक्ष मोक्ष दिला.त्यांना वैकुंठात धाडले.(हा प्रसंग मोठा आहे त्यामूळे इथे देत नाही.)
आपल्या प्रवासादरम्यान श्री राघवेंद्र स्वामी महाराज हे पंढरपूरला ही श्रीपंढरीनाथांच्या दर्शनाला येऊन गेले.नंतर ते कोल्हापूर,नाशिक करीत कृष्णातिरी अल्लूर या गावी आले.तेथेच त्यांनी तत्वप्रकाश भावदीप नावाचे अत्यंत अमुल्य असलेले व्याख्यान लिहीले.स्वामींच्या सामर्थ्याची परिक्षा घेण्याकरिता मसुर खान या यवन राजाने स्वामींना निषिद्ध पदार्थ असलेले मद्य मांस कपड्याने झाकून ताटात स्वामींपुढे पाठवले.स्वामी हे ब्रह्मज्ञानी होते,सर्वज्ञ होते.त्यांनी आपल्या अंतर्चक्षुंनी हे जाणले.स्वामींनी आपल्या पुढे ठेवलेल्या ताटावर शंखोदक प्रोक्षण केले.त्यानंतर झाकलेले वस्त्र काढल्याबरोबर मांंस-मद्याचे रुपांतर फुले व फळात झाले होते.ही अघटीत करणी बघून तो नवाब तात्काळ स्वामींना शरणं आला व त्यांना आपल्या या अपराधाची क्षमा याचना करु लागला.कृपाळू स्वामींनी त्याला लागलीच क्षमा केली हे वेगळे सांगायला नको.या नवाबाने श्रीस्वामींना मंचालीग्राम अर्पन केले.अशा प्रकारचे शेकडो चमत्कार श्री स्वामी महाराजांच्या चरित्रात आले आहेत.स्वामींचे सामर्थ्य इतके विलक्षण होते की त्याची प्रचिती प्रत्येकाला येतच होती व आहे.स्वामी महाराजांनी आपल्या शक्ती सामर्थ्याने डोळे नसणार्यांना दृष्टी ,बहिर्यांना शब्दज्ञान ,मुक्याला वाणी,लंगड्याला सरळ चालविले असे अनेकाविध विलक्षण कृपा करुणेच्या लिला केल्या.जगाला त्रिविध तापातून मुक्त करण्यासाठीच हा दिव्य अवतार या पृथ्वीतलावर अवतीर्ण झाला होता.
आता लवकरच समाधीस्थ होण्याचा विचार श्री स्वामी महाराजांनी केला व ते आपल्या या शेवटच्या काळात मंत्रालय येथे आले.त्यांनी मंचालेमध्ये आपले कुलदैवत श्री व्यंकटेशाचे देवालय निर्माण केले.इ.स १६७१ साली विरोधीनाम संवत्सराच्या आषाढ महिन्यात चातुर्मास्याचे दिवस सुरु होऊन श्रावण महिना सुरु झाला होता.श्रावण कृ.२ या दिवशी आपले अवतार कार्य पूर्ण करुन वृंदावनात समाधी घेण्याचा विचार श्री स्वामींनी केला.आपल्या सर्व इष्ट बांधवांना बोलावून घेतले.आपल्या पूर्वाश्रमीच्या मोठ्या भावांचा नातू वेंकण्णाचार्य यांना संन्यास दिक्षा देऊन "श्रीयोगींद्रतिर्थ" असे नामकरण केले.आपल्या प्रमाणे योगींद्रतिर्थांना मानावे व त्यांना हवे तेथे सहकार व सेवा करावी असा आदेश सर्वांना दिला.त्यानंतर स्वतः वृंदावणाची जागा शिष्यांना दाखविली.इ.स १६७१ विरोधीनाम संवत्सरात श्रावण कृष्ण द्वितीया शुक्रवारी हा दिवस उजाडला.ब्राह्ममुहर्तावर उठलेल्या स्वामींनी आपले आन्हीक संपविले.उपस्थीतांना आशिर्वाद देऊन सांगितले आपण शरीर सोडून जातो आहे म्हणून कुणी दु:खी होऊ नये.जिवंतपणेच आम्ही वृंदावनात राहतो.येथुनच सर्वांचा योगक्षेम चालवु.वृदांवनात अदृश्य असलो तरी आमचे शुभाशीर्वाद तुम्हा सर्वांवर अखंड असतील असा हितोपदेश केला.श्रीमूलरामचंद्रांचे डोळ्यांनी दर्शन केले.सर्वांना तिर्थ - मंत्राक्षता देऊन आशिर्वाद दिला.दिवाण वेंकण्णाला जवळ बोलावून वृंदावनात १२०० शे लक्ष्मीनारायण शालिग्राम घालण्यास सांगितले.वृंदावनात श्वास रोखून ध्यानासक्त झाले.ते समाधीत गेल्यावर जपमाळ खाली घसरली.स्वामींच्या पूर्व आज्ञेनुसार जपमाळ घसरत असलेली दिसताच शेवटची शिळा वेंकण्णांनी झाकली.हाच तो परमपावन दिन.आजचा दिवस स्वामी महाराजांचा समाराधना दिन म्हणून सर्व जगभरात साजरा केला जातो.आज स्वामींनी समाधी घेऊन शेकडो वर्ष उलटली तरी ही आजही स्वामी भक्तांच्या हाकेला तात्काळ धावतात.शुद्ध अंत:करणाने स्वामींना शरणं गेले तर ते आपली कृपा करुनेचा वर्षाव आपल्या भक्तांवर करतात याचा अनुभव आजही लोक घेत आहेत.खरंतर हा एक लेख म्हणजे फक्त स्वामी चरित्राची झलक आहे.स्वामी महाराजांचे चरित्र अतिशय विस्तृत आणि दिव्य आहे.अनंत लिलांनी मंडीत आहे पण शब्दमर्यादेस्तव ते मांडणे शक्य नाही.समाधी नंतर अनेक लिला घडल्या त्यातील काही जरी लिला घेतल्या तर त्यावर एक स्वतंत्र लेख होईल.असो अशा या प्रल्हाद अवताराचा आज समाराधना दिवस.श्री राघवेंद्र स्वामी आपल्या सर्वांवर अखंड कृपा अनुग्रह करोत.त्यांच्या कृपा करुनेचा अनुभव आपल्या सर्वांना येवो व श्री सद्गुरु चरणांची अखंड सेवा आपल्या कडुन त्यांच्या कृपेने घडो हीच श्री स्वामी महाराजांच्या सुकोमल चरणी माझी प्रार्थना.माझे श्री सद्गुरु राघवेंद्र स्वामी महाराजांच्या चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏🌸
✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️
"दुर्वादिध्वान्तरवये वैष्णवेन्दीवरेन्दवे ।
श्रीराघवेन्द्रगुरवे नमः कारुण्यसिन्धवे ।।"
"दुर्वादी अंधकाराला नष्ट करणार्या सूर्याप्रमाणे ,वैष्णव चंद्राप्रमाणे ,लोकांना समुद्रा एवढे दयाळू असलेल्या श्रीराघवेंद्रतीर्थ गुरुंना नमस्कार असो."
#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🌺
#महाराज_ज्ञानेश्वर_माउली_समर्थ 🙏🌸🌺

.jpeg)
No comments:
Post a Comment