श्रीकृष्ण_जन्माष्ठमी_आणि_श्रीमाउलींचा_जन्मोत्सव
कृष्ण गोकुळी जन्मला । दुष्टां चळकांप सुटला ।।
होता कृष्णाचा अवतार । आनंद करिती घरोघर ।।
सदा नाम वाचे गाती । प्रेमे आनंदें नाचती ।।
तुका म्हणे हरिती दोष । आनंदाने करीती घोष ।।
आज श्रावण कृष्ण अष्टमी आज पूर्णब्रह्म ,सकलगुणनिधान,भक्तवत्सल,राधाप्राणवल्लभ, यदुकुलभुषण भगवान श्री कृष्णपरामात्माचा ५२४८ वा जन्मोत्सव... यशोधाघरी राहणारे बालक्रिडेत रंगणारे भगवान बालगोपाल, गोपिकांसोबर रासक्रीडा करणारे मधुसूदन, कंस आणि चाणुरादी राक्षसांना ठार मारणारे भगवान श्रीकृष्ण, सोन्याच्या द्वारकेचे अधिपती श्रीद्वारकाधीश, योग्यांचे प्राण,भक्तांचे निधान योगीराज श्रीभगवान ,अर्जुनाचे प्राणसखा, आराध्य माधव ,गीतेचा उपदेश करणारे पूर्णब्रह्म पुरुषोत्तम महाविष्णु अशा असंख्य लिला करणारे लिलाविष्वंभर प्रभु श्रीहरी कृष्ण आजच्याच तिथीला प्रगट झाले. पण आजच्या तिथीला आमचे परमाराध्य , भक्तवत्सल ,भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या रुपात प्रभु श्रीकृष्णांनी आपल्या करुणेचा ,वात्सल्यतेचा आविष्कारच पुन्हा एकदा प्रगट केला. आजची तिथी ही या मुळे आम्हा सर्वांसाठी द्विगुणीत परमानंदाची तिथी ठरते. माउलींच्या रुपात भगवान श्रीमहाविष्णुच आज आळंदी क्षेत्री प्रगट झाले.
श्रीसद्गुरु नामदेवराय माउलींच्या जन्माचे अवतराचे वर्णन करतांना लिहीतात
अधिक सत्याण्णव शके अकरा शती ।
श्रावण मास तिथी कृष्णाष्टमी ।।१।।
वर्षाऋतु युवा नाम संवत्सर ।
उगवे निशाकार रात्रिमाजीं ।।२।।
पंच महापातकी तारावया जन ।
आले नारायण मृत्युलोकां ।।३।।
नामा म्हणे पूर्णब्रह्म ज्ञानेश्वर ।
घेतसे अवतार अलंकापुरी ।।४।।
कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती माउली ज्ञानोबारायांच्या रुपात भगवंत पुन्हा एकदा श्रीगीता तत्व प्रगट करण्यासाठी अवतरले आहेत. यावेळी हा श्रीमहाविष्णु अवतार गुरु रुपात प्रगट झाला त्यामुळेच जणू देवांनी गुरुवार हा दिवस निवडला असावा. श्रीमाउलींचा जन्म आळंदी क्षेत्री शके ११९७ ,श्रावण वद्य अष्टमी ,मध्यरात्रीस झाला.
श्रीसंत सच्चिदानंद बाबा थावरे म्हणतात
श्री शालिवाहन भूपती । अकराशे सत्याण्णव मिती ।
युवनाम संवत्सरा प्रती । श्रावणकृष्ण अष्टमी ।।
गुरुवार रोहिणी । पर्वकाळ परार्ध रजनी ।
बैसोनि देवगण विमानीं । कुसुमवृष्टी करिताती ।।
विठ्ठल रुक्मिणीचे पोटीं । अवतरले जगजेठीं ।
ज्ञानदेव नामें सृष्टि । श्रीगुरु माझा मिरवतसे ।।
देवांनीच तीच तिथी,तेच नक्षत्र, तोच वेळ अशी संधी साधुन गुरुवार हा वार जणु आपण यावेळी सद्गुरु स्वरुपात प्रगट होणार आहोत अशी खूनच दर्शविण्यासाठी गुरुवारी अवतार धारण केला. कृष्णाष्टमीच्या मध्यरात्री हा जगजेठी अलंकापुरीत अवतार धारण करता झाला .. अज्ञान अधंकाराला दूर सारण्यासाठी मध्यरात्रीला माउली स्वरुपी ज्ञानसूर्य आजच्या तिथीला अलंकापुरीत अवतार धारण करता झाला.
माउलींच्या जन्मस्थानाबाबत नामदेव राय म्हणतात
"नामा म्हणे पूर्णब्रह्म ज्ञानेश्वर ।
घेतसे अवतार अलंकापुरी ।।"
माउलींचे जड भिंत चालवणे,मशीद बोलती करणे, रेड्यामुखी वेद वदवने, मृत व्यक्तिस उठवणे अशा असंख्य लिला आपल्या सर्वांना श्रृतच आहेत...
माउलींनी भावार्थदीपिकेद्वारे श्रीगीतामाईतील ज्ञानगंगा सर्वांसाठी मोकळी केली ,सर्वांना त्या अमृताचे प्राशन करविले आणि आपल्या "माउली" या अनन्यकरुणारुपालाच जणु त्यांनी प्रगट केले आहे.
नामदेवराव माउलींच्या या करुणेचे वर्णन आपल्या अभंगात करतात -
ज्ञानराज माझी योग्यांची माउली । जेणें निगमवल्लि प्रगट केली ।।१।।
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंदलहरी प्रगट केली ।।२।।
अध्यात्म विद्येचे दाविलेसें रुप । चैतन्याचा दिप उजळिला ।।३।।
छप्पन्न भाषेचा केलासे गौरव । भवार्णवीं नाव उभारिली ।।४।।
श्रवणाचे मिषें बैसावे येऊनी । सामराज्य भुवनीं सुखी नांदे ।।५।।
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ।।६।।
अशी ही ज्ञानदेवी म्हणजे माउलींच्या करुणेचा ,मायेचा, अपार दयेचा सारंच आहे. "अनुभवामृत" या आपल्या रचनेद्वारे माउलींनी सिद्धांच्या अनुभवाचेच प्रगटिकरण केले आहे. म्हणुनच या ग्रंथाला "सिद्धानुवाद" असेंही नाव आहे. "हरिपाठ" हा आज आपल्या सर्व वैष्णवांघरी नित्य म्हटला जातो वरवर सोपा वाटणारा हा हरिपाठ म्हणजे माउलींनी प्रगट केलेले दिव्य गुरुपरंपरेचे ज्ञानच आहे... कुट दृष्टीने, गुह्यार्थाने हरिपाठाचे अवलोकन ,मनन,चिंतन केले तरं त्यातील गहन अर्थ, त्याचा गुढार्थ प्रत्येकाला स्थंभीत करणारा आहे. प्रत्येकाने त्याचा अभ्यास,चिंतन ,मनन करुन त्या दिव्य ज्ञानाला ग्रहन करायलाच हवे. माउलींनी श्रीचांगदेव महाराजांना पाठवलेले पत्र "चांगदेव पासष्टी" तसेच माउलींचे अभंग हे सर्व म्हणजे अतिदिव्य अशी ज्ञानगंगाच आहे...एकाएकाचे चिंतन करायला एक एक जन्म अपुरा पडेल असे हे दिव्य ज्ञान आहे. प.पु.श्रीमामा साहेब दांडेकर तर म्हणतात की "महाराष्ट्रात जन्म घेऊन एकदा तरी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वाचायलाच हवा"...
माउलींच्या नामाचे वर्णन करतांना संत म्हणतात
"ज्ञानदेव ज्ञानदेव वदता वाचे ।
नाही कळीकाळाचे भेव जींवा ।।"
असे माउलींच्या नामाचेच अतिदिव्य महात्म्य आहे... श्रीमाउलींनी श्रीसंत एकनाथ महाराज,श्रीसंत हैबतराव बाबा व श्रीसंत गुलाबराव महाराज या तिन्ही सत्पुरुषांना आपल्या स्वनामाचाच अनुग्रह दिला होता.असे हे माउलींचे नाम सर्वश्रेष्ट आणि स्वयंसिद्ध आहे... श्रीनाथ महाराज म्हणतात
"श्रीज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी तू सर्वज्ञा |"
माउलींचे चरित्र, माउलींचे नाम, माउलींचे रुप सर्वकाही अतिदिव्य आणि शब्दातीतच...
अशा करुणाब्रह्म भक्तवत्सल श्रीज्ञानोबारायांच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत प्रणाम आणि त्यांनी आपल्या कृपेची,करुणेची पाखर आपल्या सर्वांवर नित्य धरावी... नित्य आपल्या सर्वांवर आपल्या अमृत दृष्टीने कृपा करावी हीच श्रीचरणांशी कोटी कोटी दंडवत प्रणाम...माउलींच्या बद्दल बोलने,लिहीने म्हणजे सुर्याला पणती दाखविल्याप्रमाणे आहे.तरी देखील माउलींनीच ज्ञानदेवीत एका दृष्टांतात म्हटले आहे की , "बाळ जरी बोबडे बोल बोलत असले तरी बापाला त्याचे अपार कौतुक आणि आनंद वाटत असतो." त्याचप्रमाणे मी माझ्या या माय-बापा पुढे हे बोबडे बोल बोललो ,जे त्यांनीच वदवून घेतले आणि तेच प्रेमाने या तोडक्या मोडक्या शब्दांचे कौतुकही करतील यात शंका नाही.शेवटी ज्ञानाबाई आमची "माउली" ना!!!पुढे ही माउलींनी आपल्या सर्वांकरवी अखंड सेवा ,स्मरण करुन घ्यावे हीच त्यांच्या सुकोमल चरणी शिरसाष्टांग दंडवत पूर्वक प्रार्थना...
🙏🌼"नमामी सद्गुरुं शातं सच्चिदानंदं विग्रहं |
पूर्णब्रह्मं परानंदं इशं आळंदीवल्लभम् ||"🙏🌼
#ज्ञानदेव_ज्ञानदेव_ज्ञानदेव_ज्ञानदेव_ज्ञानदेव🌺🌸
✒️✍️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी✍️✒️


Good
ReplyDeleteज्ञानेश्वरीच्या पाठी ! जो ओवी करे मराठी ! अमृताच्या ताटी ! नरोटी ठेवली जाण !
ReplyDelete