Friday, September 16, 2022

ज्ञानेश्वरीचा परिष्करण अर्थात शुद्धीकरण दिन🙏🌸🌺

 




ते_हे_माय_ज्ञानेश्वरीः-🙏🌸🌺

                                   आज ज्ञानदेवीचे नाथांनी केलेल्या पाठशुद्धीकरणाच्या पूर्ततेचा मंगल दिन...आजच्या तिथीला नाथबाबांनी ज्ञानदेवीच्या मुळ पाठात जे तिनशे वर्षात अशुद्ध पाठ समाविष्ट झाले होते त्यांना काढून पुन्हा आपल्यापुढे मुळ नित्यशुद्ध ज्ञानदेवी मांडली.आजच्या दिवशी माउलींच्या कृपेने नाथांचे हे दिव्य कार्य पूर्णत्वास गेले.आजचा दिवस ज्ञानेश्वरी जयंती या नावाने जरी हल्ली प्रचलित असला तरी हा दिवस खरंतर शांतिब्रह्म एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत संपादित करुन आपल्या सर्वांसमोर ती प्रगट केली तो दिवस ,ती तिथी.. नाथबाबांनी आपल्या सर्वांवर केलेले हे न फेडता येणारे उपकारच आहेत. ज्ञानेश्वरी चे खरे नाव  भावार्थदिपीका आहे पण माउलींच्या मुखातून हे ज्ञान प्रगट झाले म्हणून ही ज्ञानदेवी किंवा ज्ञानेश्वरी या नावानेच प्रचलित झाली. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर माउलींची आपल्या सर्वावरील कृपा करुणेचे सगुण शब्द रुपच आहे. रुढी आणि कर्मठतेने समाजाला गिळंकृत केल्यावर भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभु माउलींच्या रुपात पुन्हा अवतरले व त्यांनी हे अनादी शाश्वत ज्ञान आपल्या सर्वांसाठी खुले केले.ज्ञानदेवांनी आपल्या सर्वांसाठी ज्ञानाची ही बंद कवाडे उघडी करुन दिली.तत्कालिन कर्मठ समाजात हा अमुलाग्र बदल घडविणारा विचार होता.माउलींनी नेवासा येथे भावार्थदिपीका आपल्या मुखातून प्रगट केली म्हणजे सांगितली आणि ती सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतली.ही अलौकिक आणि महान घटना झाल्यावर काही वर्षांनी भावार्थदिपीकेत अर्थात ज्ञानेश्वरीत वेगवेगळ्या लोकांनी आपल्याला रुचेल असे पाठ भेद टाकण्यास सुरवात केली .त्यामुळे माउलींनी प्रगट केलेल्या मुळ पवित्र शुद्ध ज्ञानात अशुद्ध बाबींचा प्रवेश झाला. पण माउलींनी तिनशे वर्षानंतर नाथ महाराजांना दृष्टांत देऊन आपल्या समाधीत बोलाविले ,त्यांना आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ समजावून सांगितला व आजवर जेवढी अशुद्धी ज्ञानेश्वरीत समाविष्ट झाली ती दुर करुन ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करण्याची आज्ञा केली.नाथबाबांनी अपार कष्ट घेऊन हे दिव्य कार्य पूर्णत्वास नेले ती तिथी होती भाद्रपद कृष्ण षष्टी इ.स १५८४.माउलींच्या या दिव्य ज्ञानाला जणू नाथांनी आपल्या हाताने सुवर्ण झळाळी दिली,त्या कार्याला सुवर्णाची झालर चढवली.नाथ महाराजांनी आपल्या या कार्याचा उल्लेख ज्ञानेश्वरीच्या संपादीत प्रतीच्या शेवटील ओवीनंतर दिला आहे तो असा की -


शके पंधराशे साहोत्तरी ! तारणनाम संवत्सरी ! एकाजनार्दने अत्यादरी ! गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली !!१!! ग्रंथ पुर्वीच अतिशुद्ध ! परि पाठांतरी शुद्ध अबद्ध ! तो शोधुनिया एवंविध ! प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी !!२!!  नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका ! जयाची गीतेची वाचितां टीका ! ज्ञान होय लोकां ! अतिभाविकां ग्रंथार्थिया !!३!! बहुकाळ पर्वणी गोमटी ! भाद्रपद मास कपिलाषष्ठी ! प्रतिष्ठानी गोदातटी ! लेखन कामासाठी संपूर्ण जाहली !!४!!


पुढील श्रीनामदेवरायांच्या आणि श्रीजनाबाईंच्या अभंगात ज्ञानदेवीच्या महात्म्य आणि महिमेचे तंतोतंत वर्णन आले आहे. त्यावर आपण काही लिहावे असं काहीच उरत नाही. हे दोन्ही अभंग म्हणजे जणू या संतद्वयांनी आपल्याला जिवन जगण्याचा मार्गच,आपल्या उद्धाराचा राजमार्गच दाखविला आहे. 


#नामदेवराय_लिहीतात-

ज्ञानराज माझी योग्यांची माउली । जेणें निगमवल्लि प्रगट केली ।।१।।

गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंदलहरी प्रगट केली ।।२।।

अध्यात्म विद्येचे दाविलेसें रुप । चैतन्याचा दिप उजळिला ।।३।।

छप्पन्न भाषेचा केलासे गौरव । भवार्णवीं नाव उभारिली ।।४।।

श्रवणाचे मिषें बैसावे येऊनी । सामराज्य भुवनीं सुखी नांदे ।।५।।

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ।।६।।


#श्रीजनाबाई_लिहीतात-

वाचावी ज्ञानेश्वरी, डोळां पहावी पंढरी ॥१॥

ज्ञान होये अज्ञान्यांसी, ऐसा वर त्या टीकेसी ॥२॥

ज्ञान होये सकळा मूढां, अतिमूर्ख त्या दगडां ॥३॥

वाचेल जो कोणी, जनी त्यासी लोटांगणी ॥४॥


                असे सकल संतांनी ज्ञानेश्वरीचे अलौकिकत्व , दिव्यत्व वेळोवेळी प्रगट केले आहे. आजच्या या परम पावन दिनी श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात माउली आणि ज्ञानेश्वरी संबंध श्री बाबा बेलसरे यांनी दिलेली हकिकत/ प्रसंग लिहून या लेखाला विराम देतो.

नामावतार प.पू.सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांनी करुणाब्रह्म कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींबद्दल शब्दात व्यक्त केलेले प्रेम :- 

                           वर्हाडच्या बाजूला राहणारे एक साधु काशीयात्रेला जात असतां वाटेंत हर्दा येथें उतरले.त्यांची व श्रीमहाराजांची भेट व परतभेट झाली.पुन्हा एकदा ते श्रीमहाराजांना भेटण्यास आले असतां बराच वेळ बसले.बोलता बोलता श्रीज्ञानेश्वरमहाराजांचा विषय निघाला.श्रीमहाराज त्यावेळी म्हणाले , " श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा ! कुरुक्षेत्रावर गीता सांगणारे भगवान् श्रीकृष्ण कपडे बदलून ज्ञानेश्वरी सांगायला आले.दोघांत मुळींच फरक नाही." असे प्रेमोद्गार श्रीमहाराजांनी त्यावेळी काढले.भगवान श्रीकृष्णच माउलींच्या रुपात पुन्हा अवताराला आले व ज्ञानेश्वरीच्या रुपात त्यांनी पुन्हा गीता तत्व प्रगट केले आहे.. 

                     अशी ही दिव्य ज्ञानेश्वरी प्रत्येकाने जिवनात एकदा तरी वाचायलाच हवी. सोनु मामा म्हणायचे की मराठी घरात जन्माला आलेल्या प्रत्येकाने जिवनात एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचायलाच हवी. कारण ज्ञानेश्वरी हे जिवन जगण्याचे तत्वज्ञान आहे आणि ते तत्वज्ञान जिवन आणि व्यक्तीला अंकर्बाह्य बदलून टाकतं. 

           ✍🏻🖋️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी 🖋️✍🏻

No comments:

Post a Comment

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...