🙏❤️ कबीर -एक शोध ❤️🙏
गेल्या अनेक शतकांपासून कबीर नावाचं हे वादळ प्रत्येक वैचारिक जिवाच्या मनात शिरुन अगदी इतस्ततः विचारांना दिशा देऊन गेलं आहे.कबीर म्हटलं तर आपल्या प्रत्येक सामान्य जनांच्या डोळ्यापुढे उभी राहते ती म्हणजे कबीरांची दोहावली.खरं ही आहे, हे दोहे नुसते काव्य किंवा रचना नाहीत, तर जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगांसारखे जिवन जगण्याचे विज्ञान आहे.जिवनाला दिशा देणारा कवडसा आहे.कबीर हे नुसते एक संत नाहीत तर कबीर हा एक विचार आहे नवचैतन्याचा,कबीर एक विद्रोह आहे समाजविरोधातील हुकुमशाहीचा,कबीर एक विवेक आहे विवेकहीन परमार्थाचा.कबीरांमध्ये एका बाजुस आपल्याला अनन्य शरणागत असलेला शिष्य दिसतो जो छातीठोक पणे सांगतो की "गुरु आणि गोविंद जर माझ्या पुढे उभे राहिले तर आधी मी गुरुंचेच पाय धरेल आणि गोविंदाला थांबायला सांगेन" तर हेच सद्गुरु पायी शरणं असलेले कबीरदास समाजातील विखारी द्वेषाच्या बिजावर टिका करतांना परखडपणे झोड उठवताना म्हणतात की "“माटी का एक नाग बनाके, पुजे लोग लुगाया ! जिंदा नाग जब घर मे निकले, ले लाठी धमकाया !!” असे हे कबीर प्रत्येकाला जिवनाच्या कुठल्यातरी वळणावर भेटतातच.कबीर दासांचे प्रत्येक शब्द हे एक स्वतंत्र चिंतनाचा विषया आहे.प्रत्येक रचना ही इतकी गहन आणि चिंतनीय आहे की त्याची खोली मोजणे कुणालाही शक्य नाही.कबीर दासांचे जिवन हे एक विद्रोही संतांचे बंडच आहे तथाकथीत विचारांच्या विरोधात,अविवेकी परमार्थ आणि जिवन व्यतित करणार्यांच्या विरोधात.कबीर वाचतांना एक गोष्ट तर प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे कबीर प्रत्येक गोष्ट ,प्रत्येक रितं ,प्रत्येक रुढी आणि पद्धत ही आपल्या विवेकाच्या बळावर तपासतात.त्यांच्या प्रत्येक दोह्यात या विवेकाची सुवर्ण झळाळी आपल्याला बघायला मिळतेच मिळते.कबीर हे आजवर झालेल्या संतांमधले पहाटेचं साखर झोपेत पडलेलं स्वप्नच आहे ज्याने आपल्याला खडबडून जागं व्हायला भाग पाडलय.अशा या कबीरदासांच्या चरित्राचे आज आपण चिंतन करुयात.
सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वी काशीजवळ लहरतारा या गावी निरु नामक एक विणकर व त्याची पत्नी निमा राहत होता.एक दिवस हे दाम्पत्य आपल्या एक नातेवाईकांना भेटायला निघाले होते.त्यावेळी लहरताला येथील तलावाजवळ जन्मतःच सोडून दिलेले एक बालक दिसले.त्यांनी त्या बाळाला बघितले पण आता त्याला सोडून पुढे जाण्यास त्यांचे मन तयार होईना.दोघेही या नवजात बालकाला घेऊन आपल्या घरी आले.कबीरांच्या जन्म दाता आई वडिलांचे नाव किंवा त्याबद्दलची काहीही माहिती कुठेही उपलब्ध नाही.पण एक दोहा कबिरदासांच्या जन्मतिथी बद्दल फार प्रचलित आहे तो असा ,
चौदह सौ पचपन साल गए
चंद्रवार इक ठाठ ठए ।
जेठ सुदी बरसायत को,
पूरनमासी प्रगट भए ।।
याचा अर्थ असा की विक्रमसंवत १४५६ हे वर्ष उलटून गेल्यानंतर सोमवारी जेष्ठ पौर्णिमेला कबिरांचा जन्म झाला होता.अजूनही कबीरांचे अनुयायी याच तिथीला कबीरांचा जन्मोत्सव करतात. कबीरांच्या जन्माबद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत.त्यात एक ब्राह्मण विधवा व तिला रामानंदांनी दिलेला "पुत्रवती भव" हा आशिर्वाद.त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या संवादानंतर लक्ष्मी मातेने घेतलेली रामानंदांची परिक्षा व त्यानंतर कबीरांचे प्राकट्य,तसेच सुखदेव हे भगवान शिवाच्या आज्ञेने कैलासावरुन भूलोकी राहायला आले व शिंपल्यातुन अयोनीज असा जन्म घेतला.तसेच लहरतारा तलावातील कमळाच्या पानवर कबीरांचे ज्योतीरुपात प्राकट्य.एकदंतरी अनेक कथा कबीरदासांच्या जन्मा बद्दल सांगितल्या जातात त्यात एक गोष्ट समान आहे ती म्हणजे लहरतारा तलाव.त्यामुळे हे स्थान हे कबीरदासांचे प्राकट्याचे स्थान समजले जाते. पण त्यांच्या माता पिताबद्दल कसलाही उल्लेख नाही.निरु व निमा हे दोघे मुसलमान विणकर दाम्पत्य होते.यांनी या नवजात बालकाचे नाव "कबीर" असे ठेवले.कुराणात कबीर या नावाचा अर्थ होतो "महान परमात्मा". कबीरांचे बालपणही फारच चमत्कारिक असल्याचे सांगितले जाते.असे सांगितले जाते की कबीरांच्या शरीराची वाढ ही खाण्या-पिण्यावाचून होतं असे.हे पाहून त्यांच्या आई वडिलांना फार चिंता वाटू लागली.आपल्या आई वडिलांची चिंता बघून कबीरजी दूध प्यायला लागले.या दूधाचीही एक चमत्कारीक हकिकत सांगितली जाते.हे दूध मोठ्या आश्चर्यकारक पद्धतीने काढण्यात येत असे.एका न व्यालेल्या गायीच्या आचळाखाली मातीचे नवे भांडे ठेवण्यात येत असे.कबीरदास त्या कलवडीकडे दूधाच्या इच्छेने पाहत असत तोच ती दूध द्यायला सुरुवात करत असे.काठोकाठ दूधाने भरलेल्या या भंड्यातीलच दूध कबीरदास पित. कबीर जरी एका मुस्लिम जूलाहाच्या म्हणजे कोष्टी घरी वाढत होते तरी त्यांना राम,गोविंद आणि हरी इत्यादी ईश्वरांचीच नावे फार आवडत असत.तो काळ हा मुस्लिम राज्यशासकांचा होता.कट्टर मुस्लिम शासक हे इतर जनतेवर धार्मिक अत्याचार करित होते.अशातच मुसलमानाच्या घरी वाढणारे हे मुल राम नामाचा जप करत असे हे तत्कालीन मुस्लिम लोकांना अजिबात रुचले नाही.कबीरांना ते लोक काफीर म्हणत असत.पण कबीरदासजी त्या लोकांना उत्तर देताना म्हणत असत की , "जो दुसर्याच्या संपत्तीचे अपहरण करतो तो काफीर,जो दुसर्यांना फसवितो तो काफीर,जो निष्पाप जिवांची हत्या करतो तो काफीर!" कबीरदासांचे काही दोहे या त्यांच्या कटू अनुभवांचे दर्शन आपल्याला घडविते. कबीर हे रामाचे परमभक्त होते.पण तो राम हा दाशरथी राम नसून जो चराचरात व्याप्त असलेला ,आत्माराम होता. बालपणापासूनच कबीर हे रामनामाच्या अखंड स्मरणात तल्लीन होत असत.त्यांचे रामनामाचे अनुसंधान इतके अखंड होते की ते त्या स्मरणात आपले सुत कातण्याचे कामही विसरुन जायचे. कबीर हिंदू देवांचे भजन करतो म्हणून इकडे मुस्लिम समाज कबीरांवर राग धरुन होता तर उच्च वर्गीय अस्पृश्यता पाळणारा हिंदू वर्ग हा कबीर हिंदूंच्या कर्मकांड , मुर्ती पुजेला विरोध करतो म्हणून रागावलेला होता. पण कबीरांचा राम हा या सर्वांच्या ही पलिकडे हृदयात वसलेला आत्माराम होता हे यांना कोण सांगणार? कबीर या रोजच्या कटकटीला त्रासुन जात असत. कबीर त्यावेळीच्या काशीत राहणारे सुप्रसिद्ध वैष्णव संत आचार्य स्वामी रामानंद यांच्याकडे दिक्षा घेण्याचा विचार करत होते.पण एक वैष्णव संत एका जुलाहाच्या मुलाला दिक्षा तरी कशी देणार या विवंचनेत स्वतः रामानंद ही होते आणि कबीर ही.पण यावर कबीरांनीच एक युक्ती शोधून काढली.रोज भल्या पहाटे रामानंद महाराज आपल्या शिष्यांसमवेत गंगेवर स्नानाला जात असत.कबीरजी एका दिवशी भल्या पहाटे उठले आणि रामानंद ज्या मार्गावर घाटाच्या दिशेने जाणार त्यावर ठाण मांडून बसले.श्रीरामानंद स्वामी हे रामनाम घेत तेथून जात होते.त्यांच्या मुखातील राम नाव ऐकल्यावर हाच आपल्याला झालेला अनुग्रह मानुन कबीरजी त्यांचे दर्शन घेऊन घरी आले.घरी येऊन त्यांनी आपल्या गळ्यात तुळशीची माळ घातली ,कपाळी गंध लावले.पण दुसर्या दिवशी कबीर दासांनी आपल्याला रामानंदांचा अनुग्रह झाल्याचे लोकांना सांगितले तेव्हा सर्वत्र गडबड उडाली.ही अनुग्रहाची चर्चा रामानंदांपर्यंत जाऊन पोचली.खरा प्रकार काय हे जाणून घेण्यासाठी रामानंदांनी कबीरांना आपल्या आश्रमात बोलावून घेतले.कबीर त्यांच्याकडे आले तेव्हा रामानंद स्वामी हे मानसपुजेत दंग होते.त्यांच्या चारी बाजूनी पडदे सोडलेले होते.मानसपूजेत त्यांनी सर्व साहित्य घेतले पण काही तरी ते घेण्यास विसरले म्हणून त्यांना मानसपुजा करण्यास उशिर झाला.कबीर हा प्रकार बाहेरुन सर्व बघत होते. तेव्हा कबीरदासजी स्वामींना उद्देशून म्हणतात की , "स्वामीजी तुम्ही आत्मदेवला तुळशीपत्र तर वाहिलेच नाही." हे एकल्यावर स्वामी रामानंदांच्या खरंच आपण देवाला मानसपूजेत तूळशीपत्र वाहले नाही हे लक्षात आले .पण कबीर दासांचा हा अतिशय विलक्षण अधिकार बघून रामनंदांनीही कबीरांचा शिष्य म्हणून स्विकार केला.
कबीरांनी हिंदू व मुस्लिम या धर्मातील कर्मकांड व रुढींना कडाडून विरोध केला.कबीरदास हे आत्मनिष्ठ आणि आत्मसाक्षात्कारी महापुरुष होते यात शंका घेण्याचे काही कारण नाही. याचा प्रत्यय कबीरांना तर आला होताच पण त्याबरोबर त्यांच्या परिवाराला आला होता.प्रसंग असा की, कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी कबीरदास हे बाजारपेठेल कापडाचा तागा विकण्यासाठी आले.तेव्हा एक गरीब ब्राह्मण कबीरांजवळ आला व नम्रपणे आपल्याला शरीर झाकण्यासाठी तागा मागू लागला.कबीरदासांनी आपण आणलेल्या ताग्यातील अर्धा तागा त्या गरीब ब्राह्मणाला दिला.पण त्याचे या अर्ध्या ताग्यावर काम भागले नाही त्याने पूर्व तागा देण्याची कबीरांना विनंती केली.कबीरदासांना त्याची दया आली आणि त्यांनी तो पूर्ण तागा त्या गरिबाला दिला.पण घरी जातांना खाली हात जर गेलं तर घरच्यांना आता खायला तरी कसे मिळणार ? याच विवंचनेत कबीरदास होते.विवंचनेत कबीर बाजारातच एका ठिकाणी बसून राहिले.ते तिनं दिवस एका ठिकाणी लपून बसले.पण इकडे एक चमत्कार झाला.खाण्यापिण्याच्या सर्व वस्तू एका बैलावर लादून एक माणूस कबीराच्या घरी आला आणि त्याने मोठ्या आग्रहाने ते सारे खाद्य कबीराच्या घरी ठेऊन निघून गेला.ही घटना सर्व गावात पसरली तेव्हा काही लोक कबीरांचा शोध घेत बाजारात कबीर लपले होते तिथे जाऊन पोचले.त्यांनी कबीरदासांना झालेली सर्व हकिकत सांगितली.ती ऐकल्यावर भगवंतांच्या कृपाळू,परम दयाळू आणि करुणाघन लिलेचा अनुभव घेऊन कबीरदास कृतकृत्य झाले.त्यांनी गावातील सर्व संत मंडळींना बोलावणे धाडले.एक मोठा संत भोजनाचा कार्यक्रम केला व सर्व अन्न संत आणि गोरं गरीबांमध्ये वाटून टाकले. पण या चमत्काराचा असा परिणाम झाला की आता कबीरदास दिवस रात्र हरी चिंतनात रंगून गेले.त्यांनी आपले ताग काम सोडून दिले व ते चोवीस तास रामनामाचा जप करु लागले. या चमत्कारामुळे काशीतील सर्व ब्राह्मण मंडळी कबीरांचा अत्यांतिक द्वेष करु लागले.अतिशय जळू लागले.द्वेषांने पेटलेले सर्व ब्राह्मण एकत्र जमले व कबीराची फजिती करण्यासाठी सज्ज झाले. आम्हाला विचारल्याशिवाय कबीराने गावातील शूद्रांना खायला-प्यायला घातले म्हणून त्याला त्यांनी गावातून निघून जाण्याची आज्ञा केली.जर गावातून जायचे नसेल तर सर्वांना पुरेल इतका शिधा देऊन संतुष्ट करण्याची अट कबीरांपुढे घातली.कबीर आता मोठ्या संकटात सापडले.घरात एक कणही शिल्लक नव्हता.मग कबीरांनी सर्वांना शिधा देण्याचे कबूल केले व ते बाजारात गेले. पण काही वेळातच एक चमत्कार अजुन घडला.एक अपरिचीत माणूस अनेक मजुरांच्या डोक्यावर पीठ,तांदूळ,गूळ,साखर असे विविध जिन्नस लादून कबीराच्या घरी आला.तो शिधा त्या माणसाने सर्व ब्राह्मण मंडळींना अर्पन केला.या माणसाचे नाव काही ठिकाणी केशव वंजारी असे दिलेले आहे.या केशव वंजारी ने सर्व ब्राह्माणांना प्रत्येकी अडीच शेर शिधा दिला व वर पानाचा एक विडा देऊन त्यांचा निरोप घेतला.अशा प्रकारे ब्राह्मणांचा राग संपला आणि सर्व जन "धन्य ,धन्य" करत आपल्या घरी गेले.या प्रसंगानंतर कबीरजींची किर्ती चहूकडे पसरली.अशा प्रकारचे अनेकाविध चमत्कार कबीरदासांच्या दिव्य चरित्रात आले आहेत.पण यामुळे कबीरदासांच्या भोवती लोकांची गर्दी दिवसागणिक वाढत होती.
या सर्वामुळे त्यांच्या ईश्वर भजनात व्यत्यय येत होता.हे टाळण्यासाठी कबीरदासांनी एक युक्ती केली.एका वेश्येला घेऊन ते बाजारपेठेतून निघाले.त्यांनी तिच्या खांद्यावर हात टाकलेला होता.तिच्या खांद्यावर हात टाकून,हातात भगवंतांच्या चरणांचे तिर्थ मद्य दाखवून पित ते भर गर्दीच्या ठिकाणातून, बाजारपेठेतून जाऊ लागले.यातून त्यांचा हेतू अगदी निराळाच होता.लोकांनी आता आपला तिरस्कार करावा,आपण ज्ञान व ध्यान भ्रष्ट झालो आहोत असे लोकांना वाटवे म्हणून त्यांनी हे सोंग रचले होते आणि याचा परिणाम ही तसाच झाला.यामुळे गावात एकच खळबळ उडाली.लोक कबीरदासांची चेष्टा उडवू लागले. कबीरांना काशीच्या राजेसाहेबांनी अशा अवस्थेत पाहिले. खरेतर राजेसाहेब हे कबीरांना आपल्या राजसभेत प्रवेश देत असत पण आता हे बघून त्यांनी तो सपशेल नाकारला.कबीरदासांसारख्या भक्तश्रेष्ठाचे अंध:पतन कसे काय झाले याचे सर्वांनाच आश्चर्य वाटू लागले.पण यावेळी एक भलताच विलक्षण चमत्कार घडला.राजसभेच्या बाहेर बसलेल्या कबीरजींनी आपल्या कमंडलूतील थोड्याशा पाण्याचा शिडकावा केला.राजाला हे काहीतरी विशेष वाटले त्यामूळे त्यांनी अशी कृती करण्याचे कारण कबीरांना विचारले.त्यावेळी कबीरदास म्हणाले, "मी सांगतो आहे त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही पण खरे सांगायचे तर जगन्नाथाच्या ओरिसामधील मंदिरात एका पुजार्याला थोडेसे भाजले होते.त्याचे रक्षण करावे म्हणून मी या तीर्थाचा शिडकावा केला आहे." राजाने ती वेळ नोंदवून ठेवली व आपला एक माणूस ओरिसात पाठविला.कबीरदास आपल्या घरी परतले.तो माणूस जगन्नाथ पुरीला दहा दिवसांनी पोचला.त्याने तेथे चौकशी केली तेव्हा त्याला समजले की खरोखरच भाताचे भांडे उतरवतांना त्यातील पेज काढून टाकतांना एका पुजार्याचा हात खरोखर भाजला होता. त्या पुजार्याने सांगितले की , "कबीरदासाने तीर्थ जल शिंपडून माझ्या भाजण्याच्या वेदना कमी केल्या व त्या संकटातून मला सोडविले." राजदूताने त्यांना , "आपण कुठल्या कबीरदासाबद्दल बोलताय "असे विचारले तेव्हा पुजार्याने सांगितले की, "हे कबीरदास जातीने विणकर आहेत.त्यांचे काशी येथे वास्तव्य असते.ही त्यांचीच कृपा.ते रोज येथे जगन्नाथपुरीला देवांच्या दर्शनास येत असतात." राजदूत परतला व त्याने ही हकिकत राजाला सांगितली.राजा हे ऐकून थक्क झाला व त्याला आपल्या वागण्याचे फारच दु:ख झाले.राजाला आपल्या चुकीच्या वागण्याचा फार पश्चात्ताप झाला होता.पण कबीरदासांची क्षमा मागायची तरी कशी या विवंचनेत तो सापडला.कारण कबीरदास हे कुठलिही भेटवस्तू स्विकारत नसत.शेवटी त्याकाळी क्षमा मागायची एक विशेष पद्धत होती.डोक्यावर लाकडाची मुळी घ्यायची व गळ्यात कुर्हाड अडकवून जायचे.याच पद्धतीने राजा संपूर्ण कुटुंबासह कबीरांकडे गेला.राजा कबीराकडे पोचताच कबीरांनी धावत येऊन त्यांची मोळी उतरविली व त्यांना मोठ्या सन्मानाने बसायला आसन दिले.पुढे राजाने कबीरांना क्षमा मागितली आणि कबीरांना ते शरणं गेले.अशाच प्रकारे कबीरांनी सुलतान सिकंदर शाह लोदी याच्या अंगाला सुटलेला दाह नुसत्या एका दृष्टिक्षेपात नष्ट केला होता.
कबिरदासांचा आपल्या सद्गुरुंनी दिलेल्या अनुग्रहाच्या रामनामावर इतका दृढ आणि अढळ विश्वास होता की त्याखेरीस ते इतर कुठल्याही साधन वा मार्गाचा विचार देखील करत नसत.अनंतदासाने त्यांचे परचई नामक चरित्र लिहीले आहे त्यात कबीरांच्या या अढळ निष्ठा आणि विश्वासाला प्रगट करणारा अतिशय सुंदर आणि चिंतनीय प्रसंग आला आहे.तो येथे देणे मला अतिशय गरजेचे वाटतं कारण सद्गुरु चरणांवर आणि त्यांनी दिलेल्या साधनेवर जर विश्वास असला तर जगातील कुठलीही शक्ती तुम्हाला आपल्या साधनापथावरुन हलवू शकत नाही हे दिसून येते.तो प्रसंग असा की, "सिकंदर लोदी जेव्हा काशीत आला त्यावेळी काशीतील काझी,मुल्ला,ब्राह्मण पंडित व व्यापारी हे त्याला भेटायला गेले व सर्वजन एकमुखाने कबीरदासांची तक्रार बादशाह कडे करु लागले.ते म्हटले ,"एका कोष्ट्याने येथे मोठा दंगा माजवला आहे.त्याने मुसलमान धर्माचे सारे रीतिरीवाज मोडलेत आणि हिंदूंच्या धर्माची ,आस्थेचीही तो निंदानालस्ती करतो आहे.तो वेद आणि तीर्थांची टिंगल करतो.तो शालिग्राम ,एकादशी अशा हिंदूंच्या परम श्रद्धा स्थानांची, पुजा ,आराधना करणार्यांची टिंगल करतोय.हिंदू आणि मुसलमान या दोघांना न मानता स्वतःचे वेगळेच अवडंबर त्याने माजवले आहे.त्यामुळे आपण त्याला दंड करावा.आपण त्याचे हे धंदे बंद करुन त्याला शासन करावे." या सर्व तक्रारी ऐकून बादशहाने ताबडतोब दोन लाठीधारी सैनीक पाठवून कबीरांना आपल्यापुढे उभे केले.तिथे उभे झाल्यावर दरबारातील काझीने कबीरांना बादशाह पुढे सलाम करण्यास सांगितले.तसेच तो म्हणाला , "का रे कोष्ट्या ,तू आपला धर्म सोडून वाकड्या मार्गाने का चालला आहेस?" यावर कबीरदास शांतपणे म्हणाले , "मला हिंदू आणि मुसलमान यांच्याशी काहीही कर्तव्य नाही.मला माझ्या गुरुंचा आशीर्वाद आहे.त्यांनी सांगितल्यानुसार मी रामाची भक्ती करतो व सदा रामाचेच गुणगान करतो.माझा विश्वास रामावर आहे त्यामुळे राजा आणि रंक किंवा बादशाहाला मी घाबरत नाही." कबीरांचे निडर वाक्य ऐकून काझीने तात्काळ हा काफीर इस्लामची निंदा करणारा आहे असा न्याय दिला."याची जपमाळ काढून घ्यावी,याचे गंध पुसून टाका आणि याला दगडांनी मारहान करावी." अशी शिक्षा दिली.कबीर तरीही न घाबरता शांतचित्ताने तिथेच उभे होते.हे बघून बादशाह खवळला आणि सिंहाप्रमाणे चवताळून त्याने हुकूम दिला की , "या कबीराचे हातपाय साखळीने बांधा आणि त्याला गंगेत टाकून जलसमाधी द्या." बादशाहाच्या सैनिकांनी त्याची अंमलबजावणी केली.कबीरदासांच्या मुखात अखंड आपल्या आराध्य रामाचे नामस्मरण सुरु होते.बघता बघता चमत्कार घडला.साखळ्या तुटून गेल्या आणि कबीरदास एखाद्या आसनावर बसल्या प्रमाणे गंगेच्या पवित्र पाण्यावर तरंगू लागले.जेव्हा कबीरदास बुडाले नाही तेव्हा अहंकार आणि क्रोधाने लिप्त बादशाहने त्यांना हातपाय बांधून एका झोपडीत कोंडण्याची व त्या झोपडीला आग लावण्याची आज्ञा केली.पण या ही प्रसंगात सर्व झोपडी जळून खाक झाली आणि कबीरदासांच्या केसालाही धक्का लागला नाही. शेवटी कबीरदासांना एका पिसाळलेल्या हत्तीच्या पायाखाली देण्यात आले.पण कबीरदासांना बघता क्षणीच तो हत्ती शांत झाला व तेथून निघून गेला.त्यानंत मात्र बादशाह आणि काझी ने कबीरदासांची क्षमा मागितली व ते त्यांना शरण आले.काही ग्रंथात कबीरदासांची ५२ वेळा परीक्षा झाल्याचा ही उल्लेख आहे.पण या तिन परिक्षा तर प्रत्येक ग्रंथात उल्लेखलेल्या आहेतच. या प्रसंगातुन कबीरांची नामावरील अढळ श्रद्धा आणि गुरुचरणांवर अखंड श्रद्धा दिसते.
अशा प्रकारच्या अनेक लिला ,दंतकथा कबीरदासांच्या चरित्रात विखुरलेल्या आहेत.प्रत्येक लिला इथे देता येणारच नाही.कबीरांच्या चरित्रा संदर्भात बरेच वाद विवाद आणि संभ्रम ही आहेत तरी शक्य तितकी जी माहिती प्रचलित व समकालीन चरित्राला धरुन आहे तीच लेखात घेण्याचा मी प्रयत्न केला आहे.असो पुढे आपला निर्वाणकाल जवळ आल्याचे जाणून कबीरदासजी काशी सोडून मगहर या गावी आले.हे गाव म्हणजे प्रजापती दक्षानी जिथे भगवान शिवांना न बोलाविता यज्ञ करण्याचे योजले होते ते स्थळ.पुढे सतीचा देह त्याग आणि दक्षाला दंड ही कथा आपल्या सर्वांना माहिती आहेच.हे स्थळ शापित आहे असे मानले जायचे व विरभद्राच्या शापामुळे येथील नदीही आटल्याची कथा सांगितली जात असे.पण कबीरांनी काशी सोडून मुद्दाम मगहर ला देह ठेवण्याकरीता आले हे विशेष आहे आणि या मागे त्यांची मोठी शिकवण आहे.जणू काही या शापीत भूमीला पुन्हा नव्याने पवित्र करण्यासाठी कबीरांनी या स्थळाची निवड केली असावी.कबीरदास जेव्हा मगहर ला आले तेव्हा काशीचे राजा ,बादशाह अनेक भक्त सर्वच त्यांच्या सोबत तिथे आले.त्यावेळी नबाब बिजलीखान पठाण याने सर्व लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. या वेळी मगहर येथे पाण्याचे दुर्भिक्ष होते .कारण येथील नदी आटलेली होती.तेव्हा कबीरांनी आपल्या दिव्य शक्तीने येथील नदीत पुन्हा पाण्याचा प्रवाह निर्माण केला आणि त्या नदीचे नाव आमी असे ठेवले. यानंतर कबीरदासांनी तेथे जमलेल्या लोकांना अंतिम उपदेश केला.नंतर कबीरदासांनी जवळच असलेल्या एका संतांच्या झोपडीत प्रवेश केला व दार बंद केले.थोड्या वेळात एक मोठा स्फोट झाल्याचा आवाज लोकांना ऐकू आला आणि एक दिव्य ज्योती त्या झोपडीतून निघून आकाशाच्या दिशेने गेली.कबीरदासांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला याची लोकांना खात्री झाली.परंतु यानंतर देखील एक वाद निर्माण झाला.काशीचा राजा वीरसिंहदेव आणि अन्य सर्व हिंदू भक्त म्हणायला लागले की कबीरदास हे हिंदूंचे गुरु आहेत.त्यामुळे त्यांचा अंतिम संस्कार हिंदूंच्याच रीतिरीवाजाप्रमाणे केला पाहिजे.म्हणजेच शरीरास अग्नी दिला पाहिजे.याउलट मुस्लिमांनी ते मुस्लिम लोकांचे पीर आहेत म्हणून त्यांचा अंतिम संस्कार हे मुस्लिम पद्धतीने व्हायला हवे असे म्हणू लागले.हा वाद विकोपाला गेला.इतका की हिंदू व मुस्लिम तलवारी उपसून लढायला सज्ज झाले.परंतु तत्क्षणी आकाशवाणी झाली , "तुम्ही मंडळी अकारण भांडत आहात.तुम्ही झोपडीत जा आणि कबिरांना बघा." हे ऐकून लोकांनी त्या झोपडीचा दरवाजा उघडला व आत गेले.बघतात तर काय तेथे कबीरदासांचे मृत शरीर नव्हते.त्याऐवजी तेथे गुलाब फुलांची रास व चादर पडली होती.त्यामुळे लोकांची खात्री पटली की कबीरदासांना सदेह मुक्ती मिळाली आहे.तेथील हिंदू व मुस्लिम भक्तांनी ती फुले व चादर घेऊनच आपल्या आपल्या रीतिप्रमाणे ती फुले व चादर घेऊनच अंतिम संस्कार केला. अशा प्रकारे जगाला परमार्थाची नवी दृष्टी देऊन कबीर नावाचे हे एक दिव्यत्व निर्गुणात स्थिरावले.आज इतका प्रचंड काळ लोटला तरी कबीर आपल्या सर्वांच्या जिवनाचा एक मोठा भाग होऊन राहिले आहेत.कबीरांचे दोहे ,रचना आजही आपल्याला मार्ग दाखवित आहेत.माझं तर व्यक्तीगत मत आहे की मानव म्हणून जो ही जन्माला आला आहे त्याने कबीरदासजी आणि तुकोबा एकदा तरी वाचायलाच हवे.कारण अंतर्बाह्य हलवून टाकणारे हे विचार आहेत.बंदिस्थ दृष्टीला एक बहुआयामी दृष्टी देणारे हे संत आहेत.खरंतर या संत चरित्रातील लेख मालेत मी फक्त संतांच्या चरित्रावरच लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे.मला सध्या तरी संत चरित्रातील तत्वज्ञान मांडायचे नाही.त्या संदर्भात मी वेगळी लेखमाला लिहायचा प्रयत्न करेन व सद्गुरु माउलींच्या कृपा करुणेने त्यांनी ती लिहून घ्यावी हीच प्रार्थना मी करतो.तरीही आपण सर्वांनी कबीरदासजी वाचाच ,कारण कबीर एक ज्वलंत विचार आहेत,कबीर एक मार्ग आहे, कबीर एक शोध आहे मानवतेचा,जिवनाचा आणि ज्ञानाचा. कबीरदासांच्या चरणी मी ही शब्दसुमनांजली अर्पण करतो आणि शिरसाष्टांग दंडवत प्रणाम करुन इथेच थांबतो.
✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️
#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🌿
#ज्ञानेश्वर_माउली_समर्थ🙏🌸🌿


Good
ReplyDelete