प्रणम्या_मातृदेवता :- माळ २
🌸🙏गौर कृष्ण की दासी मीरा 🙏🌸
आज अश्विन शुद्ध द्वितीया आपल्या "प्रणम्या मातृदेवता" या लेखमालेची द्वितीय शब्द सुमनांची माळ.ही शब्द सुमनांची माळ आपण भक्तीचे सगुण मुर्तिमंत रुप , गोपीका अवतार असलेल्या संतश्रेष्ठ श्री मीराबाई यांच्या लिला चरित्राने गुंफणार आहोत.महाराष्ट्रात ज्याप्रमाणे स्त्री संतांचे स्मरण केल्यावर सर्वप्रथम आदिशक्ती मुक्ताईंचे स्मरण होते तसे हिंदुस्तानातील स्त्री संतांच्या चरित्राचा विचार केला तर आपल्या डोळ्यापुढे उभी राहते ती कृष्णप्रेमात बेभान झालेली संतश्रेष्ठ मीराबाईंची परम सात्विक मूर्ती.सर्व जगात ज्यांच्या नावाचा डंका केली पाचशे वर्ष झाले अविरत गाजतो आहे अशा मीराबाईंचे अलौकिक आणि दिव्य चरित्र इतके विशाल आहे की बुद्धी स्तिमीत होते.मीराबाई या क्रांतिकारी संत होत्या. तत्कालिन समाजव्यवस्थेला झुगारुन एका राजघराण्यातील स्त्री आपल्या सर्व सुखाचा,राजवैभवाचा त्याग करुन आपल्या आराध्य असलेल्या भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभुंना शरणं जातात व एका साध्वीचे त्यागमय जिवन व्यतित करतात.या जिवनात त्यांना अनंत महाकठीण परिक्षेला सामोरे जावे लागले. पण आपल्या शुद्ध भक्तीच्या बळावर त्या या सर्व दिव्यातून लिलया पार झाल्या.त्यांनी भारतभर भ्रमण करुन कृष्ण प्रेमाचा ,भक्तीचा प्रचार केला.आपल्या सुंदर व रसाळ रचनेतून त्यांनी फक्त आणि फक्त विशुद्ध भक्तीचेच प्रतिपादन केले.संतश्रेष्ठ मिराबाईंचे चरित्र इतके विलक्षण आहे की आजही ते प्रत्येक साधकाला परमार्थ मार्गावर चालण्याचे पाथेय झाले आहे.आजच्या द्वितीय माळेला आपण मिराबाईंच्या अतिशय सुंदर व अलौकिक चरित्राचे स्मरण चिंतन करुयात व आपल्या या नवरात्रीच्या आगळ्या वेगळ्या स्त्री संत चरित्राच्या स्मरण उत्सवाला साजरा करुयात.
अशी मान्यता आहे की मीराबाई या द्वापर युगातील एक गोपी होत्या.त्यांनी आपल्या काही पदांमध्ये याचा उल्लेख ही केला आहे.एका ठिकाणी त्या म्हणतात,
सतयुग में सोती रही त्रेता लियो जगाय ।
द्वापर में जाण्यो नहीं अब कलियुग पहुंच्यो आय ।।
मीराबाई या अभंगात म्हणतात की सतयुगात माझी चेतना प्रसुप्त होती,पण त्रेतायुगात भगवंतांनी मला जागे केले.यातुन संकेत मिळतात की मीराबाई या रामावतारात ही हजर होत्या.पुढे त्या म्हणतात की मला द्वापारात जन्म मिळाला पण मी भगवंतांना प्राप्त करु शकले नाही तर आता कलियुगात जन्मास आले आहे.मीराबाईंच्या गोपी अवताराबद्दल एक विशेष आख्यायिका उत्तरेत फार प्रचलित आहे ती अशी की, नन्द गावातील एक गोप बालकाचा विवाह बरसाना गावातील एका गोपीका बरोबर झाला.लग्न झाल्यावर ती गोपीका ज्यावेळी सासरी नन्द गावात जाण्यास निघाली त्यावेळी रस्त्यातच प्रेम सरोवराजवळ भगवान गोपालकृष्ण गाई चारत झाडाखाली उभे होते.आपल्या गोप सख्याला बघून देवांनी त्याला प्रेमाने म्हटले, "तू आपल्या पत्नीला माझा चेहेरा नाही का दाखविणार?" त्यावर गोप म्हणाला, "ती तर तुझी वहिनी आहे,तू स्वतःच रथावर चढ आणि आपल्या वहिनीचा चेहेरा बघ.तू तर माझा प्राणसखा आहेस." पण गम्मत अशी की या बरसानातील गोपीकाला तिच्या आईने आधीच सांगितले होते की ,"नन्द गावात नन्दराजांचा एक लाल म्हणजे मुलगा आहे.ज्याला लोक कन्हैया, श्यामसुंदर म्हणून ओळखतात.तो अतिशय खट्याळ आहे. तु त्याचा चेहेरा बघू नको आणि आपला ही चेहेरा त्याला दाखवू नकोस.त्याच्याकडे अशी काही जादू आहे की त्याला बघणारा व्यक्ती त्याच्या प्रेमात पडतो आणि वेडाच होतो." आपल्या आईचा सल्ला त्या भोळ्या गोपीने अगदी मनापासून ऐकला.श्रीबालकृष्ण ज्यावेळी रथावर चढले व तिचा चेहेरा पाहण्याचा प्रयत्न करु लागले तेव्हा तिने आपला चेहेरा पदराने घट्ट झाकून घेतला.खुप प्रयत्न करुनही देवांना तिने चेहेरा दाखविला नाही.शेवटी देव तिचा चेहेरा न बघताच निघून गेले.निघतांनी देव तिला म्हणाले, "आज तु मला तुझा चेहेरा दाखविला नाही पण लक्षात ठेव एक दिवस असा येईल की तु माझा चेहेरा बघण्यास तरसशील." काही दिवसांनी गोवर्धन लिला घडली.ज्यावेळी देवांनी गोवर्धन आपल्या करंगळीवर धारण केला त्यावेळी सर्व गावच त्याखाली आश्रयाला आले होते.ही गोपीका पण आपल्या पतीबरोबर तिथे उपस्थित होती.त्यावेळी सर्व लोक देवांच्या त्या अनाकलनीय लिलेकडे व रुपाकडे एकटक आश्चर्यचकित होऊन बघू लागले.त्यावेळी त्या गोपीकेनेही देवांचे ते श्यामसुंदर,गोवर्धनधारी अलौकिक रुप बघितले.ती देवांना बघून इतकी व्याकुळ झाली की तिला आपल्या हृदयात उचंबळलेल्या तिव्र आनंदाच्या भावना असह्य झाल्या व तिला तात्काळ भोवळ आली.लोकांनी तिला सावध केले त्यानंतर ज्यावेळी तिला शुद्ध आली तेव्हा तिने आपल्या नशिबाला दोष द्यायला सुरुवात केली.ती म्हणू लागली की , "माझ्या आईने माझ्याशी कुठल्या जन्माचे वैर काढले कुणास ठाऊक की आजवर व्रजगावात राहूनही मी या श्यामसुंदर कृष्णाचे हे दिव्य मनोहारी रुप बघू शकले नाही.माझा आजवरचा काळ व्यर्थ गेला." असे म्हणत ती रडु लागली,विलाप करु लागली.तीची ही व्याकुळ अवस्था बघून श्रीदेवांना तिच्यावर करुणा दया आली.त्यानंतर देव तिला म्हणाले, "तु माझा या देहाने तिरस्कार केला आहे त्यामुळे या जन्मात तुला माझी प्राप्ती होणार नाही परंतु पुढील कलियुगात तुझा गोपी-प्रेमाचे प्राकट्य करण्याकरिता जन्म होणार आहे त्यावेळी तु मला जरुर प्राप्ती करु शकशील आणि मी सदैव तुझ्या बरोबर असेन." मग हीच व्रजगावातील गोपी पुढे मीराबाईंच्या रुपात अवतरली होती.या अवतारात ही गोपीका परमभक्त अशा मीराबाई झाल्या.त्यांनी या जन्मात उच्च कुळ मानल्या गेलेल्या राजपूत घरात जन्म घेतला होता व राणा वंशात लग्न झाल्या नंतर ही लोकलज्जा,कुळाची मर्यादा या सर्वांचा त्याग केला होता.मीराबाईंच्या आपल्या सर्व पदात याची छाप दिसून येते.त्यांनी आपल्या पदात "मीरा के प्रभू गिरधर नागर" असे नामाभिधान वापरले आहे त्याचे कारण ही तेच की ज्यांनी आपल्या करंगळीवर गीरीराज गोवर्धन धारण केला आहे अशा गीरधरांनी मला हे वरदान दिले आहे व त्यांचीच प्रतिमा माझ्या हृदयात विराजमान झालेली आहे.तेच माझे आराध्य माझे प्रभू आहेत.
मीरा सुधा सिंधू या राजस्थान सरकारने प्रसिद्ध केलेल्या चरित्र व पद संग्रहाच्या ग्रंथात या कथेचा उल्लेख आला आहे.
मीराबाईंचा जन्म राठौडांच्या मेडतिया शाखाचे प्रवर्तक राव दूदाजी चे द्वितीय पुत्र राणा रतनसिंह व त्यांची पत्नी कुसुम कुंवरी यांच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीया म्हणजे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सन १५५५ रोजी जोधपूर जिल्ह्यातील मेडता या गावी झाला.मीराबाईंना आपल्या आजोबांकडून म्हणजे दूदाजी यांच्याकडून बालपणीच प्रेमभक्तीचे धडे मिळाले होते.त्या पाच वर्षांच्या होत्या त्यावेळी पुष्कर यात्रेला जाणार्या संतांची एक टोळी मेडता या गावी आली.( मीरा सुधा सिंधू मध्ये हे स्थान डाकोर सांगितले आहे.) त्यावेळी त्या संतांसमवेत त्यांच्या पुजेची परमप्रिय कृष्ण मूर्ती होती.ज्यावेळी मीरा त्यांची पुजा बघायची त्यावेळी त्यांचे शरीर पुलकांकित होऊन त्यांना समाधी लागत असे.ते संत गावांतून जायला निघाल्यावर बाल मीरा व्याकुळ झाली तिने तो गोपालकृष्ण त्यांच्याकडे मागितला पण संतांनी हा बाल सुलभ हट्ट म्हणून त्याला नकार दिला.मीराबाई रात्रभर रडत राहिली,तिचे डोळे रडून सुजुन गेले.त्याच रात्री भगवान श्रीकृष्ण त्या संतांच्या स्वप्नात गेले व त्यांना म्हणाले, "बाबा आता तुम्ही उशीर करु नका व मला लवकरात लवकर मीरे जवळ पोचवा.तिच्या पर्यंत पोचण्यासाठीच मी तुमच्याजवळ येऊन राहिलो होतो." सकाळ होताच ते संत ती मुर्ती घेऊन मीरे जवळ येतात व तिला ती कृष्ण मुर्ती देऊन त्यांची सेवा करण्याची आज्ञा देतात.पुढे बाल मीरा दिवस रात्र त्या गोपाल कृष्णाची अविरत अखंड सेवेत रममाण होऊ लागली. (त्यांची ही कृष्ण मुर्ती आजही उदयपूर मधील पीताम्बरराय मंदीरात विराजमान झालेली बघायला मिळते.) श्याम कुंज या राजवाड्यात अनेक साधू संत दूदा यांना भेटावयास वरचेवर येत असत.एकदा असाच सत्संग सुरु असतांना मीरे ने ऐकले की सद्गुरु शिवाय भगवंतांची प्राप्ती होत नाही.तेव्हा त्यांनी याबाबत आपल्या आजोबांना विचारले आजोबा दूदा यांनी सांगितले की तु याबद्दल तुझ्या गोपालकृष्णांना प्रार्थना कर.ते तुझ्या साठी अवश्य तुझ्या गुरुंना इथे बोलावतील.मीरा अत्यंत व्याकुळ अंत:करणाने भगवंतांना आळवू लागल्या.देवांनी ही मीरेची हाक ऐकली व गुरुपौर्णिमेला संत श्रेष्ठ श्री रवीदास जी पुष्कर यात्रेला जाण्याचे निमित्त करुन मीरेकडे आले.मीराबाईंनी आपल्या गुरुंना व रवीदासांनी आपल्या प्रिय शिष्येला तात्काळ ओळखले.रवीदासांनी मीराबाईंना अनुग्रह देऊन कृतार्थ केले. एकदा मेडत्यात एक वरात आली.ती वरात बघायला बाल मीरा घराबाहेर आली.तीने घोड्यावर बसलेला माणूस बघितला आणि आईला विचारले हा कोण आहे? आईने तो नवरदेव असल्याचे सांगितले.मग आपला नवरदेव कुठे ? असे मीराबाईंनी आईला विचारले.आईने गम्मत म्हणून तुझा गोपालकृष्णच तुझा नवरदेव असल्याचे सांगितले.पण मीराबाईंनी ही खुणगाठ हृदयाशी पक्की बांधली व त्या देवांची पतीभावातच पुजा करु लागल्या.हा भाव बाल्यकाळापासूनच वृद्धींगत होत गेला.मीराबाईंना बालपणीच भगवत कृपेचा अनुभव आला होता व याचे वर्णन त्यांनी आपल्या अभंगात केलेले दिसून येते. मीराबाईंच्या आत्या या चितौड येथील होत्या.त्यांचा पुतण्या भोजराज यांचा विवाह मीरेसोबत व्हावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती.ही गोष्ट मीराबाईला कळल्यावर त्यांना ती आवडली नाही.त्यांनी याबाबत आईला विचारले व "आपले पती तर श्रीकृष्ण प्रभू आहेत.मग आता वेगळा विवाह कसा?" अशी शंका विचारली.तेव्हा आईने म्हटले की असेच गम्मत म्हणून म्हटले होते.लोकव्यवहार म्हणून लग्न तर करावेच लागेल.जर तु या स्थळाला नकार दिला तर चितौड सारखे बलवान राज्याशी वितुष्ठ होईल व ते लोक मेडता गावाचे अस्तित्वच संपुष्टात आणतील.त्यामुळे तुला विवाहाचा प्रस्ताव मान्य करावाच लागेल. पुढे आपल्या काकु ला घेण्याकरीता भोजराज मेडता गावी आले.त्यावेळी त्यांनी मीराबाईंचे सुमधुर भजन ऐकले व त्यांच्या दर्शनाने व भाव समाधीने आश्चर्यचकित झाले.ही जर कन्या आपल्या कुळात विवाह करुन आली तर आपल्या संपूर्ण कुळाचा ही उद्धार करेल.असा विचार त्यांच्या मनात आला.पण मीराबाईंना कुणाशीही विवाह करायचा नाही असे त्यांना कळले तेव्हा मीराबाईंना ते म्हणाले , "तुम्ही जर विवाह करुन आमच्या कुळात याल तर मी तुमच्या भक्तीला पुरक अशीच सर्व व्यवस्था ठेवेल व तुम्हाला स्पर्श सुद्धा करणार नाही." मुळातच भोजराज हे भाविक गृहस्थ होते आणि मीराबाईंच्या अलौकिक भक्तीने ते खुपच प्रभावीत झाले होते. त्यांनी मीराबाईंना वचन दिले की मी फक्त आपल्या सानिध्यात राहून कृष्ण प्रेम प्राप्त करेल.आपल्याकडून मला कसलीही संसारीक अभिलाषा नाही.मी आजिवन पुज्य भावाने आपले सानिध्य आणि दर्शन करेल.भोजराजांनी आपले हे शब्द तंतोतंत शेवटपर्यंत पाळले.त्याकाळी कुठलाही पुरुष तेही राजपूत पुरुष हे करणे अशक्यप्राय होते.यावरुन त्यांच्या पारमार्थिक अधिकाराची जाणिव झाल्याशिवाय राहत नाही.भोराजांनी आपल्या वैवाहिक जीवनाचा मीराबाईंच्या भक्तीप्रेमावर पूर्ण त्याग केला. भोजराजांचे हे वचन ऐकून मीराबाई आश्वस्थ झाल्या.भोजराज तेथून गेल्यावर त्या एकतारी घेऊन श्रीकृष्ण प्रभुं पुढे बसल्या.तेव्हा त्या भावसमाधीत गेल्या व त्यांना देवांचा आदेश मिळाला की, "तु काळजी करु नकोस.मीच तुझ्या पुढे लग्न वेदीवर उभा असेल.फेरे घेतानाही मीच तुझ्या पुढे असेन." विशेष म्हणजे आदल्या दिवशी देवांची वाट बघत मीराबाईंना झोप लागली.झोपेत त्यांना स्वप्न दिसले की श्रीकृष्ण प्रभु आपल्या गोप सख्यांची वरात घेऊन स्वतः घोड्यावर बसून लग्नास आले.सर्वांसमक्ष त्यांनी मीराबाईंशी विवाह केला,फेरे झाले.सर्व विधी यथासांग पार पडले.इकडे मीरांना अचानक जाग आली तो बघता तर हातावर सुंदर मेहेंदी,अंगाला हळद लागलेली,भांगेत कुंकू,गळ्यात नन्द बाबांनी दिलेले आभुषण हे सर्व प्रत्यक्षात दिसतं होते.दुसर्या दिवशी सन १५७२ ला त्यांचा विवाह युवराज भोजराजांशी मोठ्या धुमधामीत पार पडला.
लग्न झाल्यावर त्या जेव्हा सासरी आल्या तेव्हा पतीच्या दिर्घायुष्यासाठी सासुने त्यांना देवी पुजा करण्यास सांगितले.पण आपण तर आधीच आपले मस्तक कृष्ण चरणी वाहिले असल्याने तसे करण्यास त्यांनी नकार दिला.याचा महाराणीला खुप राग आला व त्यांनी ही हकिकत राणा सांगा यांना सांगितली.मीराबाईंच्या या वागण्याचा राजालाही खुप राग आला.त्यामुळे या दोघांनीही मीराबाईला धडा शिकविण्याचे ठरविले.त्यांनी मीराबाईंच्या भक्तीचे कारण सांगून त्यांना एक सुमसान ,उजाड व भुतं प्रेतांचा वास असलेला राजवाडा राहण्यास दिला.तेथे अनेक प्रेत, पिशाच्च वस्तीस होते.
राजवाडा साफ झाल्यावर मीराबाई आपल्या श्रीकृष्ण प्रभुंना घेऊन राजवाड्यात गेल्या.तेथे त्यांनी देवांची पुजा केली व त्यांच्या स्नानाचे जल हे शंखातून सर्व जागी शिंपडले.ते शिंपडल्यावर तेथील सर्व पिशाच्च व प्रेतांना तात्काळ मुक्ती मिळाली व ते सर्व मीराबाईंचा जयजयकार करत मुक्त झाले.मीराबाईंना तो महाल अतिशय आवडला व आता त्या तेथील एकांतात भजन,पुजन व सत्संग करीत रममाण झाल्या होत्या.पुढे त्यांचे पती भोजराज ही त्यांचा सत्संग ,भजन ऐकण्यासाठी त्या महालात येऊ लागले.ते इतके शुद्ध भाव व निर्मळ हृदयाचे होते की मीराबाईंच्या भजनामुळे ते अंतर्बाह्य बदलून गेले होते.मीराबाईंच्या सहवासात भोजराजांची साधना वाढतच गेली.दिवसेंदिवस त्यांचा सात्विक भाव वृद्धिंगत होत गेला.मीराबाईंना संत सहवास मिळावा म्हणून त्यांनी मीराबाईंच्या महाला बाहेर एक कृष्ण मंदिर ही बांधले व जवळच साधू संतांच्या निवासाची,थांबण्याची व्यवस्था केली.भोजरांजांचा पुढे एका लढाईत मृत्यू झाला.त्यांना मृत्यू समयी भगवान कृष्णांनी दर्शन दिले व "तू मीराची नाही तर माझीच सेवा केली आहे " असे म्हणून हृदयाशी लावले. भोजराजांच्या मृत्यूनंतर त्यांची आई ,बहिण ऊदा व त्यांचे सावत्र भाऊ मीराबाईंना खुप त्रास देऊ लागले.इथवर भोजराज त्यांची ढालच बनून राहिले होते पण आता परिस्थिती बदलली होती.मीराबाईंची ननद ऊद बाई यांनी, तुम्ही साधु ,संतांशी सत्संग करता त्यामूळे राणा कुळाला व आपल्या पित्याच्या कुळाला आपण कलंक लावता आहात असे सांगितले.पण त्यावर मीराबाई म्हणाल्या , "माझे प्राण तर साधू ,संताबरोबर वास करतात.त्यांच्या सहवासाने,सत्संगाने मला अपार सुखाची अनुभूती होते.ज्यांना माझ्यामुळे दु:ख होत आहे त्यांनी माझ्या दूर राहावे." मीराबाईं चे हे स्पष्ट शब्द राणा विक्रमसिंहाला पटले नाहीत.तो रागाने लालबुंद झाला व त्याने देवांचे तिर्थ म्हणून हलाहल विष मीराबाईंकडे पाठवीले.मीराबाईंना ते विष आहे हे माहिती असुनही तो पेला त्यांनी क्षणार्धात पिला .पण त्याचा विपरीत परिणाम झाला.मीराबाईंचे तेज अधिकच वाढले.मीराबाईला काही न झाल्यामुळे ते विष खोटे होते असा समज राणाचा झाला व त्याने तेच विष वैद्याला पिण्यास सांगितले.वैद्याने नुसता एक थेंब ओठांशी लावला तोच वैद्य गतप्राण झाला.मीराबाईंना ही वार्ता कळली त्यांनी ते वैद्याचे प्रेत देवांच्या पुढे ठेवण्याची आज्ञा केली व त्या पद म्हणू लागल्या .आश्चर्य म्हणजे काही वेळातच तो मृत झालेला वैद्य उठून बसला.यानंतर राणाने मीराबाईंच्या अनेक निष्ठूर परिक्षा घेतल्या.इतके चमत्कार घडून ही राणाच्या मनात मीराबाई बद्दल आत्यांतिक द्वेष होता.तसेच मीराबाईंचे भजन ऐकण्यासाठी अकबर बादशाह व तानसेन ही वेषांतर करून येऊन गेले होते.या काळात मीराबाईंना राणाने अतिशय त्रास दिला होता.त्यामुळे यातून मार्ग काढत मार्गदर्शन मिळवावे यासाठी त्यांनी संतश्रेष्ठ तुलसीदासांना पत्र लिहिले.तेव्हा तुलसीदासांनी त्यांना राम नामाचेच स्मरण करण्याचा उपदेश केला होता.तुलसीदासानी सांगितल्या प्रमाणे मीराबाईंनी चितौडचा त्याग केला व त्या वृंदावन येथे गेल्या.तेथे पोचल्यावर त्यांनी संन्यासी असलेले श्री जीव गोस्वामीपाद यांची भेट घेण्याचे ठरविले.पण तेथे गेल्यावर ज्यावेळी शिष्य त्यांना सांगायला गेला की एक स्त्री आपल्याला भेटावयास आली आहे.तेव्हा संन्यास धर्माला अनुसरून त्यांनी भेटावयास नकार दिला.त्यावर मीराबाईंनी उत्तर दिले की, "माझा ही नियम आहे की मी गिरीधर कृष्ण सोडले तर कुणाचेही मुख बघत नाही.मी तर या साठी वृंदावनात आले की येथे वृंदावनात श्रीभगवान कृष्ण प्रभू सोडले तर बाकी सर्व गोपीका आहेत.पण आश्चर्य असे की आज देवांच्या व्यतिरिक्त एक अजुन पुरुष वृदांवनात राहतो आहे." तेव्हा ही कुणी सामान्य स्त्री नव्हे हे लक्षात आल्यावर ते. स्वतः बाहेर आले व पुत्री प्रमाणे मीराबाईंशी वार्तालाभ केला.त्यांनीच मीराबाईंना चैतन्य महाप्रभुंची वार्ता सांगितली.पुढे मीराबाई देवांच्या आज्ञेनुसार द्वारिका क्षेत्री आल्या.
इकडे मीराबाई चित्तौडला न गेल्यामुळे ते गाव श्रीहीन झाले.राणा एका सेवकाच्या हातून मृत्यू मुखी पडला.मीराबाईंनी पाठ फिरवली म्हणून चित्तौड ला अकाल पडला,महामारी पसरली.अनेक विद्वान ,संतांना बोलविले गेले.त्यांनी एकमुखाने मीराबाईंना परत चित्तौडला आणण्याचा एकमात्र उपाय सांगितला.राणा उदयसिंह याने आपले मंत्री व ब्राह्मण मंडळींना काहीही करुन मीराबाईंना चित्तौड ला परत आणण्यासाठी द्वारकेला पाठवले.त्यावेळी मीराबाई द्वारकेत अतिशय भक्ती पूर्ण आयुष्य जगत होत्या.तेथे पोचल्यावर ब्राह्मण मंडळींनी मीराबाईंना हात जोडून परत चलण्याची विनंती केली.आपल्या नसल्याने चित्तौड ची झालेली विदिर्ण अवस्था त्यांना वर्णन केली.पण मीराबाई तर अंतर्बाह्य कृष्ण प्रेमात न्हाऊन निघाल्या होत्या.त्या म्हणाल्या , "आता तर गंगा सागराला जाऊन मिळाली आहे.त्यामुळे आता मागे फिरणे अशक्य.त्यावर ब्राह्मण मंडळी अन्न पाणी सोडून उपोषणाला बसली.आता मीराबाईंपुढे पेच प्रसंग उभा राहिला.त्यांचा हा निर्वाणीचा हट्ट बघून मीराबाई रडून त्यांना म्हणाल्या , "आपण मला परत माघारी येण्यास हट्ट करु नका.मला तर आता फक्त आणि फक्त या गोविंदाच्या चरणी वास हवा आहे." तरी ब्राह्मण आपल्या निश्चयावर अडीग राहिले.त्यावर मीराबाई म्हणाल्या , "तुम्ही एवढा आग्रह करता आहात तर मी एकदा द्वारकाधीशांना विचारते." सर्वांसमक्ष त्यांनी द्वारकाधीशांना म्हटले, "हे नाथ आपल्या जवळ आणून आता मला आपण परत संसारात ढकलून देत आहात.मला आता आपल्याला कुठेही सोडून जाण्याची इच्छा नाही."त्यानंतर मीराबाईंनी विव्हळ होऊन भगवंतांना आळवण्यास सुरवात केली.थोड्या वेळात मीराजींपुढे भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभु सगुण रुपात प्रगट झाले व देवांनी त्यांना आपल्या कडे ये म्हणून आवाज दिला.तोच मीराबाई देवांकडे व्याकुळ अंत:करणाने धावल्या व बघता बघता हजारो लोकांपुढे आपल्या परमप्रिय द्वारकाधीशांच्या तेजरुपात प्रविष्ट झाल्या. या दिव्य गोपीका आपल्या प्रभु़च्या निजस्थानास निघून गेल्या.मीराबाईंनी जवळपास १५०० पदं लिहीले आहेत.सर्व पदांचा विषय म्हणजे कृष्ण प्रेम ,भगवंत प्रेम.त्यांनी आपल्या सर्वांच्या हृदयात श्रीगुरु प्रेमाचा ,श्री भगवद प्रेमाचा अंकुर रुजवावा व त्यातुन आपल्यालाही शुद्ध भक्तीची प्राप्ती व्हावी ही श्रीचरणी प्रार्थना करतो व ही शब्दसुमनांजली श्रीचरणी अर्पण करुन इथेच थांबतो.
✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️
#राम_कृष्ण_हरी🌺🌿🙏
#श्रीदत्त_शरणं_मम🌺🌿🙏


🙏अदभूत श्री मीरा माताजी चरित्र 🙏धन्यवाद 🙏जय शंकर जय गिरनारी 🙏
ReplyDelete