प्रणम्या_मातृदेवता माळ_१ 🙏🌸🚩
🍃🌺🙏 धन्य ती मुक्ताई 🙏🌺🍃
"मुक्तपणे मुक्त ,श्रेष्ठपणे श्रेष्ठ। सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती ।।"
सर्वत्र वरिष्ठ अशा शब्दांत ज्यांचे महात्म्य प्रत्यक्ष एकनाथ महाराजांनी वर्णन केले आहे अशा आदिशक्ती ब्रह्मचित्कला मुक्ताई माउलींच्या चरित्राचे हे स्मरण.आपल्या "प्रणम्या मातृदेवता" या लेखमालेतील हे प्रथम पुष्प. भगवती आई मुक्ताई माउलींपासून आपण या लेखमालेची सुरुवात करतो आहे त्याचे एक विशेष कारण म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदा ही मुक्ताई महाराजांच्या जन्माची परम पावन तिथी.मुळात शक्ती ही येत ही नाही आणि जात ही नाही ती नित्य,अखंड सर्वत्र विश्व व्यापून आहे. ती शक्ती फक्त आपल्या संवेदनांपुढे प्रगट होते.तशीच ही ब्रह्मचित्कला मुक्ताई जिचे वर्णन 'सनकांडी' असे केले आहे. ती विद्युत तेजाप्रमाणे आली व तसेच काही काळ त्रिमुर्तीं समवेत या धरेला पावन केले व आपल्या निजस्थळी कुणाला न कळता निघून ही गेली.या आदिशक्तीचे आजच्या पहिल्या माळेला आपल्याला स्मरण व त्यांच्या दिव्य चरित्राचे चिंतन करायचे आहे.खरंतर मुक्ताईंचे चरित्र असे वेगळे लिहीता येणारच नाही कारण ज्ञानदेवादी या चारही भावंडांची लिला चरित्रे ही एकमेकांशी पूर्णपणे संलग्न आहेत.तरी आपण आज या चारही भावंडांच्या चरित्रातील मुक्ताई चरित्राचे विशेष रुपाने चिंतन करुयात.त्यामुळेच या लेखाचा गाभा हा मुक्ताईंच्या चरित्रानेच मांडण्याचा बालप्रयत्न मी करतो आहे.
मुक्ताई व इतर तिन्ही भावंडे हे प्रत्यक्ष भगवंतांचे पूर्ण अवतार होते यात शंका नाहीच. आणि आपले हे अवताराचे तत्व प्रगट करण्यासाठी की काय ,या सर्वांनी विशिष्ठ तिथीलाच अवतार घेतला व मनुष्य देह धारण केला हे विशेष. निवृत्तीनाथांनी आपले शिवतत्वाचे संकेत सोमवारी जन्म घेऊन दर्शविले तर ज्ञानदेवांनी गोकुळाष्टमीला जन्म घेऊन आपणच ते महाविष्णु-कृष्ण तत्व आहोत हे निदर्शित केले.तर कार्तिक पौर्णिमेस सोपानदेवांनी अवतार घेतला व आपणच ते ब्रह्म तत्व असल्याची जाणिव करुन दिली आणि आदिशक्ती पराशक्ती भगवती मुक्ताईंनी अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी ज्या काळी आदिशक्ती अवतरली होती त्याच दिनी मुक्ताईंनी मनुष्य देह धारण करुन आपणच ती पराशक्ती ,विश्वजननी असल्याची जाणिव जगाला करुन दिली. बरं मुक्ताईंच्या अवतार काळातील अनेक प्रसंगावरुन आपल्याला त्यांच्या या विलक्षण अधिकाराची जाणिव झाल्याशिवाय राहत नाही. मुक्ताईंचा जन्म शके १२०१ प्रमाथीनाम संवत्सर ,अश्विन शुद्ध प्रतिपदा शुक्रवार या दिवशी झाला.निळोबारायांनी आपल्या चरित्रात मुक्ताईंचे वर्णन केले आहे त्यातुन मुक्ताईंच्या अधिकाराची जाणिव झाल्याशिवाय राहणार नाही. श्री निळोबाराय म्हणतात -
“मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी । आद्यत्रय जननी देवाचिये ॥
अशी ही आद्यशक्ती ,त्रयदेवांची जननी मुक्ताईरुपे लिला करती झाली.जन्म झाल्यावर काही काळानेच पिता विठ्ठलपंत व माता रुक्मिनी यांना लोकांनी वाळीत टाकल्यामुळे या सर्व बालकांना समाजात वावरता येत नसे. पुढे मुक्ताई आदी भावंडे आई वडिलांसमवेत त्रंबकेश्वर व इतर ठिकाणी तिर्थयात्रेस गेली.या ठिकाणी या सर्वांचा मुक्काम जवळ जवळ एक वर्ष होता.याच वेळी निवृत्तीनाथांना भगवान गहिनीनाथ महाराज यांनी व्याघ्र लिली करुन आपल्या गुंफेत आणले व त्यांच्यावर अनुग्रह केला.सात दिवस अहोरात्र त्यांना ज्ञानांचे प्रतिपादन केले व नाथपंथाची दिक्षा दिली.आपल्या नाथपंथातील शांभव तत्व निवृत्तीनाथांना देऊन हेच तत्व पुढे ज्ञानदेवांना देण्याचा आज्ञा केली व त्यांच्याकडून गिता तत्व पुन्हा प्रगट करण्याचा आदेश दिला.काही दिवसांनी निवृत्तीनाथ त्रंबकेश्वरातील आपल्या मुक्कामी परतले.आई-वडिलांना त्यांनी घडलेला वृत्तांत सांगितल्यावर सर्वांना अत्यंत आनंद झाला.पुढे निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना ब्रह्मगिरीवर नेऊन अनुग्रह दिला व त्यांच्याठाई आधीच विलसीत असलेले आत्मज्ञान प्रगट केले . अशा रितीने निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना अनुग्रह दिला व ते त्यांचे सद्गुरु झालेत. निवृत्तीनाथांनी हेच ज्ञान सोपानदेव व मुक्ताईंना देण्याची आज्ञा ज्ञानेश्वरांना केली.ज्ञानेश्वरांनी गुरुआज्ञा पाळली आणि सोपानदेव व मुक्ताईंना ब्रह्मविद्येचा उपदेश केला.पुढे सर्व जण यथाकाळी आळंदीस परतले. यापुढील देहांत प्रायश्चित्ताचा भाग आपल्या सर्वांना माहित आहेच त्यामुळे तो इथे गाळला आहे.आई वडिलांनी ज्यावेळी गृहत्याग करुन देहांत प्रायश्चित्त घेतले त्यावेळी सर्व भावंडे वयाने अगदी लहान होती. मुक्ताई तर अवघ्या ७ वर्षांच्या होत्या.यानंतर ही चारही भावंडे शुद्धीपत्र घेण्याकरीता पैठणास प्रयाण करते झाले.तेथील घडलेली लिली ही जगविख्यात आहे.ज्ञानदेवांनी तेथे रेड्यामुखी वेद वदविले होते,कृष्णाजीपंतांच्या घरी गावातील ब्राह्मणांचे सर्व पित्र स्वर्गातुन खाली जेवावयास बोलाविले होते.या अलौकिक लिलेमुळे सर्वांना या चारही भावंडांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली व सर्वलोक यांच्या चरणी नतमस्तक झाले. पुढे ज्ञानेश्वरादी तिघेही भावंडे तो वेद वदविलेला रेडा व शुद्धीपत्र घेऊन नेवासा या गावाच्या दिशेने मार्गस्थ झाले.नेवासा येथे पोचल्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी मृत झालेल्या व चितेवरील सच्चिदानंद बाबांना पुन्हा जिवंत केले.गावात शिरल्यावर निर्जीव मशिद बोलवली.त्यानंतर ही चारही भावंडे मोहिनीराजांच्या मंदिरात आले व तेथे पुढे दोन वर्ष राहिले.याच ठिकाणी माउलींनी ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थदीपिका या अलौकिक आणि एकमेवाद्वितीय ग्रंथाला आपल्या सर्वांच्या कल्याणाकरिता प्रगट केले.
त्यानंतर ही संतमंडळी प्रवास करीत चांगदेवाच्या गावाला म्हणजे पुणतांब्यास आली.तेथे चांगदेव महाराज समाधीतून उठल्यावर मेलेली माणसे जिवंत करित असत.पण त्यांचा समाधी अवस्थेतून उठण्याचा काळ निश्चित नसे.तोवर तेथे आलेले लोक सोबत आणलेले प्रेत वनस्पतींत व मसाल्यांत घालून ठेवीत.तेथे गेल्यावर हा प्रकार मुक्ताईंनी बघितला व त्यासंबंधी माहिती लोकांना विचारली.त्यावर लोकांनी सांगितले की , "चांगदेव समाधीतून उठले की प्रेताचे अवलोकन करतात व प्रत्येकाचे नाव घेऊन हाक मारतात.त्यांपैकी कोणी एखादाच जिवंत होतो व मग बाकीची प्रेते त्यानंतर जाळून टाकली जातात.कोण उठेल ,हे सांगता येत नाही,म्हणून हे सर्व आशा धरून येथे प्रेत आणून ठेवतात" .तेव्हा मुक्ताई म्हणाल्या, "चांगदेव केव्हा समाधीतून उठतील?" तेव्हा चांगदेवांचा सेवक म्हणाला,अजून समाधीतून उठण्यास दोन महिने आहेत.मुक्ताई म्हणाल्या , "जर आताच प्रेते उठवून दिली ,तर काही हरकत आहे का?" त्यावर सर्व लोक म्हणाले , "आईसाहेब ! आपले फार उपकार होतील.आम्ही इथे पार हताश होऊन बसलो आहोत." मुक्ताईं त्यावेळी अगदी १०/ ११ वर्षाच्या कोवळ्या वयाच्या होत्या. चिमुकल्या मुक्ताईंचे बोल त्यावेळी सर्वांना एखाद्या सिद्धाप्रमाणे भासले व कुतुहल म्हणून पुढे काय होते हे बघण्यासाठी पुष्कळ लोक तेथे जमले. मुक्ताईंनी तेथील सर्व प्रेतांना एका ठिकाणी जमा करण्यास सांगितले त्याप्रमाणे ती सर्व प्रेते एका ठिकाणी लोकांनी एकत्र केली.मुक्ताईने तेथेच पडलेले एका मेलेल्या कुत्र्याचे हाड उचलून त्या सर्व प्रेतांवरुन ओवाळून फेकले.त्याबरोबर ती सर्व प्रेते जणू काही झोपेतून उठावे,त्याप्रमाणे गडबडीने उठली.कोणी आपले पागोटे सावरु लागला तर कोणी अंगरखे शोधू लागले,तर कोणी वस्त्र निट करु लागले तर कोणी कासोटा निट करु लागले.सर्वत्र एकच धांदल उडाली.हा सर्व विलक्षण प्रकार तेथील लोकांनी पाहिला व प्रत्येकाच्या आश्चर्याला पारावार उरला नाही.सर्वांनी मुक्ताईंचा जयजयकार केला.सर्व म्हणू लागले ,ही तर जगन्माता आदिशक्ती आहे.याप्रमाणे अनेक गावांतून प्रवास करित ही भावंडे आळे या गावी पोचली.या प्रवासात पैठणला वेद वदविलेला रेडा माउली आदी भावंडांबरोबरच होता.आश्चर्य म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा हा पहिला शिष्य ,पैठणला माउलींच्या कृपेने वेद म्हणणारा हा रेडा पुढे चार वर्ष अखंड वेद पठण करित होता.रेडा वेद पठण करतो आहे हे आळ्याच्या ब्राह्मणांना पाहवले नाही.त्यांना हे पाप वाटले व आपल्या कानावर हात ठेवून ही मंडळी ज्ञानेश्वर महाराजांकडे आली.ती सर्व वैदिक मंडळी माउलींना म्हणाली, "हे पाप आता आम्हांला ऐकवत नाही,रेडा वेद म्हणतो ,हे बंद करा." हे ऐकून ज्ञानेश्वर महाराज लगेच म्हणाले, "महाराज! आपण प्रत्यक्ष भूदेव आहात ,तुमची इच्छा पूर्ण होईल." असे म्हणत माउलींनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला.तसाच तो रेडा खाली बसला व "ॐ तत् सत् "असे उद्गार काढून त्याने आपला प्राण सोडला.नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी तेथेच त्याला समाधी दिली व समाधीजवळ स्वतः अजानवृक्ष लावला.आळेगावच्या ब्रह्मवृंदांना वेदांचा वीट आला होता, म्हणून ते वेदघोष बंद करण्यास आले,तर त्यांचाच कायमचा वेदघोष बंद झाला.अशी आख्यायिका आहे की, आळ्यास कोणी अजूनही वेद म्हणणारा वैदिक जन्माला येत नाही.
याप्रमाणे ही मंडळी प्रवास करता करता शके १२१२ला आळंदीस येऊन पोचली.पण गम्मत अशी की आळंदीच्या कर्मठ लोकांवर माउली आदी भावंडांनी पैठण व इतर ठिकाणी केलेल्या चमत्काराचा काही फरक पडला नव्हता.उलट ही सर्व ब्राह्मण मंडळी त्यांना अजुनच त्रास देऊ लागली.सर्व मंडळी या चारही भावंडांचा आत्यांतिक द्वेष करित होते.संपूर्ण गावाने त्यांना वाळीत टाकल्यामुळे मुक्ताई ज्ञानेश्वर आदी चारही जन गावाबाहेर जांबूळ बेटात राहत होते.परिस्थिती इतकी भिषण होती की ज्ञानेश्वर माउली भिक्षेस निघाल्यावर जर ते रस्त्यात दिसले तरी लोक रस्ता बदलत असतं वा कुणाच्याही घरी भिक्षेस गेले तर त्यांना चतकोर भिक्षा ही दिली जात नसे.एकदा माउली असेच भिक्षेला निघाले तो एक आळंदीचा ब्राह्मण आपल्या कन्येकरीता वर बघण्यासाठी निघाला होता.पण रस्त्यातच त्याला ज्ञानेश्वर महाराज प्रथम व्यक्ती दिसतात.चांडाळाचे दर्शन झाले ,हा फार मोठा अपशकून आहे,असे वाटून त्याला राग अनावर झाला.आपले काम आता नक्की होणार नाही.असा विचार करुन त्याचा पारा चढला व त्याने माउलींना अमाप शिव्या देण्यास सुरुवात केली.त्याचा आवाज ऐकून तेथे गावातील लोकं जमली.मग काय तर त्याने अधिकच ताव दाखवित माउलींना मारण्यास सुरुवात केली.त्याने माउलींना अर्थात त्या कोवळ्या ज्ञानेदेवांना खुप मारले.श्री माउलींनी त्याला काहीच उत्तर दिले नाही.पण सहनशीलतेची पराकाष्ठा झाली.जगाला आपला विट आला.नको ,आता आपण जगात राहणे.आपण अस्पृश्य तर काय पण अदर्शनीयही झालो की आपले दर्शनसुद्धा अशुभ आहे.आपल्या दर्शनाने जर लोकांस अशुभ होते ,तर जगण्यात काही अर्थ नाही.असे म्हणत ज्ञानदेव आपल्या ताटीत शिरले व रडत रडत त्यांनी आपल्या ताटीचे दार बंद केले व स्वतः ला आत कोंडून घेतले.त्यावेळी आदिशक्ती भगवतीने आपल्या मातृभावाचे प्राकट्य केले व "ताटीचे अभंग" या रुपात महासिद्ध महाविष्णू असलेल्या ज्ञानदेवांनाही उपदेश केला.तो उपदेश एकमेवाद्वितीय असाच आहे.माउलींना मुक्ताईंनी केलेला उपदेश हा इतका उच्च कोटीचा आहे की तो नुसता वाचला तरी त्यांच्या ठाई असलेले आदिशक्ती तत्व आपल्याला लक्षात आल्यावाचून राहणार नाही. "योगी पावन मनाचा" या कडव्या पासून सुरु झालेला उपदेश "तुम्ही तरुन विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।" या ओवीवर त्याची पूर्तता होते.तो संपूर्ण उपदेश जगातील प्रत्येक साधू ,संत व सिद्धांसाठी मुक्ताईंनी दिलेली आचार संहिताच आहे.ही आचार संहिता मांडणार्या मुक्ताई प्रत्यक्ष पराशक्तीच होत्या हे यावरुन लक्षात येते.त्यानंतर माउली ताटी बाहेर आले व मुक्ताईंनी त्यांना जेऊ घालून शांत केले ही कथा क्रमप्राप्त आहेच. पुढे मांड्यांची हकिकत घडली होती ती आपल्या सर्वांना श्रृत आहेच.माउलींच्या पाठीवर मुक्ताई मांडे भाजू लागल्या आणि हे दृष्य विसोबा चाट्याने लपून बघितले.हा अलौकिक चमत्कार बघून तो इतका गर्भगळीत झाला की त्यानंतर तो लागलीच झोपडीत आला व त्याने माउलींचे चरण धरले.( पूर्ण प्रसंग इथे देणे शब्द मर्यादेमुळे शक्य होणार नाही)
माउलींच्या व निवृत्तीनाथ, सोपान देवांच्या पात्रातील उष्टे जर खाल्ले तर आपला ही उद्धार होईल म्हणून तो त्या पात्रावरील उष्टे अधाशासारखे खाऊ लागला.त्यावेळी त्याचे खाणे भुतासारखे होते.भूता सारखे खातो म्हणून मुक्ताई म्हणाल्या , "विसोबा! तू पात्रातील उष्टे खातोस ! तू खेचर (म्हणजे भूत) आहेस का?" शेवटी विसोबा मुक्ताईंना शरणं आला.त्याने मुक्ताईंचे पाय धरले व माझ्यावर कृपा अनुग्रह करा म्हणून तो कळवळीने प्रार्थना करु लागला.मुक्ताईंनी विसोबांवर अनुग्रह केला व त्याला उपदेश दिला.त्यानंतर त्यांचे नाव विसोबा खेचर असे ठेवले.
पुढे १४ विद्या ६४ कलांचे ज्ञान असलेले चौदाशे वर्षांच्या चांगदेवांना १४ वर्षांच्या मुक्ताई अनुग्रह देऊन कृतार्थ करतात.प्रसंग मोठा असल्यामुळे तो अगदी संक्षिप्तातच मांडतो त्याबद्दल क्षमस्व.चांगदेव ज्यावेळी माउलींना कोरेच पत्र पाठवितात त्यावेळी मुक्ताई ते पत्र हातात घेऊन मागुन पुढून व्यवस्थीत बघतात.ते कोरे पत्र बघून चिमुकल्या मुक्ताई म्हणतात , "दादा, हा चांगदेव सर्व प्रकारच्या विद्या व अष्टांग योग शिकूनही कोरडाच राहिला,हा या पत्राचा अर्थ आहे." हे ऐकून निवृत्तीनाथ म्हणाले, "वारे! मुक्ताई खरी मर्मज्ञ आहे." पुढे चांगदेव वाघावर बसून ,आपल्या एक लाख शिष्यांचा लवाजमा घेऊन या भावंडांना भेटण्याकरीता निघाले.पण माउली आदीं भावंडे निर्जिव भिंतीवर बसुन त्यांना सामोरे गेले व त्याचा गर्वपरिहार केला हे आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे.पुढे ज्ञानदेवांनी सांगितल्यामुळे मुक्ताईंनी चांगदेवांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आत्मज्ञान दिले व चांगदेवांना पत्रात लिहीलेल्या पासष्ट ओव्यांचे मर्म,अर्थ समजावून सांगितला.यानंतर चांगदेव स्वत:स मुक्ताई पुत्र म्हणून घेऊ लागले. पुढे एकदा मुक्ताई स्नान करित असता अचानक तेथे चांगदेव गेले.मुक्ताईंना बघताच चांगदेव लाजून एकदम मागे फिरले.तेव्हा मुक्ताई "हात मेल्या निगुर्या" असे म्हणाल्या.मुक्ताई स्नान करुन ,वस्त्र नेसून बाहेर आल्यावर त्यांना चांगदेवांनी विचारले, "आईसाहेब! मला हात मेल्या निगुर्या" असे का म्हणाल्यात? त्यावर मुक्ताई म्हणतात, अरे तुझी अजून भेदबुद्धी गेली नाही.अजून तुला स्त्री-पुरुष भाव आहेच.असे म्हणून १४ वर्षांच्या मुक्ताईंनी १४ शे वर्षांच्या चांगदेवांना उपदेश केला व त्यांची देहाची भेद बुद्धी ही नासवली व आत्मसाक्षात्कार करविला.या वरुन आपल्याला भगवती आदिशक्ती मुक्ताईंच्या अधिकाराची फक्त पुसटशी कल्पनाच करता येईल. पुढे ही सर्व भावंडे पंढरीस गेली तेथे मुक्ताईंनी गोरोबा काकांना सांगून संत परिक्षण केले व नामदेवांना कच्चे मडके ठरविले.अर्थातच त्यामागचा उद्देश हा अतिशय गहन होता.प्रत्यक्ष पंढरीनाथ ज्यांना वश झाले होते अशा नामदेवरायांचा अधिकार किती थोर असेल याचा आपण विचारही करु शकत नाही. पण त्यांनाही विसोबांकडून अनुग्रह ज्ञान घेऊन आत्मज्ञानी करण्याची ही मुक्ताईंचीच लिला होती.विशेष म्हणजे मुक्ताई या नामदेवरायांच्या आजेगुरुच.पुढे ही सर्व मंडळी तिर्थ यात्रेस गेली तिथे मुक्ताईंनी एका बाळाला नुसती हाक मारुन जिवंत केले.तसेच चंद्रपूरच्या डोंगराळ भागातून जात असता सर्वांना खुप तहान लागली होती तेव्हा मुकताईंनी नुसते बसल्या ठिकाणचे दगड बाजुला सारले व तेथून शुद्ध गंगाजळ प्रगट केले.आजही ते स्थान चंद्रपूर जिल्ह्यातील एका खेड्यात बघावयास मिळते.तेथे आजही छोटी यात्रा भरते.अशा रितीने सर्व भावंडे नामदेवरायांसह तिर्थयात्रा पूर्ण करुन पंढरीस परतले.तेथे माउलींनी देवांना आपला समाधी घेण्याचा विचार सांगितला व समाधीचा दिवसही ठरविला.सर्व भावंडे , नामदेवराय आदी संत आळंदीत येऊन पोचले.इथे प्रत्यक्ष पंढरीनाथांच्या उपस्थितीत ,सकल संतांच्या उपस्थितीत माउलींनी संजिवन समाधी घेतली .हे समाधी प्रकरण नामदेवरायांनी अतिशय सुंदर व विस्तृत रुपाने लिहीले आहे.ते आपण जरुर वाचा.पुढे सोपान काकांनी सासवड क्षेत्री देह ठेवला तेव्हा मुक्ताई तेथे हजर होत्या .काही दिवसांनी मुक्ताईंनी आपल्या लाडक्या मानस पुत्राला ,लाडक्या शिष्याला म्हणजेच चांगदेवांना तापी तिरी स्वत: समाधी दिली व त्या निवृत्तीनाथांसमवेत तापी तीरावर भ्रमण करत महतनगर येथे आल्या.तेथेच मग मुक्ताई अचानकपणे विजेच्या प्रकाशात गुप्त झाल्या.भगवती आई मुक्ताईं चे गुप्त होणे इतके अलौकिक होते की ते बघून उपस्थित सर्वांना जणू प्रलय येतो की काय असे वाटले.तो प्रसंग मी मुक्ताईंच्या अंतर्धान दिनी वेगळा व विस्तृत लिहीला आहे.या लेखात त्या जुन्या लेखाची लिंक देतो आहे तो लेख आपण जरुर वाचा.
https://akshayrjadhav.blogspot.com/2022/05/blog-post_49.html
कारण तो प्रसंग अतिशय दिव्य असा आहे. अशा प्रकारे ही भगवती आदिशक्ती, पराशक्ती, आद्यजननी माय मुक्ताई या धरेवर कार्य करून विद्युतलतेसारखी गुप्त झाली.आज अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे घटस्थापना .आपल्या "प्रणम्या मातृदेवता" या लेखमालेतील ही पहिली माळ परमप्रिय आदिशक्ती माय मुक्ताईंच्या सुकोमल चरणी अर्पण करतो व आपल्या सर्वांकडून शिरसाष्टांग दंडवत प्रणाम करुन सर्वांवर अखंड कृपा करुणा करण्याची प्रार्थना करतो.


No comments:
Post a Comment