"प्रणम्या मातृदेवता" माळ ६ 🌸🌿🙏🏻
🙏 शक्तीस्वरुपीनी भगवती श्रीआनंदमयी मॉं 🙏🌺
आज अश्विन शुद्ध चतुर्थी म्हणजे नवरात्रातील ६ वा दिवस.आपल्या या "प्रणम्या मातृदेवता" लेखमालेतील चतुर्थ शब्दसुमनांची माळ.ही माळ आपण प्रेमस्वरूपा शक्तीस्वरुपीनी भगवती श्रीआनंदमयी मॉं यांच्या सुकोमल चरणी अर्पण करतो आहोत.हिंदूस्थान ही संतांची भूमी ,देवभूमी आहे.आसेतू हिमालय आजवर लाखो संत या परम पवित्र भूमीवर अवतार धारण करुन आले,जगाला दिशा देण्याचे अफाट कार्य त्यांनी केले,अनेक मुमुक्षू ,आर्त जिज्ञासू,शरणागतांचे इह पारलौकिक कल्याण केले व आपल्या निर्गुण रुपात आजही आपल्या लिला स्थानी ,समाधी स्थानी विराजमान झालेले आहेत.अशाच जगविख्यात संतांपैकी एक असलेल्या महान विभूती म्हणजे "श्री आनंदमयी माॅं " या एक आहेत. मॉं म्हणजे प्रत्यक्ष भगवती होत्या याची प्रचिती त्यांच्या चरित्र वाचनानंतर आपल्याला येतेच.मॉं चा अधिकार इतका विलक्षण होता की त्यांच्या भेटीस्तव ,दर्शनाला अनेक साधू ,संत,संन्यासी, योगी ,सिद्ध ,साधक यायचे.मॉं च्या नुसत्या दर्शनाने ही कित्येक भक्त आनंदाची अनुभूती घेत असत.अशा या दिव्य विभुतीचे आज आपण संक्षिप्त चरित्र लेखातून स्मरण करणार आहोत.
आनंदमयी मॉं चा जन्म वैशाख कृष्ण तृतीया ३० एप्रिल १८९६ रोजी त्रिपुरा जिल्ह्यातील खेओडा या गावात झाला होता ( आज हे गाव बांगलादेश चा भाग आहे.) त्यांच्या पिताश्रींचे नाव श्री विपिनबिहारी भट्टाचार्य आणि मातेचे नाव मोक्षदा असे होते.त्यांनी मॉंचे नाव "निर्मला" असे ठेवले होते.मॉं चा असाधारण असल्याची जाणिव ही त्यांच्या बाल्यावस्थेतच लक्षात येतं.त्या अतिशय हसमुख अशा होत्या.मॉं या जन्मसिद्धच असल्याच्या खुणा त्यांनी बालपणी केलेल्या अनेक लिलांवरुन लक्षात येते. कुठेही बालपणी किर्तन सुरु असले की त्यांची भावसमाधी लागत असे व ही हकीकत स्वतः मॉंनी सांगितलेली आहे.आनंदमयी मॉं यांना आपल्या अगदी एक वर्षापासून घडलेल्या घटना ,भेटलेल्या व्यक्ती लक्षात होते.खर तर मॉं चा हा दिव्य भाव पुढे नित्य कायम स्थिर होता.मॉं च्या बालपणी घडलेल्या सर्व घटना मोठ्या झाल्यावर त्या आपल्या आईला जशाच्या तशा सांगत असत.मॉंना बसल्या बसल्या आकाशात बालपणी देवी देवतांच्या रुपाचे दर्शन होत असे.मॉंचे वडिल हे विष्णू उपासक होते.पण त्यांच्या घरची परिस्थिती काही विशेष ठिक नव्हती.मॉं चे लौकिक शिक्षण तसे बघता दोन वर्षांपासून सुरु झाले होते.सामान्य मुलांच्या शाळेत त्या काही दिवस शिक्षण घेण्यास गेल्या होत्या.त्यांची बुद्धीमत्ता अतिशय अलौकिक होती.त्या एकपाठी असल्याचा अनुभव त्यांच्या शिक्षकांना येऊ लागला होता.वयाच्या १२ व्या वर्षी मॉंचा ढाका विक्रमपूर येथील श्रीजगबन्धु चक्रवर्ती आणि त्रिपुरसुंदरी यांचे पुत्र रमणीमोहण चक्रवर्ती ज्यांना भोलानाथ या नावाने ओळखले जात असे यांच्याशी झाला.ते पोलिस विभागात काम करत होते.लग्न झाल्यावर माॅं पाच वर्ष आपल्या चुलत भावा कडे राहिल्या.त्यावेळी त्या जास्तीत जास्त ध्यान धारणा करु लागल्या.त्यांनी कसलेही वैदिक पद्धतीचे शिक्षण घेतले नव्हते तरी त्या अतिशय अचुक वैदिक पद्धतीचे देवपूजा करित असत.तसेच त्या ध्यानातून देवांशी वार्तालाभ ही करित असत.त्यांची अलौकिक व दिव्य भावावस्था बघून त्यांच्या एका सज्जन शेजार्याने त्यांना सर्वात प्रथम "मॉं म्हणून संबोधले होते.मॉं १७ वर्षांच्या झाल्यावर त्या ओष्ठ नावाच्या गावात १९१८ मध्ये आपल्या पती समवेत राहावयास गेल्या.
मॉं आपल्या पतिसोबत म्हणजे "भोलानाथ" यांच्याबरोबर राहू तर लागल्या. पण हा संसार असामान्य ठरला.त्यांचे पति जेव्हाही त्यांना स्पर्श करायचा प्रयत्न करित तेव्हा तत्क्षण त्यांचे शरीर हे मृतवत होत असे.एखाद्या प्रेतासारखी त्यातली चेतना शुन्य होत असे.ज्यावेळी मॉं चा विवाह झाल्या त्याच्या आधीपासूनच त्या अत्यंत तेजस्वी व सामर्थ्य संपन्न होत्या.लग्न झाल्यावर त्यांचे पति त्यांना संसार- व्यवहार या सर्वांचे महत्व सांगू लागले, त्यांना आत्मस्थिती वरुन देहबुद्धी वर आणण्याचा प्रयत्न करु लागले.परंतु मॉं त्यांना संयम, परमार्थ,सत्संग यांची महिमा सांगत असत.आता मॉं प्रत्यक्ष आदिशक्ती होत्या त्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द हा ज्ञान प्रगट करण्याच्या ताकदीचा होता.झालेही तसेच त्यांच्या पति च्या हृदयात हळूहळू तिव्र वैराग्याचा उदय व्हायला लागला.ही अतिशय असामान्य कृती मॉं नी फक्त आपल्या उपदेशातुन केली होती.त्यांच्या मनात विकार उत्पन्न झाली की मॉं आपल्या स्व:सामर्थ्याने तात्काळ तो दूर करीत असत.संसारात राहून कितीतरी महिने लोटले. एकदिवशी अखेर त्यांच्या पति ने त्यांना विचारलेच की, "तु माझ्याशी विवाह केला आहे तरी तु मला अशी दूर का ठेवते? तु मग विवाह तरी का केला ?" तेव्हा मॉं नी त्यांना उत्तर दिले की, " मी तुमच्याशी लग्न जरुर केले आहे.परंतु लग्नाचा खरा अर्थ हा आनंद आहे.वस्तुत: आनंद प्राप्त करण्यासाठी पति-पत्नीने एकमेकांना साह्यभूत ठरायला हवे ,शोषीक नाही! काम विकारात लिप्त होणे हेच लग्नाचे फलित नाही आहे." अशा प्रकारे त्यांनी अनेक उपदेश करुन त्यांच्या ठायी विवेकाची जागृती केली.त्या संसारात वावरत तर होत्या पण संसारात राहून ही त्यापासून अलिप्त असत. त्यांची ही संसारातील अलिप्तता जणू चिखलातल्या कमळा सारखी होती.त्या त्यात कामळाप्रमाणे राहून आपल्या पतीची सेवा करित असत.पति नोकरीवरुन घरी आले की आपल्या हाताने अत्यंत स्वादिष्ट स्वैपाक करुन त्यांना खायला घालत असत.
ही सर्व जगरहाटी करित असतांना त्यांनी आपल्या ध्यानधारणेची बैठक मोडली नाही.त्या वेळ मिळेल तेव्हा एकांतात ध्यान मग्न होऊ लागल्या.कधी कधी तर त्या स्टो वर डाळ शिजायला ठेऊन छतावर येत व चंद्राकडे बघत त्राटक करित आणि त्यातून त्या प्रगाढ ध्यानात जात असत.त्यांना इतके प्रगाढ ध्यान लागत असे की स्टोवर ठेवलेली डाळ जळून अगदी कोळसा झालेली असे.असे अनेकदा होत असे व घरातील लोक त्यांच्यावर रागावले की त्या चुपचाप आपली चुक मान्य करित असत.पण त्यांना आतून ठाऊक होतेच की "आपण कुठल्याही वाईट मार्गावर नाही तर परम पवित्र अशा ईश्वरी मार्गावर मार्गक्रमण करीत आहोत." अशा प्रकारे त्यांना ध्यानाचा ,नित्य भजनाचा क्रम अखंड चालूच होता.याच ध्यानमग्न अवस्थेत अनेक दैवीय , अनाकलनीय घटना घडू लागल्या.त्यात एक विलक्षण प्रसंग घडला. मॉं जशाजशा साधना मग्न होऊ लागल्या तसे तसे त्यांच्यात दैवी शक्ती जागृत होऊ लागल्या.त्यांच्या ठिकाणी आदिशक्ती चे प्राकट्य होऊ लागले.एकदा श्रावण पौर्णिमेला एक विलक्षण घटना घडली.आपल्या या आत्मस्थितीत त्या आदिशक्तिशी इतक्या एकरुप झाल्या की मध्यरात्री त्या अचानक उठल्या.त्यांनी आपल्या पतिलाही जागे केले.मग आपल्या ठाई भगवती आई महाकाली चे दिव्य स्वरुप प्रगट केले आणि आपल्या पतिला आदेश दिला की , "महाकाली ची पुजा करा." असा आदेश मिळताच त्यांच्या पति ने त्यांची पूजा केली. तेव्हा मॉं च्या ठिकाणी त्यांना महाकाली चे सगुण दर्शन झाले होते.ते दर्शन होताच त्यांच्या पतिने त्यांना साष्टांग दंडवत घातला. तेव्हा आनंदमयी मॉं त्यांना म्हणाल्या , "आता महाकालीला तर आईच्या नजरेनेच बघायचे आहे ना?" पतिने विचारले ,"हे काय आहे." तेव्हा मॉं त्यांना स्पष्टपणे म्हणाल्या, "तुमचे आज कल्याण झाले आहे." मॉं नी आपल्या पतिला त्या पुढे काही दिवसांनी दिक्षा दिली होती. हा दिक्षा अनुग्रह झाल्यावर असे म्हणतात की मॉं नी आपल्या पतिला साधूच केले व उत्तर काशी ला आश्रमात पाठवून दिले. इ.स १९२२ ला मॉं चंद्राकडे त्राटक करुन ध्यान करत असता त्या गहन ध्यानात लिन झाल्या व त्या आत्मतत्वाशी एकरुप झाल्या.त्यावेळी त्या २६ वर्षांच्या होत्या.जणू याद्वारे त्यांनी आपले अवतार कार्य प्रगट रुपाने सुरु केले. मॉं चे तेज दिवसेंदिवस वाढत चालेले होते.त्या सहज भावसमाधीत स्थिर होऊ लागल्या.ज्याप्रमाणे कस्तुरीचा सुगंध लपवून ठेवता येत नाही त्याप्रमाणे मॉं चे हे दिव्यत्व ही लपून राहिले नाही.त्यांच्या जवळपासच्या अनेक लोकांना त्यांच्या ठाई असलेल्या सामर्थ्याची प्रचिती होऊ लागली.त्यांचे नाव तसे तर निर्मला पण त्यांच्या अधिकारामुळे त्यांचे शेजारी त्यांना मॉं म्हणूनच संबोधू लागले.हेच " मॉं " त्यांचे जगविख्यात नावच झाले.हा लेख जरी मराठीत असला तरी मी आई न वापरता " मॉं" वापरले त्याचे कारण ही हेच आहे.
एक अलौकिक प्रसंग इथे मुद्दाम देतो आहे.हा प्रसंग माॅं नी आपल्या पतिला दिक्षा देण्या आधी घडला आहे.मॉं चे मामेभाऊ निशिकान्त जे त्यांच्यपेक्षा १०/११ वर्ष मोठे होते.ते रमणी बाबु तथा भोलानाथ (मॉं चे पति) यांना रागावून विचारु लागले की ,"तुम्ही तिला या असल्या ध्यान क्रिया ,अशा विक्षिप्त अवस्थेबद्दल विचारत का नाही." त्यावेळी मॉं पदर घेऊन त्याच खोलीतील एका कोपऱ्यात ध्यानावस्थेत बसलेल्या होत्या.हे ऐकून त्यांचा भाव अचानक बदलून गेला.त्या आसनावर आपले शरीर ताठ करुन बसल्या, त्यावेळी डोक्यावर तोंड झाकायला घेतलेले वस्त्र ही खाली पडले.त्यांचे केस अस्ताव्यस्त झाले होते.शरीराचा काही भाग पदर खाली पडल्यामुळे उघडा दिसू लागला.त्या दिव्य अवस्थेत त्यांना कसलेही भान राहिले नाही.त्या अतिशय मोठ्या आवाजात आपल्या भावाकडे बघून ओरडल्या, "काय बोलतो आहेस रे?" त्यांचे हे प्रखर उद्गार ऐकून निशि बाबू कापायला लागले व मागे सरकले.मग मॉं नी त्याच अवस्थेत आपल्या डाव्या हाताने त्यांचा चेहेरा धरला व अतिशय वात्सल्य पूर्ण आवाजात म्हणाल्या,
"काय रे भिलास का? भिऊ नकोस,भिऊ नकोस!"
तेव्हा मग निशि बाबुंनी मॉं ना भित भित विचारले ,
"तुम्ही कोण आहात?"
मॉं गंभीर झाल्या व म्हणाल्या , "पूर्णब्रह्म नारायण."
हे ऐकून दोघेही चकित झाले.
मग भोलानाथ म्हणजे मॉं च्या पतीने विचारले , "तुम्ही कोण आहात?"
मॉं म्हणाल्या, "महादेवी,महादेव."
निशि बाबुंनी त्यांना विचारले "तुमची दिक्षा झाली आहे का?"
मॉं म्हटल्या , "हो झाली आहे." परत ते म्हणाले, "रमणी बाबुची झाली का?"
मॉं म्हटल्या , "नाही .पाच महीने झाल्यावर रविवारी द्वितीयेला होईल.
खरंतर मॉं नी कधीही पंचांग पाहिले नव्हते त्यामुळे त्यांना हे माहित असण्याचा संभव नव्हतं.मॉं यापुढे काही संस्कृत मध्ये बोलल्या.पण कुणालाही ते समजले नाही.त्यामुळे मॉं नी शेजारी राहणाऱ्या जानकी बाबुंना बोलवा अशी आज्ञा केली. जानकी बाबु आले पण यावेळी नेहमी पदराखाली राहणार्या मॉं आज त्यांना वेगळ्याच अवस्थेत दिसल्या.त्यांना कसलेही बाह्य भान नव्हते.तेव्हा जानकी बाबुंनी विचारले, "तुम्ही कोण आहात?" मॉं म्हटल्या, "पूर्णब्रह्म नारायण."
जानकी बाबु म्हटले , "तुम्ही तर राक्षसी ताकद भासता आहात."
मॉं पुन्हा मोठ्याने म्हणाल्या , "नाही ,पूर्णब्रह्म नारायणी."
तेव्हा मग सर्वांनी मॉं ना आपला परिचय चांगल्या प्रकारे देण्याची प्रार्थना केली. तेव्हा मॉं आसनावर उभ्या राहिल्या.त्यांनी भोलानाथ म्हणजे आपल्या पतिच्या मस्तकावरुन ते पायापर्यंत आपली बोटे फिरवली.असे केल्या क्षणी त्यांचे डोळे अधांतरी स्थिर झाले.त्यांना काष्ठ समाधी लागली.या अवस्थेला जवळ जवळ एक तास होऊन गेला.तेव्हा अचानक शाळेतून त्यांचा पुतण्या घरी आला.मॉं ची अवस्था ,त्याच्या काकांची काष्ठ समाधी बघून तो इतका बावरला की रडायला लागला.तेव्हा जानकी बाबुंनी मॉं ना भोलानाथ ला ठिक करण्याची प्रार्थना केली.मॉंनी परत मग आपल्या बोटांनी भोलानाथ ला स्पर्श केला व तात्काळ ते समाधी तून बाहेर आले.बाहेर आल्यावर ते म्हणायला लागले, "मी कुठे होतो.किती आनंद होता तिथे.त्या आनंदाचे वर्णन ही आपण करु शकत नाही." हा प्रसंग झाल्यावर मॉं चा एकमेवाद्वितीय अधिकार सर्वांना कळून चुकला.सर्व लोकांना त्यांच्या अलौकिक तत्वाची जाणून झाली.
पुढे उत्तर काळात एका शिष्याने मॉं ना प्रश्न विचारला ,"मॉं जर आपल्या ठाई असलेले पूर्ण ब्रह्म नारायण जर आपले शरीर सोडून गेले,तर मग आमचे कसे होईल?" तेव्हा मॉं नी दिलेले उत्तर विलक्षण आहे.मॉं म्हणाल्या , "अरे सोडून कोण जाईल.मीच तर ते प्रत्यक्ष स्वरुप आहे."
या प्रसंगावरुन मॉं चा अधिकार लक्षात येतो.मॉं च्या दर्शनाला हिमालयातील योगी ही यायचे त्याचे कारण ही हेच आहे यात शंका नाही.
त्यानंतर मॉं नी आपले कार्य प्रगट रुपाने सुरु केले. नंतर त्या नित्य दिव्य भावातच स्थिर झाल्या.त्यांना अनेक लोक शरणं यायला लागले.अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. १९२९ ला रमानी जवळील कालीमंदीर परिसरात मॉं नी आपला पहिला आश्रम स्थापन केला.एक वर्ष तर त्या अखंड मौनातच राहिल्या.त्या वेळी त्या एकांतवासात होत्या.मौन आणि समाधी बस एवढेच!त्यांचे पती हेच त्यांचे प्रथम शिष्य झाले.त्यानंतर भक्तोद्धारासाठी त्यांनी भारतभर भ्रमण केले.भारतातील त्याकाळी जगविख्यात असलेले हरी बाबा,उडीया बाबा,परमहंस योगानंद ,अखंडानंद सरस्वती हे मॉं वर आई सारखे प्रेम करायचे.परमहंस योगानंद व स्वामी शिवानंद तर त्यांना आत्मप्रकाशाने सुसज्ज व अत्यंत विकसीत आत्म पुष्प म्हणत असत.त्या सर्व संतांना मग ते अगदी त्यांच्यापेक्षा लहान वयाचे असले तरी "पिताजी" म्हणूनच संबोधन करित.त्यांना संतांवर विशेष प्रेम होते. भलेही भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी सारख्या मोठ्या मोठ्या लोकांकडून त्यांच्या चरणांची सेवा पुजा होत असे पण त्या स्वतः मात्र संतांची पुजा करुन अतिशय आनंदीत होत.श्रीअखंडानंद सरस्वती स्वामी महाराजांचा सत्संग त्या त्यांच्या चरणाशी बसुन ऐकत. मॉं चे चरित्र अतिशय दिव्य आहे .जवळपास ३ ते ४ हजार पृष्ठाचे व पाच खंडातील हे चरित्र इतके विस्तृत व चमत्कारिक आहे की त्याची महती शब्दात मांडता येणार नाही.मॉं नी वेळोवेळी केलेल्या लिला , केलेले उपदेश यांचा तो कोषच आहे .त्या सर्व लिला तर मी या ठिकाणी मांडण्यास असमर्थ आहे. पण भविष्यात त्यातील काही भाग जरुर निवडुन मराठीत शब्दबद्ध मॉं नी करवून घ्यावा ही माझी मॉं च्या चरणी प्रार्थना आहे. मॉं चे भ्रमण सर्व दूर असायचे.आपल्या महाराष्ट्रात मॉं नेहमी येत असत.पुण्यात तर मॉं चा अतिशय भव्य दिव्य आश्रम आहे.या आश्रमात मॉं स्वतः बर्याच वेळा येऊन राहत असत.मॉं नी अशा प्रकारे अलौकिक कार्य केले ,अनेकांना दिक्षा दिली,अनुग्रह देऊन कृतार्थ केले.साधनेच्या प्रत्येक पातळीवरील साधकाला मॉं नी त्याच्या अधिकारानुरुप मार्गदर्शन केले.मॉं १९८२ ला हरिद्वार कनखल या ठिकाणी आपल्या दिव्य देहाचा त्याग करुन स्वधामी परतल्या.त्यांची समाधी कनखल या ठिकाणी आहे.देशविदेशात करोडो भक्तांना मॉं आजही कृपा दृष्टीने सांभाळत आहेत.आजही मॉं च्या कृपेची प्रचिती अनेकांना येते.जगभरात त्यांचे आश्रम आज स्थापन झाले आहेत.आजही हे सर्व भक्त मॉं नी दाखवलेल्या धर्माच्या, सदाचाराच्या मार्गावर मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करित आहेत.मॉं वर लेख लिहावा ही माझी अनेक दिवसांपासून ची इच्छा होती.आज आपल्या या "प्रणम्या मातृदेवता" लेख मालेच्या निमीत्ताने मॉं नी कृपा करुणा पूर्वक माझी ही इच्छा पूर्ण केली.त्यांच्या चरित्राचे स्मरण घडणे ही पण मी त्यांची परम कृपा करुणा समजतो.त्यांनीच लिहून घेतलेली ही शब्दसुमनांची त्यांच्याच श्रीचरणी अर्पण करतो.मॉं ना प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या सर्वांवर त्यांची करुणा मायेची सावली नित्य अखंड धरावी, आम्हालाही धर्माच्या ,सत्याच्या ,साधनेच्या मार्गावर चालण्याची बुद्धी देऊन ,आपल्या सद्गुरु माउलींची अखंंड सेवा करण्याची विवेक बुद्धी प्रदान करावी.
✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️
श्रीदत्त: शरणं मम 🌿🌺🙏🌸
महाराज ज्ञानेश्वर माउली समर्थ🌿🌺🙏🌸


No comments:
Post a Comment