Saturday, October 1, 2022

प्रणम्या मातृदेवता माळ ७:- कृष्णाकाठची ज्ञानेश्वरी प.पू.ताई दामले🙏🌺 🌸🌿🙏🏻

 



प्रणम्या मातृदेवता :- माळ ७ 🌸🌿🙏🏻


🌺🙏कृष्णाकाठची ज्ञानेश्वरी:- प.पू.ताई दामले🙏🌺


आज अश्विन शुद्ध सप्तमी म्हणजे नवरात्रातील ७ वा दिवस.आपल्या या "प्रणम्या मातृदेवता" लेखमालेतील शब्दसुमनांची सातवी माळ.ही माळ आपण करुणाब्रह्म भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पूर्ण कृपांकित अशा संत ,ज्या अतिशय प्रसिद्धीपराङमुख होत्या अशा सद्गुरु श्रीताई दामले तथा पार्वती शंकर दामले यांच्या श्रीचरणी अर्पण करणार आहोत.परमपूज्य ताई या प्रसिध्दी पासून दूर व अतिशय अलौकिक आणि विलक्षण अधिकारी संत होत्या.ताईंनी सर्वांमध्ये राहून अलिप्तता जपली,जी ज्ञानेश्वर माउलींना ही अभिप्रेत आहे. 

      "जो अंतरी दृढु । परमात्मरुपी गूढु । 

        बाह्य तरी रुढू । लौकिकु जैसा ।।"

माउलींनी संतांच्या अंतरंग स्थितीचे वर्णन करतांना सांगितले आहे की , संत हे तुमच्या आमच्या सारख्या दिसत असले तरी ते अंतरंगात परमात्म तत्वाशी एकरुप झालेले असतात.त्यांच्या ठाई अंतर्मुखता,कमालीची रुजूता,विलक्षण नम्रता,इतरांप्रती असलेले प्रचंड प्रेम व आत्मानंदात गढून गेलेली वृत्ती अशा अनेक गुणांचे प्रगटीकरण झालेले बघावयास मिळते.परम पूज्य सद्गुरु ताई या अशाच प्रकारच्या आत्मानंदात गढून गेल्या होत्या,माउलींशी एकरुप झालेल्या होत्या.त्यांचे बाह्य रुप अगदी सामान्य स्त्री सारखे दिसत असले तरी त्या अंतरंगात श्रीभगवंताच्या तत्वाशी एकरुप झालेल्या होत्या.आज आपण प.पू.ताईंच्या या सुंदर अशा चरित्राचे स्मरण करणार आहोत.

परमपूज्य ताईंचा जन्म ५ फेब्रुवारी १८८९ ,माघ वद्य पंचमी रोजी सांगली जिल्ह्यातील रेठरेहरणाक्ष या गावी झाला.त्यांच्या वडिलांचे नाव नारायणराव व आईचे नाव लक्ष्मी असे होते.ताईंच्या माहेर चे नाव पटवर्धन.हे घराणे अतिशय सुखवस्तू व गर्भश्रीमंत होते.ताईंच्या घरात जवळपास पंचवीस लोक राहत असत.१८९८ साली आलेल्या प्लेगच्या साथीमुळे ताईंच्या घरातील जवळ जवळ सर्व लोक मृत्युमुखी पडले होते.ताईंच्या आई या त्यांच्या बालपणीच वारल्या होत्या त्यामुळे त्यांना मातृसुख हे मिळाले नाही.पण त्यांना हे मातृप्रेम त्यांच्या चुलती पार्वती देवी पटवर्धन यांच्या कडून मिळले.त्या जरी निरक्षर असल्या तरी त्यांना अमरकोश संपूर्ण पाठ होता.तसेच अभंग, स्तोत्रे,भूपाळ्या सर्व त्यांना मुखोद्गत होते.ताईंच्या परमार्थाची सुरवात याच चुलती मुळे झाली.ताईंच्या घरी अनेक थोर साधु ,संत, संन्यासी , वैरागी मुक्कामास येत असत.

पुढे लहानपणी खेळताना एका थोर संन्यासी संतांनी त्यांच्या हाताला स्पर्श केला तोच त्यांच्या शरीरात शक्तीसंचार झाला होता.तसेच ताईंच्या घराशेजारी आप्पाशास्त्री नावाचे एक वृद्ध संन्यासी एका कुटीत राहत होते.जगाशी अलिप्त असणारे, कुणाशीही न बोलणारे पू.आप्पा शास्त्रींनी ताईंना एक लाकडाचा तुकडा फेकुन मारला व त्यांच्यावर कृपा केली होती.काही दिवसांनी एकदा ब्रह्मनाळचे एक अधिकारी महापुरुष,संत ताईंच्या घरी मुक्कामी आले.दोन‌ दिवस मुक्काम करुन ते जायला निघणार तेव्हा त्यांनी ताईंना जवळ बोलाविले व म्हटले , "मुली ,एक गोष्ट सांगतो ती लक्षात ठेव.मी सांगतो त्याप्रमाणे करीत जा.आपल्याला आवडेल त्या देवाचे नाव घेत जा.त्याची रोज मानसपूजा करीत जा.पुढे याचा तुला नक्की फायदा कळेल." पूज्य ताईंच्या पारमार्थिक साधनेला येथूनच सुरुवात झाली.ताईंनी याचा अभ्यास सुरु केला.पू.ताईंची दत्तोपासनाही येथूनच सुरु झाली. त्यांच्याजवळ एक दत्तप्रभुंची तसवीर होती.ती पाटावर ठेवून त्या रोज मानसपूजा करीत.नंतर प्रदक्षिणा घालीत.त्या गुरुवार चा उपास देखील करीत.ही उपासना सुरु केली व थोड्या दिवसातच दत्त कृपेची अनुभूती त्यांना झाली. 

पू.ताईंना डोळ्यांचा विकार झाला.ते अत्यंत लाल झाले.डोळ्यातून सारखे पाणी वाहू लागले.त्यांच्या चुलतीने त्यांना श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे आणले.पू.ताईंच्या चुलतीने त्यांना श्रीगुरु पादुकांना प्रदक्षिणा घालण्यास सांगितले.तिथेच परम पूज्य ताईंना दत्तसांप्रदायातील अतिशय थोर विभूती सद्गुरु श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे दर्शन घडले.स्वामी महाराजांनी करुणादृष्टीने ताईंकडे बघितले व ते तेथून निघून मुक्कामी परतले.पण इकडे ताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.ताई सर्व देहभान विसरल्या.त्यांना भाव समाधीच लागली.ताईंना देवांचा स्वप्नदृष्टांत झाला की ,श्री स्वामी महाराजांचे चरणतीर्थ आपल्या डोळ्यात घालावे म्हणजे त्यायोगे डोळ्यांची व्याधी दूर होईल.पण स्वामी महाराज आपले चरणतीर्थ कुणालाही देत नसत हा त्यांचा नियम होता.त्यांनी श्रीस्वामी महाराज स्नान करुन कृष्णामाईतुन वर आले की घाटाच्या पायर्‍यावर उमटणारे स्वामी महाराजांच्या चरणांवरील पाणी त्या आपल्या पदरात टिपून घेऊ लागल्या व‌ ते चरणतीर्थ आपल्या डोळ्यात घालू लागल्या.आश्चर्य आणि श्रीदत्त कृपा अशी की काही दिवसांतच पू.ताईंच्या डोळ्यांची व्याधी यामुळे समुळ दूर झाली.पुढे नरसोबावाडीच्या श्रीपादुकांची मानसपूजा त्या अखेरपर्यंत करीत.

लवकरच ताईंचा विवाह वाईच्या सावकार दामलेंच्या मुलाशी श्री शंकरराव दामले यांच्याशी झाला.हे अत्यंत श्रीमंत व प्रतिष्ठित घराने होते.त्यांच्या तेजस्वी जिवनास येथूनच सुरुवात झाली.त्यांची कृष्णामाई वर नितांत श्रद्धा होती.रोज पाणी भरण्यासाठी वा स्नानासाठी कृष्णामाईवर त्यांचे जाणे होत असे.त्या माईंच्या स्मरणात इतक्या एकरुप होत की त्यांना तिथेच भावसमाधी लागत असे.संसार करतांना ही ताईंची पारमार्थिक बैठक यत्किंचितही मोडली‌ नाही.त्या सतत नामस्मरण व आपला नित्य क्रम यात खंड पडू देत नसत.पण त्या हा आपला परमार्थ अतिशय गुप्त पद्धतीने करित.पुढे यथाकाळी ताईंना मुलगा झाला.त्याचे नाव "दत्तात्रेय" ठेवण्यात आले.ताई त्यावेळी आपल्या माहेरी आलेल्या होत्या.पण यावेळी अजून एक महद् भाग्याची घटना घडली.मानसपूजा,नामस्मरण करण्याची साधना देणारे ब्रह्मनाळचे स्वामी परत जवळ जवळ १२ वर्षांनी पुन्हा ताईंकडे आले.एका तपानंतर जणू आता पुढची उपासना द्यायलाच ते आले होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.त्यांनी ताईंना "तू यापुढे ज्ञानेश्वरी वाचीत जा.समजो न समजो.नियमाने वाचीत जा." ताईंनी दुसर्‍या दिवसापासून ज्ञानेश्वरी वाचण्याचा नियम सुरु केला. जमेल तशी‌ त्या ज्ञानेश्वरी वाचू लागल्या.ताई आता सासरी परतल्या पण यावेळी दत्तप्रभुंच्या उपासने बरोबर त्या ज्ञानेश्वरी ही सोबत घेऊन आल्या.पुढे १२ वर्ष ताईंनी अखंड ज्ञानेश्वरी व दत्त उपासना केली.हे दुसरे तप‌ ही पूर्ण होत आले.त्याच काळात त्यांचे यजमानांनी वेगळ्या ठिकाणी बिर्‍हाड हलविले.आता त्यांना ज्ञानेश्वरी चा अर्थ माउलींच्या कृपा करुणेनी अंतरंगातून उलगडायला लागला.त्या आता नित्य अखंड ज्ञानेश्वरी वाचत असतंच, पण शेजारी राहणाऱ्या स्त्रीया देखील ज्ञानेश्वरी ऐकायला दुपारी त्यांच्या घरी येऊ‌ लागल्या. याच काळात त्यांना शेषशायी भगवान महाविष्णू व माता लक्ष्मी चे दर्शन ही झाले.तो दिव्य अनुभव ताईंच्या या साधनेचा परीपाकच होता.त्यांचे ओढीने,तळमळीने, प्रेमाने,कसलीही अपेक्षा न ठेवता ज्ञानेश्वरी चे वाचन सुरुच होते.पण आता त्यांना माउलींच्या दर्शनाची ओढच‌ लागली होती.त्यांची ही तळमळ दिवसेंदिवस वाढत गेली व एकेदिवशी त्यांना माउलींनी स्वप्नात दर्शन दिले.त्यांच्या पाठीवरुन हात फिरवला. हा प्रसंग घडल्यावर मात्र त्यांच्या जिवनात शांती व समाधान उत्तरोत्तर वाढतच गेले.पुढे ताईंनी ध्यानाभ्यासाला ही सुरुवात केली.त्या सुरुवातीस रात्रीला सर्व निजल्यावर ध्यान करीत.नंतर त्या पहाटेच्या वेळी ही ध्यान करु लागल्या.मार्ग चालत राहा, कंटाळू नका.परमेश्वर पाठीशी आहे.असे आश्वासन त्या आपल्या स्वानुभवातून इतरांना देत.


संसार करता करता ताई ज्ञानेश्वरी आपल्या जिवनात उतरवून तसे जिवन जगण्याचा सराव करु लागल्या.त्यांनी नुसते ज्ञानेश्वरी चे वाचनच नाही केले तर त्या आता ज्ञानेश्वरी जगायला ही लागल्या .त्याचा एक सुंदर प्रसंग ताईंच्या चरित्रात आहे तो बोधप्रद प्रसंग मुद्दाम इथे देतो आहे.ताईंनी कधीही आपल्या आवडी निवडी कुणालाही सांगितल्या नाही.त्या पुढे येईल त्याचा भगवंतांची इच्छा म्हणून स्विकार करीत.एकदा त्यांचे पती श्री शंकरराव यांनी त्यांच्यासाठी घरच्याच दुकानातून लुगडी आणली.लुगड्यांची जोडी असल्याने त्यांनी तशीच ती ताईंसाठी आणली.ताईंनी ती नेहमी प्रमाणे देवासमोर ठेऊन भिजविली.लुगडी चांगली होती पण एकाच रंगाची! शंकररावांनी हे बघितल्यावर त्यांना आपण एकाच रंगाची दोन लुगडी आणल्याचे लक्षात आले.त्यांनी ताईंना विचारले, "एकाच रंगाची लुगडी असतांना मला सांगितले का नाही.मी बदलून दुसरा रंग आणला असता." त्यावर ताईंने दिलेले उत्तर त्यांचा अधिकार दाखवतो.त्या म्हटल्या, "जगात चैतन्य एकच आहे,असा अभ्यास करायचा,मग द्वैत कशाला? जे ज्ञानेश्वरी वाचताना मिळवायचे त्याची कृती व्यवहारात यायला हवीच." ताईंच्या या उत्तरातून त्यांच्यात परमार्थ किती खोल रुजला होता.त्यांची विवेकाची बैठक किती दृढ झाली होती हे दिसून येते.ताई अशाप्रकारे ज्ञानेश्वरीची ओवी अनुभवात आणण्याचा प्रयत्न करीत होत्या.ज्ञानेश्वरीचे सातत्याने वाचन,मनन‌ व चिंतन करीत करीत ताईंनी ज्ञानेश्वरीचा अर्थच आपल्या जिवनात उतरविला.


पुढे व्यापारात नुकसान‌ झाले, घरावर जप्तीचा प्रसंग आला.आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक झाली.पण याकाळात ही ताई डगमगल्या नाही.तर त्या मनात म्हणत, "बरे झाले लक्ष्मी गेली ती ! नाहीतरी सावकारी चा व श्रीमंतीचा दामले मंडळींना फार अहंकार होता.तो नाहीसा करण्यासाठीच देवांनी हा प्रसंग आणला आहे." इतक्या त्या भगवंत चरणी लिन होत्या की जिवनात होणारी प्रत्येक घटना ही त्यांचीच कृपा आहे असा भाव त्यांचा दृढ झाला होता. अडचणीच्या काळात ही ताई आनंदाने जिवन जगत.दुपारी कामे उरकली की त्या तिन नंतर ज्ञानेश्वरीवर चिंतन ,प्रवचन करीत.पुढे ज्ञानेश्वर माउलींनी स्वप्नात येऊन त्यांना अनुग्रह देण्याची आज्ञा केली.त्याप्रमाणे त्या त्यांच्याकडे आलेल्या मुमुक्षू साधकाला अनुग्रह देऊ लागल्या. त्यांनी आजिवन भक्तांसाठी ज्ञानेश्वरी सांगितली. पुढे उत्तरोत्तर त्यांनी आपला ध्यानाभ्यास वाढविला.त्या जरुरीपुरतीच झोप घेत.यावेळी ध्यान साधनेत त्यांना भगवान महाविष्णू चे दर्शन झाले होते.ताईंच्या चरित्रातून आपल्याला लक्षात येतं की ,ताईंनी जे जे वाचले ते ते आचरणात आणण्याचा प्रयत्न केला.नामाचा आधार घेतला.वृती अंतर्मुख करण्यासाठी मानसपूजा केली.श्रीज्ञानेश्वरी अभ्यासली.त्या वाचनाने विवेक व वैराग्याचा जिवनात अवलंब केला.अखंड अभ्यासाने मनाची व बुद्धीची स्थिरता व सुक्ष्मता त्यांनी प्राप्त करुन घेतली होती.


ज्ञानेश्वर माउली हाच आमचा संप्रदाय असे त्या म्हणत.त्यांनी कधीही कुणालाही उत्तराधिकारी नेमले नाही.आपली प्रसिद्धी व्हावी म्हणून काडीचाही प्रयत्न केला नाही.कधीही मुलाखात दिली नाही.त्या ज्ञानेश्वरी सांगण्यासाठी कधीही उच्चासनावर बसल्या नाही.त्या सदैव श्रोत्यांमध्येच बसत व प्रवचन झाल्यावर प्रत्येक श्रोत्यांना माउली म्हणून नमस्कार करीत. पुढे मुले मोठी झाली ,नोकरीला लागली ,त्यांचे लग्न उरकल्यावर त्या जवळ जवळ संसारातून जणू मुक्तच झाल्या .त्यांनी आपले साधन आता जवळ जवळ पूर्ण दिवस भरच सुरु केले.त्या आता नित्य साधनेत लिन राहू लागल्या.याच काळात भक्तांनी त्यांना तिर्थयात्रेला ही नेले.असेच एकदा त्रंबकेश्वरी गेल्यावर निवृत्तीनाथांच्या समाधी जवळ त्या दिड तास गहन ध्यानात गढून गेल्या होत्या.पुढे अखंड ज्ञानेश्वरी चे वाचन व प्रवचनाद्वारे ताईंनी लोकसंग्रह केला.त्यांना ज्ञानेश्वरी ची गोडी लावली.त्यासाठी त्या मुंबई,पुणे,सांगली, इस्लामपूर, औदुंबर, इचलकरंजी, ठाणे,चिंचवड अशा बर्‍याच ठिकाणी अखंड प्रवास करीत.९५ वर्षाची शेवटची दोन तपे ताईंनी अखंड ज्ञानेश्वरी सांगितली.अशा प्रकारचे भव्य दिव्य जिवन ताई जगल्या.खरंतर प.पू.ताईंचे चरित्र इतके विलक्षण आहे की प्रत्येक प्रसंग हा जिवन कसे जगावे याचा एक एक प्रबंध‌ आहे.पण शब्द मर्यादेमुळे ते मांडता आले नाही.संसार करुन ,घर सांभाळून अखंड परमार्थ करणार्‍या ताई म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक आदर्शच आहेत.संसार हा परमार्थाला मारक नसुन आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला तर तोच संसार परमार्थाला कसा पुरक होतो याचे हे प.पू.ताईंचे जिवन उत्तम उदाहरण आहे.ही संत चरित्रे किती उपकारक असतात हे याचे वाचन करतांना नित्य जाणवते.ताईंच्या जिवन चरित्राचा विचार केला तर आपण काय करायला हवे याचे उत्तर आपले अंतर्मनच देऊन जाते.अशी ही कृष्णाकाठची ज्ञानेश्वर माउलींची परमप्रिय विभूती वयाच्या ९५ व्या वर्षी १९ सप्टेंबर १९८३ रोजी त्रयोदशी तिथीला आपल्या परमप्रिय माउलींच्या चरणी लिन झाल्या.भक्तांनी त्यांचे सारे और्ध्वदेहीक हे आळंदीला इंद्रायणी काठी केले .आज ज्या ठिकाणी त्यांना अग्नी देण्यात आला तिथे घाटावर प.पू.ताईंची समाधी आहे.ही शब्दसुमनांजली परमपूज्य ताईंच्या चरणी अर्पण करून त्यांना प्रार्थना करतो की हे जिवन माउलींच्या सेवेत,स्मरणात रुजू करण्याचा विवेक त्यांनी आम्हाला द्यावा व ज्ञानेश्वरी च्या कृपेचा अनुभव ही या जिवनात आम्हाला मिळावा.

      ✒️✍️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

#महाराज_ज्ञानेश्वर_माउली_समर्थ ❤️🙏🌸🌿

#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🌿🌺



 

1 comment:

  1. अतिशय बोधपर संत चरित्र ताई चे आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन किती महत्त्वाचे आहे.चरित्र वाचून समजून आहे.म.

    ReplyDelete

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...