Thursday, October 6, 2022

सद्गुरु श्रीबाळुमामा महाराजांची आज १३०वी जयंती🙏🌸🌺🚩


 शिवावतार_आदमापूर_निवासी_सद्गुरु_श्रीबाळुमामा_महाराजांची_आज_१३०वी_जयंती:-🙏🌸🌺🚩


                             विलक्षण महापुरुष,प्रत्यक्ष शिवावतार सद्गुरु श्रीबाळुमामांची आज १३० वी जयंती.मामांचे भक्त महाराष्ट्र,दक्षिण भारत व संपूर्ण हिंदुस्थानात पसरलेले आहेत.सिद्धांच्या मांदियाळीत अग्रगण्य असलेले मामा म्हणजे एक लोकविलक्षण सत्पुरुष.प.पू.मामांचे चरित्र अतिशय विलक्षण आणि आश्चर्यचकित करणारे आहे.अलिकडच्या काळात होऊन गेलेल्या विलक्षण संतांपैकी एक असलेल्या मामांचे चरित्र आपल्याला श्रुत आहेच.तरी आपण आज जयंतीच्या पुण्यपर्वावर मामांच्या अवतार कार्याचे स्मरण करुयात.

                 पु.मामांचे पूर्वज हे बाणा-निंबर्गीचे देसाई असे मानले जातात.काही कारणाने या घराण्यातचे लोक आकोळ या गावी राहावयास आले.याच घराण्यातील श्री मायाप्पा हे मामांचे वडिल व सौ.सुंदराबाई या मामांच्या मातोश्री.बाळु मामांची आई सौ‌ सुंदराबाई यांचे माहेर आप्पाचीवाडी.हे गाव कागल-निपाणी या राष्ट्रीय महामार्गाजवळ आहे.याच गावात नाथ संप्रदायातील सिद्ध महापुरुष सद्गुरु श्री हालसिद्धनाथांचे अतिशय जागृत असे ठिकाण आहे.प.पूमामांची आई सुंदराबाई या अतिशय धार्मिक आणि सत्शिल होत्या.त्यांची पांडुरंगावर विशेष भक्ती होती.त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ होती व त्या निष्ठेने एकादशीचे व्रत करित असतं.सत्याव्वा व मायाप्पांचे शुभमुहूर्तावर लग्न झाले.दोघेही अतिशय भाविक असे दांम्पत्य होते.लवकरच सुंदराबाई दिवस गेलेत व मामांसारख्या महापुरुषांच्या जन्माची चाहूल लागली.गर्भवती झाल्यावर सुंदराबाई या जास्तीत जास्त भजनात ,नामस्मरणात तल्लीन होऊ लागल्या. त्यांचे मन हे भगवद भजनात रमत असे.असा लोकविलक्षण महापुरुष ज्या पोटी जन्म घेणार होता त्यांना या पेक्षा वेगळे काय डोहाळे होतील? शके १८१४ चा अश्विन उजाडला.सुंदराबाई नऊ महिने भरत आले होते.अश्विनातील शुद्ध एकादशी आली.सौ.सुंदराबाई गरोदर असुनही त्या वेळी उपवास केला होता.अहोरात्र भजन नामस्मरण सुरु होते.त्यात त्या तल्लिन झाल्या होत्या.दुसर्या दिवशी द्वादशी सोमवार.सकाळी सर्वांची जेवणे झाल्यावर दुपारी ४ वाजुन २३ मिनीटांनी त्या प्रसुत झाल्या व‌ प्रत्यक्ष शिवावतार मामांचा जन्म झाला.जन्मताच या बाळाच्या चेहेर्यावर विलक्षण शांती आणि तेज होते.जन्म झाल्यावर मामा शांत आणि प्रसन्न मुद्रेत हसत होते.मामांची बालपणी प्रकृती सुदृढ होती.पण त्यांचे लक्ष सदैव वेगळ्याच ठिकाणी लागलेले असे.त्यांचे विक्षिप्त वागणे ,एकांतप्रिय असणे लोकांना वेगळे वाटत असे.त्यामुळे की काय लोक मामांना "खुळा बाळू" असे म्हणत.त्यांच्या विक्षिप्त वागण्यामुळे घरच्यांना वाटले की त्यांना भुतबाधा झाली आहे व त्यामुळे त्यांना यातुन सोडविण्यासाठी अनेक मांत्रिक,बुवा,देव ऋषी यांचे उपाय ही केले गेले.बाळूमामांनी एका धनगर घरात अवतार धारण केला होता.त्यामुळे थोडे मोठे झाल्यावर बाळूमामांना कामाचे वळण लागावे म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना अक्कोळ या गावातील जैन व्यापारी चंदुलाल शेठजींकडे पाठविले.धनगराचे पोरं म्हणून त्या शेटजीने त्यांना गोठ्यात राहण्यास एक कोपरा,जेवण्यासाठी एक थाळी आणि पाण्यासाठी एक लोटा दिला.त्या शेटजींच्या आईला मामांनी त्या थाळीतील छिद्रातून निघणार्या प्रकाश झोतात भगवान महावीरांचे दर्शन घडविले. पण हा चमत्कार झाल्यावर मामा आपल्या घरी परत आले.शेटजीने प.पु.मामांची ती थाळी व तांब्या आपल्या देवघरात पुजेसाठी ठेवला.तो ठेवल्यावर त्यांच्या घराची मोठी भरभराट झाली.मामा वीस वर्षांचे झाल्यावर लवकरच  त्यांच्या मनाविरोधात त्यांच्या भाचीशी म्हणजे सत्यव्वांशी त्यांचा विवाह करण्यात आला.त्यावेळीच्या रितीप्रमाणे विवाह पार पडला पण सत्यव्वांचे वडिल, मामांचे सासरे मामांनी आधी भविष्य वर्तवल्या प्रमाणे लग्न लागताच गतप्राण झाले.प.पु.मामा हे जन्मसिद्ध योगी होते.त्यांच्या या योग सामर्थ्याची प्रचिती लवकरच सर्वांना आली.मनाविरुद्ध लग्न झाल्यावर मामा घरी परतले.पण आल्यावर आठवडाभर ते निर्विकल्प समाधी लावण्याचा खेळ करु लागले.ते मृतासारखे पडून राहत.हृदयाचे ठोके ,शारिरीक हालचाली सर्व काही बंद होत असे.सुरवातीला असे झाल्यावर लोक जमले.बाळू मेला म्हणून रडले.अगदी तिरडी बांधून सर्व तयारी ही झाली आणि बघतात तर मामा झोपेतून उठल्याप्रमाणे अंग सावरत उठून बसले.हा खेळ मामांनी आठवडाभर चालवला होता. मामांनी लवकरच आपला पिढीजात चालत आलेला बकरी पाळण्याचा व्यवसाय सुरु केला.आपल्या कमरेचा चांदिचा करदोडा विकुन त्यांनी एक शेळी व एक गाय विकत घेतली.मामांनी आपल्या वडिलांना एकदा म्हटले होते, "मला लोकांच्या घरी पाठवू नका‌,पुढे मागे बाळू धनगराचे घर राजवाड्यासारखे होईल! ते पाहायला जग येईल."!


                                         इथे एक विशेष गोष्ट अधोरेखित करतो‌‌ ती अशी की मामा हे जन्मसिद्ध होते.त्यांनी कधीही कुठलीही साधना केली नाही आणि विशेष म्हणजे त्यांना सद्गुरुंचा अनुग्रह लाभण्याआधीच ते सिद्ध अवस्थेला प्राप्त झालेले होते.प.पू.मामांनी अगदी बालपणापासूनच आपल्या या सामर्थ्याची प्रचिती अनेकांना दिली होतीच.मामांच्या दर्शनासाठी पहाटेला अनेकवार त्यांच्या तंबूमध्ये कैलासातील भक्तराज नंदी,देवीदेवता येऊन जात.यांचे दर्शन लोकांना झाले होते,भगवती आदिशक्ती चा व मामांचा अनेकवार संवाद होत असे.एका प्रसंगी मामांनी चिंचणीच्या मायक्कांना फटकारल्याचाही प्रसंग आहे.यावरुन मामांचे अवतारित्व व त्यांचा विलक्षण दिव्य अधिकार आपल्या लक्षात येईल.श्री मामांच्या चरित्रात इतक्या अलौकिक आणि चमत्कारिक लिला आहेत की कितीही प्रयत्न केला तरी या लेखात त्यातील थोड्यांचाही समावेश करणे अशक्यप्राय आहे.तरी मी मामांच्या दिव्य अधिकाराची प्रचिती आणणारे काही प्रसंग लेखात देतो आहे.(हे सर्व प्रसंग सद्गुरुंच्या भेटी अगोदर घडलेले आहे.) 

          एकदा मामांचा मुक्काम चिकोत्रा नदीजवळ होता.मामा त्यावेळी २८ वर्षांचे असतील.त्यावेळी सत्याव्वा,मेहुणी लगमव्वा आणि सासू गंगुबाई या स्त्रिया तळावर होत्या.तळ्यावरील दूध विकुन पैसे साठवण्याचा छंद या स्रियांना लागला. पण यामुळे मामा सोडून इतरांना जेवणात दूध कमी पडु लागले.सर्वज्ञ मामांना ही बाब अंतर्ज्ञानाने कळलीच होती व या स्त्रीयांना अद्दल घडविण्याचे त्यांनी ठरविले.मामांची सत्ता चराचरावर होती.इतकेच काय तर ज्या वस्तु आपल्याला निर्जीव वाटताता त्या ही मामांच्या मर्जीत वागत.मामांनी स्त्रियांना दुसर्या दिवशी मोठ्या प्रमाणात दूधातून लोणी काढण्याची आज्ञा केली.आज्ञा केल्यावर सर्व जन आपापल्या कामात व्यस्त झाले व मामा ताकाच्या डेर्याजवळ आले‌.त्यांनी त्या ताकाच्या डेर्याला आज्ञा केली , "उद्यापासून तुझ्यातून लोणी निघेल तर माझ्या पायात खेटर आहे.हे लक्षात ठेव!" असे म्हणून मामा तिथून निघून गेले.दुसर्या दिवशी लगमव्वा आज्ञेप्रमाणे ताक करण्यास बसली.एकतास गेला,दोन तास गेले,तीन तास गेले ,चार तास गेले तरी लोणी काही आले नाही.खुप स्त्रियांनी देखील प्रयत्न केला पण लोणी काही आले नाही.शेवटी कंटाळून त्यांनी काम बंद केले.हाच प्रकार सलग तिनं दिवस झाला.शेवटी त्या स्त्रिया मामांना शरणं आल्या ,त्यांना आपली चूक लक्षात आली.त्यांनी मामांची क्षमा मागितल्यावर मामांनी ताकाला , "बारो बेन्याप्पा!(लोण्या ये बाबा) असे म्हणताच .ताकावर लोण्याचे गोळे तरंगु लागले.चराचरावरील मामांची ही सत्ता सर्वांसाठी अचंबित करणारी होती.सजिवांवर प.पू.मामांची पूर्ण सत्ता होतीच पण निर्जिव सृष्टीवर ही मामांचा पूर्ण अधिकार होता.याचे अनेक उदाहरण आपल्याला मामांच्या दिव्य चरित्रात जागो जागी बघायला मिळतात.अशी सत्ता आपल्याला फक्त भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या चरित्रातच बघायला मिळते.माउलीनीही निर्जीव भिंतीला आज्ञा देऊन चालते केले होते.यावरुन आपल्याला मामांचा अधिकार लक्षात येईल.मामांची पंचमहाभूतांवरही सत्ता ,नियंत्रण होते.त्या लिला ही चरित्रात आल्या आहेत.नियंत्रण म्हणजे शब्दशः नियंत्रण असाच अर्थ मला मांडायचा आहे.मामांनी मालकाच्या हक्काने पृथ्वी,हवा ,पाणी आग,आकाश यांना आपली आज्ञा केली आणि ही आज्ञा त्या पंचमहाभूतांनी मामांनी सांगितल्या प्रमाणे पाळली आहे.शब्द मर्यादेस्तव त्या लिला इथे देता येणार नाही.


एकदा एक अतिशय दयनीय गरीब माणूस मामांना शरणं आला आणि आपल्याला कर्जातून सोडविण्याची प्रार्थना करु लागला.कृपाळू मामांना त्याची लगेच दया आली व तो खरंच शुद्ध अंतःकरण असलेला माणूस आहे हे त्यांनी जाणले.तो खरचं दु:खात होता हे जाणून मामा लागलीच चालता चालता थांबले.ते जमिनीवर बसले.त्यांनी आपल्या हातातील काठी तिनं वेळा जमीनीवर मारली तोच जमिनीतून एक गाठोडे वर आले त्यांनी त्या गरिबाला त्या गाठोड्यातून हवे तेवढे चांदिचे शिक्के घेण्यास सांगितले.त्या माणसाने त्याला निकड होती तेवढेच पैसे घेतले.मामांनी लगेच हातातील काठी जमीनीवर मारता क्षणी ते आले तसे जमीनीत गुप्त झाले. कानपूर गावाजवळ लोकांना मरीच्या आजारातुन फक्त एका रिंगणात रहायला सांगुन वाचविले.तसेच एकदा अचानक वादळ सुटलं त्यात मामांना मेढ्यांना सांभाळायला धावपळ करावी लागली.धावपळीत मामांची चप्पल ,घोंगडे आणि डोक्याचा पटका सतत सटकु लागला.मामांना याचा अतिशय त्रास झाला .मामांनी या तिघांनाही जमिनीवर ठेवून आपली काठी वाजवली व शिव्या देत दम दिला.त्यानंतर या वस्तु जिवनात कुठलाही प्रसंग आला तरी जागेच्या हलल्या नाही.या प्रसंगाचे अनेक जन आजही साक्षीदार आहेत.शरण आलेल्याला संतान प्राप्तीचे आशिर्वाद दिले,अनेकांचे रोग दूर दिले असे अनेकाविध लिला चमत्कार मामांनी केले.कित्येक वेळा गरीब लोक मामांपर्यंत पोचू शकत नव्हते त्यांच्यापर्यंत मामा स्वतः जात.


               प.पू.मामांचा वेश अगदी साधा पण निटनेटका होता‌.स्वच्छ धोतर ,पूर्ण बाह्यांचा शर्ट,डोक्यावर फेटा,पायात कातडी साध्या चपला,हातात एक काठी,सुमारे सहा फूट उंची,मध्यम बांधा,प्रमाणबद्ध सडपातळ शरीरयष्टी,निमगोरा सावळा वर्ण,आखीव रेखीव चेहेरा,भव्य कपाळ आणि भेदक तिक्ष्ण नजर असे मामांचे एकंदरीत व्यक्तीमत्व होते.मामा कानडी व मराठी या दोन्ही भाषा बोलत. मामा दर एकादशीला उपवास करत पण स्नान मात्र दर द्वादशीला करत.पण मामांचे कपडे नेहमी शुभ्रच राहत.त्यांच्या शरीरातुन दिव्य सुगंध येत असे.त्यांना भक्ती प्रेमाने केलेले भजन अतिशय प्रिय होते.ढोंगीपणा,अनाचार वृत्ती आणि अंधश्रद्धा यांचा त्यांना प्रखर विरोध होता.मामांच्या पत्नी सत्यव्वांना दिवस गेले पण मामांची आज्ञा न मानल्याने होणारा पुत्र जन्माआधीच मृत झाला व मामांचा नावाला असलेला संसार संपुष्टात आला. लवकरच मामांची आपल्या सद्गुरु माउलींशी भेट झाली.मामांचे सद्गुरु श्रीमुळे महाराज हे गाणगापूर चे दत्तप्रभु भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या परंपरेतील एक महापुरुष होते.भगवान राम व कृष्णांप्रमाणे मामांनी ही सद्गुरुंच्या अनुग्रहाचा अवलंबन केला.सद्गुरु मुळे महाराज यांचे पूर्ण नाव श्री बाळकृष्ण जयराम मुळे.यांचा जन्म मार्गशीर्ष द्वितीया शके १७९१ ला सन १८६९ रोजी दुपारी दोन वाजता सोळांकूर ,तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी झाला.बालपणीच यांनी घराचा त्याग केला.लवकरच त्यांना आपले सद्गुरु मौनी महाराज यांचा अनुग्रह लाभला.त्यांनी ही अनेक विलक्षण लिला केल्या.ते विठ्ठलाची भक्ती करत.पंढरपूर येथे दरवर्षी एकदा देवांच्या दर्शनाला जात.त्यांची आशिर्वाद देण्याची पद्धत ही फार विलक्षण होती.ते आशिर्वाद देतांना भक्तांना शिव्या देत व त्यातच त्या भक्तांचे कल्याण होत असे.बाळुमामांनी आपल्या पत्नीचा त्याग केला.ते आपल्या मेंढ्या राखता राखता भक्तांचे कल्याण करत होतेच.काही दिवस गेल्यावर एके दिवशी आकाशवाणी झाली की, "बाळु तू गुरु करुन घे.त्याशिवाय तुला तपश्चर्येचे फळ मिळणार नाही." मामा यावर सतत विचार करु लागले. पण आता गुरुंना शोधायचे कसे हा प्रश्न त्यांना पडला.त्यावर त्यांनी एक उपाय काढला.ते फुकटातच लोकांची भुतं बाधा दूर करत.पण इथून पुढे कुणीही आले तर त्यांच्या कडून दक्षिणा म्हणून सव्वा रुपये घ्यायचे त्यांनी ठरविले.जमतील ते रुपये न मोजता जवळ ठेवायचे.जो कुणी ते रुपये व‌ जमा झालेली रक्कम मागेल तेच माझे गुरु असा त्यांनी निश्चय केला.चार सहा महिने पैसे गोळा केल्यावर एकदा मामा शेणगांवच्या दत्त मंदिरात गेले तिथे मुळे महाराज होते.ते मामांना म्हणाले, "बाळू माझे पैसे कुठे आहेत ते दे!"  मामांनी प्रश्न केला "किती पैसे ते सांगा?" मुळे महाराज म्हटले, "१२० रुपये आहेत." अशा प्रकारे मामांची आपल्या सद्गुरु माउलींशी भेट झाली. पुढे यथावकाश त्यांनी मामांवर आपल्या कृपा करुणेचा अनुग्रह केला.मामा आपल्या सद्गुरुंचा अतिशय आदर करत.ते आपल्या गुरुंचा नेहमी सल्ला घेत.ते सांगतील त्याप्रमाणे वागत.ते गुरुंना कधीही प्रतिप्रश्न करित नसत.मुळे महाराज पक्के मांसाहारी होते आणि मामा पक्के शाकाहारी.महाराजांकडे मामा गेले की महाराज म्हणायचे "माझा लिंगायत देव आलाय.सर्व स्वच्छता , टापटीप ठेवा."  मामांनी व महाराजांनी अनेक लोकांचे दु:ख दूर केले,त्यांना सन्मार्गाला लावले.लवकरच मुळे महाराजांनी सन १९४८ ला चैत्र शुद्ध प्रतिपदेला सायंकाळी समाधी घेतली व आपली ईहलोकाचे अवतार कार्य पूर्ण केले.महाराजांनी गारगोटी ला देह ठेवला आणि मामा इकडे गडहिंग्लज येथील औरनाळ येथे होते.मामा अचानक बकर्यात गडबडा लोळायला लागले. त्यांच्या अंगाची लाही लाही होऊ लागली.मामांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या.त्यांनी तिन दिवस अन्नाला स्पर्श केला नाही व ते कुणासोबत ही बोलले देखील नाही.

                                        पुढे १९३१ साली एका दुपारी आकाशवाणी झाली, "बाळू तू लोकसंग्रह करण्यासाठी पांडुरंगाचा सप्ताह कर.मोठे अन्नदान कर.तुझ्या तपश्चर्येला फळ मिळेल." मामांनी याचा विचार केला.मामांनी या सप्ताहाला "भंडारा" असे नाव दिले.सन १९३२ ला मेतके या गावी पहिला भंडारा सप्ताह करण्यात आला.त्यानंतर तो भंडारा उत्सव काही कारणाने मेतक्याला करण्याचे मामांनी नामंजूर केले आणि मग तो विविध ठिकाणी झाला.अखेर फिरत फिरत तो भंडारा उत्सव हा आदमापूर येथे आला व मामांनी देह ठेवेपर्यंत तिथेच साजरा झाला.आजही मामांचा "भंडारा" उत्सव हा आदमापूर येथील समाधी मंदीरात सर्वात महत्वाचा उत्सव आहे.हजारो लोक मामांचा भंडारा आशिर्वाद घेण्याकरिता उत्सवात जातात.यानंतर मोठा काळ मामांनी धनगरांच्या मेंढी पालणाचे काम अखंड केले.जणू हे काम करता करता मामांच्या रुपात अवतरलेले भगवंत दिन,दुबळ्या ,दु:खी जिव जे मामांपर्यंत पोचू शकत नव्हते त्या सर्वांपर्यंत स्वतः जाऊ लागले.आपल्या भक्त उद्धाराचे काम व त्यावेळी त्यांनी केलेल्या लिला जर लिहील्या तर एक काय असे शेकडो लेख तयार होतील.त्यात मामांनी कुणाचे कॅन्सर सारखे भयंकर हे रोग घालवले तर कुणाचे दारिद्र दूर केले.कुणाची करणी बाधा दूर केली तर कुणाला भूत बाधेतून सोडविले.अशा अनेकाविध डोके सुन्न करणारे अलौकिक लिला चमत्कार मामांच्या चरित्रात आहे.विशेष असे की मामांच्या या लिला प्रत्यक्ष अनुभवनारे भक्त आजही जिवंत आहेत.असे भक्तांचा उद्धार करणारे प्रचंड अगम्य कार्य करत करत मामांनी सर्वदूर संचार केला.पुढे १९६६ साली मामांनी आपला देह ठेवण्याचा निर्णय काही भक्तांना सांगितला.त्यासाठी खुप आधी त्यांनी जागाही निवडली होती.१९६२ साली मामा आदमापूर येथे तळावर होते.तेथील एका वृक्षाखाली मामा निवांत बसले होते. त्यावेळी आदमापूरचे सरकार (जमिनदार मोठे प्रसिद्ध गृहस्थ) व इतर काही लोक मामांजवळ बसले होते.त्यावेळी मामांनी एका माळाकडे जिथे भाताची शेती होती बोट दाखवत विचारले, "हे माळ कुणाचे?" सरकार ने सांगितले की , "माझं आहे जी!" मामा म्हटले, "तिथे मला थोडी जागा देशील काय?" सरकारने तात्काळ मामांना ती जागा अगदी नम्रपणे अर्पन केली.मामांनी यावेळी ही जागा का मागितली हे कुणासही ठाऊक नव्हते पण नंतर मात्र सर्वांना मामांच्या या मागणीचा अर्थ कळला.१९६६ पासून मामा समाधी बद्दल थोडेफार बोलू लागले.अगदी गुढ शब्दात ते सुचना देऊ लागले.मामा निंगापूर ला होते तिथे त्यांना ताप आला.मामा अशक्त झाल्यामुळे त्यांना आदमापूर येथे आणल्या गेले. ४ सप्टेंबर श्रावण वद्य चतुर्थी आपल्या जवळच्या भक्तांना मामांनी बोलाविले.सांगितले मला बघून घ्या,डोळे भरुन बघा. शनिवारी मध्यरात्र उलटल्यावर मामांनी आपले अवतार कार्य संपविले.तो दिवस होता ४ सप्टेंबर श्रावण वद्य चतुर्थीचा.मामांच्या समाधीची वार्ता लवकरच सर्वदूर पसरली.जो तो मिळेल ते वाहन घेऊन आदमापूरला मामांच्या अखेरच्या दर्शनाला आला.सर्वांचे दर्शन झाल्यावर मामांच्या देहाची विधीयुक्त पुजा झाली व मामांच्या देहाला समाधी देण्यात आली.


             कोल्हापूरातील एका धनगर भक्ताला मामा एकदा म्हणाले होते. "अरे मी मरणारा मानव नव्हे! गोरीतनं (समाधीतून) माझं हाडं तुझ्याशी बोलतील.ध्यानात ठेव!" या वाक्याची प्रचिती मामांच्या महासमाधी नंतर भक्तांना लगेच आली व आजही येत आहे.मामांचा आवडता भक्त बाबुराव याला मामांच्या समाधीचे वृत्त उशीरा कळले.तो चौथ्या दिवशी आदमापूरला रडत रडत निघाला‌.रात्री उशीरा पोचल्यामुळे त्याला समाधी स्थानाचे ठिकाण माहिती नव्हते.गावातील लोक कुणीच दिसत नव्हते.तेव्हा अंधारात वाट शोधत तो निघाला.पण तो समाधी स्थानाच्या विरुद्ध दिशेला जात होता.तेवढ्यात अंधारातून त्याला मामांचे स्पष्ट शब्द ऐकू आले.मामा त्याला म्हटले, "ए बावच्या! असं वेड्यासारखं तिकडं आडाकडं कुठं चालला आहेस? मी इथं बसलोय नव्हं?" बाबुराव आवाजाच्या दिशेने गेला तर त्याला मामांचे समाधीस्थळ दिसले.रात्री तिथेच घोंगडी टाकून तो  झोपला.सकाळी तळावरचे लोक आल्यावर सर्वांना त्याने ही हकिकत सांगितली तेव्हा सर्व मामांच्या समाधीपुढे नतमस्तक झाले.आपल्या मानसभगिनी श्रीमती पारुबाई कुंभार यांना मामांनी स्पष्ट शब्दात सांगितले होती की, "पारे,बाळू धनगर मेला,असं जग म्हणलं.बोंब मारतील! पण लक्षात ठेव,मी मरणारा धनगर नव्हे! माझ्या उपवासाचे पारणे कायमपणे मी तुझ्या हातच्या अन्नानेच सोडणार आहे! माझा नैवेद्य तू चुकवू नकोस! मी अमर आहे! कु़ंभारणी ,ध्यानात ठेव!!" पारु कुंभारीण ज्यांना सर्व भक्त पारुमामी म्हणून ओळखत असत.मामांचे हे शब्द तसेच अखेरपर्यंत पाळले.त्या दर द्वादशीला मामांसाठी नैवैद्य घेऊन येत असत.कित्येकदा त्यांनी आणलेले पदार्थ त्यांच्या गाठोड्यातून अदृश्य झाल्याचा अनुभव अनेक लोकांनी घेतला होता.१९९६ ला मामांचे नामस्मरण करता करता त्या मामांच्या चरणी लिन झाल्या.असे हे बाळुमामांचे दिव्य चरित्र.त्याचे स्मरण ही झाले तरी अंगावर रोमांच उभे राहतात.इतके ते विलक्षण दिव्य आहे.मामा हे मानव रुपात अवतरलेले प्रत्यक्ष परब्रह्म होते.मामांच्या संपूर्ण चरित्रात याचे दाखले मिळतात.अशा या धनगर रुपात अवतरलेल्या परब्रह्माच्या चरणी माझी ही शब्दसुमनांजली मी अर्पन करतो.मामा परमदयाळू आणि शरणागतवत्सल आहेत.मी त्यांच्या चरणी माझे शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो आणि आपल्या सर्वांवर मामांनी सदैव त्यांच्या कृपा करुणेची छाया धरुन ,आपल्या सर्वांकडून आपल्या सद्गुरु माउलींची सेवा करु घ्यावी ही प्रार्थना करतो.


       ✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🏻🌺🌹🌸🌿

#महाराज_ज्ञानेश्वर_माउली_समर्थ🙏🏻🌺🌹🌸🌿

Tuesday, October 4, 2022

दसर्‍याचे सिमोल्लंघन 🙏महायोगिनी अक्का महादेवी🕉️🙏📿🌸🌿

 


दसर्‍याचे सिमोल्लंघन 🙏🌸☘️🔥🔱🕉️📿

महायोगिनी_अक्का_महादेवी🕉️🙏📿🌸🌿


               आज विजयादशमी आपल्या "प्रणम्या मातृदेवता" या लेखमालेतील शेवटचा व समारोपाचा लेख.खरंतर हा समारोप नाही तर ही सुरुवात असावी हीच श्रीगुरु चरणी प्रार्थना.हा लेख व्हावा ही ईश इच्छा असावी कारण तसे योगायोग ही घडले आणि आमच्या हेमंत दादांनी इच्छा प्रगट केली की सिमोल्लंघनाला तू अक्का महादेवींवर एक लेख लिही.मलाही अतिशय आनंद झाला कारण अलिकडेच अक्का महादेवींचे चरित्र वाचले होते.त्यामुळे आनंदाने श्रीगुरु महाराजांचे चरणी आणि अक्का महादेवी माउलींच्या चरणी प्रार्थना केली व हा लेख व्हावा अशी बालसुलभ मागणी ही केली.अक्का महादेवींचा लेख आजच का? तर मला हा तत्कालीन समाजव्यवस्थेला फाटा देणार्‍या एका स्त्री संता विषयीचा आदर वाटतो,ज्यांनी टोकाचा अपमान ,तिरस्कार,सहन केला पण त्या डगमगल्या नाहीत. ज्यांच्या चरित्रात भक्तिचे सिमोल्लंघन,लज्जेचे सिमोल्लंघन , तपाचे सिमोल्लंघन, शरणागतीचे सिमोल्लंघन ,समाज व्यवस्थेचे सिमोल्लंघन अशा अनेक रसांचा आविर्भाव आहे.महादेवींनी आपल्या समाजात मानलेल्या सर्व नियमावलींना धूडकावत गुरु निष्ठेच्या ,भक्तीच्या बळावर परमपद प्राप्त केले...हे मला व्यक्तीगत 'सिमोल्लंघनच' वाटते.आजचा हा लेख ही भगवती अक्का महादेवींच्या सुकोमल चरणी अर्पण करतो आहे.


अक्का महादेवीचा जन्म कर्नाटक राज्यात शिमोगा जिल्ह्यातील उडुतडी (सध्याचे उडिताणी) या गावी झाला होता.अक्का मातोश्रींच्या वडिलांचे नाव होते ओंकार शेट्टी व आईचे नाव होते लिंगम्मा.हे दोघेही अतिशय धार्मिक व शिवभक्त असलेले दाम्पत्य होते.ओंकार शेट्टी हे मोठे व्यापारी होते.त्यांनी सचोटीने व्यापार करुन संपत्ती, प्रतिष्ठा आणि समाजात मान मिळविला होता.ते अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते.त्यांना पूजाअर्चा करणे,ध्यान करणे अतिशय आवडत असे.गावाजवळील चन्नमल्लिकार्जुन भगवान हे त्यांचे आराध्य होते.जवळच एक विरशैव संप्रदायाचा मठ होता.शिवाचार्य नावाचे एक महान त्रिकालज्ञ साधुपुरुष तेथील मठाधिपती होते.ओंकार शेट्टी व लिंगम्मांच्या लग्नाला बराच काळ लोटला होता तरी पण अजुन त्यांना संतांन प्राप्ती झाली नव्हती.याचे शल्य सदैव त्यांना सतावत होते.लिंगाम्मा यांना हे दु:ख सदा हृदयात बोचत असे.त्या पुत्रप्राप्तीसाठी भगवान चन्नमल्लिकार्जुनाच्या चरणी सतत प्रार्थना करित असत. पुढे विरशैव मठाधिपती असलेल्या शिवाचार्यांनी श्रीबसवेश्वरांच्या लिंगायत धर्माची दिक्षा घेतली व 'गुरुलिंगदेव' हे नाव धारण केले.एक दिवस गुरुदेव लिंगदेवांच्या दर्शनास गेले असता गुरुदेव लिंगाम्मा ला म्हणाले , "मुली शिवाच्या इच्छेप्रमाणे तुला एक अलौकिक कन्यारत्न होणार आहे.ती आपल्या सामर्थ्याने तुमच्याच कुळाचा नाही तर सार्‍या मानवकुळाचा उद्धार करणार आहे.गुरुदेवांचे हे शब्द ऐकून दोघांनाही अतिव आनंद झाला.गुरुदेवांचा आशिर्वाद फळाला आला व लवकरच लिंगाम्मांना दिवस गेले.जसजसे दिवस जाऊ लागले तसेतसे लिंगाम्मांना जगावेगळे डोहाळे होऊ लागले.दिवसेंदिवस त्यांची वृत्ती आध्यात्मिकतेकडे झुकू लागली.त्यांना दागदागिने नकोसे झाले.रोज त्या पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करु लागल्या.त्यांना जास्तीत जास्त वेळ ध्यान करावे वाटू लागले.त्यांचा चेहेरा अतिशय तेजस्वी दिसू लागला.लवकरच शुभमुहूर्तावर लिंगाम्मांच्या पोटी एक अतिशय सुंदर कन्यारत्न जन्मास आले.पुढे या बाळाला थोर संत जंगमस्वामी त्रिकालज्ञ श्रीमुरुळसिद्धेश्वर महाराज यांनी आपला कृपा आशिर्वाद दिला व कानात गुरुमंत्राचा उच्चार केला होता.श्री महाराजांनीच या दिव्य कन्येचे नाव महादेवी असे ठेवले .हा आशिर्वाद, दीक्षेचा समारंभ होताच स्वामी आपल्या स्थानी निघून गेले.ओंकार व लिंगाम्माच्या घरात एक दैवी चैतन्य महादेवीच्या रुपाने दिवसेंदिवस वाढू लागले.कौतुकात नी लाडाकोडात महादेवी मोठी होत होती.तिन वर्षांची झाल्यावर ती एकटीच देवघरात देवापुढे जाऊन हात जोडून बसू लागली.आई वडिल तिला घेऊन गुरुलिंगदेवांच्या दर्शनास जाऊ लागले.


                                 आपल्या वडिलांना ताडपत्री वरील धार्मिक ग्रंथाचे वाचन करतांना महादेवी बघत असे.तिला ही ते वाचावे वाटू लागले.तिने आपल्यालाही वाचन शिकायचे आहे असा हट्ट धरला.खरे पाहता त्या काळात स्त्रीयांना वाचन व इतर शिक्षण घेता येत नसे.पण महादेवी ने हट्ट केल्यामुळे वडिलांनी तिला गुरुकुलात पाठविण्याचे ठरविले.पण तत्कालीन अंधश्रद्धा , रुढी-परंपराने ग्रासलेल्या समाजात ही बाब सामान्य नव्हती.ओंकारांनी महादेवी ला बरोबर घेऊन मठ गाठला.मठात जाऊन आपल्या कन्येची इच्छा गुरुदेवांना कळविली.गुरुदेवांनी महादेवी ला शिक्षण घेण्याची परवानगी दिली व समाजातील रुढी ,परंपरांना झुगारुन नवी दृष्टी समाजाला देण्याची प्रेरणा दिली.या मागे गुरुदेवांचा खुप मोठा विचार होता.अंधश्रद्धा ,रुढी-परंपरा यांनी ग्रासलेल्या समाजाला नवी दिशा देण्याचे कार्य करायचे होते व हाच संदेश बसवण्णांनी दिला होता.समाजात शिक्षणामध्ये समानता आल्याशिवाय जुन्या रुढी कशा नष्ट होतील त्यामुळे स्त्रीयांना शिक्षण देणे गरजेचे आहे हे ओंकार ला गुरुदेवांनी सांगितले. त्यांनी मोठ्या धैर्याने,धाडसाने या मार्गावर चालण्याची आज्ञा ओंकारला केली.काही दिवसांत महादेवी गुरुकुलात यायला लागली.पण तत्कालीन समाजाला ही घटना मान्य नव्हती.लोकांमध्ये चुळबुळ सुरु झाली.संस्कृतचे शिक्षण ही महादेवीला दिले जाऊ लागले.तेव्हा नगरातल्या उच्चवर्णीयांनी त्याला कडाडून विरोध केला.त्यांना धमकीही मिळू लागली.पण त्याला गुरुदेवांनी भीक घातली नाही.ते खंबीरपणे उभे राहिले व न डगमगता त्यांनी महादेवीला संस्कृतचे ही शिक्षण दिले.महादेवी ही तल्लख बुद्धीची,एकपाठी होती.तिची प्रचंड ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती पाहून अध्यापक ही स्तंभित होत असत. गुरुदेवांनी महादेवीला धर्मज्ञान, तत्वज्ञान,अध्यात्मज्ञान द्यायला सुरुवात केली.ही त्याकाळात स्वतःतच एक नव्या विचारांची क्रांती होती.हा समाजासाठी मोठा बदल होता.गुरुदेवांनी महादेवीला तत्वज्ञानी शरणांची, बसवण्णांची वचने शिकवायला सुरुवात केली.याच काळात महादेवींनी ही काही वचने‌ स्वतः ही रचण्यास सुरुवात केली.यथावकाश महादेवी मोठी होऊ लागली. शिक्षणाने तिच्या विचारांच्या कक्षा रुंदावत चालल्या होत्या.त्या चिंतनाने महादेवी अधिक प्रगल्भतेकडे वाटचाल करु लागली.दिवसेंदिवस महादेवी भगवान चन्नमल्लिकार्जुनांकडे आकृष्ट होऊ लागली.तिला आता देवांच्या मुळ स्थान श्रीगिरीवर जाण्याची ओढ लागली.पण श्रीगिरीकडे जाणारा मार्ग अतिशय खडतर , कठिण व दुर्गम असल्याचे वडिलांनी तिला सांगितले.तिने याबद्दल गुरुदेवांना विचारले.गुरुदेवांनी महादेवीला श्रीगिरीकडे जाण्याचा मार्ग सांगितला.महादेवी मोठी झाल्यावर गुरुदेवांनी घरी येऊन तिला ज्ञानदीक्षा दिली.आपला वरदहस्त महादेवीच्या डोक्यावर ठेऊन गुरुदेवांनी तिला दीक्षा दिली. त्याच वेळी गुरुदेवांनी महादेवीला इष्टलिंग ही दिले व त्याची साधना कशी करायची याचे संपूर्ण विधान समजावून सांगितले.ते लिंग तळहातावर ठेवत गुरुदेवांनी आता हेच तुझे पती आहेत,यांची पत्नी भावाने सेवा करावी अशी आज्ञा दिली.पण महादेवीच्या आई लिंगम्मा यांना त्यांची अतिशय चिंता वाटू लागली.त्यांनी तिचा विवाह करण्याचे ठरविले व त्यासाठी वर शोधण्यास ही सुरुवात केली.पण महादेवींनी आपल्या आईला स्पष्टपणे सांगितले की , माझा विवाह गुरुदेवांनी आधीच  चन्नमल्लिकार्जुना सोबत लावला आहे.आता मला इतर कुठल्याही पतीची गरज नाही.तरीही लिंगम्मांनी हर एक प्रयत्नाने महादेवी चे मन वळविण्याचा प्रयास केला. पण महादेवींनी आपले सर्वस्व श्री चन्नमल्लिकार्जुनां चरणी अर्पण केले होते.

     

                          पुढे महादेवी मातोश्रींच्या जिवनाला सर्वात मोठे वळण देणारी एक अतिशय महत्वाची घटना घडली.राजा कौशिक हा आपल्या लवाजम्यासह उडूतडी या गावातून जाणार होता.त्यामुळे सर्व गाव सज्ज झाले.ओंकार शेट्टी व इतर सर्व लोक ही आपल्या आपल्या परीने राजाचे स्वागत करण्यास सज्ज झाले.महादेवींना विनवून त्यांच्या सख्यांनी त्यांना ही स्वागतासाठी उभे राहण्यास सांगितले.महादेवींनी त्यांनी हट्ट केल्यामुळे तो हट्ट मान्य केला.थोड्याच वेळात राजाची मिरवणूक त्यांच्यापुढून जाऊ लागली.राजाची नजर तेथे उभ्या असलेल्या महादेवींवर गेली.त्यांच्या तेजस्वी,सात्विक , सुंदर रुपाकडे तो पहातच राहीला.महादेवींच्या सौंदर्यावर भाळून राजा आपले भान हरपून बसला.त्याला आता त्याच सुंदर युवतीचा चेहेरा डोळ्यापुढे दिसु लागला.आपल्या सेवेकांकडून त्याने महादेवींची सर्व माहिती काढली.राजाने सरळ आपल्या घरातील स्त्रीयांना महादेवी कडे पाठवून लग्नाची मागणीच केली व महादेवीला पट्टराणी करण्याचे आश्वासन ही दिले.पण ही मागणी महादेवींनी साफ धुडकावून लावली.ही मागणी धुडकावल्यामुळे आता राजद्रोच्या नावाखाली राजाच्या संतापाला सगळ्यांना तोंड द्यावे लागेल हे महादेवींना माहिती होते.त्या ही विवंचना घेऊन गुरुदेवांकडे गेल्या.सर्व हकिकत गुरुदेवांना सांगितले व यातुन बाहेर निघण्याचा मार्ग ही विचारला.गुरुदेवांनी यावर एक युक्ती सांगितली.गुरुदेव म्हणाले, "महादेवी तु राजाकडे जा.तिथे राहा पण त्याआधी काही अटी त्यांच्यापुढे मांड.जर त्या अटी मान्य असतील तरच तुझ्यासोबत मी राहेल असे ही त्याला निक्षून सांग आणि जर एकाही अटींचे उल्लंघन झाले तर मी तात्काळ राजवाडा सोडून निघून‌ जाईल असे सांग.त्या अटी होत्या,वर्षभरात मी एक महिना व्रतस्थ असते त्या काळात मी कुणालाही स्पर्ष करत नाही व कुणी मला स्पर्ष करणे अगदी वर्ज आहे,त्यावेळी माझा आहार हा दूध व फळांचा असेल ,पुर्ण वेळ मी सोवळ्यातच असेन,मला या काळात इष्टलिंग,जंगम पूजा करायची असेल,माझ्या साधनेत कुणाचाही व्यत्यय आणता कामा नये.सायंकाळी पहिल्या प्रहरापासून ते शेवटच्या प्रहरापर्यंत कोणाचेही मी मुखदर्शन करणार नाही.यातील एकही अट जर तुटली‌ तर मी तात्काळ निघून जाईल.या सर्व अटी सांगून काही दिवसांत महादेवी राजवाड्यात मेन्यात बसून निघून गेल्या.इथे एक गोष्ट लक्षात घेतली‌ पाहिजे महादेवींच्या ठाई इतके अलौकिक वैराग्य विलसत होते की त्यांनी प्रत्यक्ष भगवंतांसाठी राजसुखालाही धुडकावून लावले होते. पुढे जंगम पुजा करण्यासाठी चार जंगम राजदरबारात येणार होते.त्यातील  निजलिंगदेव हे मुख्य होते.महादेवींनी महालात सर्व पुजेची विशेष तयारी ठेवली होती‌ व तिने सर्वांचे यथोचित स्वागत ही केले.राजाची वासना शमन होऊन त्याला सन्मार्ग दिसो अशी ही कामना तिने निजलिंगदेवांकडे केली.पुढे एकदिवस रात्री सर्वजन अगदी भावपूर्ण अवस्थेत भजन करु लागले.त्यामुळे राजाला संताप आला.त्याने जंगमांना तात्काळ महालाबाहेर जाण्यास सांगितले.राजाने महादेवीच्या चारित्र्यावर ही शंका घेतली.निजलिंगदेव, जंगमांचा अपमान आणि आपल्या चारित्र्यावर घेतलेल्या संशयामुळे महादेवी खुप रागावल्या.पण तरीही राजाला तिनं चुका माफ म्हणून त्यांनी अभय दिले होते.पुढे काही दिवसांनी भावसमाधीत लिन असलेल्या महादेवींचे ते तेजस्वी रुप बघून राजाच्या मनात कामवासना उत्पन्न झाली व त्यातून त्याने महादेवीला स्पर्ष केला.झालं मग तर ,महादेवींच्या क्रोधाला पारावार उरला नाही.तिने राजाला म्हटले , "मुर्खा तुला या देहावरच प्रेम आहे ना तर बघ हा देह .माझा स्वामी पती तो चन्नमल्लिकार्जुन आहे.तो दिगंबर असतो मी ही आता दिगंबर होते.बघ काय बघायचे ते बघ.या वस्त्राखाली आहे हा हाडामासाच्या अस्तिपंजर देह,गोरं कातडं ,मलमूत्राचं डबकं,पंचभुतात नाहीसी होणारी ही काया." असे म्हणत महादेवी ने आपले सर्व वस्त्र काढले व राजाच्या तोंडावर फेकले. त्या राजाला म्हणाल्या, "अविवेकी मुर्खा,हे शरीर पाहण्यासाठी ,त्याला स्पर्श करण्यासाठी तू आतुर झाला होतास ना? मी या वस्त्रात सुंदर दिसते ना? आता घे एकदा शेवटचे बघून.त्या वस्त्रांचा तात्काळ त्याग करत महादेवी तशाच नग्न अवस्थेत आपल्या लांब अशा केशसंभाराने अंग झाकून राजमहालाबाहेर निघाल्या.त्या राजदरबारातून तशाच अवस्थेत बाहेर जाऊ लागल्या.सर्व दरबार त्यांना बघून‌ घाबरला ,एका जागी खिळून गेला.कुणाचीही त्यांना थांबविण्याची हिंमत झाली नाही.त्या भर बाजारपेठेतून निघाल्या.लोक‌ तर त्यांना बघून अवाक झाले.महादेवींनी भगवंतांसाठी आता आपल्या लाज लज्जेचाही पूर्णपणे त्याग केला होता.प्रखर ,वैराग्य अंगी बाणलेल्या,भगवंतांशी एकनिष्ठ झालेल्या महादेवी आता गुरुदेवांजवळ येऊन पोचल्या.गुरुदेव त्यांना अशा अवस्थेत बघून आश्चर्यचकित झाले.त्यांनी गुरुदेवांना आता मी बसवण्णांकडे जाणार आहे ,मला तसा इष्टलिंगाने आदेश‌ दिला असल्याचे सांगितले.आता या वस्त्राचा मी त्याग केला आहे.स्त्री देहाकडे काही दृष्टीने पाहणार्‍या लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी मी याचा त्याग केला आहे.पण गुरुदेवांच्या आज्ञेने त्यांनी एक घोंगडी त्यांनी अंगावर पांघरली.


          ‌          आई वडिलांचा ,गुरुदेवांचा निरोप घेऊन त्या तडक कल्याणला निघाल्या.एवढा दूरवरचा प्रचंड प्रवास करत करत महादेवी मार्गक्रमण करु लागल्या.भिक्षा मागत ,मिळेल तिथे आश्रय घेत त्यांचा हा प्रवास सुरु होता.हे सर्व दिव्य करीत असतांना‌ त्या किती चन्नमल्लिकार्जुनांच्या चरणी शरणागत होत्या याचा साधा विचार ही आपण करु शकणार नाही.या प्रवासात भगवान सदाशिवाने त्यांची हर एक प्रकारे कठिण अशी परिक्षा घेतली.इकडे त्रिकालज्ञानी बसवण्णांना हा सर्व वृतांत ज्ञात होताच.त्यांनी इतर संतांना , सेवकांना आपल्या कडे एक महान शिवशरणी महादेवी येणार असल्याचे आधीच सांगितले होते.महादेवी तिथे पोचल्यावर त्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले.तेथील प्रसादमंदिरात त्यांना मोठ्या सन्मानाने नेण्यात आले.पुढे त्यांचे प्रवचन झाले व दुसर्‍या दिवशी त्या बसवण्णांच्या भेटीसाठी कल्याणला निघाल्या.कल्याण ला पोचल्यावर महादेवींना कठोर अशा परिक्षेला सामोरे जावे लागले.त्या सर्व दिव्यातून ही पार होत महादेवी बसवेश्वरांना शरणं गेल्या.पुढे त्या बसवेश्वरांच्या अनुभवमंडपातील अतिशय महत्वपूर्ण व्यक्ती झाल्या .त्यांनी केलेल्या रचना या तत्कालीन संत मांदियाळीत महत्वपूर्ण रचना म्हणून गणल्या जाऊ लागल्या.त्यांच्या वचनांची थोरवी सर्वत्र एकमुखाने गायली जाऊ लागली.अखंड पाच वर्षे महादेवींची कल्याणला बसवेश्वरांच्या मार्गदर्शनाखाली साधना सुरु होती.त्यांचे शिवतत्वाशी एकरुप होत होते.त्या दिवसेंदिवस अंतर्मुख होऊ लागल्या.पुढे भगवान शिवांनी तिला साधनेवेळी संकेत देऊन सांगितले होते की आता आपल्या निजस्थानी तुला लवकरच यायला हवे.त्यासाठी कर्दळीवनातील अतिदुर्गम स्थानी जायला त्या सज्ज ही झाल्या.बसवण्णांची व इतर सर्वांची त्यांनी यासाठी आज्ञा मागितली.सर्वजन या विचारांनी हेलावले.चन्नमल्लिकार्जुनाच्या भेटीसाठी आसुसलेली महादेवी आता श्रीगिरीपर्वत ओलांडून, चन्नमल्लिकार्जुनालाही ओलांडून कर्दळीवनात प्रस्थान करणार होती.महादेवी आपल्या आराध्यांशी एकरुप होण्यासाठी आता कर्दळीवनात निघाली.सर्वांनी जड अंतःकरणाने त्यांना निरोप दिला.ही योगिनी आता आपल्या परमध्येयाकडे निघण्यास सज्ज झाली.त्या मोठा खडतर प्रवास करीत ,दिव्य पार करित श्रीगिरी पर्वतावर पोचल्या.तेथील भयंकर अरण्य,पर्वतरांगा त्यांनी लिलया पार केल्या.पर्वतावर स्थित असलेल्या भगवान मल्लिकार्जुनांच्या गाभार्‍यात त्या पोचल्या.श्रीदेवांचे दिव्य लिंग बघून त्यांना तात्काळ समाधी लागली. त्या भावसमाधीतून बाहेर आल्यावर दुसर्‍या दिवशी त्यांनी पाताळगंगेत स्नान केले.तेथील पुजार्‍यांना कर्दळीवनात जाण्याचा रस्ता विचारला व देवांची आज्ञा घेत त्या मार्गस्थ झाल्या.कर्दळीवनाचा अतिशय भयान , महाकठीण , अतिदुर्गम रस्ता पार करत त्या एका गुफेजवळ आल्या.ते स्थान त्यांनी आता आपल्या तपासाठी निवडले.काही दिवसांनी वैराग्य उत्पन्न झालेला राजा कौशिक व महादेवींच्या प्रिय सखी शिवानी ही तेथे पोचले.त्या दोघांनाही इष्टलिंगाची दिक्षा महादेवींनी दिली.त्यानंतर महादेवी आपल्या कठोर साधनेत एकरुप झाल्या.त्यांनी सर्वस्वाचा त्याग तर केव्हाच केला होता.आता हा देह ही त्या चन्नमल्लिकार्जुनाला अर्पण करणार होत्या.त्या ध्यानाच्या अखंड समाधीत लिन झाल्या व लवकरच ध्यानावस्थेत त्यांनी आपला देहही शिवयोग साधून शिवार्पण केला. अशी ही महायोगिनी अक्का महादेवींची दिव्य चरित्र गाथा.खरंतर ही दिव्य कथा मला थोड्याच शब्दात मांडण्यासाठी बराच भाग वगळावा लागला.अक्का महादेवी यांचा त्याग ,भक्ती,वैराग्य इतकं अपरिमित आणि एकमेवाद्वितीय आहे की कुणीही वाचल्यावर अवाक होऊन जाईल.अक्का महादेवी या एक अतिशय महान विभूती होत्या.आपल्या "प्रणम्या मातृदेवता" लेखमालेची सांगता मी या लेखाने आज करतो आहे याचे मला अतिव समाधान आहे.हा‌ लेख मी अक्का महादेवी माउलींच्या चरणी अर्पण करतो आहे व त्यांचे चरणी कोटी कोटी वंदन करुन ही सेवा करुन घेतल्याबद्दल श्रीचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.या दहा ही स्त्री संत रत्नांची ही महागाथा आपल्या सर्वांच्या जिवनात विचारांचे,भक्तीचे ,आचरणाचे,प्रेमाचे,विवेकाचे,ज्ञानाचे ,सेवेचे,साधनेचे सिमोल्लंघन करो आणि आपल्या जिवनात नवचैतन्याची विजयादशमी साजरी होवो‌ हीच माझी अक्का महादेवी व सकल संतांच्या चरणी प्रार्थना.

    ✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

 श्रीदत्त शरणं मम 🌿🌺🙏

महाराज ज्ञानेश्वर माउली समर्थ 🌿🌺🙏

{ अक्का महादेवींचे संक्षिप्त चरित्र लिहितांना त्यासंबंधी जास्त साहित्य उपलब्ध‌ होऊ शकले नाही.त्यामुळे या लेखात तृटी असु शकतात.जर आपल्याला तृटी आढळली तर मला तसे कळवावे म्हणजे मला या लेखातील‌ चुकीची सुधारणा करता येईल. }

प्रणम्या मातृदेवता माळ ९ :-भवतारिणी श्री सारदा मॉं🌸🌺🌿 🙏



प्रणम्या मातृदेवता :- माळ ९ 🌸🌿🙏🏻

🌺भवतारिणी  :- श्री सारदा मॉं🌺

आज अश्विन शुद्ध नवमी म्हणजे खंडे महानवमी , नवरात्रातील ९ वा दिवस.आपल्या या "प्रणम्या मातृदेवता" लेखमालेतील शब्दसुमनांची नववी माळ.ही माळ आपण भगवान रामकृष्ण परमहंस यांच्या लिला सहधर्मचारिणी प्रत्यक्ष आदिशक्ती दक्षिणेश्वरी कालिंच्या पूर्णावतार असलेल्या जगविख्यात विभुती, ज्यांचा प्रभाव भारतीयच नाही तर पाश्चात्य लोकांवर ही होता आणि आहे अशा श्री सारदा मॉं च्या श्रीचरणी अर्पण करणार आहोत..सारदा मॉं नी भगवान रामकृष्ण परमहंसांनी देह ठेवल्यावर रामकृष्ण मिशन चे कार्य नुसतेच बघितले नाही तर त्याला दिशा दिली.स्वामी विवेकानंदांसह‌ सर्व संन्यासी शिष्यांना व सर्व भक्त परिवाराला सारदा मॉं नी आधार दिला.त्या या सर्वांच्या आई झाल्या.प्रत्येक अवतारासह त्यांची शक्ती ही स्त्री रुप धारण करुन त्यांच्यासह लिला करण्यास येते.या राम कृष्ण परमहंस अवतारात ठाकुरांना साह्य करण्यासाठी प्रत्यक्ष आदिशक्ती भगवती सारदा मॉं च्या रुपात अवतार धारण करत्या झाल्या.भगवान रामकृष्ण नेहमी म्हणत , "ती साक्षात सारदा आहे- सरस्वती आहे.ज्ञान देण्यासाठी ती आली आहे.ती माझी शक्ती आहे."  ईश्वराचा मातृभाव कशाप्रकारचा असतो हे जगाला दाखविण्यासाठी श्रीसारदादेवींनी मानव देह धारण केला होता.मॉंच्या चरित्रातील या एका वाक्यातून मॉंच्या अतिदिव्य अधिकाराची ,अवताराची कल्पना येते.आज या लेखाद्वारे आपण मॉं च्या चरित्राचे स्मरण करुयात .


श्रीसारदा मॉं चा जन्म मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी,गुरुवार दिनांक २२ डिसेंबर १८५३ ला एका गरीब ब्राम्हण कुटुंबात झाला.मॉं च्या वडिलांचे नाव रामचंद्र मुखर्जी आणि आईचे नाव श्यामसुंदरी होते.बालपणी मॉं चे दिव्य रुप बघण्यासाठी अनेक लोक घरी येत.त्या अतिशय हसर्‍या मुखाच्या होत्या.श्री रामचंद्र मुखर्जींना श्रीजगदंबेचा आधीच दृष्टांत झाला होता व त्यांच्या पोटी अतिशय दिव्य कन्या जन्म घेणार आहे याची कल्पना त्यांना दिली होती.हळूहळू बाळ लिला करीत मॉं मोठ्या होऊ लागल्या.मॉं च्या बाळलिलां बद्दल आज जास्त माहिती उपलब्ध नाही.खेड्यात जन्म झाल्यामुळे व घरी अठरा विश्वे दारिद्र्य असल्याने मॉं ना लौकिक शिक्षण प्राप्त करता आले नाही.बालपणापासूनच मॉं घरकामात हातभार लावीत,स्वैपाक करित.थोड्या मोठ्या झाल्यावर त्या आपल्या वडिलांनाही हातभार लावू लागल्या.एकदा शिहड या आपल्या मातृ गावी मॉं कीर्तन ऐकण्यासाठी आईसोबत गेल्या.ते कीर्तन भगवान रामकृष्ण परमहंस यांचे भाचे ह्रदयराम यांच्या घरी होते.त्यावेळी हृदयरामांनी ठाकुरांनाही आपल्या घरी पालखीत बसवून आणले होते.तिथे पोचल्यावर रामकृष्ण आपल्या भावात तल्लिन होते.तिथे पुष्कळ गर्दी झाली होती.त्या गर्दीत सारदा मॉं ही आपल्या आईच्या मांडीवर बसलेल्या होत्या. सहा वर्षांच्या सारुला शेजारीणीने जवळ घेतले व थट्टेने विचारले , 'लग्न करतेस? मग ह्या सगळ्या मंडळींमध्ये तुला कोण पसंत आहे ?' तेव्हा सहा वर्षांच्या सारु ने रामकृष्णांकडे बोटाची खुण करत यांच्याशी आपल्याला लग्न करायचे आहे असे म्हटले. इकडे घरी रामकृष्ण परमहंसांच्या आई चंद्रमणी आपल्या मुलाचे आता कसे होईल,याला कोण मुलगी देईल या विचाराने दु:खी होऊ लागल्या.एक दिवस भगवान रामकृष्ण आपल्या भावातून बाहेर आले व आपल्या आईला स्पष्ट शब्दात म्हणाले, "इकडे तिकडे पाहणे अगदी व्यर्थ आहे.जयरामवाटी येथील रामचंद्र मुखर्जी ह्यांच्या घरी वधू खूण लावून ठेवली आहे.तेथे जाऊन पहा." लवकरच इ.स १८५९ रोजी वैशाख महिन्यात भगवान रामकृष्णांचा सारदा देवींशी विवाह पार पडला.विवाह प्रसंगी ठाकुरांचे वय २४ तर मॉं केवल ६ वर्षांच्या होत्या. लग्नानंतर ठाकुर मॉंना त्यांच्या माहेरीच ठेवून दक्षिणेश्वरीला गेले.तो ठाकुरांचा साधना काळ होता.त्यावेळी त्यांच्या हृदयात आग होत असे.झोप लागत नसे.जगन्मातेचे रुप त्यांना चराचरात दिसू लागले..या दिव्य काळात त्यांना आपल्या घरच्यांचा,पत्नीचा पूर्ण विसर पडला.इकडे सारदा मॉं आता १३ वर्षांच्या झाल्या.सात वर्ष कठोर साधना केल्यामुळे कृश झालेले ठाकुर त्यांच्या गुरु भैरवी ब्राह्मणी व हृदयराम बरोबर आपल्या गावी कामारपुकुर या गावी आले.लवकरच सारदा मॉं ही तेथे येऊन पोचल्या.श्रीठाकुरांचा दिव्य भावावेश,त्यागपूर्ण , तेजस्वी जिवन या सर्वांचा सारदा मॉं वर प्रभाव‌ पडू लागला. ठाकुरांनाही या आपल्या पत्नीला हर एक प्रकारे उपदेश केला.त्यांना सेवा भाव शिकवीला.जणू आपल्या जगभर चालणार्‍या महान अलौकिक कार्यासाठी ते मॉं ना तयारच करु लागले.सात महिने ठाकुर कामारपुकुर या गावी होते.या काळात त्यांनी अनेक प्रकारे सारदा मॉं ना पारमार्थिक मार्गदर्शन व उपदेश केला.त्यानंतर ठाकुर दक्षिणेश्वरीला परतले व मॉं आपल्या गावी.


पुढे २५ मार्च १८७२ ला सारदा मॉं दक्षिणेश्वरीला राहण्यास आल्या.त्या ठाकुरांची निस्सीम सेवा करु लागल्या.एकदा ठाकुरांनी म्हटले, "तुम्ही काय मला संसारात ओढायला आल्या आहात का?" त्यावर मॉं निश्चयाने म्हणाल्या , "मी कशाला तुम्हाला संसारात ओढू? मी तर तुम्हाला तुमच्या इष्टप्राप्तीत मदत करावयास आली आहे." त्यावेळी मॉं चे वय १९ वर्षांचे होते.मॉं ना आपले अवतार कार्य कळले होते व या वाक्यातून त्यांच्या विचारातील स्पष्टपणा व निश्चय दिसून येतो. रामकृष्ण परमहंस जसे इश्वरी अवतार पुरुष होते तसेच मॉं देखील नित्य सिद्ध अतिमानवी स्त्री होत्या.एकदा मॉं ठाकुरांचे पाय चेपत होत्या .तेवढ्यात त्या ठाकुरांना म्हणाल्या , "बरे,एक गोष्ट सांगा.तुम्ही माझ्याकडे कोणत्या दृष्टीने पाहता?" श्रीरामकृष्णांनी नि:संकोचपणे उत्तर दिले, "जी आई मंदिरात आहे,जिने मला जन्म दिला आहे,तीच माझे पाय दाबत बसली आहे.खरोखर तुम्ही साक्षात आनंदमयी आहात.तिच्याच रुपात मी तुम्हाला पाहतो." या उत्तरातून मॉं चे खरे स्वरुप व मॉं चा असामान्य अधिकार लक्षात येतोच.पुढे इ.स १८७२ रोजी जेष्ठ अमावस्येला फलहारिणीदेवीच्या पूजेच्या दिवशी श्रीरामकृष्णांनी षोडशी पूजा केली.पण ही पूजा वेगळी होती.कारण यावेळी मॉं दक्षिणेश्वरीस होत्या.ठाकुरांनी मॉं चे त्रिपुरसुंदरी रुपात समंत्रक पूजन केले.पूर्ण षोडशोपचार पूजन करतेवेळी मॉं प्रगाढ समाधीत होत्या.समाधिमग्न हे पूजक व समाधिमग्न देवी आत्मरुपात एक होऊन गेले होते.मुद्दाम चरित्रातील एक घटना देतोय.रामकृष्ण देवांचे अतिप्रिय शिष्य श्री स्वामी शिवानंदजी यांनी एकदा आपल्या शिष्याला पत्र लिहीले होते.ते त्या पत्रात मॉं सारदा बद्दल लिहीतात की, "त्या मानवी नाही.त्या साधकही नाही आणि सिद्धही नाही.त्या नित्यसिद्ध आहेत.त्या आदिशक्तीच्या अंशस्वरुप आहेत.काली ,तारा, भुवनेश्वरी ह्यांच्या सारख्याच माताजी ही आहेत. असा माझा दृढ विश्वास आहे."


श्रीरामकृष्णदेवांच्या साधनाकालीन जीवनक्रमाचा अधिकांश इतिहास आज आपल्याला उपलब्ध आहे.परंतु सारदा मॉं चा साधना काल हा जास्तीत जास्त काळ एकांतात व्यतित झाला असल्याने तो अज्ञातच आहे. षोडशी-पूजनाच्या रात्रीच जणू,सारदा मॉं चे आध्यात्मिक जीवनाचा प्रथम भाग प्रगट झाला.तेव्हापासून त्यांनी साधन-भजनादींचे अनुष्ठान नियमपूर्वक स्वीकारले.ईश्वराचे ध्यान करण्यात त्या रात्ररात्र व्यतीत करु लागल्या.एकदा आपली भाची नलिनी देवी हिच्या जवळ त्या म्हणाल्या होत्या, "मी जेव्हा तुझ्याएवढी होते तेव्हा मला केवढा कामाचा डोंगर उपसावा लागत असे.पण त्याही काळी ,सगळे काम सांभाळून मी एक लाख जप करीत असे." या वरुन त्यांच्या साधनेची पुसटशी कल्पनाच आपण करु शकतो.पुढे पुढे तर मॉंना ही वेळोवेळी भाव समाधी लागत असे.याचे अनेक उदाहरण मॉं च्या चरित्रात दिलेले आहेत.शब्दमर्यादेस्तव ते आपल्याला घेता येणार नाही.तरी एक प्रसंग मुद्दाम इथे देतो.ठाकुरांच्या स्त्री भक्त योगींद्रमोहिनी या अनेक वेळा दक्षिणेश्वरीस येत व ठाकुरांच्या,मॉं च्या सहवासात राहून तृप्त होत.एकदा असेच त्या मुक्कामी आल्या होत्या.मॉं त्यांना आपल्या जवळच झोपायला लावित. एका रात्री बाहेरुन अचानक बासरीचा आवाज यायला लागला.तो आवाज ऐकून मॉं तत्क्षणी भावसमाधी अवस्थेत गेल्या.कितीतरी वेळ मॉं त्या अवस्थेत स्थिर होत्या.खुप वेळ गेल्यावर त्या देहस्थितीत परतल्या.अगदी लहानसे कारण घडले तरी तेवढ्यानेच सारदा मॉं भाव समाधीत जात असत.दक्षिणेश्वरीला आल्यापासून ते ठाकुरांनी देह ठेवेपर्यंतचा १५ वर्षांचा काळ हा मॉंच्या कठोर साधनेचा , तपश्चर्येचा काळ होता.मॉं ना ठाकुरांनी कधीही एकेरी शब्दात संबोधन केले नाही.एकदाच चुकुन ठाकुर मॉं ना "तु" म्हटले तेव्हा त्यांना त्याचे अमाप दु:ख झाले.यावरुन मॉं बद्दल असलेला आदर किंवा मॉं च्या विलक्षण अवतारा बद्दल लक्षात येते.इतरांना जरी मॉं वरवर सर्वसामान्य दिसत असल्या तरी त्यांचे खरे रुप ठाकुरांनाच ज्ञात होते.मातीजींच्या जिवनाच्या माध्यमातून ठाकुरांनी जगासमोर स्त्रीत्वाचा एक नवा आदर्श प्रस्थापित केला.मातृत्वाच्या विकासाची नवी कल्पना प्रस्थापित केली. एकदा इ.स १९०७ मध्ये एका भक्ताने मॉं ना विचारले , "तुम्ही सगळ्या जगाची आई आहात का?" मॉं म्हणाल्या , "हो." अतिशय चकित होऊन त्या भक्ताने पुन्हा विचारले,. "अनेक प्राणी आहेत,जिवजंतू आहेत,त्या सगळ्यांची आई ही तुम्हीच आहात का?" मॉं सारदा सि:संकोचपणे म्हणाल्या, "होय,मी त्या सर्वांची सुद्धा आई आहे." यावरून मॉं च्या रुपात/अवतारात ठाकुरांनी जगासाठी मातृभावाचे अलौकिक प्राकट्याच केले होते.असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.

                                   

हळूहळू आपल्या स्नेहाने आणि ममतेने सगळ्या भक्तांना मॉं नी आपल्याकडे आकर्षित केले.पुढे ठाकुरांना गळ्याची व्याधी उद्भवली.त्यांनी पाच वर्षा आधीच मॉं ना आपल्या प्रयाणाची कल्पना देऊन ठेवली होती.ती व्याधी वाढत जाऊन इ.स १५ ऑगस्ट १८८६ ला ठाकुरांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला.ठाकुरांच्या पवित्र देहाचा अंतिम विधी झाल्यावर मॉं आपले सर्व सौभाग्य अलंकार काढीत होत्या.त्यांनी आपल्या हातातील बांगडीला हात लावताच ठाकुर तिथे चिन्मय देहाने अवतरले व त्यांना म्हणाले, "मी काय मेलो आहे? हातातील हे सौभाग्य चिन्ह का उगीच काढता?" त्यानंतर मॉं ना ठाकुरांच्या नित्य अस्तित्वाची साक्ष पटली व त्यांनी त्या बांगड्या पुढे तशाच ठेवल्या.रामकृष्णांनी देह ठेवल्यावरही या सगळ्या भक्तांची ,शिष्यांची जबाबदारी मॉं नी सांभाळली होती.पुढे माताजी ठाकुरांच्या विरहाने इतक्या व्याकुळ झाल्या की त्यांनी आपला देह ठेवण्याचा विचार केला होता.तेव्हा ठाकुर पुन्हा चिन्मय रुपात प्रगटले व त्यांना म्हणाले , "नाही,तुम्हाला राहावेच लागेल.अजून पुष्कळ कार्य व्हायचे आहे." पुढे माताजी आपल्या काही भक्तांसमवेत एक वर्ष वृंदावनात राहायला गेल्या होत्या.त्या ठिकाणी त्यांच्या प्रगाढ समाधीचे,भावावस्थेचे दर्शन अनेकांना घडले.त्याच सुमारास ठाकुरांनी मॉंना योगेन (योगानंद) या भक्ताला दीक्षा देण्याची आज्ञा केली.ही मॉं नी दिलेली पहिली दीक्षा.पुढे तिर्थयात्रा करत मॉं पुन्हा दक्षिणेश्वरीला परतल्या.पण त्यांना ठाकुरांचा आदेश झाला की , "तुम्ही कामारपुकुरला राहा.तिथे भाजीपाला करा आणि भात भाजी खाऊन हरिस्मरण करीत दिवस काढा." त्या वेळी मॉंनी अतिशय दारिद्र्याचे दिवस काढले पण त्यांच्या अंतरंगातील आत्मानंदाची बैठक यत्किंचितही मोडली नव्हती. पुढे एकदा सहज गोष्टी निघाल्यावर मॉं म्हणाल्या होत्या, "मी असेपर्यंत मला कोणीही ओळखू शकणार नाही.गेल्यावर मात्र सगळ्यांना कळेल." यातच सर्व आलं असे मला वाटते.कामारपुकुर या खेडेगावात लोकांनी मॉं ना खुप त्रास दिला.त्यांना ते नेहमी बोलत असत.त्यांचा तिरस्कार करत असत आणि या बरोबरच मॉं कठिण अशा परिस्थितीत, दारिद्र्यात राहत असत.पण पुढे ठाकुरांच्या संन्यासी शिष्यांनी मॉं ना कलकत्यास आणाण्याचे ठरविले व लवकरच आपल्या या पुत्रांचे म्हणणे ऐकून मॉं सन १८८८ ला कलकत्यास आल्या.आता मॉं च्या हृदयात ,जीवकल्याणस्वरुप दयामूर्ती श्रीरामकृष्णांचा उदय झाला होता.याचा अनुभव पुढे ठिक ठिकाणी येतो.पुढे १८९० साली स्वामी विवेकानंद मॉं चे आशिर्वाद घेऊन भारत भ्रमणाच्या त्यांच्या दिव्य यात्रेला निघाले.मॉं नी त्यांना भरभरुन आशिर्वाद दिले.भारत भ्रमण करुन आल्यावर विवेकानंद सन १८९६ ला सर्वधर्म परिषदेस शिकागो येथे जाणार होते तेव्हा ते मॉं ना येऊन भेटले.मॉंनी त्यांना चिंता न करता ठाकुर बरोबर असल्याची ग्वाही दिली व आश्वस्थ करुन आशिर्वाद दिले आहे.पुढे विश्वविजय करुन आल्यावर विवेकानंदांनी मठ स्थापनेसाठी अपार कष्ट घेतले व  इ.स १८९८ ला नोव्हेंबर महिन्याया १२ तारखेला मॉंच्या उपस्थितीत त्यांनी मठात प्रवेश केला.तिथे मॉंनी आपल्या नित्यपुजेतील ठाकुरांच्या फोटोंची स्थापना केली व जगविख्यात "रामकृष्ण मिशन" ची मुहूर्तमेढ रोवल्या गेली.या मठात पुढे भगवान रामकृष्णांचे अवशेष देहभस्म विवेकानंदांनी आपल्या खांद्यावर चालत आणले व अनंत काळासाठी त्याची या दिव्य मठात स्थापना करण्यात आली. पुढे आपल्यातील मातृभाव कायम राखुन मॉं अनेक भक्तांच्या गुरु झाल्या.अनेकांना दीक्षा देऊन मॉंनी त्यांचा उद्धार केला.या ही वेळी ठाकुर स्वतः प्रगट होऊन मॉं ना मार्गदर्शन करीतच असत.आपल्या संन्यासी बालकांची मॉं सर्वोपरी काळजी वाहत असतं.अनेकांना मॉं चे भेटी आधीच स्वप्न दर्शन झाले होते.असे अनेक भक्त मॉं चा शोध घेत त्यांच्या पर्यंत येऊन पोहचत.अशी अनेक उदाहरणे चरित्रात ठिक ठिकाणी आली आहेत.भगवान रामकृष्णांनी देह ठेवल्यावर मॉं नी आपले करुणेनी सर्वांना आश्रय दिला,संघाचे रक्षण केले.आपल्या आध्यात्मिक शक्तीच्या प्रभावाने त्यांनी संघातील प्रेम बंधनाला अधिकच दृढ केले.

                                   श्रीसारदा मॉं बहुदा कुणालाही काहीच उपदेश देत नसत.कोणी जर हट्टच केला तर श्रीरामकृष्ण देवांकडे बोट दाखवून त्या म्हणत , "मी आणखी काय उपदेश देणार? ठाकुरांचा उपदेश चित्तात बाळगून वागाल तर सगळे काही ठीक होईल." श्रीसारदा मातेच्या योगमय जिवनाची पार्श्वभूमी ही फक्त रामकृष्णदेव होते.मॉं नी शेकडो लोकांना दीक्षा दिल्या, पण त्या सगळ्यांच्या समोर त्यांनी श्रीरामकृष्णांचेच तेजस्वी स्वरुप उभे केले."ठाकुरच गुरु आहेत.ठाकुरच इष्ट आहेत,ठाकुरांचेच नाव घ्या,ठाकुरांचाच आश्रय घ्या." कधीकधी ,भक्तांच्या संतोषासाठी ,त्यांनी आपल्या नावाचा जप आणि ध्यान जरी सांगितले असेल तरी ते देखील ठाकुरांत आणि आपल्यात अभेद मानूनच करायला सांगितले. मॉं प्रत्यक्ष पूर्ण भगवती अवतार होत्या असे ठाकुरांनी आणि अनेक महात्म्यांनी सांगितले होतेच.तरी मॉं नी आपल्या जिवन कार्यात कधीही ते जाणवू दिले नाही.त्या आपल्या आपल्या सामान्य भक्तांमध्ये अतिसामान्य बनून राहत.हजारो‌ लोक मॉंच्या चरणी शरणं येत असत.त्यांना "तुम्ही रुद्रानी आहात , भगवती आहात,जगज्जननी आहात" असे म्हणत चरणी लोटांगण घालीत पण आश्चर्य असे की मॉं ना याचा काडीचाही अहंकार नव्हता.सारदा मॉं जेव्हा खुप आजारी होत्या तेव्हा एक प्रौढ स्त्री त्यांच्या दर्शनास आली होती."तुम्ही जगदंबा आहात,सर्वकाही आहात " अशा शब्दांत ती त्यांची स्तुती करु लागली.ते ऐकताच मॉं कडाडल्या , "चल मोठी आली 'जगदंबा' वाली! त्यांनी (ठाकुरांनी ) दयावंत होऊन आपल्या चरणांशी मला आश्रय दिला एवढ्यानेच मी धन्य झाले आहे. यावरुन लक्षात येते की मॉं ने ठाकुरांच्या परमतेजस्वी आभेखाली आपले संपूर्ण अस्तित्व लपवून टाकले होते.

               एकदा एक मुलगा मॉंकडे आला.त्याने दर्शन घेतले आणि प्रणाम केला.आपल्या मनातील काही गोष्टी मॉं जवळ सांगाव्या म्हणून तो आला होता.पण तिथे काय बोलावं हे न सुचल्याने तो बाहेर एका कोपर्‍यात बसून होता.सारदा मॉं नी त्याची ही विवंचना ओळखली.त्या म्हणाल्या, "बेटा ,आत ये बघू ,इथे बसून सांग तुला काय सांगायचे ते." तो मुलगा म्हणाला, "नाही आई ,मी इथेच बरा आहे.आई ,मी हलक्या जातीचा आहे." भावपूर्ण स्वरात मॉं म्हणाल्या, "अरे ,तू हलक्या जातीचा आहेस असे तुला कुणी सांगितले? तू तर माझा मुलगा आहेस.ये, आत येऊन बैस." श्रीरामकृष्णदेव म्हणत असत, "भक्तांना कुठली जात? अर्थात सगळ्या भक्तांची एकच जात असते.आणि जातिभेदाचे काय? तो केवळ एकाच उपायाने नाहीसा होऊ शकतो.तो उपाय म्हणजे भक्ती...अस्पृश्य देखील शुद्ध होतात.चांडाल देखील भक्ती अंगी बाणली म्हणजे चांडाल राहत नाही.चैतन्यदेवांनी आचांडाल सगळ्यांना आलिंगन दिले होते."  काय सुंदर हा उपदेश आहे.मॉंनी सर्वांवर किती करुणा प्रेम दिले याचा अंदाजही आपण आज बांधू शकणार नाही.किती ती मातृवत्सलता! सर्व काही अगदी अलौकिक आहे.पुढे जगद्धात्रीपूजेचा पहिला दिवस आला. त्याआधी एक अलौकिक घटना घडली.सारदा मॉं ना एक भाऊ होता.ज्याचे नाव होते प्रसन्न कुमार.याला एक विमला नावाची मुलगी होती.तिच्या पायात कसले तरी विष भिनले व तो चांगलाच सुजला.तिला अगदी फणफणून ताप आला.हळूहळू ती बेशुद्ध झाली.विमलेची शेवटची घडी येऊन ठेपली.अशावेळी बांकुडा येथील आश्रमातील डॉक्टरांनी विमलेला औषध दिले, आणि मॉं ना तो म्हणाला, "केवळ तुमच्या म्हणण्यासाठी मी औषध दिले.अन्यथा आता काही आशा नाही.नाडी बंद पडली आहे.औषधही पोटात गेले नाही.तसेच्या तसे बाहेर पडले." ते ऐकून मॉं आपल्या नव्या घरातून उठून प्रसन्नकुमारांच्या घरी गेल्या.त्यांच्या पत्नीचे नाव होते, "सुवासिनी" .तिने मॉंचे चरण धरले व ती धाय मोकलून रडू लागली.तिने त्यांच्या चरणांची धूळ पाण्यात घालून ते पाणी विमलेच्या तोंडांत घातले.मॉंनी विमलेच्या सर्वांगावरुन हात फिरवीला‌.मग मॉं जगद्धात्रीच्या मुर्ती समोर हात जोडून,अश्रु पूर्ण नयनांनी प्रार्थना करु लागल्या, "आई उद्या तुझी पूजा आहे.त्यावेळी माझ्या मोठ्या भावजयीला तू काय हंबरडा फोडून रडायला लावणार आहेस का?"  चमत्कार असा झाला की त्याच रात्री विमला शुद्धीवर आली.पण जगद्धात्री पूजेनंतर मात्र मॉंची प्रकृती बिघडू लागली.वारंवार ताप यायला लागला.पौष महिन्यात तर प्रकृती अधिकच बिघडली‌ व त्यांनी अंथरूणच धरले.पुढे मग संन्यासी शिष्यांनी, भक्तांनी मॉंची सेवा केली व त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

                       अशा प्रकारे अनेक भक्तांना मॉंं सारदेनी मार्गदर्शन केले,आपला अनुग्रह दिला.त्यांना त्रिविध तापांतून मुक्त होण्याचा मार्ग दाखविला."रामकृष्ण मिशन" या संघाला सांभाळले.आपल्या मातृवत्सलता  , परमकरुणेनी त्या हजारो शरणांगतांच्या आई झाल्या.
आदिशक्तीने रामरायांसारखा मानवी देह धारण करुन या मानवी देहाच्या सर्व मर्यादा पाळल्या,दु:ख सोसले,कष्ट उपसले, दारिद्र्यात राहिल्या आणि जो कुणी आपल्याला शरण येईल त्यांना कृपा पूर्वक ठाकुरांच्या चरणांचा आश्रय दिला.कुठेही मॉंनी आपले अलौकिकत्व प्रगट केलेले दिसत नाही. इसवी सन १८९४ मधे ,स्वामीजींनी अमेरिकेतून आपल्या एका गुरुबंधूला लिहिलेल्या पत्रात पुढील वाक्ये आलेली आहेत, "माताजींचे खरे स्वरुप तुम्हाला अजून कळले नाही.तुमच्यापैकी कोणालाच कळले नाही.हळूहळू तुम्ही ते समजू शकाल.माझे डोळे आता उघडले आहेत.दिवसेंदिवस माझ्या सगळे लक्षात येऊ लागले आहे.पण खरे सांगतो,तुमच्यापैकी कोणीही माताजींना अजून निट ओळखू शकले नाही.माझ्यावर पित्याच्या कृपेपेक्षा मातेची कृपा अपार आहे.माताजींच्या संबंधी मी जरा एककल्ली आहे.माताजींच्या आज्ञा होताच हे भूत ,हे विरभद्र काय वाटेल ते करू शकतो.अमेरीकेला येण्यापूर्वी मी मुद्दाम पत्र लिहून माताजींचा आशिर्वाद मागविला होता.त्यांनी आशिर्वाद दिला आणि बस,मी लगेच उड्डाण घेऊन समुद्रापलिकडे गेलो.एवढ्यात काय ते समजून घ्या." या स्वामीजींच्या शब्दातून सारदा मॉं चा अधिकार ,अलौकिकत्व,अवतारित्वा ची साक्षच मिळते.
अशा या दिव्य विभूती ने मंगळवार दिनांक २० जुलै १९२० रोजी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला व त्या आपल्या स्वधामी परतल्या.स्वामी अपूर्वानंदांनी लिहीलेले श्री सारदा मॉं चे चरित्र एकदा तरी आपण सर्वांनी जरुरच वाचायला हवे.इतके‌‌ विलक्षण आणि सर्वांग सुंदर असे हे चरित्र आहे. ही शब्दसुमनांजली मी श्री सारदा मॉं च्या सुकोमल चरणी अर्पण करतो आणि प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या व ठाकुरांच्या श्रीचरणांची कृपा करुणा अखंड आपल्या सर्वांवर तेवत ठेवावी.

    ✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️


Sunday, October 2, 2022

प्रणम्या मातृदेवता माळ ८ :- आदिशक्ती :- भगवती श्रीदेवी व्यंकम्मा🌿🌸🙏

 



प्रणम्या मातृदेवता :- माळ ८ 🌸🌿🙏🏻


🌺आदिशक्ती :-भगवती श्रीदेवी व्यंकम्मा🌺

🌿🌸 श्रीमाणिक्यप्रभुर्विजयते 🌸🌿


आज अश्विन शुद्ध अष्टमी म्हणजे महाअष्टमी , नवरात्रातील ८ वा दिवस.आपल्या या "प्रणम्या मातृदेवता" लेखमालेतील शब्दसुमनांची आठवी माळ.ही माळ आपण चतुर्थ दत्तावतार भगवान श्री माणिक प्रभू महाराज यांच्या श्रेष्ठ शिष्या ,परमयोगिनी भगवती श्रीदेवी व्यंकम्मा मातोश्रींच्या श्रीचरणी अर्पण करणार आहोत.श्रीव्यंकम्मा मातोश्री या प्रत्यक्ष आदिशक्ति अवतार होत्या.भगवान श्रीदत्तात्रेय श्रीमाणिक प्रभू महाराजांची ही शक्तिच होती.श्रीमातोश्रींचे चरित्र अतिशय दिव्य आणि अलौकिक असे आहे.आज महाअष्टमीच्या परम पावन तिथीला आपण प्रत्यक्ष आदिशक्ती स्वरुपिनी भगवती व्यंकम्मांच्या चरित्राचे स्मरण करुयात.


                   तेलंगणात सावकारीचा व्यवसाय करणारा एक वर्ग होता.याच वर्गातील लोक पुढे मोठे व्यापारी म्हणून उदयास आले.कोमटी जातीच्या याच व्यापार्‍याच्या मधील एका सत्शिल धनाढ्य व्यापाऱ्याच्या व्यंकम्मा या कन्या होत्या.व्यंकम्माचे वडिल हे निजाम राज्यातील प्रसिद्ध व्यापारी होते.सावकारीचा व्यवसाय असतांनाही ते अतिशय धार्मिक होते.तत्कालिन रुढी नुसार व्यंकम्मांचा विवाह त्यांच्या अगदी बालपणीच झाला होता.पुढे दुर्दैवाने त्यांच्या पतीचा लग्नानंतर काही काळातच मृत्यू झाला.वयात येण्यापूर्वीच व्यंकम्मा या बालविधवा झाल्या.जिवनात आता भगवंतांवाचुन आपली या दु:खातून कुणीही सुटका करणार नाही या कारणाने व्यंकम्मा आपला सर्व वेळ हा भगवत सेवेत व्यतित करु लागल्या.आधीच सश्रद्ध असलेल्या व्यंकम्मांच्या आई वडिलांचेही त्यांना सहाय्य लाभले होते.ते ही व्यंकम्मा समवेत भगवंतांच्या भक्तीत लिन होऊ लागले.अशा प्रकारे आपले जिवन व्यतित करणार्‍या व्यंकम्मा भगवान श्री माणिक प्रभु महाराजांच्या चरणांकडे वळल्या.या संदर्भात दोन कथा प्रचलित आहेत.त्या दोन्ही कथांचा उल्लेख इथे थोडक्यात करतो.

पहिल्या कथेचा भाग पुढीलप्रमाणे आहे.

देवांच्या सेवेत रममाण झालेल्या या भोळ्या भाविक कुटुंबाला अनेक लोकांनी भक्तीच्या नावाखाली, भुलथापांनी फसविले होते.अशातच एका दांभिक गुरुने मला कैलासाला जाण्याची अद्भुत विद्या ठाऊक आहे असे व्यंकम्माच्या पित्यास सांगितले.व्यंकम्माचे वडिल या गुरुच्या सापळ्यात सापडले. त्याने आधी वेगवेगळ्या पुजा , युक्तीच्या आधारे त्यांच्याकडून खुप धन‌ बळकावले.त्यानंतर एका दिवशी सर्व कुटुंबास मैलार येथील रुद्रकुंडावर व्यंकम्मासह घेऊन गेला व त्या अथांग जलाशयात उडी मारण्याचे त्याने सांगितले.गुरु आज्ञा प्रमाण मानून या सर्व कुटुंबाने त्या अथांग जलाशयात उडी मारली.पण दुर्दैवाने त्यातील कुणालाही पोहायला येत नसे.श्रीप्रभुंची योजना बघा की व्यंकम्मा गटांगळ्या खात वर आल्या.परत बुडून जात असतांना त्यांना कुणी तरी हात धरुन वर काढले.नाका तोंडांत पाणी शिरल्याने त्या अस्वस्थ झाल्या होत्या.पण वर काढण्यासाठी हात दिलेल्या त्या पुरुषाचा चेहेरा मात्र त्यांना दिसला.पुढे लोकांनी व्यंकम्मांवर उपचार केले आणि त्या ठिक झाल्या.पण या लिलायोगे जणू श्रीमाणिक प्रभु महाराजांनी त्यांचे सर्व संसार पाषच तोडून टाकले होते.कारण आता त्यांच्या घरातील कुणीही मागे उरले नव्हते.पुढे याच अवस्थेत फिरत असताना व्यंकम्मांना प्रभु दर्शनाचा लाभ झाला होता.


दुसरी कथा अशी आहे की, या ईश्वर भक्त कुटूंबाच्या कानी श्रीप्रभुंची किर्ती आली.माणिक प्रभु महाराज यांचे वास्तव्य मैलार या खंडेरांयांच्या क्षेत्री आहे असे त्यांना कळले.आता आपल्या जिवनाचे प्रभु दर्शनाने सार्थक करुन घ्यावे म्हणून सर्व कुटुंब बैलगाडीने प्रवासास निघाले.पण रस्त्यातच मोठ्या प्रमाणात विजांच्या गडगडाटासह पाऊस सुरु झाला.ओढा ,नाल्यांना पुर आला.अशातच एका नाल्यातून बैलगाडी जात असतांनाच ती पाण्याच्या प्रवाहात सापडली.गाडी भोवर्‍यात सापडली व गटांगळ्या खाऊ लागली. व्यंकम्मानी प्रभु महाराजांचा धावा केला. शेवटी ही सर्व भगवान श्री माणिक प्रभु महाराजांची इच्छाच होती त्यामुळे अचानक पाण्याच्या प्रवाहात गटांगळ्या खात असणार्‍या व्यंकम्मांना एका सोळा वर्षीय दिव्य पुरुषाने हात दिला व अलगद उचलून काठावर आणले.त्या दिव्य पुरुषाचा चेहेरा व्यंकम्मांनी बघितला आणि त्या बेशुद्ध झाल्या.काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर व्यंकम्मांना आपल्या कुटुंबाचे स्मरण राहिले नाही.त्या सर्व काही विसरल्या होत्या.जणू काही प्रभुंनी तिला जलाशयातून बाहेर आल्यावर पुनर्जन्म दिला होता.शुद्ध आल्यावर मात्र त्यांना आपल्याला पुरातून वाचविणार्‍या पुरुषाचा चेहेराच आठवू लागला.ज्याप्रमाणे वासरु आपल्या गोमातेला शोधत सैराभैरा होतं त्याप्रमाणे आपल्याला जिवनदान देणार्‍या त्या महापुरुषाला भेटण्यासाठी व्यंकम्मा ही सैराभैरा धावू लागल्या.त्या अनेक ठिकाणी गेल्या,पुष्कळ ठिकाणी याच मन:स्थितीत त्या फिरु लागल्या.शेवटी अशीच भटकंती करता करता व्यंकम्माच्या भाग्योदयाचा काळ जवळच येऊन ठेपला होता.



त्या फिरता फिरता मैलार या तिर्थक्षेत्री येऊन पोचल्या.तिथे त्यांना सर्वात प्रथम माणिक प्रभु महाराजांचे दर्शन घडले.श्रीप्रभुंचे मुखकमल बघितल्या बरोबर त्यांना लगेच लक्षात आले की आपल्याला पुरातून बाहेर काढलेला हाच तो महापुरुष.त्या प्रभु दर्शन घेता घेता भाव समाधीत स्थिर झाल्या.त्यांना त्यांचे जन्मोजन्मी चे मायबाप भेटले होते.अशा अवस्थेत बराच वेळ त्या प्रभु दर्शन घेत उभ्या असता तेथील सेवेकर्‍यांनी त्यांना प्रसाद घेण्यासाठी हाक मारली.त्या भानावर आल्या .त्यांनी माणिक प्रभु पुढे लोटांगण घातले व प्रसादासाठी हात पुढे केला.श्रीप्रभुंनी दोन खारका आणि दोन फुले त्यांच्या ओंजळीत टाकली.प्रसाद घेऊन त्या बाहेर पडल्या पण त्यांना कोठे जावे हेच सुचेना.पाय नेतील तिकडे त्या जात होत्या.पण त्यांचे अंत:करण हे प्रभु रुप झाले होते.त्यांना सर्वत्र फक्त आणि फक्त प्रभुंचे दिव्य रुप दिसु लागले.या उन्मनी अवस्थेत दोन दिवस त्या भटकत राहिल्या व पुन्हा प्रभुदर्शनाला आल्या.प्रभुंनी परत त्यांना खारकांचा व फुलांचा प्रसाद दिला.पुन्हा त्या बाहेर पडल्या पण काय करावे हे त्यांना सुचेना.दुसर्‍या दिवशी पुन्हा त्या प्रभु पुढे हजर झाल्या.प्रभुंनी मग त्यांना विचारले , "बाई ,तु वरचेवर का येत आहेस?‌तुला प्रसाद मिळाला आहे आता आपले गावी का जात नाहीस?" असे प्रभुंनी विचारताच ,त्या म्हणाल्या "महाराज ,मला माझे गाव माहित नाही.मला माझ्या पूर्वस्थितीचा विसर पडला आहे. आपल्या चरणांशिवाय मला हे जग शुन्य झाले आहे.मी आता आपल्या चरणांना सोडून कुठेही जाणार नाही." श्री प्रभुंनी तिच्या अंत:करणातील भाव जाणले होतेच.ते तिला म्हणाले , "बा‌ई तु तरुण आहेस.तुझा आमच्या वैरागी लोकांमध्ये निभाव लागणार नाही.आमच्या खाण्याचा वेळ नसतो, ना राहण्याचा ठिकाणा.आमच्या सहवासात तुझे हाल होतील.त्यामुळे तु परत जा." पण व्यंकम्मा म्हणाल्या , "आता मी आपल्याला शरणं आली आहे.आपणच माझे माता पिता ,सगे सोयरे आहात.आता मी आपले चरण सोडून मी कुठेही जाणार नाही" प्रभुंनी त्यांना बरोबर अलंकार बाळगता येणार नाही म्हणून म्हटले, त्यावेळी त्यांनी तत्क्षणी अलंकार काढून प्रभु चरणी ठेवले.

त्यानंतर मात्र त्यांचा शुद्ध भाव ,त्यांचा निर्धार बघून श्री प्रभु महाराजांनी आपल्या शिष्य परिवारात त्यांना सामिल होण्याची आज्ञा दिली.एका शिष्याकरवी प्रभुंनी व्यंकम्मांना आपल्या मातेकडे पाठविले.शिष्याने त्यांना माता बयंम्माकडे पोहचविले.प्रभुंच्या मातेला ही आनंद झाला व त्यांना आपल्या कन्येप्रमाणे मातेने जवळ ठेवले.


श्रीप्रभु महाराजांनी पुढे व्यंकम्माची अनेक प्रकारे परिक्षा घेतली.कित्येक दिवस त्यांना फक्त खारकेवरच ठेवले.अनेक दिवस आहारावाचुन राहिल्याने त्यांची प्रकृती ढासाळली तरीही व्यंकम्मा डगमगल्या नाही.त्या प्रभु चरणांशी एकनिष्ठ राहिल्या.एकदा व्यंकम्मा नित्याप्रमाणे स्नान करित होत्या.तेवढ्यात प्रभुंनी निरोप पाठविला की, "असशील तशीच निघून ये." हे निरोपाचे शब्द कानी येताच प्रभु आज्ञा प्रमाण मानून देहभान विसरून त्या विवस्त्र स्थितीतच प्रभुंपुढे जावयास निघाल्या.सर्व लोक स्तिमीत झाले.मातोश्रींना हे कळल्यावर लगेच व्यंकम्मांच्या पाठीमागे त्यांनी धाव घेतली व त्यांना थोपवुन ठेवले.विवस्त्र अवस्थेतही व्यंकम्मा निघाल्याचे जाणून प्रसन्न अंत:करणाने श्री प्रभूंनी व्यंकम्माचे शरीर झाकण्यासाठी आपल्या अंगावरील शुभ्र शाल तिच्या अंगावर घालण्यासाठी आपल्या मातेकडे पाठविली.बयंम्माने तात्काळ त्या प्रभु वस्त्राने व्यंकम्माचे शरीर झाकले.श्रीप्रभुंचे वस्त्र अंगावर पडताच व्यंकम्मा देहभान विसरल्या.त्यांच्या अंत:करणात दिव्य तेज उफाळून आले.त्यांना तात्काळ आत्मसाक्षात्कार घडला.हा व्यंकम्माच्या जिवनातील अतिशय दिव्य परिवर्तनीय प्रसंग होता.या द्वारे प्रभुंनी व्यंकम्मांवर आपल्या कृपा आशिर्वादाचे पांघरुणच घातले.यानंतर व्यंकम्मा शुभ्र वस्त्र परिधान करु लागल्या.कपाळाला शुभ्र भस्म चर्चून ,शुभ्रवसन परिधान केलेली व्यंकम्मा आता एका योगिनी च्या रुपात अधिकच तेजस्वी देसू लागल्या.यापुढील काळात व्यंकम्मा अधिकाधीक भजनात रंगुन जाऊ लागल्या.श्रीमाणिक प्रभुंच्या मार्गदर्शनाखाली यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार ,ध्यान,धारणा व समाधी या अष्टांग योगाचा अभ्यास करु लागल्या.व्यंकम्माने कठोर तपश्चर्या सुरु केली.श्रीप्रभुंची पुर्ण कृपा व्हावी म्हणून व्यंकम्मा आपल्या सर्वस्वाचा त्याग करुन अहोरात्र भजनानंदात राहू लागली.शिष्योत्तमा व्यंकम्माची अध्यात्मिक साधना श्रीप्रभुंच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर होत होती. लवकरच व्यंकम्मांनी प्रभु कृपेने लवकरच समाधी अवस्थेची प्राप्ती केली.त्या साधनेच्या अतिउच्च पातळीला गाठले.श्रीमाणिकप्रभुंनी व्यंकम्मांना परमोच्च असे देवी पद बहाल केले.माणिकप्रभुंच्या आज्ञेने श्रीदेवी व्यंकम्मा स्वतंत्ररित्या सकलजनोद्धाराचे कार्य करित होत्या.विशेष करुन त्या माणिकनगर ला येणार्‍या स्त्रियांचे प्रश्न हाताळत असत.


श्रीदेवी व्यंकम्मांचा अधिकार विलक्षण होता त्याचे एक उदाहरण मातु:श्रींच्या चरित्रात आले आहे.एकदा हुमनाबादचे एक वयोवृद्ध जोडपे प्रभु दर्शनाला आले.वयाची साठी ओलांडल्यामुळे त्यांना संतांन नव्हते.ते जोडपे प्रभुंना संतांन प्राप्तीची याचना करु लागले.तेवढ्यात तिथे व्यंकम्मा आल्या आणि प्रभुस नमस्कार करुन बाजुला उभ्या राहिल्या.तेव्हा प्रभुंनी त्यांना विचारले, "व्यंके,गेले चार दिवस तु कोठे होतीस?" त्यावर व्यंकम्मा म्हणाली, "महाराज ,पूर्वपापामुळे मला चार महिन्यातून चार दिवस आपल्या दर्शनाला मुकावे लागते.मला हे अगदी नकोसे झाले आहे." यावर श्रीप्रभु म्हणाले, "तुला इतका कंटाळा आला असेल तर एखाद्या सत्पात्र स्त्रीला ते दान देऊन का टाकत नाहीस?" तेव्हा व्यंकम्मा म्हणाली, "सद्गुरुनाथा ,माझा हा दोष घेण्यासाठी कोण हात पसरील?" प्रभु म्हणाले, "त्या समोर बाई बसल्या आहेत,त्यांच्या हातावर पाणी सोड आणि तुला नको असलेला दोष दान देऊन मोकळी हो." व्यंकम्माने तसे केले व‌ त्या दोषमुक्त झाल्या.तिथे आलेल्या जोडप्याला पुढे संतान प्राप्ती झाली.


देवी व्यंकम्मानी आपल्या उत्तर आयुष्याच्या उत्तरार्धात अखंड मौन व्रत धारण केले होते.हे मौनव्रत चालू असतांनाच शके १७८४ श्रावण वद्य त्रयोदशी रोजी आपला नश्वर देह सोडण्याचा निश्चय केला.त्या पायात चाळ बांधून प्रभु भजनात तल्लीन झाल्या.अहोरात्र नृत्य चालु होते,मुखी श्री प्रभु नामाशिवाय काहीही नव्हते.अशाप्रकारे व्यंकम्मा नाचत नाचत मृत्यूला सामोर्‍या गेल्या.व्यंकम्माने देह त्याग केला.अंगावरील कचरा दूर सारावा अशाप्रकारे त्यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला.देहत्यागानंतर कोमटी समाजाचे लोक श्रीदेवी व्यंकम्मांचा अंतिम संस्कार करण्यासाठी जमले.त्यांचे कलेवर उचलण्यासाठी जवळ जाताच त्यांच्या मुखातून "ॐ" असा ध्वनी निघू लागला.परत काही वेळाने पुन्हा उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हाही "ॐ" चा ध्वनी पुन्हा निघू लागला.बराच वेळ असेच झाल्यामुळे त्या जिवंत आहेत की त्यांनी देह ठेवला हे लोकांना कळेनासे झाले.ही गोष्ट प्रभुंना कळविण्यात आली तेव्हा ते म्हणाले, "तिच्या मनात ब्राह्मणांकरवी समाधी मिळावी असे आहे म्हणून तुम्ही कोणीही तिला स्पर्श करु नका." पुढे शिष्यांनी व्यंकम्मांना स्नान घातले ,त्यांना शुभ्र वस्त्र नेसविले ,कपाळी भस्म लावले,गळ्यात रुद्राक्ष माळा घातल्या.देह ठेवल्यावरही त्या पुन्हा एकदा समाधी तून उठल्या व त्यांनी श्रीप्रभुंना नमस्कार केला आणि मग परत मांडी घालून योगासन साधून अखंड समाधी लावली. सर्वत्र "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त" असा जयघोष झाला व प्रभु महाराज स्वतः तिथे आले ,त्यांनी शिष्यांकरवी व्यंकम्मांची पुजा,आरती करविली.त्यानंतर व्यंकम्मांना समाधी दिली गेली.अशा प्रकारे वैश्य समाजातील एक सामान्य कोमटी विधवा स्त्री परमोच्च देवी पदाला पोहचली होती.इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष दत्तावतार श्रीमाणिकप्रभूंची त्या चित्शक्ती बनल्या.हा माणिक प्रभू महाराजांनी केलेला एक दिव्य लिला आविष्कारच होता.व्यंकम्मा या अतिविलक्षण शक्ती होत्या.श्रीदेवी व्यंकम्माने सत्संग ,कठोर तपश्चर्या,साधना, गुरु चरणी अनन्य निष्ठा आणि अनन्य भक्तीने "श्रीदेवी मधुमती शामलांबा" हे नाव प्राप्त केले ,तो अधिकार प्राप्त केला.अशा या दिव्य भगवती व्यंकम्माच्या चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो आणि ही शब्दसुमनांजली श्रीचरणी अर्पण करतो.

           ✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

Saturday, October 1, 2022

प्रणम्या मातृदेवता माळ ७:- कृष्णाकाठची ज्ञानेश्वरी प.पू.ताई दामले🙏🌺 🌸🌿🙏🏻

 



प्रणम्या मातृदेवता :- माळ ७ 🌸🌿🙏🏻


🌺🙏कृष्णाकाठची ज्ञानेश्वरी:- प.पू.ताई दामले🙏🌺


आज अश्विन शुद्ध सप्तमी म्हणजे नवरात्रातील ७ वा दिवस.आपल्या या "प्रणम्या मातृदेवता" लेखमालेतील शब्दसुमनांची सातवी माळ.ही माळ आपण करुणाब्रह्म भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पूर्ण कृपांकित अशा संत ,ज्या अतिशय प्रसिद्धीपराङमुख होत्या अशा सद्गुरु श्रीताई दामले तथा पार्वती शंकर दामले यांच्या श्रीचरणी अर्पण करणार आहोत.परमपूज्य ताई या प्रसिध्दी पासून दूर व अतिशय अलौकिक आणि विलक्षण अधिकारी संत होत्या.ताईंनी सर्वांमध्ये राहून अलिप्तता जपली,जी ज्ञानेश्वर माउलींना ही अभिप्रेत आहे. 

      "जो अंतरी दृढु । परमात्मरुपी गूढु । 

        बाह्य तरी रुढू । लौकिकु जैसा ।।"

माउलींनी संतांच्या अंतरंग स्थितीचे वर्णन करतांना सांगितले आहे की , संत हे तुमच्या आमच्या सारख्या दिसत असले तरी ते अंतरंगात परमात्म तत्वाशी एकरुप झालेले असतात.त्यांच्या ठाई अंतर्मुखता,कमालीची रुजूता,विलक्षण नम्रता,इतरांप्रती असलेले प्रचंड प्रेम व आत्मानंदात गढून गेलेली वृत्ती अशा अनेक गुणांचे प्रगटीकरण झालेले बघावयास मिळते.परम पूज्य सद्गुरु ताई या अशाच प्रकारच्या आत्मानंदात गढून गेल्या होत्या,माउलींशी एकरुप झालेल्या होत्या.त्यांचे बाह्य रुप अगदी सामान्य स्त्री सारखे दिसत असले तरी त्या अंतरंगात श्रीभगवंताच्या तत्वाशी एकरुप झालेल्या होत्या.आज आपण प.पू.ताईंच्या या सुंदर अशा चरित्राचे स्मरण करणार आहोत.

परमपूज्य ताईंचा जन्म ५ फेब्रुवारी १८८९ ,माघ वद्य पंचमी रोजी सांगली जिल्ह्यातील रेठरेहरणाक्ष या गावी झाला.त्यांच्या वडिलांचे नाव नारायणराव व आईचे नाव लक्ष्मी असे होते.ताईंच्या माहेर चे नाव पटवर्धन.हे घराणे अतिशय सुखवस्तू व गर्भश्रीमंत होते.ताईंच्या घरात जवळपास पंचवीस लोक राहत असत.१८९८ साली आलेल्या प्लेगच्या साथीमुळे ताईंच्या घरातील जवळ जवळ सर्व लोक मृत्युमुखी पडले होते.ताईंच्या आई या त्यांच्या बालपणीच वारल्या होत्या त्यामुळे त्यांना मातृसुख हे मिळाले नाही.पण त्यांना हे मातृप्रेम त्यांच्या चुलती पार्वती देवी पटवर्धन यांच्या कडून मिळले.त्या जरी निरक्षर असल्या तरी त्यांना अमरकोश संपूर्ण पाठ होता.तसेच अभंग, स्तोत्रे,भूपाळ्या सर्व त्यांना मुखोद्गत होते.ताईंच्या परमार्थाची सुरवात याच चुलती मुळे झाली.ताईंच्या घरी अनेक थोर साधु ,संत, संन्यासी , वैरागी मुक्कामास येत असत.

पुढे लहानपणी खेळताना एका थोर संन्यासी संतांनी त्यांच्या हाताला स्पर्श केला तोच त्यांच्या शरीरात शक्तीसंचार झाला होता.तसेच ताईंच्या घराशेजारी आप्पाशास्त्री नावाचे एक वृद्ध संन्यासी एका कुटीत राहत होते.जगाशी अलिप्त असणारे, कुणाशीही न बोलणारे पू.आप्पा शास्त्रींनी ताईंना एक लाकडाचा तुकडा फेकुन मारला व त्यांच्यावर कृपा केली होती.काही दिवसांनी एकदा ब्रह्मनाळचे एक अधिकारी महापुरुष,संत ताईंच्या घरी मुक्कामी आले.दोन‌ दिवस मुक्काम करुन ते जायला निघणार तेव्हा त्यांनी ताईंना जवळ बोलाविले व म्हटले , "मुली ,एक गोष्ट सांगतो ती लक्षात ठेव.मी सांगतो त्याप्रमाणे करीत जा.आपल्याला आवडेल त्या देवाचे नाव घेत जा.त्याची रोज मानसपूजा करीत जा.पुढे याचा तुला नक्की फायदा कळेल." पूज्य ताईंच्या पारमार्थिक साधनेला येथूनच सुरुवात झाली.ताईंनी याचा अभ्यास सुरु केला.पू.ताईंची दत्तोपासनाही येथूनच सुरु झाली. त्यांच्याजवळ एक दत्तप्रभुंची तसवीर होती.ती पाटावर ठेवून त्या रोज मानसपूजा करीत.नंतर प्रदक्षिणा घालीत.त्या गुरुवार चा उपास देखील करीत.ही उपासना सुरु केली व थोड्या दिवसातच दत्त कृपेची अनुभूती त्यांना झाली. 

पू.ताईंना डोळ्यांचा विकार झाला.ते अत्यंत लाल झाले.डोळ्यातून सारखे पाणी वाहू लागले.त्यांच्या चुलतीने त्यांना श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे आणले.पू.ताईंच्या चुलतीने त्यांना श्रीगुरु पादुकांना प्रदक्षिणा घालण्यास सांगितले.तिथेच परम पूज्य ताईंना दत्तसांप्रदायातील अतिशय थोर विभूती सद्गुरु श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे दर्शन घडले.स्वामी महाराजांनी करुणादृष्टीने ताईंकडे बघितले व ते तेथून निघून मुक्कामी परतले.पण इकडे ताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.ताई सर्व देहभान विसरल्या.त्यांना भाव समाधीच लागली.ताईंना देवांचा स्वप्नदृष्टांत झाला की ,श्री स्वामी महाराजांचे चरणतीर्थ आपल्या डोळ्यात घालावे म्हणजे त्यायोगे डोळ्यांची व्याधी दूर होईल.पण स्वामी महाराज आपले चरणतीर्थ कुणालाही देत नसत हा त्यांचा नियम होता.त्यांनी श्रीस्वामी महाराज स्नान करुन कृष्णामाईतुन वर आले की घाटाच्या पायर्‍यावर उमटणारे स्वामी महाराजांच्या चरणांवरील पाणी त्या आपल्या पदरात टिपून घेऊ लागल्या व‌ ते चरणतीर्थ आपल्या डोळ्यात घालू लागल्या.आश्चर्य आणि श्रीदत्त कृपा अशी की काही दिवसांतच पू.ताईंच्या डोळ्यांची व्याधी यामुळे समुळ दूर झाली.पुढे नरसोबावाडीच्या श्रीपादुकांची मानसपूजा त्या अखेरपर्यंत करीत.

लवकरच ताईंचा विवाह वाईच्या सावकार दामलेंच्या मुलाशी श्री शंकरराव दामले यांच्याशी झाला.हे अत्यंत श्रीमंत व प्रतिष्ठित घराने होते.त्यांच्या तेजस्वी जिवनास येथूनच सुरुवात झाली.त्यांची कृष्णामाई वर नितांत श्रद्धा होती.रोज पाणी भरण्यासाठी वा स्नानासाठी कृष्णामाईवर त्यांचे जाणे होत असे.त्या माईंच्या स्मरणात इतक्या एकरुप होत की त्यांना तिथेच भावसमाधी लागत असे.संसार करतांना ही ताईंची पारमार्थिक बैठक यत्किंचितही मोडली‌ नाही.त्या सतत नामस्मरण व आपला नित्य क्रम यात खंड पडू देत नसत.पण त्या हा आपला परमार्थ अतिशय गुप्त पद्धतीने करित.पुढे यथाकाळी ताईंना मुलगा झाला.त्याचे नाव "दत्तात्रेय" ठेवण्यात आले.ताई त्यावेळी आपल्या माहेरी आलेल्या होत्या.पण यावेळी अजून एक महद् भाग्याची घटना घडली.मानसपूजा,नामस्मरण करण्याची साधना देणारे ब्रह्मनाळचे स्वामी परत जवळ जवळ १२ वर्षांनी पुन्हा ताईंकडे आले.एका तपानंतर जणू आता पुढची उपासना द्यायलाच ते आले होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.त्यांनी ताईंना "तू यापुढे ज्ञानेश्वरी वाचीत जा.समजो न समजो.नियमाने वाचीत जा." ताईंनी दुसर्‍या दिवसापासून ज्ञानेश्वरी वाचण्याचा नियम सुरु केला. जमेल तशी‌ त्या ज्ञानेश्वरी वाचू लागल्या.ताई आता सासरी परतल्या पण यावेळी दत्तप्रभुंच्या उपासने बरोबर त्या ज्ञानेश्वरी ही सोबत घेऊन आल्या.पुढे १२ वर्ष ताईंनी अखंड ज्ञानेश्वरी व दत्त उपासना केली.हे दुसरे तप‌ ही पूर्ण होत आले.त्याच काळात त्यांचे यजमानांनी वेगळ्या ठिकाणी बिर्‍हाड हलविले.आता त्यांना ज्ञानेश्वरी चा अर्थ माउलींच्या कृपा करुणेनी अंतरंगातून उलगडायला लागला.त्या आता नित्य अखंड ज्ञानेश्वरी वाचत असतंच, पण शेजारी राहणाऱ्या स्त्रीया देखील ज्ञानेश्वरी ऐकायला दुपारी त्यांच्या घरी येऊ‌ लागल्या. याच काळात त्यांना शेषशायी भगवान महाविष्णू व माता लक्ष्मी चे दर्शन ही झाले.तो दिव्य अनुभव ताईंच्या या साधनेचा परीपाकच होता.त्यांचे ओढीने,तळमळीने, प्रेमाने,कसलीही अपेक्षा न ठेवता ज्ञानेश्वरी चे वाचन सुरुच होते.पण आता त्यांना माउलींच्या दर्शनाची ओढच‌ लागली होती.त्यांची ही तळमळ दिवसेंदिवस वाढत गेली व एकेदिवशी त्यांना माउलींनी स्वप्नात दर्शन दिले.त्यांच्या पाठीवरुन हात फिरवला. हा प्रसंग घडल्यावर मात्र त्यांच्या जिवनात शांती व समाधान उत्तरोत्तर वाढतच गेले.पुढे ताईंनी ध्यानाभ्यासाला ही सुरुवात केली.त्या सुरुवातीस रात्रीला सर्व निजल्यावर ध्यान करीत.नंतर त्या पहाटेच्या वेळी ही ध्यान करु लागल्या.मार्ग चालत राहा, कंटाळू नका.परमेश्वर पाठीशी आहे.असे आश्वासन त्या आपल्या स्वानुभवातून इतरांना देत.


संसार करता करता ताई ज्ञानेश्वरी आपल्या जिवनात उतरवून तसे जिवन जगण्याचा सराव करु लागल्या.त्यांनी नुसते ज्ञानेश्वरी चे वाचनच नाही केले तर त्या आता ज्ञानेश्वरी जगायला ही लागल्या .त्याचा एक सुंदर प्रसंग ताईंच्या चरित्रात आहे तो बोधप्रद प्रसंग मुद्दाम इथे देतो आहे.ताईंनी कधीही आपल्या आवडी निवडी कुणालाही सांगितल्या नाही.त्या पुढे येईल त्याचा भगवंतांची इच्छा म्हणून स्विकार करीत.एकदा त्यांचे पती श्री शंकरराव यांनी त्यांच्यासाठी घरच्याच दुकानातून लुगडी आणली.लुगड्यांची जोडी असल्याने त्यांनी तशीच ती ताईंसाठी आणली.ताईंनी ती नेहमी प्रमाणे देवासमोर ठेऊन भिजविली.लुगडी चांगली होती पण एकाच रंगाची! शंकररावांनी हे बघितल्यावर त्यांना आपण एकाच रंगाची दोन लुगडी आणल्याचे लक्षात आले.त्यांनी ताईंना विचारले, "एकाच रंगाची लुगडी असतांना मला सांगितले का नाही.मी बदलून दुसरा रंग आणला असता." त्यावर ताईंने दिलेले उत्तर त्यांचा अधिकार दाखवतो.त्या म्हटल्या, "जगात चैतन्य एकच आहे,असा अभ्यास करायचा,मग द्वैत कशाला? जे ज्ञानेश्वरी वाचताना मिळवायचे त्याची कृती व्यवहारात यायला हवीच." ताईंच्या या उत्तरातून त्यांच्यात परमार्थ किती खोल रुजला होता.त्यांची विवेकाची बैठक किती दृढ झाली होती हे दिसून येते.ताई अशाप्रकारे ज्ञानेश्वरीची ओवी अनुभवात आणण्याचा प्रयत्न करीत होत्या.ज्ञानेश्वरीचे सातत्याने वाचन,मनन‌ व चिंतन करीत करीत ताईंनी ज्ञानेश्वरीचा अर्थच आपल्या जिवनात उतरविला.


पुढे व्यापारात नुकसान‌ झाले, घरावर जप्तीचा प्रसंग आला.आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक झाली.पण याकाळात ही ताई डगमगल्या नाही.तर त्या मनात म्हणत, "बरे झाले लक्ष्मी गेली ती ! नाहीतरी सावकारी चा व श्रीमंतीचा दामले मंडळींना फार अहंकार होता.तो नाहीसा करण्यासाठीच देवांनी हा प्रसंग आणला आहे." इतक्या त्या भगवंत चरणी लिन होत्या की जिवनात होणारी प्रत्येक घटना ही त्यांचीच कृपा आहे असा भाव त्यांचा दृढ झाला होता. अडचणीच्या काळात ही ताई आनंदाने जिवन जगत.दुपारी कामे उरकली की त्या तिन नंतर ज्ञानेश्वरीवर चिंतन ,प्रवचन करीत.पुढे ज्ञानेश्वर माउलींनी स्वप्नात येऊन त्यांना अनुग्रह देण्याची आज्ञा केली.त्याप्रमाणे त्या त्यांच्याकडे आलेल्या मुमुक्षू साधकाला अनुग्रह देऊ लागल्या. त्यांनी आजिवन भक्तांसाठी ज्ञानेश्वरी सांगितली. पुढे उत्तरोत्तर त्यांनी आपला ध्यानाभ्यास वाढविला.त्या जरुरीपुरतीच झोप घेत.यावेळी ध्यान साधनेत त्यांना भगवान महाविष्णू चे दर्शन झाले होते.ताईंच्या चरित्रातून आपल्याला लक्षात येतं की ,ताईंनी जे जे वाचले ते ते आचरणात आणण्याचा प्रयत्न केला.नामाचा आधार घेतला.वृती अंतर्मुख करण्यासाठी मानसपूजा केली.श्रीज्ञानेश्वरी अभ्यासली.त्या वाचनाने विवेक व वैराग्याचा जिवनात अवलंब केला.अखंड अभ्यासाने मनाची व बुद्धीची स्थिरता व सुक्ष्मता त्यांनी प्राप्त करुन घेतली होती.


ज्ञानेश्वर माउली हाच आमचा संप्रदाय असे त्या म्हणत.त्यांनी कधीही कुणालाही उत्तराधिकारी नेमले नाही.आपली प्रसिद्धी व्हावी म्हणून काडीचाही प्रयत्न केला नाही.कधीही मुलाखात दिली नाही.त्या ज्ञानेश्वरी सांगण्यासाठी कधीही उच्चासनावर बसल्या नाही.त्या सदैव श्रोत्यांमध्येच बसत व प्रवचन झाल्यावर प्रत्येक श्रोत्यांना माउली म्हणून नमस्कार करीत. पुढे मुले मोठी झाली ,नोकरीला लागली ,त्यांचे लग्न उरकल्यावर त्या जवळ जवळ संसारातून जणू मुक्तच झाल्या .त्यांनी आपले साधन आता जवळ जवळ पूर्ण दिवस भरच सुरु केले.त्या आता नित्य साधनेत लिन राहू लागल्या.याच काळात भक्तांनी त्यांना तिर्थयात्रेला ही नेले.असेच एकदा त्रंबकेश्वरी गेल्यावर निवृत्तीनाथांच्या समाधी जवळ त्या दिड तास गहन ध्यानात गढून गेल्या होत्या.पुढे अखंड ज्ञानेश्वरी चे वाचन व प्रवचनाद्वारे ताईंनी लोकसंग्रह केला.त्यांना ज्ञानेश्वरी ची गोडी लावली.त्यासाठी त्या मुंबई,पुणे,सांगली, इस्लामपूर, औदुंबर, इचलकरंजी, ठाणे,चिंचवड अशा बर्‍याच ठिकाणी अखंड प्रवास करीत.९५ वर्षाची शेवटची दोन तपे ताईंनी अखंड ज्ञानेश्वरी सांगितली.अशा प्रकारचे भव्य दिव्य जिवन ताई जगल्या.खरंतर प.पू.ताईंचे चरित्र इतके विलक्षण आहे की प्रत्येक प्रसंग हा जिवन कसे जगावे याचा एक एक प्रबंध‌ आहे.पण शब्द मर्यादेमुळे ते मांडता आले नाही.संसार करुन ,घर सांभाळून अखंड परमार्थ करणार्‍या ताई म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक आदर्शच आहेत.संसार हा परमार्थाला मारक नसुन आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला तर तोच संसार परमार्थाला कसा पुरक होतो याचे हे प.पू.ताईंचे जिवन उत्तम उदाहरण आहे.ही संत चरित्रे किती उपकारक असतात हे याचे वाचन करतांना नित्य जाणवते.ताईंच्या जिवन चरित्राचा विचार केला तर आपण काय करायला हवे याचे उत्तर आपले अंतर्मनच देऊन जाते.अशी ही कृष्णाकाठची ज्ञानेश्वर माउलींची परमप्रिय विभूती वयाच्या ९५ व्या वर्षी १९ सप्टेंबर १९८३ रोजी त्रयोदशी तिथीला आपल्या परमप्रिय माउलींच्या चरणी लिन झाल्या.भक्तांनी त्यांचे सारे और्ध्वदेहीक हे आळंदीला इंद्रायणी काठी केले .आज ज्या ठिकाणी त्यांना अग्नी देण्यात आला तिथे घाटावर प.पू.ताईंची समाधी आहे.ही शब्दसुमनांजली परमपूज्य ताईंच्या चरणी अर्पण करून त्यांना प्रार्थना करतो की हे जिवन माउलींच्या सेवेत,स्मरणात रुजू करण्याचा विवेक त्यांनी आम्हाला द्यावा व ज्ञानेश्वरी च्या कृपेचा अनुभव ही या जिवनात आम्हाला मिळावा.

      ✒️✍️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

#महाराज_ज्ञानेश्वर_माउली_समर्थ ❤️🙏🌸🌿

#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🌿🌺



 

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...