Thursday, October 6, 2022

सद्गुरु श्रीबाळुमामा महाराजांची आज १३०वी जयंती🙏🌸🌺🚩


 शिवावतार_आदमापूर_निवासी_सद्गुरु_श्रीबाळुमामा_महाराजांची_आज_१३०वी_जयंती:-🙏🌸🌺🚩


                             विलक्षण महापुरुष,प्रत्यक्ष शिवावतार सद्गुरु श्रीबाळुमामांची आज १३० वी जयंती.मामांचे भक्त महाराष्ट्र,दक्षिण भारत व संपूर्ण हिंदुस्थानात पसरलेले आहेत.सिद्धांच्या मांदियाळीत अग्रगण्य असलेले मामा म्हणजे एक लोकविलक्षण सत्पुरुष.प.पू.मामांचे चरित्र अतिशय विलक्षण आणि आश्चर्यचकित करणारे आहे.अलिकडच्या काळात होऊन गेलेल्या विलक्षण संतांपैकी एक असलेल्या मामांचे चरित्र आपल्याला श्रुत आहेच.तरी आपण आज जयंतीच्या पुण्यपर्वावर मामांच्या अवतार कार्याचे स्मरण करुयात.

                 पु.मामांचे पूर्वज हे बाणा-निंबर्गीचे देसाई असे मानले जातात.काही कारणाने या घराण्यातचे लोक आकोळ या गावी राहावयास आले.याच घराण्यातील श्री मायाप्पा हे मामांचे वडिल व सौ.सुंदराबाई या मामांच्या मातोश्री.बाळु मामांची आई सौ‌ सुंदराबाई यांचे माहेर आप्पाचीवाडी.हे गाव कागल-निपाणी या राष्ट्रीय महामार्गाजवळ आहे.याच गावात नाथ संप्रदायातील सिद्ध महापुरुष सद्गुरु श्री हालसिद्धनाथांचे अतिशय जागृत असे ठिकाण आहे.प.पूमामांची आई सुंदराबाई या अतिशय धार्मिक आणि सत्शिल होत्या.त्यांची पांडुरंगावर विशेष भक्ती होती.त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ होती व त्या निष्ठेने एकादशीचे व्रत करित असतं.सत्याव्वा व मायाप्पांचे शुभमुहूर्तावर लग्न झाले.दोघेही अतिशय भाविक असे दांम्पत्य होते.लवकरच सुंदराबाई दिवस गेलेत व मामांसारख्या महापुरुषांच्या जन्माची चाहूल लागली.गर्भवती झाल्यावर सुंदराबाई या जास्तीत जास्त भजनात ,नामस्मरणात तल्लीन होऊ लागल्या. त्यांचे मन हे भगवद भजनात रमत असे.असा लोकविलक्षण महापुरुष ज्या पोटी जन्म घेणार होता त्यांना या पेक्षा वेगळे काय डोहाळे होतील? शके १८१४ चा अश्विन उजाडला.सुंदराबाई नऊ महिने भरत आले होते.अश्विनातील शुद्ध एकादशी आली.सौ.सुंदराबाई गरोदर असुनही त्या वेळी उपवास केला होता.अहोरात्र भजन नामस्मरण सुरु होते.त्यात त्या तल्लिन झाल्या होत्या.दुसर्या दिवशी द्वादशी सोमवार.सकाळी सर्वांची जेवणे झाल्यावर दुपारी ४ वाजुन २३ मिनीटांनी त्या प्रसुत झाल्या व‌ प्रत्यक्ष शिवावतार मामांचा जन्म झाला.जन्मताच या बाळाच्या चेहेर्यावर विलक्षण शांती आणि तेज होते.जन्म झाल्यावर मामा शांत आणि प्रसन्न मुद्रेत हसत होते.मामांची बालपणी प्रकृती सुदृढ होती.पण त्यांचे लक्ष सदैव वेगळ्याच ठिकाणी लागलेले असे.त्यांचे विक्षिप्त वागणे ,एकांतप्रिय असणे लोकांना वेगळे वाटत असे.त्यामुळे की काय लोक मामांना "खुळा बाळू" असे म्हणत.त्यांच्या विक्षिप्त वागण्यामुळे घरच्यांना वाटले की त्यांना भुतबाधा झाली आहे व त्यामुळे त्यांना यातुन सोडविण्यासाठी अनेक मांत्रिक,बुवा,देव ऋषी यांचे उपाय ही केले गेले.बाळूमामांनी एका धनगर घरात अवतार धारण केला होता.त्यामुळे थोडे मोठे झाल्यावर बाळूमामांना कामाचे वळण लागावे म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना अक्कोळ या गावातील जैन व्यापारी चंदुलाल शेठजींकडे पाठविले.धनगराचे पोरं म्हणून त्या शेटजीने त्यांना गोठ्यात राहण्यास एक कोपरा,जेवण्यासाठी एक थाळी आणि पाण्यासाठी एक लोटा दिला.त्या शेटजींच्या आईला मामांनी त्या थाळीतील छिद्रातून निघणार्या प्रकाश झोतात भगवान महावीरांचे दर्शन घडविले. पण हा चमत्कार झाल्यावर मामा आपल्या घरी परत आले.शेटजीने प.पु.मामांची ती थाळी व तांब्या आपल्या देवघरात पुजेसाठी ठेवला.तो ठेवल्यावर त्यांच्या घराची मोठी भरभराट झाली.मामा वीस वर्षांचे झाल्यावर लवकरच  त्यांच्या मनाविरोधात त्यांच्या भाचीशी म्हणजे सत्यव्वांशी त्यांचा विवाह करण्यात आला.त्यावेळीच्या रितीप्रमाणे विवाह पार पडला पण सत्यव्वांचे वडिल, मामांचे सासरे मामांनी आधी भविष्य वर्तवल्या प्रमाणे लग्न लागताच गतप्राण झाले.प.पु.मामा हे जन्मसिद्ध योगी होते.त्यांच्या या योग सामर्थ्याची प्रचिती लवकरच सर्वांना आली.मनाविरुद्ध लग्न झाल्यावर मामा घरी परतले.पण आल्यावर आठवडाभर ते निर्विकल्प समाधी लावण्याचा खेळ करु लागले.ते मृतासारखे पडून राहत.हृदयाचे ठोके ,शारिरीक हालचाली सर्व काही बंद होत असे.सुरवातीला असे झाल्यावर लोक जमले.बाळू मेला म्हणून रडले.अगदी तिरडी बांधून सर्व तयारी ही झाली आणि बघतात तर मामा झोपेतून उठल्याप्रमाणे अंग सावरत उठून बसले.हा खेळ मामांनी आठवडाभर चालवला होता. मामांनी लवकरच आपला पिढीजात चालत आलेला बकरी पाळण्याचा व्यवसाय सुरु केला.आपल्या कमरेचा चांदिचा करदोडा विकुन त्यांनी एक शेळी व एक गाय विकत घेतली.मामांनी आपल्या वडिलांना एकदा म्हटले होते, "मला लोकांच्या घरी पाठवू नका‌,पुढे मागे बाळू धनगराचे घर राजवाड्यासारखे होईल! ते पाहायला जग येईल."!


                                         इथे एक विशेष गोष्ट अधोरेखित करतो‌‌ ती अशी की मामा हे जन्मसिद्ध होते.त्यांनी कधीही कुठलीही साधना केली नाही आणि विशेष म्हणजे त्यांना सद्गुरुंचा अनुग्रह लाभण्याआधीच ते सिद्ध अवस्थेला प्राप्त झालेले होते.प.पू.मामांनी अगदी बालपणापासूनच आपल्या या सामर्थ्याची प्रचिती अनेकांना दिली होतीच.मामांच्या दर्शनासाठी पहाटेला अनेकवार त्यांच्या तंबूमध्ये कैलासातील भक्तराज नंदी,देवीदेवता येऊन जात.यांचे दर्शन लोकांना झाले होते,भगवती आदिशक्ती चा व मामांचा अनेकवार संवाद होत असे.एका प्रसंगी मामांनी चिंचणीच्या मायक्कांना फटकारल्याचाही प्रसंग आहे.यावरुन मामांचे अवतारित्व व त्यांचा विलक्षण दिव्य अधिकार आपल्या लक्षात येईल.श्री मामांच्या चरित्रात इतक्या अलौकिक आणि चमत्कारिक लिला आहेत की कितीही प्रयत्न केला तरी या लेखात त्यातील थोड्यांचाही समावेश करणे अशक्यप्राय आहे.तरी मी मामांच्या दिव्य अधिकाराची प्रचिती आणणारे काही प्रसंग लेखात देतो आहे.(हे सर्व प्रसंग सद्गुरुंच्या भेटी अगोदर घडलेले आहे.) 

          एकदा मामांचा मुक्काम चिकोत्रा नदीजवळ होता.मामा त्यावेळी २८ वर्षांचे असतील.त्यावेळी सत्याव्वा,मेहुणी लगमव्वा आणि सासू गंगुबाई या स्त्रिया तळावर होत्या.तळ्यावरील दूध विकुन पैसे साठवण्याचा छंद या स्रियांना लागला. पण यामुळे मामा सोडून इतरांना जेवणात दूध कमी पडु लागले.सर्वज्ञ मामांना ही बाब अंतर्ज्ञानाने कळलीच होती व या स्त्रीयांना अद्दल घडविण्याचे त्यांनी ठरविले.मामांची सत्ता चराचरावर होती.इतकेच काय तर ज्या वस्तु आपल्याला निर्जीव वाटताता त्या ही मामांच्या मर्जीत वागत.मामांनी स्त्रियांना दुसर्या दिवशी मोठ्या प्रमाणात दूधातून लोणी काढण्याची आज्ञा केली.आज्ञा केल्यावर सर्व जन आपापल्या कामात व्यस्त झाले व मामा ताकाच्या डेर्याजवळ आले‌.त्यांनी त्या ताकाच्या डेर्याला आज्ञा केली , "उद्यापासून तुझ्यातून लोणी निघेल तर माझ्या पायात खेटर आहे.हे लक्षात ठेव!" असे म्हणून मामा तिथून निघून गेले.दुसर्या दिवशी लगमव्वा आज्ञेप्रमाणे ताक करण्यास बसली.एकतास गेला,दोन तास गेले,तीन तास गेले ,चार तास गेले तरी लोणी काही आले नाही.खुप स्त्रियांनी देखील प्रयत्न केला पण लोणी काही आले नाही.शेवटी कंटाळून त्यांनी काम बंद केले.हाच प्रकार सलग तिनं दिवस झाला.शेवटी त्या स्त्रिया मामांना शरणं आल्या ,त्यांना आपली चूक लक्षात आली.त्यांनी मामांची क्षमा मागितल्यावर मामांनी ताकाला , "बारो बेन्याप्पा!(लोण्या ये बाबा) असे म्हणताच .ताकावर लोण्याचे गोळे तरंगु लागले.चराचरावरील मामांची ही सत्ता सर्वांसाठी अचंबित करणारी होती.सजिवांवर प.पू.मामांची पूर्ण सत्ता होतीच पण निर्जिव सृष्टीवर ही मामांचा पूर्ण अधिकार होता.याचे अनेक उदाहरण आपल्याला मामांच्या दिव्य चरित्रात जागो जागी बघायला मिळतात.अशी सत्ता आपल्याला फक्त भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या चरित्रातच बघायला मिळते.माउलीनीही निर्जीव भिंतीला आज्ञा देऊन चालते केले होते.यावरुन आपल्याला मामांचा अधिकार लक्षात येईल.मामांची पंचमहाभूतांवरही सत्ता ,नियंत्रण होते.त्या लिला ही चरित्रात आल्या आहेत.नियंत्रण म्हणजे शब्दशः नियंत्रण असाच अर्थ मला मांडायचा आहे.मामांनी मालकाच्या हक्काने पृथ्वी,हवा ,पाणी आग,आकाश यांना आपली आज्ञा केली आणि ही आज्ञा त्या पंचमहाभूतांनी मामांनी सांगितल्या प्रमाणे पाळली आहे.शब्द मर्यादेस्तव त्या लिला इथे देता येणार नाही.


एकदा एक अतिशय दयनीय गरीब माणूस मामांना शरणं आला आणि आपल्याला कर्जातून सोडविण्याची प्रार्थना करु लागला.कृपाळू मामांना त्याची लगेच दया आली व तो खरंच शुद्ध अंतःकरण असलेला माणूस आहे हे त्यांनी जाणले.तो खरचं दु:खात होता हे जाणून मामा लागलीच चालता चालता थांबले.ते जमिनीवर बसले.त्यांनी आपल्या हातातील काठी तिनं वेळा जमीनीवर मारली तोच जमिनीतून एक गाठोडे वर आले त्यांनी त्या गरिबाला त्या गाठोड्यातून हवे तेवढे चांदिचे शिक्के घेण्यास सांगितले.त्या माणसाने त्याला निकड होती तेवढेच पैसे घेतले.मामांनी लगेच हातातील काठी जमीनीवर मारता क्षणी ते आले तसे जमीनीत गुप्त झाले. कानपूर गावाजवळ लोकांना मरीच्या आजारातुन फक्त एका रिंगणात रहायला सांगुन वाचविले.तसेच एकदा अचानक वादळ सुटलं त्यात मामांना मेढ्यांना सांभाळायला धावपळ करावी लागली.धावपळीत मामांची चप्पल ,घोंगडे आणि डोक्याचा पटका सतत सटकु लागला.मामांना याचा अतिशय त्रास झाला .मामांनी या तिघांनाही जमिनीवर ठेवून आपली काठी वाजवली व शिव्या देत दम दिला.त्यानंतर या वस्तु जिवनात कुठलाही प्रसंग आला तरी जागेच्या हलल्या नाही.या प्रसंगाचे अनेक जन आजही साक्षीदार आहेत.शरण आलेल्याला संतान प्राप्तीचे आशिर्वाद दिले,अनेकांचे रोग दूर दिले असे अनेकाविध लिला चमत्कार मामांनी केले.कित्येक वेळा गरीब लोक मामांपर्यंत पोचू शकत नव्हते त्यांच्यापर्यंत मामा स्वतः जात.


               प.पू.मामांचा वेश अगदी साधा पण निटनेटका होता‌.स्वच्छ धोतर ,पूर्ण बाह्यांचा शर्ट,डोक्यावर फेटा,पायात कातडी साध्या चपला,हातात एक काठी,सुमारे सहा फूट उंची,मध्यम बांधा,प्रमाणबद्ध सडपातळ शरीरयष्टी,निमगोरा सावळा वर्ण,आखीव रेखीव चेहेरा,भव्य कपाळ आणि भेदक तिक्ष्ण नजर असे मामांचे एकंदरीत व्यक्तीमत्व होते.मामा कानडी व मराठी या दोन्ही भाषा बोलत. मामा दर एकादशीला उपवास करत पण स्नान मात्र दर द्वादशीला करत.पण मामांचे कपडे नेहमी शुभ्रच राहत.त्यांच्या शरीरातुन दिव्य सुगंध येत असे.त्यांना भक्ती प्रेमाने केलेले भजन अतिशय प्रिय होते.ढोंगीपणा,अनाचार वृत्ती आणि अंधश्रद्धा यांचा त्यांना प्रखर विरोध होता.मामांच्या पत्नी सत्यव्वांना दिवस गेले पण मामांची आज्ञा न मानल्याने होणारा पुत्र जन्माआधीच मृत झाला व मामांचा नावाला असलेला संसार संपुष्टात आला. लवकरच मामांची आपल्या सद्गुरु माउलींशी भेट झाली.मामांचे सद्गुरु श्रीमुळे महाराज हे गाणगापूर चे दत्तप्रभु भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या परंपरेतील एक महापुरुष होते.भगवान राम व कृष्णांप्रमाणे मामांनी ही सद्गुरुंच्या अनुग्रहाचा अवलंबन केला.सद्गुरु मुळे महाराज यांचे पूर्ण नाव श्री बाळकृष्ण जयराम मुळे.यांचा जन्म मार्गशीर्ष द्वितीया शके १७९१ ला सन १८६९ रोजी दुपारी दोन वाजता सोळांकूर ,तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी झाला.बालपणीच यांनी घराचा त्याग केला.लवकरच त्यांना आपले सद्गुरु मौनी महाराज यांचा अनुग्रह लाभला.त्यांनी ही अनेक विलक्षण लिला केल्या.ते विठ्ठलाची भक्ती करत.पंढरपूर येथे दरवर्षी एकदा देवांच्या दर्शनाला जात.त्यांची आशिर्वाद देण्याची पद्धत ही फार विलक्षण होती.ते आशिर्वाद देतांना भक्तांना शिव्या देत व त्यातच त्या भक्तांचे कल्याण होत असे.बाळुमामांनी आपल्या पत्नीचा त्याग केला.ते आपल्या मेंढ्या राखता राखता भक्तांचे कल्याण करत होतेच.काही दिवस गेल्यावर एके दिवशी आकाशवाणी झाली की, "बाळु तू गुरु करुन घे.त्याशिवाय तुला तपश्चर्येचे फळ मिळणार नाही." मामा यावर सतत विचार करु लागले. पण आता गुरुंना शोधायचे कसे हा प्रश्न त्यांना पडला.त्यावर त्यांनी एक उपाय काढला.ते फुकटातच लोकांची भुतं बाधा दूर करत.पण इथून पुढे कुणीही आले तर त्यांच्या कडून दक्षिणा म्हणून सव्वा रुपये घ्यायचे त्यांनी ठरविले.जमतील ते रुपये न मोजता जवळ ठेवायचे.जो कुणी ते रुपये व‌ जमा झालेली रक्कम मागेल तेच माझे गुरु असा त्यांनी निश्चय केला.चार सहा महिने पैसे गोळा केल्यावर एकदा मामा शेणगांवच्या दत्त मंदिरात गेले तिथे मुळे महाराज होते.ते मामांना म्हणाले, "बाळू माझे पैसे कुठे आहेत ते दे!"  मामांनी प्रश्न केला "किती पैसे ते सांगा?" मुळे महाराज म्हटले, "१२० रुपये आहेत." अशा प्रकारे मामांची आपल्या सद्गुरु माउलींशी भेट झाली. पुढे यथावकाश त्यांनी मामांवर आपल्या कृपा करुणेचा अनुग्रह केला.मामा आपल्या सद्गुरुंचा अतिशय आदर करत.ते आपल्या गुरुंचा नेहमी सल्ला घेत.ते सांगतील त्याप्रमाणे वागत.ते गुरुंना कधीही प्रतिप्रश्न करित नसत.मुळे महाराज पक्के मांसाहारी होते आणि मामा पक्के शाकाहारी.महाराजांकडे मामा गेले की महाराज म्हणायचे "माझा लिंगायत देव आलाय.सर्व स्वच्छता , टापटीप ठेवा."  मामांनी व महाराजांनी अनेक लोकांचे दु:ख दूर केले,त्यांना सन्मार्गाला लावले.लवकरच मुळे महाराजांनी सन १९४८ ला चैत्र शुद्ध प्रतिपदेला सायंकाळी समाधी घेतली व आपली ईहलोकाचे अवतार कार्य पूर्ण केले.महाराजांनी गारगोटी ला देह ठेवला आणि मामा इकडे गडहिंग्लज येथील औरनाळ येथे होते.मामा अचानक बकर्यात गडबडा लोळायला लागले. त्यांच्या अंगाची लाही लाही होऊ लागली.मामांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या.त्यांनी तिन दिवस अन्नाला स्पर्श केला नाही व ते कुणासोबत ही बोलले देखील नाही.

                                        पुढे १९३१ साली एका दुपारी आकाशवाणी झाली, "बाळू तू लोकसंग्रह करण्यासाठी पांडुरंगाचा सप्ताह कर.मोठे अन्नदान कर.तुझ्या तपश्चर्येला फळ मिळेल." मामांनी याचा विचार केला.मामांनी या सप्ताहाला "भंडारा" असे नाव दिले.सन १९३२ ला मेतके या गावी पहिला भंडारा सप्ताह करण्यात आला.त्यानंतर तो भंडारा उत्सव काही कारणाने मेतक्याला करण्याचे मामांनी नामंजूर केले आणि मग तो विविध ठिकाणी झाला.अखेर फिरत फिरत तो भंडारा उत्सव हा आदमापूर येथे आला व मामांनी देह ठेवेपर्यंत तिथेच साजरा झाला.आजही मामांचा "भंडारा" उत्सव हा आदमापूर येथील समाधी मंदीरात सर्वात महत्वाचा उत्सव आहे.हजारो लोक मामांचा भंडारा आशिर्वाद घेण्याकरिता उत्सवात जातात.यानंतर मोठा काळ मामांनी धनगरांच्या मेंढी पालणाचे काम अखंड केले.जणू हे काम करता करता मामांच्या रुपात अवतरलेले भगवंत दिन,दुबळ्या ,दु:खी जिव जे मामांपर्यंत पोचू शकत नव्हते त्या सर्वांपर्यंत स्वतः जाऊ लागले.आपल्या भक्त उद्धाराचे काम व त्यावेळी त्यांनी केलेल्या लिला जर लिहील्या तर एक काय असे शेकडो लेख तयार होतील.त्यात मामांनी कुणाचे कॅन्सर सारखे भयंकर हे रोग घालवले तर कुणाचे दारिद्र दूर केले.कुणाची करणी बाधा दूर केली तर कुणाला भूत बाधेतून सोडविले.अशा अनेकाविध डोके सुन्न करणारे अलौकिक लिला चमत्कार मामांच्या चरित्रात आहे.विशेष असे की मामांच्या या लिला प्रत्यक्ष अनुभवनारे भक्त आजही जिवंत आहेत.असे भक्तांचा उद्धार करणारे प्रचंड अगम्य कार्य करत करत मामांनी सर्वदूर संचार केला.पुढे १९६६ साली मामांनी आपला देह ठेवण्याचा निर्णय काही भक्तांना सांगितला.त्यासाठी खुप आधी त्यांनी जागाही निवडली होती.१९६२ साली मामा आदमापूर येथे तळावर होते.तेथील एका वृक्षाखाली मामा निवांत बसले होते. त्यावेळी आदमापूरचे सरकार (जमिनदार मोठे प्रसिद्ध गृहस्थ) व इतर काही लोक मामांजवळ बसले होते.त्यावेळी मामांनी एका माळाकडे जिथे भाताची शेती होती बोट दाखवत विचारले, "हे माळ कुणाचे?" सरकार ने सांगितले की , "माझं आहे जी!" मामा म्हटले, "तिथे मला थोडी जागा देशील काय?" सरकारने तात्काळ मामांना ती जागा अगदी नम्रपणे अर्पन केली.मामांनी यावेळी ही जागा का मागितली हे कुणासही ठाऊक नव्हते पण नंतर मात्र सर्वांना मामांच्या या मागणीचा अर्थ कळला.१९६६ पासून मामा समाधी बद्दल थोडेफार बोलू लागले.अगदी गुढ शब्दात ते सुचना देऊ लागले.मामा निंगापूर ला होते तिथे त्यांना ताप आला.मामा अशक्त झाल्यामुळे त्यांना आदमापूर येथे आणल्या गेले. ४ सप्टेंबर श्रावण वद्य चतुर्थी आपल्या जवळच्या भक्तांना मामांनी बोलाविले.सांगितले मला बघून घ्या,डोळे भरुन बघा. शनिवारी मध्यरात्र उलटल्यावर मामांनी आपले अवतार कार्य संपविले.तो दिवस होता ४ सप्टेंबर श्रावण वद्य चतुर्थीचा.मामांच्या समाधीची वार्ता लवकरच सर्वदूर पसरली.जो तो मिळेल ते वाहन घेऊन आदमापूरला मामांच्या अखेरच्या दर्शनाला आला.सर्वांचे दर्शन झाल्यावर मामांच्या देहाची विधीयुक्त पुजा झाली व मामांच्या देहाला समाधी देण्यात आली.


             कोल्हापूरातील एका धनगर भक्ताला मामा एकदा म्हणाले होते. "अरे मी मरणारा मानव नव्हे! गोरीतनं (समाधीतून) माझं हाडं तुझ्याशी बोलतील.ध्यानात ठेव!" या वाक्याची प्रचिती मामांच्या महासमाधी नंतर भक्तांना लगेच आली व आजही येत आहे.मामांचा आवडता भक्त बाबुराव याला मामांच्या समाधीचे वृत्त उशीरा कळले.तो चौथ्या दिवशी आदमापूरला रडत रडत निघाला‌.रात्री उशीरा पोचल्यामुळे त्याला समाधी स्थानाचे ठिकाण माहिती नव्हते.गावातील लोक कुणीच दिसत नव्हते.तेव्हा अंधारात वाट शोधत तो निघाला.पण तो समाधी स्थानाच्या विरुद्ध दिशेला जात होता.तेवढ्यात अंधारातून त्याला मामांचे स्पष्ट शब्द ऐकू आले.मामा त्याला म्हटले, "ए बावच्या! असं वेड्यासारखं तिकडं आडाकडं कुठं चालला आहेस? मी इथं बसलोय नव्हं?" बाबुराव आवाजाच्या दिशेने गेला तर त्याला मामांचे समाधीस्थळ दिसले.रात्री तिथेच घोंगडी टाकून तो  झोपला.सकाळी तळावरचे लोक आल्यावर सर्वांना त्याने ही हकिकत सांगितली तेव्हा सर्व मामांच्या समाधीपुढे नतमस्तक झाले.आपल्या मानसभगिनी श्रीमती पारुबाई कुंभार यांना मामांनी स्पष्ट शब्दात सांगितले होती की, "पारे,बाळू धनगर मेला,असं जग म्हणलं.बोंब मारतील! पण लक्षात ठेव,मी मरणारा धनगर नव्हे! माझ्या उपवासाचे पारणे कायमपणे मी तुझ्या हातच्या अन्नानेच सोडणार आहे! माझा नैवेद्य तू चुकवू नकोस! मी अमर आहे! कु़ंभारणी ,ध्यानात ठेव!!" पारु कुंभारीण ज्यांना सर्व भक्त पारुमामी म्हणून ओळखत असत.मामांचे हे शब्द तसेच अखेरपर्यंत पाळले.त्या दर द्वादशीला मामांसाठी नैवैद्य घेऊन येत असत.कित्येकदा त्यांनी आणलेले पदार्थ त्यांच्या गाठोड्यातून अदृश्य झाल्याचा अनुभव अनेक लोकांनी घेतला होता.१९९६ ला मामांचे नामस्मरण करता करता त्या मामांच्या चरणी लिन झाल्या.असे हे बाळुमामांचे दिव्य चरित्र.त्याचे स्मरण ही झाले तरी अंगावर रोमांच उभे राहतात.इतके ते विलक्षण दिव्य आहे.मामा हे मानव रुपात अवतरलेले प्रत्यक्ष परब्रह्म होते.मामांच्या संपूर्ण चरित्रात याचे दाखले मिळतात.अशा या धनगर रुपात अवतरलेल्या परब्रह्माच्या चरणी माझी ही शब्दसुमनांजली मी अर्पन करतो.मामा परमदयाळू आणि शरणागतवत्सल आहेत.मी त्यांच्या चरणी माझे शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो आणि आपल्या सर्वांवर मामांनी सदैव त्यांच्या कृपा करुणेची छाया धरुन ,आपल्या सर्वांकडून आपल्या सद्गुरु माउलींची सेवा करु घ्यावी ही प्रार्थना करतो.


       ✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🏻🌺🌹🌸🌿

#महाराज_ज्ञानेश्वर_माउली_समर्थ🙏🏻🌺🌹🌸🌿

No comments:

Post a Comment

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...