Sunday, October 2, 2022

प्रणम्या मातृदेवता माळ ८ :- आदिशक्ती :- भगवती श्रीदेवी व्यंकम्मा🌿🌸🙏

 



प्रणम्या मातृदेवता :- माळ ८ 🌸🌿🙏🏻


🌺आदिशक्ती :-भगवती श्रीदेवी व्यंकम्मा🌺

🌿🌸 श्रीमाणिक्यप्रभुर्विजयते 🌸🌿


आज अश्विन शुद्ध अष्टमी म्हणजे महाअष्टमी , नवरात्रातील ८ वा दिवस.आपल्या या "प्रणम्या मातृदेवता" लेखमालेतील शब्दसुमनांची आठवी माळ.ही माळ आपण चतुर्थ दत्तावतार भगवान श्री माणिक प्रभू महाराज यांच्या श्रेष्ठ शिष्या ,परमयोगिनी भगवती श्रीदेवी व्यंकम्मा मातोश्रींच्या श्रीचरणी अर्पण करणार आहोत.श्रीव्यंकम्मा मातोश्री या प्रत्यक्ष आदिशक्ति अवतार होत्या.भगवान श्रीदत्तात्रेय श्रीमाणिक प्रभू महाराजांची ही शक्तिच होती.श्रीमातोश्रींचे चरित्र अतिशय दिव्य आणि अलौकिक असे आहे.आज महाअष्टमीच्या परम पावन तिथीला आपण प्रत्यक्ष आदिशक्ती स्वरुपिनी भगवती व्यंकम्मांच्या चरित्राचे स्मरण करुयात.


                   तेलंगणात सावकारीचा व्यवसाय करणारा एक वर्ग होता.याच वर्गातील लोक पुढे मोठे व्यापारी म्हणून उदयास आले.कोमटी जातीच्या याच व्यापार्‍याच्या मधील एका सत्शिल धनाढ्य व्यापाऱ्याच्या व्यंकम्मा या कन्या होत्या.व्यंकम्माचे वडिल हे निजाम राज्यातील प्रसिद्ध व्यापारी होते.सावकारीचा व्यवसाय असतांनाही ते अतिशय धार्मिक होते.तत्कालिन रुढी नुसार व्यंकम्मांचा विवाह त्यांच्या अगदी बालपणीच झाला होता.पुढे दुर्दैवाने त्यांच्या पतीचा लग्नानंतर काही काळातच मृत्यू झाला.वयात येण्यापूर्वीच व्यंकम्मा या बालविधवा झाल्या.जिवनात आता भगवंतांवाचुन आपली या दु:खातून कुणीही सुटका करणार नाही या कारणाने व्यंकम्मा आपला सर्व वेळ हा भगवत सेवेत व्यतित करु लागल्या.आधीच सश्रद्ध असलेल्या व्यंकम्मांच्या आई वडिलांचेही त्यांना सहाय्य लाभले होते.ते ही व्यंकम्मा समवेत भगवंतांच्या भक्तीत लिन होऊ लागले.अशा प्रकारे आपले जिवन व्यतित करणार्‍या व्यंकम्मा भगवान श्री माणिक प्रभु महाराजांच्या चरणांकडे वळल्या.या संदर्भात दोन कथा प्रचलित आहेत.त्या दोन्ही कथांचा उल्लेख इथे थोडक्यात करतो.

पहिल्या कथेचा भाग पुढीलप्रमाणे आहे.

देवांच्या सेवेत रममाण झालेल्या या भोळ्या भाविक कुटुंबाला अनेक लोकांनी भक्तीच्या नावाखाली, भुलथापांनी फसविले होते.अशातच एका दांभिक गुरुने मला कैलासाला जाण्याची अद्भुत विद्या ठाऊक आहे असे व्यंकम्माच्या पित्यास सांगितले.व्यंकम्माचे वडिल या गुरुच्या सापळ्यात सापडले. त्याने आधी वेगवेगळ्या पुजा , युक्तीच्या आधारे त्यांच्याकडून खुप धन‌ बळकावले.त्यानंतर एका दिवशी सर्व कुटुंबास मैलार येथील रुद्रकुंडावर व्यंकम्मासह घेऊन गेला व त्या अथांग जलाशयात उडी मारण्याचे त्याने सांगितले.गुरु आज्ञा प्रमाण मानून या सर्व कुटुंबाने त्या अथांग जलाशयात उडी मारली.पण दुर्दैवाने त्यातील कुणालाही पोहायला येत नसे.श्रीप्रभुंची योजना बघा की व्यंकम्मा गटांगळ्या खात वर आल्या.परत बुडून जात असतांना त्यांना कुणी तरी हात धरुन वर काढले.नाका तोंडांत पाणी शिरल्याने त्या अस्वस्थ झाल्या होत्या.पण वर काढण्यासाठी हात दिलेल्या त्या पुरुषाचा चेहेरा मात्र त्यांना दिसला.पुढे लोकांनी व्यंकम्मांवर उपचार केले आणि त्या ठिक झाल्या.पण या लिलायोगे जणू श्रीमाणिक प्रभु महाराजांनी त्यांचे सर्व संसार पाषच तोडून टाकले होते.कारण आता त्यांच्या घरातील कुणीही मागे उरले नव्हते.पुढे याच अवस्थेत फिरत असताना व्यंकम्मांना प्रभु दर्शनाचा लाभ झाला होता.


दुसरी कथा अशी आहे की, या ईश्वर भक्त कुटूंबाच्या कानी श्रीप्रभुंची किर्ती आली.माणिक प्रभु महाराज यांचे वास्तव्य मैलार या खंडेरांयांच्या क्षेत्री आहे असे त्यांना कळले.आता आपल्या जिवनाचे प्रभु दर्शनाने सार्थक करुन घ्यावे म्हणून सर्व कुटुंब बैलगाडीने प्रवासास निघाले.पण रस्त्यातच मोठ्या प्रमाणात विजांच्या गडगडाटासह पाऊस सुरु झाला.ओढा ,नाल्यांना पुर आला.अशातच एका नाल्यातून बैलगाडी जात असतांनाच ती पाण्याच्या प्रवाहात सापडली.गाडी भोवर्‍यात सापडली व गटांगळ्या खाऊ लागली. व्यंकम्मानी प्रभु महाराजांचा धावा केला. शेवटी ही सर्व भगवान श्री माणिक प्रभु महाराजांची इच्छाच होती त्यामुळे अचानक पाण्याच्या प्रवाहात गटांगळ्या खात असणार्‍या व्यंकम्मांना एका सोळा वर्षीय दिव्य पुरुषाने हात दिला व अलगद उचलून काठावर आणले.त्या दिव्य पुरुषाचा चेहेरा व्यंकम्मांनी बघितला आणि त्या बेशुद्ध झाल्या.काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर व्यंकम्मांना आपल्या कुटुंबाचे स्मरण राहिले नाही.त्या सर्व काही विसरल्या होत्या.जणू काही प्रभुंनी तिला जलाशयातून बाहेर आल्यावर पुनर्जन्म दिला होता.शुद्ध आल्यावर मात्र त्यांना आपल्याला पुरातून वाचविणार्‍या पुरुषाचा चेहेराच आठवू लागला.ज्याप्रमाणे वासरु आपल्या गोमातेला शोधत सैराभैरा होतं त्याप्रमाणे आपल्याला जिवनदान देणार्‍या त्या महापुरुषाला भेटण्यासाठी व्यंकम्मा ही सैराभैरा धावू लागल्या.त्या अनेक ठिकाणी गेल्या,पुष्कळ ठिकाणी याच मन:स्थितीत त्या फिरु लागल्या.शेवटी अशीच भटकंती करता करता व्यंकम्माच्या भाग्योदयाचा काळ जवळच येऊन ठेपला होता.



त्या फिरता फिरता मैलार या तिर्थक्षेत्री येऊन पोचल्या.तिथे त्यांना सर्वात प्रथम माणिक प्रभु महाराजांचे दर्शन घडले.श्रीप्रभुंचे मुखकमल बघितल्या बरोबर त्यांना लगेच लक्षात आले की आपल्याला पुरातून बाहेर काढलेला हाच तो महापुरुष.त्या प्रभु दर्शन घेता घेता भाव समाधीत स्थिर झाल्या.त्यांना त्यांचे जन्मोजन्मी चे मायबाप भेटले होते.अशा अवस्थेत बराच वेळ त्या प्रभु दर्शन घेत उभ्या असता तेथील सेवेकर्‍यांनी त्यांना प्रसाद घेण्यासाठी हाक मारली.त्या भानावर आल्या .त्यांनी माणिक प्रभु पुढे लोटांगण घातले व प्रसादासाठी हात पुढे केला.श्रीप्रभुंनी दोन खारका आणि दोन फुले त्यांच्या ओंजळीत टाकली.प्रसाद घेऊन त्या बाहेर पडल्या पण त्यांना कोठे जावे हेच सुचेना.पाय नेतील तिकडे त्या जात होत्या.पण त्यांचे अंत:करण हे प्रभु रुप झाले होते.त्यांना सर्वत्र फक्त आणि फक्त प्रभुंचे दिव्य रुप दिसु लागले.या उन्मनी अवस्थेत दोन दिवस त्या भटकत राहिल्या व पुन्हा प्रभुदर्शनाला आल्या.प्रभुंनी परत त्यांना खारकांचा व फुलांचा प्रसाद दिला.पुन्हा त्या बाहेर पडल्या पण काय करावे हे त्यांना सुचेना.दुसर्‍या दिवशी पुन्हा त्या प्रभु पुढे हजर झाल्या.प्रभुंनी मग त्यांना विचारले , "बाई ,तु वरचेवर का येत आहेस?‌तुला प्रसाद मिळाला आहे आता आपले गावी का जात नाहीस?" असे प्रभुंनी विचारताच ,त्या म्हणाल्या "महाराज ,मला माझे गाव माहित नाही.मला माझ्या पूर्वस्थितीचा विसर पडला आहे. आपल्या चरणांशिवाय मला हे जग शुन्य झाले आहे.मी आता आपल्या चरणांना सोडून कुठेही जाणार नाही." श्री प्रभुंनी तिच्या अंत:करणातील भाव जाणले होतेच.ते तिला म्हणाले , "बा‌ई तु तरुण आहेस.तुझा आमच्या वैरागी लोकांमध्ये निभाव लागणार नाही.आमच्या खाण्याचा वेळ नसतो, ना राहण्याचा ठिकाणा.आमच्या सहवासात तुझे हाल होतील.त्यामुळे तु परत जा." पण व्यंकम्मा म्हणाल्या , "आता मी आपल्याला शरणं आली आहे.आपणच माझे माता पिता ,सगे सोयरे आहात.आता मी आपले चरण सोडून मी कुठेही जाणार नाही" प्रभुंनी त्यांना बरोबर अलंकार बाळगता येणार नाही म्हणून म्हटले, त्यावेळी त्यांनी तत्क्षणी अलंकार काढून प्रभु चरणी ठेवले.

त्यानंतर मात्र त्यांचा शुद्ध भाव ,त्यांचा निर्धार बघून श्री प्रभु महाराजांनी आपल्या शिष्य परिवारात त्यांना सामिल होण्याची आज्ञा दिली.एका शिष्याकरवी प्रभुंनी व्यंकम्मांना आपल्या मातेकडे पाठविले.शिष्याने त्यांना माता बयंम्माकडे पोहचविले.प्रभुंच्या मातेला ही आनंद झाला व त्यांना आपल्या कन्येप्रमाणे मातेने जवळ ठेवले.


श्रीप्रभु महाराजांनी पुढे व्यंकम्माची अनेक प्रकारे परिक्षा घेतली.कित्येक दिवस त्यांना फक्त खारकेवरच ठेवले.अनेक दिवस आहारावाचुन राहिल्याने त्यांची प्रकृती ढासाळली तरीही व्यंकम्मा डगमगल्या नाही.त्या प्रभु चरणांशी एकनिष्ठ राहिल्या.एकदा व्यंकम्मा नित्याप्रमाणे स्नान करित होत्या.तेवढ्यात प्रभुंनी निरोप पाठविला की, "असशील तशीच निघून ये." हे निरोपाचे शब्द कानी येताच प्रभु आज्ञा प्रमाण मानून देहभान विसरून त्या विवस्त्र स्थितीतच प्रभुंपुढे जावयास निघाल्या.सर्व लोक स्तिमीत झाले.मातोश्रींना हे कळल्यावर लगेच व्यंकम्मांच्या पाठीमागे त्यांनी धाव घेतली व त्यांना थोपवुन ठेवले.विवस्त्र अवस्थेतही व्यंकम्मा निघाल्याचे जाणून प्रसन्न अंत:करणाने श्री प्रभूंनी व्यंकम्माचे शरीर झाकण्यासाठी आपल्या अंगावरील शुभ्र शाल तिच्या अंगावर घालण्यासाठी आपल्या मातेकडे पाठविली.बयंम्माने तात्काळ त्या प्रभु वस्त्राने व्यंकम्माचे शरीर झाकले.श्रीप्रभुंचे वस्त्र अंगावर पडताच व्यंकम्मा देहभान विसरल्या.त्यांच्या अंत:करणात दिव्य तेज उफाळून आले.त्यांना तात्काळ आत्मसाक्षात्कार घडला.हा व्यंकम्माच्या जिवनातील अतिशय दिव्य परिवर्तनीय प्रसंग होता.या द्वारे प्रभुंनी व्यंकम्मांवर आपल्या कृपा आशिर्वादाचे पांघरुणच घातले.यानंतर व्यंकम्मा शुभ्र वस्त्र परिधान करु लागल्या.कपाळाला शुभ्र भस्म चर्चून ,शुभ्रवसन परिधान केलेली व्यंकम्मा आता एका योगिनी च्या रुपात अधिकच तेजस्वी देसू लागल्या.यापुढील काळात व्यंकम्मा अधिकाधीक भजनात रंगुन जाऊ लागल्या.श्रीमाणिक प्रभुंच्या मार्गदर्शनाखाली यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार ,ध्यान,धारणा व समाधी या अष्टांग योगाचा अभ्यास करु लागल्या.व्यंकम्माने कठोर तपश्चर्या सुरु केली.श्रीप्रभुंची पुर्ण कृपा व्हावी म्हणून व्यंकम्मा आपल्या सर्वस्वाचा त्याग करुन अहोरात्र भजनानंदात राहू लागली.शिष्योत्तमा व्यंकम्माची अध्यात्मिक साधना श्रीप्रभुंच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर होत होती. लवकरच व्यंकम्मांनी प्रभु कृपेने लवकरच समाधी अवस्थेची प्राप्ती केली.त्या साधनेच्या अतिउच्च पातळीला गाठले.श्रीमाणिकप्रभुंनी व्यंकम्मांना परमोच्च असे देवी पद बहाल केले.माणिकप्रभुंच्या आज्ञेने श्रीदेवी व्यंकम्मा स्वतंत्ररित्या सकलजनोद्धाराचे कार्य करित होत्या.विशेष करुन त्या माणिकनगर ला येणार्‍या स्त्रियांचे प्रश्न हाताळत असत.


श्रीदेवी व्यंकम्मांचा अधिकार विलक्षण होता त्याचे एक उदाहरण मातु:श्रींच्या चरित्रात आले आहे.एकदा हुमनाबादचे एक वयोवृद्ध जोडपे प्रभु दर्शनाला आले.वयाची साठी ओलांडल्यामुळे त्यांना संतांन नव्हते.ते जोडपे प्रभुंना संतांन प्राप्तीची याचना करु लागले.तेवढ्यात तिथे व्यंकम्मा आल्या आणि प्रभुस नमस्कार करुन बाजुला उभ्या राहिल्या.तेव्हा प्रभुंनी त्यांना विचारले, "व्यंके,गेले चार दिवस तु कोठे होतीस?" त्यावर व्यंकम्मा म्हणाली, "महाराज ,पूर्वपापामुळे मला चार महिन्यातून चार दिवस आपल्या दर्शनाला मुकावे लागते.मला हे अगदी नकोसे झाले आहे." यावर श्रीप्रभु म्हणाले, "तुला इतका कंटाळा आला असेल तर एखाद्या सत्पात्र स्त्रीला ते दान देऊन का टाकत नाहीस?" तेव्हा व्यंकम्मा म्हणाली, "सद्गुरुनाथा ,माझा हा दोष घेण्यासाठी कोण हात पसरील?" प्रभु म्हणाले, "त्या समोर बाई बसल्या आहेत,त्यांच्या हातावर पाणी सोड आणि तुला नको असलेला दोष दान देऊन मोकळी हो." व्यंकम्माने तसे केले व‌ त्या दोषमुक्त झाल्या.तिथे आलेल्या जोडप्याला पुढे संतान प्राप्ती झाली.


देवी व्यंकम्मानी आपल्या उत्तर आयुष्याच्या उत्तरार्धात अखंड मौन व्रत धारण केले होते.हे मौनव्रत चालू असतांनाच शके १७८४ श्रावण वद्य त्रयोदशी रोजी आपला नश्वर देह सोडण्याचा निश्चय केला.त्या पायात चाळ बांधून प्रभु भजनात तल्लीन झाल्या.अहोरात्र नृत्य चालु होते,मुखी श्री प्रभु नामाशिवाय काहीही नव्हते.अशाप्रकारे व्यंकम्मा नाचत नाचत मृत्यूला सामोर्‍या गेल्या.व्यंकम्माने देह त्याग केला.अंगावरील कचरा दूर सारावा अशाप्रकारे त्यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला.देहत्यागानंतर कोमटी समाजाचे लोक श्रीदेवी व्यंकम्मांचा अंतिम संस्कार करण्यासाठी जमले.त्यांचे कलेवर उचलण्यासाठी जवळ जाताच त्यांच्या मुखातून "ॐ" असा ध्वनी निघू लागला.परत काही वेळाने पुन्हा उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हाही "ॐ" चा ध्वनी पुन्हा निघू लागला.बराच वेळ असेच झाल्यामुळे त्या जिवंत आहेत की त्यांनी देह ठेवला हे लोकांना कळेनासे झाले.ही गोष्ट प्रभुंना कळविण्यात आली तेव्हा ते म्हणाले, "तिच्या मनात ब्राह्मणांकरवी समाधी मिळावी असे आहे म्हणून तुम्ही कोणीही तिला स्पर्श करु नका." पुढे शिष्यांनी व्यंकम्मांना स्नान घातले ,त्यांना शुभ्र वस्त्र नेसविले ,कपाळी भस्म लावले,गळ्यात रुद्राक्ष माळा घातल्या.देह ठेवल्यावरही त्या पुन्हा एकदा समाधी तून उठल्या व त्यांनी श्रीप्रभुंना नमस्कार केला आणि मग परत मांडी घालून योगासन साधून अखंड समाधी लावली. सर्वत्र "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त" असा जयघोष झाला व प्रभु महाराज स्वतः तिथे आले ,त्यांनी शिष्यांकरवी व्यंकम्मांची पुजा,आरती करविली.त्यानंतर व्यंकम्मांना समाधी दिली गेली.अशा प्रकारे वैश्य समाजातील एक सामान्य कोमटी विधवा स्त्री परमोच्च देवी पदाला पोहचली होती.इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष दत्तावतार श्रीमाणिकप्रभूंची त्या चित्शक्ती बनल्या.हा माणिक प्रभू महाराजांनी केलेला एक दिव्य लिला आविष्कारच होता.व्यंकम्मा या अतिविलक्षण शक्ती होत्या.श्रीदेवी व्यंकम्माने सत्संग ,कठोर तपश्चर्या,साधना, गुरु चरणी अनन्य निष्ठा आणि अनन्य भक्तीने "श्रीदेवी मधुमती शामलांबा" हे नाव प्राप्त केले ,तो अधिकार प्राप्त केला.अशा या दिव्य भगवती व्यंकम्माच्या चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो आणि ही शब्दसुमनांजली श्रीचरणी अर्पण करतो.

           ✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

1 comment:

  1. माणिकप्रभू महाराज पुण्यतिथी

    ReplyDelete

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...