Tuesday, October 4, 2022

दसर्‍याचे सिमोल्लंघन 🙏महायोगिनी अक्का महादेवी🕉️🙏📿🌸🌿

 


दसर्‍याचे सिमोल्लंघन 🙏🌸☘️🔥🔱🕉️📿

महायोगिनी_अक्का_महादेवी🕉️🙏📿🌸🌿


               आज विजयादशमी आपल्या "प्रणम्या मातृदेवता" या लेखमालेतील शेवटचा व समारोपाचा लेख.खरंतर हा समारोप नाही तर ही सुरुवात असावी हीच श्रीगुरु चरणी प्रार्थना.हा लेख व्हावा ही ईश इच्छा असावी कारण तसे योगायोग ही घडले आणि आमच्या हेमंत दादांनी इच्छा प्रगट केली की सिमोल्लंघनाला तू अक्का महादेवींवर एक लेख लिही.मलाही अतिशय आनंद झाला कारण अलिकडेच अक्का महादेवींचे चरित्र वाचले होते.त्यामुळे आनंदाने श्रीगुरु महाराजांचे चरणी आणि अक्का महादेवी माउलींच्या चरणी प्रार्थना केली व हा लेख व्हावा अशी बालसुलभ मागणी ही केली.अक्का महादेवींचा लेख आजच का? तर मला हा तत्कालीन समाजव्यवस्थेला फाटा देणार्‍या एका स्त्री संता विषयीचा आदर वाटतो,ज्यांनी टोकाचा अपमान ,तिरस्कार,सहन केला पण त्या डगमगल्या नाहीत. ज्यांच्या चरित्रात भक्तिचे सिमोल्लंघन,लज्जेचे सिमोल्लंघन , तपाचे सिमोल्लंघन, शरणागतीचे सिमोल्लंघन ,समाज व्यवस्थेचे सिमोल्लंघन अशा अनेक रसांचा आविर्भाव आहे.महादेवींनी आपल्या समाजात मानलेल्या सर्व नियमावलींना धूडकावत गुरु निष्ठेच्या ,भक्तीच्या बळावर परमपद प्राप्त केले...हे मला व्यक्तीगत 'सिमोल्लंघनच' वाटते.आजचा हा लेख ही भगवती अक्का महादेवींच्या सुकोमल चरणी अर्पण करतो आहे.


अक्का महादेवीचा जन्म कर्नाटक राज्यात शिमोगा जिल्ह्यातील उडुतडी (सध्याचे उडिताणी) या गावी झाला होता.अक्का मातोश्रींच्या वडिलांचे नाव होते ओंकार शेट्टी व आईचे नाव होते लिंगम्मा.हे दोघेही अतिशय धार्मिक व शिवभक्त असलेले दाम्पत्य होते.ओंकार शेट्टी हे मोठे व्यापारी होते.त्यांनी सचोटीने व्यापार करुन संपत्ती, प्रतिष्ठा आणि समाजात मान मिळविला होता.ते अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते.त्यांना पूजाअर्चा करणे,ध्यान करणे अतिशय आवडत असे.गावाजवळील चन्नमल्लिकार्जुन भगवान हे त्यांचे आराध्य होते.जवळच एक विरशैव संप्रदायाचा मठ होता.शिवाचार्य नावाचे एक महान त्रिकालज्ञ साधुपुरुष तेथील मठाधिपती होते.ओंकार शेट्टी व लिंगम्मांच्या लग्नाला बराच काळ लोटला होता तरी पण अजुन त्यांना संतांन प्राप्ती झाली नव्हती.याचे शल्य सदैव त्यांना सतावत होते.लिंगाम्मा यांना हे दु:ख सदा हृदयात बोचत असे.त्या पुत्रप्राप्तीसाठी भगवान चन्नमल्लिकार्जुनाच्या चरणी सतत प्रार्थना करित असत. पुढे विरशैव मठाधिपती असलेल्या शिवाचार्यांनी श्रीबसवेश्वरांच्या लिंगायत धर्माची दिक्षा घेतली व 'गुरुलिंगदेव' हे नाव धारण केले.एक दिवस गुरुदेव लिंगदेवांच्या दर्शनास गेले असता गुरुदेव लिंगाम्मा ला म्हणाले , "मुली शिवाच्या इच्छेप्रमाणे तुला एक अलौकिक कन्यारत्न होणार आहे.ती आपल्या सामर्थ्याने तुमच्याच कुळाचा नाही तर सार्‍या मानवकुळाचा उद्धार करणार आहे.गुरुदेवांचे हे शब्द ऐकून दोघांनाही अतिव आनंद झाला.गुरुदेवांचा आशिर्वाद फळाला आला व लवकरच लिंगाम्मांना दिवस गेले.जसजसे दिवस जाऊ लागले तसेतसे लिंगाम्मांना जगावेगळे डोहाळे होऊ लागले.दिवसेंदिवस त्यांची वृत्ती आध्यात्मिकतेकडे झुकू लागली.त्यांना दागदागिने नकोसे झाले.रोज त्या पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करु लागल्या.त्यांना जास्तीत जास्त वेळ ध्यान करावे वाटू लागले.त्यांचा चेहेरा अतिशय तेजस्वी दिसू लागला.लवकरच शुभमुहूर्तावर लिंगाम्मांच्या पोटी एक अतिशय सुंदर कन्यारत्न जन्मास आले.पुढे या बाळाला थोर संत जंगमस्वामी त्रिकालज्ञ श्रीमुरुळसिद्धेश्वर महाराज यांनी आपला कृपा आशिर्वाद दिला व कानात गुरुमंत्राचा उच्चार केला होता.श्री महाराजांनीच या दिव्य कन्येचे नाव महादेवी असे ठेवले .हा आशिर्वाद, दीक्षेचा समारंभ होताच स्वामी आपल्या स्थानी निघून गेले.ओंकार व लिंगाम्माच्या घरात एक दैवी चैतन्य महादेवीच्या रुपाने दिवसेंदिवस वाढू लागले.कौतुकात नी लाडाकोडात महादेवी मोठी होत होती.तिन वर्षांची झाल्यावर ती एकटीच देवघरात देवापुढे जाऊन हात जोडून बसू लागली.आई वडिल तिला घेऊन गुरुलिंगदेवांच्या दर्शनास जाऊ लागले.


                                 आपल्या वडिलांना ताडपत्री वरील धार्मिक ग्रंथाचे वाचन करतांना महादेवी बघत असे.तिला ही ते वाचावे वाटू लागले.तिने आपल्यालाही वाचन शिकायचे आहे असा हट्ट धरला.खरे पाहता त्या काळात स्त्रीयांना वाचन व इतर शिक्षण घेता येत नसे.पण महादेवी ने हट्ट केल्यामुळे वडिलांनी तिला गुरुकुलात पाठविण्याचे ठरविले.पण तत्कालीन अंधश्रद्धा , रुढी-परंपराने ग्रासलेल्या समाजात ही बाब सामान्य नव्हती.ओंकारांनी महादेवी ला बरोबर घेऊन मठ गाठला.मठात जाऊन आपल्या कन्येची इच्छा गुरुदेवांना कळविली.गुरुदेवांनी महादेवी ला शिक्षण घेण्याची परवानगी दिली व समाजातील रुढी ,परंपरांना झुगारुन नवी दृष्टी समाजाला देण्याची प्रेरणा दिली.या मागे गुरुदेवांचा खुप मोठा विचार होता.अंधश्रद्धा ,रुढी-परंपरा यांनी ग्रासलेल्या समाजाला नवी दिशा देण्याचे कार्य करायचे होते व हाच संदेश बसवण्णांनी दिला होता.समाजात शिक्षणामध्ये समानता आल्याशिवाय जुन्या रुढी कशा नष्ट होतील त्यामुळे स्त्रीयांना शिक्षण देणे गरजेचे आहे हे ओंकार ला गुरुदेवांनी सांगितले. त्यांनी मोठ्या धैर्याने,धाडसाने या मार्गावर चालण्याची आज्ञा ओंकारला केली.काही दिवसांत महादेवी गुरुकुलात यायला लागली.पण तत्कालीन समाजाला ही घटना मान्य नव्हती.लोकांमध्ये चुळबुळ सुरु झाली.संस्कृतचे शिक्षण ही महादेवीला दिले जाऊ लागले.तेव्हा नगरातल्या उच्चवर्णीयांनी त्याला कडाडून विरोध केला.त्यांना धमकीही मिळू लागली.पण त्याला गुरुदेवांनी भीक घातली नाही.ते खंबीरपणे उभे राहिले व न डगमगता त्यांनी महादेवीला संस्कृतचे ही शिक्षण दिले.महादेवी ही तल्लख बुद्धीची,एकपाठी होती.तिची प्रचंड ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती पाहून अध्यापक ही स्तंभित होत असत. गुरुदेवांनी महादेवीला धर्मज्ञान, तत्वज्ञान,अध्यात्मज्ञान द्यायला सुरुवात केली.ही त्याकाळात स्वतःतच एक नव्या विचारांची क्रांती होती.हा समाजासाठी मोठा बदल होता.गुरुदेवांनी महादेवीला तत्वज्ञानी शरणांची, बसवण्णांची वचने शिकवायला सुरुवात केली.याच काळात महादेवींनी ही काही वचने‌ स्वतः ही रचण्यास सुरुवात केली.यथावकाश महादेवी मोठी होऊ लागली. शिक्षणाने तिच्या विचारांच्या कक्षा रुंदावत चालल्या होत्या.त्या चिंतनाने महादेवी अधिक प्रगल्भतेकडे वाटचाल करु लागली.दिवसेंदिवस महादेवी भगवान चन्नमल्लिकार्जुनांकडे आकृष्ट होऊ लागली.तिला आता देवांच्या मुळ स्थान श्रीगिरीवर जाण्याची ओढ लागली.पण श्रीगिरीकडे जाणारा मार्ग अतिशय खडतर , कठिण व दुर्गम असल्याचे वडिलांनी तिला सांगितले.तिने याबद्दल गुरुदेवांना विचारले.गुरुदेवांनी महादेवीला श्रीगिरीकडे जाण्याचा मार्ग सांगितला.महादेवी मोठी झाल्यावर गुरुदेवांनी घरी येऊन तिला ज्ञानदीक्षा दिली.आपला वरदहस्त महादेवीच्या डोक्यावर ठेऊन गुरुदेवांनी तिला दीक्षा दिली. त्याच वेळी गुरुदेवांनी महादेवीला इष्टलिंग ही दिले व त्याची साधना कशी करायची याचे संपूर्ण विधान समजावून सांगितले.ते लिंग तळहातावर ठेवत गुरुदेवांनी आता हेच तुझे पती आहेत,यांची पत्नी भावाने सेवा करावी अशी आज्ञा दिली.पण महादेवीच्या आई लिंगम्मा यांना त्यांची अतिशय चिंता वाटू लागली.त्यांनी तिचा विवाह करण्याचे ठरविले व त्यासाठी वर शोधण्यास ही सुरुवात केली.पण महादेवींनी आपल्या आईला स्पष्टपणे सांगितले की , माझा विवाह गुरुदेवांनी आधीच  चन्नमल्लिकार्जुना सोबत लावला आहे.आता मला इतर कुठल्याही पतीची गरज नाही.तरीही लिंगम्मांनी हर एक प्रयत्नाने महादेवी चे मन वळविण्याचा प्रयास केला. पण महादेवींनी आपले सर्वस्व श्री चन्नमल्लिकार्जुनां चरणी अर्पण केले होते.

     

                          पुढे महादेवी मातोश्रींच्या जिवनाला सर्वात मोठे वळण देणारी एक अतिशय महत्वाची घटना घडली.राजा कौशिक हा आपल्या लवाजम्यासह उडूतडी या गावातून जाणार होता.त्यामुळे सर्व गाव सज्ज झाले.ओंकार शेट्टी व इतर सर्व लोक ही आपल्या आपल्या परीने राजाचे स्वागत करण्यास सज्ज झाले.महादेवींना विनवून त्यांच्या सख्यांनी त्यांना ही स्वागतासाठी उभे राहण्यास सांगितले.महादेवींनी त्यांनी हट्ट केल्यामुळे तो हट्ट मान्य केला.थोड्याच वेळात राजाची मिरवणूक त्यांच्यापुढून जाऊ लागली.राजाची नजर तेथे उभ्या असलेल्या महादेवींवर गेली.त्यांच्या तेजस्वी,सात्विक , सुंदर रुपाकडे तो पहातच राहीला.महादेवींच्या सौंदर्यावर भाळून राजा आपले भान हरपून बसला.त्याला आता त्याच सुंदर युवतीचा चेहेरा डोळ्यापुढे दिसु लागला.आपल्या सेवेकांकडून त्याने महादेवींची सर्व माहिती काढली.राजाने सरळ आपल्या घरातील स्त्रीयांना महादेवी कडे पाठवून लग्नाची मागणीच केली व महादेवीला पट्टराणी करण्याचे आश्वासन ही दिले.पण ही मागणी महादेवींनी साफ धुडकावून लावली.ही मागणी धुडकावल्यामुळे आता राजद्रोच्या नावाखाली राजाच्या संतापाला सगळ्यांना तोंड द्यावे लागेल हे महादेवींना माहिती होते.त्या ही विवंचना घेऊन गुरुदेवांकडे गेल्या.सर्व हकिकत गुरुदेवांना सांगितले व यातुन बाहेर निघण्याचा मार्ग ही विचारला.गुरुदेवांनी यावर एक युक्ती सांगितली.गुरुदेव म्हणाले, "महादेवी तु राजाकडे जा.तिथे राहा पण त्याआधी काही अटी त्यांच्यापुढे मांड.जर त्या अटी मान्य असतील तरच तुझ्यासोबत मी राहेल असे ही त्याला निक्षून सांग आणि जर एकाही अटींचे उल्लंघन झाले तर मी तात्काळ राजवाडा सोडून निघून‌ जाईल असे सांग.त्या अटी होत्या,वर्षभरात मी एक महिना व्रतस्थ असते त्या काळात मी कुणालाही स्पर्ष करत नाही व कुणी मला स्पर्ष करणे अगदी वर्ज आहे,त्यावेळी माझा आहार हा दूध व फळांचा असेल ,पुर्ण वेळ मी सोवळ्यातच असेन,मला या काळात इष्टलिंग,जंगम पूजा करायची असेल,माझ्या साधनेत कुणाचाही व्यत्यय आणता कामा नये.सायंकाळी पहिल्या प्रहरापासून ते शेवटच्या प्रहरापर्यंत कोणाचेही मी मुखदर्शन करणार नाही.यातील एकही अट जर तुटली‌ तर मी तात्काळ निघून जाईल.या सर्व अटी सांगून काही दिवसांत महादेवी राजवाड्यात मेन्यात बसून निघून गेल्या.इथे एक गोष्ट लक्षात घेतली‌ पाहिजे महादेवींच्या ठाई इतके अलौकिक वैराग्य विलसत होते की त्यांनी प्रत्यक्ष भगवंतांसाठी राजसुखालाही धुडकावून लावले होते. पुढे जंगम पुजा करण्यासाठी चार जंगम राजदरबारात येणार होते.त्यातील  निजलिंगदेव हे मुख्य होते.महादेवींनी महालात सर्व पुजेची विशेष तयारी ठेवली होती‌ व तिने सर्वांचे यथोचित स्वागत ही केले.राजाची वासना शमन होऊन त्याला सन्मार्ग दिसो अशी ही कामना तिने निजलिंगदेवांकडे केली.पुढे एकदिवस रात्री सर्वजन अगदी भावपूर्ण अवस्थेत भजन करु लागले.त्यामुळे राजाला संताप आला.त्याने जंगमांना तात्काळ महालाबाहेर जाण्यास सांगितले.राजाने महादेवीच्या चारित्र्यावर ही शंका घेतली.निजलिंगदेव, जंगमांचा अपमान आणि आपल्या चारित्र्यावर घेतलेल्या संशयामुळे महादेवी खुप रागावल्या.पण तरीही राजाला तिनं चुका माफ म्हणून त्यांनी अभय दिले होते.पुढे काही दिवसांनी भावसमाधीत लिन असलेल्या महादेवींचे ते तेजस्वी रुप बघून राजाच्या मनात कामवासना उत्पन्न झाली व त्यातून त्याने महादेवीला स्पर्ष केला.झालं मग तर ,महादेवींच्या क्रोधाला पारावार उरला नाही.तिने राजाला म्हटले , "मुर्खा तुला या देहावरच प्रेम आहे ना तर बघ हा देह .माझा स्वामी पती तो चन्नमल्लिकार्जुन आहे.तो दिगंबर असतो मी ही आता दिगंबर होते.बघ काय बघायचे ते बघ.या वस्त्राखाली आहे हा हाडामासाच्या अस्तिपंजर देह,गोरं कातडं ,मलमूत्राचं डबकं,पंचभुतात नाहीसी होणारी ही काया." असे म्हणत महादेवी ने आपले सर्व वस्त्र काढले व राजाच्या तोंडावर फेकले. त्या राजाला म्हणाल्या, "अविवेकी मुर्खा,हे शरीर पाहण्यासाठी ,त्याला स्पर्श करण्यासाठी तू आतुर झाला होतास ना? मी या वस्त्रात सुंदर दिसते ना? आता घे एकदा शेवटचे बघून.त्या वस्त्रांचा तात्काळ त्याग करत महादेवी तशाच नग्न अवस्थेत आपल्या लांब अशा केशसंभाराने अंग झाकून राजमहालाबाहेर निघाल्या.त्या राजदरबारातून तशाच अवस्थेत बाहेर जाऊ लागल्या.सर्व दरबार त्यांना बघून‌ घाबरला ,एका जागी खिळून गेला.कुणाचीही त्यांना थांबविण्याची हिंमत झाली नाही.त्या भर बाजारपेठेतून निघाल्या.लोक‌ तर त्यांना बघून अवाक झाले.महादेवींनी भगवंतांसाठी आता आपल्या लाज लज्जेचाही पूर्णपणे त्याग केला होता.प्रखर ,वैराग्य अंगी बाणलेल्या,भगवंतांशी एकनिष्ठ झालेल्या महादेवी आता गुरुदेवांजवळ येऊन पोचल्या.गुरुदेव त्यांना अशा अवस्थेत बघून आश्चर्यचकित झाले.त्यांनी गुरुदेवांना आता मी बसवण्णांकडे जाणार आहे ,मला तसा इष्टलिंगाने आदेश‌ दिला असल्याचे सांगितले.आता या वस्त्राचा मी त्याग केला आहे.स्त्री देहाकडे काही दृष्टीने पाहणार्‍या लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी मी याचा त्याग केला आहे.पण गुरुदेवांच्या आज्ञेने त्यांनी एक घोंगडी त्यांनी अंगावर पांघरली.


          ‌          आई वडिलांचा ,गुरुदेवांचा निरोप घेऊन त्या तडक कल्याणला निघाल्या.एवढा दूरवरचा प्रचंड प्रवास करत करत महादेवी मार्गक्रमण करु लागल्या.भिक्षा मागत ,मिळेल तिथे आश्रय घेत त्यांचा हा प्रवास सुरु होता.हे सर्व दिव्य करीत असतांना‌ त्या किती चन्नमल्लिकार्जुनांच्या चरणी शरणागत होत्या याचा साधा विचार ही आपण करु शकणार नाही.या प्रवासात भगवान सदाशिवाने त्यांची हर एक प्रकारे कठिण अशी परिक्षा घेतली.इकडे त्रिकालज्ञानी बसवण्णांना हा सर्व वृतांत ज्ञात होताच.त्यांनी इतर संतांना , सेवकांना आपल्या कडे एक महान शिवशरणी महादेवी येणार असल्याचे आधीच सांगितले होते.महादेवी तिथे पोचल्यावर त्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले.तेथील प्रसादमंदिरात त्यांना मोठ्या सन्मानाने नेण्यात आले.पुढे त्यांचे प्रवचन झाले व दुसर्‍या दिवशी त्या बसवण्णांच्या भेटीसाठी कल्याणला निघाल्या.कल्याण ला पोचल्यावर महादेवींना कठोर अशा परिक्षेला सामोरे जावे लागले.त्या सर्व दिव्यातून ही पार होत महादेवी बसवेश्वरांना शरणं गेल्या.पुढे त्या बसवेश्वरांच्या अनुभवमंडपातील अतिशय महत्वपूर्ण व्यक्ती झाल्या .त्यांनी केलेल्या रचना या तत्कालीन संत मांदियाळीत महत्वपूर्ण रचना म्हणून गणल्या जाऊ लागल्या.त्यांच्या वचनांची थोरवी सर्वत्र एकमुखाने गायली जाऊ लागली.अखंड पाच वर्षे महादेवींची कल्याणला बसवेश्वरांच्या मार्गदर्शनाखाली साधना सुरु होती.त्यांचे शिवतत्वाशी एकरुप होत होते.त्या दिवसेंदिवस अंतर्मुख होऊ लागल्या.पुढे भगवान शिवांनी तिला साधनेवेळी संकेत देऊन सांगितले होते की आता आपल्या निजस्थानी तुला लवकरच यायला हवे.त्यासाठी कर्दळीवनातील अतिदुर्गम स्थानी जायला त्या सज्ज ही झाल्या.बसवण्णांची व इतर सर्वांची त्यांनी यासाठी आज्ञा मागितली.सर्वजन या विचारांनी हेलावले.चन्नमल्लिकार्जुनाच्या भेटीसाठी आसुसलेली महादेवी आता श्रीगिरीपर्वत ओलांडून, चन्नमल्लिकार्जुनालाही ओलांडून कर्दळीवनात प्रस्थान करणार होती.महादेवी आपल्या आराध्यांशी एकरुप होण्यासाठी आता कर्दळीवनात निघाली.सर्वांनी जड अंतःकरणाने त्यांना निरोप दिला.ही योगिनी आता आपल्या परमध्येयाकडे निघण्यास सज्ज झाली.त्या मोठा खडतर प्रवास करीत ,दिव्य पार करित श्रीगिरी पर्वतावर पोचल्या.तेथील भयंकर अरण्य,पर्वतरांगा त्यांनी लिलया पार केल्या.पर्वतावर स्थित असलेल्या भगवान मल्लिकार्जुनांच्या गाभार्‍यात त्या पोचल्या.श्रीदेवांचे दिव्य लिंग बघून त्यांना तात्काळ समाधी लागली. त्या भावसमाधीतून बाहेर आल्यावर दुसर्‍या दिवशी त्यांनी पाताळगंगेत स्नान केले.तेथील पुजार्‍यांना कर्दळीवनात जाण्याचा रस्ता विचारला व देवांची आज्ञा घेत त्या मार्गस्थ झाल्या.कर्दळीवनाचा अतिशय भयान , महाकठीण , अतिदुर्गम रस्ता पार करत त्या एका गुफेजवळ आल्या.ते स्थान त्यांनी आता आपल्या तपासाठी निवडले.काही दिवसांनी वैराग्य उत्पन्न झालेला राजा कौशिक व महादेवींच्या प्रिय सखी शिवानी ही तेथे पोचले.त्या दोघांनाही इष्टलिंगाची दिक्षा महादेवींनी दिली.त्यानंतर महादेवी आपल्या कठोर साधनेत एकरुप झाल्या.त्यांनी सर्वस्वाचा त्याग तर केव्हाच केला होता.आता हा देह ही त्या चन्नमल्लिकार्जुनाला अर्पण करणार होत्या.त्या ध्यानाच्या अखंड समाधीत लिन झाल्या व लवकरच ध्यानावस्थेत त्यांनी आपला देहही शिवयोग साधून शिवार्पण केला. अशी ही महायोगिनी अक्का महादेवींची दिव्य चरित्र गाथा.खरंतर ही दिव्य कथा मला थोड्याच शब्दात मांडण्यासाठी बराच भाग वगळावा लागला.अक्का महादेवी यांचा त्याग ,भक्ती,वैराग्य इतकं अपरिमित आणि एकमेवाद्वितीय आहे की कुणीही वाचल्यावर अवाक होऊन जाईल.अक्का महादेवी या एक अतिशय महान विभूती होत्या.आपल्या "प्रणम्या मातृदेवता" लेखमालेची सांगता मी या लेखाने आज करतो आहे याचे मला अतिव समाधान आहे.हा‌ लेख मी अक्का महादेवी माउलींच्या चरणी अर्पण करतो आहे व त्यांचे चरणी कोटी कोटी वंदन करुन ही सेवा करुन घेतल्याबद्दल श्रीचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.या दहा ही स्त्री संत रत्नांची ही महागाथा आपल्या सर्वांच्या जिवनात विचारांचे,भक्तीचे ,आचरणाचे,प्रेमाचे,विवेकाचे,ज्ञानाचे ,सेवेचे,साधनेचे सिमोल्लंघन करो आणि आपल्या जिवनात नवचैतन्याची विजयादशमी साजरी होवो‌ हीच माझी अक्का महादेवी व सकल संतांच्या चरणी प्रार्थना.

    ✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

 श्रीदत्त शरणं मम 🌿🌺🙏

महाराज ज्ञानेश्वर माउली समर्थ 🌿🌺🙏

{ अक्का महादेवींचे संक्षिप्त चरित्र लिहितांना त्यासंबंधी जास्त साहित्य उपलब्ध‌ होऊ शकले नाही.त्यामुळे या लेखात तृटी असु शकतात.जर आपल्याला तृटी आढळली तर मला तसे कळवावे म्हणजे मला या लेखातील‌ चुकीची सुधारणा करता येईल. }

2 comments:

  1. अक्क महादेवीचे दीक्षा गुरू शिवाचार्य हे वीरशैव मठाधीश होते. वीरशैव म्हणजे लिंगधारण करणारे लिंगधारी शैव , जे बसवपूर्व काळातील असूनह त्यांचा षटस्थल सिद्धांत ही प्राचीन शिव आगमोक्त आहे. अक्क महादेवी व शिवयोगी अल्लमप्रभू हे बसव कल्याण येथे येण्या पूर्वीच लिंगदीक्षा घेतलेले होते. त्यांनी व त्यांच्या गुरुनी बसवण्णा यांच्या कडून धर्माची घेतली नव्हती.

    ReplyDelete
    Replies
    1. बदल करतो... साहित्यची अनुपलब्धता असल्याने चुक झाली आहे.. त्यामुळे लेखात तसे लिहीले होते... धन्यवाद 🙏

      Delete

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...