Monday, November 14, 2022

भगवान श्री शिव चिदंबर महाप्रभुंची जयंती 🌺🌸🙏🚩

 


🌸🌿🙏शिव चिदंबर महाप्रभुंची जयंती🙏🌿🌸

||चिदंबर नमस्तेsतू चिन्तितार्थ प्रदायिने|औदुंबर सदावास चिदंबर नमोस्तुsते||


आज कार्तिक वद्य षष्ठी आज पूर्णब्रह्म शिवावतार श्रीचिदंबर महाप्रभुंची जन्मतिथी.


आजच्याच दिवशी आशुतोष भक्तवत्सल भगवान श्री महादेवांनी मुरगोड येथील श्रीमल्हार दिक्षीत या परमशिवभक्त असलेल्या सतशिल ब्राह्मणापोटी आपल्या पूर्ण कलांनीयुक्त असा विलक्षण असलेला सगुण अवतार धारण केला. भगवान श्री शिवचिदंबर महाप्रभु हे कलियुगातील साक्षात सगुण रुपात अवतरलेले शिव आहेत.त्याकाळातील सर्वच महापुरुष चिदंबर महाप्रभुंच्या दर्शनाला,भेटीला येऊन गेल्याची नोंद आहे.त्यात आपल्या दत्त संप्रदायातील भगवान श्री अक्कलकोट स्वामी महाराज आणि श्रीक्षेत्र नृसिंहवाडी निवासी समर्थ सद्गुरु श्री नारायण स्वामी महाराज यांचा उल्लेख विशेष आहे. प.प.श्रीमद सद्गुरु नारायण स्वामी महाराज तर चिदंबर महाप्रभुकडे तिन महिने मुक्कामी होते.या दिव्य भेटीची नोंद श्रीनारायण स्वामी महाराजांच्या चरित्रात आहे.तसेच परब्रह्म भगवान श्री अक्कलकोट स्वामी महाराज आणि चिदंबर महाप्रभुंच्या भेटीचा दिव्य प्रसंग पुढे दिला आहेच. अशा भक्तवत्सल भगवान श्री शिव चिदंबर महाप्रभुंच्या या परमपावन जन्म तिथीला प्रभु चरणी माझे शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏🌸🌿🌺


#परब्रह्म_भगवंत_श्रीस्वामी_समर्थ_माउलींचा_आणि_शिवावतार_श्रीचिदंबर_महाप्रभुंचा_लिलाप्रसंग :-

                   कर्नाटक प्रांतात मलप्रभा नदितीरी मुरगोड या क्षेत्री श्री मल्हार दिक्षीत नामक सतशिल ,शिवभक्त कण्वशाखी यजुर्वेदी असलेल्या ब्राह्माणाच्या प्रखर भक्तिवर प्रसन्न होऊन प्रत्यक्ष सांबसदाशिव भगवान श्री आदीनाथ महादेवांनी "तुझ्या स्त्रीच्या उदरी मीच पुत्र होऊन येतो" असा आशिर्वाद दिला. या आशिर्वादाच्या रुपाने कार्तिक वद्य षष्ठी या दिवशी मुरगोडी मल्हार दिक्षीता घरी जन्म घेतला. जन्माताच महाप्रभुंच्या कानाजवळ बिल्वपत्र होते.सर्वत्र आनंदीआनंद झाला‌ आणि आपल्या घरी प्रत्यक्ष भगवंत अवतरले यामुळे मल्हार दिक्षीतांनी बाळाचे नाव चिदंबर ठेवले.यथावकाश महाप्रभुंचे मौंजीबंधन ही पार पडले. एकदा गजगौरीव्रतासाठी पूजा सांगण्याकरिता काही लोकं मल्हार दीक्षितांकडे आले.तेव्हा ते संध्यावंदनासाठी बसले होते.त्यांनी पुत्र चिदंबरांना "तू पूजा सांगायला जा" अशी आज्ञा केली. त्यावेळी गणपती पूजनार्थ जलकुंभ मांडून चिंदबर महाप्रभुंनी देवता आवाहन केले.तेव्हा साक्षात लंबोदर उभे राहले व आशिर्वाद पर वचन बोलते झाले. 'धन्य धन्य चिदंबर, तू प्रख्यात शिवावतार होशील.यज्ञयागादी करशील.' तिथे मातीचा हत्ती बनवलेला होता.तो सजीव होऊन चालू लागला.अशा अनेकावीध सहस्त्र लिला महाप्रभुंनी केल्या. पुढे महाप्रभुंचे लग्न झाले.त्यांना दोन पत्नि होत्या.त्यांना सहा मुलगे झाले.थोरले दिवाकर आप्पा, दुसरा मार्तंड ,तिसरा मृत्युंजय ,यांचे पुत्र,नातू आणि असाच त्यांचा वंशवृक्ष विस्तिर्ण वाढला.

अक्कलकोटस्थ भगवंतांच्या चरित्रात आपण महाप्रभुंचे ओझरते लिला दर्शन घेतले आहेच. श्री शिव चिदंबर महाप्रभुंनी या अवतारात असंख्य लिला केल्या त्या यथावकाश आपण बघणार आहोतच.आपल्याला आजच्या लेखात श्री स्वामीरायांची व महाप्रभुंच्या भेटीचा प्रसंग बघायचा आहे.  

                            मुरगोडला श्रीचिदंबर महाप्रभुंनी महायज्ञ केला होता,त्यावेळी बाजीराव पेशवे तेथे उपस्थित होते.पण त्याचवेळी लीलाविग्रही श्री स्वामी समर्थ महाराज यज्ञामध्ये तुप वाढत होते.स्वत: श्रीस्वामी महाराजांनीच आपल्या प्रियजनांसमोर हे वृत्त एकदा सांगितले होते. प्रत्यक्ष भगवान शिवांनी केलेल्या यज्ञात प्रत्यक्ष आदिपुरुष नारायण महाविष्णुंची यज्ञमूर्ती स्वामी माउली स्वानंदात पंक्तिमध्ये वावरत होती. चिदंबर महाप्रभुंनी मुरगोडी असंख्य यज्ञ केले. यज्ञसमारंभात चांदीचे पाट, विविध पद्धतीच्या रांगोळ्या ,पिण्यास स्वच्छ पाणी, पंगत रांगावर भव्य मंडप ,तोरणे ,झालरी लटकत असायच्या.मध्येच सुंदर प्रकाशदीप झळकत असत.भोजनाचे पदार्थ ठेवण्यासाठी विशाल हौद बांधून काढण्यात आले होते. ज्याप्रमाणे पाण्याचा फार मोठा हौद असतो तेवढे मोठे मोठे हौद कढी, आमटी व खिरीसाठी तयार केलेले होते.ब्राह्मणलोक हवे तेवढे पदार्थ या हौदातुन काढून घेत.लक्षावधी मनुष्यांसाठी पुरेल एवढे पदार्थ त्या कुपात तयार असत. या हौदाची नित्य धुऊन ,कपड्याने पुसून स्वच्छता ठेवली जात असे.यात परिपूर्णत्व राहावे म्हणून अन्नपूर्णा जातीने चोहीकडे तिष्ठत असे.सिद्धांन्न वाटपावेळी वाढप्यांची धावपळ उडत असे.

                एकदा एक तरुण ब्राह्मणाचा हौदातून उकळत असलेली आमटी काढतांना गडबडीत पाय घसरला व तो घसरून आत पडला.काठावर धावपळ झाली.मोठ्या युक्तीने काही लोकांनी त्याला बाहेर काढले.काढणार्याचेही हातपाय पोळले.त्या आत पडलेल्या तरुणाला सावध करण्याचा प्रयत्न केला गेला पण दुर्दैवाने त्याचा मृत्यु झाला होता.त्यावेळी लक्षावधी ब्राह्मण मंडळी मंडपामध्ये आनंदाने भोजनाचा आस्वाद घेत होती. या विलक्षण प्रसंगाने थरकाप उडालेले दिवाकर दीक्षित धावत पित्याकडे आले‌ व यज्ञात विघ्न ओढवले असल्याची धक्कादायक बातमी त्यांनी हात जोडुन महाप्रभुंना सांगितली.हे ऐकून चिंदबर महाप्रभु म्हणाले, " खरंच ,हा तर दुर्धर प्रसंग ओढावला आहे. एवढे बोलून ते आपल्या मुलांसह श्रीगुरु स्वामीसमर्थ महाराजांकडे धावले. स्वामींना त्यांनी सर्व घटित प्रकार सांगितला. स्वामींनी सर्वांना आश्वस्थ केले "घाबरु नका हो, धीर धरा.प्रेत इथे आणा.त्यावर पुष्कळ हळद लावून ठेवा." त्याप्रमाणे त्या मृत ब्राह्माणाचे शव उचलून आणले व संपूर्ण अंगभर हळद लेप देवून स्वामी महाराजांसमोर ठेवण्यात आले.तेव्हा महाराज त्या सर्वांना म्हणाले , "चला,आपापली कामे करण्यास जा". एकाला स्वामींनी शवावर पांघरुन घालण्यास सांगितले आणि त्याला स्वामी स्वहस्ते थोपटु लागले.थोपटत ते म्हणाले, "अरे ब्राह्मणा,तुझे प्राण कोणी नेले ते सांग बघू.श्रमाचा परिहार होण्यासाठी तुला सुखकर गाढ निद्रा लागली आहे.पण आता तू लवकर उठ बघू.ब्राह्मणांना तांबूल दे." हे परब्रह्म स्वामीमुखाचे बोल कानी पडताच तो सावध होऊन उठून बसला नि गडबडून म्हणाला, 'अपराध्याला क्षमा करा महाराज.परमेश्वरा ,आपली लीला अगाध आहे.आमटीच्या हौदात पडून मृत झालो असता आपण पुन्हा उठविले हो कृपाळा.

        दरम्यान हे पुनर्जन्माचे वृत्त सर्वत्र कळून आनंदीआनंद झाला.संजीवन झालेल्या विप्रास सर्वांनी स्नान घातले‌.नंतर इतरांनी शुद्धस्नान करुन वेदमंत्रांनी सिंचन केले.त्या ब्राह्मनाचे "यज्ञदत्त" असे नामकरण झाले.तो भक्तीभावाने स्वामींचरणी लीन झाला‌.नंतर सर्वांना नमस्कार करुन नव पितांबर परिधान केले.हाती सुवर्णपात्र घेऊन त्यामधून त्याने तांबूल व दक्षिणा वाटप केले. ज्या हौदामध्ये पडून ब्राह्मण मृत झाला होता तो आपल्या आपण सहज कोरडा झाला .तो धुवून त्याची शांती करण्यात आली.पूजन करण्यात आले.चिदंबरयज्ञात उणे तरी काय राहील? देवादिकांसह, अन्नपूर्णा ही आपल्या सर्व सिद्धीसह तिथे राबत असे.त्या शुद्ध झालेल्या हौदामध्ये पुन्हा ब्रह्मवृंद आमटी घालू लागले,परंतु सातत्याने प्रयत्न करुनही तो काठोकाठ भरला नाही.तेव्हा चिदंबर महास्वामी श्री अक्कलकोट स्वामी महाराजांना म्हणाले ,"काही केल्या हौद भरत नाही.तेव्हा यावर काय विचार करणे आवश्यक आहे तो करावा."

       तेव्हा स्वामी समर्थ माउलींनी सर्वांना सांगितले की ,"हे कार्य होण्यासाठी 'यज्ञदत्त' ला पाचारण करा." तेव्हा यज्ञदत्ताने पुढे येवून स्वामींना वंदन केले. त्याला स्वामी भगवंतांनी आज्ञा केली "यज्ञदत्ता,तू एक पळीभर शुद्ध जल आमटीत टाक." त्या आज्ञेनुसार यज्ञदत्ताने हौदात उदक सोडताच अचानक आमटीचा हौद उचंबळून पूर्ण भरल्याप्रमाणे दिसू लागला. अशाप्रकारच्या लिला स्वामीरायांनी केल्या.श्री चिदंबर दिक्षीत महाप्रभुंचे दिव्य लिला चरित्र आपण सखोल लवकरच बघु. अशा या शिवावतरी प्रत्यक्ष शिव श्रीचिदंबर महाप्रभुंच्या व परब्रह्म भगवंत श्री अक्कलकोट स्वामी माउलींच्या चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम....

       ✒️✒️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी


#शिव_चिदंबर🌿🌼🙏🏻

#श्रीस्वामीसमर्थजयजयस्वामीसमर्थ🌹🌸🙏🏻

No comments:

Post a Comment

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...