सद्गुरु शंकर महाराजांचे प्रिय शिष्य श्री मधु बुवांची १०० वी जयंती :-
भगवान अक्कलकोट स्वामी महाराजांच्या परंपरेतील थोर सत्पुरुष आणि सद्गुरु शंकर महाराजांचे परमप्रिय शिष्य , सोलापूर च्या शुभराय मठाचे मठाधिपती सद्गुरु श्रीजयकृष्ण बुवा तथा मधु बुवा यांची आज १०० वी जयंती. सद्गुरु शंकर महाराजांचे वास्तव्य सर्वात जास्त कुठे झाले असेल तर ते म्हणजे सोलापूर ला व सोलापुरातील शुभराय मठात.शंकर महाराज तब्बल २७ वर्ष येऊन जाऊन शुभराय मठात वास्तव्यास होते.मठातील प्रत्येक स्थान,प्रत्येक व्यक्ती ही महाराजांच्या परम पवित्र स्पर्शाने पावन झाली होती व आहे.आज या पुण्य पर्वावर आपण महाराजांच्या सहवासाने ,कृपा अनुग्रहाने पावन झालेल्या श्रीमधु बुवांच्या चरित्राचे चिंतन करुयात.
प.पू.मधु बुवांच्या या भक्तीमय जीवनाचा विचार करण्याअगोदर आपण या कुळाची पूर्वपीठिका लक्षात घेतली पाहिजे.हे संपूर्ण कुळ भगवान श्रीपंढरीनाथ, सद्गुरु श्रीशुभराय महाराज,भगवान सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी महाराज व सद्गुरु शंकर महाराजांच्या कृपा आशिर्वादाने पवित्र झाले होते.मधु बुवांच्या आजोबांना प्रत्यक्ष भगवान अक्कलकोट स्वामी महाराज भेटायला आले होते ,त्यांना आशीर्वाद देऊन आपली अंगठी,पादुका प्रसाद रुपाने देऊन गेले होते.त्यानंतर सद्गुरु शंकर महाराजांनी तर आपले प्रगट रुपाने कार्यच शुभराय मठातून सुरु केले होते.आपले परम प्रिय जनु काका म्हणजे महाराजांचे प्रिय बुवा हे तर महाराजांचे ह्रदयच.महाराजांची पूर्ण कृपा जनु काकांवर होती हे आपल्या सर्वांना श्रुतच आहे.
प.पू.जनार्दन बुवांचे चरित्र व त्यांचा शंकर महाराजांसोबतचा काळ हा सुवर्ण काळच होता व तो आपण पुढे कधीतरी बघणार आहोतच.आज आपण प.पू मधु बुवांच्या जन्म शताब्दी च्या सुवर्ण योगावर त्यांच्या चरित्राचे चिंतन करणार आहोत.
प.पू जनु काकांचे पुत्र म्हणजेच मधु बुवा. श्रीमधु बुवांचा जन्म हा इ.स १९२३ साली कार्तिक वद्य प्रतिपदा या दिवशी विजापूर येथे झाला.त्यावेळी इकडे शुभराय मठामध्ये जनु काका म्हणजे जनार्दन बुवा देवांसमोर किर्तन करितं होते.त्याचवेळी मठात जनार्दन बुवांना पुत्र रत्न झाल्याची बातमी आली व सर्वत्र आनंदी आनंद झाला.मधु बुवा हे अत्यंत भाग्यवान होते कारण जन्मताच त्यांना सद्गुरु शंकर महाराजांचा परिस स्पर्श लाभला होता.मधु बुवा दिसायला गोरेपान, सुंदर व सुदृढ शरीरयष्टी लाभलेले होते.सद्गुरु शंकर महाराज मठात आले ते साल होते १९२२ व मधु बुवांचा जन्म झाला तो १९२३ साली म्हणजे जन्मतःच मधु बुवा शंकर महाराजांच्या कृपादृष्टीने कृतार्थ झाले असणार यात शंका नाही.मधु बुवांना सद्गुरु प्राप्तीसाठी कुठे जाऊन तप करावे लागले नाही किंवा त्यांना काही विशेष साधन करावे लागले नाही.ते तर महाराजांच्या कृपेने सिद्ध झालेले कृपासिद्ध महात्मे होते.मधु बुवा लहानपणी शंकर महाराजांच्या मांडीवर खेळत असत व महाराज ही आपल्या या प्रिय शिष्याचे सर्व लाड पुरवीत असत.महाराज म्हणजे आपल्या घरातील व्यक्तीचं आहेत असे या लहानग्या मधु बुवांना वाटत होते व ते वस्तुतः खरे ही होते.पुढे आठ वर्षाचे झाले असता मधु बुवांची मुंज पार पडली.या मौंजीबंधनाच्या कार्यक्रमात सद्गुरु शंकर महाराज स्वतः हजर होते.आपले वडील प.पू जनु काकांनी त्यांना गायत्रीचा उपदेश केला.त्यानंतर सद्गुरु शंकर महाराजांनी मधु बुवांना आपल्या जवळ बोलावले व आज्ञा केली की, "हे बघ आज तुझी मुंज झाली.आता उद्यापासून संध्या करायची आणि आई-वडीलांचे चरणतीर्थ रोज घ्यायचे.खंड पाडायचा नाही." मधु बुवांनी महाराजांचे हे शब्द तंतोतंत पाळले व ते त्याप्रमाणे रोज संध्या व तीर्थ प्राशन करु लागले. बालपणापासूनच मठात येणार्या सर्व थोर मंडळींचा सहवास मधु बुवांना व त्यांच्या भावंडांना लाभला होता.शंकर महाराज मठात आले, की त्यांची सर्व शिष्य मंडळी ,इतर संत मंडळी त्यांना भेटायला शुभराय मठात येत व या सर्वांचे निरिक्षण मधु बुवा बालपणापासून करित असत.हे सर्व सुरु असतांनाच मधु बुवांचे शालेय शिक्षण ही सुरु होतेच.मधु बुवा इयत्ता १० वी पर्यंत शिकले.
असे सर्व दिवस आनंदात जात असता अचानक इ.स १९३८ ला प.पू श्री जनार्दन बुवांनी देह ठेवला.हा प्रसंग खरोखर मन हेलावणारा आहे.त्यावेळी मधु बुवांचे वय फक्त १५ वर्ष होते.पुढे मठ कोण सांभाळणार?आता मठाची पुढील व्यवस्था काय? मठाधिपती च्या गादीवर आता कोण बसणार? हे प्रश्न सर्वांपुढे उपस्थित होतेच.पण याचे नियोजन सद्गुरु शंकर महाराजांनी आधीच लावून ठेवले होते असे दिसते.पुढे मधु बुवांच्या गळ्यात माळ घातली गेली. महाराजांनी त्यांना स्वतःच्या मांडीवर बसवून तारक मंत्राचा (परंपरेचा गुरुमंत्र) उपदेश केला.मधु बुवांना महाराज स्वतः घडवत होते ,त्यांच्या जीवनाला आकार देत होते हे यातुन स्पष्टच होते.मधु बुवा अतिशय सुंदर पूजा करीत असत.मठाचे सर्व उत्सव आनंदाने साजरे करीत असत.प.पू.जनु काकांनी देह ठेवल्यावरचा प्रसंग आहे.मठात उत्सवाची समाप्ती होती आणि उत्सवाची समाप्ती ही काल्याच्या कीर्तनाने होत असते.सद्गुरु शंकर महाराज मठातच होते.पण आता काल्याचे कीर्तन कोण करणार? हा प्रश्न सर्वांपुढे होता.तेव्हा सद्गुरु शंकर महाराजांनी मधु बुवांना जनु काकांच्या कीर्तनाचे सामान आणायला सांगितले.महाराज मधु बुवांना म्हटले, "मला कफनी घाल,फेटा बांध आणि चिपळ्या हातात दे." मधु बुवांनी तसेच केले.श्रीशंकर महाराज कीर्तनकाराच्या वेशात सजले.सर्वांना वाटले आता महाराज कीर्तन करतील पण झाले अलौकिकच.महाराजांनी मधु बुवांना पुन्हा म्हटले , "आता हे कपडे काढ आणि तू घाल." महाराजांची आज्ञा म्हणून मधु बुवांनी तसेच केले.ते कपडे मधु बुवांनी घातल्यावर महाराजांनी त्यांच्या हातात चिपळ्या दिल्या . स्वतः महाराजांनी "जय जय रामकृष्ण हरी" म्हणायला सुरुवात केली व पुढे "तुला कीर्तन करायचे आहे" ही आज्ञा मधु बुवांना केली.अचानक कीर्तनाच्या आज्ञेने मधु बुवांची थोडं चलबिचल अवस्था झाली पण महाराजांची आज्ञा प्रमाण मानून ते कीर्तनाला उभे राहिले.त्या दिवशी मधु बुवांनी अलौकिक असे कीर्तन केले.महाराजांनी आपली शक्तीच जणू त्यांच्यात प्रवाहीत केली होती.पुढे मधु बुवा उत्तम कीर्तन शिकले.एवढेच काय तर त्यांनी पुढे राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून पाच वर्षे काम ही केले होते.हा सर्व महाराजांच्या कृपेचा ,प्रेमाचा परिपाकच होता.
एकदा शंकर महाराज शुभराय मठात आलेले होते.महाराज मठात आलेले आहेत ही बातमी दूरवर पसरल्या मुळे बाहेरगावची काही मंडळी महाराजांच्या दर्शनासाठी शुभराय मठात आली.त्यावेळी त्या मंडळींनी शंकर महाराजांना अनुग्रह द्यावा म्हणून कळकळीने प्रार्थना केली.सद्गुरु शंकर महाराजांनी जवळच असलेल्या मधु बुवांना हाक मारली.मधु बुवा लगेच महाराजांच्या समोर येऊन उभे राहिले.महाराज म्हणाले, "मधु ,या मंडळींना अनुग्रह दे." मधु बुवा म्हणाले, "महाराज मला यातले काहीच कळत नाही." तेव्हा शंकर महाराजांनी मधु बुवांना आपल्या अगदी जवळ बसविले व त्यांना उजवा कान पुढे करायला सांगितला.त्यावेळी महाराजांनी मधु बुवांना तारक मंत्राचा उपदेश केला.त्यांना महाराजांनी आज्ञा केली की आता हा मंत्र जसाच्या तसा या पुढील मंडळींच्या कानात सांगायचा.मधु बुवांनी त्यावेळी महाराजांनी जसे सांगितले तसेच केले.ही मंडळी गेल्यावर महाराज मधु बुवांना म्हणाले ,"आता तुला पुढील व्यक्ती योग्य वाटला की त्यांना तु अनुग्रह द्यायचा.आम्ही आजपासून तुला हा अधिकार देतो आहोत."
पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे की महाराजांनी याद्वारे मधु बुवांना गुरु पदावरुन बसविले होते.याद्वारे शंकर महाराजांनी आपल्या प्रिय मधु बुवांना परमार्थात एका विशिष्ट उंचीवरच नेऊन ठेवले होते.महाराजांनी ललिता पंचमीला नवरात्रात मधु बुवांच्या पाठीवर जगदंबेच्या रुपात नृत्य केलेला प्रसंग सर्वश्रुत आहेच.
१९३० सालची गोष्ट महाराज शुभराय मठात बसले होते.तेव्हा बोलता बोलता ते म्हटले की आता आमची देह ठेवण्याची वेळ जवळ आली आहे.हे सर्व ऐकून भक्तांना गहिवर आला.पण मधु बुवांवर हे ऐकून जणू आभाळच कोसळले.महाराजा आपल्याला सोडून जाणार ,आपल्याला अनाथ करुन जाणार हा विचार ही त्यांना सोसवला नाही.त्यांना या विचारानेच चक्कर आली व ते भोवळ येऊन पडले.हे सर्व पाहिल्यावर महाराजांनी मधु बुवांचे डोके आपल्या मांडीवर घेतले त्यांना पाणी पाजले व शुद्धीवर आणले.त्यांना अतिव प्रेमाने कुरवाळत जवळ घेतले.त्यांना आपल्या ताटात जेवायला बसवून,
मुखात घास भरवुन महाराज मधु बुवांना म्हणाले, "अरे वेड्या मी दगडात गेलो,मातीत गेलो ,मसणात गेलो तरी मी तुझ्याबरोबर आहे.हे लक्षात ठेव."पण महाराजांनी आपल्या या प्रिय शिष्याला समाधी घेतांना दूर ठेवले होते.
खरं ही आहे प्रत्येक सत्पुरुष आपल्या प्रिय शिष्यांना देह ठेवतांना आपल्यापासून दूर ठेवतोच.पण पुढे महाराजांच्या या शब्दाची प्रचिती प्रत्येक क्षणाला मधु बुवांना येत असे. सद्गुरु शंकर महाराजांच्या सर्व शिष्य मंडळींचे मधु बुवांवर प्रेम होते.राम मास्तर कोराड,रुद्रकर बाबा, भाऊसाहेब राऊत,कडलासकर काका(पेंटर काका), अण्णासाहेब भावे,जक्कल कुटुंबीय, मोहनसिंग बायस ही सर्व भक्त मंडळी शुभराय मठात येत असत.मठातील सर्व उत्सवात मधुबुवांसह आनंदाने सहभागी होत असत. जनु काकां नंतर मधु बुवांनी तब्बल ६० वर्षे मठाची धुरा सांभाळली.ही केवळ असाधारण गोष्ट आहे. सन १९४८ साली बुवांचे लग्न ही झाले.पू.शुभांगी बुवा म्हणजे आपल्या सर्वांच्या माई या बुवांच्या एकमात्र अपत्य. पैजारवाडीचे चिले महाराज,विडणीचे श्रीशिवाजी महाराज,मालाड चे कुलकर्णी मास्तर , श्रीकान्हेरे गुरुजी , पू.डॉ धनेश्वर अशी सर्व मंडळी मधु बुवांना भेटायला शुभराय मठात येऊन गेली होती. मधु बुवांना महाराजांनी जसे जीवन जगायला सांगितले बुवा तसेच जीवन तंतोतंत जगले.इतरांना संकटात बघून त्यांना फार वाईट वाटे.त्यामुळे पुढील व्यक्ती सुखी व्हावा,संकटमुक्त व्हावा यासाठी अनेकांकडे जाऊन ते दैवी उपाय योजना करायचे.अनेकांना स्वतः बोलावून अनुग्रह द्यायचे,विविध उपासना करायला सांगायचे.या द्वारे त्यांनी अनेकांना संकटमुक्त केले,अनेकांवर कृपा केली. कोल्हापूर चे श्रीकाटकर साहेब हे प.पू मधु बुवांचे शिष्य.काटकर साहेबांची बुवांच्या चरणी अत्यंत निष्ठा व प्रेम. प.पू.मधु बुवा आजीवन शंकर महाराजांनी दाखविलेल्या मार्गावर भक्तिपूर्ण जीवन जगले.त्यांनी महाराजांची कृपा आशिर्वादाची उधळण मुक्त हस्ताने सर्वांवर केली.सर्वांना आपल्या जवळील अध्यात्मिक अमृत मुक्त हस्ताने वाटले.अशा या थोर शिष्याने ,थोर सत्पुरुषाने २८ जुलै १९९८ ला दुर्गाष्टमीच्या पुण्यपर्वावर आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. आज मधु बुवांची शताब्दी जयंती.सद्गुरु शंकर महाराजांच्या या थोर शिष्योत्तमाच्या चरणी ही शब्दसुमनांजली अर्पण करुन प्रार्थना करतो की त्यांनीच आम्हा सर्वांना महाराजांच्या चरणांवर नतमस्तक होण्याचे सामर्थ्य द्यावे.परम पूज्य श्री सद्गुरु मधु बुवांच्या चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो आणि विराम घेतो.
✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी


No comments:
Post a Comment