झाले ब्रह्मरूप ज्ञानदेव भाग १-:
आज कार्तिक कृष्ण एकादशी, आजची एकादशी ही *करुणाब्रह्म* कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती सद्गुरु भगवान श्रीज्ञानेश्वर महाराजांची एकादशी म्हणून सर्वश्रुत आहे."आळंदीची कार्तिक वारी" म्हणून प्रसिद्ध असलेल्या या माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे. कार्तिक वारीतील ही एकादशी का *विशेष* आहे ? या एकादशीचे काय वैशिष्ट आहे ? ही माउलींची एकादशी का आहे? अशा अनेक प्रश्नांचा उलगडा आपण आज करणार आहोत.
करुणाब्रह्म सद्गुरु भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींची संजीवन समाधी ही जगातील एकमेवाद्वितीय व अलौकीक अशी समाधी आहे. माउलींच्या जा समाधीला संजीवन समाधी म्हटले जाते. संजीवन या शब्दाला इथे विशेष महत्व आहे कारण माउलींनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केलाच नाही तर एका विशिष्ठ प्रक्रियेद्वारे त्यांनी आपल्या देहाला चिदाकाशात विलीन केले आहे. हा भाग आपण पुढच्या लेखात सविस्तर बघणार आहोतच. आपल्या अवताराचे मुख्य प्रयोजन म्हणजे “भावार्थदिपीका” या आपल्या ग्रंथातून गीतेची ब्रह्मविद्या सर्वसामान्यांसाठी प्रगट केल्यावर माऊलींनी अनुभवामृत , हरीपाठ , अभंगाद्वारे आत्मज्ञानाची शब्दरुपात मांडणी केली व त्यानंतर आता समाधी घेण्याची वेळ जवळ आली आहे याची कल्पना आपले *ज्येष्ठ* बंधू ,आपले सद्गुरु श्रीनिवृत्तीनाथांना दिली होती. आळंदी हे सिद्धपीठ, शिवपीठ आहे, हे माउलींचे निजस्थान आहे, प्रत्येक कल्पात माउली याच *ठिकाणी* समाधिस्थ होतात अशा अनेक दिव्य गोष्टी या अलंकापुरीशी निगडीत आहेत. याच कारणाने माधानच्या ज्ञानेशकन्या सद्गुरु श्रीगुलाबराव महाराजांनी आळंदीला “नित्यतीर्थ” असे म्हटले आहे.
श्रीज्ञानेश्वर माउलींनी पांडूरंगाजवळ आपल्या या निजस्थानी आता समाधी घ्यायची आहे हा विचार व्यक्त केला व त्यानंतर मग सर्वांना एक कल्पना नक्की आली की करुणेचा-प्रेमाचा हा सगुण पुतळा आता आपल्या दृष्टीआड होणार आहे. माउलींच्या सगुण रुपात काय प्रेम , करुणा , वात्सल्य असेल याची आपण कल्पनाही करु शकणार नाही . कारण त्यांनी समाधी घेतल्यावर प्रत्यक्ष परब्रह्म पंढरीनाथ ही रडले ,ते बराच काळ पंढरपूरात एकांतात असलेल्या वनात जिथे आज आपण विष्णुपद बघतो त्या ठिकाणी जाऊन राहिले होते. ही गोष्ट ज्ञानोबांच्या अधिकाराची , त्यांच्या अवताराची आपल्याला कल्पना देण्यास पुरेशी आहे असे मला वाटते. माउलींनी समाधी आळंदीलाच का घेतली यामागे प्राचीन व दिव्य असा इतिहास आहे.आजच्या लेखाचा तो विषय नसल्याने एवढेच सांगतो की आळंदी अर्थात ही अलंकापुरी माउलींचे नित्य लिलाक्षेत्र आहे,माउलींचे निजस्थान आहे.माउली प्रत्येक अवतारात याच ठिकाणी समाधिस्थ होतात.पुढच्या द्वितीय भागात आपण याच अलंकापुरी महात्म्याचा उहापोह करुयात.
माउली ज्ञानोबारायांनी देह ठेवला त्यावेळी प्रत्यक्ष परमात्मा पंढरीनाथ व *रुक्मिणी* आईसाहेब सर्व संत मंडळींसह आळंदीत आले होते. याला प्रमाण म्हणजे त्यावेळी स्वतः उपस्थित असलेल्या नामदेवरायांनी माउलींचे केलेले चरित्र वर्णन, समाधी प्रकरण. यात नामदेवरायांनी प्रत्येक घडामोडीचे अत्यंत सुंदर व इथ्यंभूत असे वर्णन केले आहे. नामदेवराय एका ठिकाणी म्हणतात,
“ विठ्ठल रुक्मिणीसहित गरुड हनुमंत । आणिक संत महंत जमा झाले”
श्रीनामदेवराय सांगतात श्रीभगवान पंढरीनाथ सर्व संत मंडळींसह माउलींना घेऊन दशमीला अलंकापुरीत दाखल होतात. तेव्हा सर्वत्र गंभीर पण दिव्य चैतन्याचे भारलेले वातावरण निर्माण होते. गंभीर का ? तर प्रत्येकाला ठाऊक असते की आता हा आपला ज्ञानोबा ,ज्ञानदेव ,हा *ज्ञानियांचा* राजा आपल्या दृष्टीआड होणार आहे. खरं सांगू तर या प्रसंगांचे वर्णन वाचले तरी ह्रदय भरुन येतं.पुढे भगवान पंढरीनाथांनी नामदेवरायांना माउलींचे निजस्थान म्हणजे त्यांच्या समाधीच्या विवराचे , गुंफे चे स्थान दाखविले . त्याचे रहस्य सांगितले. मग नारा, विठा, गोंदा या नामदेवरायांच्या पुत्रांना त्या समाधी विवरात उतरुन सर्व जागा साफ करण्याची आज्ञा देव करतात. आश्चर्याची बाब अशी की जेव्हा ही मंडळी समाधी विवरात जातात तेव्हा तिथे मृगाजिन ,रुद्राक्ष माळ ,धूनी असे सर्व साहित्य आधीच ठेवलेले होते. तेव्हा देव नामदेवरायांना सांगतात , “ अष्टोत्तरशें वेळा साधिली समाधी । ऐसे हे अनादी ठाव असे॥” म्हणजेच या ठिकाणी १०८ वेळा आधीच समाधीलीला झाली आहे व हे ज्ञानदेवांचे अनादी असे निजस्थान आहे. यावरुन आपल्याला या स्थानाचे महात्म्य लक्षात येतेच येते. तर आता आपण आजच्या लेखाच्या मुख्य विषयाकडे वळूयात ,की ही एकादशी माउलींची का ? या एकादशीला ऐवढे महत्व का?
दशमी ,एकादशी व द्वादशी चे व्रत पूर्ण करुन त्रयोदशीचा परम पावन पण तेवढाच सर्वांचे मन हेलावणारा,दुःखद दिवस पुढे येऊन ठेपला .तेव्हा माउलीं ज्ञानराजांनी भगवान पंढरीनाथांकडे , सद्गुरु निवृत्तीदादांकडे समाधी घेण्याची आज्ञा मागितली. देवांनी आज्ञा दिली व स्वतः ते ज्ञानदेवांना घेऊन समाधी विवराजवळ आले. पुढे गेल्यावर भगवान पांडूरंग ज्ञानोबांना म्हणतात “ज्ञानदेवा आता सावध हो” पण या सावध हो शब्दामागे मोठे रहस्य दडलेले आहे.सावध हो म्हणजे नक्की काय ? तर देहातच ब्रह्मस्वरुप झालेले ज्ञानोबा हे समाधी अवस्थेला आधीच प्राप्त झालेले होते. ते देहातच समाधी अवस्थेला गेले होते, त्या स्थितीत स्थिर झाले होते. त्या समाधी अवस्थेत स्थिर झालेल्या ज्ञानोबांचे मन हे विश्वमनाशी केव्हाच एकरूप झाले होते. ते देहात असून ही देहातीत झालेले होते. देहाच्या , मनाच्या , बुद्धीच्या ही पलिकडे गेलेले ज्ञानोबा हे देहातच विश्वरूप झाले होते.त्यामुळे त्यांना पंढरीनाथांनी “सावध हो” म्हटले आहे. जे नित्य ब्रह्मरुपाशी एकरूप झालेले असतात ,जे तुर्यातीत अवस्थेच्या ही पार गेलेले असतात त्यांना देहभावाला येण्यासाठी फार कष्ट पडतात *असे* ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात .त्यामुळे ज्ञानोबांना देहभावावर आणण्यासाठी भगवंत ज्ञानदेवा सावध हो असे म्हणतात .ज्ञानदेवांना सावध हो म्हणून भगवान पंढरीनाथ म्हणतात की , “आता मला काहीतरी वरदान माग”. देवांनी ज्ञानोबांना वरदान मागण्यास सांगितले तेव्हा जगाची माउली असलेल्या ज्ञानोबांनी देवांकडे एक वैशिष्ठ्यपूर्ण मागणे मागितले .ते म्हणाले ,”देवा ! कार्तिक महिन्यातील शुद्ध पक्षांतील एकादशी चे व्रत हे तुमच्या अधिकारातले व्रत आहे.पण माझें एक मागणे आहे की याच महिन्यांतील कृष्ण पक्षातील एकादशी व्रताचा मान मला मिळावा.ते घडले की माझी इच्छा पूर्ण झाली.” बरं माउलींचे हे मागणे ही जगातील प्रत्येकाच्या उद्धारासाठी,कल्याणासाठीच आहे. देवांना हे ज्ञानोबांनी मागितल्यावर पंढरीनाथ अत्यंत आनंदीत झाले व त्यांनी वरदान दिले की, “जो भक्त आळंदी क्षेत्री कीर्तन करील ,त्याला वैकुंठाचा लाभ होईल. *माणूस* श्रद्धावान असो वा अश्रद्ध त्या दोघांनाही परब्रह्मस्वरुप करण्याचे सामर्थ्य या इंद्रायणीच्या पवित्र जलामध्ये आहे. जे लोक या पुण्यसलिला इंद्रायणीत स्नान करतील व ज्ञानोबांपुढे नतमस्तक होतील,त्यांच्यापुढे किर्तन ,भजन करतील त्यांच्या कोट्यावधी कुळांसह मी त्यांचा उद्धार करीन. जिथे ज्ञानदेव असतील तिथे मी अहोरात्र असेनच.” देवांचे हे आश्वासन ऐकून सर्वत्र आनंदी आनंद झाला. त्यामुळे मग कार्तिक कृष्ण पक्षातील या एकादशीला माउलींची एकादशी असे म्हटले जाते. म्हणून या एकादशीला आळंदीला येऊन प्रत्येक वारकरी माउलींच्या परमपावन चरणी नतमस्तक होऊन धन्य होतो. म्हणून माउलींच्या या कार्तिक वारीला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे.
उद्याच्या भागात आपण माउलींच्या या परमप्रिय ,निजस्थान असलेल्या अलंकापुरीचे महत्व ,माउलींनी याच ठिकाणी का समाधी घेतली त्याचे कारण व माउलींच्या समाधी घेण्याआधी काय घडामोडी घडल्या, त्याचे नामदेवरायांनी काय वर्णन केले हे बघूयात. वदवून घेणारे , लिहून घेणारे माझे मायबाप ज्ञानदेवच आहेत तरी त्यांनीच करुन घेतलेली ही सेवा त्यांच्याच परममंगलकारी ,परमपावन चरणी अर्पण करतो.
✍🏻🖋️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी


💯🚩🙏
ReplyDelete