Monday, December 11, 2023

झाले_ब्रह्मरूप_ज्ञानदेव भाग ३ 🙏🏻🌸☘️❤️

 



#झाले_ब्रह्मरूप_ज्ञानदेव भाग ३-:

     

 “नामा म्हणे आता लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधिस्त ।।”

                         

आज कार्तिक कृ्ष्ण त्रयोदशी आज करुणाब्रह्म कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती सद्गुरु भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींचा संजीवन समाधी सोहळ्याचा मुख्य दिवस. आजच्याच तिथीला म्हणजेच शके बाराशे अठरा कार्तिक वद्य १३ गुरुवार आंग्ल दिनांक १५ ॲाक्टोबर इ. सन १२९६ या दिवशी संजीवन समाधी घेऊन आपले हे अलौकिक अवतार कार्य दृष्य रुपातून गुप्त केले. त्या वेळी माउलींचे वय होते २१ वर्षे ३ महिने व ५ दिवस. म्हणजे हा माउलींचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळा. वयाच्या १५ व्या वर्षी भावार्थदिपीके सारखे ब्रह्मज्ञान प्रगट करणारा हा महायोगी , हा योगीराज , योगीयांचा शिरोमणी,योगीयांचा चक्रवर्ती सम्राट व आमच्या अनाथांचा मायबाप समाधीस्त झाला .खरंसांगू तर हा प्रसंग वाचतांनाही डोळे भरुन येत आहेत. माझ्यासाठी जीवनात माउलींचे समाधी प्रकरण व छत्रपती शंभु महाराजांचे देह ठेवणे हे दोन अत्यंत व्यथित करणारे व अगदी मन हलवून सोडणारे अत्यंत गंभीर ,दुःखद व शब्दांच्या कक्षेत न मावणारे प्रसंग आहेत. शंभु महाराजांचे शेवटचे ४० दिवस तर वाचणे ही अवघड. माउलींनी देह ठेवला तेव्हा “शांतीची पै शांती” असे वर्णन असलेले जगद्गुरु निवृत्तीनाथ ही कळवळले , त्यांच्या ही अश्रुंचा बांध फुटला . जिथे आपल्या लाडक्या ज्ञानेबांचे समाधीत जाणे परब्रह्म भगवान पांडूरंगाला ही सहन न झाल्याने ते ही दुःखाने व्याकुळ झालो तिथे माझ्यासारख्यांचे घुंगरड्याचे काय सांगावे ? आम्हा सर्वांसाठी तर आमच्या ज्ञानाबाई ,आमचे मायबापच आज स्थूल रुपाने अदृष्य झाले. संतकुळ शिरोमणी ज्ञानदेव हे जगातील एकमात्र पुरुष आहेत ज्यांना “माउली” असे संबोधले जाते.कारण ज्ञानोबा माझ्या तुमच्या सारख्या अज्ञानी जीवांच्या उद्धारासाठी अवताराला आले ,आपले संपूर्ण जीवन जे अवघे २१ वर्षाचे होते ते लोकोद्धारासाठी जगले, तुमच्या माझ्या सारख्या अज्ञानी जीवास भावार्थदिपीकेतून ,हरीपाठातून ज्ञानाचा अनुग्रह केला व आपले कार्य पूर्ण होताच समाधीत विश्वरूप झाले. माउलींनी आम्हालाला उद्धाराचा मार्ग दिला ,तो दाखविला व त्यावर चालण्याचा अधिकार दिला म्हणून ही आई आहे जिने प्रत्येकाला आपल्या करुणेच्या पदराखाली घेतले , प्रत्येकाचा उद्धारच केला व आज ही करित आहेत. असो आज आपल्याला माउलींच्या समाधी दिवसाचा प्रसंग बघायचा आहे.त्याचे स्मरण करायचे आहे.त्या दिवशी चे जे वर्णन भक्तशिरोमनी नामदेवरायांनी केले ते बघायचे आहे.


ज्ञानेश्वरीतून जगाला ब्रम्हविद्या सुलभ करुन दिली ,जगातील प्रत्येकाला  ज्ञानाचा अधिकार देऊन उद्धाराचा मार्ग दाखविल्यावर , “आपले सर्व अवतार कार्य पूर्ण झाले आता मला सिद्धक्षेत्र अलंकापुरीस समाधी घेण्याची आज्ञा द्यावी” अशी विनंती ज्ञानोबाराय भगवान पंढरीनाथांकडे करतात.तेव्हा आपण स्वतः रुक्मिणी मातेसह आळंदीला ज्ञानोबांना समाधी देण्याकरिता येऊ असे भगवान पंढरीनाथांनी ठरवले. देवांच्या बरोबर तेव्हा त्यांचे सर्व पार्शद आले. गरुड -हनुमंत ,भक्त पुंडलिक -परिसा भागवत व नामदेवराय, देव -गंधर्व , ऋषी-मुनी ,सर्व संत मंडळींसह देव कार्तिक अष्टमीस आळंदीला येऊन पोचले.या सर्वांना घेण्यासाठी , तसेच देवांना सामोरे जाण्यासाठी सोपानदेव पुढे गेले. सोपानदेवांनी देवांना , माता रुक्मिणीस साष्टांग दंडवत घातला व ते सर्वांना घेऊन आळंदीत दाखल झाले.नामदेवरायांनी नारा ,विठा ,गोंदा ,महादा या आपल्या मुलांना समाधी सोहळ्यासाठी काय काय साहित्य लागते ते सर्व आणायला सांगितले. तेव्हा त्याचे प्रमाण व त्याची निवड काय करायची याचे मार्गदर्शन स्वतः भगवान पंढरीनाथांनी केली. आता आपला ज्ञानोबा समाधीस्त होणार या विचाराने ही नामदेवरायांना अपार दुःख होत होते. 

( नामदेवरायांच्या मनःस्थितीचे वर्णन त्यांच्या समाधी प्रकरणात वाचल्यावर आपल्याला खरोखर त्या दुःखाची ,व्याकुळतेची कल्पना आल्याशिवाय राहत नाही.) स्वतः भगवान पांडुरंगांनी सर्वांना सांगितले की आता दशमीला बाहेर प्रदक्षिणेसाठी निघून एकादशीला रात्रंदिवस हरिनामाचा जागर करा आणि त्यानंतर द्वादशीला पारणे करा. या वेळी स्वःता श्रीहरी सर्व सोहळ्यात ज्ञानोबाराय ,नामदेवरायांसह हजर होते. सर्वात दिव्य आणि अलौकिक बाब अशी की द्वादशीचे पारणे करण्यासाठी स्वतः माता रुक्मिणी ,गंगा , गिरीजा ,सत्यभामा या सर्व स्वयंपाकासाठी सिद्ध झाल्या .त्यांनी आपल्या या साऱ्या लाडक्या लेकरांसाठी विविध खाद्यपदार्थ केले. सर्व लोक इंद्रायणीवर स्नान करुन आले . सर्व वैष्णवांच्या पंक्ती पिंपळाच्या पाराजवळ बसविल्या. स्वतः भक्तवत्सल पांडुरंग परमात्मा सोवळे नेसून सर्व भक्तांना वाढायला लागले. देवांनी रुक्मिणी मातेला ज्ञानोबांच्या ताटात भरभरून वाढायला सांगितले. सर्वांचे जेवणे झाली ,या पंक्तीत देवांनी आपल्या हाताने ज्ञानोबांना भरविले व हे सर्व बघून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रु उभे राहिले.


त्यानंतर सर्व लगबगीने सिद्धेश्वरापाशी आले. देवांनी सिद्धेश्वराचा नंदी बाजूला करुन ज्ञानदेवांचे अनादी असे हे सिद्ध स्थान सर्वांना आधीच दाखविले होते. जेव्हा सर्व मंडळी आत गेली तर तिथे आधीच धुनी,आसन ,मृगाजिन अंथरलेले होते. भगवान श्रीहरी तेव्हा या स्थानाचे रहस्य प्रगट करुन नामदेवरायांना सांगतात की “हे माझेच सर्वात जुने असे समाधीचे स्थान आहे.” ज्ञानेश्वर माउली त्यानंतर आपले ज्येष्ठ बंधू व आपले सद्गुरु श्री निवृत्ती दादांपुढे हात जोडून उभे राहतात.निवृत्तीदादांनी आपल्या या लाडक्या ज्ञानोबाला प्रेमाने आलिंगन दिले. त्यांच्या भावनांचे बांध नेत्रावाटे वाहायला लागला. त्यांची हे ह्रद्य भेट बघून सर्वांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. भगवान परब्रह्म पंढरीनाथांनी सोपानदेव ,मुक्ताईला जवळ घेतले व ते त्यांचे सांत्वन करु लागले. त्यांनी ज्ञानदेवांना आश्वासन दिले की आम्हा स्वतः यांना ब्रह्मस्वरुपाला पोचवू. हे कार्य मी माझ्याकडे घेतो.( त्यामुळे ज्ञानोबांच्या समाधी या तिघाही भावंडांच्या समाधी वेळी भगवान पंढरीनाथ स्वतः हजर होते.)  


पुढे गरुड - हनुमंत, मुक्ताई- सोपान, देव- साधूजन, सकल संत -वैष्णव पताक्यांचे भार घेऊन ज्ञानोबांच्या पुढे मागे चालू लागले. ज्ञानदेवांना मध्यभागी घेऊन मिरवणूक निघाली. टाळ ,मृदुंग,वीणे यांच्या साथीने गायन कीर्तन सुरु झाले.सर्व मंडळी आपल्या लाडक्या ज्ञानोबांना घेऊन समाधी विवराभोवती बसली. ज्ञानेश्वर माउली समाधी साठी सिद्ध झाले. तेव्हा एक नवल घडले. माउलींनी आपल्या हातातील एक काठी मातीत रोवली व ती रोवल्या बरोबर त्याला पालवी फुटली. ती काठी होती अजान वृक्षाची. ज्या काठीला पालवी फुटली तो आपण आज बघतो आहे तो अजानवृक्ष आहे. राही , रखुमाबाई , सत्यभामा यांनी ज्ञानोबांना ओवाळले.या प्रसंगी ज्ञानोबांनी देवांची पाद्यपुजा केली व ते पदतीर्थ प्राशन केले. त्यानंतर स्वतः भगवान पंढरीनाथांनी ज्ञानोबांची पाद्यपूजा केली व त्यांचे पदतीर्थ स्वतः प्राशन केले.भगवंतांनी भक्ताचे पदतीर्थ प्राशन करावे हा जगातील एकमात्र  प्रसंग असावा.


नारा ,विठा,गोंदा,महादा या नामदेवरायांच्या पुत्रांनी ज्ञानोबाची भेट घेतली.विसोबा खेचर,चांगा वटेश्वर ,परसा भागवत सर्व संतांनी ज्ञानोबांना नमस्कार केला.या प्रसंगी सावता माळी महाराज,गोरोबा काका लहान लेकरासारखे तळमळत होते. ज्ञानदेवांनी समाधी स्थानाची प्रदक्षिणा केली. देवांनी व निवृत्तीनाथांनी ज्ञानोबांचे दोन्ही हात धरले व आता ते समाधीत जाण्यासाठी सिद्ध झाले.हे दृष्य बघून सर्वत्र दुःखाश्रुंचा बांध फुटला. लहानगे सोपानदेव-मुक्ताईंना अतिशय दुःख झाले.देवांनी आपल्या प्राणसख्या ज्ञानोबांना समाधी स्थानी आसनावर बसविले. नंतर ज्ञानदेवांनी देवांना त्रिवार नमन केले आणि मग आपले डोळे झाकून घेतले. या प्रसंगांचे वर्णन करतांना नामदेवराय म्हणतात “नामा म्हणे आता लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधिस्त॥” हा ज्ञानप्रकाश तेज सूर्य आज लोपला ,आज दृष्टीआड गेला . हा आमचा बाप ज्ञानदेव आज समाधिस्त झाला.


ज्ञानदेव समाधीस्त झाल्यावर पांडूरंग व निवृत्तीनाथ विवराच्या बाहेर आले .त्यानंतर समाधीची शिळा बंद करण्यात आली.सोपानदेव , मुक्ताईंनी नंतर जमिनीवरच अंग टाकले. निवृत्तीनाथांनी ही ज्ञानोबांच्या नावाने टाहो फोडला. देवांनी या सर्वांना पोटाशी धरले व सर्वांचे सांत्वन केले.आता लवकरच संवत्सरगावी म्हणजे सासवडला जाण्याचा संकेत या भावंडांना दिला. तेव्हा ही सर्व भावंडे शांत झाली. त्यानंतर सर्व इंद्रायणीवर आले , सर्वांनी आचमन केले. अमावस्येला गोपाळकाला करण्यात आला. हा सर्व सोहळा पाच दिवस झाला. त्यानंतर भगवान पंढरीनाथ व सर्व संत मंडळी आपल्या स्वस्थानी परतली. आपला प्राणसखा असलेल्या ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यामुळे भगवान पंढरीनाथ खुप व्याकूळ झाले.ते मंदिरात न जाता चंद्रभागेच्या काठी वनात जाऊन खिन्न वदनाने जाऊन बसले होते. ज्यांच्या समाधीमुळे भगवंतांनाही दुःख झाले अशा ज्ञानोबांची ख्याती आपण काय वर्णन करणार. खरं सांगू तर हे समाधी प्रकरण माझ्या कडून लिहीले जाईल का? हीच मला शंका होती पण त्या मायबाप ज्ञानोबांनी ही सेवा घडवून आणली .या लेखाचा शेवट नामदेवरायांच्या अभंगाने करतो.

( वेळे अभावी व शब्द मर्यादेस्तव हे समाधी प्रकरण अगदी थोडक्यात मांडले आहे.खरंतर संपूर्ण समाधी प्रकरणावर अनेक लेख होतील इतका तो विलक्षण आहे.) तरी ही मोडकी तोडकी सेवा ज्ञानाईच्या चरणी अर्पण करतो व इथेच थांबतो.


काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती । वेद म्हैशामुखीं वदविले ॥१॥

कोठवरी वानूं याची स्वरुप स्थिती । चालविली भिंती मृत्तिकेची ॥२॥

अविद्या मायेचा लागों नेदी वारा । ऐसें जगदोद्वारा बोलविलें ॥३॥

नामा म्हणे यांनीं तारिले पतित । भक्ति केली ख्यात ज्ञानदेवें ॥४॥


             ✍🏻🖋️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी

Sunday, December 10, 2023

झाले_ब्रह्मरूप_ज्ञानदेव भाग २ 🙏🏻🌸☘️🌺

 



#झाले_ब्रह्मरूप_ज्ञानदेव भाग २-:

                              *करुणाब्रह्म* कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती सद्गुरु भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींचा संजीवन समाधी सोहळा म्हणजे आळंदीची कार्तिक वारी . हा प्रत्येक वारकऱ्यासाठी,वैष्णवासाठी जिव्हाळ्याचा, प्रेमाचा आणि दिव्यानंदाचा उत्सव आहे.आषाढी वारी झाली की प्रत्येक वारकरी हा आळंदीच्या वारीची वाट बघत असतो, माउलींच्या आळंदीला येण्यासाठी आतुरलेला असतो.आळंदीच्या पुण्यपावन भूमीत येऊन एकदा आपल्या लाडक्या ज्ञानाबाईला बघून,त्यांच्या समाधीवर मस्तक ठेवून हा प्रत्येक वारकरी  कृतकृत्य होतो.*करुणाब्रह्म* सद्गुरु भगवान श्रीज्ञानेश्वर महाराजांची समाधी आळंदीत आहे ही सामान्य बाब नक्कीच नाही.माउलींनी आळंदीत समाधी का घेतली ? आळंदी हे श्रेत्र का वैशिष्ट्यपूर्ण आहे? या क्षेत्राचे काय महात्म्य आहे? या क्षेत्राचा इतिहास काय? हे क्षेत्र किती जुने आहे ? या क्षेत्राला शिवपिठ का म्हणतात? याचा आणि माउलींचा कसा अनादी संबंध आहे? अशा अनेक प्रश्नांचा उलगडा आपण आज करणार आहोत.

               *आळंदी* हा शब्दच अगदी वैशिष्टपूर्ण आहे. "अलं ददाति इति आलंदि" अशी आळंदी शब्दाची फोड आहे.जी आनंद देते ,जी साधकाला ,भक्ताला तोवर देते जोवर तो पुरे म्हणत नाही.(अर्थातच ही बाब आपल्यासारख्या विषयी लोकांसाठी नाही तर ती साधक,मुमुक्षू जनांसाठी आहे हे विसरुन चालणार नाही.) अशी ही माउलींची दिव्य आळंदी आहे.करुणाब्रह्म ज्ञानोबाराय हे विष्णू अवतार आहेत नव्हे नव्हे तर ते प्रत्यक्ष महाविष्णूच आहेच यात दुमत,शंका असण्याचे कारणच नाही.पण माउलींचे हे आळंदी क्षेत्र वैकुंठासमान दिव्य ,एकमेवाद्वितीयच आहे .मी तर त्या ही पलिकडे जाऊन म्हणेन की महाविष्णू ज्ञानोबारायांचे हे भूवैकुंठ आहे. माउलींचे निजस्थान असलेली ही अलंकापुरी काही आत्ताची नाही , तर प्रत्यक्ष पंढरीनाथ सांगतात की ,”ऐसे हे अनादी ठाव असे” म्हणजे जे अनादी आहे, ज्याच्या प्रारंभाचा ठाव कुणीही घेऊ शकत नाही.कारण असे म्हटले जाते की माउली प्रत्येक कलीयुगात याच क्षेत्रात अवतार धारण करतात आणि तो कलीयुगातील अवतार येथेच अलंकापुरीतील आपल्या निजस्थानी समाधिस्थ करतात.म्हणूनच आळंदीला *अनादी* क्षेत्र म्हटले जाते.आळंदी क्षेत्र हे चार ही युगापासून स्थिर व माउलीचे निजस्थान आहे. चार ही युगात नित्य असलेल्या या क्षेत्राला ज्ञानेशकन्या गुलाबराव महाराजांनी “नित्यतिर्थ” म्हटले आहे ते याच कारणाने.आळंदीचा प्रलयात ही लोप होत नाही म्हणून नामदेवरायांनी एका अभंगात हे अलंकापुरीचे महात्म्य शब्दबद्ध केले ते असे की,


देव म्हणे नामयां ब्रह्मक्षेत्र आदी । येथेंची समाधि ज्ञानदेवा ॥१॥

चौयुगां आदिस्थळ पुरातन । गेले ते नेमून मुनिजन ॥२॥

चालिले सकळ जाले ते विकळ । अनादि हें स्थळ ज्ञानदेवा॥३॥

नामा म्हणे आम्हां सांगितले हरी । दीर्घध्वनि करी वोसंडोनी॥४॥


आळंदी ही चारही युगात विविध नावाने ओळखली गेली. कृतयुगात आळंदीला आनंदवन असे नाम होते तर त्रेतायुगात वारुणीक्षेत्र.द्वापारयुगात आळंदीला कपिल क्षेत्र हे नाव होते तर कलीयुगात अलकावती .ज्याला पुढे अलंकापुर व सांप्रत काळात आळंदी हे नामाभिधान आहे. मुमुक्षांना ,साधकांना आनंद देते ते हे आनंदवन.आदीयोगी भगवान शिवांनाही या क्षेत्राने आपल्या दिव्य आनंदाने भुरळ घातली व देव ही या क्षेत्रात वास्तव्य करुन राहिले असे हे अलौकीक क्षेत्र. स्कंदपुराणातील अलंकापुरी महात्म्यात या संदर्भातील कथा आहे. एकदा भगवान शिव व माता पार्वती आकाश विहार करित असता या आनंदवनात उतरले.भगवान शिव या क्षेत्रात उतरल्याबरोबर आनंदाने भावविभोर झाले.त्यांनी या क्षेत्राला साष्टांग दंडवत घातला,त्यांचे अष्टभाव दाटले,इथली माती ही देवांनी आपल्या सर्वांगाला लावली,ते आनंदाने भावविभोर होऊन टाळी पिटू लागले व नंतर ते निचेष्टीत होऊन या अलंकापुरीच्या भूमीवर पडून राहिले. अशा प्रकारे आदियोगी आदिनाथ भगवान शिव ,जे आनंदाचे निजस्थान आहेत त्या आशुतोष महादेवांनाही जे क्षेत्र आनंद देऊ शकते त्याचे महात्म्य काय असेल याचा आपण विचारही करु शकत नाही. त्यावेळी भगवती माता पार्वती हे सर्व आश्चर्यचकीत मुद्रेणे पहात होती.बराच काळ भगवान महादेव या आनंद समाधीत होते ,तेव्हा माता पार्वतीने त्यांना सावध केले.त्यानंतर त्यांनी देवांना असे का झाले?आपण इतके आनंदविभोर का झालात ? हे प्रश्न विचारले. तेव्हा देवांनी पार्वती मातेला सांगितले की “हे माझे अनादी असे मुळपीठ आहे.येथे कालांतराने महाविष्णु अवतार धारण करणार आहेत.ही परमपवित्र अशी अनादी भूमी ,अनादी क्षेत्र मला अत्यंत प्रिय आहे.” भगवान शिवांनाही परमप्रिय असे हे अलंकापुर क्षेत्र आहे. कुबेराने या ठिकाणी कठोर असे तप केले होते.याच क्षेत्री कुबराने अष्टसिद्धीचे प्रतिक व त्या सिद्धीने युक्त असलेल्या दिव्य अष्टलिंगाची स्थापना केली होती. तसेच या संपूर्ण क्षेत्राखाली कोटी लिंग गुप्त झालेले आहे.म्हणून “शिवपीठ हे जुनाट” असे नामदेवराय ही म्हणतात. 

                                            अलंकापुरीतील सिद्धबेट हे स्वयं सिद्ध क्षेत्र आहे.या सिद्धबेटात देव ,ऋषी ,मुनी,संतांनी तप केले आहे व ते आजही गुप्त रुपाने या क्षेत्री वास करुन आहेत.नामदेवरायांनी तर आपल्या अभंगात वर्णन केले आहे की सिद्ध बेट हे भगवान शिवांच्या कैलासापेक्षा व भगवान विष्णूंच्या वैकुंठापेक्षाही श्रेष्ठ असे क्षेत्र आहे.ऐवढेच काय तर आळंदीजवळील पांच कोसा वरील सर्व भूमीसुद्धा सिद्ध क्षेत्र आहे.या अलंकापुर क्षेत्रात देवराज इंद्राने मोठा यज्ञ केला होता.या ठिकाणी दक्षिणाभिमुख वाहणारी इंद्रायणी ही कोटी तिर्थात,प्रयाग व काशीत केलेल्या तिर्थ स्नानाचे फळ प्रदान करणारी गंगाच आहे. असे हे अनादी शिवपीठ असलेले दिव्य क्षेत्र .या क्षेत्राचे महात्म्य सर्व संतांनी एकमुखाने केले आहे. माउलींनी याच क्षेत्री का समाधी घेतली हे आज आपण बघितले तर उद्या कार्तिक कृष्ण त्रयोदशी म्हणजे माउलींचा समाधी दिवस. हा समाधी प्रसंग कसा होता,त्यावेळी नक्की काय घडले,त्यावेळी आळंदीत कोण कोण उपस्थित होते या सर्व घटनांचा विचार उद्याच्या लेखात करुयात.माउलींचे समाधी प्रकरण दिव्य व खरोखर मन हेलावणारे आहे.पंढरीनांथांकडे विश्वात्मक मागणे मागून हे ज्ञानीयांचे राजे त्रयोदशीला विश्वरूप झाले.त्यांनी संजीवन समाोधीत समाधीस्थ होणे ही गेल्या हजार वर्षात झालेली अलौकिक ,शब्दातीत व विलक्षण दैवी घटना आहे. नामदेवरायांच्या अभंगावरून आपण उद्या समाधी क्षणाचा शब्दाद्वारे अनुभव घेऊ. मायबाप ज्ञानेश्वरा तुम्ही रेड्यामुखी वेद वदविता.हे शब्द ही आपलीच प्रेरणा आहे.हे आपले देणे आहे जे असेच आपल्या चरणांशी अर्पण करतो.

             ✍🏻🖋️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी

Saturday, December 9, 2023

झाले ब्रह्मरूप ज्ञानदेव भाग १ 🙏🏻☘️🌸🌺



झाले ब्रह्मरूप ज्ञानदेव भाग १-:

                              आज कार्तिक कृष्ण एकादशी, आजची एकादशी ही *करुणाब्रह्म* कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती सद्गुरु भगवान श्रीज्ञानेश्वर महाराजांची एकादशी म्हणून सर्वश्रुत आहे."आळंदीची कार्तिक वारी" म्हणून प्रसिद्ध असलेल्या या माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे. कार्तिक वारीतील ही एकादशी का *विशेष* आहे ? या एकादशीचे काय वैशिष्ट आहे ? ही माउलींची एकादशी का आहे? अशा अनेक प्रश्नांचा उलगडा आपण आज करणार आहोत.

                           करुणाब्रह्म सद्गुरु भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींची संजीवन समाधी ही जगातील एकमेवाद्वितीय व अलौकीक अशी  समाधी आहे. माउलींच्या जा समाधीला संजीवन समाधी म्हटले जाते. संजीवन या शब्दाला इथे विशेष महत्व आहे कारण माउलींनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केलाच नाही तर एका विशिष्ठ प्रक्रियेद्वारे त्यांनी आपल्या देहाला चिदाकाशात विलीन केले आहे. हा भाग आपण पुढच्या लेखात सविस्तर बघणार आहोतच. आपल्या अवताराचे मुख्य प्रयोजन म्हणजे “भावार्थदिपीका” या आपल्या ग्रंथातून गीतेची ब्रह्मविद्या सर्वसामान्यांसाठी प्रगट केल्यावर माऊलींनी अनुभवामृत , हरीपाठ , अभंगाद्वारे आत्मज्ञानाची शब्दरुपात मांडणी केली व त्यानंतर आता समाधी घेण्याची वेळ जवळ आली आहे याची कल्पना आपले *ज्येष्ठ* बंधू ,आपले सद्गुरु श्रीनिवृत्तीनाथांना दिली होती. आळंदी हे सिद्धपीठ, शिवपीठ आहे, हे माउलींचे निजस्थान आहे, प्रत्येक कल्पात माउली याच *ठिकाणी* समाधिस्थ होतात अशा अनेक दिव्य गोष्टी या अलंकापुरीशी निगडीत आहेत. याच कारणाने माधानच्या ज्ञानेशकन्या सद्गुरु श्रीगुलाबराव महाराजांनी आळंदीला “नित्यतीर्थ” असे म्हटले आहे. 

                            श्रीज्ञानेश्वर माउलींनी पांडूरंगाजवळ आपल्या या निजस्थानी आता समाधी घ्यायची आहे हा विचार व्यक्त केला व त्यानंतर मग सर्वांना एक कल्पना नक्की आली की करुणेचा-प्रेमाचा हा सगुण पुतळा आता आपल्या दृष्टीआड होणार आहे. माउलींच्या सगुण रुपात काय प्रेम , करुणा , वात्सल्य असेल याची आपण कल्पनाही करु शकणार नाही . कारण त्यांनी समाधी घेतल्यावर प्रत्यक्ष परब्रह्म पंढरीनाथ ही रडले ,ते बराच काळ पंढरपूरात एकांतात असलेल्या वनात जिथे आज आपण विष्णुपद बघतो त्या ठिकाणी जाऊन राहिले होते. ही गोष्ट ज्ञानोबांच्या अधिकाराची , त्यांच्या अवताराची आपल्याला कल्पना देण्यास पुरेशी आहे असे मला वाटते. माउलींनी समाधी आळंदीलाच का घेतली यामागे प्राचीन व दिव्य असा इतिहास आहे.आजच्या लेखाचा तो विषय नसल्याने एवढेच सांगतो की आळंदी अर्थात ही अलंकापुरी माउलींचे नित्य लिलाक्षेत्र आहे,माउलींचे निजस्थान आहे.माउली प्रत्येक अवतारात याच ठिकाणी समाधिस्थ होतात.पुढच्या द्वितीय भागात आपण याच अलंकापुरी महात्म्याचा उहापोह करुयात.

                                  माउली ज्ञानोबारायांनी देह ठेवला त्यावेळी प्रत्यक्ष परमात्मा पंढरीनाथ व *रुक्मिणी* आईसाहेब सर्व संत मंडळींसह आळंदीत आले होते. याला प्रमाण म्हणजे त्यावेळी स्वतः उपस्थित असलेल्या नामदेवरायांनी माउलींचे केलेले चरित्र वर्णन, समाधी प्रकरण. यात नामदेवरायांनी प्रत्येक घडामोडीचे अत्यंत सुंदर व इथ्यंभूत असे वर्णन केले आहे. नामदेवराय एका ठिकाणी म्हणतात,

“ विठ्ठल रुक्मिणीसहित गरुड हनुमंत । आणिक संत महंत जमा झाले” 

श्रीनामदेवराय सांगतात श्रीभगवान पंढरीनाथ सर्व संत मंडळींसह माउलींना घेऊन दशमीला अलंकापुरीत दाखल होतात. तेव्हा सर्वत्र गंभीर पण दिव्य चैतन्याचे भारलेले वातावरण निर्माण होते. गंभीर का ? तर प्रत्येकाला ठाऊक असते की आता हा आपला ज्ञानोबा ,ज्ञानदेव ,हा *ज्ञानियांचा* राजा आपल्या दृष्टीआड होणार आहे. खरं सांगू तर या प्रसंगांचे वर्णन वाचले तरी ह्रदय भरुन येतं.पुढे भगवान पंढरीनाथांनी नामदेवरायांना माउलींचे निजस्थान म्हणजे त्यांच्या समाधीच्या विवराचे , गुंफे चे स्थान दाखविले . त्याचे रहस्य सांगितले. मग नारा, विठा, गोंदा या नामदेवरायांच्या पुत्रांना त्या समाधी विवरात उतरुन सर्व जागा साफ करण्याची आज्ञा देव करतात. आश्चर्याची बाब अशी की जेव्हा ही मंडळी समाधी विवरात जातात तेव्हा तिथे मृगाजिन ,रुद्राक्ष माळ ,धूनी असे सर्व साहित्य आधीच ठेवलेले होते. तेव्हा देव नामदेवरायांना सांगतात , “ अष्टोत्तरशें वेळा साधिली समाधी । ऐसे हे अनादी ठाव असे॥” म्हणजेच या ठिकाणी १०८ वेळा आधीच समाधीलीला झाली आहे व हे ज्ञानदेवांचे अनादी असे निजस्थान आहे. यावरुन आपल्याला या स्थानाचे महात्म्य लक्षात येतेच येते. तर आता आपण आजच्या लेखाच्या मुख्य विषयाकडे वळूयात ,की ही एकादशी माउलींची का ? या एकादशीला ऐवढे महत्व का? 

           दशमी ,एकादशी व द्वादशी चे व्रत पूर्ण करुन त्रयोदशीचा परम पावन पण तेवढाच सर्वांचे मन हेलावणारा,दुःखद दिवस पुढे येऊन ठेपला .तेव्हा माउलीं ज्ञानराजांनी भगवान पंढरीनाथांकडे , सद्गुरु निवृत्तीदादांकडे समाधी घेण्याची आज्ञा मागितली. देवांनी आज्ञा दिली व स्वतः ते ज्ञानदेवांना घेऊन समाधी विवराजवळ आले. पुढे गेल्यावर भगवान पांडूरंग ज्ञानोबांना म्हणतात “ज्ञानदेवा आता सावध हो” पण या सावध हो शब्दामागे मोठे रहस्य दडलेले आहे.सावध हो म्हणजे नक्की काय ? तर देहातच ब्रह्मस्वरुप झालेले ज्ञानोबा हे समाधी अवस्थेला आधीच प्राप्त झालेले होते. ते देहातच समाधी अवस्थेला गेले होते, त्या स्थितीत स्थिर झाले होते. त्या समाधी अवस्थेत स्थिर झालेल्या ज्ञानोबांचे मन हे विश्वमनाशी केव्हाच एकरूप झाले होते. ते देहात असून ही देहातीत झालेले होते. देहाच्या , मनाच्या , बुद्धीच्या ही पलिकडे गेलेले ज्ञानोबा हे देहातच विश्वरूप झाले होते.त्यामुळे त्यांना पंढरीनाथांनी “सावध हो” म्हटले आहे. जे नित्य ब्रह्मरुपाशी एकरूप झालेले असतात ,जे तुर्यातीत अवस्थेच्या ही पार गेलेले असतात त्यांना देहभावाला येण्यासाठी फार कष्ट पडतात *असे* ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात .त्यामुळे ज्ञानोबांना देहभावावर आणण्यासाठी भगवंत ज्ञानदेवा सावध हो असे म्हणतात .ज्ञानदेवांना सावध हो म्हणून भगवान पंढरीनाथ म्हणतात की , “आता मला काहीतरी वरदान माग”. देवांनी ज्ञानोबांना वरदान मागण्यास सांगितले तेव्हा जगाची माउली असलेल्या ज्ञानोबांनी देवांकडे एक वैशिष्ठ्यपूर्ण मागणे मागितले .ते म्हणाले ,”देवा ! कार्तिक महिन्यातील शुद्ध पक्षांतील एकादशी चे व्रत हे तुमच्या अधिकारातले व्रत आहे.पण माझें एक मागणे आहे की याच महिन्यांतील कृष्ण पक्षातील एकादशी व्रताचा मान मला मिळावा.ते घडले की माझी इच्छा पूर्ण झाली.” बरं माउलींचे हे मागणे ही जगातील प्रत्येकाच्या उद्धारासाठी,कल्याणासाठीच आहे. देवांना हे ज्ञानोबांनी मागितल्यावर पंढरीनाथ अत्यंत आनंदीत झाले व त्यांनी वरदान दिले की, “जो भक्त आळंदी क्षेत्री कीर्तन करील ,त्याला वैकुंठाचा लाभ होईल. *माणूस* श्रद्धावान असो वा अश्रद्ध त्या दोघांनाही परब्रह्मस्वरुप करण्याचे सामर्थ्य या इंद्रायणीच्या पवित्र जलामध्ये आहे. जे लोक या पुण्यसलिला इंद्रायणीत स्नान करतील व ज्ञानोबांपुढे नतमस्तक होतील,त्यांच्यापुढे किर्तन ,भजन करतील त्यांच्या कोट्यावधी कुळांसह मी त्यांचा उद्धार करीन. जिथे ज्ञानदेव असतील तिथे मी अहोरात्र असेनच.” देवांचे हे आश्वासन ऐकून सर्वत्र आनंदी आनंद झाला. त्यामुळे मग कार्तिक कृष्ण पक्षातील या एकादशीला माउलींची एकादशी असे म्हटले जाते. म्हणून या एकादशीला आळंदीला येऊन प्रत्येक वारकरी माउलींच्या परमपावन चरणी नतमस्तक होऊन धन्य होतो. म्हणून माउलींच्या या कार्तिक वारीला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे. 

उद्याच्या भागात आपण माउलींच्या या परमप्रिय ,निजस्थान असलेल्या अलंकापुरीचे महत्व ,माउलींनी याच ठिकाणी का समाधी घेतली त्याचे कारण व माउलींच्या समाधी घेण्याआधी काय घडामोडी घडल्या, त्याचे नामदेवरायांनी काय वर्णन केले हे बघूयात. वदवून घेणारे , लिहून घेणारे माझे मायबाप ज्ञानदेवच आहेत तरी त्यांनीच करुन घेतलेली ही सेवा त्यांच्याच परममंगलकारी ,परमपावन चरणी अर्पण करतो.

                 ✍🏻🖋️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...