#भगवान_कालभैरव_जयंती :- कार्तिक कृष्ण अष्टमी कालाष्टमी ही भगवान शिवांचे पूर्ण अवतार असलेले भगवान श्रीकालभैरवांची प्राकट्य तिथी.आजच्या या परमपावन तिथीला आपण भगवान कालभैरव यांच्या प्राकट्याची कथा ,त्यांचा व शाक्त संप्रदाय,नाथ संप्रदाय संबंध ,तसेच भगवान कालभैरवांचे स्वरूप ,त्यांचे मुख्य प्रकार, त्यांची कुठल्या रुपात उपासना सर्वत्र प्रचलित आहे ,कालभैरवांचे मुख्य स्थान कुठले अशा अनेक विषयांवर आपण चिंतन करणार आहोत.
भगवान भैरव हे तंत्रमार्गाचे अधिष्टात्री देवता आहेत.ते ज्ञानाचे अथांग सागर आहेत.ज्यांच्यापासून भयाची उत्पत्ती झाली आहे,जे भयाची वृद्धी करतात,जे भयावर शासन करतात व जे भयाचा नाश करतात असे भगवान भैरव हे काळाचेही राजे आहेत म्हणूनच त्यांना “कालराज” असे म्हटले जाते.तंत्रानुसार भैरवाचा अर्थ होतो जे स्वतः शिव आहेत.तंत्र मार्गाचे जे साधक ज्ञान घेत असतात,जे साधक सद्गुरु कडून तंत्रमार्गाची दिक्षा घेऊन तंत्राचा अभ्यास करित असतात त्यांना भैरव व भैरवी असे म्हटले जाते.भगवान भैरवांना काल ही भितो म्हणून त्यांना “कालभैरव” म्हटले जाते. प्राचिन ग्रंथ “विज्ञान भैरव” व “तंत्रलोक” नुसार भैरव हा शब्द भि व अव या धातुने तयार झाला आहे.ज्याचा अर्थ होतो भिषण,भय कारक तसेच जे साधकाचे संकटापासून रक्षण करतात असे भैरव. “वामकेश्वर” तंत्रात भैरव शब्दातील भ,र,व हे तिन जे वर्ण आहेत त्याचा अर्थ भरण,रमण व वमन असा होतो.अर्थात ज्या रुपात भगवान सदाशिव हे या विश्वाची उत्पत्ती ,पालन व संहार करतात ते भैरव. शाक्त संप्रदायात ,शाक्त तंत्रामध्ये भैरव उपासनेला अनन्यसाधारण महत्व आहे.शाक्त तंत्र ग्रंथामध्ये भगवान भैरव उपासनेशिवाय शक्ती तंत्रात पूर्णत्व प्राप्तच होत नाही असे सांगितले गेले आहे.भैरव उपासना ही शक्ती उपासनेचा अविभाज्य भाग आहे.रुद्रयामल तंत्रामध्ये ६४ भैरवांची चर्चा केली गेली आहे.या ६४ भैरवांच्या शक्तीलाच आपण ६४ योगीनी म्हणून ओळखतो. तसेच ५२ शक्तीपिठाचे रक्षणकर्ते देवता हे ५२ भैरव आहेत.दशमहाविद्या या विश्वाच्या आद्य शक्ती आहेत व त्या प्रत्येक महाशक्तीला एक स्वतंत्र भैरव आहे.अशा प्रकारे भगवान कालभैरव हे शक्ती उपासनेमध्ये मुख्य देवता आहेत.
भगवान कालभैरव यांच्या प्राकट्या संबंधी तिन कथा आपल्या विविध पुराण ,तंत्र ग्रंथात वाचायला मिळतात. त्या तिन्ही कथा आपण या लेखात बघणार आहोत.
१) सत्य युगाच्या सुरुवातील भगवान ब्रह्मदेव सुमेरु पर्वतावर बसलेले असतात तेव्हा भगवान विष्णू व इतर देवता तिथे जाऊन त्यांना मुळ तत्वाचे ,परब्रह्म तत्वाचे वर्णन करण्याची ,स्तुती करण्याची विनंती करतात.पण शिव मायेने ब्रह्म देवांना अहंकार होतो व “मीच निर्गुण निराकार ब्रह्म आहे,मीच अजन्मा आहे,मीच या सर्व विश्वाचे कारण आहे.” असे म्हणतात.असे म्हटल्यावर भगवान विष्णू त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करतात की ,”माझ्यातूनच तुमचा जन्म झाला आहे.मीच तुमचा पिता आहे.” पण शिव मायेमुळे ब्रह्मदेवांना अहंकार होतो व त्यांचा आणि भगवान विष्णूंचा वाद होतो.या वादाचा काहीही निष्कर्ष निघत नाही.त्यामुळे भगवान ब्रह्म आणि भगवान विष्णू हे चारही वेदांचे आवाहन करतात.त्यावेळी तिथे दिव्य देह धारण करुन चारही वेद प्रगट होतात.भगवान विष्णू त्यांना परब्रह्म कोण व त्यांचे वर्णन काय असे विचारतात.त्याचे तुम्ही वर्णन करा म्हणून सांगतात.त्यावेळी ऋग्वेद , यजुर्वेद, अथर्ववेद व सामवेद हे मुक्तकंठाने भगवान रुद्राची म्हणजे भगवान महादेवांची स्तुती करतात. तरी ही भगवान ब्रह्मा व विष्णू हे कथन अमान्य करतात.त्यांच्यात परत वाद सुरु होतो.तेव्हा त्या दोघांच्या मधे एक तेजपुंज स्तंभ तयार होतो. त्या स्तंभातून भगवान शिव प्रगट होतात. पण त्यांना बघून शैव मायेने ग्रस्त झालेले भगवान ब्रह्मा भगवान शिवांना म्हणतात की , “मीच तुमचा पिता आहे,मीच तुमची उत्पत्ती केली आहे.त्यामुळे तुम्ही मला शरण यां!” असे म्हटल्यावर भगवान शिवांना खुप क्रोध येतो आणि ते आपल्या देहातून एक भयंकर ,प्रचंड व भिषण असे रुप ते प्रकट करतात.हेच भगवान भैरवांचे प्राकट्य.भगवान भैरव हे अतिशय प्रचंड ,भयंकर असतात.त्यांना बघून सर्वांचा थरकाप उडतो. भगवान शिव भैरवांना अहंकाराने ग्रस्त ब्रम्हाला शासन करण्याची आज्ञा करतात.भगवान भैरव तात्काळ आपल्या उजव्या हाताच्या बोटाच्या नखाने ब्रह्मदेवांच्या पाचव्या मुखाला कापतात.तात्काळ ते पाचवे मुख कापले जाते व खाली पडते.असे केल्या क्षणी ब्रह्म देवांना आपल्या चुकीची जाणीव होते व ते आणि इतर देवता मिळून भगवान शिवांना शरण येतात.सर्व देव भगवान शिवांची स्तुती करतात. त्यानंतर भगवान शिव प्रसन्न होऊन व सर्वांना अभय देतात.भिषण रुप व काळालाही ज्यांच्यामुळे भय उत्पन्न झाले असे भगवान भैरवांवर भगवान शिव प्रसन्न होतात व त्यांना “कालभैरव” हे नाम देतात.
पण ब्रह्म हत्या केल्याने भगवान भैरव यांच्या हाताला ब्रह्म देवांचे मस्तक येऊन चिटकते. तेव्हा भगवान शिव कालभैरवांना आपल्या प्रिय वाराणसी ,काशीला जाण्याची आज्ञा करतात.त्याचवेळी भगवान शिव कालभैरवांना काशीचे अधिपती ,काशीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करतात. भगवान कालभैरव काशीला जातात.तिथे गेल्यावर त्यांच्या हाताला चिटकलेले ब्रह्म कपाल गळून पडते व ते ब्रह्महत्येपासून मुक्त होतात.हे जिथे घडले ते स्थान आज कपालमोचन तिर्थ म्हणून प्रसिद्ध आहे .
२) दुसरी कथा अशी की सत्ययुगात अंधकासुर नावाचा राक्षस जन्माला येतो. हा भगवान शिवांचा भक्त असतो.कठोर तप करुन तो भगवान शिवांना प्रसन्न करुन घेतो.भगवान शिवांकडून त्रैलोक्य विजयाचे अभय वरदान तो मिळवून घेतो.त्यानंतर त्रैलोक्यवर त्याने हाहाःकार माजवला.सर्वत्र ऋषी मुनी ,देव त्रस्त झाले. यामुळे अंधकासुराचा अहंकार शिगेला पोचतो व अज्ञानी अंधकासुर आपले सैन्य घेऊन भगवान शिवालाच युद्धाला ललकारतो,आव्हान देतो.जेव्हा तो भगवान शिवांवर आक्रमण करतो तेव्हा भगवान शिवांच्या रुधिरापासून भगवान कालभैरव प्रगट होतात .भगवान कालभैरव तात्काळ अंधकासुराला शासन करतात व त्याचा वध करतात.ही कालभैरवांच्या प्राकट्याची दुसरी कथा.
३) तिसरी कथा अशी की भगवान ब्रह्मा चार वेदांना प्रगट करतात व त्यानंतर आपल्या पाचव्या मुखाने पंचम वेदांची रचना करण्यास सुरुवात करतात .त्यावेळी भगवान शिव तिथे प्रगट होतात व त्यांना तसे न करण्याची आज्ञा देतात.पण अहंकाराने ग्रस्त ब्रह्मा भगवान शिवांची आज्ञा पालन करत नाही.तेव्हा क्रोधायमान झालेल्या भगवान शिवांनी भगवान कालभैरवांना प्रगट केले.त्यानंतर भगवान कालभैरव आपल्या नखाने ब्रह्माचे पाचवे मुख कापतात व त्यांची अहंकारातून मुक्तता करतात.
अशा या भगवान कालभैरवांच्या प्राकट्याच्या कथा आपल्या विविध ग्रंथातून वाचायला मिळतात.
भगवान कालभैरव यांचे एकून ५२ रुप सांगितले जातात पण त्यातही आठ भैरव हे मुख्य समजले जातात.त्यात असितांग भैरव ,रुद्र भैरव,चंद्र भैरव,क्रोध भैरव,उन्मत्त भैरव,कपाली भैरव,भीषण भैरव,संहार भैरव यांचा समावेश होतो.नाथ संप्रदायात भगवान भैरवांची उपसना केली जाते.त्यांचे विविध शाबर मंत्र आपल्याला नाथ संप्रदायात वाचायला मिळतात.पण या सर्व शाबर मंत्राचा उपयोग सद्गुरु कडून माहिती करुन करावा लागतो. उपासनेच्या दृष्टीने भगवान कालभैरवांचे दोन रुप आपल्याकडे मुख्य समजले जातात.ते रुप म्हणजे बटुक भैरव जे भगवन कालभैरवांचे बाल्य रुप आहे व भगवान कालभैरव जे भगवान भैरवांचे उग्र स्वरुप आहे.भगवान कालभैरव हे तामसिक तंत्र देवता आहे तरी त्यांची उपासना ही सात्विक ,राजसिक व तामसिक मार्गाने केली जाते.खरंतर भगवान कालभैरवांचे विविध मंत्र ,बिज मंत्र ,कवच ,स्तोत्र हे आपल्या तंत्र ग्रंथात,पुराणात वाचायला मिळतात.पण या मंत्राचा जप वा उपासना ही सद्गुरु कडूनच घ्यावी लागते.त्या मंत्राचा जप आपण स्वतः करु नये.आता भगवान कालभैरव यांचे दोन स्तोत्र फार सोपे व प्रत्येकाला रोज म्हणता येतात.ते म्हणजे भगवान आदी शंकराचार्य यांनी रचलेले “कालभैरवाष्टक” आणि “बटुक भैरव अष्टोत्तरशत नामावली”. हे दोन्ही स्तोत्र भगवान भैरवांच्या उपासनेत आपण म्हणू शकतो.
भगवान कालभैरवांचे मुख्य स्थान हे काशीला आहे.काशीचे कोतवाल ज्यांना आपण म्हणतो तेच भगवान कालभैरवांचे मुख्य व प्रथम स्थान आहे.तसेच अवंतिकापुरी म्हणजे भगवान महाकालेश्वराची उज्जैनी येथील क्षेत्र रक्षक भगवान कालभैरव हे अत्यंत प्राचिन व ज्वलंत स्थान आहे.दिल्ली येथील किलकारी भैरव यांचे स्थान हे महाभारत कालीन आहे.पांडवांना मदत करण्यासाठी भगवान कालभैरव तिथे प्रगट होतात व किलकारी देऊन दानवांचा संहार करतात म्हणून त्यांना किलकारी भैरव म्हटले जाते.हे भगवान कालभैरवांचे मुख्य स्थान आहे.चौथे स्थान महाराष्ट्रातील अमरावती परतवाडा येथील बहिरम हे स्थान.बहिरम हा भैरव या शब्दाचा अपभ्रंश आहे.हे भगवान कालभैरवांचे जागृत स्थान आहे.आपल्या महाराष्ट्राचे आराध्य ,कुलदैवत असलेले भगवान खंडोबा हे मार्तंड भैरव आहेत.भैरव उपासना आसेतू हिमाचल आपल्या भारतात केली जाते.भगवान भैरवांची उपासना ही साधकाला निर्भय बनवते.साधकाचे ,भक्तांचे रक्षण करणारे भगवान कालभैरव हे अत्यंत कृपाळु ,कारुण्यसिंधू आहेत. आजची ही शब्द सेवा भगवान कालभैरवांच्या चरणी अर्पण करतो व त्यांनी आपल्या सर्वांवर अखंड कृपादृष्टी ठेवेवी ही प्रार्थना करतो.
🖋️✍🏻त्याचाच अक्षय जाधव आळंदी
No comments:
Post a Comment