![]() |
| श्रीमन् नारायण स्वामिन् । दयाब्धे तारकपद दायिन ।। |
श्रीमन् नारायण स्वामिन् । दयाब्धे तारकपद दायिन ।।🙏🌸
आज चैत्र वद्य अमावस्या भगवान श्रीदत्तात्रेय प्रभुंचे अत्यंत लाडके शिष्य ,भक्तोत्तम, दत्तप्रभुंची राजधानी असलेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे ज्यांना देवांच्या पुजेआधी अग्रपूजेचा मान प्रत्यक्ष दत्तप्रभुंनी दिला आहे ,ज्यांना प्रत्यक्ष भगवान श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराजांनी अनुग्रह देऊन कृतार्थ केले होते आणि जगद्गुरु श्रीतुकोबाराया नंतर जे एकमात्र आहेत ज्यांचे सदेह वैकुंठगमन झाले होते असे श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् सद्गुरु नारायण स्वामी महाराज यांची आज पुण्यतिथी अर्थात समाराधना दिवस.श्रीस्वामी महाराजांचा अधिकार इतका थोर होता की अत्यंत मधुर कंठाचे धनी असलेल्या स्वामी महाराजांनी भजन गायला सुरुवात केली की जगतजननी करवीर निवासिनी भगवती महालक्ष्मी अंबाबाई आणि भगवान श्रीदत्तात्रेय प्रभु हे सगुण रुपाने श्रीस्वामी महाराजांपुढे बसुन ऐकत असत.श्री स्वामी महाराज हे योगीराज श्री गुळवणी महाराज यांच्या कुलाचे सद्गुरु.अत्यंत विलक्षण आणि अफाट असे स्वामी महाराजांचे दिव्य चरित्र आहे.भगवंतांचा श्रीस्वामी महाराजांवर इतका लोभ होता की त्यांचा विरह देवांनाही सहन होत नव्हता म्हणून की काय तर आपल्या उत्सव मूर्तीच्या स्वरुपात दत्तप्रभु नित्य श्री स्वामी महाराजांच्या बरोबर त्यांच्या समाधी मंदिरात नृसिंहवाडी येथे वास करुन असतात.श्रीस्वामी महाराजांचे चरित्र अतिशय दिव्य आहे ,त्यातील प्रत्येक लिला ही एक स्वतंत्र चिंतनाचा व लेखाचा भाग होईल इतकी ती दिव्य आहे ,पण शब्द मर्यादेमुळे आपल्याला अगदी संक्षिप्त स्वरुपात श्री नारायण स्वामी महाराजांच्या चरित्राचे चिंतन व स्मरण करायचे आहे.या लेखाला आधार म्हणजे श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील पुजारीकुलोत्पन्न ब्रम्हर्षी प.पू.श्रीआत्मारामजी शास्त्री जेरे वाडीकर यांनी लिहीलेले संस्कृत व मराठी चरित्र हेच आहे. प्रत्येकाने आवर्जून वाचावे व त्यावर चिंतन करावे असे हे दिव्य चरित्र आहे.श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांची स्वामी श्री नारायण स्वामी महाराजांचे चरणी अत्यंत श्रद्धा प्रेम होते.श्री टेंबे स्वामी महाराजांनी श्री नारायण स्वामी महाराजांवर १२ संस्कृत श्लोकांचे संक्षिप्त चरित्र ही लिहीले आहे.
श्री.प.प श्रीमद् नारायण स्वामी महाराज यांचा जन्मकाळ आणि जन्मस्थान हे आज ज्ञात नाही.तरी श्री नारायण स्वामी महाराज यांची व मुरघोड निवासी भगवान श्री शिव चिदंबर महाप्रभु यांची भेट झाल्याचा व देवलपूर येथे श्री स्वामी महाराज व चिंदबर महाप्रभु यांचा एकत्र तिन महिने सहवास ,वेदान्त चर्चा झाल्याचा उल्लेख ,वर्णन चिंदबर महाप्रभुंच्या चरित्रात आले आहे. त्यामुळे हे दोघेही महापुरुष समकालीन होते हे निश्चित होते.यावरुन शके १६५० नंतरच्या काळात श्री नारायण स्वामी महाराज यांचा जन्म झाला असावा असा अंदाज धरता येतो. श्री स्वामी महाराजांचा जन्म हा विसापूर येथील जोशी कुळात झाला होता.त्यांचे वडिल देशस्थ ऋग्वेदी प्रसिद्ध याज्ञिक होते.एका सत्शिल दाम्पत्याचे स्वामी महाराज हे चतुर्थपुत्र होते.नारायणाच्या मौंजिबंधनानंतर वडिलांनी यांना वेद व शास्त्र शिकण्यासाठी वेदपाठशाळेत पाठविले.काही काळातच ते वेदशास्त्रसंपन्न विभूषित झाले.त्यांची योग्यता व किर्ती ऐकून त्याकाळातील रिवाजाप्रमाणे अनेक सद्गृहस्थ आपली कन्या त्यांना देण्यास उत्सुक होते. लवकरच त्यांचा विवाह झाला.पण ही नववधू लवकरच स्वर्गवासी झाली.त्यानंतर करवीर क्षेत्रातील "तारळे" गावातील राम दिक्षीत गुळवणी नावाच्या सद्गृहस्थांनी आपली उपवर कन्या नारायणास दिली.अर्थास नारायण शास्त्रींचा हा दुसरा विवाह.या पत्नीपासून त्यांना तिनं अपत्य झाली.त्यात विश्वंभर शास्त्री हे मोठे चिरंजीव व नंतरच्या दोन कन्या.अशाप्रकारे उत्तम गृहस्थाश्रम शास्त्रीबुवांचा सुरु होता.एकवेळी विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत एक विद्वत्सभा झाली.त्यात श्रीनारायण शास्त्री ही गेले होते.पण त्या सभेत त्यांना पराजयाला सामोरे जावे लागले.त्यामुळे त्यांचे मन अतिशय खट्टू झाले.त्यानंतर त्यांनी मनोमन काशीस जाऊन उत्तम प्रकारे शास्त्राध्ययन करण्याचे ठरवीले.घरी येऊन पत्नीला सांगुन काशीस आले.तेथील विश्वविख्यात गुरुंना ते शरणं गेले.अहोरात्र कष्ट करुन गुरुकडून उत्तम प्रकारे शास्त्रज्ञान संपादन करुन ते वेदशास्त्रसंपन्न झाले.पण सद्गुरुंना त्यांच्या मनातील हेतू माहित होता व जर यांनी वादविवादाचा मार्ग स्विकारला तर यांचा अध:पात होईल,माझ्या शिष्याची अधोगति होणे म्हणजे परंपरेने माझीच अधोगती आहे तरी याला खरा कल्याणाचा मार्ग दाखवावा असे गुरुंनी ठरविले.दुसर्या दिवशी गुरुंनी नारायणांकडे गुरुदक्षिणा मागीतली व गावी परत जाण्याची आज्ञा केली.पण ही गुरुदक्षिणा काही वेगळी होती.गुरुंनी आधी नारायणाच्या हातावर गंगोदक सोडले व तसा संकल्प सोडण्यास सांगितले.हे केल्यानंतर गुरुंनी नारायणांकडे पुढील गुरुदक्षिणा मागितली , "नारायणा आजपासून मरेपर्यंत कोणाशीही वाद करायचा नाही.ही आम्हास गुरुदक्षिणा पाहिजे आहे." नारायण शास्त्री ही तयारीचे शिष्य होते.त्यांनी क्षणाचाही विलंब न करता हे दान सद्गुरुंच्या दिले व साष्टांग नमस्कार घातला.पण यानंतर नारायण शास्त्री खिन्न झाले.आता आपल्याला गावी कुणालाही तोंड दाखवता येणार नाही याची चिंता वाटू लागली.पण कृपाळू गुरुंनी त्यांच्या मनातील हे भाव जाणले व त्यांना उपदेश करुन त्यांच्या मनातील या अज्ञानाचे हरण करुन ज्ञानाचा प्रकाश प्रगट केला.त्यामुळे त्यांच्या मनातील दुःख दूर होऊन त्यांना समाधान प्राप्त झाले. पुढे गुरुंनी त्यांना आशिर्वाद दिला व सांगितले, "नारायणा! तुझे भाग्य थोर आहे.एका वाक्यात तुझे अज्ञान दूर होऊन तुला बोध झाला.आता तू घरी जा.लवकरच कृष्णा पंचगंगा संगमतीर निवासी अनंतकोटी ब्रह्मांडनायक भक्तकामकल्पदृम श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तुझ्यावर कृपा करुन स्वतःच तुला चतुर्थाश्रम देतील व कृतकृत्य करतील.माझा पूर्ण आशिर्वाद तुला आहे." असे बोलून त्यांना गुरुंनी त्यांना दृढालिंगन दिले व घरी जाण्याची आज्ञा केली.घरी आल्यावर नारायण शास्त्री पुन्हा गृहस्थाश्रमात उदासिनपणे प्रपंच करु लागले.दोन कन्या झाल्यावर त्यांच्या पत्नी निवर्तल्या.यामुळे आता त्यांना चतुर्थाश्रमाची ओढ लागली.आपल्या थोरल्या चिरंजीवास पुण्यात त्यांनी शास्त्राध्यायन करण्यास ठेवले व दोन्ही कन्येस आपल्या आप्तांच्या घरी कोल्हापूरात ठेवून ते तात्पुरते निरुपाधीक झाले.चतुर्थाश्रमाची तयारी म्हणून कोल्हापूर जवळील दोन चार मैलांवर असलेल्या कात्यायनीच्या निर्जन रम्य डोंगरात देवी मंदिराजवळ एक झोपडी बांधून ते तेथे भजन करत राहिले.इथेच ते भजनानंदात मग्न होऊन एकांतात राहू लागले.
याच काळात एक अतिशय दिव्य व अलौकिक घटना घडली.(प्रसंग अतिशय मोठा आहे त्यामुळे तो इथे मांडत नाही.पण श्री नारायण स्वामींची अत्यंत निष्काम निर्हेतूक भक्ती व आदिशक्ती करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईंची अकारण कृपा करुणेचा अफाट आविष्कार या घटनेतून होतो.अतिशय भक्तिरसपूर्ण असा हा दिव्य प्रसंग आहे.आपण पुढे तो वेगळ्या लेखातून बघूयात) त्यावेळी आई जगदंबा नारायणी अंबाबाई स्वामींपुढे प्रगटली स्वतः त्यांना आशिर्वाद दिला.तो आशिर्वाद म्हणजे , "शास्त्रीबुवा,लवकरच श्रीमन्नृसिंह दत्तगुरु तुमच्यावर अनुग्रह करुन तुम्हाला कृतार्थ करतील त्याविषयी मनांत चिंता बाळगू नये.महाराजांनी अनुग्रह केल्यानंतर चतुर्थाश्रम स्विकारुन काही दिवस येथे राहून तुमचे अत्यंत मधूर भजन मला ऐकवावे." असा आशिर्वाद देऊन आईसाहेब अंतर्धान पावल्या व शास्त्रीबुवा आपल्या नित्यक्रमात मग्न झाले.पुढे काही काळाने दत्तप्रभुंनी श्रीनारायण स्वामी महाराजांना अंत:प्रेरणा दिलं व श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे बोलविले.स्वामी महाराज वाडीला व्रतस्थ पद्धतीने साधकांचे कठोर जिवन जगु लागले.एका रात्री आपल्या दोन्ही कन्यांनाही इथेच वाडीत राहावयास बोलावून घ्यावे असा स्पष्ट देवांचा आदेश श्री नारायण स्वामी महाराज यांना झाला. लागलीच श्री स्वामी महाराज दोन्ही मुलींना घेऊन वाडीत आले.हल्ली जिथे नारायण स्वामींचे मंदीर आहे त्याच जागी श्रीस्वामी महाराज एक छप्परवजा घर बांधून मुलींसह श्रीसेवा करत राहू लागले.याकाळात श्रीस्वामी महाराजांची दिनचर्या अतिशय कडक व शिस्तबद्ध होती.याप्रमाणे कालक्रमण सुरु असतांना दोन्ही मुलींना वारंवार शौच होण्याचा विकार झाला.पण यातुनच श्री भगवंतांनी आपल्या वात्सल्याचे प्रगटीकरण केले आहे.तो प्रसंग असा की, एकदा त्यांनी रात्री मुलींना जेऊ घालून झोपवले व स्वत: समाधी लावून बसले. नेमके त्या मुलींना शौचास लागल्याने जाग आली. त्यांनी बाबांना हाक मारली, पण ते तर समाधीत होते. त्यांना ऐकू जाण्याचा प्रश्नच नव्हता. पण भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज चटकन श्री. नारायणशास्त्रींचे रूप घेऊन आले व त्या दोघींना परसाकडेला घेऊन गेले. त्यांची स्वहस्ते शुद्धी केली व पुन्हा आणून झोपवले. सकाळी हा प्रसंग श्री.नारायणशास्त्रींना कळला. प्रत्यक्ष देवांना आपल्यासाठी असे हीन कृत्य करावे लागले, याचे त्यांना अतीव वाईट वाटले. त्यांनी लवकरच आपल्या मुलींना योग्य वर शोधून त्यांची लग्ने लावून दिली व सद्गुरुसेवेसाठी मोकळे झाले.पुढे लवकरच विश्वंभरशास्त्री नावाच्या आपल्या मुलाचा विवाह करुन शास्त्रीबुवा सांसारिक सर्व उपाधीतून कायमचे मुक्त होऊन संन्यासाश्रम स्विकारण्यास परमयोग्य झाले.
आता शास्त्रीबुवांना श्रीगुरु महाराजांच्या कृपाअनुग्रहासाठी आत्यांतिक तळमळ सुरु झाली.एक दिवस शेजारती नंतर श्रीनारायण शास्त्री गुरुपादुकांजवळ आले त्यांनी अत्यंत दिनभावाने साष्टांग प्रणिपात केला व अत्यंत नम्रभावाने आपणास संन्यासाश्रम देण्याची कृपा श्रींनी करावी अशी कळकळीची प्रार्थना केली व ते आपल्या झोपडीत परतले.त्याच रात्री शास्त्रीबुवांच्या स्वप्नात श्रीगुरु महाराज आले व त्यांना आश्वासन देऊन "काही चिंता करु नको योग्य मुहूर्त पाहून मी तुला संन्यास दिक्षा देईन" असे म्हणून तात्काळ गुप्त झाले.त्यानंतर लगेच शास्त्रीबुवांना जाग आली व आता आपल्याला प्रत्यक्ष देशांकडून संन्यास दिक्षा मिळणार या विचाराने धन्य झाले.काहीदिवसांनी त्यांना पुन्हा श्रीगुरु महाराजांचा दृष्टांत झाला व संन्यासदिक्षेचा मुहूर्त जवळ आला आहे तेव्हा प्रपंचाची निरवानिरव करावी पण कुणालाही कळू न देता ही व्यवस्था करावी असा स्पष्ट आदेश झाला.शास्त्रीबुवांनी देवांची आज्ञा तंतोतंत पाळली .पुढे एक दिवस शास्त्रीबुवा पहाटेच्या वेळी कृष्णा-पंचगंगा संगमावर स्नानाकरीता गेले व बुडी मारणार इतक्यात त्यांचा पाय घसरला.आपल्याला कुणीतरी आत ओढतोय अशी त्यांना जाणिव झाली.काही वेळाने आत मोठा झगमगीत प्रकाश दिसला.त्यात सुंदर मंदिर होते,वेदपाठी पुष्कळ ब्राह्मण बसलेले होते,त्यांच्याजवळच रत्नजडीत सिंहासनावर दण्डकमण्डलु व रम्यकाषायांबरधारी परमतेजस्वी सद्गुरु श्रीगुरु महाराज वेदश्रवण करतांना दिसले.काही वेळानी श्रींनी शास्त्रीबुवाना स्वतः प्रैषोच्चारपूर्वक महावाक्योपदेश व दंड,कमंडलू ,काषायवस्त्रादि सर्व देऊन नारायण सरस्वती असे नाव प्रसिद्ध केले.काही काळ आपल्या जवळ ठेवून यति धर्माचा उपदेश केला व नंतर ज्या जागेवर ते बुडाले त्याच ठिकाणी आणून सोडले.नारायण स्वामी महाराज संन्यासी स्वरुपात दण्डकमण्डलु काषय वस्त्रात गुरुपादुकांच्या मंडपात आले व त्यांनी श्रीपादुकांना परमप्रेमाने दंडवंदन केले.त्यांना संन्यास वेषात पाहून सर्वजन थक्क झाले.मठाधिपतीच्या सांगण्यावरुन त्यांना आपण संन्यास कुठे घेतला,केव्हा घेतला आपले गुरु कोण हे सर्व विचारु लागले पण देवांची आज्ञा नसल्या कारणाने त्यांनी कुणालाही काही सांगितले नाही.त्यामुळे मठाधिपतीच्या सांगण्यावरुन सर्वांनी श्रीनारायण स्वामी महाराजांवर बहिष्कार घातला.पण त्यामुळे एक अतिशय वाईट गोष्ट घडली ती अशी की नारायण स्वामी महाराजांना श्रीगुरु पादुकांना पाणी घालण्यावर आणि दत्तदर्शनावर बंदी घालण्यात आली.यामुळे श्रीस्वामींना अतिशय कष्ट होऊ लागले.त्यांनी आपल्या कुटीचे दार बंद करुन एकांतात अखंड भजन सुरु केले.गम्मत अशी की भक्तवत्सल भगवान श्री नृसिंह सरस्वती दत्त प्रभु सिंहाचे रुप घेऊन त्यांच्या पुढे बसून भजन ऐकून लागले.एकान्तात बसुन हे काय करतात हे बघायला मठाधिपती आले आणि पाहतात तर काय याच्या पुढ्यात सिंह बसुन भजन ऐकतो आहे.ही अघटीत लिला बघून मठाधिपती श्री नारायण स्वामी महाराजांना शरणं आले व शिष्य झाले.त्यानंतर प्रत्येक पुजारी वर्गाच्या स्वप्नात प्रत्यक्ष गुरु महाराज गेले व मी त्यांना स्वतः संन्यास आश्रमाची दिक्षा दिली आहे त्यांना बिलकुल त्रास देऊ नये व झालेल्या अपराधी ची क्षमा मागुन त्यांच्याकरीता मठभिक्षेचा समारंभ करा अशी आज्ञा केली.त्यानंतर सर्व लोक श्रीस्वामी महाराजांना शरणं आले ,सर्वांना मोठा मठभिक्षेचा समारंभ केला.त्यानंतर स्वामी महाराज आज जेथे नारायण स्वामींचा मठ आहे तिथेच राहू लागले.
श्रीगुरुंनी नारायण स्वामी महाराजांना तिर्थयात्रेस जाण्याची आज्ञा केली.श्रीगुरुंची आज्ञा शिरसावंद्य मानून श्रीस्वामी महाराज यात्रेस निघाले.या यात्रेत कर्नाटक मुक्कामात देवलपुरांत प्रत्यक्ष शिवावतार महास्वामी श्री चिदंबर दिक्षीत स्वामी महाराज यांचा मुक्काम आहे असे समजताच त्यांच्या भेटीस्तव श्रीस्वामी महाराज देवलपुरास गेले.( या भेटीत श्रीस्वामी महाराज व शिवचिदंबर महप्रभुंनी अतिशय दिव्य लिला केल्या.हा प्रसंग शिव चिदंबर महाप्रभुंच्या चरित्रात अतिशय विस्तृत आला आहे.पुढे आपण त्यावर स्वतंत्र लेखाद्वारे चिंतन करण्याचा प्रयत्न करुयात.शब्द मर्यादेस्तव हा प्रसंग थोडक्यात मांडतो.)चिदंबरमहाप्रभुंच्या प्रेमामुळे नारायण स्वामी तीन महिने त्यांच्या सानिध्यात देवलपुरात राहिले. वाडीला परतल्यावर त्यांचा नित्यक्रम सुरु झाला.पण करवीरनिवासीनी आई भगवती अंबाबाईला संन्यास दिक्षेनंतर भजन ऐकविण्याच्या वचनाची त्यांना आठवण झाली.त्या वचन पालनासाठी कोल्हापूरी जाण्याचा ते विचार करु लागले.त्यांनी देवांची आज्ञा मागितली.देवांनी ही परत लवकर या ,असे सांगुन त्यांना प्रेमाने आज्ञा दिली.तात्काल स्वामी महाराज कोल्हापूरास आले.श्रीजगदंबेला दंडवंदन करुन देवालयाच्या आवारातच असलेल्या मठांत मुक्काम केला.श्रीजगदंबेला व दत्तप्रभुंना भजन श्रवणार्थ बसण्यासाठी मठात दोन कट्टे तयार करविले.रोज शेजारती झाल्यावर ते एकान्तात श्री जगदंबा व दत्तप्रभुंचे आव्हान करायचे व ते आसनारुढ झाल्यावर आपल्या प्रेमळ अशा भजनास आरंभ करायचे.काय ती स्वामींची योग्यता ,काय तो अवर्णनीय अधिकार की प्रत्यक्ष आदिशक्ती भगवती जगतजननी करवीर निवासिनी अंबाबाई आणि भगवान श्रीदत्तात्रेय प्रभु त्यांचे भजन स्वत: समोर बसून ऐकत असत. याच कोल्हापूर मुक्कामात श्री नारायण स्वामी महाराज "कौलव" या गावी आले होते.या कौलव गावी योगीराज श्री गुळवणी महाराज यांचे पंजोबा श्रीनागेश भटजी गुळवणी यांच्या घरी स्वामी महाराज आले.त्यांच्या कृपेने नागेश भटजींच्या घरात मुलगा झाला.नागेश भटजींनी स्वामी कृपा म्हणून त्या मुलाचे नाव नारायण हेच ठेवले.पुढे याच नारायणास चार मुले व तीन मुली झाल्या.यातील जेष्ठ अपत्य दतंभट्ट हे योगीराज श्री गुळवणी महाराज यांचे पिताश्री.याच वेळी श्री स्वामी महाराज दुर्गमान गडावर आई जगदंबेची आज्ञा म्हणून गेले.त्यांच्याबरोबर नागेशशास्त्री व इतर शिष्य मंडळीही होते.त्यावेळी जंगलातील एका वाघाच्या पायाला झालेली जखम श्रीस्वामी महाराजांनी स्वतः सुई व वनौषधीच्या साह्याने बरी केली.( अतिशय चमत्कारीक व दिव्य असा हा वाघाचा प्रसंग आहे पण येथे तो लिहीण्याचे टाळले आहे.त्यावर एक स्वतंत्र लेख तयार होईल.) कोल्हापूरास परतल्यावर महाराजांचा भजनाचा नित्यक्रम पुन्हा सुरु झाला.करवीर संस्थानाचे छत्रपती श्रीबाबासाहेब महाराज हे श्री नारायण स्वामींचे अनन्य भक्त बनले.श्री स्वामी महाराजांचीही पूर्ण कृपा त्यांच्यावर होती.एकदा भजन संपल्यावर आई जगदंबेनी व दत्तप्रभुंनी त्यांना आज्ञा केली की पन्हाळागडावरील एका दिव्य गुहेत शक्तिपुत्र व वसिष्ठ महर्षींचे नातू पराशर मुनी एकान्तवास करुन राहिले आहेत.त्यांचे आपण दर्शन करुन परत या.अशी आज्ञा होतास दुसर्या दिवशी शिष्यांना घेऊन स्वामी महाराज पन्हाळा गडाकडे जाण्यास निघाले पण हे महर्षी पराशर महामुनींना अंतर्ज्ञानाने कळाले.नारायण स्वामींना यायचा त्रास होऊ नये म्हणुन त्यांनी योगबलाने पांढर्या शुभ्र सुंदर बैलाचे रुप घेतले व अर्ध्या रस्त्यातच स्वामी महाराजांना भेटण्यास आले.श्रीस्वामी महाराजांनी तात्काळ त्यांना ओळखले.त्यांची तिथेच भेट झाली व स्वामी महाराज कोल्हापूरी परतले.यानंतर राजापुरची गुप्त झालेली गंगा स्वामी महाराज आले म्हणून परत प्रगटली.तसेच अनेकाविध चमत्कार झाले हे सर्व एका संक्षिप्त लेखात लिहीने अशक्यप्राय आहे त्यामुळे ते संपूर्ण गाळले आहेत.एका अतिशय सुंदर आणि भक्तिरसाने परिपूर्ण प्रसंग स्वामी चरित्रात आहे तो मुद्दाम येथे देतो आहे. एकदा एक गलित्कुष्ठ झालेला ब्राह्मण श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे व्याधी मुक्ती साठी देवांच्या सेवेकरीता येऊन राहिला होता.पुष्कळ दिवस श्रीचरणांची सेवा केल्यामुळे एक रात्री श्रीगुरु महाराजा त्याच्या स्वप्नात आले व त्याला म्हणाले , "अरे विप्रा ,श्री नारायण स्वामी महाराज रोज कृष्णा पंचगंगा संगमावर स्नानास जातात.ते तेथे स्नान करुन लागले की त्यांच्या पाठीमागच्या बाजूस तु स्नान कर.त्या तिर्थामुळे तुझी संपूर्ण रोग दूर होईल व तु व्याधीमुक्त होशील." स्वप्न दृष्टांतानुसार ब्राह्माणाने तसेच करण्यासाठी सकाळीच श्रीस्वामी महाराजांच्या मागे जाण्याचा मानस केला.श्रीस्वामी महाराज नदीत उतरणार तो हा मनुष्य संगमावर नदीत त्यांना उभा दिसला त्यांनी त्याची विचारपूस केली तेव्हा त्यांना त्या ब्राह्मणाला झालेला देवांचा दृष्टांत कळला.श्रीनारायण स्वामी महाराजांनी त्याला एका विशिष्ट जागेवर स्नान करुन नेसलेले वस्त्र नदीत फेकून देण्यास सांगितले व नुतन वस्त्र परिधान करण्याची आज्ञा केली.तसे करता क्षणी त्याची व्याधी नाहीशी झाली.हा चमक्तार झाल्याबरोबर श्री स्वामी महाराजांनी त्याला आज्ञा केली की सुर्योदय होण्याचे पूर्वी तू वाडीतून एक अक्षरही कोणाशी न बोलति बाहेर निघून जा नाहीतर पुनः तुझे शरीर पूर्ववत होईल.स्वामींची आज्ञा ऐकल्यावर तो तात्काळ वाडीबाहेर गेला.पण तो गेला असे पाहून स्वामी महाराज स्नान न करताच दण्डास परशुमुद्रा बांधून 'येथून आता बाहेर जावे' असे मनात आणून श्रीगुरु महाराजांना निरोप देण्याकरिता मंडपात आले व वंदन करु लागले.मंदिरद्वार बंदच होते.परंतु स्वामींचे वंदन जाणून सर्वज्ञ प्रभू म्हणाले , "अहो स्वामी? दण्डास परशुमुद्रा बांधून ,हे वंदन कशाला? कोठे परगावी प्रमाणाची तयारी दिसते?" त्यावर स्वामी महाराज म्हणाले "मी येथे राहू नये अशी श्रीचरणांची इच्छा दिसते.म्हणून आता कुठेतरी देशोधडीला लागावे असे वाटत आहे.आता हे शेवटचे वंदन करण्या साठी आलो आहे." श्रीगुरु म्हणाले, "तुम्हास झाले तरी काय? इतका उद्वेग कशामुळे झाला?" स्वामी महाराज म्हणाले, "मला काही सांगायचे ही नाही व वादही घालायचा नाही.काशीत गंगोदक घेऊन तशी प्रतिज्ञाच केली आहे." असे बोलून जाण्याच्या निश्चयाने नारायण स्वामींनी देवांना वंदन करण्यास आरंभ केला. हे रागावले असे जाणून दयाघन भक्तवत्सल प्रभु श्रीनृसिंह सरस्वती महाराज दार उघडून प्रत्यक्ष बाहेर आले व आपल्या हाताने स्वामींचा दंड आपल्याजवळ घेऊन आई रागावलेल्या मुलाची समजूत घालते त्याप्रमाणे ब्रह्मांडनायक दत्तप्रभु श्रीगुरु माउलींनी नारायण स्वामींना आलिंगन देऊन त्यांची समजूत केली व म्हणाले ,"आम्ही उगीच हे तुमच्याशी कौतुक केले.त्याबद्दल इतके रागवण्याचे काही कारण नाही.तुमच्यासारखे प्रेमळ भक्त येथून गेल्यावर आम्हास चैन कसे पडेल? तुमची इच्छा नसेल तर आता इत:पर काही तुम्हास अशी पीडा होणार नाही.आता वेळ झाली.तरी तुम्ही स्नानास जा." अशी आज्ञा करुन महाराज अन्तर्धान झाले.धन्य ते परमशिष्य श्री नारायण स्वामी महाराज व धन्य ते भक्तवत्सल भक्तभिमानी भक्तकामकल्पदृम श्रीगुरु श्रीपाद नरहरी दत्त प्रभु.
अशा या श्रेष्टोत्तम ,शिष्योत्तम,भक्तोत्तम श्रीमद् नारायण स्वामी महाराज अनेकाविध लिला केल्य व आता अवतार कार्य पूर्ण करुन ब्रह्मलोकांत गमन करावे असा मानस केला.चैत्र अमावस्या शके १७२७ म्हणजेच इसवी सन १८०५ , श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री नारायण स्वामींना नेण्यासाठी किंकिणीचा आवाज करीत पुष्पक विमान आले. तो आवाज कृष्णा प्रवाहात स्नान करीत असणाऱ्या गोपाळ स्वामींनी ऐकला आणि ते तसेच स्नान सोडून धावतच नारायणस्वामींच्या मठात आले; आणि त्यांनी श्रीचरणी मस्तक ठेवून वंदन केले.
त्यावर नारायणस्वामी त्यांना म्हणाले की, "आमचे लौकिक कार्य झाले, आता आम्ही येतो" असे म्हणून नारायणस्वामी त्यांना घ्यायला आलेल्या विमानात बसून डोळ्यादेखत निघून गेल्याचे गोपाळस्वामिनी प्रत्यक्ष पाहिले आहे.दिव्यदर्शने दिव्यदृष्टीशिवाय घडु शकत नसतात म्हणून हे 'दिव्य' दर्शन गोपाळस्वामी शिवाय अन्य कोणालाही घडले नाही.
आजच्या या परमपावन तिथीला श्री स्वामी महाराजांच्या चरित्राचे स्मरण करुन श्रीचरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो व श्रीदत्तचरणांची सेवा अखंड घडावी हेच एक मागणं स्वामी महाराजांच्या चरणी मागतो.
✒️✍️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️






