Thursday, May 26, 2022

अक्कलकोट स्वामी महाराजांच्या प्रभावळीतील दिव्य रत्न असलेले सद्गुरु श्री बाळकृष्ण महाराज सुरतकर🌺🌸🙏🌿

 

🌺 सद्गुरु श्री बाळकृष्ण महाराज सुरतकर 🌺

श्री बाळकृष्ण महाराज सुरतकर यांची १०४ वी पुण्यतिथी ||
                 परब्रम्ह भगवान श्रीअक्कलकोट निवासी  स्वामी समर्थ महाराजांच्या प्रभावळीतील अद्वितीय असे रत्न म्हणजे श्रीबाळकृष्ण महाराज सुरतकर .वैशाख कृ.एकादशी म्हणजे श्रीबाळकृष्ण महाराज यांची पुण्यतिथी चा पावन दिन.श्रीबाळकृष्ण महाराज हे आपल्या सर्वांना अतिप्रिय व सर्वश्रुत असलेल्या दादर येथील स्वामी मठाचे संस्थापक. या पुण्यतिथी निमीत्ताने महाराजांच्या संक्षिप्त चरित्राचे अवलोकन व प्रचंड अशा स्वामी कार्याचे ओझरते दर्शन घेऊयात व महाराजांच्या दिव्य लिलांचे स्मरण करुयात.

श्री बाळकृष्ण महाराज यांचा जन्म सुरत येथे २८ ऑक्टोबर १८६६ साली झाला. लहानपणीपासूनच महाराजांना देवभक्तीची व नामस्मरणाची आवड होती.अंतर्मुख असलेल्या महाराजांचे बालपण शिक्षण गावातच झाले. पुढील शिक्षणासाठी बाळकृष्ण महाराज हे आपले चुलते शिवशंकर यांच्याकडे मुंबईला शिक्षणासाठी आले. मुंबईस आल्यावर त्यांच्यावर आर्यसमाजाच्या शिकवणीचा पगडा बसला. त्यांचे चुलते शिवशंकर कट्टर शिवभक्त असल्यामुळे त्यांना या गोष्टीचे अतिशय दुःख झाले. त्यांचे शेजारी श्री रामचंन्द्र व्यंकटेश बरडकर उर्फ सारस्वत ब्राम्हण भेंडे हे राहत असत.ही कुणी सामान्य व्यक्ती नव्हे तर हे प्रत्यक्ष अक्कलकोट स्वामी महाराजांचे शिष्योत्तम सद्गुरु श्रीतात महाराज होते. "तात महाराज" हे श्री स्वामी समर्थांचे निःसीम भक्त होते.तात महाराज हे संत एकनाथ महाराजांप्रमाणे गृहस्थाश्रमी होते.ते सरकारी मुद्रणालयात नोकरीस होते.त्यांनी अखेर पर्यंत म्हणजे पेंशन मिळेपर्यंत नोकरी केली होती.ते अतिशय गुप्त असे संत होते.तात महाराजांनी स्वामी भक्ती ,स्वामी संप्रदायाचा प्रचाराचे खुप मोठे कार्य या भागात केले होते.बाळकृष्ण महाराजांच्या काकांनी आर्यसमाजी विचारांच्या आपल्या या निस्तिक झालेल्या पुतण्यात सुधारणा करण्याची विनंती "तात महाराजांना"  केली.तात महाराजांनी बाळकृष्ण महाराजांवर कृपा करण्याची व त्यांचे मत धर्माकडे वळविण्यासाठी एक विलक्षण लिला केली.ते बाळ कृष्णांना घेऊन भुलेश्वर येथील अष्टभुजा देवीच्या मंदिरात गेले.तेथील देवळात यात महाराजांनी बाळकृष्णांना प्रत्येक्ष देवीच्या हास्यमुखाचे दर्शन घडविले.या सगुण साक्षात्काराने बाळकृष्ण महाराजांच्या मनात यात महाराजांबद्दल विलक्षण आकर्षण ,आदर व प्रेम निर्माण झाले.त्यांच्या वृत्तीत विलक्षण असा अमुलाग्र बदल घडला.या प्रसंगाचा बाळकृष्णांवर इतका विलक्षण परिणाम झाला की त्यांनी तात महाराजांना आपल्यावर कृपा अनुग्रह करण्याची विनंती केली.तात महाराज आपला निजशिष्य ओळखून होतेच.त्यांनी तात्काळ बाळकृष्ण महाराजांवर आपल्या कृपा अनुग्रहाची वृष्टी केली.त्यांना सनाथ केले.या प्रसंगानंतर श्री बाळकृष्ण महाराज हे भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचे निस्सीम भक्त बनले.पुढे तात महाराजांची सेवा,त्यांचे सानिध्य आणि त्यातून मिळालेला अनुभव हेच बाळकृष्ण महाराजांच्या जिवनाचे ध्येय झाले.तात महाराजांनी बाळकृष्ण महाराजांना पडलेल्या प्रत्येक शंकांचे समाधान हे प्रत्यक्ष अनुभूती देऊन दिले.पुढे तात महाराजांनी बाळकृष्ण महाराजांकडून कठोर साधना ,अभ्यास,वाचन करुन घेतले व त्यांना आत्मसाक्षात्कार घडविला ,त्यांना समाधी अवस्थेला पोचवले.बाळकृष्ण महाराजांची भावस्थिती या काळात रामकृष्ण परमहंसांप्रमाणे इतकी विलक्षण झाली होती की तिन तिनं दिवस ते देवघरात ध्यान धारणा करित मग्न झालेले दिसून येत.महाराज सदैव आत्मानंदात गढून जात.
                                 श्रीमहाराजांना उत्तम असे संस्कृत व  इंग्रजी चे ज्ञान होते.ते गोकूळदास पाठशाळेत संस्कृत या विषयाचे शिक्षक होते तसेच ते विद्यार्थ्यांची शिकवणी घेत असत.या कारणाने सर्वांना ते "मास्तर" या नावानेच श्रृत होते. महाराजांचा मुक्काम त्यावेळी मुंबई येथील काळबादेवी येथील हनुमानगल्ली या ठिकाणी असे. जांभुळवाडीत श्रीमहाराजांच्या घरा शेजारी धोत्रे नावाचे एक कुटुंब राहायचे.धोत्रे कुटुंबाचे बाळकृष्ण महाराजांशी अतिशय प्रेमाचे ऋणानुबंध होते.त्या कुटुंबात शंकर धोत्रे या व्यक्तीला पिशाच्च बाधेचा प्रचंड त्रास होत असे.तो बाळकृष्ण महाराजांच्या समोर येण्यास घाबरत असे.बाळकृष्ण महाराजांनी त्याला स्वामी समर्थांचे तिर्थ देऊन त्यांची ही बाधा पूर्ण नाहीसी केली.जेव्हा त्या कुटुंबातील पिशाच्चबाधा महाराजांनी दुर केली  तेव्हापासुन हे कुणी साधे 'मास्तर' नसुन एक दिव्य महात्मे आहेत याची ओळख सर्व लोकांना झाली. बाळकृष्ण महाराज सदैव देवपूजेत निमग्न झालेले असत.कुणीही त्यांच्याकडे गेले की ते देवघरात जप-जाप्य,पूजा-अर्चा,ध्यान धारणा करतांना दिसत असत.महाराजांची वर्णकांती स्फटीकासमान शुभ्र  होती.महाराजांचे डोळे अतिशय तेजस्वी व वात्सल्याने भरलेले होते.ते सदैव तलम असा जरी काठी पितांबर वापरीत.सर्वांगास भस्माचे पट्टे,गळ्यात रुद्राक्ष व स्फटिकाच्या माळा महाराजांना अतिशय शोभून दिसत असे.चेहेर्यावर शुभ्र दाढी व अंगाला पुजेच्या अत्तराचा सुवास अशी वात्सल्य मुर्ती बघितली की महाराजांच्या चरणी घट्ट मिठी मारावी असे वाटत असे.त्यांच्या चरणांवर  कुणी नमस्कार करण्यास आले तर महाराज ,"अरे माझ्या काय पाया पडतोस ? आजोबांच्या पड!" असे अतिशय मृदू आणि वात्सल्यपूर्ण आवाजात म्हणत असत.श्रीबाळकृष्ण महाराज तात महाराजांना वडिल व स्वामी माउलींना आजोबा असे संबोधत असत.भगवान श्री अक्कलकोट स्वामी माउलींचे नाम जरी ऐकले किंवा त्यांनी उच्चारले तरी ते देहस्थिती विसरुन बेभान होत व त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत असत.इतका अतिव प्रेम व शरणागत भाव त्यांचा स्वामी चरणी होता.त्यांच्या कडे आलेल्या व्यक्तिस ते म्हणत, "अरे आजोबांच्या चरणी आपले हृदय गहिवरु दे.या शुद्र देहासाठी कशाला वेडा होतोस.या शुद्र देहासाठी कशाला वेडा होतोस?"  महाराज अतिशय सुंदर असे प्रवचन करित.गुजराती असुनही महाराजांची मराठी इतकी सुस्पष्ट आणि ओघवती होती की कुणालाही त्या शब्दांची मोहिनी पडावी.हृदयाचा ठाव घेणारे महाराजांचे शब्द नास्तिकाच्याही मनात श्रद्धेचा पूर आणत.एकदा एक विलक्षण प्रसंग घडला.एक दिवस प्रवचनाला गुजराती स्त्री भक्तांचा मोठा समुह मठात आला.सर्व स्त्रीया महाराजांच्या भोवती गराडा करुन बसल्या.त्या सर्व महाराजांच्या शब्दाकडे लक्षपूर्वक ध्यान ठेवून महाराजांच्या मुखाकडे बघत होत्या.कै.त्रंबक धोत्रे हे तिथे हजर होते.खुप गर्दी असल्याने त्यांना बसावयास जागाच मिळाली नाही त्यामुळे त्यांना दारतच उभे राहून प्रवचन ऐकावे लागले.तेव्हा महाराजांच्या भोवती बसलेल्या स्त्रिया ज्या महाराजांकडे टक लावून बघत आहेत असे त्यांच्या लक्षात आले.महाराजांवरील अतिव प्रेमापोटी त्यांच्या मनात विचार आला की "एवढ्या सुंदर स्त्रियांच्या गराड्यात महाराज सापडले आहेत,जर मोहपाशात अडकल्याने महाराजांच्या अध्यात्मिक साधनेचे पतन झाले तर मग पुढे असे होईल? महाराज ही त्यांच्या तोडीस तोड देखने आहेत." हे सर्व विचार सुरु असतांनाच त्यांचे प्रवचनातून लक्ष भलतीकडेच प्रवाहीत झाले.पण नवल असे की , महाराजांनी एकदम प्रवचन थांबवून त्यांना 'त्र्यंबक' अशी हाक मारली.ते गर्दीतून वाट काढत महाराजांपर्यंत पोचले.महाराजांनी त्यांच्याकडे भेदक दृष्टीने बघितले व लडिवाळपणाने त्यांच्या डोक्यात चापट मारली .त्यांना विचारले ,"त्र्यंबक, तमे ध्यान उपर छे? स्त्री-पुरुष भेद आजोबाये मारापासेथी खेची लिधा.तू फिकर ना कर.प्रवचन उपर ध्यान राख." हे ऐकताच त्रंबक धोत्रेंना आश्चर्य वाटले व ते खजिल झाले.त्यांनी लागलीच महाराजांचे चरण धरले‌ व क्षमा मागितली.
                                       
                              लोकमान्य टिळक मंडालेहून सुटून आल्यावर त्यांचा गीतारहस्य हा ग्रंथ प्रकाशित झाला.गितेचा अर्थ टिळकांनी कर्मपर लावला म्हणून तत्कालीन कर्मठ सनातनी लोकांनी फार गदारोळ विरोध केला.सभा होऊन टिळकांच्या नावे खलिते गेले,तर काहींनी त्यावर बहिष्कार टाकावा अशी मागणी केली.तेव्हा टिळकांनी या ग्रंथाला संतांचा आशिर्वाद मिळावा म्हणून संताकडे जाण्याचे योजले.टिळकांचे स्नेही कै.दादासाहेब खापर्डे यांनी टिळकांना श्री बाळकृष्ण महाराजांकडे जाण्याचं सुचवले.टिळक व खापर्डे असे दोघेही महाराजांना भेटण्यासाठी गेले‌.महाराजांकडे गेल्यावर दादासाहेबांनी महाराजांना नमस्कार केला व गीतारहस्यांची एक प्रत त्यांच्या हाती देऊन आशीर्वाद मागितला.लोकमांन्यांनी महाराजांना शिष्टाचाराप्रमाणे लांबून नमस्कार केला.दिव्यदृष्टीने महाराज या ग्रंथाकडे दोन मिनिटे बघत राहिले.मग टिळकांना उद्देशून म्हणाले , "आम्ही उभयता हा ग्रंथ देवघरात ठेवतोच;परंतु प्रत्यक्ष आद्यशंकराचार्य यांनी मंडालेस ग्रंथाचे लिखाण चालू असतांना स्वप्नात दर्शन देऊन आशिर्वाद दिला असताना आपण या सनातन्यांचे विरोधास का घाबरता? आपला हा ग्रंथ अमर आहे." हे सर्व ऐकून लोकमान्य चकितच झाले.महाराजांना त्यांनी पुन्हा वंदन करुन सांगितले, "महाराज,आपण थोर अंतर्ज्ञानी.माझा स्वप्नस्थितीवर विश्वास नसल्याने मी हे स्वप्न कुणालाही सांगितले नाही,पण आपणास कसे कळले?" श्री अक्कलकोट स्वामी समर्थांकडे हात करुन महाराज म्हणाले, "बळवंतराव ,ही यांचीच कृपा." महाराजांकडे अष्टसिद्धी होत्या पण महाराजांनी आपल्या स्वतः करीता कधीही त्यांचा उपयोग केला नाही.जीवनात कितीही संकटे आली तरी ती प्रारब्धाचा भाग म्हणून भोगले.या सर्व प्रसंगी त्यांनी कधीही आपली भक्ती,समर्थ चरणां वरील अनन्य शरणागत भाव कमी होऊ दिली नाही.महाराजांनी एक अपत्य झाल्यावर आपला संसारही तात महाराजांसारखा समर्थ चरणी अर्पण केला.त्यांच्या सहधर्मचारिणी असलेल्या कमलामाताही तितक्याच तयारीच्या होत्या.आजोबा म्हणजे भगवान‌ अक्कलकोट स्वामी महाराज हे आपल्या उभयतांच्या जिवनाचे कर्णधार व हा संसारही त्यांच्या चरणी अर्पण करुन त्या मनाने अगदी नि:संग झाल्या होत्या.महाराजांच्या कठोर वैराग्यशील जीवनात ,अनेक टाकेचे घाव सोसत ही साध्वी महाराजांच्या बरोबर सावली प्रमाणे अखंड सोबत होत्या.कमलामाता व महाराजांचा एक विलक्षण प्रसंग आहे तो इथे देतोच त्यावरुन महाराजांचा अधिकार आपल्याला लक्षात येईल.
महाराजांचे आपल्या संसाराकडे लक्ष नसे पण कमला मातेने आपल्या एकुलत्या एक मुलासाठी मौल्यवान दागिने व काही पैसे मागे जमा ठेवले होते.कमलामातेने हे सर्व सुरत मुक्कामी सुरक्षित ठेवले होते.याच सुमारास बाळकृष्ण महाराजांना समर्थ दर्शन दुर्लभ झाले.त्यावर त्यांनी सखोल विचार केला.असे का घडते ? आपले कुठे काय चुकते? त्यामुळे त्यांना आपल्या पत्नीवर शंका आली.त्यांनी लागलीच ध्यानातून धनाची सर्व हकिकत जाणली.याच कारणामुळे समर्थ दर्शनास आपण मुकलो आहे हे महाराजांना लक्षात आले.त्यावेळी महाराज सुरत मुक्कामी होते.कमलामातेला महाराजांनी काही कारणाने बाहेर पाठवले.स्वत: इकडे तिजोरीची चाबी घेऊन तिजोरीतील सर्व पैसे ,सोने चांदी हस्तगत केले.ते घेऊन महाराज तापी नदीकाठी आले. "यासाठीच समर्थ मला दर्शन देत नाही का?" म्हणाले व जाऊन ते सर्व नदीत बुडवून टाकले.या देहाला समर्थ दर्शन घडतं नाही मग हा देह तरी का मागे ठेवावा असे म्हणून स्वतःही नदीत उडी घेतली.महाराज फार दूर बुडत बुडत गेले.सुरतेपासून फार दूर पोचल्यावर तिथे अचानक परमपूज्य सद्गुरू श्री तात महाराज प्रगटले ,त्यांनी बाळकृष्ण महाराजांना पाण्याबाहेर काढले व म्हणाले, "तू काही काळ शांत रहा.या देह प्रारब्धातून तू मुक्त आहेस.तुला कनक,कामिनी केव्हाही श्री स्वामी समर्थांपासून दूर सारणार नाही.तू तर त्यांचा महान प्रिय भक्त आहेस.श्री स्वामी समर्थ तुझ्या नित्य सन्निध आहेत.हाक मारशील तेव्हा ते तुझी षोडशोपचार पूजा सदेह स्विकारतील.आता निर्धास्त घरी जा." या दिलास्यानंतर महाराज निश्चिंत झाले. असे एक नाही तर अनेक शेकडो चमत्कारिक दिव्य प्रसंत बाळकृष्ण महाराजांच्या चरित्रात आले आहेत.
                                   महाराज पुढे मालाडात त्यांचे मित्र द्वारकादास, यांच्याकडे रहावयास गेले. महाराजांच्या दैवी सामर्थ्याचा प्रसार झाल्यामुळे पुष्कळ लोक त्यांचेकडे येऊ लागले. महाराजांना भजन फार आवडत असे व त्यांचेकडे येणा-यांना कटाक्षाने भजन करण्यास गुरुवारी व शनिवारी बोलावीत असत शनिवारी सबंध रात्र भजन होत असल्यामुळे द्वारकादासांच्या मंडळीस त्रास वाटू लागला. ही गोष्ट कै. विश्वनाथ मोरेश्वर कोठारे (माजी विश्वस्त) व त्यांच्यां मातोश्री पुतळाबाई यांना कळल्यावर त्यांनी महाराजांना मालाडला मामलेदार वाडीतील आपल्या घरात आणले. तेथेही पूर्वीप्रमाणेच गर्दी सुरु झाली. महाराजांकडे त्यावेळी कुलाब्यापासुन वसई, घाटकोपर, चेंबुर येथवरची मंडळी दर्शनास व भजनास येत असत इतक्या लांबुन शनिवारी रात्री ते ही त्याकाळात मालाडला भजनास येणे हे गैरसोयीची असल्याने महाराजांनी कोठेतरी मध्यवर्ती ठिकणी रहाणे सर्वांना सोईस्कर होईल असा विचार भक्तजनांत उत्पन्न झाला कै. भाऊसाहेब देशमुख त्यावेळी मुंबई कलेक्टरचे हेडक्लार्क असल्यामुळे दादरची पुढे होणारी वाढ त्यांना माहीत होती व महाराजांच्या सांगण्यावरून भक्त मंडळींनी दादरला जागा बघायला सुरुवात केली. त्यांना एक बंगला सापडला तो भुताटकीचा व तीन खुनी बंगला म्हणून ओळखला जात असे. मंडळींनी ही गोष्ट महाराजांस कळविली. महाराज म्हणाले,"काही हरकत नाही आपण तेथे समर्थांची स्थापना करुन सर्व भुतांना मुक्त्ती देऊ. आपण परत जावे व कुलुप उघडून आत अत्तराचा व उदबत्तीचा सुगंध येईल, तो असा आल्यास भाडे देऊन ताबडतोब बंगला ताब्यात घ्यावा." वरील मंडळींना कुलुप उघडल्यावर अत्तराचा व उदबत्तीचा सुगंध आला व त्यांनी महाराजांचे सांगण्यावरुन बंगला भाड्याने घेतला. वर भाड्याने घेतलेला बंगलाच आपल्या आजच्या मठाचे स्थान आहे. सन १९१० मध्ये मठ स्थापन झाला. हा बंगला खूपच जुना असल्याने कालांतराने  बंगल्याचे दुरुस्तीचे काम करण्यास सुरु केले. त्याकाळात मठ माटुंग्याला दुसऱ्या जागेत हलवणे भाग पडले. ऑगस्ट १९१३ मध्ये पुरे झाले व ३० ऑगस्ट रोजी मठ परत पहिल्या जागी आला. मधोमध मोठा हॉल. हॉल मधोमध कमान.दोन्ही बाजुस दोन मोठ्या खोल्या व पुढच्या बाजुस म्हणजे रस्त्यावरुन आत शिरण्याच्या बाजुला मोठा ओटा. दोन्ही बाजुस बसावयास दगडी ओटे व पुढे चढण्यास पाय-या येण्याच्या मार्गावर दुतर्फा फुलांच्या कुंड्या, तसेच गॅस बत्त्या पण लागल्या. मठात परत आल्यावर महाराजांनी सध्याचे सिंहासन सुरतहुन कारागिर आणून तयार करविले व सिंहासनाच्या बैठकीत स्वामी समर्थांचे अवशेष घालुन त्यावर संगमरवरी लादी बसवुन समर्थांच्या फोटोची स्थापना केली. महाराज पक्के सिंहासन करतात हे पाहुन यमूताईंनी विचारले "महाराज, हा भाड्याचा मुसलमानाचा बंगला, हे स्थान कायम कसे होणार ?" तेंव्हा महाराजांनी, "जो बसणार तोच कायम करणार" असे म्हणून 'कायम कायम कायम' असा त्रिवार उच्चार केला.

हे स्थान कायम ठेवण्याचा समर्थांच्या अघटीत लीलांचे वर्णन पुढे येईलच. बंगल्यात मठ आल्यावर दर्शनास व भजनास येणा-या भक्त्तांची गर्दी फारच होऊ लागली. गॅसबत्त्यांमुळे प्रकाशाचा झगझगाट होऊन रात्री रंम्य व शोभिवंत दिसू लागले. रिवाजानुसार लांबून येणा-या भक्तांसाठी गुरुवार-शनिवार आरती रात्री १० ला सुरु होऊन ११-३० ला संपे. त्यानंतर महाराज, हल्ली महाराजांचे छायाचित्र आहे तेथे आरामखुर्चीत बसत. अर्धा एक तास भक्तजनांचे महाराजांना हार घालणे चाले. हार इतके येत की, तीन-तीन वेळा काढून ठेवावे लागत. त्यानंतर महाराज गुजराथी असुनसु्द्धा मराठीत एकनाथी भागवतावर रात्री दोन वाजेपर्यत प्रवचन करीत. त्यावेळी त्यांचा कंठ दाटून येई. त्यांची शिकवण भक्तिमार्गाची असे.
'एकात अनेक पहावे व अनेकांत एक पहावा,’परि प्रीतीजे अंतरी आत्मभावे । तया प्रीतीला भक्त्ति असे म्हणावे’, ’दाताने जीभ चावली म्हणुन कोणी बत्तीशी तोडली’,असा उपदेश महाराज करीत. श्री स्वामी समर्थांना शरण जाऊन व त्यांची उपासना करुन ज्याने त्याने आपला हेतू साधावा, आपणाकडे काही नाही, असे सांगत असत. महाराजांचे प्रवचन चालू असता श्रोते मंत्रमूग्ध होत असत. मठाचा मुख्य वार शनिवार त्यादिवशी कोणीही येथील कींवा सुरतेचा मठ सोडून जावयाचे नाही. असा महाराजांचा दंडक आहे. तसे गाभा-यात कोणीही टोपी, पगडी किंवा रुमाल घालून जावयाचे नाही. ती काढूनच गाभा-यात जाऊन प्रदक्षिणा कराव्यात, असा त्यांचा आदेश आहे. समर्थंना तांबडी फुले, कण्हेर, जास्वंद, तगर घलू नयेत, असा त्यांचा दंडक असे व घातल्यास ताबडतोब कटाक्षाने सांगून काढून टाकत. तांबडा गुलाब चालत असे.माहीमकर मंडळी दुसरीकडून भजन आटपून येत. रात्री दोन वाजेपर्यंत व उजाडेपर्यंत भजन करत. महाराजांनी भजनास कधी पुरे म्हटले नाही. मंडळी दमल्यास त्यांनी जावे.
महाराजांना पूजा-पाठास आठ तास लागत. त्यामूळे दर्शनास गर्दी लोटल्यास किंवा भजन लांबल्यास काही वेळा महाराजांना तीन-तीन दिवस उपास घडत; कारण सेवा आटोपल्याशिवाय ते पाण्याचा थेंबसुद्धा घेत नसत. पूजा आटोपल्यावर महाराज दूध घेत किंवा फराळाचे खात. त्यांनी अन्न सोडले होते. फराळात शिंगाड्याच्या पिठाचे पदार्थ, व-याचे तांदूळ, शेंगदाणे, बदाम, फळे घेत असत. महाराजांस आंबा फार आवडे. ते स्वत: चहा पीत नसत, पण भक्तांस मठाचा प्रसाद म्हणून देशी साखरेचा चहा देत असत. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे या मठात स्प्रुश्य-अस्प्रुश्य, हिंन्दू-अहिंन्दू असा भेद नव्हता व आजही नाही. ज्याला त्याला आपापल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करावयास सांगत पार्शांना कस्ती, ख्रिश्चनांना प्रेअर, मुसलमानांना नमाज करता येत असे.

श्री सदगुरु बाळकृष्ण महाराजांच्या समाधीचा प्रसंग :

दादर मठाच्या स्थापनेनंतर सन १९११ मध्ये वडवली शेरी बेगमपुरा सुरत येथे सुद्धा महाराजांनी श्री स्वामी समर्थांचा मठ स्थापन केला. त्या मठात श्री स्वामी समर्थांचा पलंग श्री स्वामी समर्थांनी दृष्टांत दिल्याप्रमाणे महाराजांनी अक्कलकोटला जाऊन आणली, ती त्या मठातील गाभार्यात ठेवलेली आहे.
महाराज नेहमी श्री स्वामी समर्थांची पुण्यतीथीची पालखी मुंबईस काढून दुसरे दिवशी तशीच पालखी सुरतेस काढण्यास जात असत, त्याप्रमाणे ,महाराज १० मे १९१८ रोजी रात्रीच्या गाडीने सुरतेस गेले. त्यावेळेपासून महाराजांनी निर्याणास जाण्याच्या पुष्कळ पूर्वसूचना दिल्या, पण कोणालाच समजल्या नाहीत.

वैशाख वद्य दशमी शके १८४० संवत १९७४ तारीख ४ जून १९१८ मंगळवार रात्रौ ते पहाटे ५ वाजेपर्यंत सुरतेच्या मठात भजनाचा कार्यक्रम होत असताना महाराजांनी तो बंद करून सर्वाना घरी जाण्यास सांगितले.परंतु एक तासाने यावे लागेल असे म्हणाले. त्यांचा अर्थ त्यावेळी कोणालाही कळला नाही. सूर्योदय होण्याच्या थोड्या वेळापूर्वी महाराज मागील चौकात गेले. तेथे एक दोरी टांगलेली होती.तिला धरून महाराज नाचू लागले. 'खडावांचा खड खड खड खड ' असा आवाज ऐकून परमपूज्य आई खाली आल्या व महाराजांस म्हणाल्या, "दोरी जुनी आहे,ती तुटेल व तुम्ही पडाल." महाराजांनी उत्तर दिले, "दोरी तर केव्हाच तुटली आहे,ह्या घे किल्ल्या ! " असे म्हणून त्या प.पु.आईच्या अंगावर फेकल्या व म्हणाले, " सांभाळ." प.पु. आई म्हणाली," मला किल्ल्या का देता?" इतक्यात सूर्योदय झाला. सूर्यास नमस्कार करून बाजूला असलेल्या आरामखुर्चीवर बसून छातीवर हाता ठेवून त्रिवार "ओ तात, ओ तात, ओ तात" असे स्मरण करून महाराजांनी मान टाकली. याप्रमाणे वैशाख वद्य एकादशी शके १८४० संवत १९७४ बुधवार, तारीख ५ जून १९१८ रोजी सूर्योदयी निर्याणास गेले.
भजन चालू असताना ते बंद करा असे महाराजांनी केव्हाच सांगितले नव्हते; परंतु त्या दिवशी मात्र ते पाच वाजता बंद करा असे सांगितले व परत एक तासाने यावे लागेल असे म्हणाले व दोरी केव्हाच तुटली या शब्दावरून बोध असा होतो की या महान संताने काळास सूर्योदयाची वेळ होईपर्यंत एक तास थांबवून देह ठेविला. बाळकृष्ण महाराजांची समाधी हि सुरत येथील स्वामींच्या मठाजवळच आहे. अशा भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ माउलींच्या दिव्य भक्ताला,एका थोर संतांना माझा कोटी कोटी शिरसाष्टांग दंडवत प्रणाम.  महाराजांच्या सुकोमल चरणी प्रार्थना करतो की त्यांनी ही आम्हा सर्वांना स्वामीरायांच्या नामस्मरणात ,सेेवेत जिवनाचे सोने करण्याची बुद्धी द्यावी. 
   ✒️✍️ अक्षय जाधव आळंदी/वाशिम✍️✒️


Tuesday, May 24, 2022

मुक्तपणें मुक्त श्रेष्ठपणें श्रेष्ठ । सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती ।। भगवती आदिशक्ती मुक्ताबाई माउलींचा आज ७२३ वा पुण्यतिथी सोहळा🌸🙏🌺

 


मुक्तपणें मुक्त श्रेष्ठपणें श्रेष्ठ । सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती ।।

                            वैशाख वद्य दशमी ब्रह्मचित्कला माय मुक्ताईंचा ७२३ वा पुण्यतिथी दिन.आजच्याच तिथीली जगत्रय जननी ब्रह्मचित्कला आदिशक्ती माय मुक्ताबाई तापीच्या परमपावन तिरावर गुप्त झाली.खरंतर आदिशक्ती माय मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर माउली ,निवृत्तीनाथ ,सोपानकाका या सर्वांचे वेगळे असे चरित्र नाहीच.चारही भावंडांचे चरित्र हे एकमेकांशी संलग्न आहेतच.यात शंका असण्याचे कारणही नाही.तरीही प्रत्यक्ष मुळ महामाया असलेल्या आदिशक्ती मुक्ताईंचा विलक्षण अधिकार आणि त्यांचे निरंजनी गुप्त होणे म्हणजे या सर्व चरित्रातील एक विलक्षण बाब आहे. 

निळोबाराय आदिशक्ती मुक्ताईचे वर्णन करतांना म्हणतात


"मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी । आद्यत्रय जननी देवाचिये ।।"

     

 "आद्यत्रय जननी" म्हणजे त्रिदेवांना जिने जन्मास घातले आहे अशी भगवती.देवी भागवतात या त्रिदेवांना जन्माला घातलेल्या आदिशक्तीचे विस्तृत वर्णन आहे.श्रीमद भागवतात योगमायेचे वर्णन केले आहे ,तिला भागवतात दुर्गा,भद्रकाली,विजया,वैष्णवी,कुमुदा,चंडिका,कृष्णा,माधवी,कन्यका,माया,नारायणी,इशानी,शारदा व अंबिका असे १४ नावे आहेत.त्याच योगमायेचा पूर्ण अवतार म्हणजे भगवती मुक्ताबाई आहेत .प्रत्यक्ष महाविष्णू असलेल्या भगवान श्रीज्ञानोबारायांना ज्यांनी ताटीच्या अभंगातून उपदेश केला त्या आदिशक्ती मुक्ताबाईच्या अधिकाराचे वर्णन आपण किटक कुठे करणार.तिथे तर वेद ही मौन धारण करतात. विसोबा चाट्या दहा वर्षांच्या मुक्ताबाईंचे चरण धरतो,त्यांना शरण येतो तेव्हा माय मुक्ताबाई त्याला अनुग्रह देऊन कृतार्थ करतात व त्याला विसोबा खेचर असे नाव देतात. याविषयी एकनाथ महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे , "मुक्ताबाईने बोध खेचरासी केला । तेणे नामयाला बोधियेलें ।।" चौदाशे वर्ष वयाया महायोगी चांगदेवांना चौदा वर्षांच्या मुक्ताबाईंनी अनुग्रह देऊन कृतार्थ केले. प्रत्यक्ष पांडुरंगाचे लाडके नामदेवराय यांनाही सर्व संत मंडळीत कच्चे मडके ठरविले यातच या भगवती आदिशक्तीच्या अधिकाराची जाणीव होते. नामदेवराय आपल्या एका अभंगात मुक्ताईच्या अधिकाराची जाणीव करुन देतात ते म्हणतात, "लहानशी मुक्ताई जसी सनकांडी । केले देशोधडी महान संत ।।"

   मुक्ताई वयाने जरी लहानगी पोरं दिसत असली तर ती सणसणीत सनकांडीच आहे.लहान असुन मोठी तिखट आहे.तिने मोठ्या मोठ्या संतांना देशोधडीला लावले आहे.


मुक्ताबाई ची समाधी :-

              ज्ञानेश्वर माऊलींची ,सोपानकाका,चांगदेव यांनी समाधी घेतल्यावर माय मुक्ताबाई अतिशय उदास झाल्या.आता हे शरीर ठेवू नये असे त्यांना वाटू लागले.

"मुक्ताबाई उदासी झाली असे फार । आता हे शरीर रक्षू नये ।।१।। त्यागिले आहार अन्नपाणी सकळ । निवृत्तिराज तळमळी मनामाजी ।।२।।"


मुक्ताबाई या महाकल्पापर्यंत ,महाप्रलयापर्यंत चिरंजीव आहेत.निवृत्तीनाथांनी माय मुक्ताबाईंच्या डोक्यावर हात ठेवून "चिरंजीव" होण्याचा आशिर्वाद च दिला आहे.याल प्रमाण म्हणजे एकनाथ महाराजांचा अभंग -

नाथाचे आश्रमीं समाधिरहित । मुक्तता मुक्त नाम तुम्हां ।।१।। महाकल्पावरी चिरंजीव शरीर । कीर्ती चराचर त्रिभुवनी ।।२।। आनंदे समाधी सदा ती उघडी । नामस्मरण घडोघडी मुखोद्गत ।।३।। एका जनार्दनी नाम तुमचे गोड । त्रैलोक्य उघड नाम किर्ती ।।४।।


शके १२९९ वैशाख वद्य दशमीस माध्यान्हास तापीपूर्णांच्या संगमात मुक्ताबाईस निवृत्तीनाथांनी,रखुमाई,सत्यभामा यांनी मंगलस्नान घातले‌.तेव्हा स्नान करुन मुक्ताबाईंनी सर्व पांढरी वस्त्रे परिधान केली. त्यानंतर त्यांनी पांडुरंगाचे, रुक्मिणीचे व निवृत्तीनाथांचे दर्शन घेतले.तेवढ्यात फार आभाळ उठले.विजा चमकू लागल्या.ढग वरचेवर माथ्यावर येऊ लागले.प्रलयकालच्या विजांचा गडगडाट सुरु झाला.सोसाट्याचा वारा सुटला.

याचे वर्णन नामदेवराय करतात -

प्रळयींच्या विजा वर्षती अपार । झाला धुंधकार दाही दिशा ।।१।। झुंझाट सुटला वारा कांपूं लागे धरा । नभची अंतरा कालवलें ।।२।। नामा म्हणे देवा झाली कैसी गती । पडलीसे भ्रांती अवघ्या जनां ।।३।। निवृत्तीराज म्हणे प्रळयींचा वारा । सुटला शारंगधरा ऐसे वाटे ।।४।।

          हे सर्व सुरु असता निरंजनामध्ये मोठ्याने वीज कडकडाट करुन गर्जली व त्याबरोबर मुक्ताबाई गुप्त झाली.मुक्ताबाई माय अदृश्य झाली तेव्हा एक सारखा प्रहरभर लख्ख उजेड पडला होता व वैकुंठात १ लक्ष घंटा वाजत होत्या. नामदेवराय या प्रसंगाचे वर्णन आपल्या अंभंगातून करतात -

कडाडली वीज निरंजनी जेव्हा । मुक्ताबाई जेव्हा गुप्त झाली ।। वैकुंठी लक्षघंटा वाजती एकघाई । झाली मुक्ताबाई स्वरुपाकार ।। एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी । जेव्हा निरंजनी गुप्त झाली ।। गेले निवारुनी आभाळ आभूट । नामा म्हणे कोठे मुक्ताबाई ।।

 ‌ भगवती ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताबाई ज्या दिवशी तापी तिरावर गुप्त झाली ती तिथी होती शके १२१९ हेमलंबीनाम संवत्सर वैशाख शुद्ध १० तारीख १९/५/१२९९ दुपारी १ वा.१५ मी. पण खरे पाहता मुक्ताबाई माय त्याच देहाने आजही चिरंजीव आहेत.आजच्या या परम पावन दिनी माय माउली भगवती आई मुक्ताबाईंच्या चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो आणि नाथांच्याच शब्दात ही शब्दसुमनांजली श्रीचरणी अर्पन करतो.

"जगत्रय जननी मुक्ताबाई माते । कृपा करी वरद हस्ते मजवरी ।।"

 ✒️✍️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी/वाशिम ✍️✒️

करवीर छत्रपती संस्थानाचे राजगुरु सद्गुरु श्रीसिद्धेश्वर महाराज 🌸☘️🌺🚩

 


करवीर संस्थानाचे राजगुरु सद्गुरु श्रीसिद्धेश्वर महाराज 🌸☘️
                               वैशाख वद्य सप्तमी कोल्हापूर या दक्षिण काशी क्षेत्रात आजवर झालेल्या असंख्य महापुरुषांपैकी अग्रगण्य असलेले दिव्य विभूती सद्गुरु श्री सिद्धेश्वर महाराज यांची पुण्यतिथी. श्रीमहाराजांची माहिती होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे आमचे पैजारवाडीचे दत्तप्रभु सद्गुरु चिले दत्त महाराजांच्या चरित्रातील श्री महाराजांचा उल्लेख.तसेच कोल्हापूर चे दत्त सद्गुरु श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या
चरित्रातील उल्लेख.सद्गुरु चिले महाराजांसाठी श्रीमहाराजांचे समाधी मंदिर हे अतिशय आवडते ठिकाण.महत्वाची गोष्ट अशी की अतिशय सुरवातीच्या काळात म्हणजे चिले देवांचे प्रत्यक्ष कार्य सुरु झाले तो सुरवातीचा काळ ,तेव्हा चिले देव रोज श्री सिद्धेश्वर महाराजांचे मंदिर झाडून काढत असत.झाडून झाले की तेथील पुजार्यांकडे खाण्यास भाकरी मागत.हा नेम महाराजांचा पुष्कळ वर्षे अखंड सुरु होता.पुढे महाराजांचा भक्त परिवार ,महाराजांची माहिती सर्वश्रुत झाली तेव्हा पुष्कळ लोक चिले महाराजांकडे यायचे.त्या सर्व भक्तांचे  सर्व प्रश्न ,शंका चिले देव याच श्री सिद्धेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात बसून ऐकत व त्यावर मार्गदर्शन करित असत.श्रीसिद्धेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरातील कासवाच्या उजव्या हाताला चिले देव बसायचे व भक्त डाव्या हाताला बसायचे.तिथे बसले की चिले महाराज "सिद्धेश्वरा सिद्धेश्वरा पाप हारी रे सिद्धेश्वरा" हे भजन भक्तांकडून तासंतास म्हणून घेत असत.एकदा चिले महाराज आपल्या भक्तांना सिद्धेश्वर महाराजांच्या समाधीकडे हात करुन म्हटले होते की , "तो वाडीचा दत्त हा इथे सिद्धेश्वर रुपात आहे आणि तोच इथे (स्वतः कडे हात करुन) ही आहे." तसेच कुंभार स्वामी महाराज यांनी ही एका भक्ताला , "तुम्ही पंचगंगेवरील ब्राह्मणकुमारा कडे जावं तिथे तुमचे काम होईल" म्हणून पाठवल्याचे ऐकिवात आहे. त्यामुळे महाराजांचे नाव ऐकून होतोच पण नक्की महाराज कुठले ,कार्यकाळ ,चरित्र काय ? ही माहिती घेण्यास उत्सुक असतांनाच एकेदिवशी अनायसे महाराजांचे चरित्र पुण्यात मिळाले.श्री सिद्धेश्वर महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज आपण त्यांच्या दिव्य चरित्राचे स्मरण करुयात.
                             वेरुळ गावच्या उत्तरेकडील "निधोन बावरे" या गावातील एक सात्विक ,कृष्णात्री गोत्र कुळातील वेदशास्त्रसंपन्न रामभट व गोदावरीबाई यांच्या कठोर तपाचरणाने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भगवान श्रीकालभैरवांनी या दाम्पत्याचे पोटी शालिवाहन शके १६६५ प्रमोदीनाम संवत्सर चैत्र शुद्ध नवमी म्हणजे रामनवमी या पावन दिनी जन्म घेतला.देवांच्या दृष्टांतानुसार या जगदोद्धारक बालकाचे नाव "सिद्धेश्वर" असे ठेवण्यात आले. चंद्रकलेप्रमाणे सिद्धेश्वर बाळ हळूहळू मोठा होऊ लागला.बालपणापासुनच हे बाळ एकटेच खेळत असे.सिद्धेश्वर बाळ रुपाने , गोरापान , तेजस्वी व एकांतप्रिय होते.आपल्या आईबरोबर मंदिरात जावे,कथा किर्तन ऐकावे,मातेची देवपुजा एकटक आनंदात बघत बसायचे हाच यांचा छंद. लहानपणापासूनच त्यांना वाचासिद्धी होती.आपल्या पाचही बहिनींना त्यांनी बालपणी सांगितल्याप्रमाणेच स्थळ मिळाले होते.बाळ सिद्धेश्वरांचा अगदी थाटामाटात व्रतबंध सोहळा पार पडला.बाळाची अंतर्मुख वृत्ती कमी होऊन तो वैदिक कर्मात निष्णात व्हावा,त्याने घरातील परंपरागत असलेले ज्योतिष शास्त्राचे ज्ञान घ्यावे ,विद्याव्यासंग करुन घर सांभाळावे असे आई-वडिलांना वाटल्यामुळे त्यांचे वयाच्या पाचव्या वर्षी लग्न करण्यात आले.पण त्यांची ध्यानधारणा, अंतर्मुख वृत्ती काही कमी झाली नाही उलट "आपला दाता रघुनंदन.अयोध्यापती श्रीराम,हाचा आमचा दाता.तोच आमचा यजमान.आपले कुटुंबालाच काय तर इतरांनाही देऊन उरेल इतके तो देईल" असे अलौकिक उत्तर त्यांनी दिले.त्यांचे हे उत्तर ऐकून सर्वजन अवाक् झाले व सिद्धेश्वरास त्याच्या मार्गाने जाऊ द्यावे असे सर्वांनी ठरविले.पुढे वडिलांच्या आज्ञेवरुन सिद्धेश्वर हे वेदाध्ययनासाठी औरंगाबाद येथे गेले.तेथील नाना शास्त्री यांच्याकडे ते वेदाध्ययनासाठी जाऊ लागले.सिद्धेश्वर हे एकपाठी होते.सर्व शास्त्र ज्ञान, वेदांचा अभ्यास ते भराभर आत्मसात करु लागले पण या सर्वात त्यांचे मन रमेना.कारण त्यांना ब्रह्मकर्म ,यज्ञकर्म करुन याज्ञिकी किंवा वेदांती व्हावयाचे नव्हते.याच सुमारास त्यांची पत्नि निवर्तली. पण यानंतर एक महत्वाची घटना घडली.पत्निचे क्रियाकर्म आटोपल्यावर एक दिवस त्यांना औरंगाबादमधून निरोप आला की एक मोठा स्वाहाकार औरंगाबाद येथे आयोजित केला आहे व आपण लवकरात लवकर त्या साठी परतावे.या स्वाहाकार ची मुख्य उपस्थिती होती ती म्हणजे पैठण येथील आदरणीय व्यक्ती,थोर ईश्वर भक्त,महान संत अमृतराय.या महान‌ विभूती ची सिद्धेश्वरांना ओढ लागून राहिली.अखेर स्वाहाकारा च्या दिनी संत अमृतरायांचे आगमन झाले.सिद्धेश्वरांनी अमृतरायांच्या चरणी मस्तक ठेवले व अश्रुंनी श्रीचरणांना अभिषेक घातला.श्रीगुरुंना आपल्या शिष्याची ओळख पटली.त्यांनी आपल्या या दिव्य शिष्याला हृदयासी कवटाळले.सिद्धेश्वर हे सामान्य व्यक्ती नाहीत तर प्रत्यक्ष भगवंतांचा अंश आहेत हे अमृतरायांनी मनोमन जाणले.पुढे सिद्धेश्वर श्रीगुरु समवेत पैठणास आले.श्रीगुरुंच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वरांची आध्यात्मिक प्रगती झपाट्याने होऊ लागली.एव्हाना उपजतच आत्मज्ञानी असलेल्या ज्ञानाला झळाळी मिळाली असे म्हटले तर जास्त संयुक्तिक ठरेल. काही दिवसांनी गुरु आज्ञा घेऊन सिद्धेश्वर आपल्या घरी परतले.आपल्या आई-वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांनी दुसरे लग्न केले.सुरंगली या गावातील गंगाधर पंत व सौ आनंदीबाई यांची कन्या वधू म्हणून घरात आली.आई -वडिलांसाठी सिद्धेश्वर पुन्हा गृहस्थ आयुष्य जगू लागले खरे.पण त्यांचे मन यात रमेना.ऐक दिवशी प्रात:काळी ते घर सोडून आपल्या सद्गुरुंकडे परतले.सिद्धेश्वरांना श्रीगुरुंनी पुढील अध्ययनासाठी , साधनेसाठी आपले गुरुबंधू श्री अद्वैतानंद स्वामी यांच्या कडे श्री क्षेत्र काशी येथे पाठविले.गुरु आज्ञा प्रमाण मानून श्री सिद्धेश्वर हे काशी क्षेत्री अद्वैतानंद स्वामी यांच्या कडे आले.स्वामी अद्वैतानंदांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धेश्वरांचा शास्त्राभ्यास व योगाभ्यास सुरु होता.लवकरच ते शास्त्र संपन्न व योगसिद्ध झाले.पुढे स्वामी अद्वैतानंदांनी "तुझे अवतार कार्य दक्षिणेकडे व्हावयाचे आहे तेव्हा आता तू दक्षिणेकडे जा" अशी आज्ञा केली.काही काळाने अद्वैतानंदानी समाधी घेतली. श्री अद्वैतानंद स्वामींच्या समाधीला नमन करुन सिद्धेश्वर हे दक्षिणेकडे जाण्यास निघाले.
                                     प्रथम ते तिर्थयात्रा करत नाशिक क्षेत्री आले.तिथे‌ रामराया चे दर्शन घेतल्यावर ते तुळजापूर येथे आले.श्रीक्षेत्र तुळजापूर येथे एक विलक्षण प्रसंग घडला.भगवती तुळजाभवानी चे दर्शन घेतल्यावर परततांना एक व्याधीग्रस्त जर्जर झालेला ब्रह्माण श्रीगुरु सिद्धेश्वरांच्या आडवा आला.त्याने श्रीगुरु चरणी लोटांगण घातले व "आपल्या डोळ्याला दूर्धर व्रण झाला आहे व त्याचा खुप दाह होतो आहे,आपण यातून माझी सुटका करावी" अशी विनंती केली. श्रीगुरुंनी त्याला 'सप्तशतीचे' पाठ करण्याची आज्ञा केली.हे पाठ पूर्ण होईपर्यंत श्रीगुरु सिद्धेश्वर महाराज हे तुळजापूर येथेच राहिले.तो ब्राह्मण पूर्ण व्याधी मुक्ती झाल्यावरच ते पुढील प्रवासास निघाले.पुढे पांडुरंगाच्या दर्शनाला ते पंढरपूर येथे आले.पंढरपूर ला विठूराया चे दर्शन घेऊन ते सातारा मार्गे कराड येथे आले.पुढे पुष्कळ दिवस कृष्णाकाठी श्रीगुरु रमले.कृष्णाकाठीच कुठेतरी शांत स्थान साधनेसाठी निवडावे असा विचार त्यांनी केला.अशा स्थळाच्या शोधात असतांना त्यांना कृष्णाकाठीच एक दिव्य व जसे हवे होते तसे क्षेत्र मिळाले.ते क्षेत्र म्हणजे "श्रीक्षेत्र नरसिंहपूर" ज्याला आपण कोळे नरसिंहपूर म्हणून आज ओळखतो.पुजार्यांच्या अनुज्ञेने श्रीगुरु याच नृसिंह मंदिरात वास्तव्य करु लागले.येथे एकांतात , कृष्णाकाठी त्यांनी कठोर साधना केली.श्रीगुरु सिद्धेश्वरांचे  दिव्य तपाचरण,व्रतस्थ जिवन बघून आता ते नरसिंहपूर व जवळपासच्या परिसरात एक महान तपस्वी म्हणून परिचीत होऊ लागले.त्या परिसरात ते आता "भटजी बाबा" म्हणून ओळखले जाऊ लागले.या अनुष्ठान काळात त्यांच्या हातून अनेक चमत्कार घडले.एकदा श्रीगुरु ध्यानस्थ बसले होते.त्यावेळी प्रचंड गडगडाट करीत विद्युल्लता पडली ती अगदी श्रीगुरुंच्या जवळच.इतक्या जवळ पडून ती ते स्थळातून बाहेरही पडली.पण त्या विद्युल्लतेचा श्रीगुरुंना साधा स्पर्श ही झाला नाही किंवा एवढ्या आवाजाने त्यांची ध्यानावस्था, समाधी भंग ही झाली नाही. पुढे आणखीन एक विलक्षण घटना घडली.दिवसभराचे सर्व कार्य आटोपून श्रीगुरु निद्रिस्त झाले.मध्यरात्री उशा लगत असलेल्या दिपदानातील वातीवर पुष्कळ काजळी साचली व ती श्रीगुरुंच्या शय्येवर पडली.त्यामुळे ती शय्या हळूहळू पेटत गेली.सकाळी उठून सर्वजण पहातात तो श्रीगुरुंची सर्व शय्या जळून भस्मसात झाली होती.परंतु अग्नी नारायणाने त्या महासमर्थ स्वामींच्या शरीरास स्पर्शही केला नाही.वरील घटनांमुळे लोकांना कळून चुकले की हे कुणी सामान्य साधक नाहीत तर प्रत्यक्ष परमेश्वरी अवतार आहेत. पुढे एक ब्राह्मण दांम्पत्य श्रीगुरुंना शरणं आले.त्या ब्राह्मण बाईची व्याधी निरसली व त्या दोघांवर ही कृपा अनुग्रह केला.नरसिंहपूरला श्रीगुरुंचे अनेक चमत्कार लिला चरित्रात वर्णन करण्यात आले आहे. एकदा ब्रह्ममुहूर्तावर स्नानास गेले व नदीकाठी खडकावर ध्यानास बसले.सकाळी सूर्यप्रकाश पडल्यावर लोक आले आणि बघतात तर श्रीगुरु हे एक प्रचंड मोठ्या अजस्त्र सुसरीवर बसले होते.लोकांनी आवाज दिल्यावर श्रीगुरु समाधी तून बाहेर आले व बाजूला आल्यावर ती सुसरी शांतपणे निघून गेली.नरसिंहपूरला श्रीगुरुंनी अनेकांच्या व्याधी दूर केल्या,अनेकांना कृपा अनुग्रह दिला.त्यात आपल्याला शरण आलेल्या भिमाबाईंवर कृपा अनुग्रह केला व त्यांना योगात व परमार्थात एका उच्च पदावर पोचवले.अनेक अलौकिक अशा चमत्कारिक लिला श्रीगुरुंनी नरसिंह पूरी केल्या. "कुटुंबियांना भेटायला जाण्यासाठी बारा वर्ष उलटून जाऊ देऊ नये" असा शास्त्र संकेत आहे.त्यामुळे श्रीगुरु आता स्वगृही जाण्याचा विचार करु लागले. श्रीगुरु आता स्वगृही जाणार आहेत ही बातमी सर्वत्र वार्यासारखी पसरली.सर्वांनी साश्रुनयनांनी श्रीगुरुंना निरोप दिला.त्यामुळे श्रीगुरु आता आपल्या घरी जाण्याचे ठरवून मार्गक्रमण करते झाले.घरी आल्यावर आपल्या भावाची व इतर घरातील सर्वांची भेट घेतल्यावर श्रीगुरुंना कळले की आपल्या मातोश्री आपली भेट व्हावी म्हणून करवीर क्षेत्री भगवती अंबाबाईंच्या चरणी ठाण मांडून बसल्या आहेत.तिथेच आपल्या पुत्र सिद्धेश्वराची भेट व्हावी म्हणून त्यांनी अंबाबाई चरणी अनुष्ठान मांडले आहे.श्रीगुरुंनी राम भटांना आपल्या मातोश्रींना आणावयास धाडले.काही काळात सर्व लोकांच्या लवाजम्यासह मातोश्री घरी परतल्या. अतिशय आनंदाने अश्रू पूर्ण नेत्रांनी माता - पुत्राची भेट झाली.पुढे तिनं महिने स्वगृही राहून श्रीगुरु आपली पत्नी सौ.भवानीबाई व मातोश्रींसमवेत आधी काही काळ पंढरपूर येथे राहिले व नंतर नरसिंहपूर येथे आले.यावेळी श्रीगुरुंचा परिवार त्यांच्या सोबत होता.नरसिंहपुरी सर्वांनी आनंदाने त्यांची व्यवस्था केली.पंढरपूर मुक्कामी श्रीगुरुंनी योगानंद,अद्वैतानंद व वैकुंठाश्रम या तिन्ही शिष्यांवर कृपा अनुग्रह केला व त्यांना योगाभ्यासात निष्णात केले.यातले वैकुंठाश्रम स्वामी हे तर गुरु सहवासात राहून सिद्ध झाले. श्रीगुरु नरसिंहपूर येथे वास्तव्यास पुष्कळ काळ होते.याठिकाणीच त्यांना रामचंद्र नावाचा पुत्र झाला.हा पुत्र तिनं वर्षांचा झाल्यावर एकदा श्रीगुरुंनी सर्व भक्तांपुढे त्याला त्याचा पूर्वजन्मीचा वृत्तांत विचारला.तर त्या तिनं वर्षाच्या गुरु पुत्राने खडानखडा पूर्वजन्मी ची माहिती सांगितली.आपण गंगा किनारी राहणारा ब्राह्मण होतो व अनुष्ठान काळात गंगा काठी मृत्यू पावलो. या पुण्यामुळे श्री गुरुंच्या पोटी जन्म लाभला असे इतिवृत्त त्याने सांगितले. रामचंद्र पाच वर्षांचा झाल्यावर श्रीगुरुंनी त्यांचा धर्मरक्षणासाठी ,कर्ममार्गाचा लोप होवू नये म्हणून व्रतबंध सोहळा मोठ्या थाटात पार पाडला.याच प्रसंगात तूप कमी पडल्यावर श्रीगुरुंनी कृष्णामाईतून घागर भरुन आणण्यास सांगितले व त्याचे तुपात रुपांतर केले.एकदा पर्जन्यकाळात कृष्णामाईला पूर आला व प्रात:काळी कृष्णेचे जल श्रीगुरुंच्या ध्यान गुंफेत शिरले.सर्व लोक खुप घाबरले व श्रीगुरुंना आवाज देऊ लागले. पण श्रीगुरु गुढ समाधीत स्थिर बसले होते.कृष्णामाई आपल्या या बाळाचे शांत पणे अवलोकन करुन परतली व श्रीगुरु आपल्या ध्यान गुफेतून कोरडे बाहेर आले.नंतर लोकांनी आत जाऊन बघितले तर कृष्णामाई च्या जलाने संपूर्ण गुंफा ही छतापर्यंत ओली होती.
                                 करवीर चे छत्रपती श्रीमंत श्री शिवाजी महाराज दुसरे हे श्रीगुरुंच्या वेळी गादीवर होते.एकदा त्यांच्या पाठीस फोड झाला.तो दिवसेंदिवस मोठा होऊ लागला.तिचा आकार काही काळाने आंब्याएवढा मोठा झाला.त्याचा श्रीमंतांना त्रास होऊ लागला.रात्रंदिवस ते वेदनेने तळमळू लागले.हकीम ,वैद्य ,राजवैद्य यांनी शरथिचे प्रयत्न करुन ही काही फरक पडला‌ नाही.महिनाभर महाराज या व्याधिने पिडीत होते‌.अंगावरील वस्त्र फोडास लागला की प्रचंड वेदना होई.महाराजांना झोपनेही अवघड झाले होते.एक दिवशी श्रीमंत छत्रपती शयन गृहात पालथे पडले होते.महाराजांना मंद वार्या मुळे डोळा लागला होता.इतक्यात व्हरांड्यातून भव्य आणि तेजस्वी महापुरुष प्रकाशझोतात प्रवेश करता झाला.मंद सुंगंध सर्वत्र दरवळू लागला.सुवर्णकांती ,डोईस शालनामा,अंगावर भरजरी शालजोडी,कांसेला रेशीमकाठी तलम धोतर ,बाकी उघड्या अंगावर गोपीचंदानाचे तिलक,रामनामांकित मुद्रा,एक हाती पळीपंचपात्र,पायामध्ये काष्टमय चंदनी पादुका,गळ्यात पोवळ्यांची व स्फटिकाची माळ.अत्यंत दैदिप्यमान आणि तेजस्वी मूर्तीचे छत्रपतींनी दर्शन घेतले.तेव्हा छत्रपतींना त्या महापुरुषांनी "आप्पा" या नावाने हाक मारली व म्हणाले,. "हे तुला काय झाले? इतका दिनवाना व व्याकूळ का झालास? ऊठ चिंता करु नकोस मी तुझ्या पाठीशी आहे." असे म्हणून स्वामींनी आपला हात त्यांचे गळवावरुन फिरविला व छत्रपतींचे मस्तकी ठेवला आणि छत्रपतींच्या कानात काही मंत्रोपदेश केला आणि ते योगी पुरुष अंतर्धान पावले.छत्रपतींना अचानक जाग आली पाहातात तर जवळ कुणीच नव्हते.प्रवेशद्वार बंद आणि पाठीवरील गळू आपोआप फुटून वाहू लागले.आजवरचा हा प्रचंड त्रासदायक फोडाचा त्रास क्षणार्धात संपला होता. पुढे श्रीमंत श्री छत्रपतींचे सुभेदार येसाजी शिंदे व बाजीपंत यांनी श्रीगुरुंना करवीरात आणले.सुभेदार येसाजी काही दिवसांनी अचानक छत्रपतींना भेटायला पन्हाळ्यावर गेले व त्यांना एक सिद्ध महापुरुष करवीरात आले आहेत व ते सबनीस यांच्या वाड्यात आहेत अशी माहिती दिली.त्यांच्या दर्शनास येण्याची विनंती छत्रपतींना केली.छत्रपती सुर्योदयापूर्वी दुसर्यादिवशी तयार झाले.पालखीत बसून गड उतार झाले व काही वेळात येऊन श्रीगुरुंना भेटले.श्रीगुरुंना बघताक्षणीच त्यांना ओळख पटली की हेच ते महापुरुष ज्यांनी आपली व्याधी दूर केली.त्यांनी श्रीगुरुंच्या चरणी लोटांगण घेतले.श्रीगुरुंनी त्यांना उठवून हृदयाशी कवटाळले.छत्रपतींच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या.श्रीगुरु म्हटले ,"आप्पा , काय सुखरुप आहेस की ..." अचानक छत्रपती भानावर आले व त्यांच्या मनीचे सर्व संशय फिटले.छत्रपतींनी श्रीगुरुंची पाद्यपूजा केली व विनंती केली की , "आपला सहकुटुंब मुक्काम माझ्या सन्निध पन्हाळगडावर व्हावा."  श्रीगुरुंनी याला संमती दर्शविली व राजे श्रीगुरु समवेत पन्हाळा गडावर परतले.पुढे छत्रपतींनी श्रीगुरु सिद्धेश्वर महाराजांकडून अनुग्रह मंत्र ही घेतला.हा सोहळा अतिशय थाटामाटात पार पडला.तसेच त्यावेळी थोरल्या राणी साहेबांनी ही मंत्रोपदेश घेतला होता. त्यावेळी छत्रपतींनी आपले सर्व राज्य श्रीगुरुना दान करण्याची इच्छा व्यक्त केली पण श्रीगुरुंनी ती विनम्र पुर्वक नाकारली.त्यामुळे छत्रपतींनी श्रीगुरुंना "महाराज" ही पदवी स्विकारण्याची विनंती केली.गुरु महाराजांनी ती स्विकारली.यामुळे आनंदीत झालेल्या छत्रपतींनी स्वतः जयघोष केला."करवीर छत्रपतींचे राजगुरु श्री सिद्धेश्वर महाराज की जय." श्रीगुरु सिद्धेश्वर महाराज आता करवीर छत्रपतींचे राजगुरु झाले होते.
                                   पुढे श्रीगुरु महाराज आपल्या मातोश्रींच्या इच्छेनुसार सिंहस्थ कुंभमेळ्याला त्रंबकराज येथे जाण्यास निघाले.प्रवासाची छत्रपती महाराजांनी सर्व चोख व्यवस्था केली होती. प्रवासात श्रीगुरु आधी नरसिंहपूर येथे आले.तेथील भक्तमंडळी ही श्रीगुरु समवेत कुंभमेळ्याला जाण्यास निघाली.हळूहळू यात्रा पुण्यामार्गे आळंदीला आली.श्रीगुरु महाराजांनी ज्ञानेश्वर माउलींचे अतिव प्रेमाने दर्शन घेतले.अजान वृक्षाला कडकडून मिठी मारली.श्रीगुरु सिद्धेश्वर महाराज हे आळंदीत आले आहेत ही बातमी सवाई माधवराव पेशवे यांना कळले.श्रीगुरुंची किर्ती आधीच त्यांच्यापर्यंत पोहोचली होती.त्यांनी नाना फडणवीस,हरीपंत फडके आदी लोकांना श्रीगुरुंना पुण्यात आणण्यास विनंती करण्याकरिता पाठविले.पेशव्यांच्या विनंतीस मान देऊन श्रीगुरु पुण्यास निघाले.पुण्याच्या वेशीवर स्वतः पेशवे श्रीगुरुंना सामोरे झाले.त्यांनी श्रीगुरुंच्या चरणी मस्तक ठेऊन नमस्कार केला.श्रीगुरुंनी त्यांना हृदयासी लावले व ते पुण्यात आले.श्रीगुरु तिन दिवस पुण्यनगरीत होते.चौथ्या दिवशी ते नाशिक क्षेत्री आले.तिथे त्यांनी सर्व विधी सशास्त्र केले.श्रीगुरु नाशिक क्षेत्री होते त्यावेळी अनेक चमत्कार लिला तिथे घडल्या शब्द मर्यादेमुळे तो भाग गाळला आहे.परततांना तिन महिने परत श्रीगुरु महाराजांचा मुक्काम पुण्यास पेशव्यांकडे होता.काही कालावधी नंतर श्रीगुरु नरसिंहपूर येथे जाण्यास निघाले.वाटेत भोरच्या राजांनी त्यांना आपल्या कडे येण्याची विनंती केली.त्यांनी आपल्या वाड्यात श्रीगुरुंची व्यवस्था ठेवली होती.या वेळी भोरच्या राजांनी श्रीगुरु महखराजां कडून अनुग्रह मंत्र घेतला होता.तिन दिवस राहून‌ श्रीगुरु पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले. पुढे दरमजल करीत श्री आपल्या प्रिय कर्मभूमीत म्हणजे नरसिंहपूरला आले.श्रींनी नरसिंह पूर येथे आपले मोठे चिरंजीव रामचंद्र महाराज तथा बाबा महाराज यांचे लग्न लावून दिले व करवीर छत्रपतींची इच्छा म्हणून आपले दुसरे चिरंजीव नाना महाराज यांचे लग्न करविर क्षेत्री लावले.
                                           पुढे छत्रपतींच्या विनंतीवरून श्रीगुरु पन्हाळा गडावर राहण्यास आले.श्रीगुरुंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपतींची अध्यात्मिक बैठक दृढ होत गेली.एकदा एका व्याधीग्रस्त ब्राह्माणाने व्याधी निरसणासाठी अंबाबाईचे अनुष्ठान सुरु केले तर जगदंबेनी त्याला शिवाजी राजाचे स्नान तिर्थ घ्यावे म्हणजे व्याधी समुळ नाश पावेल असा दृष्टांत केला होता.यावरुन छत्रपती महाराजांच्या अधिकाराची कल्पना करता येईल.पुढे श्रीगुरु नसरापुरी आले तेथे त्यांनी आपल्या भक्त राधाबाई यांच्या मृत पावलेल्या पतीला तिरडीवर फक्त हाक मारुन जिवंत केले.एकदा नरसिंहपूरला असतांनाच भर मध्यरात्री खग्रास चंद्रग्रहण आले.श्रीगुरुंनी मध्यरात्री पर्वकाळात नदीत उभे राहून जपजाप्य केले पण गावातील एकही ब्राह्मण तिथे आला नाही.दुसरे दिवशी ज्यावेळी ब्राह्मण मंडळी श्रींच्या दर्शनाला आली तेव्हा श्रींनी त्यांना याबाबत विचारले. तेव्हा ब्राह्मण मंडळींनी या डोहात ,नदीतिरावर वास करीत असलेल्या सुसरीचे कारण दिले.त्यावेळी श्री गुरुंनी ब्राह्मणांना आश्वासन दिले व श्रीकृष्णा मातेला आवाहन करुन म्हणाले, "श्रीसर्वोत्तमाची आज्ञा अशी आहे की,उत्तरेस नृसिंह तिर्थापासून दक्षिणेस वैष्णव घाटाच्या खाली परीट धुणेचा घाट आहे,तिथपर्यंत या दोन्ही स्थळांचे मध्ये सुसरीने कोणासही उपद्रव करु नये.सर्वजनांनी नि:शंक मनाने स्नानादी कर्मे करावीत." अशी आज्ञा करुन ते उपस्थितांना म्हणाले , "आता तुम्हाला सुसरीचे भय बाळगण्याचे कारण नाही." आणि आश्चर्य असे की आज दोनशे वर्षं झाली तेव्हापासून आजतागायत नृसिंह तिर्थापासून परीट घाटापर्यंत सुसरी दृष्टीस पडत नाही.नरसिंहपूर येथे केलेल्या लिला अतिशय विस्तृत व विलक्षण आहेत.त्या एक एक लिला चमत्कार ,प्रत्येक घटना व भक्तांवर केलेल्या कृपेचा चमत्कार बघितला तर प्रत्येकावर एक एक स्वतंत्र लेख होईल.पण तो भाग आता इथे मांडणे शक्य होणार नाही.आपण पुढे कधीतरी तो स्वतंत्र बघूच.करवीर छत्रपतींवर अचानक सरदार परशुराम पटवर्धन तासगाव यांनी केलेला हल्ला,ते भिषण युद्ध श्रीगुरुंच्या कृपेने छत्रपतींचे हाणून पाडले.हा अतिशय विलक्षण प्रसंग आहे.तसेच करवीर छत्रपतींना पुत्र नव्हता.त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी श्रीगुरुंना विनंती केली.श्रीगुरुंनी आपल्या या लाडक्या शिष्याला तसा आशिर्वाद दिला होता.त्या आशिर्वाद फलस्वरुप छत्रपती महाराजांना दोन पुत्ररत्न लाभले होते.दुसरे पुत्ररत्न हे बुवा महाराजांचा आशिर्वाद म्हणून त्यांचे नामकरण ही श्री बोवासाहेब छत्रपती असे करण्यात आले. पुढे रामचंद्र पटवर्धन याने अचानक करवीरावर हल्ला केला त्यावेळी श्रीगुरुंनी करवीरचा किल्ला लढवून छत्रपतींची कृपा पूर्वक पन्हाळा गडावर सुरक्षीतपणे सुटका केली होती.धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य.हा प्रसंग इतका दिव्य आहे की मी जरुर यावर एक वेगळा लेख लिहीणार आहे.श्रीगुरु बुवा महाराजांनी छत्रपतींचे या बाक्या प्रसंगातुन इतक्या विलक्षण पद्धतीने रक्षण केले‌ की कुणीही हा प्रसंग वाचला‌ तर अवाक् होईल.अतिशय विलक्षण असा हा प्रसंग आहे.मी स्वतः वाचुन अतिशय आश्चर्यचकित झालो.सद्गुरु आपल्या शिष्यासाठी काय काय करतात याची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही .त्यातीलच एक विलक्षण असे हे उदाहरण आहे.विस्तृत व दिर्घ असा प्रसंग असल्याने इथे देता येणे शक्य नाही
                                             आपल्या भक्तांचे रक्षण करणारे श्रीगुरु आता वयाने थकले होते.आपले तिनही सुपुत्र स्वकर्तृत्वावर उभे होते.विद्येत पारंगत होते.कन्या या उत्तम घरी नांदत होत्या.आता आपल्या अवताराचे प्रयोजन कार्य ही पूर्ण झाल्याचे श्रीगुरुंना लक्षात आले.त्यांनी दोन दिवस अन्नास स्पर्श केला नाही.फक्त कधीतरी थोडे जलपान केले.एकनिष्ठ सेवक असलेले ब्रह्मानंद स्वामी श्रीगुरु महाराजांचे सोबतच होते.श्रींचा अवतार काळ पूर्ण होत आला हे त्यांनी जाणले होते.ब्रह्मानंद स्वामींनी प्रार्थना केली की आपल्याजवळील सर्व ज्ञान हे आपले पुत्र बाबा महाराज यांना द्यावे.यावर खुप चिंतन घडल्यावर श्रीगुरुंंनी आपल्या समाधीचा विचार काही काळासाठी रहीत केला.श्रीबाबा महाराज आपल्या वडिलांना शिष्य रुपाने शरणं आले.आठ महिन्यात त्यांनी श्रीगुरुंची कृपा संपादन केली.श्रीगुरुंनी त्यांना महावाक्याचा उपदेश करुन त्यांच्याकडुन ध्यान समाधीचा अभ्यास अवघ्या सात आठ महिन्यांत पूर्ण करुन घेतला.ज्याला साधनेचा कित्येक काळ लोटावा लागतो ते फक्त काही महिन्यात श्रीगुरुंनी आपल्या शिष्याकरवी घडविले हे परमआश्चर्यच आहे.बाबा महाराजांच्या मस्तकी श्रीगुरुंनी आपल्या पूर्ण कृपेचा हस्त ठेवला ,त्यांना हृदयाशी कवटाळून या हृदयीचे गुज त्या हृदयी घातले.बाबांवर पूर्ण कृपा झाल्यावर श्रीगुरुंनी आता समाधी घेण्याचा विचार निश्चित केला.त्यांनी सर्व निरवानिरव चालवली.ही माहिती छत्रपतींना मिळताच ते तिथे हजर झाले.छत्रपतींना दु:खावेग आवरत नव्हता.सद्गुरुंच्या विरहाच्या कल्पनेने ही ते हलून गेले होते.अतिशय दु:खी आणि खिन्न अंत:करनाने ते श्रीगुरु पुढे उभे होते.डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या.श्रीगुरुंनी त्यांना जवळ घेतले.त्यांचे सांत्वन करीत बोलले, "आप्पा ! चिंता करु नकोस.जे मजपाशी होते ते सर्व महात्म्य चिरंजीव बाळापाशी आहे.त्या ठिकाणी तुमचे सेवेचे वैगेरे जे काही हेतू असतील ते पूर्ण करुन घ्या.बाळ व माझ्यात काही अंतर नाही.तुजविरुद्ध जे कपटाने वागतील ते तुझे शत्रू लयास जातील.असा माझा तुला आशिर्वाद आहे."असे बोलून छत्रपतींना श्रींनी आश्वासन अभय दिले. दुसरा अप्रिय असा दिवस अखेर उजाडला.वैशाख वंद्य षष्ठी इंदुवार शके १७२३ ला ब्राह्ममुहूर्ती सूर्योदयापूर्वी सहा घटिका असतांनाच श्रीगुरुंनी बाबा महाराज,श्रीपूर्णानंद स्वामी व छत्रपतीस आपल्या समोर बसवून स्वतः आसनस्थ झाले.श्रीमद शंंकराचार्यांच्या ग्रंथातील काही श्लोक वाचण्यास सांगितले.त्या ग्रंथात ज्ञान्याची चरमदशा म्हणजे मरण दशा काळी जी चिन्हे वर्णिली आहेत.ती सर्व या त्रिवर्ग शिष्यांना दाखवावे या हेतूने त्यांना संन्निध बसविले.त्यात योग्याने जसे देह ठेवण्याचे वर्णन केले आहे तसेच या तिन्ही शिष्यांना दाखवून श्रींनी स्वतः चैतन्यपूर्ण ब्रह्मरुप होऊन विदेह कैवल्य पावून आपला अवतार समाप्त केला.श्रींनी देह ठेवल्याची वार्ता सर्वत्र वार्या सारखी पसरली.शिष्यांच्या दु:खाचा पारावार उरला नाही.अवतार समाप्ती नंतर बाबा महाराज यांनी दहनविधी उत्तरक्रिया केली.शिवछत्रपतींनी यांनी दहनाचे स्थानी स्थल शुद्धी करुन देवालय बांधून देवालयामध्ये श्रींचा बसावयाचा पाट आणि त्यावर श्रींचे अंगावरील धोतर ठेवून वर श्रींच्या पादुका स्थापन करविल्या.श्रीगुरुंच्या या पुण्यपावन पुण्यतिथी दिनी त्यांच्या या दिव्य चरित्राचे आपल्याला स्मरण झाले ही त्यांचीच परमकृपा.अशा या अवतारी व दिव्य महापुरुषांच्या चरणी माझे शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम
      ✒️✍️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️


Friday, May 20, 2022

भक्तशिरोमणी भक्तश्रेष्ठ संतश्रेष्ठ सद्गुरु श्रीचोखोबांची_पुण्यतिथी🙏🌸🌺🌿☘️

 


भक्तशिरोमणी_भक्तश्रेष्ठ_संतश्रेष्ठ_सद्गुरु श्री चोखोबांची_पुण्यतिथी🙏🌸🌺🌿☘️


"ऊंस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ।।" असं परखडपणे सर्व समाजाला सांगणारे संतश्रेष्ठ भक्तशिरोमणी श्रीचोखोबारायांची आज पुण्यतिथी.वैशाख कृष्ण पंचमीला गुरुवारी चोखोबारायांनी शके १२६० इ.स.१३३८ ला मंगळवेढे येथे देह ठेवला त्याला आज ६८४ वर्ष झालेत.अतिशय लोकविलक्षण महापुरुष असलेले चोखोबा माझे व्यक्तिगत प्रिय असे संत आहेत.नामदेवरायांप्रमाणेच चोखोबांच्या ही घरात ते ,त्यांची पत्नी सोयराबाई,पुत्र कर्ममेळा,बहिण निर्मळा व मेव्हणे बंका हे सर्वच संतपदाला पोचले होते.ही खरंच लोकविलक्षण बाब आहे.

श्रीचोखोबांच्या चरित्रावर विवेकदृष्टीने जर चिंतन केले तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे भगवंतांच्या प्राप्ती करीता तुम्हाला कुठल्याही विशिष्ठ धर्म,जात,लिंग,क्षेत्र आणि समुदायाचा भाग होण्याची तिळमात्र गरज नाही.समाजात कितीही विषमता आणि जातीभेदाची पानेमुळे खोलवर रुजलेली असली तरी एका शुद्ध अंतःकरणाने , सद्गुरु प्रदत्त मार्गाने परमार्थात मार्गक्रमण करत गेले तर भगवंत ही आपल्या प्रेमाला ,भक्तीला भुलतो.दुर्दैव असे की , "आम्हां आनंद झाला आम्हा आनंद झाला । देवोची देखिला देहामाजी।।" असा आपल्या विलक्षण आत्मानुभूतीचे वर्णन करणारे ,ब्रह्मसाक्षात्कार झालेले चोखोबा मांडण्यात आम्हाला रस नसून चोखोबांनी रचलेल्या अभंगापैकी अगदी एक-दोन ठराविक अभंग निवडणूक त्यातून जातिव्यवस्था आणि समाज किती वाईट यावर काथ्याकुट करत बसण्यात आपल्याला फार आनंद धन्यता वाटते.पण मूळात हे आंब्याचा गर सोडून कोय चोखत बसण्यासारखे आहे,अमृताचे ताट दूर सारुन ताकाची वाटी जवळ करण्यासारखे आहे.चोखोबांसारखे असामान्य महापुरुष एका सामान्य अगदी शुद्र समजल्या जाणार्या घरात जन्माला येऊन कशा प्रकारे आत्मज्ञानी संत होतात,कुठल्या कारणामुळे प्रत्यक्ष वैकुंठाचे नाथ पांडुरंग त्यांच्या घरी सुईन बनून आले,ढोरं ओढते झाले.या प्रश्नांचे उत्तर शोधायला जर चोखोबांचे चरित्र अभ्यासले तर खरंच नवनित, अमृतच आपल्याला गवसेल.आज या पावन दिनी आपण याच दिव्य चरित्राचे चिंतन करुयात.

                श्रीचोखोबा हे ज्ञानेश्वर माउली आणि नामदेवरायादी संतांचे समकालीन.म्हणजे चोखोबांच्या अवताराला आज सातशे वर्ष होऊन गेलेत.चोखोबांचा जन्म वर्हाडात बुलढाणा जिल्ह्यात ,देऊळगावराजा तालुक्यातील निर्मळा नदीकाठी असलेल्या मेहुणराजा या गावात झाला.चोखोबांच्या जन्मासंबंधी एक कथा सर्वत्र प्रचलित आहे व त्याला आधार ही चोखोबांचे समकालीन असलेले त्यांचे मेव्हणे संत बंका यांची चोखोबांवरील आरती आहे.त्यातून आपल्याला चोखोबांच्या जन्म दिवसा बद्दल व जन्म कथेबद्दल कल्पना येते. बंका यांनी लिहीलेल्या आरतीत ते उल्लेख करतात की, चोखोबांच्या आई-वडिलांच्या प्रवासात त्यांना भगवंत एका गरीब ब्राह्मणाच्या वेशात येऊन भेटतात ,त्यांच्या जवळील आंबा चोखतात व तो अर्धा चोखलेला आंबा परत देऊन अंतर्धान पावतात.त्या प्रसादाचे फळ म्हणजे प्रत्यक्ष चोखोबांचा जन्म निवृत्ती व मिराबाई या दाम्पत्यापोटी झाला.या कथेला बरेच विविध रुप दिले गेले आहेत.कथा बरीच मोठी आहे शब्दमर्यादेस्तव‌ ती इथे देण्याचे टाळतो.

तसेच बंका म्हणतात की ,"शुद्ध एकादशी आंबा देवाने चोखिला । संतोषला देव जन्म चोखा पावला ।।"

म्हणजे एकादशी ही चोखोबांची जन्मतिथी. चोखोबांचे बालपण , त्यांचे शिक्षण ,त्यांना लाभलेला सहवास या संबंधी अगदी तुरळकच माहिती आज उपलब्ध आहे‌.लौकिकदृष्ट्या बघितले तर चोखोबा हे तत्कालिन मान्यतेनुसार समाजात जातिहीन असलेल्या कुळात जन्माला आले होते‌.त्यामुळे त्यांना शिक्षणाचा अधिकार,अक्षर ओळख करून,भाषेचा अभ्यास करुन ,विद्याप्राप्ती करुन घेणे अशक्यप्राय होते.तरीही चोखोबांना "संतसहवास" लाभला होता.निरक्षर असलेल्या चोखोबांच्या अभंगांवर दृष्टी जरी फिरवली तरी आश्चर्य होतं इतके ते अभंग अर्थपूर्ण ,रसाळ व गहन आहेत. चोखोबांचे आई-वडिल हे वारकरी होते.त्यामुळे बालपणापासूनच चोखोबांना पंढरी परिचीत असेल.लहानपणापासूनच पांडुरंग,चंद्रभागा व वारकरी संत यांच्या बद्दल त्यांना ओढ लागलेली असावी. चोखोबांची व संपूर्ण परिवाराची भक्तश्रेष्ठ नामदेवरायांशी ओळख ही पंढरपूरातच झाली होती.चोखोबांवर नामदेवारायांची पूर्ण कृपा होती हे नक्की आहे.श्री नामदेवरायांनी चोखोबांच्या चरित्रावर काही ओव्या लिहील्या आहेत ज्यांना आपण पंचरत्नी चोखामेळा अभंग या नावाने ओळखतो‌.यात बंका,निर्मळा व चोखोबा -सोयरा यांच्या जन्माबद्दल व समाधी बद्दल हकीकत नामदेवरायांनी उद्धृत केली आहे.

                          याच नामदेवारायांच्या अभंगात चोखोबांच्या चरित्रातील अतिशय दिव्य लिला आली आहे.ती अशी की चोखोबांच्या पत्नी सोयराबाई या गर्भवती असतात.नऊ महिने पूर्ण झालेले असल्यामुळे त्या चोखोबांना काही साहित्य आणावयास सांगतात.चोखोबा सोयराला काही न सांगताच ते साहित्य आणण्यासाठी आपल्या बहिणीकडे मेहूणराजा गावी जातात.इकडे चोखोबांना परतायला उशीर झाल्यामुळे सोयराबाई श्रीपंढरीनाथांना शरणं जातात.भक्तवत्सल विठूराया आपल्या या परमभक्त सोयराबाईंच्या हाकेला धावून जातात .भगवंत चोखोबांच्या बहिणीचे निर्मळेचे रुप धारण करुन सोयराबाईंचे बाळंतपण करतात.झालेल्या बाळाचे भगवंत स्वतः नामकरण "कर्ममेळा" असे करतात व निघून‌ जातात.हेच पुढे संत कर्ममेळा म्हणून आपल्या सर्वांना परिचित आहेत.ही सर्व हकिकत स्वतः नामदेवरायांनी आपल्या अभंगातून मांडली आहे. चोखोबांचे संपूर्ण चरित्रच एक विशाल महासागर आहे.प्रत्येक घटना ,लिला एक स्वतंत्र भक्तीचे आख्यान आहे. चोखोबांच्या चरित्राचे जे काही वर्णन संतांनी केले आहेत त्यात एक गोष्ट सर्वत्र समान बघायला मिळते ते म्हणजे त्यांच्या संपूर्ण परिवाराचा भक्तिभाव आणि संताविषयीचे अनन्य प्रेम.वारकरी लोकांबद्दल आदर ,माउली-नामदेवराय आदी विभूतींवरील प्रेम व कृतार्थता चोखोबांनी आपल्या अभंगातून व्यक्त केली आहेच. माउलींबद्दल चोखोबा म्हणतात , "महाविष्णूचा अवतार । प्राणसखा ज्ञानेश्वर ।।" आपल्या प्रिय ज्ञानदेवांंना चोखोबा प्राणसखा संबोधतात. चोखोबा एका ठिकाणी ज्ञानेश्वरी चे महात्म्य प्रकट करातांनी म्हणतात, "चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ । वाचिता सनाथ जीव होती।।" भक्तश्रेष्ठ नामदेवरायांनी चोखोबांवर माउलींच्या आज्ञेने कृपा अनुग्रह केला व परमार्थात सनाथ केले.चोखोबा नामदेवरायांच्या या कृपेचे वर्णन फार सुंदर शब्दांत करतात, 

"धन्य धन्य नामदेवा । केला उपकार जीवा।।१।।

माझा निरसिला भेवो । दाखविला पंढरीरावो।।२।।

मंत्र सांगितला सोपा । निवारलें भव तापा ।।३।।

माझी कृपेची माउली । चोखा म्हणे पान्हा घाली।।४।।"


 एका अभंगात चोखोबा नामदेवरायांचा गौरव करतात

"धन्य धन्य नामदेव।माझा निरसला भेव ।।१।।

विठ्ठल मंत्र त्रिअक्षरी । खूण सांगितली निर्धारी ।।२।।

ठेवोनी माथां हात । दिलें माझे मज हित ।।३।।

दावियेले तारुं । चोखा म्हणे माझा गुरु ।।४।।"


            चोखोबा हे जातिने महार त्यामुळे त्याकाळी समाजातील व्यवस्थेनुसार गावातील मरुन पडलेले गुरे ढोरे ओढून गावाबाहेर टाकणे , तसेच उच्चवर्णीय समजले जाणारे लोक देहकष्टाचे जे काही काम सांगतील ते करणे व त्याबदल्यात धान्य मिळवणे हेच काय ते उदरनिर्वाहाचे साधन. असेच काम करतांना चोखोबा नित्य भगवत स्मरणात स्थिर असत.कुठल्याही प्रसंगी त्यांची ही स्थिती ढळलेली दिसत नाही.एकदा असेच मेलेले जनावर खूपच मोठे असल्यामुळे एकट्या चोखोबांना ओढून टाकणे शक्य होईना.काय करावे, कोणाची मदत घ्यावी,या विवंचनेत असतांना भगवंत एका सामान्य माणसाच्या रुपात त्यांच्या मदतीला धावून आले.त्यांनी चोखोबांना ढोरं ओढण्यासाठी मदत केली. या प्रसंगाचे वर्णन अनेक संतांनी आपल्या अभंगातून केलेले आहे, 

जनाबाई महाराज म्हणतात, 

"चोख्यामेळ्यासाठी । ढोरें ओढी जगजेठी ।।"

एकनाथ महाराज म्हणतात, 

"गोरियाचे घरी स्वयें मडकी घडी । चोखियाची वोढी गुरेढोरे ।।"

तुकाराम महाराज म्हणतात, 

"नरहरी सोनारा घडू फुंकू लागे । चोखामेळ्यासंगे ढोरें ओढी ।।"

             आपल्या या परमप्रिय आणि श्रेष्ठ शिष्याचे महत्व सर्वांना कळावे यासाठी भगवंतांनी एक लिला केली.( ही आख्यायिका चोखोबांच्या व भगवंतांच्या मधूर संबंधाला दर्शवते) एका प्रसंगी स्वर्गातील इंद्रदरबारी असलेले अमृत नासले.तर सर्व देव भगवान पंढरीनाथांकडे आले व त्यांना हे अमृत पुन्हा शुद्ध करण्याचा उपाय विचारला.तेव्हा देवांनी त्यांना सदैव भक्तीत तल्लीन असलेल्या चोखोबांचा हस्तस्पर्श त्या अमृताला करण्याची आज्ञा केली व त्यायोगेच हे नासलेले अमृत शुद्ध होईल असे सांगितले.देवांनी तसे केले व अमृताचे शुद्धीकरण करुन घेतले.असे हे भगवंतांचे‌ व चोखोबांचे दिव्य प्रेम होते. चोखोबांच्या देहावसनाचा प्रसंग आपल्या सर्वांना सुपरिचित आहे.मंगळवेढ्याला गावकूसाची भिंत अंगावर कोसळून चोखोबांनी देह ठेवला होता.हा दिवस होता शके १२६० प्रयामी संवत्सर ,वैशाख वद्य पंचमी गुरुवार इ.स.१३३८.खरंतर भगवतस्वरुप झालेल्या महात्म्यांनी,आत्मज्ञानी ,देहातीत अवस्थेत स्थिर झालेल्या संतांनी देह कसा ठेवला ही बाब अगदी नगण्य आहे.या गावकूसीत ,भिंतीखाली चोखोबा आदी लोक दाबल्या गेले.पण चोखोबांचा हा विरह भगवान पंढरीनाथांना सहन झाला नाही.त्यांनी आपल्या या परमप्रिय भक्ताला आपल्या नित्य चरणांजवळ जागा दिली .त्यांचे सानिध्य सतत आपल्या जवळ असावे म्हणून नामदेवरायांना मंगळवेढ्यास धाडून ढिगार्याखाली अडकलेल्या अस्थी गोळा करुन आणण्यास सांगितले.

"देव म्हणे नाम्या त्वा जावें तेथें । त्याच्या अस्थि येथे घेऊनी याव्या ।।"

पुढे देवांनी नामदेवरायांना सांगितले की ,ज्या अस्थितून अखंड विठ्ठल विठ्ठल नाम येईल त्याच चोखोबांच्या अस्थी आहेत.नामदेवरायांनी त्या अस्थी गोळा केल्या व टाळ-मृदुंगाच्या घोषात त्या पंढरीला आणल्या.पंढरीत आल्यावर नामदेवरायांनी त्या अस्थी भगवंतांच्या स्वाधीन केल्या.तर अश्रू ढाळीत देवांनी त्या अस्थी आपल्या पितांबरात घेतल्या. त्याचे वर्णन अभंगात पुढील प्रमाणे केले आहे.

"नामदेव अस्थी उचलिता समयी । विठ्ठल नामाचा गजर वैकुंठात जाई ।।

नामदेवे अस्थी आणिल्या पारखोनी । घेत चक्रपाणी पितांबरी ।।

समाधी महाद्वारी दिली विठ्ठल चरणी । अस्थी निक्षेपण आपुलिया हाते ।।

करुनी अनंते पाषाण ठेवी । ओवाळती सत्यभामा राहिमाता रूक्मिणी ।।" 

       भगवान श्री पंढरीनाथांनी स्वतः आपल्या हाताने चोखोबांच्या त्या अस्थींना महाद्वारात वैशाख वद्य त्रयोदशी शुक्रवारी समाधी दिली.

                   चोखोबांच्या चरित्रात त्यांचे समाजव्यवस्था,जातीभेद व भेदाभेद यावर काही परखड शब्द ही आपल्याला बघावयास मिळते.ते खरंच अतिशय चिंतनीय आहेत.नारद भक्ती सुत्रांनुसार शुद्ध प्रेमयुक्त भक्ती ही सर्व योगांची ,ज्ञानाची आणि साधनेची स्वामिनी आहे आणि हेच तत्व आपल्याला चोखोबांच्या चरित्रात बघायला मिळतो.जणू हा या अमृत फळाचा गाभा आहे.

चोखोबांनी समाजातील विषमता,भेदाभेद,तथाकथीत कर्मठता डावलुन मानवतेच्या,भक्तीच्या आणि प्रेमाच्या जोरावर प्रत्यक्ष श्रीपांडुरंगालाही आपलेसे केले.शुद्ध भक्ती हाच अध्यात्माचा ,साधनेचा प्राण आहे,हेच श्रीभगवंतालाही प्रिय आहे हे सर्व जगाला दाखवुन दिलं.भक्ती विरहीत केलेले कर्म,साधन,उपासना ही कोरड्या विहीरीसारखी असते,त्याचा काहीही उपयोग नसतो.

         श्रीचोखोबाराय हे श्रीज्ञानेश्वर माउली, श्रीनामदेवराय,श्रीगोरोबा काका,श्रीसावता महाराजांचे समकालीन. चोखोबांना तत्कालिन वर्णाश्रम धर्माच्या नावाखाली भेदाभेद,अवहेलना ,द्वेष करणार्या व रुढीत जखडलेल्या समाजाने जरी दूर लोटले तरी या सर्व संतांनी चोखोबांना हृदयासी लावले.आपल्या शुद्ध भक्तीमुळे चोखोबांनी या सर्व संतमंडळींमध्ये आपले स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले .इतर संतांच्या वाङमयाच्या तुलनेत चोखोबांचे आज अवघे ३५० अभंग उपलब्ध आहेत.चोखोबा स्वत: निरक्षर होते.जर त्यांना लिहीता वाचता आलं असतं तर काय स्वानुभवाचे शब्दभंडार त्यांनी लिहुन ठेवले असते याची कल्पनाही करवत नाही.शेवटी आपलं सर्वांचं दुर्देवं..पण यातही सुदैवाने मंगळवेढ्यातील एक सज्जन ब्राम्हण कुटुंबातील आनंद भट्ट यांनी चोखोबांचा अधिकार ओळखुन हे सर्व अभंग लिहुन ठेवले.यासाठी संपुर्ण समाज त्यांचा ऋणी राहील.

      चोखोबा हे तथाकथीत अस्पृश्य समाजात जन्माला आले होते.त्यामुळे त्यांना जिवनभर अवहेलना,हेटाळणी,द्वेष,तिरस्कार यांनाच सामोरं जावं लागलं.पण चोखोबांनी व इतर संतांनी कधीही या लोकांचा द्वेष व तिरस्कार केला नाही मुळात हेच खरं संतत्व. उलट चोखोबांनी आपल्या शद्ध भक्ती व शुद्ध भावाने श्रीसंतश्रेष्ठ नामदेवरायां सारखे सद्गुरु मिळवले,प्रत्यक्ष पांडुरंगाला आपलेसे केलं.चोखोबांच्या अभंगांचा जर विचार केला तर इतर संतांच्या तुलनेत त्यात समाजातील या विषमते बद्दलची जास्त वेदना,कळकळ,दु:खाची जाणिव होते. दुर्दैव हे की आजही समाजात असे प्रकार जेव्हा घडतात तेव्हा चोखोबांच्या या अभंगातील जाणीव अजुनच जवळुन प्रखर जाणवते.


हिन याती माझी देवा | कैसी घडे तुझी सेवा ||१||

मज दूर दूर हो म्हणती |तुज भेटूं कवण्यारीती ||२|| 

माझा लागतांची कर | सिंतोडा घेताती करार ||३||

माझ्या गोविंदा गोपाळा | करुणा भाकी चोखामेळा ||४||

     ही वेदना ,ही खंत चोखोबांच्या अभंगात ठिकठिकाणी जाणवते. तथाकथीत अस्पृश्य असलेले चोखोबा प्रत्यक्ष श्रीभगवंतांचे कसे झाले ? कशामुळे भगवंतांनी चोखोबांची ढोरे ओढली ? का भगवंत चोखोबांच्या घरी सुईन म्हणुन गेले ? सुदैवाने श्रीचोखोबांनीच याचे उत्तर ही देऊन ठेवले आहे. चोखोबा म्हणतात

आमुचा आम्ही केला भावबळी | भावे वनमाळी आकळीला ||१||

भावाची कारण भावाची कारण | भावें देव शरण भाविकांसी ||२||

निजभावबळे घातिलासे वेढा | देव चहुंकडा कोंडियेला ||३||

चोखा म्हणे देव भावाचा बांधला | भक्तांचा अंकिला म्हणुनी झाला ||४||


     अशा स्वानंदाच्या सिंहासनावर आरुढ झालेल्या श्री चोखोबारायांच्या चरित्रातील हाच शुद्ध भाव आपल्या सर्व वैष्णवांच्या जिवनात कणभर का होईना पण उतरावा हीच या पुण्यतिथी दिनी श्रीचोखोबारायांच्या चरणी कोटी कोटी प्रार्थना!!!🙏🌸🌺🚩🌹

       ✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी✒️✍️

Monday, May 16, 2022

वैशाख पौर्णिमा शिव अवतार भगवान श्री गोरक्षनाथ यांची प्राकट्य तिथी🙏🌺🌸☘️🚩


भगवान_श्रीगोरक्षनाथप्रभुंचा_प्रगटदिन🌸🌺

                              
सिद्धानां च महासिद्ध ऋषीनांच ऋषीश्वर: ।
योगीनां चैव योगींद्र: श्रीगोरक्ष ! नमोस्तुऽते ।।

                    आज वैशाख शुद्ध पौर्णिमा.आज नाथपंथाचे आद्य प्रवर्तक,नाथ संप्रदायाचे इष्टदेव ,प्रचारक ,आराध्य, प्रत्यक्ष शिवावतार ,भगवान मच्छिंद्रनाथांचे हृदय, हटयोगाचे प्रधान आचार्य, महायोगी ,चिरंजीव ,परम गुरुभक्त असलेल्या भक्तवत्सल भगवान श्री गोरक्षनाथांचा प्रगटदिन...योगीराज भगवान श्रीगोरखनाथ प्रभुंच्या चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏🌸🌺🌸🌼🌹🌿🍃☘️🍀🍂🍁💮

ज्या दिवशी भगवान शिव हे गोरक्षनाथ रुपात प्रगट झाले, त्याचे वर्णन श्रीगोरक्षनाथ कथामृत या ग्रंथात पुढील श्लोकात करण्यात आले आहे..तो श्लोक असा

*वैशाखी शिव पूर्णिमा तिथिवरे वारे शिवे मंगले |*
*लोकानुग्रह विग्रह: शिवगुरु गोरक्षनाथोSभवत ||*
*गोरक्षा चल गह्वरेअतिरुचीरे कैलाशशेला अधरे |*
*दिव्य द्वाद्श वार्षीकेण वपुषा वासा स्वयम ||*
*- गोरक्षअवतार कथामृत*

सत्ययुगाच्या प्रारंभी वैशाख पूर्णिमा मंगळवार या दिवशी
योगानुग्रह द्वारे, सकल लोकांचे ,मंगल करणारे,
सकल सिद्धांचे  गुरु साक्षात भगवान शिव कैलाश पर्वतावरील अधर देशात गोरक्षाचल पर्वताच्या एका गुफेत ,पद्मासन योगमुद्रा धारण केलेल्या,बारा वर्षाच्या बाल रूपात प्रकटले ,
आणि त्यांनी माता पार्वती चा भ्रम नष्ट करुन त्यांना योग मार्गाचे ज्ञान व दिक्षा दिली .यावरुन लक्षात येतं की भगवान गोरक्षनाथ हे चिरंजीव आहेत,अमरकाय योगपुरुष आहेत.चारही युगात भगवान गोरक्षनाथांचा अवातार झाला आहे व ते अखंड कार्यरत आहेत‌. नाथ संप्रदायात भगवान गोरक्षनाथांना भगवान आदिदेव शिवाचा पूर्ण अवतार मानले जाते त्यामुळे त्यांना "शिव गोरक्ष" असे ही संबोधले जाते. "महाकालयोगशास्त्र" या ग्रंथात भगवान शिवांनी मीच गोरक्षनाथ असल्याचे म्हटले आहे.विशेष बाब अशी की आपल्या महाराष्ट्रात नाथसंप्रदायाचा जो प्रचार आहे तो "श्रीमद्भागवत" या ग्रंथातील ११ व्या स्कंदात आलेल्या नव नारायणांच्या वर्णनानुसार झालेला आढळतो.हे नव नारायण आणि त्यांचे नवनाथ अवतार यांचे प्रसिद्ध आणि सर्वश्रुत वर्णन या ग्रंथात आलेले आहे पण यात भगवान गोरक्षनाथांचा उल्लेख नाही कारण हे नारायणाचा अवतार नसून प्रत्यक्ष शिवावतार आहेत. भगवान गोरक्षनाथ हे सत्ययुग,त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगात वेळोवेळी आपल्या दिव्य देहाने प्रकट होत आले आहेत.जोधपूरचे राजा श्रीमानसिंग हे आपल्या काळातील प्रसिद्ध नाथपंथी, त्यांनी आपल्या "श्रीनाथतीर्थावली" या ग्रंथात गोरक्षनाथांच्या चारही युगात अवतरीत होणारे संकेत श्लोक दिले आहेत.या सर्व युगात भगवान गोरक्षनाथांनी भारतात वेगवेगळ्या ठिकाणी तपश्चर्या केली आहे.गुजरात, सौराष्ट्र,पंजाब,कर्नाटक,बंगाल आणि हिमालयातील काही भागात असलेली नाथांची योगपिठे भगवान गोरक्षनाथांच्या अफाट कार्याची व अवतार लिलांची जाणिव देतात. महासिद्धयोगी भगवान गोरक्षनाथांनी सत्ययुगात पंजाब मध्ये , त्रेतायुगात गोरखपूर ,द्वापारात श्रीक्षेत्र द्वारिका, आणि कलियुगात गुजरात मधील काठियावाड येथे तपश्चर्या केली व तो भाग पवित्र केला.महाराजा मानसिंग यांनी आपल्या "श्रीनाथतिर्थावली" या ग्रंथात गोरक्षनाथ व त्यांचे भ्रमण यावर सविस्तर प्रकाश टाकला आहे.काही ठिकाणी भगवान रामचंद्रप्रभू हे भगवान गोरक्षनाथांच्या भेटीला गेले होते असा उल्लेख केला आहे.तसेच भगवान कृष्णचंद्र प्रभु आणि रूक्मिणी मातोश्रींच्या विवाह प्रसंगी भगवान गोरक्षनाथ स्वतः हजर होते.द्वापारयुगात धर्मराज युधिष्ठिर यांनी राजसूय यज्ञाचे आयोजन केले होते आणि त्याचे आमंत्रण द्यायला गोरखपूर येथे पांडवविर भिमसेन यांना पाठविले गेले होते.त्यावेळी सिद्धमहायोगी भगवान गोरक्षनाथ हे समाधी मध्ये तल्लिन असल्यामुळे सेवकांनी त्यांना विश्राम करण्याचा आग्रह केला.भिमसेन हे तिथे काही दिवस मुक्कामी होते .त्यांच्या वजनाने जमिनीचा काही भाग दाबल्या गेला व तिथे एक सरोवर निर्माण झाले अशी एक आख्यायिका नाथ संप्रदायात फार प्रचलित आहे.आज सुद्धा गोरखपूर येथे या द
लिलेची आठवण म्हणून एक स्मारक बघायला मिळते.
खरंतर भगवान श्रीगोरक्षनाथांचे संक्षिप्त चरित्र लेखन हे कुणालाही शक्य नाही पण त्यांच्याच चरणी प्रार्थना करुन हे धाडस करतो आहे आणि त्याला कारण ही तसेच आहे.भगवान श्रीगोरक्षनाथ हे विलक्षण ,अनन्यसाधारण गुरु भक्त होते.श्रीगोरख प्रभुंच्या प्रत्येक लिला हा सर्व जगातील गुरुभक्तांसाठी एक एक मोलाचा दगड आहे.आपल्या सद्गुरु प्रती असलेली त्यांची निष्ठा इतकी विलक्षण आहे की प्रत्येक लिला एक स्वतंत्र भाग वाटतो.त्यामुळे हे धाडस केले आहे.श्रीप्रभुंच्या चरित्रातील काही ठराविक मोती वेचून इथे अल्पबुद्धी ने मांडतो आहे.काही अनावधानाने चुकीचे लिहिल्या गेले‌ तर ती फक्त माझी अल्पबुद्धी आहे. इथे एक विशेष नमुद करतो की उत्तरेकडील नाथ संप्रदाय आणि महाराष्ट्रातील नाथ संप्रदाय यात बरेच तात्विक मतभेद आहेत.उत्तरेकडील नाथ संप्रदायाचे लोक हे मालुकवी लिखित "नवनाथ भक्तीसार" किंवा "श्रीमद् भागवत" ग्रंथात आलेले नवनाथांचे वर्णन प्रमाण मानत नाही तरीही आपण हे मतभेद बाजुला ठेऊन पूर्ण श्रीशिवावतार असलेले महासिद्ध महायोगी पूर्णब्रह्म श्री गोरक्षनाथ प्रभुंच्या लिलांचे स्मरण करुयात.कारण त्यातील मदभेद दूर सारुन जर विवेक बुद्धी ने त्यांचे निरीक्षण केले तर लक्षात येईल की ही तर जिवनात सद्गुरु निष्ठेची अमृत संजिवनी आहे.
                                         

अगदी चारही युगात भगवान गोरक्षनाथ प्रगट रुपाने सदेही हजर होते व त्यांनी या चारही युगात अनेक सिद्ध, महापुरुष आणि योग्यांना भेट दिली आहे.या संदर्भात अनेक कथा आहेत.पण भगवान श्री गोरक्षनाथांच्या जन्माची एक कथा फार प्रचलित आहे.ज्यात भगवान मत्सेंद्रनाथांनी एका स्त्रीला पुत्रप्राप्तीसाठी झोळीतील भस्म दिले‌ व ते माघारी परतले.पुन्हा बारा वर्षांनी ते परत त्या घरी भिक्षेला गेले व त्या बालका संबंधी चौकशी केली तेव्हा ते भस्म त्या स्त्री ने उकिरड्यावर फेकल्याचे त्यांना कळले.ज्यावेळी उकिरडा साफ करुन त्या जागेवर खोदण्यात आले तेव्हा तिथे महासिद्ध भगवान गोरक्षनाथ हे प्रकट झालेले होते. काही ठिकाणी ही लिला बंगाल प्रांतात घडली होती असा उल्लेख आहे तर महाराष्ट्रात ही लिला गोदावरी काठी घडली होती असे मानले जाते.श्रीप्रभुंच्या प्राकट्यासंबंधी दोन कथा आणखी प्रसिद्ध आहे.त्यातील एक अशी की,भगवान श्री विष्णू हे कमलातून एका विशाल जलात प्रगट झाले.त्यांनी आजुबाजुला बघितले तर पाणीच पाणी  भरलेले होते.त्यांनी हे बघून पाताळाकडे बुडी मारली.पाताळात भगवान श्री गोरक्षनाथ ध्यान समाधीत होते.भगवान विष्णूंनी त्यांना सृष्टी रचना करण्यासाठी प्रार्थना केली तेव्हा गोरखप्रभुंनी आपल्या धूनीतील भस्म काढून भगवान व विष्णु ला दिले व सृष्टी रचण्यास सांगितले.ही लोककथा उत्तरेकडे फार प्रचलित होती.असे भगवान गोरखनाथ त्रिदेवांनाही पुज्य मानले जातात.तसेच एक कथा "गोरखविजय" या बंगाली भाषेतील काव्यात फारच वेगळी आली आहे.त्यामध्ये त्यांच्या अयोनीज स्वरुप प्रगटीकरणावर व अस्तित्वावर प्रकाश पडलो.त्यात असे म्हटले आहे की,श्रीशिवांच्या नाभितून महासिद्धयोगींद्र मत्सेंद्रनाथ, हाडापासून श्रीहाडिपा ( सिद्धयोगींद्र जालंदरनाथ), काळापासून कानपा अर्थात सिद्धकान्हिपा आणि जटांपासून सिद्धयोगींद्र श्रीगोरक्षनाथांची उत्पत्ती झाली आहे.अशा प्रकारे अयोनिज असलेल्या महासिद्धयोगी भगवान गोरक्षनाथांच्या प्राकट्याबद्दल कथा प्रसिद्ध आहेत.यातील भस्माची कथा जास्त संयुक्तिक आणि सर्वश्रुत प्रसिद्ध आहे.गोदावरीच्या काठी चंद्रगिरी येथे ही घटना घडली अशी मान्यता आहे.
                             आपल्या झोळीतील भस्मातून उत्पन्न झालेल्या या बारा वर्षीय आयोनिज महासिद्धाला भगवान श्रीमत्सेंद्रनाथांनी अनुग्रह दिला व नाथ पंथाचे शांभव वैभव असलेली दिक्षा दिली.खरंतर जन्मसिद्ध असलेल्या गोरक्षनाथांना या दिक्षेची ही गरज नव्हती पण जगाच्या कल्याणासाठी त्यांनी दाखविलेल्या मार्गावर ते स्वतः आधी चालले .महायोगी आधी आचरण करतात आणि मग जगाला स्वानुभव सांगतात."गुरुंशिवाय तरणोपाय नाही"  या त्रिकालबाधीत सत्याला भगवान गोरक्षनाथांनी आपल्या सर्व ग्रंथ ,रचनांमध्ये जागोजागी प्रगट केले आहे.त्यांनी आपल्या "सिद्धसिद्धांतपद्धती" या ग्रंथात एका ठिकाणी स्पष्ट म्हटले आहे की, "परमपदाची प्राप्ती ही श्रीसद्गुरुंच्या प्रसन्नतेमुळेच होऊ शकते."
दिक्षाविधी झाल्यानंतर भगवान मत्सेंद्रनाथ गोरक्षनाथांना बरोबर घेऊन जगन्नाथ पुरीच्या यात्रेला गेले.या प्रवासात ते एका कनकगिरी नावाच्या गावाजवळ येऊन पोचले. त्यावेळी भगवान मत्सेंद्रनाथांना शिष्य गोरक्षाची परिक्षा घेण्याचा विचार आला.( हा प्रसंग आपल्यातील बहुतेक जणांना श्रृती असेलच त्यामुळे मी तो परत विस्त्तृत सांगत नाही)  मत्सेंद्रनाथ गोरक्षनाथांना म्हणतात, "बाळ मला खूप भुक लागली आहे तेव्हा तु जवळच्या गावात जाऊन भिक्षा घेऊन ये." हे ऐकून भगवान गोरक्ष जवळच्या कनकगिरी येथील गावात गेले.एका घरी धामधूम बघून गोरक्षनाथ त्या घरी गेले.तेथे श्राद्ध विधी सुरु होता.भगवान गोरक्षांच्या बाल सुकुमार रुपाला बघून आतील स्त्री बाहेर आली तिथे नाथांच्या झोळीत श्राद्धाच्या अन्नाची सर्व भिक्षा वाढली.ती घेऊन ते परत सद्गुरु मत्सेंद्रनाथांकडे आले.नाथांनी त्यातील उडदाचे वडे खुप आवडल्याचे गोरक्षनाथांना सांगितले.आपल्या शिष्याची परिक्षा घेण्याचा नाथांचा विचारच सुरु होता.त्यामुळे जेवणानंतर ते गोरक्षनाथांना म्हणाले की, "हे वत्सा! मला आणखीन उडदाचे वडे खायचे आहेत त्यामुळे तू परत ही भिक्षा मागून घेऊन ये." गोरक्षनाथ परत त्या घरी जातात.ती स्त्री गोरक्षनाथांना बघून विचारात पडते तोच "अल्लख निरंजन" म्हणून गोरक्षनाथ वड्यांची भिक्षा मागतात.त्या बाईला गोरक्षनाथ हे जिव्हाल्लोलूप वाटतात.त्यामुळे ती गोरक्षनाथांना टाकून बोलते. तरीही नाथ तिला विनंती करतात की माझ्या सद्गुरुंसाठी ही भिक्षा हवी आहे.तेव्हा ती बाई रागाने म्हणते की, "मी वडा तर देते पण मला आपला डोळा काढून द्या." सहज ती ते रागाने बोलली आणि घरात गेली.इकडे गोरक्षनाथांनी आपला एका डोळ्याची बाहूली काढून दुसर्या हातावर ठेवली.त्यांच्या डोळ्यातून भळाभळा रक्त वाहू लागले.ती स्त्री हे सर्व बघून आश्चर्यचकित झाली.घाईघाईने वडे नाथांच्या झोळीत टाकून ती घरात गेली.इकडे गोरक्षनाथांनी आपली ती जखम पट्टीने घट्ट बांधली व गुरुरायां कडे परत आले.आपल्या सद्गुरुंना आणलेली भिक्षा दिली व नम्रपणे ग्रहण करण्याची प्रार्थना केली.डोळ्यावरीव  पट्टी बघून मत्सेंद्रनाथांनी गोरक्षनाथांना कारण विचारले .सद्गुरुंशी खोटे बोलू नये म्हणुन गोरक्षनाथांनी घडलेला सर्व वृत्तांत जसाच्या तसा सद्गुरुंना सांगितला.हा वृत्तांत ऐकुन भगवान मत्सेंद्रनाथ अतिशय आनंदीत झाले.त्यांनी तात्काळ नाथांच्या डोळ्यांवर भस्म लावले व योगसिद्धीने शिष्य गोरक्षनाथांचा डोळा पूर्ववत केला.त्यानंतर त्यांनी गोरक्षनाथांना आशिर्वाद दिला व म्हटले, "हे वत्सा! मी तुझ्या भक्तिने प्रसन्न झालो आहे.तू सर्व योगविद्यांमध्ये पारंगत आणि परम यशस्वी होशील." अशा प्रकारे या परिक्षेत गोरक्षनाथ प्रभु उत्तिर्ण झाले व त्यांनी आपले सच्छिष्यत्व सिद्ध केले. यानंतर भगवान गोरक्षनाथांच्या चरित्रात आलेली अतिशय दिव्य कथा म्हणजे अयोनिज असलेल्या भगवान गहिनीनाथांचे प्राकट्य.लहान मुलांसोबत खेळताना गोरक्षनाथ आपल्या सद्गुरुंनी दिलेला संजिवनी मंत्र पाठ करुन लागले.खेळता खेळता त्यांनी एक मातीचा पुतळा तयार करु लागले.संजिवनी मंत्र म्हटल्यामुळे तो पुतळा सजिव झाला.त्या बाळाला एका ब्राह्मण दांपत्याकडे देऊन ते आपल्या सद्गुरु समवेत पुढील यात्रेस गेले.पुढे मोठ झाल्यावर या बाळाला भगवान गोरक्षनाथांनी आपल्या परंपरेचे वैभव दिले ,अनुग्रह दिला व तप करण्याकरिता सह्याद्री पर्वतावर पाठवीले. हेच भगवान गहिनीनाथ आपल्या परमाराध्य ज्ञानेश्वर माउलींचे आजेगुरु.यांनीच पुढे हे परंपरेचे शांभव वैभव निवृत्तीनाथांना दिले व नंतर निवृत्ती नाथांनी माउलींना.अशी ही दिव्य गुरु परंपरा. त्यानंतर गोरक्षनाथ आणि कानिफनाथांच्या मधील संवाद व आंब्यांच्या फळांचा झालेला चमत्कार आला आहे जो अतिशय दिव्य आहे.(शब्दविस्तारामुळे तो इथे देत नाही )
यापुढील प्रसंग संपूर्ण भारतात ,नाथ संप्रदायात ऐव्हाणा घराघरात सुपरिचित आहे.तो म्हणजे स्त्री राज्यात संसार करत लिला करणार्या गुरु मत्सेंद्रनाथांना सोडविण्यासाठी  मृदुंगातूनही "चलो मछिंदर गोरख आया" हा नाद निर्माण करणारे परमशिष्य गोरक्षांचा प्रसंग.ही कथा फार मोठी आहे यात भगवान गोरक्षनाथ आणि महारुद्र हनुमंताचा युद्ध प्रसंग आला आहे.या युद्धात भगवान गोरक्षनाथांनी भगवान श्रीहनुमंतांनाही हरविले होते.भगवान मायारुप श्री मत्सेंद्रनाथ स्त्रीराज्यात का गेले? एक योगी महासिद्ध असुनही ते या मायेत कसे अडकले अशा प्रकारच्या अनंत शंका आपल्या सर्वांच्या मनात वारंवार उठल्या असतीलच. याला मोठी पार्श्वभूमी आहे. तरी त्यावर आता विस्तृत लिहीत नाही पण एवढेच सांगेन की ही त्यांचीच लिला होती.मैनावती ला तसा आशिर्वाद ही होता आणि भगवान शिवांनी मासोळीच्या पोटात लपून ज्ञान ऐकले म्हणून तसा शाप ही होता. यांची कारण मिमांसा मोठी आहे ती परत केव्हा तरी नक्कीच बघु.या स्त्रीराज्यातून सुटल्यावर भगवान मत्सेंद्रनाथ व गोरक्षनाथ हे यात्रा करत तैलंगराज्यात आले.तिथे संपूर्ण पर्वतच भगवान गोरक्षनाथांनी सोन्याचा केला होता.नंतर त्या पर्वताला त्यांनीच गेरु पर्वतात परावर्तित केले.यानंतर जालिंदरनाथांचा उद्धार आणि भर्तृहरीनाथांवर  अनुग्रह करुन नाथांनी कृपा केली.यापुढे गोरक्षचरित्रातील अतिशय दिव्य आणि अद्भुत अशी कलकत्ता कालीची लिला आली आहे. ज्यात भगवान गोरक्षनाथ आणि भगवती काली चे युद्ध झाले होते व त्यात काली मातेला गोरक्षनाथांनी युद्धात पराभूत केले व कालीघाटावर होणारी पशुबली बंद‌ केली होती.असे म्हणतात की, काली घाटावरील काली मातेची स्थापना ही भगवान गोरक्षनाथांनी केली होती.
                                    यानंतर धर्मनाथांचा प्रसंग , त्यांच्यावर कृपा करुणा.त्यानंतर चौरंगीनाथांवर कृपा अनुग्रह .हे दोन्ही प्रसंग मोठे आहेत पण शब्द मर्यादा बघता इथे ते देणे योग्य होणार नाही.पुढे चर्पटीनांथांची भगवान गोरक्षांच्या कौपिनातून उत्पत्ती झाल्याची लिला व चर्पटीनांथांवर कृपा अनुग्रहाचा दिव्य प्रसंग येतो.राजस्थान येथील मेवाड राज्याचे संस्थापक श्रीबाप्पा  रावळ यांच्यावर भगवान गोरक्षनाथांनी कृपा केली.त्यांना गोरक्षनाथांनी अभीमंत्रीत केलेली दुधारी तलवार दिली व त्यांना सर्वत्र विजयी होण्याचा आशिर्वाद दिला होता.याच आशिर्वादाने श्री बाप्पा हे चित्तोडचे राजा झाले.त्या तलवारीची पुजाअर्चा चित्तोडला नाथपंथी संतांकडून अनेक वर्षे होत आली आहे‌.कालांतराने नागदाच्या डोंगरावर भगवान श्री शंकराची स्थापना केली.आज हे स्थान एकलिंगजी या नावाने प्रसिद्ध आहे जे संपूर्ण राजपूत राजांचे आराध्य आहे.नेपाळवर व तेथील राजघराण्यावर भगवान मत्सेंद्रनाथ आणि गोरक्षनाथांची कृपा दृष्टी सदैव अखंड आहे. गोरक्षनाथप्रभुंच्या कृपेमुळे तेथील राजाने आपल्या राजवंशाचे नाव "गोरखा" असे ठेवले.यावेळी तेथील राजघराण्यावर केलेली कृपा ,दुष्काळाचे सावट दूर करण्याचा चमत्कार असे अनेक प्रसंग आहेत.तसेच राजस्थान मधील गोगावीर यांच्यावर कृपा,श्रीरतननाथ यांच्यावर कृपा,श्रीगोपीचंद अर्थात दृमिलनारायण यांना दिलेल्या अभयदानाचा प्रसंग.तसेच मेहेर येथील शारदा भवानीचे परमभक्त आल्ल्हा उदल यांना भगवान गोरक्षनाथांनी दिक्षा देऊन कृतार्थ केले.आजही ते चिरंजीव आहेत.
             भगवान श्री गोरक्षनाथ आणि आदिगुरु, योगमार्गाचे आद्य भगवान श्री दत्तात्रेय प्रभु यांची भेट व झालेला संवाद प्रसिद्ध आहे.अशीच एक लिला एका ठिकाणी वाचण्यात आली होती ती तशीच इथे देतो आहे.
{ स्त्री-राज्यातून मच्छिंद्रनाथांची सुटका केल्यावर मच्छिंद्र-गोरक्ष ही गुरू-शिष्यांची जोडगोळी नाना ठिकाणची भ्रमंती करत होती. एके दिवशी मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना भिक्षा आणण्यास सांगितले. त्यावेळी त्यांचा मुकाम एका पर्वतावर होता. आजूबाजूस चिटपाखरूही नव्हते. जवळपास गावही दिसत नव्हते. भिक्षा मागायला जाणार कुठे या चिंतेत असताना गोरक्षनाथांना मैनावाती राणीचे बोल आठवले. स्त्री-राज्यातून निरोप घेताना तीने "कधीही भिक्षा मागायला या" असे सांगितले होते.  गोरक्षांनी योगसामर्थ्याने आपले भिक्षापात्र आकाशमार्गाने स्त्री-राज्यात धाडले. ते भिक्षापात्र थेट राणीपुढे जाऊन पडले. राणीने नाथाचे पात्र लगेच ओळखले आणि ती आश्चर्यचकीत झाली. तीलाही आपले शब्द आठवले आणि ही गोरक्षांचीच किमया आहे याची खात्री पटली. एवढ्याशा पात्रातली भिक्षा तीघांना (मच्छिंद्र, गोरक्ष आणि मीननाथ) कशी पुरणार अशी काळजी वाटून तीने आपल्या दासींना त्या पात्रात भरपूर भिक्षा वाढण्यास सांगितले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेवढी भिक्षा घालावी तेवढे ते पात्र मोठे मोठे होत होते. अगदी मारूतीच्या शेपटासारखे. शेवटी राणी अहंकार सोडून मनातल्यामनात मच्छिंद्रनाथांना शरण गेली. तत्क्षणी पात्र पूर्ण भरले आणि परत अवकाशमार्गाने गोरक्षनाथांकडे निघाले.वाटेत एका पर्वतावर अत्रिपुत्र दत्तात्रेय बसले होते. त्यांनी आकाशमार्गाने उडत जाणारे हे भिक्षापात्र पाहिले. त्यांना विस्मय वाटला. हे कोणाचे पात्र आहे ते विचारावे या हेतूने त्यांनी हातातला दंड वर केला. पात्र घेवून जाणारी सिद्धी त्या दंडाला आपटून खाली पडली. दतात्रेयांनी तीला ठावठिकाणा विचारला आणि पुढे जाण्याची अनुमती दिली. सिद्धी भिक्षापात्रासह गोरक्षांनाथांकडे पोहोचली आणि म्लान वदनाने उभी राहिली. गोरक्षनाथांनी तीला उशीर होण्याचे कारणं विचारले. सिद्धीने झालेला सर्व प्रकार कथन केला.

आपल्या सिद्धीला कोणी गोसाव्याने दंड मारून पाडले हे एकून गोरक्षनाथांचा क्रोध अनावर झाला. आपल्या योगसामर्थ्याचा अपमान करणाऱ्याला शासन करायला ते त्या पर्वतावर पोहोचले. गोरक्षनाथांचा क्रोध म्हणजे ज्वालामुखीच. पर्वतावर दत्तात्रय ध्यानस्थ बसले होते. गोरक्षनाथांनी क्रोधायमान होऊन दातात्रेयांवर झेप घेतली. पण अघटीत घडले. गोरक्ष दत्तात्रेयांच्या शरीरातून त्यांना काहीही इजा न करता आरपार निघून गेले. पाण्यातून काठी फिरवली तरी ते जसे अभेद रहाते अगदी तसे. गोरक्ष विस्मयचकीत झाले. दत्तात्रेयांनाही गोरक्षांची परीक्षा पहावी असे वाटले. ते गोरक्षनाथांना म्हणाले, "गोरक्षा! तुझ्या सिद्धींविषयी मी बरेच ऐकून आहे. तु सिद्धांचा सिद्ध आहेस असे ऐकले आहे. तुला ब्रह्मांडसमाधीचा अनुभव आहे म्हणे. जरा पंचतत्वात लीन होवून दाखव बरे. बघूया तुला शोधता येतय का ते."

गोरक्षनाथ अवश्य म्हणत तेथून गुप्त झाले आणि समुद्रात एक छोटा मासा बनले. दत्तात्रेयांनी ध्यान लावले आणि क्षणात गोरक्षांचा ठाव शोधला. पटकन पाण्यात हात घालून त्यांनी माशाच्या रूपातील गोरक्षनाथांना बाहेर काढले. मग ते गोरक्षनाथांना म्हणाले, "आता मी अदृश्य होतो. तू जर मला शोधू शकलास तर तू खरा सिद्ध. मग माझे सर्वस्व तुला दिले असे समज."

गोरक्षाने होकार देताच दत्तात्रेय अदृश्य पावले. गोरक्षाने चौदा भुवने, तीर्थक्षेत्रे, गुहा, वने, समुद्र सर्व शोधले पण दत्तात्रेय काही त्यांना सापडले नाहीत. आपण हरलो असे लक्षात येऊन गोरक्षांनी मच्छिंद्रनाथांचा धावा केला. मच्छिंद्रनाथ तात्काळ पर्वतावर प्रकट झाले. गोरक्षांनी झालेली हकीकत सांगितली. ती एकल्यावर मच्छिंद्र म्हणाले, "गोरक्षा! हा नक्कीच अत्रेय आहे. त्यांच्याशिवाय अन्य कोणालाही असला अचाट प्रकार करता येणार नाही. त्याला शोधण्याचा मार्ग एकच की तू लीन भावाने पंचतत्वात विलीन झालेल्या दत्तात्रेयांना मनोध्यानाने शोध." गुरू आज्ञेनुसार गोरक्षांनी तसे करताच दत्तात्रेयांचे दिव्य स्वरूप त्यांना दृगोचर झाले. "अलक्ष" शब्द गर्जून गोरक्ष त्यांना "आदेश" करते झाले .}
अशा या दिव्य अवताराने अमनस्कयोग, ज्ञानदीपप्रबोध, गोरक्षपद्धती, गोरक्षसंहिता, योगमार्तंड, गोरक्षकल्प, अवधूतगीता, गोरक्षगीता, गोरखबानी; अमरौघशासनम, महार्थमंजरी, सिद्धसिद्धान्तपद्धती या ग्रंथातून नाथ संप्रदायाचे ज्ञान वैभव प्रगट केले आहे. भगवान श्री गोरक्षनाथांचे आजही अवतार कार्य सगुण रुपात अखंड सुरु आहे.अगदी अलिकडच्या काळात आपल्या सर्वांना सुपरिचित असलेल्या दिव्य नाथपंथी स्त्री संत सद्गुरु जोगण विठामाई यांना प्रत्यक्ष भगवान गोरक्षनाथांचा अनुग्रह लाभला होता.विठामाईंचा काळ अगदी अलिकडचा काही दशकांपूर्वीचा आहे.नित्यवंदनीय,नित्य पूजनीय आणि नित्य स्मरणीय अशा या दिव्य भगवंतांच्या अवताराला आजच्या त्यांच्या प्राकट्यतिथी निमीत्त मी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो आणि माझ्या या बोबड्या बोलांच्या शब्दसुमनांजलीला श्रींच्या सुकोमल चरणी अर्पण करतो.

          ✒️✍️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️

Friday, May 13, 2022

परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् सद्गुरु लोकनाथतिर्थ स्वामी महाराज 🌺🌸🙏🚩

 

                    श्रीलोकनाथाय_नमो_नमः ।।

शक्तिपाताचार्य_परमहंस_परिव्राजकाचार्य_श्रीमद_लोकनाथतिर्थ_स्वामी_महाराज_यांची_१३१वी_जयंती🙏🌸🌺


अखंडानंद रुपाय चिदानंदात्मरूपिणे ।

चिन्मयानंदरूपाय श्रीलोकनाथाय नमो नमः ।।

                              अलौकिक,दिव्य आणि विहंगम प्राचीन अशा शक्तिपात योग परंपरेच्या गंगेला हिंदूस्थानातील दक्षिणेकडे प्रवाहीत करणारे महायोगी शक्तिपाताचार्य परमहंस परिव्राजकाचार्य योगीराज समर्थ सद्गुरु श्री लोकनाथ तिर्थ स्वामी महाराज यांची आज १३१ वी जयंती.श्रीस्वामी महाराज हे एक विलक्षण महापुरुष,योगीराज श्री गुळवणी महाराज यांच्याकडे शक्तिपातयोग परंपरेची एक शाखा श्री स्वामी महाराजांकडून आलेली आहे.श्रीगुळवणी महाराज हे श्री स्वामी महाराजांना आपल्या गुरुस्थानीच मानत.प.पू.श्री स्वामी महाराजांचा जन्म हा ८ मे १८९१ रोजी वैशाख शुद्ध द्वादशी या तिथीला ढाका यथील चक्रवर्ती घराण्यात झाला.श्री स्वामी महाराजांचा परिवार हे ढाका येथील शक्तिपिठ असलेल्या ढाकेश्वरीचे परंपरागत पुजारी होते. श्री स्वामी महाराजांचे पाळण्यातील नाव हे योगेश्वरचंद्र असे ठेवण्यात आले.अतिशय तेजस्वी,देखने असणारे हे बालक भगवती श्रीढाकेश्वरीच्याच कृपेने शुक्लपक्षीच्या चंद्राप्रमाणे वाढू लागले ,तिच्याच मंदिरात खेळत बागडत असे,तासंतास भगवतीची पुजा पहात असे.ढाकेश्वरीच्या मंदिरात होणाऱ्या किर्तन, भजन,प्रवचनात हे बाळ रंगुन जात असे.शालेय शिक्षणात योगेश्वरचंद्र अतिशय तल्लख होते.शाळेत त्यांच्या तल्लख बुद्धीमत्तेमुळे ते बरेच प्रसिद्ध होते.पण वयाच्या अकरा-बारा वर्षी योगेश्वरांच्या जिवनात एक अतिशय दु:खद घटना घडली जिने त्यांच्या संपूर्ण जिवनालाच कलाटणी मिळाली.योगेश्वरांचे वडिल बाबुजी हे वयाच्या ३२-३३ व्या वर्षी देवाघरी गेले.संपूर्ण घरावरील छत्रच जणू हिरावून गेले.त्यावेळी योगेश्वरचंद्र पाचवी इयत्तेत शिकत होते.अचानक आलेल्या या आपत्तीमुळे त्यांना आपले‌ शालेय शिक्षण सोडून नोकरी पत्करावी लागली.ते एका तागाच्या गिरणीत कारकुनची नोकरी करु लागले.संकटांची श्रृंखला एकापाठोपाठ सुरुच होती पण त्याचा वेगळाच परिणाम योगेश्वरांच्या मनावर झाला.ते यामुळे जास्तितजास्त अंतर्मुख होऊ लागले.त्यांना आता भगवती विश्वजननी जगदंबेच्या दर्शनाची ओढ लागली होती.ते अगदी व्यथित होऊन, कळकळीने, अश्रुपूर्ण नेत्रांनी भगवतीला प्रार्थना करीत, "आई मला रस्ता दाखव! पुढे घेऊन जाणार्यांची भेट करुन दे ! मला या सर्वातून मुक्त कर.आई ! तुझ्याशिवाय मला कुणाचाही आधार नाही.कुणाचाही भरोसा नाही.!!" योगेश्वरांच्या मनाची ही अवस्था त्यांच्या मातोश्रींना ठाऊक होती.बालपणापासून त्यांची अंतर्मुख वृत्ती त्यांना माहित असल्यामुळे त्यांना कल्पना होती की कधीतरी हा आपल्याला सोडुन जाणार आहे. एक दिवस रात्री त्यांना देवीचा दृष्टांत झाला.त्यांना सद्गुरुंकडे जाण्याचा मार्ग दाखविला,गावाच्या ,घराच्या खुणा दाखविल्या आणि एका व्यक्तिचे दर्शन ही दिले.योगेश्वर त्यावेळी २१ वर्षांचे होते.दृष्टांत झाल्याबरोबर ते झोपेतून उठले जगदंबेच्या चरणी साष्टांग दंडवत घातला व त्यांनी तात्काळ सद्गुरु प्राप्तीसाठी गृहत्याग केला.

                                  लवकर त्यांची भेट श्रीमदात्मानंद ब्रह्मचारी यांच्याशी झाली. हे श्रीमदात्मानंद दुसरे तिसरे कुणी नसून प.प.शंकरपुरुषोत्तमतिर्थ स्वामी महाराज होते.त्यांचे‌ वर त्यावेळी २२ वर्षांचे होते.एवढ्या कमी वयात ही श्रीशंकर पुरुषोत्तम स्वामी महाराजांना आपल्या सद्गुरु श्री नारायणतिर्थ स्वामी महाराजांकडून दिक्षा देण्याचे परंपरेचे अधिकार मिळाले होते यावरुन त्यांच्या विलक्षण अधिकाराची कल्पनाच आपण करु शकतो.योगेश्वरचंद्रांनी श्रीशंकरपुरुषोत्तमतिर्थ स्वामी महाराजांची खुप सेवा केली.त्यांची अविश्रांत सेवा पाहून श्रीशंकर पुरुषोत्तम महाराजांच्या मनाला संतोष झाला.श्रीयोगेश्वरांनी श्री गुरुदेव शंकरपुरुषोत्तमतीर्थांना एकदा दिक्षेसंबंधी विचारणा केली तेव्हा त्यांनी स्पष्ट म्हटले की, "आजन्म नैष्टिक ब्रह्मचारी रहाण्याची तयारी असेल तर दीक्षेचा विचार करता येईल." योगेश्वरांनी लगेच होकार दिला. काही काळाने श्रीगुरुदेवांनी योगेश्वरांना नैष्ठिक ब्रह्मचर्याची दिक्षा दिली व त्यांचे नाव "ब्रह्मचारी योगेशचंद्र प्रकाश" असे ठेवले. श्रीशंकर पुरुषोत्तमतीर्थ या आपल्या नव्या ब्रह्मचारी शिष्याला घेऊन आपल्या सद्गुरु श्री नारायणतीर्थदेवांकडे आले.श्रीनारायणतिर्थदेवांना ब्रह्मचारी योगेशचंद्रांना बघुन खुप समाधान वाटले.काही काळतच श्री गुरुदेव शंकरपुरुषोत्तमतीर्थांनी योगेश्वरांना शक्तिपात दिक्षा देऊन कृतार्थ केले.आपले गुरु श्रीशंकर पुरुषोत्तम तिर्थ आणि परमगुरु श्रीनारायणतीर्थ देवांच्या प्रत्यक्ष सहवासाने , मार्गदर्शनाने आणि कृपेने श्री योगेशचंद्रांचे जिवनच उजळून निघाले. श्रीनारायणतिर्थदेवांची सेवा ,आश्रमातील कामे ,स्वैपाक अशी सर्व सेवा योगेश चंद्र करु लागले.पुढील दोन वर्षांच्या काळात योगेशचंद्रांनी आपल्या परमगुरु आणि गुरुंच्या मार्गदर्शनाखाली कठोर सेवा ,साधना केली.यानंतर योगेशचंद्र आपल्या आईला भेटायला ढाक्याला घरी आले.आईने आनंदाने योगेश्वरांना या‌ प्रकारचे दिव्य अध्यात्मिक जिवन जगण्याची,संन्यास घेण्याची परवानगी दिली‌. यावेळी त्यांचे‌ वय जेमतेम २२/२३ असेल.ढाक्यातील श्रीत्रिपुरलिंगसरस्वती यांच्या मठात श्रीशंकर पुरुषोत्तमतीर्थ स्वामी महाराज व योगेश्वर हे मुक्कामी होते.योगेश्वरांंची गुरुभक्ती ,विरक्ती आणि परमार्थाची तळमळ बघून त्रिपुरलिंगसरस्वती स्वामी त्यांच्यावर अतिशय खुश होते.पुढे श्री शंकरपुरुषोत्तमतीर्थांनी श्रीत्रिपुरलिंगांना योगेश्वरला संन्यास दिक्षा देण्याची प्रार्थना केली. पुढे काही काळाने एक सुमुहूर्त बघून त्रिपुरलिंगसरस्वती स्वामी महाराजांनी योगेश्वरांना संन्यास दिक्षा दिली व ते आता "स्वामी चिन्मयानंद सरस्वती झाले." इतक्या कमी वयात योगेश्वरचंद्र संन्यास आश्वमात प्रवेश करते झाले. एक विशेष म्हणजे याच वर्षी इ.स.१९१४ ला गरुडेश्वरी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज समाधिस्थ झाले आणि इकडे याच वर्षी श्रीयोगेश्वरांनी संन्यास दिक्षा घेतली.यानंतर स्वामी महाराज काही काळ बंगालमध्ये राहले पण कही घडामोडी घडल्या व स्वामी महाराज आपल्या सद्गुरु श्री शंकरपुरुषोत्तमतीर्थांकडे काशीला निघून आले. ( खुप विस्तार नको म्हणून बहूतेक प्रसंग गाळतो आहे ) पुढे १९२० पर्यंत स्वामी महाराज आपल्या गुरुदेवांचे जवळ काशीत राहिले.याच काळात ते अनेकवेळा हिमालयात यात्रेला, साधनेला जाऊन आले.पुढे स्वामी महाराज हिमालयातील टिहरी गढवाल भागात दिड-दोन वर्षापर्यंत एकांतात साधना मग्न राहिले.याकाळात ते कुठे राहिले ,त्यांनी कसला आहार घेतला ,त्यांचा दिनक्रम काय होता या बाबतीत कसलीही माहिती उपलब्ध नाही. एक दिवशी साधना सुरु असतांना भगवतीचा स्पष्ट आदेश स्वामींना झाला की , "दक्षिणेकडे चल." स्वामींनी याकडे दुर्लक्ष केलं तर दुसरे दिवशी ,तिसरे दिवशी तोच आदेश परत आला तेव्हा स्वामींना कळून चुकले की भगवतीची इच्छा आपण दक्षिणेकडे जाण्याची आहे आणि ते दक्षिणेकडे निघाले.पुढे एक चातुर्मास संदर्भ मध्ये झाला.चातुर्मास झाल्यावर आता दक्षिणेकडे जायचे कुठे या चिंतनात असतांनाच स्वामींना स्पष्ट आदेश झाला की, अजून दक्षिणेत जा.दक्षिण दिशा ही तुझी कर्मभूमी आहे.तुझ्याकडून माझा प्रचार दक्षिणेकडे होणार आहे.तुझे परमगुरु श्रीनारायणतिर्थांना मी आशिर्वाद दिला आहे.तुझ्या हातात हा स्फुल्लिंग बांधला आहे.याचा प्रचार सर्वत्र होणार आहे.तुला हेच कार्य करायचे आहे.चल! अजून दक्षिणेकडे चल! येथे थांबून नको!." हा स्पष्ट आदेश मिळाल्यावर स्वामी महाराज आनौदित झाले.ते आसनावरुन उठले दंड-कमंडलू घेतला व तडक गुहेबाहेर आले.दक्षिणेकडे निघण्यासाठी हथरस स्टेशनवर आले.जवळ पैसे नव्हते .तेवढ्यात एक धनिक यात्रीक आला व त्याने स्वामींना होशंगाबादचे तिकीट काढून दिले.

                 स्वामी आता भगवती माॅं नर्मदेच्या काठी आले होते.तेथे पोचल्यावर एका भुताटकी असलेल्या धर्मशाळेत काही नतद्रष्टांनी स्वामींना राहण्यास पाठविले पण स्व:सामर्थ्याने स्वामींनी तेथील भूत-पिशाच्यांना क्षणार्धात बंधन करुन मुक्ति दिली.स्वामी तिथे मंगळवार घाटावर राहू लागले.येथेच काही काळाने त्यांची आपल्या परमशिष्याशी म्हणजेच योगीराज श्री गुळवणी महाराजांशी भेट झाली.( श्रीगुळवणी महाराजांची व स्वामी महाराजांची भेट होण्याआधी पुष्कळ घडामोडी घडल्या होत्या.श्रीगुळवणी महाराज होशंगाबादेत कसे आले व त्यांची भेट कधी झाली हा मोठा प्रसंग आहे तो इथे देह नाही त्याबद्दल क्षमस्व) तिथेच नारायण प्रसाद यांना स्वामींनी पहिली दिक्षा दिली.त्यांना आलेल्या दिव्य अनुभवानंतर त्यांचे जवळचे‌ मित्र ही स्वामींकडे जिज्ञासेने येऊ लागले.पुढे श्री गुळवणी महाराज ,शंकरशास्त्री आजेगावकर ,वैद्य मास्तर रोज स्वामींजींकडे जाऊ लागले.श्रीगुळवणी महाराज स्वामीजींचे सुक्ष्म निरीक्षण करीत असत.हळूहळू स्वामीजींच्या शक्तीची ,वैराग्याची प्रचिती सर्वांना येऊ लागली.काहीकाळाने स्वामींचे स्वास्थ ठिक नव्हते.श्रीस्वामीजींना आराम मिळावा म्हणून श्री गुळवणी महाराज त्यांना घेऊन आपल्या घरी आले.उमा मातोश्रींचीही तिचं इच्छा होती.काही दिवसांनंतर स्वामीजींचे स्वास्थ्य ठिक झाले.ते रोज गुळवणी महाराजांचे साधन , पुजा,पोथी वाचन ,आसन,प्राणायाम बघू लागले व त्यांना त्याचे अतिशय समाधान लाभले.

एक दिवशी‌ श्री गुळवणी महाराजांना ब्रह्मीभूत टेंबे स्वामी महाराज यांचा दृष्टांत झाला व "मी आणि चिन्मयानंद एकच आहोत.ही विद्या दत्त संप्रदायाचीच आहे.तुझ्याकडून अजुन खुप कार्य व्हायचे आहे ."अशी स्पष्ट सुचनाच महाराजांना मिळाली.याच साली इ.स १९२० ला श्री गुळवणी महाराजांना स्वामींकडून शक्तीपात दिक्षा प्राप्त झाली व उत्तरेकडील ही गंगा आता खर्या अर्थाने दक्षिणेकडे आली. त्यानंतर श्रीस्वामी महाराज ,गुळवणी महाराज, मातोश्री उमादेवी व इतर लोकांनी छोटेखानी तिर्थयात्रा केली‌.सर्वजन परत महाराष्टात परतले व श्रीस्वामी महाराज त्यानंतर एक वर्ष होशंगाबाद येथे राहिले.श्रीगुळवणी महाराजांनी स्वामी महाराजांना बार्शीला येण्याची प्रार्थना केली व त्यांच्यावरील अपार प्रेमापोटी स्वामी महाराज बार्शीला आले ही. श्रीस्वामी महाराजांनी लवकरच श्री गुळवणी महाराजांना दिक्षा देण्याचे अधिकार दिले‌ व स्वामींकडे दिक्षेसाठी आलेल्या गोपीकाबाई यांना श्रीगुळवणी महाराजांना दिक्षा देण्याची आज्ञा दिली. त्या दरम्यान स्वामींचा आपल्या गुरुदेवांशी पत्रव्यवहार चालुच होता.पुढे स्वामी उज्जैन ला गेले. काही काळानंतर श्री स्वामी महाराजांना आपल्या सद्गुरु श्री शंकरपुरुषोत्तमतीर्थांकडून दंड दिक्षा मिळावी व त्यांचे नाव "लोकनाथतिर्थ "असे ठेवले गेले. याच कालावधीत इकडे महाराष्ट्रात श्री गुळवणी महाराजांच्या जिवनात बर्याच घडामोडी घडल्या.श्रीमहाराज हे पुण्यात स्थलांतरित झाले. दण्डधारण केल्यावर १९२८ साली स्वामी जी प्रथमच पुण्यास आले. श्री गुळवणी महाराजांनी त्यांना प्रथमच आपल्या गोवईकर चाळीत आणले. यानंतर स्वामींनी नाना भालेराव वैगेरे मंडळींना दिक्षा दिली.याकालात स्वामींचे उत्तर भारतात व महाराष्ट्रात सतत प्रवास होऊ लागला.यादरम्यान त्यांनी अनेक मुर्मुक्षू जिवांना दिक्षा देऊन कृतार्थ केले‌.या प्रवासात ,मुक्कामात श्री स्वामी महाराजांंनी केलेला पत्रव्यवहार अतिशय चिंतनीय असा आहे.स्वामी महाराजांची साधने प्रती असलेली श्रद्धा विलक्षण आहे.श्रीस्वामी महाराज श्री गुळवणी महाराजांसोबत ज्यावेळी पंढरपूर ला ,पैठण ला जाऊन आले तेव्हापासून त्यांच्या मनात महाराष्ट्रातील संतांचे साहित्य वाचण्याची ओढ निर्माण झाली.त्यामुळे मराठी चा अभ्यास नसतांनाही त्यांनी तुकाराम गाथा,दासबोध , ज्ञानेश्वरी व एकनाथी भागवत वाचले.त्यांना समर्थकांवर विशेष प्रेम होते‌ .तसेच तुकोबांच्या गाथ्यातील अभंगही ते म्हणून दाखवीत.त्याच्या पत्रातून अनेक ठिकाणी त्यांनी दासबोधातील वचने‌ वापरली आहेत.त्यांच्याकडे कुणी मार्गदर्शन घेण्यास आले तर ते म्हणत असत, "महाराष्ट्रात किती मोठे मोठे संत होऊन गेले.त्या सर्व संतांनी सर्व रहस्य अत्यंत रसाळ ,सरळ व सोप्या भाषेत स्पष्ट करुन सांगितले आहे.यांचे ग्रंथ वाचले तर लक्षात येईल की,या संतांनी 'ब्रह्मज्ञान' लोण्याच्या गोळ्या प्रमाणे वेगळे काढून दिले आहे.या संतांचे ग्रंथ वाचा म्हणजे काय करायचे ते सर्वकाही समजेल.त्यापेक्षा अधिक मी काय सांगणार? परंतु मनुष्याचा स्वभावच असा आहे की ,त्याला जवळच्या वस्तूची किंमत नसते.अतिपरिचयामुळे त्याला त्यांचे महत्वही समजत नाही.तसे तुम्हा महाराष्ट्रीयांचे झाले आहे." इतकं विलक्षण प्रेम त्यांचे महाराष्ट्रातील संत परंपरेवर होते. श्री स्वामी महाराज नेहमी एक गोष्ट बोलायचे , "मुझे दल बढाना नही है" म्हणजे मला दिक्षा वाटत लोकं शिष्य म्हणून वाढवायचे नाहीत तर इथे फक्त खरे मुर्मुक्षू लागतात त्यांनाच आजिवन स्वामींनी दिक्षा पूर्वक कृपा प्रसाद दिलाय.स्वामींची शास्त्रांवर नितांत श्रद्धा होती ते काटेकोरपणे शास्त्राचे पालन करीत.त्यांना शास्त्रविरोधी वर्तन केलेले अजिबात आवडत नसे.शक्तिपात दिक्षा देण्यासही ते अतिशय कडक होते.ते उठसूठ कुणालाही दिक्षा देत नसत.आधी ब्राह्मण असला तर सव्वा लाख गायत्री जप आणि इतरांना इष्ट‌ देवतांचा लक्ष जप आणि नंतर मग ते दिक्षेचा विचार करीत असत.ते नेहमी म्हणत , "दिक्षा ये लेणे देने की नही होणे पाने की बात है." आज शक्तीपाताच्या नावाखाली सुरु असलेला भोंगळ कारभार बघितला तर मतीच गुंग होते.लोकांचे दिक्षेचे पॅकेजस आहेत ,कुणी जगदंबेची इच्छा म्हणून ग्लोबल दिक्षा देत सुटलय तर रोज गल्ली बोळातून नवा दिक्षा अधिकारी गुरु समोर येत आहे.पण प्रत्यक्षात ज्यांनी ही परंपरा महाराष्ट्रात सर्वदूर पोचवली त्यांची या सर्वांबद्दल असलेली अनास्था व या सर्वावरील विचार जर अभ्यासले तर चक्रायला होतं.असो हा एक स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे तो आज तरी टाळूयात.

                                   या काळादरम्यान स्वामी काशीस गेले ,पुन्हा एकदा टिहरीला गेले.वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास ,दिक्षा असे अनेक प्रसंग चरित्रात येतात.श्री स्वामींनी आपल्या सद्गुरुंनी दिलेलं उत्तराधीकारीपद ही विनम्रतेने नाकारले.त्यानंतर स्वामीजी पश्चिम भारताच्या यात्रेला जाऊन आले. या दरम्यान अनेक लिला स्वामी चरित्रात घडल्या आहेत पण शब्द मर्यादेमुळे तो भाग सर्वच इथे मांडता येणार नाही.स्वामीं महाराजांचे पत्र , त्यांनी शिष्यांना केलेला उपदेश , त्यांचे निस्पृह जिवन आणि अखंड अंतर्मुख वृत्ती आपल्या सर्वांना नित्य मार्गदर्शक आहे.आपल्या सद्गुरुंनी ज्यावेळी स्वामी महाराजांना उत्तराधिकारी पद देण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळी विनम्रपूर्वक ,ठामपणे स्वामी महाराज म्हणाले होते की, "गुरुदेव! आपल्या आशिर्वादाने आजपर्यंत खूप काही मिळविले आहे.त्याच आधारावर सांगतो की ,मी आपल्या आधी हे शरीर सोडून जाणार आहे.तेव्हा आपल्या देशात,आपल्यापुढे मी सिंहासनावर बसने योग्य नाही.क्षमा असावी." तसेच आधी एकदा स्वामींनी सांगून ठेवले होते मी कुठेही प्रवास केला तरी मी काशीतच देह ठेवणार. श्री स्वामींच्या चरित्रात एक अमुल्य शिष्य रत्न आहे ते म्हणजे जांबुवंत .यांनी केलेली गुरुसेवा ही एक मैलाच दगडच आहे. तो सर्वांनी जरुर वाचावा. इ.स १९५५ उजाडले.श्री स्वामी महाराजांची प्रकृती क्षिण होतं होती.ते दोन महिने झाले अंथरुणाला खिळून होते.रविवारी ६ फेब्रुवारी ला स्वामींनी जांबुवंत आणि पंडित लक्ष्मण शास्त्रींना एकांतात बोलवले व आपण आता देह ठेवणार आहोत तर त्यानंतर कुठले विधी करायचे ,कसे करायचे याची संपूर्ण माहिती दिली. आपल्या देहाला एका दगडी पेटीत ठेवून गंगेत विसर्जन करा,कपालक्रिया करा,खाली मातेची कृपा म्हणून हा आश्रम सफल झाला म्हणून ५४ कुमारीकांना जेऊ घाला,त्यांना वस्त्र जेवन,दक्षिणा द्या,माझ्या सद्गुरु आश्रमात सर्वांना जेवन द्या,१४ ब्राह्मण ,१४ संन्यासी जनांना जेवन द्या शेवटी माझी सर्व उत्तरक्रिया महाराष्ट्रीय ब्राह्मणाकडून करा कारण मी गेल्या जन्मी महाराष्ट्रीयन ब्राह्मण होतो. पुढे ८ तारखेला मंगळवारी श्री स्वामी महाराजांची प्रकृती बिघडली.बुधवारी अतिशय अशक्तता जाणवली.स्वामींनी क्षिण आवाजात गंगाजल‌ मागविले.मुखमार्जन करण्यास सांगितले,स्नान घातले,बिछाना साफ करण्यास सांगितले.भस्मलेपन केले.संध्येसाठी आचमन केले‌.कसेतरी बसून अर्ध्यदान केले.नंतर स्वामी पडुन राहिले.रात्री ११ वाजता स्वामींनी उठवून बसविण्यास सांगितले.स्वामींनी सिद्धासनाप्रमाणे मांड्या वळविल्या.हात गुडघ्यावर ठेवले .मागे तक्क्या ठेवला.स्वामींनी पुन्हा गंगाजल मागितले.भस्म लावण्यास सांगितले.रुद्राक्षमाळा गळ्यात नव्हती ती घालण्यास सांगितले.भक्ताला‌ दार लोटण्याची क्षिण आवाजात आज्ञा केली‌.सर्वांना बाहेर जाण्यास सांगितले.रात्री ठिक बारा वाजता आतून "ॐ" प्रणवाचा उच्चार ऐकू आला.सर्वांना बरे‌ वाटले ‌दुसर्यांदा आवाज आला तर तो क्षिण होता आणि तिसर्यांदा केलेला उच्चार बाहेर ऐकू आला नाही.येथेच स्वामी चिन्मय स्वरुपात विलीन झाले.पण कुणाला कळलेच नाही.अर्धा तास काही आवाज आला नाही.नंतर भक्तांना कळले की स्वामी चिन्मयानंदात विलीन झाले‌.अशा या आधुनिक ऋषी चा जिवन प्रवास संपूर्ण जगाला प्रकाशवाट दाखवून पुन्हा स्वगृही परतला.श्रीस्वामी महाराजांचे चरित्र संक्षिप्त मांडणे खरंच अतिशय कठिण काम आहे कारण प्रत्येक घटना ही आपल्याला मार्गदर्शक आहे ,प्रत्येक घटनेवर एक स्वतंत्र चिंतन करता येईल.प.प.श्रीमद लोकनाथतिर्थ स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो की आपण दाखविलेल्या साधनेच्या मार्गावर अविरत , निरंतर चालण्याची बुद्धी आपल्या सर्वांना द्यावी व श्रीचरणांची सेवा करण्याची सद्बुद्धी द्यावी.इतके लिहून ही शब्द सुमनांजली स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करून श्रीचरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो. 🙏🌸🌺

    ✒️✍️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️



कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...