Thursday, May 26, 2022

अक्कलकोट स्वामी महाराजांच्या प्रभावळीतील दिव्य रत्न असलेले सद्गुरु श्री बाळकृष्ण महाराज सुरतकर🌺🌸🙏🌿

 

🌺 सद्गुरु श्री बाळकृष्ण महाराज सुरतकर 🌺

श्री बाळकृष्ण महाराज सुरतकर यांची १०४ वी पुण्यतिथी ||
                 परब्रम्ह भगवान श्रीअक्कलकोट निवासी  स्वामी समर्थ महाराजांच्या प्रभावळीतील अद्वितीय असे रत्न म्हणजे श्रीबाळकृष्ण महाराज सुरतकर .वैशाख कृ.एकादशी म्हणजे श्रीबाळकृष्ण महाराज यांची पुण्यतिथी चा पावन दिन.श्रीबाळकृष्ण महाराज हे आपल्या सर्वांना अतिप्रिय व सर्वश्रुत असलेल्या दादर येथील स्वामी मठाचे संस्थापक. या पुण्यतिथी निमीत्ताने महाराजांच्या संक्षिप्त चरित्राचे अवलोकन व प्रचंड अशा स्वामी कार्याचे ओझरते दर्शन घेऊयात व महाराजांच्या दिव्य लिलांचे स्मरण करुयात.

श्री बाळकृष्ण महाराज यांचा जन्म सुरत येथे २८ ऑक्टोबर १८६६ साली झाला. लहानपणीपासूनच महाराजांना देवभक्तीची व नामस्मरणाची आवड होती.अंतर्मुख असलेल्या महाराजांचे बालपण शिक्षण गावातच झाले. पुढील शिक्षणासाठी बाळकृष्ण महाराज हे आपले चुलते शिवशंकर यांच्याकडे मुंबईला शिक्षणासाठी आले. मुंबईस आल्यावर त्यांच्यावर आर्यसमाजाच्या शिकवणीचा पगडा बसला. त्यांचे चुलते शिवशंकर कट्टर शिवभक्त असल्यामुळे त्यांना या गोष्टीचे अतिशय दुःख झाले. त्यांचे शेजारी श्री रामचंन्द्र व्यंकटेश बरडकर उर्फ सारस्वत ब्राम्हण भेंडे हे राहत असत.ही कुणी सामान्य व्यक्ती नव्हे तर हे प्रत्यक्ष अक्कलकोट स्वामी महाराजांचे शिष्योत्तम सद्गुरु श्रीतात महाराज होते. "तात महाराज" हे श्री स्वामी समर्थांचे निःसीम भक्त होते.तात महाराज हे संत एकनाथ महाराजांप्रमाणे गृहस्थाश्रमी होते.ते सरकारी मुद्रणालयात नोकरीस होते.त्यांनी अखेर पर्यंत म्हणजे पेंशन मिळेपर्यंत नोकरी केली होती.ते अतिशय गुप्त असे संत होते.तात महाराजांनी स्वामी भक्ती ,स्वामी संप्रदायाचा प्रचाराचे खुप मोठे कार्य या भागात केले होते.बाळकृष्ण महाराजांच्या काकांनी आर्यसमाजी विचारांच्या आपल्या या निस्तिक झालेल्या पुतण्यात सुधारणा करण्याची विनंती "तात महाराजांना"  केली.तात महाराजांनी बाळकृष्ण महाराजांवर कृपा करण्याची व त्यांचे मत धर्माकडे वळविण्यासाठी एक विलक्षण लिला केली.ते बाळ कृष्णांना घेऊन भुलेश्वर येथील अष्टभुजा देवीच्या मंदिरात गेले.तेथील देवळात यात महाराजांनी बाळकृष्णांना प्रत्येक्ष देवीच्या हास्यमुखाचे दर्शन घडविले.या सगुण साक्षात्काराने बाळकृष्ण महाराजांच्या मनात यात महाराजांबद्दल विलक्षण आकर्षण ,आदर व प्रेम निर्माण झाले.त्यांच्या वृत्तीत विलक्षण असा अमुलाग्र बदल घडला.या प्रसंगाचा बाळकृष्णांवर इतका विलक्षण परिणाम झाला की त्यांनी तात महाराजांना आपल्यावर कृपा अनुग्रह करण्याची विनंती केली.तात महाराज आपला निजशिष्य ओळखून होतेच.त्यांनी तात्काळ बाळकृष्ण महाराजांवर आपल्या कृपा अनुग्रहाची वृष्टी केली.त्यांना सनाथ केले.या प्रसंगानंतर श्री बाळकृष्ण महाराज हे भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचे निस्सीम भक्त बनले.पुढे तात महाराजांची सेवा,त्यांचे सानिध्य आणि त्यातून मिळालेला अनुभव हेच बाळकृष्ण महाराजांच्या जिवनाचे ध्येय झाले.तात महाराजांनी बाळकृष्ण महाराजांना पडलेल्या प्रत्येक शंकांचे समाधान हे प्रत्यक्ष अनुभूती देऊन दिले.पुढे तात महाराजांनी बाळकृष्ण महाराजांकडून कठोर साधना ,अभ्यास,वाचन करुन घेतले व त्यांना आत्मसाक्षात्कार घडविला ,त्यांना समाधी अवस्थेला पोचवले.बाळकृष्ण महाराजांची भावस्थिती या काळात रामकृष्ण परमहंसांप्रमाणे इतकी विलक्षण झाली होती की तिन तिनं दिवस ते देवघरात ध्यान धारणा करित मग्न झालेले दिसून येत.महाराज सदैव आत्मानंदात गढून जात.
                                 श्रीमहाराजांना उत्तम असे संस्कृत व  इंग्रजी चे ज्ञान होते.ते गोकूळदास पाठशाळेत संस्कृत या विषयाचे शिक्षक होते तसेच ते विद्यार्थ्यांची शिकवणी घेत असत.या कारणाने सर्वांना ते "मास्तर" या नावानेच श्रृत होते. महाराजांचा मुक्काम त्यावेळी मुंबई येथील काळबादेवी येथील हनुमानगल्ली या ठिकाणी असे. जांभुळवाडीत श्रीमहाराजांच्या घरा शेजारी धोत्रे नावाचे एक कुटुंब राहायचे.धोत्रे कुटुंबाचे बाळकृष्ण महाराजांशी अतिशय प्रेमाचे ऋणानुबंध होते.त्या कुटुंबात शंकर धोत्रे या व्यक्तीला पिशाच्च बाधेचा प्रचंड त्रास होत असे.तो बाळकृष्ण महाराजांच्या समोर येण्यास घाबरत असे.बाळकृष्ण महाराजांनी त्याला स्वामी समर्थांचे तिर्थ देऊन त्यांची ही बाधा पूर्ण नाहीसी केली.जेव्हा त्या कुटुंबातील पिशाच्चबाधा महाराजांनी दुर केली  तेव्हापासुन हे कुणी साधे 'मास्तर' नसुन एक दिव्य महात्मे आहेत याची ओळख सर्व लोकांना झाली. बाळकृष्ण महाराज सदैव देवपूजेत निमग्न झालेले असत.कुणीही त्यांच्याकडे गेले की ते देवघरात जप-जाप्य,पूजा-अर्चा,ध्यान धारणा करतांना दिसत असत.महाराजांची वर्णकांती स्फटीकासमान शुभ्र  होती.महाराजांचे डोळे अतिशय तेजस्वी व वात्सल्याने भरलेले होते.ते सदैव तलम असा जरी काठी पितांबर वापरीत.सर्वांगास भस्माचे पट्टे,गळ्यात रुद्राक्ष व स्फटिकाच्या माळा महाराजांना अतिशय शोभून दिसत असे.चेहेर्यावर शुभ्र दाढी व अंगाला पुजेच्या अत्तराचा सुवास अशी वात्सल्य मुर्ती बघितली की महाराजांच्या चरणी घट्ट मिठी मारावी असे वाटत असे.त्यांच्या चरणांवर  कुणी नमस्कार करण्यास आले तर महाराज ,"अरे माझ्या काय पाया पडतोस ? आजोबांच्या पड!" असे अतिशय मृदू आणि वात्सल्यपूर्ण आवाजात म्हणत असत.श्रीबाळकृष्ण महाराज तात महाराजांना वडिल व स्वामी माउलींना आजोबा असे संबोधत असत.भगवान श्री अक्कलकोट स्वामी माउलींचे नाम जरी ऐकले किंवा त्यांनी उच्चारले तरी ते देहस्थिती विसरुन बेभान होत व त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत असत.इतका अतिव प्रेम व शरणागत भाव त्यांचा स्वामी चरणी होता.त्यांच्या कडे आलेल्या व्यक्तिस ते म्हणत, "अरे आजोबांच्या चरणी आपले हृदय गहिवरु दे.या शुद्र देहासाठी कशाला वेडा होतोस.या शुद्र देहासाठी कशाला वेडा होतोस?"  महाराज अतिशय सुंदर असे प्रवचन करित.गुजराती असुनही महाराजांची मराठी इतकी सुस्पष्ट आणि ओघवती होती की कुणालाही त्या शब्दांची मोहिनी पडावी.हृदयाचा ठाव घेणारे महाराजांचे शब्द नास्तिकाच्याही मनात श्रद्धेचा पूर आणत.एकदा एक विलक्षण प्रसंग घडला.एक दिवस प्रवचनाला गुजराती स्त्री भक्तांचा मोठा समुह मठात आला.सर्व स्त्रीया महाराजांच्या भोवती गराडा करुन बसल्या.त्या सर्व महाराजांच्या शब्दाकडे लक्षपूर्वक ध्यान ठेवून महाराजांच्या मुखाकडे बघत होत्या.कै.त्रंबक धोत्रे हे तिथे हजर होते.खुप गर्दी असल्याने त्यांना बसावयास जागाच मिळाली नाही त्यामुळे त्यांना दारतच उभे राहून प्रवचन ऐकावे लागले.तेव्हा महाराजांच्या भोवती बसलेल्या स्त्रिया ज्या महाराजांकडे टक लावून बघत आहेत असे त्यांच्या लक्षात आले.महाराजांवरील अतिव प्रेमापोटी त्यांच्या मनात विचार आला की "एवढ्या सुंदर स्त्रियांच्या गराड्यात महाराज सापडले आहेत,जर मोहपाशात अडकल्याने महाराजांच्या अध्यात्मिक साधनेचे पतन झाले तर मग पुढे असे होईल? महाराज ही त्यांच्या तोडीस तोड देखने आहेत." हे सर्व विचार सुरु असतांनाच त्यांचे प्रवचनातून लक्ष भलतीकडेच प्रवाहीत झाले.पण नवल असे की , महाराजांनी एकदम प्रवचन थांबवून त्यांना 'त्र्यंबक' अशी हाक मारली.ते गर्दीतून वाट काढत महाराजांपर्यंत पोचले.महाराजांनी त्यांच्याकडे भेदक दृष्टीने बघितले व लडिवाळपणाने त्यांच्या डोक्यात चापट मारली .त्यांना विचारले ,"त्र्यंबक, तमे ध्यान उपर छे? स्त्री-पुरुष भेद आजोबाये मारापासेथी खेची लिधा.तू फिकर ना कर.प्रवचन उपर ध्यान राख." हे ऐकताच त्रंबक धोत्रेंना आश्चर्य वाटले व ते खजिल झाले.त्यांनी लागलीच महाराजांचे चरण धरले‌ व क्षमा मागितली.
                                       
                              लोकमान्य टिळक मंडालेहून सुटून आल्यावर त्यांचा गीतारहस्य हा ग्रंथ प्रकाशित झाला.गितेचा अर्थ टिळकांनी कर्मपर लावला म्हणून तत्कालीन कर्मठ सनातनी लोकांनी फार गदारोळ विरोध केला.सभा होऊन टिळकांच्या नावे खलिते गेले,तर काहींनी त्यावर बहिष्कार टाकावा अशी मागणी केली.तेव्हा टिळकांनी या ग्रंथाला संतांचा आशिर्वाद मिळावा म्हणून संताकडे जाण्याचे योजले.टिळकांचे स्नेही कै.दादासाहेब खापर्डे यांनी टिळकांना श्री बाळकृष्ण महाराजांकडे जाण्याचं सुचवले.टिळक व खापर्डे असे दोघेही महाराजांना भेटण्यासाठी गेले‌.महाराजांकडे गेल्यावर दादासाहेबांनी महाराजांना नमस्कार केला व गीतारहस्यांची एक प्रत त्यांच्या हाती देऊन आशीर्वाद मागितला.लोकमांन्यांनी महाराजांना शिष्टाचाराप्रमाणे लांबून नमस्कार केला.दिव्यदृष्टीने महाराज या ग्रंथाकडे दोन मिनिटे बघत राहिले.मग टिळकांना उद्देशून म्हणाले , "आम्ही उभयता हा ग्रंथ देवघरात ठेवतोच;परंतु प्रत्यक्ष आद्यशंकराचार्य यांनी मंडालेस ग्रंथाचे लिखाण चालू असतांना स्वप्नात दर्शन देऊन आशिर्वाद दिला असताना आपण या सनातन्यांचे विरोधास का घाबरता? आपला हा ग्रंथ अमर आहे." हे सर्व ऐकून लोकमान्य चकितच झाले.महाराजांना त्यांनी पुन्हा वंदन करुन सांगितले, "महाराज,आपण थोर अंतर्ज्ञानी.माझा स्वप्नस्थितीवर विश्वास नसल्याने मी हे स्वप्न कुणालाही सांगितले नाही,पण आपणास कसे कळले?" श्री अक्कलकोट स्वामी समर्थांकडे हात करुन महाराज म्हणाले, "बळवंतराव ,ही यांचीच कृपा." महाराजांकडे अष्टसिद्धी होत्या पण महाराजांनी आपल्या स्वतः करीता कधीही त्यांचा उपयोग केला नाही.जीवनात कितीही संकटे आली तरी ती प्रारब्धाचा भाग म्हणून भोगले.या सर्व प्रसंगी त्यांनी कधीही आपली भक्ती,समर्थ चरणां वरील अनन्य शरणागत भाव कमी होऊ दिली नाही.महाराजांनी एक अपत्य झाल्यावर आपला संसारही तात महाराजांसारखा समर्थ चरणी अर्पण केला.त्यांच्या सहधर्मचारिणी असलेल्या कमलामाताही तितक्याच तयारीच्या होत्या.आजोबा म्हणजे भगवान‌ अक्कलकोट स्वामी महाराज हे आपल्या उभयतांच्या जिवनाचे कर्णधार व हा संसारही त्यांच्या चरणी अर्पण करुन त्या मनाने अगदी नि:संग झाल्या होत्या.महाराजांच्या कठोर वैराग्यशील जीवनात ,अनेक टाकेचे घाव सोसत ही साध्वी महाराजांच्या बरोबर सावली प्रमाणे अखंड सोबत होत्या.कमलामाता व महाराजांचा एक विलक्षण प्रसंग आहे तो इथे देतोच त्यावरुन महाराजांचा अधिकार आपल्याला लक्षात येईल.
महाराजांचे आपल्या संसाराकडे लक्ष नसे पण कमला मातेने आपल्या एकुलत्या एक मुलासाठी मौल्यवान दागिने व काही पैसे मागे जमा ठेवले होते.कमलामातेने हे सर्व सुरत मुक्कामी सुरक्षित ठेवले होते.याच सुमारास बाळकृष्ण महाराजांना समर्थ दर्शन दुर्लभ झाले.त्यावर त्यांनी सखोल विचार केला.असे का घडते ? आपले कुठे काय चुकते? त्यामुळे त्यांना आपल्या पत्नीवर शंका आली.त्यांनी लागलीच ध्यानातून धनाची सर्व हकिकत जाणली.याच कारणामुळे समर्थ दर्शनास आपण मुकलो आहे हे महाराजांना लक्षात आले.त्यावेळी महाराज सुरत मुक्कामी होते.कमलामातेला महाराजांनी काही कारणाने बाहेर पाठवले.स्वत: इकडे तिजोरीची चाबी घेऊन तिजोरीतील सर्व पैसे ,सोने चांदी हस्तगत केले.ते घेऊन महाराज तापी नदीकाठी आले. "यासाठीच समर्थ मला दर्शन देत नाही का?" म्हणाले व जाऊन ते सर्व नदीत बुडवून टाकले.या देहाला समर्थ दर्शन घडतं नाही मग हा देह तरी का मागे ठेवावा असे म्हणून स्वतःही नदीत उडी घेतली.महाराज फार दूर बुडत बुडत गेले.सुरतेपासून फार दूर पोचल्यावर तिथे अचानक परमपूज्य सद्गुरू श्री तात महाराज प्रगटले ,त्यांनी बाळकृष्ण महाराजांना पाण्याबाहेर काढले व म्हणाले, "तू काही काळ शांत रहा.या देह प्रारब्धातून तू मुक्त आहेस.तुला कनक,कामिनी केव्हाही श्री स्वामी समर्थांपासून दूर सारणार नाही.तू तर त्यांचा महान प्रिय भक्त आहेस.श्री स्वामी समर्थ तुझ्या नित्य सन्निध आहेत.हाक मारशील तेव्हा ते तुझी षोडशोपचार पूजा सदेह स्विकारतील.आता निर्धास्त घरी जा." या दिलास्यानंतर महाराज निश्चिंत झाले. असे एक नाही तर अनेक शेकडो चमत्कारिक दिव्य प्रसंत बाळकृष्ण महाराजांच्या चरित्रात आले आहेत.
                                   महाराज पुढे मालाडात त्यांचे मित्र द्वारकादास, यांच्याकडे रहावयास गेले. महाराजांच्या दैवी सामर्थ्याचा प्रसार झाल्यामुळे पुष्कळ लोक त्यांचेकडे येऊ लागले. महाराजांना भजन फार आवडत असे व त्यांचेकडे येणा-यांना कटाक्षाने भजन करण्यास गुरुवारी व शनिवारी बोलावीत असत शनिवारी सबंध रात्र भजन होत असल्यामुळे द्वारकादासांच्या मंडळीस त्रास वाटू लागला. ही गोष्ट कै. विश्वनाथ मोरेश्वर कोठारे (माजी विश्वस्त) व त्यांच्यां मातोश्री पुतळाबाई यांना कळल्यावर त्यांनी महाराजांना मालाडला मामलेदार वाडीतील आपल्या घरात आणले. तेथेही पूर्वीप्रमाणेच गर्दी सुरु झाली. महाराजांकडे त्यावेळी कुलाब्यापासुन वसई, घाटकोपर, चेंबुर येथवरची मंडळी दर्शनास व भजनास येत असत इतक्या लांबुन शनिवारी रात्री ते ही त्याकाळात मालाडला भजनास येणे हे गैरसोयीची असल्याने महाराजांनी कोठेतरी मध्यवर्ती ठिकणी रहाणे सर्वांना सोईस्कर होईल असा विचार भक्तजनांत उत्पन्न झाला कै. भाऊसाहेब देशमुख त्यावेळी मुंबई कलेक्टरचे हेडक्लार्क असल्यामुळे दादरची पुढे होणारी वाढ त्यांना माहीत होती व महाराजांच्या सांगण्यावरून भक्त मंडळींनी दादरला जागा बघायला सुरुवात केली. त्यांना एक बंगला सापडला तो भुताटकीचा व तीन खुनी बंगला म्हणून ओळखला जात असे. मंडळींनी ही गोष्ट महाराजांस कळविली. महाराज म्हणाले,"काही हरकत नाही आपण तेथे समर्थांची स्थापना करुन सर्व भुतांना मुक्त्ती देऊ. आपण परत जावे व कुलुप उघडून आत अत्तराचा व उदबत्तीचा सुगंध येईल, तो असा आल्यास भाडे देऊन ताबडतोब बंगला ताब्यात घ्यावा." वरील मंडळींना कुलुप उघडल्यावर अत्तराचा व उदबत्तीचा सुगंध आला व त्यांनी महाराजांचे सांगण्यावरुन बंगला भाड्याने घेतला. वर भाड्याने घेतलेला बंगलाच आपल्या आजच्या मठाचे स्थान आहे. सन १९१० मध्ये मठ स्थापन झाला. हा बंगला खूपच जुना असल्याने कालांतराने  बंगल्याचे दुरुस्तीचे काम करण्यास सुरु केले. त्याकाळात मठ माटुंग्याला दुसऱ्या जागेत हलवणे भाग पडले. ऑगस्ट १९१३ मध्ये पुरे झाले व ३० ऑगस्ट रोजी मठ परत पहिल्या जागी आला. मधोमध मोठा हॉल. हॉल मधोमध कमान.दोन्ही बाजुस दोन मोठ्या खोल्या व पुढच्या बाजुस म्हणजे रस्त्यावरुन आत शिरण्याच्या बाजुला मोठा ओटा. दोन्ही बाजुस बसावयास दगडी ओटे व पुढे चढण्यास पाय-या येण्याच्या मार्गावर दुतर्फा फुलांच्या कुंड्या, तसेच गॅस बत्त्या पण लागल्या. मठात परत आल्यावर महाराजांनी सध्याचे सिंहासन सुरतहुन कारागिर आणून तयार करविले व सिंहासनाच्या बैठकीत स्वामी समर्थांचे अवशेष घालुन त्यावर संगमरवरी लादी बसवुन समर्थांच्या फोटोची स्थापना केली. महाराज पक्के सिंहासन करतात हे पाहुन यमूताईंनी विचारले "महाराज, हा भाड्याचा मुसलमानाचा बंगला, हे स्थान कायम कसे होणार ?" तेंव्हा महाराजांनी, "जो बसणार तोच कायम करणार" असे म्हणून 'कायम कायम कायम' असा त्रिवार उच्चार केला.

हे स्थान कायम ठेवण्याचा समर्थांच्या अघटीत लीलांचे वर्णन पुढे येईलच. बंगल्यात मठ आल्यावर दर्शनास व भजनास येणा-या भक्त्तांची गर्दी फारच होऊ लागली. गॅसबत्त्यांमुळे प्रकाशाचा झगझगाट होऊन रात्री रंम्य व शोभिवंत दिसू लागले. रिवाजानुसार लांबून येणा-या भक्तांसाठी गुरुवार-शनिवार आरती रात्री १० ला सुरु होऊन ११-३० ला संपे. त्यानंतर महाराज, हल्ली महाराजांचे छायाचित्र आहे तेथे आरामखुर्चीत बसत. अर्धा एक तास भक्तजनांचे महाराजांना हार घालणे चाले. हार इतके येत की, तीन-तीन वेळा काढून ठेवावे लागत. त्यानंतर महाराज गुजराथी असुनसु्द्धा मराठीत एकनाथी भागवतावर रात्री दोन वाजेपर्यत प्रवचन करीत. त्यावेळी त्यांचा कंठ दाटून येई. त्यांची शिकवण भक्तिमार्गाची असे.
'एकात अनेक पहावे व अनेकांत एक पहावा,’परि प्रीतीजे अंतरी आत्मभावे । तया प्रीतीला भक्त्ति असे म्हणावे’, ’दाताने जीभ चावली म्हणुन कोणी बत्तीशी तोडली’,असा उपदेश महाराज करीत. श्री स्वामी समर्थांना शरण जाऊन व त्यांची उपासना करुन ज्याने त्याने आपला हेतू साधावा, आपणाकडे काही नाही, असे सांगत असत. महाराजांचे प्रवचन चालू असता श्रोते मंत्रमूग्ध होत असत. मठाचा मुख्य वार शनिवार त्यादिवशी कोणीही येथील कींवा सुरतेचा मठ सोडून जावयाचे नाही. असा महाराजांचा दंडक आहे. तसे गाभा-यात कोणीही टोपी, पगडी किंवा रुमाल घालून जावयाचे नाही. ती काढूनच गाभा-यात जाऊन प्रदक्षिणा कराव्यात, असा त्यांचा आदेश आहे. समर्थंना तांबडी फुले, कण्हेर, जास्वंद, तगर घलू नयेत, असा त्यांचा दंडक असे व घातल्यास ताबडतोब कटाक्षाने सांगून काढून टाकत. तांबडा गुलाब चालत असे.माहीमकर मंडळी दुसरीकडून भजन आटपून येत. रात्री दोन वाजेपर्यंत व उजाडेपर्यंत भजन करत. महाराजांनी भजनास कधी पुरे म्हटले नाही. मंडळी दमल्यास त्यांनी जावे.
महाराजांना पूजा-पाठास आठ तास लागत. त्यामूळे दर्शनास गर्दी लोटल्यास किंवा भजन लांबल्यास काही वेळा महाराजांना तीन-तीन दिवस उपास घडत; कारण सेवा आटोपल्याशिवाय ते पाण्याचा थेंबसुद्धा घेत नसत. पूजा आटोपल्यावर महाराज दूध घेत किंवा फराळाचे खात. त्यांनी अन्न सोडले होते. फराळात शिंगाड्याच्या पिठाचे पदार्थ, व-याचे तांदूळ, शेंगदाणे, बदाम, फळे घेत असत. महाराजांस आंबा फार आवडे. ते स्वत: चहा पीत नसत, पण भक्तांस मठाचा प्रसाद म्हणून देशी साखरेचा चहा देत असत. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे या मठात स्प्रुश्य-अस्प्रुश्य, हिंन्दू-अहिंन्दू असा भेद नव्हता व आजही नाही. ज्याला त्याला आपापल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करावयास सांगत पार्शांना कस्ती, ख्रिश्चनांना प्रेअर, मुसलमानांना नमाज करता येत असे.

श्री सदगुरु बाळकृष्ण महाराजांच्या समाधीचा प्रसंग :

दादर मठाच्या स्थापनेनंतर सन १९११ मध्ये वडवली शेरी बेगमपुरा सुरत येथे सुद्धा महाराजांनी श्री स्वामी समर्थांचा मठ स्थापन केला. त्या मठात श्री स्वामी समर्थांचा पलंग श्री स्वामी समर्थांनी दृष्टांत दिल्याप्रमाणे महाराजांनी अक्कलकोटला जाऊन आणली, ती त्या मठातील गाभार्यात ठेवलेली आहे.
महाराज नेहमी श्री स्वामी समर्थांची पुण्यतीथीची पालखी मुंबईस काढून दुसरे दिवशी तशीच पालखी सुरतेस काढण्यास जात असत, त्याप्रमाणे ,महाराज १० मे १९१८ रोजी रात्रीच्या गाडीने सुरतेस गेले. त्यावेळेपासून महाराजांनी निर्याणास जाण्याच्या पुष्कळ पूर्वसूचना दिल्या, पण कोणालाच समजल्या नाहीत.

वैशाख वद्य दशमी शके १८४० संवत १९७४ तारीख ४ जून १९१८ मंगळवार रात्रौ ते पहाटे ५ वाजेपर्यंत सुरतेच्या मठात भजनाचा कार्यक्रम होत असताना महाराजांनी तो बंद करून सर्वाना घरी जाण्यास सांगितले.परंतु एक तासाने यावे लागेल असे म्हणाले. त्यांचा अर्थ त्यावेळी कोणालाही कळला नाही. सूर्योदय होण्याच्या थोड्या वेळापूर्वी महाराज मागील चौकात गेले. तेथे एक दोरी टांगलेली होती.तिला धरून महाराज नाचू लागले. 'खडावांचा खड खड खड खड ' असा आवाज ऐकून परमपूज्य आई खाली आल्या व महाराजांस म्हणाल्या, "दोरी जुनी आहे,ती तुटेल व तुम्ही पडाल." महाराजांनी उत्तर दिले, "दोरी तर केव्हाच तुटली आहे,ह्या घे किल्ल्या ! " असे म्हणून त्या प.पु.आईच्या अंगावर फेकल्या व म्हणाले, " सांभाळ." प.पु. आई म्हणाली," मला किल्ल्या का देता?" इतक्यात सूर्योदय झाला. सूर्यास नमस्कार करून बाजूला असलेल्या आरामखुर्चीवर बसून छातीवर हाता ठेवून त्रिवार "ओ तात, ओ तात, ओ तात" असे स्मरण करून महाराजांनी मान टाकली. याप्रमाणे वैशाख वद्य एकादशी शके १८४० संवत १९७४ बुधवार, तारीख ५ जून १९१८ रोजी सूर्योदयी निर्याणास गेले.
भजन चालू असताना ते बंद करा असे महाराजांनी केव्हाच सांगितले नव्हते; परंतु त्या दिवशी मात्र ते पाच वाजता बंद करा असे सांगितले व परत एक तासाने यावे लागेल असे म्हणाले व दोरी केव्हाच तुटली या शब्दावरून बोध असा होतो की या महान संताने काळास सूर्योदयाची वेळ होईपर्यंत एक तास थांबवून देह ठेविला. बाळकृष्ण महाराजांची समाधी हि सुरत येथील स्वामींच्या मठाजवळच आहे. अशा भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ माउलींच्या दिव्य भक्ताला,एका थोर संतांना माझा कोटी कोटी शिरसाष्टांग दंडवत प्रणाम.  महाराजांच्या सुकोमल चरणी प्रार्थना करतो की त्यांनी ही आम्हा सर्वांना स्वामीरायांच्या नामस्मरणात ,सेेवेत जिवनाचे सोने करण्याची बुद्धी द्यावी. 
   ✒️✍️ अक्षय जाधव आळंदी/वाशिम✍️✒️


2 comments:

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...