आज ऋषीपंचमी गजानन बाबांची ११२ वी पुण्यतिथी 🙏🌺
तब्बल एक शतक लोटून गेले आजच्याच दिवशी शेगावी प्रगटलेला ज्ञानगभस्ती योगीराज आपल्या निजस्थानी परतला.आपले सगुण रुप दूर सारून विश्वात्मक देह धारण करता झाला.विदर्भातील संत मांदियाळीत आजवर होऊन गेलेल्या संतांचे चुडामणी,जगभरातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या समर्थ सद्गुरु श्रीगजानन महाराजांचे चरित्र माहिती नसलेला भाविक व्यक्ती निराळाच.प.पू.दासगणु महाराजांनी लिहिलेल्या अतिशय प्रसादिक आणि रसाळ अशा "गजानन विजय" ग्रंथात बाबांच्या दिव्य लिला आपण सर्वांनी वाचलेल्या आहेच.तरीही संक्षिप्त रुपात ऋषीपंचमीच्या दिवशी झालेली समाधी लिला आपण आज बघूयात.
मी गेलो ऐसे मानू नका | भक्तित अंतर करू नका |
कदा मजलागी विसरु नका | मी आहे येथेच ||
महाराजांच्या समाधी प्रसंगासमयी गजानन विजय ग्रंथात आलेल्या या ओव्या किती सार्थ आहेत.आज एक शतका नंतरही महाराज भक्तांच्या हाकेला धावतात,त्यांच्यावर कृपा करत आहेत.आजही असंख्य आर्त, जिज्ञासू ,मुमुक्षू जनानां मार्ग दाखवित आहे.आजही "आम्ही गेलो ऐसे मानु नका" या त्यांच्या वचनाचा सर्व लोक अनुभव आजही घेत आहेत.
आपले ३२ वर्षांचे प्रदिर्घ अवतार कार्य पूर्ण करुन महाराजांनी देह ठेवण्याचा विचार केला.तो अतिशय हृद्य प्रसंग गजानन विजय पोथीत दासगणू महाराजांनी शब्दबद्ध केला आहे.महाराज आषाढ महिन्यात हरी पाटलांना बरोबर घेऊन आपल्या आराध्य विठुरायाच्या भेटीस्तव पंढरपूर येथे गेले.चंद्रभागेचे स्नान करुन महाराज विठुरायाच्या पुढे गेले.ते श्रीभगवंतांना म्हणाले,
"देवा तुझ्या आज्ञेने आजवर या भुमिवर भ्रमण केले,तु जे कार्य दिले ते पूर्ण केले.जे जे भाविक,भक्त,मुमुक्षू होते त्यांचे मनोरथ पूर्ण केले.आता माझे अवतारकार्य पूर्ण झाले आहे.हे तु ही जाणतो आहे.आता मला देह ठेवण्याची आज्ञा करावी.माझी येणार्या भाद्रपदमासी वैकुंठासी येण्याची इच्छा आहे.अशी पंढरीनाथांच्या चरणी हात जोडून महाराजांनी विनवणी केली,भगवंतांच्या विरहाने त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.पुढे पंढरपूरची यात्रा पूर्ण करुन महाराज शेगावी परतले.श्रावण मास गेला आणि भाद्रपद मास येऊन ठेपला.हरी पाटील व इतर मंडळींना महाराज देह ठेवणार आहेत हे ठाऊक होतेच.सर्व एक विलक्षण जड अंतःकरणाने मठात वावरत होते.गणेश चतुर्थी चा दिवस आला.महाराजांनी पार्थिव गणेशाची स्थापना ,पूजन केले .दुसर्या दिवशी महाराजांनी सर्वांना गणेश विसर्जनासाठी मठात बोलाविले.गणपती विसर्जनानंतर महाराज सर्व भक्तांना म्हणाले,
"दु:ख न करावे यत्किंचित| आम्ही आहोत येथेच |
तुम्हा सांभाळण्यापरी सत्य| तुमचा विसर पडणे नसे ||
हे शरीररुपी वस्त्र आता जिर्ण झाले आहे.आता या वस्त्राचा त्याग करण्याचा वेळ समीप आला आहे. महाराजांनी आपल्या परमभक्त आणि परमशिष्य असलेल्या बाळाभाऊंना आपल्या हाताने धरुन आपल्या आसनावर बसविले.महाराज म्हणाले ,
मी गेलो ऐसे मानू नका | भक्तित अंतर करू नका |
कदा मजलागी विसरु नका | मी आहे येथेच ||
सर्व भक्तांना असे आश्वासन देऊन महाराजांनी योगाने आपले प्राण ब्रह्मरंध्री खेचले व प्राण रोधल्या क्षणी "जय गजानन" असा उच्चार केला.शके अठराशे बत्तीस साली साधारणनाम संवत्सरास भाद्रपद शुद्ध पंचमी गुरुवार या दिवशी हा सिद्धयोगी, युगपुरुष, पुराणपुरुष, कलियुगातील आधुनिक ऋषी आपल्या मुळ स्थानी परतला.आपल्या नश्वर देहाचा त्याग करुन महाराज विश्वरुप झाले.महाराजांनी देह ठेवल्याक्षणी सर्व शेगावात हाहाकार उडाला.आमचा त्राता गेला म्हणून नर नारी दु:खाने व्याकुळ झाले.महाराजांच्या देहाचे अखेरचे दर्शन घेऊन दु:खाश्रु ढाळू लागले.पुढे सर्व भक्त आल्यावर महाराजांच्या देहाची मिरवणूक काढण्यात आली.हजारो दिंड्या घेऊन भक्त नामघोष करु लागले.महाराजांना बुक्का ,तुळस वाहू लागले.रात्रभर अशी मिरवणूक सुरु होती.दुसर्या दिवशी ही मिरवणूक गावातील मठात आली.महाराजांनी आधीच सांगून ठेवलेल्या जागी महाराजांच्या देहाला समाधी देण्यात आली.महाराजांच्या समाधीवर पाषाणाची शिळा लावून पुढे दहा दिवस मोठा भंडारा करण्यात आला.
श्रीगजानन बाबा देहात असतांना सद्गुरु श्री साईनाथ महाराज शिरडी, सद्गुरु श्रीताजुद्दीन बाबा नागपूर,सद्गुरु श्रीशंकर महाराज पुणे, सद्गुरु श्री माधवनाथ महाराज चित्रकूट,श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज करवीर असे असंख्य अवतारी महापुरुष महाराष्ट्र सदेही उपस्थित होते ,एवढेच काय तर महाराजांचे त्यांच्याशी अतिशय प्रेमाचे व आदराचे नाते होते. विदर्भ भूमिला आपल्या पदस्पर्शाने पावन करण्यासाठी महाराजांनी ही भूमी निवडली व पुढे आजिवन आपले सदेह वास्तव्य याच भूमीत केले यावरुन याची कल्पना येते.महाराज तिर्थयात्रा सोडून कधीही विदर्भ सोडून इतरत्र गेल्याचे आढळत नाही.तरीही साईनाथ महाराज,माधवनाथ महाराज,ताजुद्दीन बाबा,रामानंद बिडकर महाराज,नाशिकचे गोपाळबुवा महाराज यांच्याशी त्यांचा पूर्वापार परिचय होता ,हे सर्व महाराजांना मोठ्या भावासारखा मान द्यायचे हे विशेष आहे.
गेल्या शतकात होऊन गेलेल्या लोकात्तर अध्यात्मिक महापुरुषांच्या मांदियाळीत सद्गुरु श्री गजानन महाराज हे अग्रगण्य आहेत असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.श्रीसद्गुरु गजानन बाबांचा भक्त परिवार हा महाराष्ट्रच काय तर भारतभर व जगभर विखुरलेले आहे. प.पू.श्रीदासगणू महाराजांनी लिहिलेला "श्रीगजानन विजय" नामक चरित्र ग्रंथ हा आम्हा सर्व भक्तांसाठी अमृतवल्लीच आहे. या ग्रंथात महाराजांच्या सर्व लिला अतिशय रसाळ ओव्यात शब्दबद्ध केलेल्या आहेत. श्रीगजानन बाबांच्या चरित्रा संबंधी विचार केला तर, सर्व लिला प्रसंग अगदी प्रगटदिना पासून ते समाधी लिले पर्यंत सर्वत्र एक समान दुवा आढळतो आणि तो म्हणजे महाराजांनी आपल्या प्रत्येक कृतीतून भक्तांना ,जगाला, संपूर्ण मानवजातीला काहीतरी शिकवणच दिली आहे. मग ते देविदास पातुरकरांच्या वाड्याबाहेर शिते वेचुन "अन्नम ब्रह्मेती" असो किंवा बापुना काळेला विठ्ठल दर्शन असो.प्रत्तेक कृतीत काहीतरी विशेष रहस्य असायचे.श्रीदासगणु महाराजांनी सद्गुरु बाबांच्या प्रगटीकरणावर फार सुंदर ओव्या रचल्या आहेत ,ते म्हणतात,
"त्या शेगांव सरोवरीं भले । गजानन कमल उदया आले । जें सौरभे वेधिते झालें । या अखिल ब्रह्मांडा ।।"
खरंच श्रीगजानन महाराजांच्या या दिव्य प्रभेने सामान्य भक्तांनाच काय तर लोकमान्य टिळकांसारख्या युगपुरुषाला, सद्गुरु श्रीमाधान निवासी गुलाबराव महाराज, दत्तावतारी श्री टेंबे स्वामी महाराजांसारख्या जगविख्यात संतमंडळींनाही आपल्याकडे आकर्षित केले होते.ही काय सामान्य बाब नव्हे.असे अनेक संत मंडळींनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष महाराजांची भेट घेतली होती किंवा त्यांच्या बद्दल प्रेम व्यक्त केलेले होते. त्यातील असाच एक दिव्य प्रसंग म्हणजे,
श्रीगजानन बाबांनी ऋषी पंचमीला आपला देह अनंतात विलीन केला व ते वैश्विक देह धारण करते झाले.त्याच वेळी इकडे शिर्डीत सद्गुरु साई समर्थांनी जमिनीवर लोळण घेत दु:खाने आक्रोश केला होता."माझा भाऊ देह ठेऊन जातोय " म्हणून ते रडत होते.दुसर्या दिवशी त्यांनी आपले मुंडन केले व भक्तांकरवी नारळ फोडुन गुळ खोबरे वाटले होते.हा प्रसंग खुप काही सांगुन जातो.अकोट चे नरसिंग महाराज हे ही बाबांना मोठा भाऊ मानत असत.
आज श्रीगजानन बाबांचा समाधी दिन त्यामुळे त्यांच्या चरित्राचे स्मरण करणे हे क्रमप्राप्त आहेच.मला बाबांच्या चरित्रातील भावलेले दोन प्रसंग जे आजवर माझ्या जिवनातील पाथेयच झाले आहेत ते इथे मांडतो.पहिला म्हणजे बंकटलाल यांच्या शेतातील मका खाण्याचा प्रसंग आणि दुसरा बापुना काळे यांना श्रीमहाराजांच्या जागी झालेले विठ्ठल दर्शन.हे दोन्ही प्रसंग सर्वांनाच माहिती आहेत असे मी गृहीत धरतो म्हणून ते सविस्तर वर्णन करत नाही.तरी यातील जो भाग मला भावला तो मांडतो. श्रीमहाराज जेव्हा बंकटलालच्या विनंतीला मान्य करून त्याच्या शेतात मक्याची कणसे खाण्यास जातात.कणसे शेकोटीवर भाजतांनी वरील गांधील माशीच्या पोळातील माशा उठतात व तो पूर्ण जत्था तेथील माणसांवर हल्ला करतो.त्यावेळी श्री महाराज तेथे अगदी निवांतपणे बसलेले असतात.कुणीही महाराजांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न ही करत नाहीत.सर्व आपल्याला माशी चावणार नाही यासाठी धडपडत असतात.या सर्व प्रकारात एकमात्र बंकटलाल मनातुन दु:खी होतो व श्रीमहाराजांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो.श्रीमहाराजांनाही त्याच्या मनातील शुद्ध भावाची जाणिव होते व ते त्या माशांना पुन्हा आपल्या जागेवर जाण्याची आज्ञा करतात.त्यावेळी श्रीमहाराज बंकटलालला उपदेश करतात तो खरच चिंतनीय असा आहे.श्रीमहाराज म्हणतात,
" अरे ते जिव विषारी । बैसले माझ्या अंगावरी । माझ्यापासून झाले दूरी । लड्डूभक्त येधवा ।।२८।।
याचा करी विचार । संकट आल्या कोणावर ।
कोणी न साह्य करणार । एका ईश्वरावाचुनी ।।२९।। "
या दोन ओव्यात संपूर्ण जिवन प्रवासाचा सारचं सांगितला आहे.जिवनभर आपण कुठल्यातरी व्यक्तीसाठी,गोष्टीसाठी आसक्त असतो.त्या आसक्तीने आपला विवेक आणि अमुल्य असा वेळ आपण गमावून बसतो आणि एक दिवस जरा,व्याधीने ,संकटाने ग्रासल्यावर लक्षात येतं की 'माझा माझा' म्हणून मी ज्या नश्वर गोष्टींसाठी बेधुंद झालो होतो ,ज्या ऐहीकाच्या मागे जिवनभर वेळ व्यर्थ घालवला ते सर्व संकटकाळी आपल्या सोडुन गेलेले असतात.कुणीही आपल्यासोबत संकटकाळी नसतात.हा अनुभव प्रत्येकाच्या जिवन प्रवासात कधीतरी आलेला असतोच आणि हे माहिती असुनही आपली बुद्धी भगवंतांच्या ,ईश्वराच्या चरणी वळवण्याची इच्छा कुणीही करत नाही.फक्त लड्डू भक्तासारखे त्यांच्याकडुन काहीतरी मिळवण्यासाठी आपणं फक्त मंदिराचे उंबरे झिजवत असतो.
दुसरा प्रसंग श्रीगजानन महाराज आपल्या शेगांवच्या भक्त मंडळींसमवेत जेव्हा आषाढी वारी करीता पंढरपूर येथे गेलेले होते.त्यावेळी बापुना काळे या गरीब भक्ताची चुकामुक झाल्यामुळे त्याला पांडुरंगाचे दर्शन घडतं नाही.दर्शन न झाल्यामुळे तो अतिशय खिन्न व उदास अंत:करणाने दिवसभर बसून असतो.सर्व लोक त्याची टिंगल टवाळी करत असतात आणि श्रीमहाराज खोलीतील त्यांच्या आसनावरून हा सर्व प्रकार बघत असतात. बापुनांच्या मनातील शुद्ध भक्ती,शुद्ध भाव बघून महाराज त्याच्या पुढे उभे राहतात व त्याला आपल्या ठिकाणी विठुरायाचे तेच मंदिरातील सगुण रुपाचे दर्शन घडवतात. आता यापुढे जेव्हा इतरही भक्त त्यांना असे दर्शन घडविण्याची विनंती करतात तेव्हा त्या सर्वांना महाराज म्हणतात,
ऐसें ऐकतां भाषण । बोलते झाले गजानन ।
बापुनासारिखें आधीं मन । तुम्ही करा रे आपुलें ॥४९॥
तें तसें झाल्यावरी । दर्शन घडवीन निर्धारीं ।
ही दर्शन वस्तु खरी । काय मिळे बाजारांत ? ॥१५०॥
म्हणून ती आणून । देऊं तुम्हांकारण ।
निष्पाप करा आधीं मन । तरीच पुढचें घडेल हें ॥५१॥
संपूर्ण परमार्थाचे सार यात आले आहे.वरील प्रसंग पाहता एक गोष्ट ध्यानात येते ती म्हणजे तेथील सर्व लोक आधीच पांडुरंगाचे दर्शन करुन आले होते पण महाराज म्हणातात, "निष्पाप करा आधी मन" मनात पाप ,इर्षा , द्वेष ,कपट आणि ढोंग करुन केलेली प्रत्येक कृती ही फक्त बाह्य दिखावाच ठरतो मग ती पुजा असो,जप असो,देव दर्शन असो वा आणखी काही साधन असो.बापुनासारखे निष्पाप मन झाले तर प्रत्यक्ष भगवंतही पुढे उभे राहतात.हीच गोष्ट भगवान रामकृष्णांनी आपल्या भक्तांना सांगितली होती ,'तुमचे मन आधी निष्पाप करा ,लहान बाळ आपल्या आईच्या भेटीसाठी ज्या आकांताने रडतो ,त्याच्या मनात आईच्या भेटीशिवाय इतर कुठलाही भाव नसतो ,तसे निष्पाप अंतःकरणाने जर भक्ताने भगवंताला आळवलं तर तो धावुन येतोच यात शंका नाहीच." सर्व संतांनी एकमुखाने याची ग्वाही दिली आहे. महाराज म्हणातात परमार्थ हा काही व्यापार नव्हे, मी पाच वार्या करेन,एक नारळ चढवेल,अमुक दक्षिणा देईल ,अमुक पुजा करेन आणि मग भगवंत मला दर्शन देतील ,कृपा करतील तर हे अशक्यप्राय आहे. कारण जोवर बापुना सारखे शुद्ध ,निष्पाप मन होत नाही तोवर सर्व बाह्य अवंडंबराशिवाय काही नाही.
खरंतर महाराज सर्वांचेच आहेत , त्यांना महाराष्ट्र,भारत अशा प्रांतात आपण वाटु शकत नाही.ते या अखिल ब्रह्मांडाचे नायक आहेत.तरीही आम्हा विदर्भीय लोकांसाठी श्रीगजानन महाराज हे आराध्य दैवतच आहेत.लग्न झालं की आधी गजानन बाबांचे दर्शन ,बाळ जन्माला आलं की पहिलं दर्शन बाबांचे, सुट्टीत देवदर्शन म्हणजे आधी शेगांव, घरातील मुख्य संत ज्यांना आम्ही महाराज न म्हणता आमचे बाबाच मानतो ते म्हणजे गजानन महाराज.कुठल्याही शुभ प्रसंगी महिला मान तो गजानन बाबांनाच. आता ही एक पद्धत न राहता हा एक संस्कारच झाला आहे.
आज ऋषीपंचमीच्या दिवशी अगदी गल्लीबोळात ठिकठिकाणी महाप्रसाद, पुजा , पारायण , उत्सव असतो. आम्हाला देव ,संत हे कळतही नव्हते तेव्हापासून ते आपल्या घरातील एक व्यक्ती आहेत ,आपले बाबा आहेत हा विचार नकळत आम्हा सर्वांच्या अंतर्मनावर बिंबविल्या जातो.तो एक भावनीक संस्कराच मनावर अधिराज्य करतो आणि हे सर्व देव व संतांच्या बाबतीत नसुन श्रीमहाराजांच्याच बाबतीत आहे हे विशेष.सर्व संतामध्ये बाबा म्हणजे कुठेतरी माझे हक्काचे आहेत हा भाव प्रत्येक विदर्भवासीयाच्या मनात असतोच.आधूनिक काळातील हा ऋषी दृष्यरुपात जरी दिसत नसला तरी निर्गुण रुपात महाराज गेली १०० वर्ष झाले शेगावातच आहेत.याचेच अनेक अनुभव आजही शरणागत भक्ताला येतात आणि येत आले आहेत.महाराजांनी देह ठेवल्यावर अनेक वेळा याची प्रचिती दिली आहे.त्याची काही उदाहरणे दासगणू महाराजांनी गजानन विजय ग्रंथात दिली आहेत.त्यात शेगावातील गणपत कोठाडे नामक भक्ताच्या पत्नीला महाराजांनी स्वप्नात दर्शन देऊन तो करत असलेल्या धर्मकार्याला अडथळा न करण्याची आज्ञा केली.तसेच बोरीबंदरावर लक्ष्मण हरी जांजाळ या हताश झालेल्या भक्ताला स्वतः सगुण रुपात भेट दिली व त्याला उपदेश करुन गुप्त झाले.तसेच कृष्णाजी पाटलांचा रामचंद्र नावाचा पुत्र होता.त्यांच्या घरी महाराज स्वतः भिक्षेकरीच्या रुपात गेले.त्यांच्या घरी जेवले व सर्व परिवारास आशिर्वाद देऊन रामचंद्रांना उपदेश केला.आपल्या मठाची व्यवस्था करण्याची आज्ञा केली व घराबाहेर जाऊन गुप्त झाले.असे एक नाही तर गेल्या शंभर वर्षात लाखो अनुभव पदोपदी करोडो भक्तांना आले आहेत आणि येत आहेत.या अनुभवांचे संकलन जर केले तर महाराजांच्या कृपा अनुभवांचा एक मोठा कोषच निर्माण होईल.भक्तवत्सल समर्थ सद्गुरु श्रीगजानन महाराजांच्या गादीवर काही काळ बाळा भाऊ राहीले व पुढे बाळाभाऊंनी देह ठेवल्यावर नांदुरा ग्रामीचे नारायण महाराज यांना महाराजांनी आज्ञा करुन आपल्या गादीवर बसण्यास सांगितले.त्यानंतर आजतागायत महाराजांच्या समाधी मंदिरात महाराजांच्या दर्शनासाठी जगभरातून भक्त येतात.महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन चिंतामुक्त होतात.
अशा या परब्रह्म भगवंतांचा आज ११२ वा समाधी दिन आणि याच परमपावन तिथीला बेळगाव निवासी सद्गुरु माउली कलावती आईंची जयंती असते.लवकरच आपण आईंच्या चरित्राचे चिंतन करण्याचा प्रयत्न करुयात.
सद्गुरु कलावती आईंच्या व समर्थ सद्गुरु श्री गजानन बाबांच्या सुकोमल चरणी शिरसाष्टांग दंडवत प्रणाम करतो आणि त्यांनी आपल्या सर्वांना सद्गुरुप्रदत्त मार्गावर चालण्याची बुद्धी द्यावी हीच प्रार्थना करतो.
✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी/वाशिम✒️✍️
ॐ नमो भगवते श्रीगजानन बाबा । ॐ नमो सद्गुरु श्री गजानन बाबा ।।
श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तवत्सल भक्तप्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय 🙏🌺🌸🌼🙏🌺🌸🌼🙏🌺🌸🌼🙏🌺🌸








