Tuesday, August 23, 2022

आज पावस निवासी प.पु.सद्गुरु श्री स्वामी स्वरुपानंदांची ४८ वी पुण्यतिथी.🚩🌺🌸🙏

 


आज पावस निवासी प.पु.सद्गुरु श्री स्वामी स्वरुपानंदांची ४८ वी पुण्यतिथी. श्री स्वामींच्या चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏🌺🌸🕉️
                       भगवान करुणाब्रह्म ज्ञानेश्वर माउलींपासुन सुरु झालेल्या अनंत परंपरेतील एका दिव्य गुरुपरंपरेतील हे अलौकिक असे संतश्रेष्ठ... भगवान श्रीज्ञानेश्वर माउली हे स्वामी स्वरुपानंदाचे आराध्य स्थान. त्यामुळे कदाचित मला ही ते फारचं जवळचे भासतात... माउलींवरील स्वामींची श्रद्धा इतकी उत्कट आणि अनन्यसाधारण होती की त्यांच्या उत्तरकाळात ते म्हणत की "जर आम्ही माउलींच्या समाधी दर्शनाला समाधी समोर गेलो तर भावावेशात तिथेच हा देहत्याग होईल." त्यामुळे नंतर च्या काळात ते परत केव्हाही आळंदीला आले नाही... त्यांनीच श्रीक्षेत्र पावस येथे देह ठेवण्यापूर्वी,महासमाधी घेण्या आधी आपल्या अवताराबद्दल, कार्याबद्दल स्वत:च सांगुन ठेवले आहे ते त्यांच्याच शब्दांत इथे देतो...

"आजकालचे नहोंच आम्ही ।।
माऊलीनेच आम्हाला इथं पाठवलं.
दिलं काम तिच्याच कृपेने पुरं झालं.
आता आम्हाला नाही कुठं जायचं.
इथंच आनंदात राहायचं ।।
आणि माऊलीनंच अन्यत्र पाठवलं आणि तिथं अवतीर्ण व्हावं लागलं तरी आता चैतन्य स्वरुपात इथं आमचं अखंड वास्तव्य आहेच."

                    अशा या दिव्य आणि अलौकीक संतांच्या परमपावन पुण्यतिथी दिवशी आपण त्यांच्या अतिशय विलक्षण, रसाळ व दिव्य चरित्राचे चिंतन करुयात.

आपल्या पावन महाराष्ट्र तथा भारत भुमीत आजवर असंख्य अलौकिक संत ,सत्पुरुष अवताराला आलेत... त्यापैकीच एक महत्तम विभुती म्हणजे श्रीस्वामी स्वरुपानंद... स्वामींच्या फोटोकडे बघताक्षणीच एक विलक्षण आकर्षण जाणवतं. त्यांची ती अतिव सात्त्विक दृष्टी, तो मायाळु ,प्रेमळ चेहेरा बघितला तरी मनात आनंदाच्या उर्मी उठतात. जणु चराचरातील सर्व कारुण्य या देहाच्या आश्रयाने येऊन राहिलं होतं. श्रीस्वामीजींचे जिवनचरित्र अगदी थक्क करणारे आहे. महाराष्ट्रातील या संत कवींची पुण्यतिथी त्यानिमित्त त्यांचे चरित्राचे ओझरते दर्शन.
             करुणाब्रह्म भगवान भक्तवत्सल श्री ज्ञानेश्वर माउलींच्या परंपरेतील ,त्याच प्रभावळीतील श्रीस्वामीजी यांचा जन्म रत्नागिरी येथील पावस या गावी श्रीविष्णपंत व सौ.रखमाबाई यांच्या पोटी मार्गशीर्ष वद्य द्वादशी मंगळवारी १५ फेब्रुवारी १९०३ या दिवशी झाला.श्रीस्वामीजींचे नाव 'रामचंद्र' असे ठेवण्यात आले होते परंतु सर्व मंडळी त्यांना 'आप्पा' असेच संबोधीत असत. श्रीस्वामींच्या घरातील वातवरण शिस्तप्रिय,धार्मिक असे होते.लहानपणी त्यांचे आजोबा मुलांना स्तोत्र, गीतेतील काही अध्याय शिकवत असत. तसेच आपल्या आई-वडिलांचे उत्तम आचरण ,धर्मावरील श्रद्धा यांचा ठसा घरातील सर्व मुलांवर विशेषतः स्वामीजींवर पडला होता. श्रीस्वामींचे इयत्ता पाचवी पर्यंतचे शिक्षण हे पावसलाच पूर्ण झाले व पुढील शिक्षणासाठी त्यांचे व त्यांचे बंधु महादेव यांचे नाव रत्नागिरी येथील नागु स्कूलमध्ये घातले गेले. आप्पांना म्हणजे स्वामीजींना लहानपणापासूनच ज्ञानार्जनाची अतिव ओढ होती. त्यामुळे ज्ञानप्राप्तीची एकही संधी ते दवडत नसत.तसेच त्यांना वाचनाची ही अतिशय आवड होती. पुढे वयाच्या १६ व्या वर्षी श्रीस्वामीजी इंग्रजी सातवी पासुनचे पुढील शिक्षण घेण्यासाठी मुंबई येथे आले.आंग्रेवाडीतील 'आर्यन एज्युकेशन सोसायटी' या विद्यालयात त्यांचे शिक्षण सुरू झाले. या विद्यालयाचे विशेष म्हणजे यात धर्मशिक्षण ही दिले जाई.रोजची प्रार्थना झाली की अर्धा तास धर्मशिक्षण व नंतर अभ्यास सुरु होत असे.चौथीपासून पुढच्या वर्गांना भगवद्गीतेतील काही अध्याय नेमलेले असत.मुळात स्वामीजींवर लहानपणापासूनच उत्तम धार्मिक संस्कार घडले होते व गितेचा छंदही लागलेला होता. आता आपल्याला हवे तसे विद्यालय मिळाले असे वाटून त्यांना विद्यालयाचाही अतिव अभिमान वाटु लागला.
                  
श्रीस्वामींचे राहण्याचे ठिकाण सर्वोत्तम होते. ते आपल्या मामाकडे म्हणजे केशवराव गोखले यांच्याकडे आनंदी चाळीत राहत असत.त्यांचे मामा हे पारमार्थिक वृत्तीचे होते व पुढे स्वामीजींचे मार्गदर्शकही झाले.ते पुण्याच्या बाबामहाराज वैद्य यांचे अनुग्रहीत होते व महाराजांचे लाडके शिष्य होते. जणु नियतीने सद्गुरुचरणांजवळ पोचवीण्यासाठी प.पु.स्वामीजींना मुंबई पर्यंत आणले होते. विद्यालयात घारपुरे नावाचे अनुभवी शिक्षक स्वामीजींना होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली गीतेबरोबर 'गीतारहस्य' व 'ज्ञानेश्वरीचा' ही काही भाग स्वामीजींकडुन अभ्यासला गेला. याचा परिपाक म्हणुन की काय पण स्वामीजींना गीता ज्ञानेश्वरी ची अवीट गोडी लागली. त्याकाळात स्वातंत्र चळवळीचे नेतृत्व प.पु.श्रीलोकमान्य टिळक यांच्याकडे होते‌.स्वामींजी टिळकांचे विचार केसरीतुन वाचतच होते त्यातुनच देशप्रेमाची ज्वाला त्यांच्या हृदयात तिव्र होत होती. १ आॅगस्ट १९२० ला लोकमान्यांचे देहावसान झाले. संपूर्ण भारत या शोकसागरात बुडून गेला.सरदारगृहाकडे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी शेकडो लोकांची गर्दी झाली.स्वामीजींच्या मनात लोकमान्यांबद्दल अपार प्रेम असल्याने ते ही तिथे पोचले.दर्शनाच्या रांगेत उभे राहिले. लोकमान्यांबद्दलचा सर्वसामान्य जनतेचा आदरभाव ,प्रेम पाहून स्वामीजींचे मन अंत:करण भरुन आले.दिवसभरातील सर्व घटनाक्रम पाहून स्वामीजींचे मन देशप्रेमासाठी वेडे झाले. शिक्षणाबरोबरच राजकारणाचा ही विचार त्यांच्या मनात सुरु झाला. लोकमान्यानंतर देशाच्या स्वातंत्र चळवळीचे नेतृत्व गांधीजींकडे आले. यांच्या सारखा नंगा फकीर ,त्यागी देशभक्त आता लोकमान्यांचे कार्य पुढे चालु शकेल असा भाव श्रीस्वामीजींच्या मनात निर्माण झाला.पुढे गांधीजींच्या असहकार चळवळीला पाठिंबा म्हणुन १९२१ मध्ये स्वामीजींनी 'आर्यन सोसायटी' या आपल्या आवडत्या विद्यालयावर तत्वाकरीता बहीष्कार घातला. सर्व आवडत्या शिक्षकांचा निरोप घेऊन ते  बाहेर पडले यावरुन स्वामीजींच्या मनातील देशभक्तीची भावना किती तीव्र होती याची जाणीव होते. अभ्यास बहुतेक झालेला होताच त्यामुळे आता मुंबई ला राहण्याची गरज नव्हती.आता ते पावसला परतले होते .त्यावेळी त्यांचा संपूर्ण वेश म्हणजे संपूर्ण खादीचा पोषाख होता.धेय्यनिष्ठ व विरक्त तरुण बघुन पावस येथील सर्वांना हा तरुण एक आदराचा केंद्रबिंदू ठरला होता. पुढे दोन वर्षांत अजुन काही घडामोडी स्वामीजींच्या जिवनात घडल्या पण आता त्यांच्या जिवनाला नवी दिशा मिळणार होते, त्यांच्या अवताराचे प्रयोजन त्यांना कळणार होते म्हणजेच आता त्यांच्या वर गुरुकृपा होण्याची वेळ जवळ येऊन ठेपली होती.  

                                 स्वामीजींना आता विसावे वर्ष लागले होते.देशासाठी सर्वस्वावर लाथ मारुन ते देशभक्त झाले होते.पण त्यांच्या जिवनाचे धेय्य काही वेगळेच होते आणि त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांच्यावर लहानपणापासून तसे पारमार्थिक संस्कार घडत आले होते.त्यांचे मामा  केशवराव गोखले यांच्या मुळे स्वामीजींच्या वडिलांना म्हणजे विष्णुपंतांना श्रीसद्गुरु बाबामहाराज वैद्य पुणे यांचा अनुग्रह कृपेचा मार्ग मिळाला होता. तसेच स्वामीजी त्यांच्या मामा कडे मुंबईला राहत असतांनाच त्यांची पारमार्थीक जिज्ञासा वाढू लागली होती.त्याचबरोबर गीता व ज्ञानेश्वरीचे चिंतनही सुरु होतेच.यातुनच पावसला ते परत आले पण चिंतन,वाचन हे सुरुच होते.श्रीस्वामीजींचे मामा हे आपल्या भाच्याचे हे सद्गुण हेरुनच होते त्यातुनच त्यांना खात्री पटली की आपला भाचा हा पारमार्थासाठी पूर्ण अधीकारी आहे.त्यांनी श्रीस्वामीजींना पुण्यास नेऊन सद्गुरु बाबामहाराजांचे चरणावर सोपविण्याचे ठरविले.तसे पत्र त्यांनी आप्पांना म्हणजे स्वामीजींना लिहीले. आपल्या अनंत जन्माचे सुकृत फळला येणार या विचाराने स्वामीजीही सचखावले होते. मुंबईहून आप्पा (स्वामीजी) आपल्या मामाबरोबर पुण्यास गेले. पुण्यास गेल्यावर केशवराव‌ (स्वामीजींचे मामा ) व आप्पा (स्वामीजी) बाबामहाराजांचे दर्शनास गेले. बाबामहाराजांची दृष्टी आप्पांवरती पडली. महाराजांनी आप्पाबद्दल ची सर्व माहिती केशवरावांकडुन घेतली व हा परमार्थाचा उत्तम अधिकारी आहे हे पाहून बाबांनी त्यांचा अंगीकार करण्याचे तात्काळ मान्य केले व दुसर्या दिवशी अनुग्रह होईल असे सांगितले. त्यानंतर हे मामा-भाचे मुक्कामी परतले. उत्सुकतेपोटी आप्पांना रात्री झोपच लागली नाही .सद्गुरुंच्या स्मरणात आणि सुखमय विचारात ते फक्त पडुन होते.सर्व रात्रभर विसावुन आप्पा आपल्या मामांच्या आधी उठून प्रातर्विधी उरकुन मोकळे झाले.काही वेळाने मामाचेंही स्नान वगैरे उरकल्यावर सद्गुरुंच्या पुजनाकरीता फुले ,हार, उदबत्त्या,नारळ वैगेरे घेऊन आप्पा मामांसोबत बाबामहाराजांकडे गेले. इकडे बाबा आपली सर्व प्रातर्विधी आटोपून ज्ञानेश्वरी वाचनात मग्न झाले होते. परंतु आज यांचे लक्ष नेहमीप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचनात गढून न जाता आप्पांच्या चिंतनात खेचले गेले होते. कारण आदल्या दिवशी पाहिल्यापासून त्यांचे मन आप्पांकडे मोहित झाले होते.हा कोणी योगभ्रष्ट जन्माला आला आहे अशी त्यांची ठाम समजूत झाली होती.आपल्या संप्रदायात हा अलौकिक ठरून हा महान लोकोध्दाराचे कार्य करेन असं त्यांना जाणवले. बाबा आसनस्थ बसुन ध्यानस्थ होते. मामांनी त्यांना वंदन केल्यावर आप्पांनीही त्यांना वंदन केलं व मामांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी गुरुमहाराजांची पुजा केली.बाबा  आपल्या गुरुपरंपरेचे स्मरण करुन भावतन्मय अवस्थेत होते‌. आप्पा समोरच बसुन सद्गुरुंकडे बघत होते.आपली अर्धोन्मिलीत दृष्टी मोकळी करुन ते आप्पाला कृपादृष्टीने न्याहाळू लागले.नंतर बाबांनी त्यांच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेऊन गुरुगुह्य ज्ञानाचा उपदेश केला .संप्रदायातील सोऽहं मंत्राची दिक्षा दिली.आप्पांची (स्वामीजींची) लगेच भावसमाधी लागली. सोऽहं च्या अनुसंधानात ते रंगुन गेले. गुरुकृपेने उथुन पुठे फक्त अखंड सोऽहंचाच ध्यास लागला व त्यांचे चित्त अखंड अनुसंधानात रमू लागले.

                                    पुढे लवकरच स्वामीजी गुरुकृपेचा हा आशिर्वाद अनुग्रह घेऊन अंतर्बाह्य बदलले.या बदलेल्या स्थितीत स्वामीजी लवकरच पावसला परतले.पण परतल्यावर स्वामीजी नुसतं साधनारत झाले नाहीत तर त्यांनी लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या पावलावर पाऊल टाकित ते विविध समाजकार्य करण्यासाठी सरसावले.त्यांनी मुलांसाठी "स्वावलंबन" आश्रम सुरु केला.तसेच पुष्कळ लोकांना त्यांनी शिक्षणाकडे वळविले.अशा पद्धतीने श्रीस्वामी महाराजांचे समाजकार्य ही अखंड सुरु होते‌.त्याचप्रमाणे आध्यात्मिक साधना व अभ्यास ही त्यांचा सुरुच होता.आपल्या सद्गुरु श्रीबाबांची ज्ञानेश्वरी जिर्ण झाल्याचे पाहून श्री स्वामींनी आपल्या हस्ताक्षरात अतीशय सुंदर अशी ज्ञानेश्वरी लिहून काढली आणि आपल्या सद्गुरुंना अर्पण केली.हीच ज्ञानेश्वरी जेव्हा ते अर्पण करण्यास पुण्यात आले तेव्हा त्यांनी पुण्यातील टिळक महविद्यालयात पुढील उच्चशिक्षण घेण्याचा विचार केला.त्यांनी यथावकाश विद्यालयात प्रवेश घेतला आणि काम ही सुरु केले.पुढे १९२८ साली त्यांना कारकून म्हणून काम मिळाले.आता त्यांना नित्याचे सद्गुरु सानिध्य मिळू लागले .याचा ते पुरेपूर फायदा आपल्या परमार्थात करुन घेऊ लागले.आता त्यांच्या साधनेला चांगलीच धार आली.अखंड साधना व गुरुकृपा यामुळे त्यांना अतिशय अफाट असे साधनेतील अनुभव यायला लागले. यावेळी एका पत्राद्वारे त्यांनी काही वाक्य म्हटले त्यातील एक महत्वाचे वाक्य ज्याचा त्यांनी सद्गुरु कृपा संपादन करण्यासाठी पुरेपूर उपयोग केला ते वाक्य म्हणजे , "जितकी भक्ती तितकी प्राप्ती." यानंतर ही बर्याच मोठ्या घडामोडी श्री स्वामींच्या चरित्रात आहेत पण त्या इथे सध्या तरी मांडणे शक्य होणार नाही.स्वामींनी स्वातंत्रयुद्धात भाग घेतला होता त्यामुळे त्यांना दोनदा जेल मध्ये ही जावं लागलं होतं.त्यावेळी हे सर्व तरुण मंडळी महात्मा गांधींच्या सत्याग्रह चळवळीला खंबीरपणे पाठिंबा ही देत होते. पण सद्गुरु आपल्या या उत्तराधिकार्याला उत्तमपणे ओळखून होते.त्यांना श्री स्वामींच्या भावी आयुष्यातील विश्वविख्यात कार्याची जाणिव होती.श्रीस्वामींनी जेल मधून परतल्यावर सद्गुरु चरणी नवरत्नांचा म्हणजे नवओव्यांचा हार अर्पण केला.

श्री स्वामी महाराज वाङमय विशारद पदवी घेऊन १९३४ ला पावस ला परतले.यावेळी श्रीस्वामींचे तीस वय पूर्ण झाले होते.पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते.श्रीस्वामींची तब्येत अचानक बिघडली.सर्वांगाला कंप सुटू लागला,बोलण्याची शक्ति राहिली नाही,अंगात अतिशय ताप होता, अशक्तपणा आल्याने डोळ्यांची उघडझाप ही करणे अवघड होत होते.श्रीस्वामींची प्रकृती इतकी बिघडली की ती रात्र सर्वांनी जागुन काढली.पण दुसर्या दिवशी त्यांना थोडी हुशारी आली.पुढे हे आजारपण सहा महिने जसेच्या तसे राहिले.स्वामींना परस्वाधीनपणे हा काळ काढावा लागला.या आजारपणातच थरथरत्या हाताने स्वामींनी "अमृतधारा" हे काव्य रचले होते.श्रीअण्णा देसाई यांच्या मदतीने थोडे फार मंद गतीने चालनेही स्वामींनी सुरु केले.पुढे ते अण्णा देसाई यांच्याकडे राहण्यास गेले.स्वामी त्यावेळी खोलीत ,झाडाखाली तासंतास ध्यानासाठी बसुन राहिलेले  दिसत.लोकांना श्रीस्वामींना भुताने झपाटले आहे असेच वाटायला लागले.पण त्यांना काय माहिती स्वामी महाराज आत्मानंदाच्या अनंत सागरात खोल डूबत चालले होते.पुढे पंधरा दिवस देसाईंकडे व पंधरा दिवस आपल्या घरी असा क्रम त्यांनी केला.येवढ्या अशक्तपणातही त्यांनी आपला नित्यक्रम ,नित्यनेम चुकविला नाही.या काळातच स्वामींनी गुरुआज्ञेने अनुग्रह देण्यास सुरुवात केली होती. इ.स. १९४२ साली श्री स्वामींना भगवंतांचा सगुण साक्षात्कार झाल्याची अलौकिक घटना चरित्रात आली आहे.त्यानंतर श्री स्वामींनी भगवदगीतेचा साकीबद्ध अनुवाद केला.( साकी हे लिखाण शैलीतील एक वृत्त आहे.ते स्वामींना अतिशय आवडायचे व आपल्या बहुतेक रचना स्वामींनी याच वृत्तात केल्या आहेत.) इ.स.१९४४ ला हा अनुवाद लिहून पूर्ण झाला व प्रकाशित ही झाली.इ‌.स १९४५ साली "संजीवनी गाथा" हा अतिशय रसाळ ,उच्च कोटीच्या अनुभवांच्या अभंगांचा गाथाही प्रगट होऊ लागला.इ.स १९४९ सालापर्यंत स्वामी  अप्रकाशित होते.त्यांच्याबद्दल कमीच लोकांना माहिती होती.पण लवकरच पावसाच्या या ज्ञानसुर्याच्या तेजामुळे संपूर्ण जगच उजळून निघणार होते.स्वामींचे वाङमय लोकांपर्यंत पोचावे यासाठी देसाई बंधूंनी त्याचे मोठ्या प्रमाणात प्रकाशन केले.१९४९ पर्यंत बर्याच लोकांना स्वामींनी अनुग्रह देऊन कृतार्थ केले होते.याच सर्व मंडळींनी १९५० ला स्वामींचे घरी सामुदायिक भजनाचा कार्यक्रम सुरु केला.स्वामींची शांत ,सात्वीक मुर्ती बघूनच लोकांना समाधानाची प्राप्ती होवू लागले.इ.स १९५३ पासून स्वामींनी ज्ञानेश्वरीचा आपला विश्वविख्यात असलेला "अभंग ज्ञानेश्वरी" हा अनुवाद लिहीण्यास सुरुवात केली. हा अनुवाद पुर्ण होता होता स्वामींकडे बरेच लोक येऊ लागले.बरेच लोक अनुग्रहासाठी, पारमार्थिक मार्गदर्शनासाठी येत असत.या सर्वांना स्वामी प्रेमाने मार्गदर्शन करित.पुढे दिड महिना स्वामींचे रत्नागिरीत वास्तव्य होते.खुप दिवसांनी स्वामी प्रथमच पावसच्या बाहेर आले होते.इथे लोकांची दर्शनासाठी बरीच गर्दी होऊ लागली.काही लोकांच्या घरी स्वामींनी भेट ही दिली होती‌.बरेच अनुग्रह घेऊन कृतार्थ झाले.इतके प्रकृती अस्वास्थ असल्यावरही स्वामींनी मुमुक्षू, आर्त लोकांना मार्गदर्शन देऊन कृतार्थ केले ही काही सामान्य बाब नव्हे.स्वामी यानंतर पावसाला परतले.आता स्वामींची किर्ती मुंबई,पुणे वैगेरे भागत पसरली व त्यांच्या दर्शनासाठी दूरदूरच्या भागातुन लोक येऊ लागले.इ.स १९६० देसाई बंधूं व डॉ मिराशी यांनी नाथषष्टीच्या शुभमुहूर्तावर स्वामींच्या हस्ते "अभंग ज्ञानेश्वरीचे" प्रकाशन केले.यावेळी मुंबई पुणे तसेच रत्नागिरी आणि जवळपासच्या भागातील ७००/८०० स्त्री पुरुष भक्तांचा समुदाय पावसला जमला होता.या वेळी स्वामींना भरजरी पोषाख अर्पण करण्यात आला.स्वामींना त्याची यत्किंचितही आवड नव्हती पण भक्तांसाठी त्यांनी तो पोशाख केला. १९६१ साली स्वामींचा सर्व भक्तांनी मिळून जन्मोत्सव साजरा केला. इ.स १९६३ साली स्वामींच्या षठ्यब्धीचा भव्य दिव्य उत्सव ही साजरा करण्यात आला.  इ.स १९३४ ते इ.स १९६० हा विलक्षण आणि अद्वितीय असा काळ होता.याकाळात स्वामींनी अने काव्य ,अभंग ,आत्मज्ञान शब्दरुपात प्रगट केले.या वेळी अनेक मुमुक्षू,आर्त , जिज्ञासू भक्तांना,साधकांना स्वामींनी मार्गदर्शन केले.स्वामींच्या कृपा अनुग्रहाचा विलक्षण अनुभव अनेक लोकांना आला.त्यांची किर्ती उत्तरोत्तर वाढत गेली.पावसच्या या छोट्या गावात दूरवरचे लोक येऊन कृपार्थ होऊ लागले. आपल्या सद्गुरुंनी दिलेलं नाम बिज,आपल्या परमप्रिय ज्ञानेश्वर माउलींच्या परंपरेचे नामबिज स्वामी महाराज शरणागताला मुक्त हस्ताने दिले.हा मोठा काळ व त्या वेळी घडलेल्या घडामोडी ,पत्र व इतर घटनांचा उल्लेख जरी केला तरी अनेक लेख त्यावर तयार होतील.त्यामुळे मी तो भाग गाळतो आहे.( आपण सर्वांना विनंती की स्वामींचे अतिशय विलक्षण चरित्र आपण जरुर वाचाच .एका लेखातून मांडणे ते अशक्य आहे.कारण तो नुसता जीवन प्रवास नाही तर आपल्यासारख्या शिक्षण घेणार्या,नोकरी घेणार्या व्यक्तीचा सामान्य ते सिद्ध करणारा अचंबित करणारा विलक्षण जिवन वृतांत आहे.स्वामी महाराज जरी अवतारी असले तरी त्यांनी सामान्य माणसासारखे जिवन जगून दाखविले.इतके प्रकृती अस्वास्थ असल्यावर ही त्यांनी आपली अध्यात्मिक बैठक ,आपले अखंड अनुसंधान कधीही मोडले नाही.स्वत: प्रकृती अस्वास्थ्यामुळे जर्जर झाले तरीही शरणं येणार्याला त्यांनी मार्गदर्शन दिले.त्यांनी नुसता अनुग्रह नाही तर शरणागताला पारमार्थिक अनुभव  देऊन कृतार्थ केले. अनेकांना त्यांच्या त्यांच्या इष्ट दैवताच्या रुपात दर्शन देऊन भक्तिमार्गात अग्रेसर केले.अनेकांना परमार्थातील उच्च‌ कोटी च्या पातळीवर नेऊन पोचवले.स्वामींचे जिवन म्हणजे एक गाथा आहे.जी गाथा आपण स्वतः वाचल्यावरच त्याचे अलौकिकत्व कळेल.स्वामींनी लिहीलेली अभंग ज्ञानेश्वरी आणि संजीवनी गाथा एकदा चाळली जरी तरी हृदयात सात्विक प्रेम उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही.इतके ते रसाळ ,प्रसादीक आणि उच्च कोटीचे आहे. शब्दमर्यादेस्तव मी लेख आटोपता घेत आहे त्याबद्दल क्षमा मागतो पण येणार्या काळात या दिव्य चरित्रातील एक एक मोती वेचून त्यावर चिंतन मांडण्याचा मी नक्की स्वामी चरणांना स्मरूण प्रयत्न करेन.स्वामींची कृपा असेल‌ तर ते ही घडेलच.)
                                   प्रचंड धर्म कार्य ,अनेकांवर कृपा अनुग्रहाचे अखंड कार्य सुरु असतांना वयाच्या साठ वर्षा नंतर दिनांक १२ जून १९६३ रोजी स्वामींची प्रकृती पडशाच्या आजाराने अकस्मात बिघडली.हे दुखने अतिशय जास्त विकोपाला जाऊ लागले.डॉ जोगळेकर यांचे उपचार सुरु होतेच.अनेक लोक स्वामींच्या सेवेसाठी तत्पर होते.आजवरपणात थोडेफार स्वस्थता लाभून स्वामींना ठिक वाटायला लागले.पण चार महिन्यानंतर प्रचंड अशक्तता वाढली.त्यामुळे दर्शन आता दुरुनच सुरु झाले.स्वामी क्वचितच गरज असली तर कुणाशी बोलू शकत व शक्य असले तर आलेल्या व्यक्तीकडे कृपापूर्ण दृष्टीने थोडा वेळ पाहत.स्वामींकडे येणार्यांकडे भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली होती.त्यामुळे जवळून दर्शन व बोलणे स्वामींना शक्य होत नव्हते.प्रकृती बिघडू लागली .जवळच्या भक्तांनी स्वामींना फार विनवणी केल्यावर स्वामींनी दुरून दर्शनाला संमती दिली‌.इ.स १९६५ ला आजार बळावला. एवढा आजार वाढत असतांनाही १९६५ ते १९७० या पाच वर्षांच्या कालावधीत स्वामींच्या दर्शन अनुग्रह घेऊन अनेक लोकांनी आपले जिवन धन्य करुन घेतले.हजारो मुमुक्षूंना त्यांनी अनुग्रह देऊन साधकाच्या पाऊलवाटेवर आणले.स्वामींनी आपले अवतार कार्य पूर्ण होण्याआधी आपल्या तिनं शिष्यांना सद्गुरु पदावर आरुढ केले.ते तिनं शिष्य म्हणजे ल.रा.फडके ज्यांना आपण "अमलानंद" या नावाने ओळखतो.दुसरे म्हणजे "सत्यदेवानंद सरस्वती" हे आधी आळंदी ला राहत.वैराग्य होऊन यांनी संन्यास घेतला होता.यांना स्वामींनी अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या रुपात दर्शन दिले होते.त्यामुळे ते स्वामींचे अनन्य भक्त बनले.स्वामींची प्रकृती अत्यंत क्षीण झाल्यावर ज्यावेळी ते अनुग्रह देत, त्यावेळी अनुग्रहाचे रहस्य व इतर समाधानकारक उपदेश देण्याचे कार्य हे सत्यदेवानंद यांचेकडे स्वामींनीच दिले होते.त्यांना संप्रदाय चालविण्याची आज्ञा स्वामींनीच दिलेली होती.तिसरे श्री बाळासाहेब वाकडे ज्यांना आपण "माधवनाथ" म्हणून जाणतो.यांना पहिल्या भेटीत स्वामींच्या जागी ज्ञानेश्वर माउलींचे दर्शन घडले.काही काळाने स्वामींनी त्यांना लेखी संप्रदाय चालविण्याची आज्ञा केली‌ आहे.इ.स १९७३ साल उजाडले.स्वामींचा देह आता फारच थकला होता.त्या वर्षाआधी १९७२ च्या ऑक्टोबर मध्ये स्वामींनी आपल्या महासमाधीची जागा सांगून ठेवली होती.त्या समाधीच्या आतील लांबी,रुंदी ,खोली सर्वांचा तपशील कागदावर मांडून स्वामींनी त्याबद्दल मार्गदर्शन केले होते.स्वामींची प्रकृती बिघडत चालल्यामुळे अनेक भक्त दर्शनाला येऊन गेले.शेवटी दिनांक १५ ऑगस्ट १९७४ साली स्वामींनी आपल्या देहाची खोळ सांडली आणि पावसचा हा महायोगी निर्गुण रुप धारण करुन विश्वात्मक झाला.पुढे २४ तासांसाठी स्वामींचा देह दर्शनासाठी ठेवण्यात आला.सर्वत्र "राम कृष्ण हरी" नामाचा अखंड नामघोष सुरु होता.अश्रुपूर्ण डोळ्यांनी सर्व भक्त आपल्या या देवांचे दर्शन घेऊ लागले.आधी स्वामींनी आज्ञा दिलेल्या जागी स्वामींच्या पवित्र देहाला समाधी देण्यात आली.या विधीसाठी सज्जनगडाहून प.पु.मारोतीबुवा रामदासी यांना बोलाविण्यात आले. पावस हा ज्ञानदीप आपली सगुण खोळ सांडता झाला.स्वामी आजही आपल्या दिव्य वाङमयातुन आपल्याला भेटतातच.स्वामींचे अत्यंत रसाळ, प्रासादिक आणि सुंदर असे वाङमय आहे.ज्यात "संजिवनी गाथा" , "भावार्थ गीता" , "अभंग ज्ञानेश्वरी", "अभंग अमृतानुभव", "चांगदेव पासष्टी", "तीन प्रवचनें", "स्वरुप पत्र मंजुषा" अशा ग्रंथांचा समावेश होतो.श्रीस्वामी महाराजांच्या सुकोमल चरणी ही शब्दसुमनांजली अर्पण करतो आणि स्वामींनी आपल्या सर्वांकडून भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या चरणांची अखंड सेवा करुन घ्यावी ही कोटी कोटी दंडवत पूर्वक प्रार्थना 🙏🌸🌺🚩
     ✒️✍️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️

#रामकृष्णहरी🙏🌸🌺🚩
#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🌺🚩
#महाराज_ज्ञानेश्वर_माउली_समर्थ 🙏🌸🌺🚩


2 comments:

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...