आज_सद्गुरु_श्रीताजुद्दीन_बाबांची_९७वी_पुण्यतिथी🙏🌺
१९ व्या शतकात होऊन गेलेले श्रीताजुद्दीन बाबा हे एक लोकविलक्षण असे अवलिया संत होते. बाबांचा जन्म नागपूर पासुन जवळच १५ किमी असलेल्या कामठी या गावी झाला होता. या गावाला त्यावेळी १२५ वर्षांपूर्वी इंग्रजांच्या राजवटीचा फार मोठा तळ होता.बाबांचे वडील सैयद बद्रुद्दीन सैन्यामध्ये सुभेदार होते.आई मरीयम पण मद्रासी पलटन नं.१२ मध्ये सुभेदार पदावर काम करित होती. त्यामुळे ते कामठी भागातच राहत असत. २१ जानेवारी १८६१ पौष मास कृष्ण द्वितीया तिथीला आणि पहिजुबुल १२७९ हिजरी सन सोमवार सकाळी ५-१५ ला मरियम बी यांचे पोटी बाबांचा जन्म झाला.जन्मताच बाळ रडत नव्हते हा चमत्कार सर्व बघतच राहिले. कुणीतरी बाळाला जुन्या चालीरीती नवजात बाळाच्या टाळुवर व कानांच्या पाळ्यावर डाग देण्यात आले व तेव्हा बाळ रडायला लागलं.बाळाचा आवाज ऐकुन सर्वांना आनंद झाला.बाबा कधी-कधी डोळे बंद करुन रहात, कधी कधी बराच वेळ तोंडातुन आवाज निघत नसे.कधी कधी बराच वेळ एक टक पापनी न लवता बघत रहात हे सर्व चमत्कार लहानपणी पाळण्यातच त्यांची केले.त्यांच्या आई वडीलांनी त्यांचे नाव ताजुद्दीन ठेवले. जे आज सरकार ताज बाबा म्हणुन आपल्याला ठाऊक आहेत.बाबा एकवर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले.बाबांचा सांभाळ त्यांच्या आजीने व आईनेच केला.सहा वर्षाचे असताना त्यांचे नाव मदरशात घालण्यात आले.ते त्या मदरशात १५ वर्षे पर्यंत होते.या कालावधीत त्यांनी उर्दु, इंग्रजी फारसी भाषेचे ज्ञान प्राप्त केले. त्यांच्या शालेय जिवनात अशी घटना घडली ज्यामुळे त्यांच्या जिवनाला कलाटणीच मिळाली.एक दिवस मौलाना साहेब मुलांना शिकवत होते.एवढ्यात कामठीचे महान संत हजरत अब्दुल्ला शाह तिथुनच जात होते.त्यांनी जाता जाता वर्गात डोकावले तर यांची नजर ताजुद्दीन वर पडली.ते एकदम थांबले आणि वर्गात गेले आणि मौलाना साहेबांकडे पाहुन हसले व म्हणाले आपण याला काय शिकवता हा तर पूर्व जन्मीच सर्व शिकुन आला आहे.हजरत अब्दुल्ला शाह साहेबांचे हे वाक्य ऐकून मौलानांना अतिशय आश्चर्य वाटले कारण हजरत शाह बाबा फार मोठे संत होते.त्यांचे म्हणणे खोटे असू शकत नाही यावर सर्वांचा विश्र्वास होता. हळु हळु हे संत ताजुद्दीन बाबांकडे येत असत व त्यांच्या जवळ गेल्यावर त्यांनी आपल्या झोळीतील अंजन काढले व अर्धे स्वत: लावले आणि राहिलेले प्रासादाच्या स्वरुपात ताजुद्दीन बाबांच्या मुखात ठेवले व त्यांना उपदेश केला की कमी खा ,कमी झोप व कमीत कमी बोल. कुराण शरीफ असे वाच की जसे तुच महम्मद आहेस.बाबांनी जसा प्रसाद ग्रहन केला तसा त्यांच्यात लगेचच परिवर्तन दिसायला लागले.त्यांचे अष्टसात्विक भावा जागे झाले.डोळ्यातुन अश्रुधारा वाहायला लागल्या.त्या तिनं दिवस सतत वाहत होत्या.हजरत अब्दुल्ला शाह साहेबांमुळे ताजुद्दीन बाबांच्या आतील सुप्त शक्तीच जागृत झाली.ते संपूर्ण अंतर्मुख झाले.ही त्यांची अवस्था तिनं दिवस होती.या घटनेनंतर त्यांच्यात अमुलाग्र बदल घडला.त्यांचे हसणे खेळणे एकदम कमी झाले.ते एकांत प्रिय झाले.जसे जसे दिवस जाऊ लागले तसे तसे ते अधिकच अंतर्मुख झाले.आपला जास्तित जास्त वेळ ते चिंतनात घालवीत असत.खाण्यापिण्यावर त्यांची वासना नाहीशी झाली.ते मोठ्या मोठ्या संतांचे ग्रंथ वाचु लागले.त्यांच्या हृदयातुन त्यांचे स्फुरण त्यांना होऊ लागले. पाठ्यपुस्तकात काहीही नाही हे त्यांच्या विद्यार्थी दशेतच लक्षात आले.आता त्यांनी अध्यात्म मार्गावर पुढे जाण्याचाच ध्यास घेतला.
सन १८७९ च्या ॲागस्ट महिन्यात कामठीच्या कन्हान नदीला पूर आला.अर्ध्या पेक्षा जास्त कामठी पाण्यात बुडाली.बरीच घरे वाहून गेली.लोक बेघर झाले बाबांचे घरही त्यात वाहून गेले.त्यावेळी बाबा १८ वर्षाचे होते. बाबांची देहयष्टी चांगली सुदृढ होती व बाबा सहा फुटा पेक्षा जास्त उंचही होते. त्यांच्या मामांनी त्यांना २० व्या वर्षी नागपूरच्या रेजिमेंट नंबर १३ मध्ये सैनिक म्हणून भर्ती केले.या रेजिमेंट ला मद्रासी रेजिमेंट म्हणून ओळखले जायचे.१८८४ मध्ये ही रेजिमेंट सागरला रवाना झाली.सैन्याच्या नोकरीच्या दरम्यान बाबांनी देश विदेशाचा दौरा केला.बाबांना फ्रांस ला पाठविण्यात आले.तिकडुन ते हैदराबाद येथे आले.तिथे मिस्टर बेंस सैनिक अधिकारी त्यांच्या संपर्कात आले.त्यांना बाबांनी कुराण शरीफ शिकवीले.सैन्यात नोकरी करतांना ही बाबांच्या भक्तीत फरक पडत नव्हता.ते परमेश्वराची उपासना अखंत करत होतेच.त्यांच्या दैनंदीन जिवनात फार नियमीतता होती.सैन्यात असुन सुद्धा त्यांचे आचरण अतिशय पवित्र होते. पूर्वसंकेतानुसार सागरला असतांना बाबांना आपल्या सद्गुरुंचे स्थान मिळाले.त्यावेळी सागरला योगी हजरत दाऊद साहेब हुसैनी जंगलात राहत असत. त्यांनी या आपल्या जन्मोजन्मीच्या शिष्याला ओळखले होते व आपल्या कडे त्याला खेचण्यास सुरु केले होते.ते सुफी परंपरेतील श्रेष्ट चिप्ती या पंथाचे होते .आता बाबा आपले सैन्यातील काम करुन पिर साहेबांकडे जात असत.तेथेच त्यांची सेवा करीत असत.बरेच दिवस त्यांचा हा नेम अखंड चालु होता.काहीदिवसांनी पिर साहेबांनी ताजबाबांवर पूर्ण कृपा केली.बाबांना आत्मज्ञान दिले व आपला देह तिथेच ठेवला.तिथेच त्यांची समाधी बांधन्यात आली.आता बाबा रात्री अपरात्री जाऊन आपल्या गुरुंच्या समाधीजवळ बसुन ध्यान धारणा करु लागले होते.त्यांत त्यांची पूर्ण रात्र जाऊ लागली.बघता बघता ही वार्ता संपूर्ण मद्रासी रेजिमेंट मध्ये पसरली. यातुनच त्यांना पूर्ण आत्मोन्नतीचा अनुभव येऊ लागला. एक दिवस अचानक ते आपल्या अधिकार्या समोर आले व म्हणाले "सांभाळ आपली फौज आणि हा घे माझा राजीनामा." तो सैनिक अधिकारी बघतच राहिला.त्यांनी ही गोष्ट लगेचच बाबांच्या मामांचे सासरे जे तिथेच काम करत होते त्यांना कळवली.त्यांनी ही गोष्ट बाबांच्या आजीला कळवली.आजीला ही गोष्ट कळताच ती म्हणाली "माझा नातू पागल झाला आहे." ती ताबोडतोब सागरला गेली.तिथे गेल्यावर तिने पाहिले की बाबा सागरच्या गल्ली बोळात भ्रमीष्ठासारखे फिरत आहेत.त्यांना कसलेही भान राहीले नव्हते.कधी कधी ते जंगलात निघून जात तर कधी कुठल्याही झाडाखाली बसून ध्यान करु लागत.हे बघुन तीचा पक्का विश्र्वास झाला की आपला नातु ठार वेडा झाला आहे.ती लगेचच बाबांना घेऊन नागपूर ला परतली.हे वर्ष होते १८८७.कामठीत आल्यावर आज्जीने आपल्या नातवावर अनेक हकीम ,वैद्य,मांत्रिक,तांत्रिकाकडून उपचार करुन बघितले पण कशालाही यश आले नाही.हे बघुन ती फार दु:खी झाली.पण तिला काय ठाऊक बाबा कोणत्या आत्मानंदाच्या मस्तीत डुंबून गेले होते.बाबा आता बालोन्मत्तपिशाच्च वृत्तीत वावरु लागले.त्यांना कसलेही भान राहिले नाही.बाबा कामठीच्या गल्लीतुन फिरत असले की लहान मुळे त्यांच्या मागे फिरायची व त्यांना दगडं मारायची.त्यांच्यावर बाबा न रागवता ती दगडं गोळा करुन त्या पोरांना परत करतं.काही दिवसांनी बाबांची आज्जी स्वर्गवासी झाली.नंतर त्यांच्या मामांनी त्यांना चंद्रपुरात नेले.तिथे वन विभागात ते नोकरी करत असत.त्यामुळे जंगलातील आदीवासी लोकांकडुन बाबांचा इलाज करून बघितला पण काहीही झाले नाही.बाबा जंगलात फिरु लागले.चंद्रपूरच्या किल्ल्यात ध्यान करु लागले.त्यांना खाण्या पिण्याचेही लक्ष राहिले नाही.हे सर्व पाहून बाबांना परत कामठ्यात पाठविण्यात आले.आता कामठीत बाबांना अटकाव करणारे कुणीही राहिले नाही.ते आता मुक्तपणे संचार करु लागले.पाऊस पाण्याची चिंता नाही.आता ते नग्न होऊन तासन् तास फिरत राहतं.जर कुणी खायला दिले तर खात, नाहीतर कुणाला काहीही मागत नसत.अशा अवस्थेत ते कामठीत चार वर्ष राहीले.या चार वर्षांत त्यांनी असंख्य चमत्कार केले. (तुर्तास ते देण्याचे टाळतो...शब्द मर्यादेमुळे या पोस्ट मध्ये देणे शक्य नाही.पुढे यावर एक वेगळी पोस्ट करता येईल) बाबांच्या दैवी चमत्काराची बातमी पूर्ण कामठीभर पसरली हजारो लोक बाबांच्या दर्शनाला कामठीत येऊ लागले.कुणाला मुलगा हवा होता,कुणाला नोकरी,कुणाला पैसा तर कुणाला बढती.या सर्व प्रकाराला कंटाळून बाबा एक दिवस म्हटले की "आता मी पागलखान्यात जाणार" याचा लगेच दुसर्या दिवशी सर्वांना प्रत्यय आला .बाबा दुसर्या दिवशी छावणीतील एका युरोपियन महिला क्लबच्या समोर विवस्त्र जाऊन उभे राहले.बाबांना या अवस्थेत बघुन बायकांनी आरडाओरडा केला. वरिष्ठ अधिकारी येऊन बाबांना खुप मारु लागले.बाबा हसत म्हणत होते "हौजी हम तो पागल खानेमे जायेंगे."२६ अॉगस्ट १८९२ च्या गुरुवारी कामठीच्या कॅन्टोन्मेंट अधिकार्याने व जिल्हा न्यायाधिशांनी आदेश काढला की हा माणुस पागल आहे याला पागलखान्यात घेऊन जावे.बाबांना पागलखान्यात पाठविण्यात आले.पागलखान्यातील नोंद वहीत याची नोंद आहे.त्यावेळी बाबांचे वय ३१ होते.बाबा पुढे १६ वर्ष पागलखान्यातच होते.त्या १६ वर्षात बाबांनी हजारो चमत्कार केले.त्यांना सदेही कामठीत फिरताना अनेकांनी बघितले होते. तो प्रसंग असा, एका गुरवारी बाबांना पागलखान्यात ठेवण्यात आले त्याच दिवशी संध्याकाळी त्यांना कामठीच्या रस्त्यावर फिरतांनी अनेकांनी बघितले.ही गोष्ट विजेसारखी सैनिकी तळावर पोचली.शुक्रवारी सकाळी बाबांना कामठीच्या बाजारात फिरतांनी एका सैनिकाने बघितले व तो कावराबावरा झाला.कारण त्यानेच काल बाबांना बंद केले होते.तो ताबडतोब आपल्या वरिष्ठांना हे सांगायला गेला.विरीष्ठ हे तपासण्यासाठी घोड्यावर कामठीत आला ,पाहतो तर बाबा एका झाडाखाली बसलेले.त्या अधिकार्याने ताबडतोब आपला घोडा नागपूर ला वळवला तो रागाने लाल झाला होता.तिथे जाऊन तो डॉक्टरांवर गरजला की "वह पागल कैसा है जिसे मैने कल यहाँ भेजा था" डॉक्टर म्हटले तो खोलीत आहे.अधिकारी त्यांच्या सोबत खोलीत बघायला गेला तर बाबा खोलीत बसलेले. हे बघुन तर त्याच्या तोंडचे पाणीच पळाले व हे कुणीतरी मोठे महाराज आहेत हे तो समजला .तोच बाबा म्हटले "हौजी तुम अपना काम करते, हम अपना काम करते" नंतर हा अधिकारी बाबांना शरणं आला व दर रविवारी तो आपल्या परिवाराला घेऊन बाबांच्या दर्शनाला येऊ लागला. पागलखान्यात राहुनही बाबांचा सर्वत्र संचार असायचा.ते विविध देह धारण करुन अनेक ठिकाणी सदेही असायचे.पागलखाण्यात त्यांना असंख्य संत,सत्पुरुष भेटायला जात असतं.असंख्य भक्तही पागलखान्यातच बाबांच्या दर्शनाला न चुकता येत असत.
पागल खान्यात जे हजारो लोक येत त्यात नागपूर चे श्रीमंत रघोजीराजे भोसले (चतुर्थ) हे ही बाबांना भेटायला येत असत.त्यांना बाबांनी पूर्वसंकेत दिले व तोच शुभ शुकुन समजुन आपणच बाबांना सांभाळणार आहोत असा अर्ज करुन २००० रुपयांची जमानत भरुन आपल्या महलात बाबांना घेऊन आले. तो दिवस होता सोमवार २१ सप्टेंबर १९०८ .सक्करदरा महलाच्या आवारातच लालमहाल ही कोठी होती. तिथेच बाबांच्या राहण्याची सोय केली गेली. पण त्याच ठिकाणी हिरोजी महाराज हे ही संत राहत होते.यांचीही सेवा रघोजी महाराज करत असत.ताजुद्दीन बाबा लाल महालात आले आणि हसत रघोजी राजाला म्हटले "बडे भैया,जंगल घुमने आते,फिर तो यही बिस्तर लगेगा". बाबा इतर संतांना खुप मान देत असत.त्यांनंतर बाबा एक महिना राहले व वाकीच्या जंगलात निघून गेले. तिथून बाबा नागपूर पासुन २४ किमी जवळ असलेल्या वाकी या गावी आले.वाकीत ही बाबांनी असंख्य चमत्कार केले.अनेक लोकांच्या दु:खाचे हरण केले. अनेकांच्या अडचणी दुर केल्या.लोकांना भक्तीमार्गाला लावले.नागपूरच्या श्रीरघोजी राजांची बाबांवर अनन्य निष्ठा ,अतिव प्रेम होते.ते वारंवार वाकीला बाबांच्या दर्शनास येत असत.बाबांचेही त्यांच्यावर खुप प्रेम होते.हेच प्रेम बाबांना वाकीहून नागपूर ला परत घेऊन आले. राजांनी लाल महाल बाबांसाठी राखीव ठेवला होता.राजांनी काही पहेलवानांना बाबांच्या सेवेत ठेवले होते.फिरण्यासाठी एक बग्गीही दिली होती.तिथेही बाबांच्या दर्शनाला अफाट गर्दी जमत असे.बाबांच्या दर्शनाला भारतातुन हिंदु,मुस्लीम ,इंग्रज,राजा-महाराजा,पारशी विवीध लोक येत.त्या सगळ्यांची चोख व्यवस्था रघोजी राजे ठेवीत.हे सर्व लोक बाबांना काहीतरी अर्पन करीत . बाबांना येणारे कपडे,मिठाया या गरीबांना व पैसे बाबांच्या मामा आणि मावस भाऊ अब्दुल्ल जफ्फार ला देण्याचे चोख नियोजन रघुजी राजेंनी केले होते.पण काही मुसलमान लोकांना रघुजी राजांबद्दल असुया निर्माण झाली.त्यांनी बाबांच्या नातेवाईकांना रघोजी राजांविरुद्ध भडकावणे सुरु केले.मग काय १९२४ मध्ये रघोजींच्या विरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात आला.याचा उद्देश एकच की रघोजींना बाबांपासून दूर करणे.या मुळे रघुजी राजे खुप दु:खी झाले.त्यांने हे दुःख बाबांजवळ बोलुन दाखवले .पण बाबा त्यांचे आपल्या वरिल निखळ निर्मळ प्रेम जाणुन होते. बाबा रघुजी राजांना म्हटले "मुझे यहॉसे कोन निकाल सकता है | मेरा बिस्तर तेरे घरमे लाखो बरस रहेगा ||" आणि हे आजही बघायला मिळते .आजही रघुजींच्या त्याच महालात बाबांचा पलंग आहे.जे आज छोटा ताज म्हणुन ओळखल्या जातं. जुनं १९२५ नंतर बाबांची तब्येत बिघडायला लागली. राजे रघुजीवरील न्यायालयातील केस मुळे बाबा आता जास्त कुठे जात नसत.जास्त कुणाशी बोलत नसत.आपल्या प्रेमळ भक्तावर असा आळ आणल्यामुळे बाबांना फार वाईट वाटे. इतर भक्तांमध्ये आता वाद सुरु झाले होते. काही लोकांनी बाबांना आपल्या सोबत ताजबाद मधे नेले.तिथे त्यांनी बाबांना राहण्यास फार आग्रह केला पण बाबा तिथे थांबले नाहीत.शनिवार दि.१५ ऑगस्ट १९२५ च्या सायंकाळी संपूर्ण नागपूर शहरात ही बातमी पसरली की ताजुद्दीन बाबांची तब्येत बिघडली आहे.मागील काही महिन्यापासून चालु असलेल्या दावे प्रतिदाव्यांमुळे बाबा खरोखरच नाराज झाले होते.त्याचवेळी त्यांनी हा नश्वर देह ठेवण्याचा निर्णय केला होता.काही भक्तांच्या स्वप्नात जाऊन त्यांनी तसे सांगितले ही होते. रघोजी राजे जातीने बाबांच्या सेवेत लक्ष घालू लागले व आता ते स्वत: सेवेत रुजू झाले.डॉक्टरही आले त्यांनी बाबांना तपासले पण कुठल्याही आजाराचे चिन्ह त्यांना दिसेनात त्यामुळे उपचार काय करायचा हा प्रश्न त्यांना पडला. बाबांच्या चेहर्यावरील तेज दिवसेंदिवस वाढत चालले होतं. रघोजी राजांच्या लक्षात आले की बाबा आता समाधी अवस्थेकडे चालले आहेत ते सर्व जगाशी आपला संबंध तोडत आहेत.बाबांच्या चेहर्यावर प्रगाढ शांतता होती. श्रावण वद्य त्रयोदशी श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी तारीख १७ ऑगस्ट १९२५ ला लांब लांबून भक्त दर्शनाला येत होते.बाबांनी त्यांना आपल्या महानिर्वाणाची आधीच स्वप्नात माहिती दिली होती. त्यामुळे दुरवरुन लोक दर्शनाला आली होती. त्या भक्तांच्या रांगेत एक भगवेवस्त्रधारी साधु होता.त्याने बाबांच्या पायाला स्पर्ष करताच बाबांनी डोळे उघडले आणि म्हणाले ,"क्यु बाबू अभी तक यही हो" साधूने विचारले ,"हुजूर कहा जाऊ यह समझमे नहीं आता इसलिये यहाँ आता हू" बाबा हसत बोलले "आज हम जाते कल तुम जाना" अश्रुभरीत नेत्रांनी त्याने बाबांना नमस्कार केला व तो निघून गेला.हळु हळु संध्याकाळ होत आली.बाबांनी आपले डोळे उघडले पाहिले तर रघुजी राजे समोर उभे होते त्यांच्या डोळ्यातुन अश्रु वाहत होते बाबा हसुन म्हणाले "हो जी बडे भैया रोते काहे को हो हमारा बिस्तर तो यहा लाखो बरस तक लगा रहेगा" .आणि मग ते भक्तांकडे पाहुन आशिर्वाद देत पलंगावर जाऊन आडवे झालेत. त्यांनी एक खकार मारला व आपला आत्मा ब्रम्हांडात विलीन केला. ही बातमी वार्या सारखी सर्वत्र पसरली.हिंदु मुस्लिम सर्व लोक धाय मोकलून रडू लागले. नंतर बाबांच्या देहाला ताजबाग या जागेत मुस्लिम पद्धतीने कबरीत समाधी देण्यात आली. आजही बाबांच्या कृपेची करुणेची अनुभूती असंख्य लोक घेत आहेत. आज मोठा ताजबाग येथे बाबांची समाधी आहे आणि लालमहालाला छोटा ताज असे म्हटले जाते त्या ठिकाणी बाबांचा पलंग आजही आहे.
बाबांच्या समाधी नंतर दहाव्या दिवशी काजी अमीनुद्दीन साहेब ताजाबाद दर्ग्याच्या पासून थोडे दूर अंतरावर उभे राहून मनातल्या मनात बाबांना विनंती करत होते की बाबा आपण सक्करदरा (लालमहाल)सोडून ताजाबादला रहायला आलात मी आपल्या आपल्या आदेशाप्रमाणे रघुजी राजांकडे काम करत होतो.जर आपली हरकत नसेल तर मी पण इथेच राहायला येऊन का? काजी साहेब मनातल्या मनात हे बोलत होते इतक्यात करीम बादशाह उर्फ अल्लाह करीम जे बाबांचा चांगला शिष्य व संत पण होते ते त्यांना म्हणाले "तुझे बंगलेमे रहकर राजा को सलाम करने का हुकूम है" लाला बंगल्यातुन अजून बाबांचा पहारा उठला नाही.लाला बंगला महाराजांच्या महालात आहे आणि अजून तिथे ताजुद्दीन बाबा रहते है तु जा और खिदमद कर. आजही त्याठिकाणी बाबांच्या अस्तित्वाचा ,त्यांच्या कृपेचा अनुभव भक्तांना येतो.
अशा या दिव्य महात्म्यांच्या श्रीचरणी या पुण्यतिथी दिनी माझे श्री चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏🌼🍀
#श्रीदत्त_शरणं_मम🙏🏻🌺☘️🌸
#ताज_बाबा❤️🙏🌿
त्यांचाच अक्षय जाधव आळंदी✍🏻
( Note :- पुष्कळ लोक ताज बाबांचा जन्मोत्सव हा तारीखेने २७ जानेवारी ला ही साजरा करतात.पण मेहेर बाबांनी ही तारीख २१ जानेवारी सांगितली असल्याने मी तीच गृहीत धरली आहे. )


Good
ReplyDelete