🌺स्वानंदसुखनिवासी सद्गुरु श्रीजोग महाराज यांची १५५ वी जयंती :-🌺💐🌸🙏
प्रात:स्मरणीय,नित्यवंदनीय सद्गुरु श्री जोग महाराज हे खर्या अर्थाने वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू आहेत.जगद्गुरु तुकोबारायानंतर खुप सत्पुरुष वारकरी संप्रदायात झाले , प्रत्येकाने प्रचंड कार्य केले आहेच , पण महाराजांनी केलेले कार्य हे एकमेवाद्वितीयच आहे यात तिळमात्र शंका नाही.तुकोबारायानंतर वारकरी संप्रदायाला नवचेतना,नवं ऊर्जा , नवसंजीवनी व दिशा देण्याचे अचाट कार्य महाराजांनी केले.श्रीमहाराजांनी वारकरी संप्रदाय हा तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे दिव्य कार्य केले.अज्ञानी ,निरक्षर लोकांपर्यंत वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान सहज,सोप्या भाषेत पोचवले.
श्रीमहाराजांच्या चरित्राचे चिंतन केल्यावर महाराजांनी केलेल्या कार्याची व समाजावर केलेल्या उपकाराची जाणीव कुणालाही झाल्याशिवाय राहणार नाही.या उपकाराचे मूर्त स्वरुप आजही शंभर वर्षा नंतर आपण "वारकरी शिक्षण संस्था आळंदी" या रुपाने बघु शकतो.या ज्ञानाच्या विद्यापिठातून,सागरातून ज्ञानाचे अमृतकण वेचुन आजवर हजारो,लाखो विद्यार्थांच्या जिवनाचे सोनं झाले आहे ,हे सर्व विद्यार्थी कृतकृत्य झाले आहेत.श्रीजोग महाराजांनी लावलेले बिज आज वटवृक्षाच्या रुपात बहरलय आणि या वटवृक्षाच्या छायेत आजही अखंड हजारो जिव ज्ञानप्राप्तीसाठी अलंकापुरीत येतात. श्रीविष्णूबुवा जोग महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आपल्याला त्यांच्या परमपावन चरित्राचे अल्पसे चिंतन करायचे आहे.श्रीमहाराजांचे स्वनामधन्य शिष्य आपल्या सर्वांचे लाडके प.पू.सोनु मामा दांडेकर यांनी लिहीलेले चरित्र हा एकच आपल्याला आधार आहे.अतिशय सुंदर अशा या चरित्रातुन ठरावीक अमृतकण वेचुन आपणं संक्षिप्त रुपात महाराजांच्या चरित्राचे अवलोकन करुयात.या चरित्र ग्रंथाचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प.पू.सोनु मामांनी यात अजिबात श्रीजोग महाराजांच्या जिवनातील चमत्कार , अलौकिक घटनेचा उल्लेख प्रकर्षाने टाळला आहे.त्याचे महत्वाचे कारण म्हणजे श्रीमहाराजांनाही त्याबद्दल असलेली अनास्था.श्रीमहाराजांच्या चरित्रात आपल्याला सत्कर्म,सदाचार ,स्वाध्याय,अध्यायन,वर्तन, चारित्र्य आणि नियमबद्ध जिवनाचेच दर्शन घडेल.महाराजांनी आजिवन याच तत्वाचा अवलंबन केलेले आपल्याला दिसतो.खरंतर महाराजांचा अधिकार आपल्याला त्यांनीच सांगितलेल्या एका वाक्याने लक्षात येईल ते म्हणजे , "गेल्या जन्मात आम्ही भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे भोई होतो आणि त्यामुळेच आम्हाला हा जन्म लाभला आहे." खरंच महाराजांचे जिवन ही तसेच भव्य आणि दिव्यत्वाने परिपूर्ण होते.
भाद्रपद वद्य प्रतिपदा शके १७८९ रोजी दिनांक १४ सप्टेंबर १८६७ या दिवशी पुणे येथे श्रीनरसोपंत आणि मातोश्री सरस्वती देवी या अतिशय सत्शिल आणि सुखवस्तु दाम्पत्या पोटी महाराजांचा जन्म झाला.या दाम्पत्याचे हे चवथे अपत्य. श्रीमहाराजांच्या आईकडे व वडिलांकडे दोन्हीकडेही पहिलवानकी पिढीजात होती.त्यामुळे या घराण्यातील मुलांवरही मल्लविद्येचे संस्कार हे आलेच होते.महाराजांचे मोठे भाऊ पांडोबा हे उत्तम नावलौकिक असलेले मल्ल तर होतेच आणि पुण्यातील नगरकर तालीमीचे वस्तादही होते.तसेच पांडोबा हे अतिशय धार्मिक,सत्शिल ,ब्रह्मचारी आणि शिस्तबद्ध व्यक्ती होते.त्यामुळे नकळत त्यांचा पुरेपूर प्रभाव हा प.पू.विष्णुबुवांवर झाला यात नवल ते काय? श्रीविष्णुबुवा जोग महाराजही मल्ल विद्येत पारंगत झाले. एक उत्तम मल्ल म्हणून महाराजांचा पंचक्रोशीत नावलौकिक होता.यानंतर एक महत्वाचा प्रसंग महाराजांच्या चरित्रात घडला ज्यामुळे श्रीमहाराज हे अंतर्मुख झाले. तो प्रसंग म्हणजे " पुण्यातील एका कुस्ती स्पर्धेत महाराज जिंकले ,सर्वांनी आनंद उत्सव करत महाराजांची मोठी मिरवणूक काढली.त्यावेळी तिथे एक साधु ( श्री गंगाधर गोसावी असावे असा अंदाज आहे ) हे जोग महाराजांजवळ आले व म्हणाले "अरे या विजयाचा काय आनंद करतोय ,काळावर विजय मिळवशील तर तु खरा मल्ल आणि तोच खरा आनंद." त्यानंतर महाराज खर्या अर्थाने अंतर्मुख झाले आणि त्यांचे मन परमार्थाकडे खर्या अर्थाने वळले. ते आपले वडील बंधू पांडोबां समवेत वरचेवर श्रीक्षेत्र अलंकापुरीस ज्ञानेश्वर माउलींच्या दर्शनाला जाऊ लागले.हळूहळू ते माउलींचे व पांडुरंगाचे निस्सिम भक्त बनले.त्यांनी माउलींच्या समाधीवर माळ ठेवली व ती स्वतःच आपल्या हाताने गळ्यात घालून घेतली व ते वारकरी झाले.श्रीमहाराजांच्या चरित्रातील एक विशेष प्रसंग इथे मुद्दाम सांगतो ज्यातून त्यांच्या अधिकाराची जाणिव आपल्याला होते. एकदा महाराज नाशिकला रामकुंडावर गोदावरी गंगा स्नानासाठी गेले होते. ते गोदावरी मध्ये उभे होते व तिर्थोपाध्याय तिरावरुन संकल्प सांगू लागले , "पापोहं पापकर्माहं पापात्मा पापसंभव: ।।" बुवा एकदम त्याच्यावर खेकसले, "मी पापीही नाही,पापकर्मीही नाही । दुसरे काय म्हणायचे असेल ते म्हणा , एवढा हा संकल्प उच्चारला, तर खबरदार !" या एका वाक्यातुन महाराजांनी त्यांच्या अवतारीत्वालाच जणू प्रगट केले आहे.महाराज निःशंक अवतारीच ,"आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी" या तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे महाराज ही वैकुंठातुन भगवत कार्याकरीताच जन्माला आले होते यात तिळमात्र शंका नाही आणि त्यांनी हे वेळोवेळी विविध गोष्टीतून दाखवून ही दिले आहे. श्रीमहाराजांनी कधीही कुठलेही विशेष साधन केल्याचे कुणीही बघितले नाही.उपरोक्त वाक्यातून एक गोष्ट लक्षात येतेच की सर्व साधन त्यांनी आधीच्या जन्मातच पूर्ण केले होते.फक्त ते आपले नित्य कर्म असलेली संध्यावंदन कधीही चुकवीत नसत.तसेच आपल्या खोलीतील आरशापुढे ते तासंतास आपल्या दिव्य आनंदात बसून राहत.यामागचे कारण त्यांनी कुणालाही सांगितले नाही व त्यांना विचारायचे कुणाला धाडसही झाले नाही.
राहुरी या गावाजवळील एका योग्याने श्रीमहाराजांना काही योगसाधनेतील आसन व साधना शिकवली.महाराज ती साधना करु लागले पण त्याचा विपरीत परिणाम होऊन त्यांच्या नाडीचा एक ठोका कमी पडू लागला.त्यानंतर श्री जोग महाराज आळंदी येथे येऊन राहिले होते.त्यावेळी महाराजांंनी अजान बागेत बसून ज्ञानेश्वरीचे अखंड पारायण अनुष्ठान सुरु केले.लोकांमध्ये महाराज सुप्रसिद्ध होतेच आणि आता त्यांच्या भोवती लोकांचा गलबला सतत वाढत चालला होता म्हणून महाराजांनी आपला मुक्काम श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे हलवला.याच कठीण अनुष्ठानादरम्यान श्री जोग महाराजांना करुणाब्रह्म भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचा दृष्टांत व दर्शना चा परम पुण्यलाभ झाला.भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी त्यांना पुढील कार्याची दिशा दाखवली व त्याचे मार्गदर्शन केले.त्यानंतरच महाराजांनी १९१७ साली 'वारकरी शिक्षण संस्थेच्या' स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली. तुकाराम गाथेचे टिपा, अन्वयार्थ सहीत,विषयवार वर्गीकरण असलेले महदकठीण काम महाराजांनी केले.हा सार्थ गाथा १९०५ साली त्रंबक हरी आवटे यांनी प्रकाशित केला.याआधी कुणीही हे काम केले नव्हते.प्रथमच सार्थ,विषयावार वर्गीकरण असलेला गाथा प्रसिद्ध झाला होता.महाराज आद्य साखरे महाराज प.पू.श्री नाना महाराज साखरे यांच्या तत्वज्ञान व ज्ञानेश्वरीचे प्रवचन ऐकायला ही जात असत. माउलींच्या दृष्टांतानंतर महाराजांच्या कार्यास खर्या अर्थाने वेग आला.श्रीगुरु जोग महाराजांनी गावोगावी फिरून संत वाङमयाचा कीर्तन, प्रवचनाद्वारे सर्वदूर प्रचार - प्रसार केला.आपल्या अमोघ वाणीने महाराजांनी तरुणांना संत साहित्याच्या अभ्यासाला उद्युक्त केले.यातुनच 'वारकरी शिक्षण संस्थेची" स्थापना झाली.त्याकाळात महाराजांनी या संस्थेच्या उभारण्यासाठी २५ हजार रुपयांची रोख रक्कम दिली होती.इ.स १९१७ सालीचे पंचवीस हजार म्हणजे आजचे किती रुपये होतील याचा अंदाज जरी केला तरी आश्चर्याने बुद्धी स्तिमीत झाल्याशिवाय राहत नाही.श्रीमहाराज हे नैष्ठीक ब्रह्मचारी होते.वैराग्यशिल असलेल्या श्रीमहाराजांचे संपूर्ण जिवन हे वारकरी संप्रदायाच्या वर्धिष्णू कार्यासाठीच समर्पित होते असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. कीर्तन-प्रवचना साठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला.जोग महाराजांपूर्वी वारकरी कीर्तनाची धाटनी अत्यंत साधी व सरळ होती.श्रीजोग महाराजांनी तिला पंडिती पद्धतीच्या पूर्वपक्ष व उत्तरपक्षाची जोड दिली.
अत्यंत विनयशिलता,नियमशील,विशुद्ध असे आचरण,सत्यप्रियता आणि अत्यंत देशभक्ती या गुणांनी मंडीत असलेल्या श्रीमहाराजांचा समाजात अतिशय मान व प्रतिष्ठा होती. थोर देशभक्त श्री लोकमान्य टिळक हे महाराजांचे घनिष्ठ मित्र होते,टिळकांना महाराजांनी वेळोवेळी देशकार्यात मदत केली होती.ज्ञानेश्वरी,भागवत,गाथा या सर्व संत वाङमयावर महाराजांचे एवढे प्रखर चिंतन घडले होते की त्याकाळातील ह.भ.प पांगारकरांसारखे मोठ मोठे विद्वानही महाराजांच्या प्रवचनाला आवर्जून उपस्थित असत. श्रीमहाराजांनी आपल्यासारखेच वैराग्यशाली ,अत्यंत सत्शिल शिष्य आपल्या कार्यासाठी निवडले.त्यात प्रामुख्याने वै.ह.भ.प बंकटस्वामी महाराज, वै.ह.भ.प.लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, वै.ह.भ.प.मारोतीबुवा गुरव ,वै.ह.भ.प सोनोपंत दांडेकर तथा मामा साहेब दांडेकर हे प्रमुख होत.हे जणु श्रीमहाराजांचे शिष्य पंचायतनच.या सर्व शिष्य मंडळींच्या चरित्राचे जरी अवलोकन केले तरी महाराजांच्या अलौकिक चरित्राची कल्पना आल्याशिवाय राहणार नाही.श्रीमहाराजांना जातीभेदाचा आत्यंतिक टिटकारा होता.भगवान श्रीज्ञानेश्वर माउली ,तुकोबाराय ,सर्व संताकडून प्राप्त बोधाची श्रीमहाराजांनी मुक्त हस्ताने उधळन केली. श्रीमहाराजांनी संत वाङमयाचे अनेक ग्रंथ सार्थ टिपा प्रस्तावने सहीत प्रकाशित केले त्यात प्रामुख्याने सार्थ अमृतानुभव, निळोबाराय , ज्ञानेश्वर माउलींचा गाथा,सार्थ हरीपाठ,चांगदेव पासष्टी,एकनाथी भागवतादी सहा ग्रंथ,वेदान्त विचार ,महिपतीकृत ज्ञानेश्वरीतील सार्थ वेचे हे प्रमुख साहित्य आहे.
श्री जोग महाराजांना बुवावाजीची अतिशय चिड होती.असा कोणी ढोंगी महाराजांना दिसला की आपल्या हातातील काठी घेऊन त्याच्यावर ते तुटुनच पडत असत.एकदा पुण्यात असाच एक विदर्भातील बुवाबाजी करणारा तथाकथित साधु आला.त्याने अंतर्दुष्टीने एका भल्या माणसाची विधवा ही आपली गेल्या जन्मीची पत्नीच होती असे ओळखले होते म्हणे ! श्री जोग महाराजांना हे कळले तेव्हा महाराज उठले आणि आपला दण्ड घेऊन त्या साधूच्या मुक्कामी जाऊन उभे राहीले.त्यांनी त्या तथाकथित साधुला असे काही खडसावले, की लगेच त्याने आपला गाशा गुंडाळला आणि तो जे काही पळाला की बुवा असे पर्यंत पुन्हा पुण्यात पाय ठेवण्याची त्याची हिम्मत झाली नाही. तसेच हरी किर्तनासाठी पैसे घेणे याची महाराजांना अतिशय चिड व विरोध होता. गीता- भागवत हे काही विकण्याचे साधन नाही असे महाराजांचे नित्य सांगणे होते. हरीकीर्तन करुन कुणी पैसे घेऊ लागला की ते त्याच्यावर संतापत."तर मग पोट भरण्यासाठी काय करु ?" असा जर कुणी प्रश्न केला तर ते या प्रश्नावर लगेच उत्तर देत की, "वाटेल ते कर! हमाली केली तरी चालेल पण हरीनाम असे विक्रिस काढू नकोस." महाराजांचा नेहमी आग्रह असे की ,भिक मागणारा आशाबद्ध वक्ता यथार्थ मार्गदर्शन करु शकत नाही! इतके स्पष्ट मत महाराजांचे होते आणि महाराज कुणाचीही भिड न ठेवता ते मत मांडत असत.
आजच्या काळातील एकंदरीत परिस्थिती बघितली तर महाराजांनी काय केले असते याचा विचारही करवत नाही.असो तो एक स्वतंत्र चिंतनीय विषय आहे या लेखात त्याचे प्रयोजन नाही.
श्री जोग महाराजांचे भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींवर अनन्य साधारण प्रेम होते.याचे एक विशेष उदाहरण हे स्वतः प.पू.मामासाहेब दांडेकरांनी सांगितले आहे.एक दिवस श्रीमहाराजांनी सोनु मामांना आपल्याला आलेल्या पत्राचे उत्तर लिहायला सांगितले .नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पत्र लिहून झाल्यावर मामांनी पत्राच्या शेवटी 'आपला' असे लिहीले व श्रीमहाराजांपुढे सही साठी कागद केला.तेव्हा महाराज म्हणाले हे 'आपला' आधी खोड .आम्ही फक्त आणि फक्त ज्ञानदेवांचे आणि देवांचे आहोत ! हा प्रसंग छोटा जरी दिसत असला तरी यातुन महाराजांचे माउलींवरील अत्यांतीक प्रेम,अनन्य निष्ठेचे दर्शन झाल्याशिवाय रहात नाही.आपला देह आळंदी येथेच ठेवायचा हा महाराजांचा निर्धारच होता.श्रीमहाराजांचा कीर्तन प्रवचनासाठीचा प्रवास,दगदग हा अगदी अविरतपणे सुरू होता. त्यांना भगेंद्राचे दुखने झालेले असतांनाही त्यांची पंढरपुरची वारी आणि तिथली किर्तने चुकली नाहीत. त्या काळी बार्शी लाईट रेल्वेचा दगदगीचा प्रवास, पन त्यालाही ते जुमानीत नसत . महाराजांना शेवटचे दुखने झाले कफक्षयाचे . ह्या तापाने त्यांना फारच छळले, पन आजारांतही ते आत्मविश्वासाने म्हणत "आम्ही आळंदीशिवाय दुसरीकडे मरणारच नाही". श्री महाराजांचे ज्ञानेश्वरमाउलींवर अनन्यसाधारण- किंबहुना देवापेक्षांही अधिक प्रेम ! त्यामुळे आपला देह आळंदीस ज्ञानेश्वरांजवळ पडावा, अशी त्यांची इच्छा असणे स्वाभाविक होते.तसे त्यांनी ठरवून केलेही ही काय सामान्य बाबा नाही.
१९२० सालची माघ शुद्ध दशमी जवळ आली. महाराज आळंदीला जायच्या गोष्टी बोलु लागले. पोर्णिमा उजाडली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पुणे सोडण्याचा महाराजांचा निश्चय जाहीर झाला. घोडा गाडीतुन त्यांना आळंदीला नेण्यांत आले. त्यावेळी मामासाहेब हे स्वतः रस्त्यावर चालत दगड धोंडे दूर करत होते.श्रीमहाराज मध्ये मध्ये विचारत होते की "आळंदी आली का रे?"
आळंदीला आल्यावर महाराज घासवाले धर्मशाळेत उतरले. मामासाहेबांना त्यांनी माउलींचे समाधी तिर्थ आणि इंद्रायणीचे तिर्थ आणण्यास सांगितले. सोनु मामांनी इंद्रायणीचे व ज्ञानेश्वर महाराजांचे तीर्थ त्यांना आणुन दिले तोपर्यंत साडेआठ वाजुन गेले. तिर्थ प्राशन केल्यावर मग महाराजांच्या आज्ञेवरून त्यांना बसविण्यात आल्यावर ते उत्तरेकडे तोंड करुन बसले - मामांना हाक मारली आणि डोळे मिटून म्हणाले, 'जातो-- ' आणि त्यांनी देह ठेवला. माघ कृष्ण प्रतिपदा शके १८४१ रोजी माउलींच्या चिंतनात त्यांनी माउलींच्या चरणीच आपला देह विलीन केला.
श्री क्षेत्र आळंदीत - त्यांच्या प्रिय उपास्यदैवताशेजारी, गुरुवारी, उत्तरायणांत, माघ वद्य प्रतिपदा म्हणजे गुरूप्रतिपदा, सकाळी नऊ वाजतां,गीतेत योग्यांच्या मरणाला जी शुभ वेळ सांगितली आहे, तीच घटिका नेमकी त्यांनी साधली. ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरीत सांगितल्याप्रमाणेच त्यांनी देह ठेवला.
"का झांकलीये घटीचा दिवा । नेणिजे काय जाहला केव्हां । या रिती तो पांडवा । देह ठेवी ।। ज्ञा ८-९८"
श्रीमहाराजांच्या जयंती च्या परमपावन दिनी महाराजांच्या श्रीचरणी प्रार्थना करतो की त्यांनी आम्हाला माउलींच्या श्रीचरणांचे अखंंड स्मरण करण्याचे, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण करण्याचे सामर्थ्य द्यावे,नित्य हरीनाम कीर्तनात या जिवनाचा प्रत्येक क्षण व्यतित होऊन या जिवनाचे सोने होण्याचे वरदान द्यावे.मोडक्या तोडक्या शब्दात श्रीगुरु जोग महाराजांनी च बांधून घेतलेली ही शब्द सुमनांची महापूजा करुणा ब्रह्म माउलींच्या आणि श्री महाराजांच्या परम पावन चरणी अर्पण करतो.
✒️✍️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️
स्वानंदसुखनिवासी समर्थ सद्गुरु श्री विष्णुबुवा जोग महाराज की जय 🙏🚩🌸🌺
#राम_कृष्ण_हरी🙏🌸🌺
#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🌺


No comments:
Post a Comment