प्रणम्या मातृदेवता :- माळ ३
🌸🙏कृपेची सावली :-श्रीजानकी आई🙏🌸
आज अश्विन नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजेच तिसरी माळ.या परम पावन दिनी आपल्या या “प्रणम्या मातृदेवता” लेखमालेत आपण गुजरात मधील पण महाराष्ट्र जन्माला आलेल्या मराठी असलेल्या अतिशय अलौकीक संत सद्गुरु श्री जानकी मातोश्री यांच्या दिव्य चरित्राचे चिंतन,स्मरण करणार आहोत.सद्गुरु जानकी मातोश्रींना त्यांचे भक्त "बायजी" या नावाने संबोधतात. जानकी मातोश्री या अलिकडच्या काळात होऊन गेलेल्या अतिशय दैवी अशा आदिशक्ती अवतारच होत्या.ज्यांच्या चरणधुळीने गुजरातमधील गणदेवी हे छोटेसे गावही परम पवित्र तिर्थक्षेत्र बनले.
प.पू श्री जानकी मातोश्रींचा जन्म महाराष्ट्रातील महाड तालुक्यातील पोलादपूर या गावात झाला.त्यांचे नाव आई वडिलांनी "दुर्गा" असे ठेवले होते.या बाळ दुर्गेची आई लहानपणीच निवर्तल्यामुळे पुढे वडिलांनी तिला तिच्या आजी आजोबांजवळ मालुस्ते या गावी धाडले.आजी आजोबा बाळ दुर्गेवर अतिशय प्रेम करीत.चंद्रकलेप्रमाणे बाळ दुर्गा वाढू लागली. पण ती इतर तिच्या समवयस्क मुली प्रमाणे खेळण्यात रममाण होत नसे.तिची वृत्ती सदैव अंतर्मुख झालेली असे.तिला देवपुजा करायला फार आवडत असे.ती तासंतास देवपूजेत मग्न होई. मालुस्त्याची ग्रामदेवता मालजाई आई यांची नित्य पुजा करण्या करिता बाळ दुर्गा बालपणापासून जाऊ लागली.आजोबांकडून कधी कधी देवांकरीता दुर्गा दुध घेऊन जाऊ लागली.पुढे ती नित्य दुध नेऊ लागली.परंतु आजोबांना याबद्दल शंका आली व बाळ दुर्गा या दूधाचे काय करते हे बघण्यासाठी ते तिच्या मागे मागे जातात.बघताता तर आश्चर्याने ते स्तंभीतच झाले.देवीची पुजा केल्यावर बाळ दुर्गा ते दुध घेऊन शिवमंदिरात गेली,शिवमंदिरात गेल्यावर तिने ते दुध शिवपिंडी जवळ ठेवले.ठेवल्यावर एक मोठा भुजंग कुठूनतरी आला व त्याने ते दुध पिले व दुर्गाने त्या भुजंगाला नमस्कार केला व तो शांतचित्ताने निघून ही गेला. अशा प्रकारच्या अनेक दिव्य लिला मातोश्रींच्या चरित्रात घडल्या आहेत.त्यातील एक विलक्षण लिला म्हणजे, नवरात्रीचे दिवस आले.गावातील सर्व लहान मुले व दुर्गा ही खेळावयास गावाबाहेरील आळूच्या झाडाजवळ गेले.सायंकाळ झाल्यावर सर्व मुले आपल्या घरी परतले पण दुर्गा बाळ मात्र त्यांच्या बरोबर नव्हती.अंधार पडत चालला होता. अजुन दुर्गा घरी आली नाही म्हणून आजी आजोबांना चिंता वाटू लागली.गावकरी गोळा झाले,सर्वांनी शोधाशोध केली पण दुर्गा काही दिसली नाही.लोकांना वाटले एखाद्या श्वापदाने दुर्गेला पळविले.घरी तर आकांत उठला होता.अशा प्रकारे काही दिवस लोटले तरी दुर्गेचा पत्ता लागला नाही,घरच्यांनी आशाच सोडली.तेवढ्यातच एका गावकर्याला बाळ दुर्गा कडाप्याच्या देवी मंदिरात दिसली.तो धावतच गावात आला व हे वृत्तांत आजोबांना सांगितले.सर्व धावतच मंदिरात पोचले.दुर्गा कालिका देवीजवळ गाढ झोपली होती.आजोबांनी तिला सावध केले व घरी घेऊन आले."बाळ तु कुठे गेली होती?" असे विचारल्यावर दुर्गा म्हटली, "मी आई जगदंबे सोबत खेळायला गेली होती.तिथे मला सर्व देवी भेटल्या.त्यांनी मला उचलून कडेवर घेतले व त्यांच्या सोबत त्यांच्या स्थळी नेले.एवढ्या दिवस त्यांनी मला आपल्याकडेच ठेऊन घेतले होते.आम्ही सर्व रास-दांडिया खेळलो.त्यांनी मला मिष्ठान्न खावयास दिले.सर्व आनंदी आनंद चालला होता.मला घरी यायला नको वाटतं होते.मी मला परत न पाठविण्याचा हट्ट देवी जवळ केला तेव्हा आई जगदंबा म्हटली ,मी नित्य तुझ्या सोबत राहणार आहे.तुझ्यासोबत तुझ्या सुख दुःखाचा अनुभव घेईल.तुझी किर्ती मला डोळ्यांनी बघायची आहे.माझ्या आशिर्वादाने तुझी किर्ती जगभर गाजेल.असे सांगुन देवीने मला मंदिरात आणून सोडले.जेव्हा जाग आली तेव्हा तुम्ही समोर होते." त्या दिवशी पासून दुर्गेचे असामान्यत्वाची जाणिव सर्वांना व्हायला लागली.अशा प्रकारे विलक्षण बाललिला मातोश्रींच्या चरित्रात आल्या आहेत.
शुक्ल पक्षाच्या चंद्राप्रमाणे दुर्गा वाढू लागली.दुर्गा मातोश्रींचे तारुण्यात पदार्पण झाल्यावर आजोबांना त्यांच्या लग्नाची फार चिंता वाटू लागली.घरी अठरा विश्वे दारिद्र्य असल्याने त्यांच्या पुढे हा मोठा प्रश्न उभा राहिला.घरी इतके भिषण दारिद्र्य होते की एकवेळचे अन्नही काम केल्या शिवाय मिळत नसे.त्यामुळे आता उत्तम वर दुर्गेला कसा मिळेल याची काळजी आजी आजोबांना लागुन ते अगदी अस्वस्थ झाले होते.अशा ही परिस्थितीत दुर्गा समाधानी वृत्तीने राहत असे.हीच वृत्ती संत सखु,बहिणाबाई ,मुक्ताई ,जनाबाई या संतांचीही स्थिर होती.पुढे दुर्गा मातोश्रींना नाडसुरचे सुळे देशमुखांचे स्थळ स्वतः सांगून आले व यथाकाळी दुर्गामातोश्रींचा विवाह शांताराम सुळे यांच्याशी पार पडला.लग्न झाल्यावर सासरी दुर्गेचे आता जानकी हे नाव बदलण्यात आले.याच नावाने आज मातोश्रींची किर्ती गाजत आहे.लग्नानंतर घरी अठरा विश्वे दारिद्र्य होतेच.पण जानकी मातोश्री या ही परिस्थितीत समाधानी वृत्तीने राहत होत्या.एकीकडे पतिदेवांचा शिघ्रकोपी स्वभाव तर दुसरी कडे घरी दु:ख अशी दुहेरी परिस्थिती.पुढे कामास्तव जानकी आई आपल्या पति श्रीदादांबरोबर महाराष्ट्र सोडून गुजरात ला गणदेवी या गावी आले.येथे गणदेवींच्या आशिर्वादाने त्यांच्या पतिदेवांचे चांगले बस्तान बसले.पण सासरी बरेच आप्त येऊन राहत असत.त्यातच नणंदेचा अकस्मात मृत्यू झाल्यावर तिचे लेकरं ही जानकी मातोश्रींच्या घरीच आले.त्यामुळे दादा ( जानकी मातोश्रींचे पती) यांचा पगार अपुरा पडू लागला.इतक्या अडचणीच्या परिस्थिती ही मातोश्री शांत असत.कित्येक वर्ष मातोश्री एकच लुगडे नेसत,शिंप्याकडून चिंध्या आणून त्याची चोळी करुन घालत.एकदा जानकी मातोश्री आजारी पडल्या व त्यातुन परत ठिक झाल्या जणू ही त्यांच्या दिव्य कार्याची सुरूवातच ठरली.हळूहळू घरातील आर्थिक परिस्थिती ठिक होतं गेली.पुढे अनाकलनीय अशा लिला मातोश्रींच्या चरित्रात घडलेल्या होत्या.अनेक लोकांना मातोश्रींनी लिलया दु:खमुक्त केले.
पुढे दरुवाड्यात दादांनी घर घेतले व सर्व परिवार तेथे राहण्यास गेला.ते घर प्रशस्त जरी होते तरी आजुबाजुला कुणीही राहत नसत.त्याचे कारण म्हणजे सभोवतालच्या जागेवर भुतांचा वावर होता.जवळ असलेल्या राजपुतांच्या वस्तीतील लोकांचे पुर्वज युद्धात तेथे मरण पावले होते.तेच अतृप्त आत्मे तेथे भुतं म्हणून वावरत आणि लोकांना त्रास देत असत.याचा त्रास दादा व मातोश्रींना खुप दिवस झाला पण त्या स्वस्थ होत्या.पण अचानक एके दिनी दादांच्या जिवावर बेतले व त्यामूळे मातोश्रींना संताप आला.त्यांनी एका दृष्टीक्षेपात त्या सर्व भुतांना बंधन घातले व त्यांची सीमा नदीपलि कडे निश्चित केली.एकदा मातोश्री दारात उभ्या असता एक भविष्य वर्तवणारा व्यक्ती आला.तो मातोश्रींना भविष्य वर्तविण्यासाठी हात पुढे करण्यास म्हणू लागला.तोच मातोश्री म्हटल्या ,तो समोर व्यक्ती दिसतो आहे त्याचे भविष्य वर्तव.त्याने समोर बघितले तर समोर असंख्य भुते नाचत होती.तो ते दृश्य बघून किंचाळला ,त्याला घाम फुटला व भितीने त्याला कापराच सुटला.तो व्यक्ती तेथून निघून गेल्यावर मातोश्रींनी सांगितले की हे युद्धात मृत पावलेले अतृप्त आत्मे आहेत.हे आत्मे रोज सायंकाळी मातोश्रींना मुक्ती देण्याची प्रार्थना करित.पुढे जानकी मातोश्रींनी या सर्वांना मुक्ती प्रदान केली.एकदा गावात अचानक महापूर आला व सर्व पाणी गावात शिरले.त्या पाण्यासकट असंख्य सर्प ही वस्तीत शिरले.सर्व लोकांना बाहेर पाय ठेवणे ही कठीण झाले.तेव्हा गावातील सर्व स्त्रियांनी मातोश्रींकडे धाव घेतली.मातोश्रींनी देवांचे तिर्थ घेतले व फक्त सात पावले चालत पाण्यात गेल्या.त्यांनी ते तिर्थ पुरात सोडले व तत्क्षणी त्या सर्परुपी भूत प्रेतांना मुक्ती देऊन त्या पुराच्या पाण्याला कमी होण्याची आज्ञा केली.मातोश्रींनी आज्ञा करताच पाणी कमी झाले व सर्वत्र मातोश्रींच्या जयजयकार झाला.मातोश्रींची कीर्ती हळूहळू पसरत गेली.अनेक स्त्रिया मातोश्रींच्या दर्शनास येऊ लागल्या.मातोश्री येणार्या प्रत्येक स्त्रिची नारळाने ओटी भरत असत.घरातील एका कोनाड्यात नारळ ठेवलेले असत व त्यांना लागेल तेवढे नारळ त्या तेथून काढून घेत.एकदा कोनाड्यातला नारळ पाहून दादा कृद्ध झाले.त्यांनी तो नारळ उचलून फेकून दिला.पुन्हा पाहतात तर दुसरा नारळ तिथे दिसला.तो ही फेकला तर तिसरा तयार झाला,मग चौथा ,पाचवा असा ढीगच तयार झाला.दादांनी जानकी मातोश्रींजी क्षमा मागितली आणि त्यांनी वंदन ही केले.
मातोश्री अशिक्षित होत्या पण त्यांना जवळपास सर्व भाषा अवगत होत्या.त्यांच्या मुखातून विविध ओव्या आपसूकच सहजपणे बाहेर पडत.त्या आनंदात झोपाळ्यावर बसून ओव्या गात असल्या की अनेक लोकांना त्यांच्या ठाई भगवती आदिशक्ती दुर्गेचे दर्शन होत असे.पुढे अनेक दु:खी पिडीत लोक मातोश्रींना शरण येत व दु:खमुक्त होऊ लागले.मातोश्री ही या सर्वांवर कृपा करीत असत.काही दिवसांनी गावात प्लेगची साथ आली.सर्व लोक भितीने गर्भगळीत झाले.तेव्हा मातोश्रींनी सर्वांना धीर दिला.त्यांनी आपल्या हातात पिठ घेतले व ते गावाच्या सीमेवर टाकले.त्यानंतर गावात कुठेही प्लेगचा संसर्ग झाला नाही.ज्याला प्लेग झाला होता त्याला मातोश्रींनी स्वहस्ते उपचार करुन प्लेगमुक्त केले.असाच प्रसंग साईनाथांच्या ही चरित्रात ही घडला होता.
मातोश्री जानकी आईंच्या चरित्रात इतके दिव्य व अनाकलनीय चमत्कार आहेत की बुद्धी स्तिमीत होते.एका शब्द मर्यादा असलेल्या लेखात या दिव्य लिलांचे चिंतन करणे तसेही अशक्यप्राय आहेत.त्यात मातोश्रींच्या चरित्रातील या प्रचंड अनाकलनीय लिलांवर जर चिंतन करण्याचा प्रयत्न केला तर निदान शंभर तरी लेख लिहावे लागतील इतके ते विलक्षण आहे.तरी मातोश्रींच्या अधिकाराची जाणीव होणार्या दोन घटना इथे मुद्दाम मांडतो.एकदा मातोश्रींची एक परिचीत स्त्री अंबाजी व इतर क्षेत्राच्या तिर्थयात्रेहून घरी आली व त्यांच्याकडे प्रवास वर्णन करु लागली.मातोश्रींच्या मुलांना ते अतिशय आवडले व आम्हालाही आई तिर्थयात्रेला घेऊन चल म्हणून ते जानकी मातोश्रींना हट्ट करु लागले.मातोश्रींनी त्यांना "माझ्या बरोबर तिर्थयात्रा करण्याचा तुम्हा लोकांच्या जिवनात योग नाही" असे म्हटले व त्या आपल्या कामात व्यस्त झाल्या.सायंकाळ झाल्यावर जानकी मातोश्री अंगणातून येतांना दिसल्या.त्यांच्या डोक्यावर लाल देवी पुजेत वापरतात ती ओढणी/चुनडी होती.त्यांचे ते रुप पाहताच त्यांच्या मुलीला हसायला आले व ती विचारु लागली की आज हे काय रुप घेतले आहे.तेव्हा मातोश्री म्हणाल्या , "मी माउंट अबू येथील अंबा माता मंदिरात जाऊन आली.तेथील जगदंबेने ही ओढणी मला भेट म्हणून दिली आहे.तेथे दर्शन घेऊन मी पावागड येथे गेले.महाकाली मातेस भेटून आत्ताच इथे पोचले आहे.तेथे ही आईने मला ओढणी ,पेढे ,बर्फी दिली व मला आलिंगन देऊन माझी ओटी भरली." आपल्या आईचा हा अधिकार बघून मुलीला अतिशय आनंद व आश्चर्य वाटले.पुढे जानकी मातेने ती ओढणी आपल्या मुलीला प्रसाद म्हणून दिली व ती आजही त्यांच्या घरी जपून ठेवलेली आहे.
एकदा जानकी मातोश्री खुशीत ओव्या पुटपुटत बसलेल्या होत्या.त्या ओव्यातून त्या आई कालीमातेचे वर्णन करत होत्या.ते वर्णन त्यांच्या कन्येने ऐकले व आपल्याला ही जिवनात एकदा तरी आई महाकाली चे असे दर्शन घडावे अशी आईजवळ विनंती केली.काही दिवसांनी मातोश्रींनी कन्येला बोलाविले व आपण तुझ्यासाठी काली मातेला घरी बोलावले आहे तेव्हा आता मनसोक्त दर्शन घे असे सांगितले.बघते तर पुढे अष्टभुजा,काळी कांती असलेली,जिभ बाहेर असलेली, सालंकृत भगवतीची मूर्ती बघून कन्येला कापरा भरला ,भोवळ येऊन ती त्याक्षणी खाली पडली.भगवती काली मातेचे ते दिव्य रुप ती नाही बघू शकली.काही वेळाने ती शुद्धीस आल्यावर तिने आपल्या मातोश्री जानकी आईंचे चरणच धरले व आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी कोटी कोटी धन्यवाद दिले.त्यानंतर ती आपल्या मातोश्रीस शरणं गेली व प्रत्यक्ष भगवती महाकाली ला आपल्या भेटीसाठी बोलावणार्या मातोश्रींचा अधिकार किती थोर असेल याचा विचार करून धन्य झाली.जानकी मातोश्रींचे एक गुप्ते नावाचे नातेवाईक होते त्यांना जन्मांध मुलगा झाला.त्याचा हा दोष घालविण्यासाठी त्यांनी अनेक उपाय केले पण सर्व व्यर्थ.मग त्यांनी जानकी मातोश्रींना बोलाविले.मातोश्रींनी त्या बालकाला मांडीवर घेऊन त्याला त्याच्या नावाने हाक मारली आणि नवलच घडले, जन्मांध असलेल्या बाळाला दृष्टी तक्षण आली.या अघटीत लिलेमुळे जानकी आईंचा सर्वत्र जयजयकार झाला.
प.पू.जानकी मातोश्री या जन्मसिद्ध होत्या .त्यांना या सर्व विद्या ,शक्ती व अधिकार हा जन्मतःच सिद्ध होता.याची प्रचिती अनेकाविध भक्तांना वेळोवेळी आली होती.त्यांचा विलक्षण अधिकार बघून सर्वांना आश्चर्य होतं असे.
अशा प्रकारे अनंत चमत्कार /लिला जानकी आईंच्या चरित्रात आल्या आहेत.त्यांनी आपल्यातील असंख्य लोकांना आपल्या दिव्यत्वाची प्रचिती दिली, त्यांना सन्मार्गाला लावले.त्यांनी त्यांच्या ठाई असलेल्या सिद्दीचा वापर कधीही स्वतः साठी केला नाही तर त्या सदैव इतरांसाठी त्यांचा उपयोग करित.जानकी मातोश्रींनी सन १९४६ साली चैत्र वद्य नवमीला, रामनवमीच्या शुभ दिनी भरदुपारी आपली नश्वर देहाचा त्याग केला व त्या पुन्हा आपल्या मुळ स्थानी परतल्या.ती वेळ ,तिथी ,दिवस त्यांनी एका वर्षाआधीच पंचांगात लिहून ठेवले होते.जानकी मातोश्रींच्या समाधी नंतर अनेक भक्तांना त्यांच्या कृपेची सावली अनुभवायला मिळाली व आजही मिळते आहे.मातोश्री जानकी आई या वटवृक्षाच्या सावली प्रमाणे आपल्या कृपा करुणेची सावली आपल्या प्रिय भक्तांवर अखंड धरुन आहेत.मातोश्रींचे स्मरण करणार्या भक्तांच्या हाकेला त्या आजही धावतात व या प्रचितीचे अनेक उदाहरण आज आपल्या पुढे आहेत.पुढे कधी तरी त्यांचे ही स्मरण करुयात.अशा या दिव्य विभूती चरणी मी ही शब्दसुमनांजली अर्पण करतो व त्यांनी आम्हा सर्वांना सद्गुरु माउलींच्या कृपा करुणेची सावली मिळवण्यास पात्र करावं हीच शिरसाष्टांग दंडवत पूर्वक प्रार्थना श्रीचरणी करतो.
✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️


Good
ReplyDeleteGood
ReplyDelete🙏🙏🙏
ReplyDelete