Monday, February 28, 2022

सद्गुरु श्री शिवाजी महाराज विडणी यांची ११३ वी जयंती☘️🙏

सद्गुरू श्री शिवाजी महाराज, विडनी :-

                 भक्तवत्सल सद्गुरु श्री शंकर बाबा महाराजांचे अंतरंगीचे परमशिष्य, त्यांचे पूर्णकृपांकित शिष्य विडणी निवासी श्री सद्गुरु शिवाजी महाराज यांची आज ११३ वी जयंती

       

सद्गुरु श्री शिवाजी महाराजांचा जन्म कोल्हापूर शहरापासून चार मैलांवर असलेल्या कसबेबावडा या ठिकाणी माघ वद्य चतुर्दशीला शके १८२९ रविवारी दिनांक १ मार्च १९०८ रोजी महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी झाला होता...श्रीमहाराज जन्मत:च हातपायांनी अपंग होते... त्यातचं त्यांच्या वयाच्या पाचव्या/सहाव्या वर्षी महाराजांचे पित्रु छत्र आणि एक वर्षाने मातृछत्र हरवले...यानंतर महाराजांनी प्राथमिक शिक्षण घेतले पण ते ही त्यांना १/२ वर्षात अर्धवट सोडावे लागले...आईबापा विना असलेल्या या अनाथ अपंग गरिब मुलाकडे त्यावेळी कुणाचे लक्ष जाईल असंही काही नव्हतं...पण ज्याचे कुणीही नसतं त्याचे प्रत्यक्ष श्रीभगवंत असतात... काही काळाने बाल शिवाजी हे १२/१३ वर्षाचे असतांनी त्यांच्या जिवनात कलाटणी देणारी एक अपूर्व घटना घडली तो प्रसंग असा की बाल शिवाजी हे कसबेबावड्यापासून सुमारे पाच मैल दूर असलेल्या पिशवीकरांच्या वाड्यातील चुपचुप महाराजांच्या समाधी मंदिरात येऊन पोचले...कितीतरी दिवस ते तिथेच पडुन राहिले,लोक भाकरी तुकडा देत त्यावर ते दिवस काढु लागले...अशक्तता इतकी वाढली की दहा-पंधरा फुटांवर असलेल्या चुपचुप महाराजांच्या समाधी दर्शनाला ही त्यांना रांगत-घसरत जावे लागत होते.अशा असहाय स्थितीत काही काळ गेल्यावर त्यांच्या भाग्योदयाचा क्षण जवळ आला...तो मांगल्याचा क्षण या पांगळ्या शिवाजीला सामर्थ्यवान शिवाजीमहाराज बनविनार होता.अखेर तो क्षण आला प्रत्यक्ष शिव अवतार सद्गुरु श्री शंकर महाराज श्रीचुपचुप महाराजांच्या समाधी मंदिरात आले.शंकर महाराज चुपचुप महाराजांच्या समाधी समोर उभे राहुन महाराजांशी काहीतरी वार्तालाभ करु लागले व नंतर ते कोपर्यात पडून असलेल्या पांगळ्या शिवाजी कडे वळले.ते त्याच्या जवळ गेले व त्यांनी "उठ! असा झोपलास काय?" असे म्हणून त्याला हात धरुन उभे केले. मग सद्गुरु शंकर महाराजांनी शिवाजीच्या बखोटीला धरुन श्री पंतमहाराज बाळेकुंद्री यांच्याकडे त्याला नेले. श्री सद्गुरु शंकर महाराजांनी पंत महाराजांना मिठी मारली व त्यांच्या मधे बालक शिवाजी होते...मिठी मारता क्षणीच अपंग शिवाजी `सरळ' झाले.ही घटना १९२०/२१ ची आहे त्यावेळी महाराज १३/१४ वर्षाचे होते. श्रीशिवाजी महाराजांना घेऊन सद्गुरु शंकर महाराज काही काळ ब्रम्हदेशात आणि परदेशात ही गेले होते. अशा प्रकारे शंकर महाराजांनी या अनाथ मुलाला सनाथ केले त्याला आपल्या कृपा छत्रछायेखाली घेतले.आपले चैतन्य त्याच्या हृदयी प्रस्थापित केले.या हृदयीचे त्या हदयी हा प्रकार बाळ शिवाजींच्या बाबतीत घडला व आता बाल शिवाजीचे ते सद्गुरु श्री शिवाजी महाराज झाले.पुढे ते महाराजांशी इतके एकरुप झाले की `शंकर महाराज आणि मी एकच' असे ते म्हणु लागले. सद्गुरु शंकर महाराजांनी शिवाजी महाराजांवर कृपा केली व मग महाराज अखंड नामसाधनेत तल्लिन राहु लागले...ते अगदी निःसंग झाले,मिळेल ते खायचे ,नाही तर पाणी प्यायचे .खांद्यावर घोंगडी,डोक्यावर फेटा,धोतर आणि सदरा हा त्यांचा पेहराव असे... महाराज अखंड नामस्मरण करीत.नामस्मरण,भक्ती आणि प्रेम याशिवाय त्यांच्याजवळ कुठल्याही गोष्टीला थारा नव्हता. नामस्मराणाप्रमाणेच महाराज संत तुकाराम महाराज,एकनाथांचे ,ज्ञानेश्वर माउलींचे ,मिराबाईंचे आणि कबिरांचे अभंग /दोहे ही म्हणत असत.या काळात महाराज कोल्हापुरातच वास्तव्यास होते आणि त्यावेळी महाराजांची किर्ती बरीच पसरली होती ..ही किर्ती छत्रपति राजाराम महाराजांच्या कानी पडली त्यांना महाराजांबद्दल प्रेम वाटू लागले. त्यांनी या तरुन महाराजांना नाममात्र नोकरीवर ठेले व हुकुम दिला की कुणीही त्यांच्यावर कामाची सक्ती करु नये. छत्रपति महाराजांना मान देत पण त्यांचे प्रेम असे होते की महाराज व छत्रपती एकमेकांना अरेतुरेच्या भाषेत बोलायचे... छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्युनंतर शिवाजी महाराजांनी नोकरी सोडली ही गोष्ट १९४० च्या सुमारास घडली.त्यानंतर महाराज "ॐ नमः शिवाय तरणोपाय तारकमंत्र सद्गुरुंचा" या मंत्राचा अहोरात्र जप करीत असतं. याच वेळी महाराज देहातीत अवस्थेला पोहचले आणि त्यामुळे ते कधीकधी वस्त्र ही काढुन फेकुन देत असत.

                    पुढे १९५० ला महाराज प्रथमच पुण्यात आले. १९२० ला शंकर महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन कृपा केल्यानंतर पन्हा त्यांची भेट घडली नव्हती व लौकिकदृष्ट्या शंकर महाराजांनी १९४७ ला देह ठेवला होता. यावेळी ते आपल्या गुरु माउलींच्या समाधी दर्शनाला जरुर गेले..त्यावेळी या गुरु-शिष्यांचे काय हितगुज झाले हे तेच जाणोत.पुढे जेव्हा जेव्हा ते पुण्यात येत तेव्हा ते शंकर महाराजांच्या समाधी दर्शनाला जरुर जातं. इ.स.१९५३ ला महाराज कायमचे पुण्याला वास्तव्यास आले आणि इथे येऊन ते आपल्या गुरु माउलींच्या समाधी सेवेत दंग झाले.समाधी आवार झाडलोट करणे,येणार्या भक्तांसाठी पाणी भरुण ठेवणे,पुजा आरतीत भाग घेणे ,भजन करणे यांतच महाराज रममाण होऊ लागले. सद्गुरु शिवाजी महाराज अगदी अवलिया वृत्तित वागु लागले, आपल्याच सहज समाधीत ते नित्य दंग राहु लागले अशात त्यांच्या हातुन अचाट,कल्पनातीत चमत्कार घडतं. महाराजांना दांभिकतेचा , दिखाव्याचा ,ढोंगाचा प्रचंड टिटकारा असे...अशा व्यक्तीची महाराज चारचौघात मोठी फजिती करीत...महाराज भक्तीयोगी होते...त्यांनी साधनेच्या जोरावर आपल्या सद्गरुंशी एकात्मत: प्राप्त केली होती...ते प्रत्यक्ष सद्गुरु स्वरुप झाले होते. महाराज अखंड उन्मनी अवस्थेत राहत असत.. कधी त्यांचं बालकासारखे आचरण असे तर कधी वेड्यासारखं पण अशा कृतीतील असलेल्या खर्या अर्थाचे आकलन कुणालीही होतं नसे एव्हाना ते कुणाला होवु देत नसतं.

      

श्रीशिवाजी महाराजांचा त्याकाळातील अनेक थोर संतांशी जिव्हाळ्याचा संबंध होता. श्रीपंतमहाराज बाळेकुंद्री यांच्या परंपरेतील श्रीभुजंगाचार्य अवधूत महाराज, नाशिकचे नाथपंथी योगी श्रीगजानन महाराज गुप्ते,श्रीआंबेकर महाराज  ,श्रीसाईनाथ महाराजांचे शिष्य श्रीदासगणु महाराज,नगरचे श्रीअवतार मेहेर बाबा,सातार्यातील धुंडीराम महाराज, पैजारवाडीचे श्री चिले महाराज, अक्कलकोटचे श्रीगजानन महाराज हे सर्व संत सत्पुरुष शिवाजी महाराजांवर प्रेम करीत,त्यांना आदर पूर्वक ,प्रेमाने वागवित...साकोरीच्या उपासनी बाबांच्या शिष्या श्रीमती गोदावरी माताजी तर महाराज साकोरीला गेले की आपल्या हातांनी त्यांना जेवू घालित. इ.स.१९५८ ला महाराज पुण्याच्या श्री शिंदे यांच्याघरी स्वत:हुनच गेले हा प्रसंग अगदी विलक्षण आहे पण शब्दमर्यादा असल्यामुळे घेतला नाही.

                      पुढे शिंदे यांनी आपला कारखाना उभारण्यासाठी स्वारगेट ला एक प्लॉट घेतला होता महाराज तिथेच राहु लागले...शिंद्यांनी महाराजांना‌ तिथे पत्र्याची शेड उभारुन दिली व महाराज आता त्याला "आळंदी" असे म्हणु लागले.बडोद्याच्या महाराणी श्री.शांतादेवी यांनीही महाराजांचे दर्शन या "आळंदीतच" जाऊन घेतले.महाराजांनी आळंदीवर एक उंच झेंडा उभारला होता.अशा श्री सद्गुरु शिवाजी महाराजांनी अनंत लिला केल्या ,, भक्तांना भक्तीमार्गाला लावले आणि १९७४ साली अक्षय्य तृतियेच्या पावन दिवशी श्रीशिंदे यांच्या घरात ब्राम्ह मुहर्तावर आपला देह ठेवला..महाराजांनी देह ठेवण्या आधी याबाबत खुप लोकांना कल्पना दिली होती..."आम्ही आता कपडे बदलणार आहोत", "आता आम्ही भुर्रर्रऽऽ जाणार आहोत" अशें संकेत दिले होते. महाराजांची समाधी फलटन जवळील विडणी येथे आहे.तिथे आजही महाराजांच्या दिव्य चैतन्याची अनुभूती आल्या वाचुन राहातं नाही...अशा या दिव्य अवलिया अवधुताची आज जयंती...या जयंती निमीत्ताने महाराजांच्या दिव्य चरित्रातील हे काही मोती वेचन्याचा हा बालसुलभ प्रयत्न. या पोस्ट द्वारे महाराजांच्या चरणी माझी प्रेमांजली वाहली आहे...महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर अखंड राहो हीच या पावन दिनी श्रीचरणांशी प्रार्थना करतो...


         ✒️✍️ अक्षय जाधव आळंदी✍️✒️

Thursday, February 24, 2022

"दासनवमी" समर्थांची ३४० वी पुण्यतिथी 🙏🚩🌺🌸

 

आज दासनवमी समर्थांची ३४० वी पुण्यतिथी :-

                                     महाराष्ट्रातील संत परंपरेतील अग्रगण्य असलेले युगपुरुष ज्यांनी जगाला परमार्थाच काय तर प्रपंच ही नेटाने कसा करावा हे शिकविले.ज्यांनी जगाला धर्माचे पालन करणे तर शिकविलेच पण त्याबरोबर धर्म रक्षणासाठी हातात वेळे प्रसंगी शस्त्र घेऊन धर्मरक्षणाचा धडा ही दिला.समर्थांबद्दल म्हटले जाते की ज्यांचे शुक महामुनींसारखे पूर्ण वैराग्य आहे,जे वसिष्ठ महामुनींसारखे महाज्ञानी आहेत,ज्यांचे कवित्व हे वाल्मिक ऋषींसारखे सर्वमान्य आहे आणि या सर्वांची प्रचिती आपल्याला समर्थांच्या चरित्रातून येतेच येते.अतिशय विलक्षण अशा समर्थ चरित्राचे चिंतन केल्यावर लक्षात येईल की  धर्मकार्यासाठी , धर्मरक्षणासाठी स्वतः मारोतीरायच समर्थरुप धारण करते झाले होते. बालपणीच समर्थांना प्रभु श्रीरामरायांचा झालेला अनुग्रह, बालपणीच केलेला गृहत्याग,समर्थांचे बुद्धी थक्क करणारे अनुष्ठान,मारोतीरायांचे दर्शन ,अचाट असा भारत प्रवास ,विलक्षण असे धर्मकार्य ,एकमेवाद्वितीय असा 'दासबोध' सर्वांचे अवलोकन केल्यावर समर्थांच्या अवतार कार्याची पुसटशी कल्पना येईल.आज समर्थांची ३४० वी पुण्यतिथी.एवढा प्रदिर्घ काळ लोटला तरी दासबोध ,आत्माराम ,मनाचे श्लोक या सर्व रुपात समर्थ नित्य आपले कार्य करीत आहेत. समर्थांच्या कृपेची प्रचीती आजही प्रत्येक भक्ताला येतेच, अगदी अलिकडच्या काळात भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज यांना समर्थांनी प्रत्यक्ष प्रगट होऊन अनुग्रह दिला होता.समर्थांच्या निर्वाणानंतर समर्थ रोज उद्धवस्वामी, कल्याणस्वामी आणि अक्काबाई यांना मानसपुजेवेळी समर्थांचे दर्शन होत असे अशी नोंद आहे.

समाधी प्रकरण :-
                     जेष्ठ बंधू श्रेष्ठ श्री गंगाधर स्वामींचे महानिर्वाण,पुढे संत वेणाबाईंचे निर्वाण व त्यानंतर छत्रपती शिवरायांचे निर्वाण या तिन्ही घटना काही काळाच्या अंतरावर घडल्या.अंताजी गोपाळ कुडाळकर हे शिवाजी महाराजांच्या पदरी वाकेनीस होते त्यांनी एक अद्भुत नोंद करुन ठेवली आहे.इ.स १६८० साली माघ पौर्णिमेला शिवाजी महाराज समर्थांच्या दर्शनासाठी सज्जनगडावर येऊन गेले होते.गृहकलहाने महाराज फार व्यथित झाले होते व त्यातुन बाहेर पडण्यासाठी ते समर्थ दर्शनाला आले होते.त्या दिवशी महाराज समर्थांच्या शेजघरात समर्थांच्या समोर ध्यानाला बसले.तीन तास शिवाजी महाराज ध्यानस्थ होते.समर्थांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना देहबोधावर आणले.शिवाजी महाराज प्रसाद घेऊन रायगडावर निघाले तेव्हा समर्थ त्यांना पोचवायला महाद्वारापर्यंत गेले.महाराज निघून गेल्यावर समर्थांच्या डोळ्यात अश्रू आले.समर्थांशेजारी उभे असलेल्या उद्धव स्वामींनी याचे कारण विचारले तेव्हा समर्थ म्हणाले, "राजा शिवाजी भोसले यांचा अंतकाळ जवळ आला आहे." उद्धव स्वामींनी विचारले "किती दिस?" समर्थांनी उत्तर दिले , "साठ दिस" या घटनेनंतर बरोबर साठाव्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या पावन दिनावर दुपारी बारा वाजता शिवछत्रपतींनी देह ठेवला.
                       शिवरायांच्या निर्वाणानंतर समर्थांना विलक्षण दु:ख झाले.त्यांनी त्यानंतर अन्न-पाणी वर्ज्य केले. गिरीधर स्वामी लिहीतात-

समर्थ स्वप्रकाशे अंधारी तीन मास बैसताती ।
मरुमपात्रे उदके सेविताती ।
शकलपात्रे घेऊनी धावताती ।
अरण्याकडे दुश्चीन्हे ।।
                   याचा अर्थ शिवराय गेल्यानंतर समर्थ तिनं महिने कुणालाही भेटले नाही.ते अंधारात बसून आत्मचिंतन करत राहीले.मातीच्या भांड्यातून पाणी पिऊ लागले.परळीत भिक्षेसाठी गेले तर फुटके भांडे बरोबर नेत.लहानपणापासून समर्थांना विश्वाची चिंता लागली होती आणि शिवराय हे या चिंतेवरील उपाय होते.अवघ्या पन्नासाव्या वर्षी शिवाजी महाराज गेले याचे अतिशय तिव्र दु:ख समर्थांना झाले होते यात शंकाच नाही.त्यानंतर समर्थांनी छत्रपती संभाजी महाराजांना गद्य व पद्य असे पत्रव्यवहार केलेले आहेत.त्यात त्यांनी स्वराज्या संदर्भात श्रीशंभूराजांना मार्गदर्शन केले व चाफळ येथील उत्सवासंदर्भातही कळविले. यानंतर समर्थांनी देह त्याग करण्याचे ठरविले.ते रामरायांचा निरोप घेण्यासाठी चाफळला आले.रामरायांचे दर्शन निरोप घेऊन समर्थ गडावर परतले.देहत्यागाच्या पंधरा दिवस अगोदर आपल्या शिष्यांसमवेत ते बसले होते.त्यांनी एका श्लोकाचे चरण मोठ्याने म्हटले -

रघुकुलटिळकाचा वेध सन्निद्ध आला ।
तदुपरी भजनाचा पाहिजे चांग केला ।।

उद्धावाने हा श्लोक ताबडतोब पूर्ण केला -

अनुदिन नवमी हे मानसी आठवावी ।
बहुत लगबगीने कार्य सिद्धी करावी ।।
             उद्धव स्वामींनी समर्थ देह लवकरच ठेवणार हे ओळखले.सगळे शिष्य या विचारानेच व्याकुळ झाले होते.समर्थांनी तंजावर येथील अरणीकर नावाच्या अंधळ्या कारागिराला दृष्टी देऊन राम,लक्ष्मण,सीता व हनुमान या चौघांच्या पंचधातूच्या मूर्ती करायला सांगितल्या होत्या.त्या मूर्ती माघ वद्य पंचमीस सज्जन गडावर पोचल्या.देहत्यागापूर्वी पाच दिवस आधी रामराय गडावर आले हे पाहून समर्थांना खुप संतोष वाटला.त्यांनी आशिर्वाद दिला की जो कुणी मनोभावे या रामाची सेवा करेल त्याचे कल्याण होईल.हळूहळू समर्थांनी अन्नपाणी वर्ज्य केले.शरीर थकत चालले होते.समर्थ मौनात प्रवेशले होते.देहत्यागापूर्वीच त्यांनी आपल्या आवडत्या शिष्य कल्याण स्वामींना आपल्या पासून दूर पाठवले होते.माघ वद्य अष्टमीला समर्थांच्या मुखातून दोन गुढवाक्ये बाहेर पडली . ते म्हणाले १) देवद्रोहीयांचा नाशचि आहे.
२) समुद्रतीरस्थांचा नाश आहे.
समर्थ देह ठेवणार याची कुणकुण अनेक ठिकाणी पोचली होती आणि त्यामुळे समर्थांच्या दर्शनासाठी सज्जनगडावर गर्दी झाली होती.समर्थांनी कुणालाही जवळ येऊ दिले नाही.ते शेजघरातून बाहेर पडले नाही.योगायोगाने तंजावर मठाधिपती भीम स्वामी समर्थांच्या अंतकाळी गडावर होते.त्यांनी तो प्रसंग अतिशय सुंदर ५० ओव्यात लिहून ठेवला आहे.त्याचा भावार्थ मांडतो.
शनिवार ,माघ वद्य नवमी दिवस उजाडला,ज्या दिवशी दोन प्रहरी समर्थांनी स्वधामी प्रयाण केले.समर्थ पलंगावरुन उतरले,त्यांनी आपल्या खडावा परिधान केल्या,आणि उत्तरेकडे तोंड केले.भक्त म्हणू लागले की पलंगावर बसा,पण समर्थ म्हणाले, "आता माझ्याच्याने तिथे बसणं होणार नाही तुम्हाला शक्य असल्यास मला तिथे नेऊन बसला." समर्थांनी असे म्हटल्यावर दहा सशक्त शिष्य पुढे आले आणि समर्थांना उचलायचा प्रयत्न करु लागले पण समर्थ जागचे तुसभरही हलले नाहीत.शेवटी दमून ते शिष्य बाजुला झाल्यावर समर्थ त्यांना म्हणाले , "बाहेर जाऊन बसा.अनेकांनी जे‌ जे काही प्रश्न विचारले त्यांची उत्तरं मी पूर्वीच दिली आहेत,आता सांगण्यासारखे माझ्याकडे काहीच राहिलं नाही.पण ,माझं  हे शरीर आणि माझी वाणी गेली तरी मी इथेच ,या जगात कायम आहे हे लक्षात ठेवा.आत्माराम आणि दासबोध ही माझीच सगुण रुप आहेत हे ध्यानात ठेवा.तेव्हा मी नसल्याचा खेद कुणीही करू नका." यानंतर समर्थांनी तीन वेळ रामनामाचा घोष केला.त्यांच्या पाठोपाठ भक्तांनीही जयघोष केला याने सारा आसमंत रामनामाने दुमदुमून गेला.समर्थांची प्राणज्योत शरीरातून बाहेर पडली‌ आणि तंजावरहून आणलेल्या राममूर्तीत प्रविष्ट झाली.दुपारी साडेबारा वाजता समर्थांनी देह ठेवला.समर्थांनी देह ठेवला ही बातमी सर्वत्र पोचली.संभाजी महाराज आणि दिवाकर गोसावी रात्रीतून निघाले‌ व सकाळी सज्जनगडावर पोचले.मठाच्या उत्तरेला एक खड्डा होता,तिथली स्थलशुद्धी करुन ,तिथे बिल्वदल ,तुलसी पत्रे,चंदन ,तुलसीकाष्ठे व इतर सुवासीक द्रव्यांनी चिता तयार करण्यात आली.उद्धव स्वामींनी समर्थांना अग्नी दिला. छत्रपती संभाजी महाराजांनी समर्थांचे अंतिम दर्शन घेतले व गडावर भलेमोठे राममंदिर  बांधण्याचे आपले वचन पूर्ण केले.तिसर्या दिवशी अस्थी गोळा करण्यासाठी शिष्य जमा झाले तेव्हा समर्थांची स्वयंभू समाधी आपोआप जमिनीतून वर आली.खाली समर्थांची समाधी व वरती तंजावरहून आणलेल्या रामाआदी मूर्तींची स्थापना करण्यात आली.हे सर्व बांधकाम छत्रपती संभाजी महाराज यांनी बांधले आहे.
                    समर्थांच्या निर्वाणाची बातमी परांडा येथे कल्याण स्वामींना जाऊन धडकली.हे कळताच एखाद्या वार्यासारखे अतिशय दु:खी अंत:करणाने कल्याण स्वामी सज्जनगडावर दाखल झाले.कल्याण स्वामी समाधीसमोर आले व धाय मोकलून रडू लागले.समर्थांनी आपल्या देहत्याची आधी कल्पनाही आपल्याला देऊ नये याचे त्यांना फार वाईट वाटले.जोपर्यंत सगुण दर्शन होत नाही तोपर्यंत अन्न पाणी घ्यायचे नाही असा त्यांनी निश्चय केला.त्यांचा तो दृढनिश्चय पाहून समर्थ समाधीतून प्रगट झाले.त्यांनी कल्याण स्वामींना दर्शन दिले.कल्याण स्वामींची समजूत घालून समर्थ पुन्हा समाधीमध्ये प्रविष्ट झाले.कल्याणस्वामींनी समाधीचे दर्शन घेऊन सज्जनगड सोडला तो नंतर ते पुन्हा कधीही गडावर आले नाहीत.कारण त्यांच्या हृदय सिंहासनावरच प्रत्यक्ष समर्थांना बसवून ते परतले होते यात शंका नाही. अशा समर्थांच्या पुण्यतिथी दिनी त्यांच्याच अखेरच्या संदेशाचे स्मरण आपण सर्व करुयात

माझी काया आणि वाणी । गेली म्हणाल अंत:करणी ।
परी मी आहे जगज्जीवणी । निरंतर ।।
आत्माराम दासबोध । माझे स्वरुप स्वतः सिद्ध ।
असता न करावा हो खेद । भक्तजनी ।।
नका करु खटपट । पहा माझा ग्रंथ नीट ।
जेणे सायोज्यतेचि वाट । गवसेल की ।।
             समर्थांच्या या वचनाप्रमाणे दासबोध आत्मारामाचे चिंतन करण्याची सद्बुद्धी आपल्या सर्वांना मिळो , समर्थांच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा आपल्याला समर्थ चरित्रातून मिळत राहो हीच प्रार्थना श्रीरामरायांच्या आणि समर्थांच्या चरणी करतो.
✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

#जयजयरघुवीरसमर्थ 🙏🌸🚩
#श्रीरामजयरामजयजयराम 🙏🌸🚩
#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🚩


Wednesday, February 23, 2022

समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज यांचा १४४ वा प्रगटदिन🌸🙏🚩

 


अवतरलासी_भूवरी_जढ_मुढ_ताराया !!!

                                आज सकल संत चुडामणी, आमच्या विदर्भवासीयांचे आराध्य दैवत शेगांव निवासी,परब्रह्म, ब्रह्मांडनायक, भक्तवत्सल समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांचा १४४ वा प्रगट दिन.आजच्याच पावन तिथीला सद्गुरु श्री गजानन महाराज हे शेगावच्या पावन भूमीवर प्रगट झाले आणि १४४ वर्ष लोटली तरी आजही आपल्या शरणागत भक्तांच्या हाकेला तात्काळ धावून जातात.आजही "आम्ही गेलो ऐसे मानु नका" या त्यांच्या वचनाचा सर्व लोक अनुभव घेत आहेत.


शेगांवी माघमासी। वद्य सप्तमी ज्या दिवशी।

हा उदय पावला ज्ञानराशी। पदनताते तारावया।।


श्रीदेवीदास पातुरकारांच्या वाड्याबाहेर माघ वद्य सप्तमी तिथीला हे संतचुडामनी अवतरले.श्रीमहाराज अवतरले तेव्हा ते अगदी तेजस्वी व तरुण होते. दासगणू महाराज लिहीतात , 

ऐन तारुण्याभीतरीं । गजानन आले शेगावनगरी । शके अठराशाभीतरी । माघ वद्य सप्तमीला ।।

                  फार पूर्वी शेगांव संस्थानाने प्रकाशित केलेला "श्रीगजानन चरित्र कोष" या ग्रंथात श्रीविवेक जी वैद्य यांनी अतिशय अभ्यासपूर्ण व संशोधक पूर्वक असे मांडलेले आहे की श्री महाराज हे अगदी ७/८ वर्षाच्या कोवळ्या वयात परब्रह्म भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या भेटीसाठी अक्कलकोट येथे गेले होते.स्वामी आज्ञेने तिथून ते सटाणा येथील थोर महापुरुष सद्गुरु श्री देव मामलेदार यांच्याकडे गेले.श्री सद्गुरु देव मामलेदार यांनी श्रीगजानन बाबांना नाशिकजवळील अपिलधारा या तिर्थावर तपाकरीता पाठवले.कपिलधारेवर श्रीमहाराजांनी विघ्नहर्ता विनायकाची स्थापना केली व पुढील १२ वर्ष तिथेच त्यांनी तप केले.हे स्थान आज गजानन महाराजांची तपोभूमी या नावाने प्रसिद्ध आहे.श्रीदेव मामलेदार यांच्या चरित्र ग्रंथांत हा सर्व कथाभाग आलेला आहे.आजही महाराजांच्या या तप:स्थलीवर श्रीगजानन महाराज संस्थानाने "तपोभूमी" नामक महाराजांचे भव्य दिव्य असे मंदिर व साधना भवन उभारले आहे. कपिलधारेवरील आपले तप पूर्ण करुन महाराजांनी आपल्या पुढील कार्यासाठी विदर्भ भूमि निवडली असावी असे वाटते. श्रीगजानन बाबा देहात असतांना सद्गुरु श्री साईनाथ महाराज शिरडी, सद्गुरु श्रीताजुद्दीन बाबा नागपूर,सद्गुरु श्रीशंकर महाराज पुणे, सद्गुरु श्री माधवनाथ महाराज चित्रकुट,श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज करवीर असे असंख्य अवतारी महापुरुष महाराष्ट्र सदेही उपस्थित होते ,एवढेच काय तर महाराजांचे त्यांच्याशी अतिशय प्रेमाचे व आदराचे नाते होते. विदर्भ भूमिला आपल्या पदस्पर्शाने पावन करण्यासाठी महाराजांनी ही भूमी निवडली व पुढे आजिवन आपले सदेह वास्तव्य याच भूमीत केले यावरुन याची कल्पना येते.महाराज तिर्थयात्रा सोडून कधीही विदर्भ सोडून इतरत्र गेल्याचे आढळत नाही.तरीही साईनाथ महाराज,माधवनाथ महाराज,ताजुद्दीन बाबा,रामानंद बिडकर महाराज,नाशिकचे गोपाळबुवा महाराज यांच्याशी त्यांचा पूर्वापार परिचय होता ,हे सर्व महाराजांना मोठ्या भावासारखा मान द्यायचे हे विशेष आहे.

                    गेल्या शतकात होऊन गेलेल्या लोकात्तर अध्यात्मिक महापुरुषांच्या मांदियाळीत सद्गुरु श्री गजानन महाराज हे अग्रगण्य आहेत असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.श्रीसद्गुरु गजानन बाबांचा भक्त परिवार हा महाराष्ट्रच काय तर भारतभर व जगभर विखुरलेले आहे. प.पू.श्रीदासगणू महाराजांनी लिहिलेला "श्रीगजानन विजय" नामक चरित्र ग्रंथ हा आम्हा सर्व भक्तांसाठी अमृतवल्लीच आहे. या ग्रंथात महाराजांच्या सर्व लिला अतिशय रसाळ ओव्यात शब्दबद्ध केलेल्या आहेत. श्रीगजानन बाबांच्या चरित्रा संबंधी विचार केला तर, सर्व लिला प्रसंग अगदी प्रगटदिना पासून ते समाधी लिले पर्यंत सर्वत्र एक समान दुवा आढळतो आणि तो म्हणजे महाराजांनी आपल्या प्रत्येक कृतीतून भक्तांना ,जगाला, संपूर्ण मानवजातीला काहीतरी शिकवणच दिली आहे. मग ते देविदास पातुरकरांच्या वाड्याबाहेर शिते वेचुन "अन्नम ब्रह्मेती" असो किंवा बापुना काळेला विठ्ठल दर्शन असो.प्रत्तेक कृतीत काहीतरी विशेष रहस्य असायचे.श्रीदासगणु महाराजांनी सद्गुरु बाबांच्या प्रगटीकरणावर फार सुंदर ओव्या रचल्या आहेत ,ते म्हणतात,

"त्या शेगांव सरोवरीं भले । गजानन कमल उदया आले । जें सौरभे वेधिते झालें । या अखिल ब्रह्मांडा ।।"

          खरंच श्रीगजानन महाराजांच्या या दिव्य प्रभेने सामान्य भक्तांनाच काय तर लोकमान्य टिळकांसारख्या युगपुरुषाला, सद्गुरु श्रीमाधान निवासी गुलाबराव महाराज, दत्तावतारी श्री टेंबे स्वामी महाराजांसारख्या जगविख्यात संतमंडळींनाही आपल्याकडे आकर्षित केले होते.ही काय सामान्य बाब नव्हे.असे अनेक संत मंडळींनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष महाराजांची भेट घेतली होती  किंवा त्यांच्या बद्दल प्रेम व्यक्त केलेले होते. त्यातील असाच एक दिव्य प्रसंग म्हणजे, 

श्रीगजानन बाबांनी ऋषी पंचमीला आपला देह अनंतात विलीन केला व ते वैश्विक देह धारण करते झाले.त्याच वेळी इकडे शिर्डीत सद्गुरु साई समर्थांनी जमिनीवर लोळण घेत दु:खाने आक्रोश केला होता."माझा भाऊ देह ठेऊन जातोय " म्हणून ते रडत होते.दुसर्या दिवशी त्यांनी आपले मुंडन केले व भक्तांकरवी नारळ फोडुन गुळ खोबरे वाटले होते.हा प्रसंग खुप काही सांगुन जातो.अकोट चे नरसिंग महाराज हे ही बाबांना मोठा भाऊ मानत असत.

                              आज श्रीगजानन बाबांचा प्रगट दिन त्यामुळे त्यांच्या चरित्राचे स्मरण करणे हे क्रमप्राप्त आहेच.मला बाबांच्या चरित्रातील भावलेले दोन‌ प्रसंग जे आजवर माझ्या जिवनातील पाथेयच झाले आहेत ते इथे मांडतो.पहिला म्हणजे बंकटलाल यांच्या शेतातील मका खाण्याचा प्रसंग आणि दुसरा बापुना काळे यांना श्रीमहाराजांच्या जागी झालेले विठ्ठल दर्शन.हे दोन्ही प्रसंग सर्वांनाच माहिती आहेत असे मी गृहीत धरतो म्हणून ते सविस्तर वर्णन करत नाही.तरी यातील जो भाग मला भावला तो मांडतो. श्रीमहाराज जेव्हा बंकटलालच्या विनंतीला मान्य करून त्याच्या शेतात मक्याची कणसे खाण्यास जातात.कणसे शेकोटीवर भाजतांनी वरील गांधील माशीच्या पोळातील माशा उठतात व तो पूर्ण जत्था तेथील माणसांवर हल्ला करतो.त्यावेळी श्री महाराज तेथे अगदी निवांतपणे बसलेले असतात.कुणीही महाराजांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न ही करत नाहीत.सर्व आपल्याला माशी चावणार नाही यासाठी धडपडत असतात.या सर्व प्रकारात एकमात्र बंकटलाल मनातुन दु:खी होतो व श्रीमहाराजांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो.श्रीमहाराजांनाही त्याच्या मनातील शुद्ध भावाची जाणिव होते व ते त्या माशांना पुन्हा आपल्या जागेवर जाण्याची आज्ञा करतात.त्यावेळी श्रीमहाराज बंकटलालला उपदेश करतात तो खरच चिंतनीय असा आहे.श्रीमहाराज म्हणतात, 


" अरे ते जिव विषारी । बैसले माझ्या अंगावरी । माझ्यापासून झाले दूरी । लड्डूभक्त येधवा ।।२८।।

 याचा करी विचार । संकट आल्या कोणावर । 

कोणी न साह्य करणार । एका ईश्वरावाचुनी ।।२९।। "


              या दोन ओव्यात संपूर्ण जिवन प्रवासाचा सारचं सांगितला आहे.जिवनभर आपण कुठल्यातरी व्यक्तीसाठी,गोष्टीसाठी आसक्त असतो.त्या आसक्तीने आपला विवेक आणि अमुल्य असा वेळ आपण गमावून बसतो आणि एक दिवस जरा,व्याधीने ,संकटाने ग्रासल्यावर लक्षात येतं की 'माझा माझा' म्हणून मी ज्या नश्वर गोष्टींसाठी बेधुंद झालो होतो ,ज्या ऐहीकाच्या मागे जिवनभर वेळ व्यर्थ घालवला‌ ते सर्व संकटकाळी आपल्या सोडुन गेलेले असतात.कुणीही आपल्यासोबत संकटकाळी नसतात.हा अनुभव प्रत्येकाच्या जिवन प्रवासात कधीतरी आलेला असतोच आणि हे माहिती असुनही आपली बुद्धी भगवंतांच्या ,ईश्वराच्या चरणी वळवण्याची इच्छा कुणीही करत नाही.फक्त लड्डू भक्तासारखे त्यांच्याकडुन काहीतरी मिळवण्यासाठी आपणं फक्त मंदिराचे उंबरे झिजवत असतो. 

दुसरा प्रसंग श्रीगजानन महाराज आपल्या शेगांवच्या भक्त मंडळींसमवेत जेव्हा आषाढी वारी करीता पंढरपूर येथे गेलेले होते.त्यावेळी बापुना काळे या गरीब भक्ताची चुकामुक झाल्यामुळे त्याला पांडुरंगाचे दर्शन घडतं नाही.दर्शन न झाल्यामुळे तो अतिशय खिन्न व उदास अंत:करणाने दिवसभर बसून असतो.सर्व लोक त्याची टिंगल टवाळी करत असतात आणि श्रीमहाराज खोलीतील त्यांच्या आसनावरून हा सर्व प्रकार बघत असतात. बापुनांच्या मनातील शुद्ध भक्ती,शुद्ध भाव बघून महाराज त्याच्या पुढे उभे राहतात व त्याला आपल्या ठिकाणी विठुरायाचे तेच मंदिरातील सगुण रुपाचे दर्शन घडवतात. आता यापुढे जेव्हा इतरही भक्त त्यांना असे दर्शन घडविण्याची विनंती करतात तेव्हा त्या सर्वांना महाराज म्हणतात,


ऐसें ऐकतां भाषण । बोलते झाले गजानन ।

बापुनासारिखें आधीं मन । तुम्ही करा रे आपुलें ॥४९॥ते

 तसें झाल्यावरी । दर्शन घडवीन निर्धारीं ।

ही दर्शन वस्तु खरी । काय मिळे बाजारांत ? ॥१५०॥

 म्हणून ती आणून । देऊं तुम्हांकारण ।

निष्पाप करा आधीं मन । तरीच पुढचें घडेल हें ॥५१॥

                    

                    संपूर्ण परमार्थाचे सार यात आले आहे.वरील प्रसंग पाहता एक गोष्ट ध्यानात येते ती म्हणजे तेथील सर्व लोक आधीच पांडुरंगाचे दर्शन करुन आले होते पण महाराज म्हणातात, "निष्पाप करा आधी मन" मनात पाप ,इर्षा , द्वेष ,कपट आणि ढोंग करुन केलेली प्रत्येक कृती ही फक्त बाह्य दिखावाच ठरतो मग ती पुजा असो,जप असो,देव दर्शन असो वा आणखी काही साधन असो.बापुनासारखे निष्पाप मन झाले तर प्रत्यक्ष भगवंतही पुढे उभे राहतात.हीच गोष्ट भगवान रामकृष्णांनी आपल्या भक्तांना सांगितली होती ,'तुमचे मन आधी निष्पाप करा ,लहान बाळ आपल्या आईच्या भेटीसाठी ज्या आकांताने रडतो ,त्याच्या मनात आईच्या भेटीशिवाय इतर कुठलाही भाव नसतो ,तसे निष्पाप अंतःकरणाने जर भक्ताने भगवंताला आळवलं तर तो धावुन येतोच यात शंका नाहीच." सर्व संतांनी एकमुखाने याची ग्वाही दिली आहे. महाराज म्हणातात परमार्थ हा काही व्यापार नव्हे, मी पाच वार्या करेन,एक नारळ चढवेल,अमुक दक्षिणा देईल ,अमुक पुजा करेन आणि मग भगवंत मला दर्शन देतील ,कृपा करतील तर हे अशक्यप्राय आहे. कारण जोवर बापुना सारखे शुद्ध ,निष्पाप मन होत नाही तोवर सर्व बाह्य अवंडंबराशिवाय काही नाही.

                          खरंतर महाराज सर्वांचेच आहेत , त्यांना महाराष्ट्र,भारत अशा प्रांतात आपण वाटु शकत नाही.ते या अखिल ब्रह्मांडाचे नायक आहेत.तरीही आम्हा विदर्भीय लोकांसाठी श्रीगजानन महाराज हे आराध्य दैवतच आहेत.लग्न झालं की आधी गजानन बाबांचे दर्शन ,बाळ जन्माला आलं की पहिलं दर्शन बाबांचे, सुट्टीत देवदर्शन म्हणजे आधी शेगांव, घरातील मुख्य संत ज्यांना आम्ही महाराज न म्हणता आमचे बाबाच मानतो ते म्हणजे गजानन महाराज.कुठल्याही शुभ प्रसंगी महिला मान तो गजानन बाबांनाच. आता ही एक पद्धत न राहता हा एक संस्कारच झाला आहे.

आज प्रगटदिनाला आणि ऋषीपंचमीच्या दिवशी अगदी गल्लीबोळात ठिकठिकाणी महाप्रसाद, पुजा , पारायण , उत्सव असतो. आम्हाला देव ,संत हे कळतही नव्हते तेव्हापासून ते आपल्या घरातील एक व्यक्ती आहेत ,आपले बाबा आहेत हा विचार नकळत आम्हा सर्वांच्या अंतर्मनावर बिंबविल्या जातो.तो एक भावनीक संस्कराच मनावर अधिराज्य करतो आणि हे सर्व देव व संतांच्या बाबतीत नसुन श्रीमहाराजांच्याच बाबतीत आहे हे विशेष.सर्व संतामध्ये बाबा म्हणजे कुठेतरी माझे हक्काचे आहेत हा भाव प्रत्येक विदर्भवासीयाच्या मनात असतोच. अशा या परब्रह्म भगवंतांचा आज १४४ वा प्रगट दिन आणि याच परमपावन तिथीचे महात्म्य आमच्यासाठी द्विगुणित झाले आहे कारण दत्तसंप्रदायातील अतिशय विलक्षण थोर संत भक्तवत्सल भक्तभिमानी सद्गुरु माउली श्रीशंकुतला ताई आगटे यांची ही पुण्यतिथी.याच तिथीला प.पू सद्गुरु श्री शका ताई आपल्या निजधामास गेल्या.आज मातोश्री ताईंचे ४ थे पुण्यस्मरण.सद्गुरु ताईंच्या ,समर्थ सद्गुरु श्री गजानन बाबांच्या सुकोमल चरणी शिरसाष्टांग दंडवत प्रणाम करतो आणि त्यांनी आपल्या सर्वांना सद्गुरुप्रदत्त मार्गावर चालण्याची बुद्धी द्यावी हीच प्रार्थना करतो           ✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी/वाशिम ✍️✒️




.

Monday, February 21, 2022

श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांची १८६ वी जयंती 🙏🌸🌺


 #आज_आपल्या_आबासाहेबांची_म्हणजे_श्रीकृष्ण_सरस्वती_दत्त_महाराजांची_१८६वी_जयंती🙏🌸


काषायवस्त्रं मनिहारभूषितम् ।

सिंहासनस्थ श्रितभक्त व्यापीतम् ।

अनाथ नाथं करवीर वासीतम् ।

श्रीकृष्ण देवं शरणं प्रपद्ये ।।


#श्रीपैजारवाडी_निवासी_चिलेदेव_व_आबासाहेब:-

                     श्रीपैजारवाडीचे दत्त श्रीचिले महाराज यांना श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजां बद्दल अनन्य प्रेम व आदारभाव होता. ते परब्रह्म भगवंत श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांना तात्यासाहेब व श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांना आबासाहेब असे संबोधीत. करवीरात ते आबासाहेबांच्या वैराग्य मठी म्हणजे समाधी मठीच्या पायर्यावर कित्येकदा बसुन राहत. एकदा कुणा एक नतद्रष्ट माणसाने आबासाहेबांच्या समाधी मठीच्या पायरीवर रात्रीच्या अंधारात येऊन घान टाकली व ही बातमी चिले महाराजांना अंतर्ज्ञानानेच कळली..ते तडक कुंभारगल्लीत आले ,आपल्या सोबतच्या भक्ताला लक्स साबन आणायला लावले व आपल्या हाताने ती घान साफ करुन पायर्या व  सर्व कुंभार गल्ली धुऊन काढली. असे चिलेदेवांचे अनन्य प्रेम आबासाहेबांवर होते. श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज म्हणजे प्रत्यक्ष गाणापुरचे आणि नृसिंहवाडी चे दत्त. गाणगापूर व वाडीला अनुष्ठान करणार्या कित्येक भक्तांना देवांनी दृष्टांत देऊन सांगितले होते की आम्ही करवीरात कुंभार गल्लीत देह धारण करुन राहत आहोत व त्यांना सेवेला तिकडे बोलावून घेतले होते असे असंख्य प्रसंग श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या चरित्रात बघायला मिळतात. श्रीआबासाहेब हे बालोन्मत्त पिशाच्च वृत्ती धारण करुन राहत असत. 

                 कोल्हापूरातील कुंभार आळीतील श्रीताराबाई शिर्के या दत्तभक्त स्त्रीला पूर्वकर्माने पोटशुळाची व्यथा जडली.त्याचा परिहार व्हावा म्हणून ती बाई दर पौर्णिमेला श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे जात असे.त्या वाडीला एक दिवस मुक्काम करुन दुसर्या दिवशी परतत असे .अशी अनेक वर्षे सेवा केल्यावर एके रात्री वाडीस त्यांना श्रीदत्तगुरूंनी स्वप्नदृष्टान्त देऊन सांगितले की मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो असून लवकरच तुझ्या घरी राहावयास येईन. त्यानुसार स्वामी कृष्ण सरस्वती महाराजांनी आपले सर्व आयुष्य कोल्हापूर येथील कुंभार आळीत श्रीमती ताराबाई शिर्के यांच्या घरी व्यतीत केले. श्रीताराबाईंच्या अनन्य भक्तीला जणू भगवंतांने आपले स्वत:च दान दिले होते.ते त्यांचे घर सोडून कुठेही कधीही गेले नाही. कुठे गेले तरी  ते ताराबाईंकडे परत येत.श्री दत्त प्रभुंच्या अतिव करुणा कृपेचा हा जणू आविष्कारच होता. ताराबाईचे अनंतकोटी जन्माचे पूण्य फळाला आले व प्रत्यक्ष वाडीचे दत्तच त्यांच्या घरी येऊन लिला करते झाले. श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांनी ताराबाईच्या या वाड्याला वैराग्य मठी असे नाव दिले. हीच वैराग्य मठी आज आबासाहेबांचे समाधी मंदीर आहे. श्रीआबासाहेबांनी अनंत लिला , शेकडो लोकांचे अपार कल्याण याच वैराग्य मठीत केले व आपला देहही याच मठीत ठेवला. शेवटी आबासाहेबांच्या देहाला समाधीही इथेच दिली गेली. श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏🌼🌸🌺

         ✍️✒️अक्षय जाधव आळंदी✒️✍️

नर्मदेचा दत्तयोगी 🌺🙏🚩


 

🍁 !! प. पू. पंडित काका धनागरे महाराज वाशिम !! 🍁
                             

प. पू. काकांच्या बद्दलची माहीती घ्यायच्या अगोदर आपण काकांच्या जन्मा अगोदरची हकीकत बघू. शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी, या उक्ती प्रमाणे प. पू. काकांच्या जन्मा अगोदरच दत्तकृपेने धनागरे कुटुंब पावन झाले होते. प्रत्यक्ष श्रीदत्तअंशावतार श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी तथा टेंबे स्वामी महाराज यांचा प. पू. धनागरे काकांच्या आजी कै. हरिबाई धनागरे यांच्यावर गोरेगाव जवळील केनरा या गावी अनुग्रह झाला. स्वामींची पूर्ण कृपा त्यांच्यावर होती. अनुग्रह देता वेळी स्वामी महाराज हरीबाई यांना बोलले की तुमच्या पुढच्या पिढीतील एक जण आम्ही धर्मकार्यासाठी घेणार आहोत. याच आशिर्वादाने प. पू. काकांच्या स्वरुपात मुर्तीमंत रुप घेतले.

दत्तावतारी प. पू. टेंबे स्वामींचा सर्वत्र संचार असायचा. स्वामींनी दोन वेळा भारत भ्रमण केले. वाशिम परिसरात स्वामी चार वेळा आले. त्यांचा मुक्काम वाशिम येथे करुणेश्वराच्या देवळात असायचा. त्यावेळी प. पू. स्वामी महाराज भिक्षेसाठी श्री धनागरे यांच्या घरी येऊन गेलेत. त्यावेळी आज ज्या जागेवर वासुदेव आश्रम आहे त्याच ठिकाणी स्वामींची भिक्षा झाली आहे. तसेच काकांच्या मातोश्री यांना टेंबे स्वामींचे पट्टशिष्य श्रीमद् प. प. सद्गुरु श्री दिक्षीत स्वामी महाराज यांचा अनुग्रह होता. विशेष बाब म्हणजे काकांचे मामा ज्यांना बाळमामा असे संबोधत त्या बाळमामांनाही श्रीमद् प. प. टेंबे स्वामींचा प्रत्यक्ष अनुग्रह होता. बाळ मामांना स्वामी महाराजांची खुप सेवा घडली. विशेष बाब म्हणजे टेंबे स्वामींनी गरुडेश्वरी देह ठेवतांना बाळमामा हे प्रत्यक्ष हजर होते. तसेच श्रीमद् प. प. दिक्षीत स्वामींनी अयोध्या येथे देह ठेवतांना ही बाळमामा तेथे हजर होते आणि प. पू. टेंबे स्वामींचे पूर्वाश्रमीचे लहान बंधू प. पू. सिताराम महाराज टेंबे यांनीही अमरावती येथील झिरी ला देह ठेवतांना बाळमामा तेथेही हजर होते. अशा प्रकारे एका संत पुरुषाच्या जन्माअगोदरच धनागरे घराण्यावर सर्वस्वी दत्तकृपा होती. एव्हाना दत्तप्रभू स्वत:च या संस्कारांची पूर्वपिठीका तयार करवून घेत असावेत असेच म्हणावे लागेल.

अशा दत्तभक्तीत रंगलेल्या, कर्तृत्वसंपन्न, सदाचारी घरण्यात प. पू. पंडित काका यांचा जन्म सन १९४२ ला कूष्मांड नवमी या शुभ तिथीला झाला. काकांचे नाव दिनकर असे ठेवले होते. परंतु काकांच्या तासनतास देवपुजेत रमलेल्या बालमुर्ती मुळे सर्वांना आनंद होत असे व त्यामुळे सर्व लोक त्यांना पंडित या नावाने हाक मारत असत. आज त्यांना सर्व जण पंडितकाका याच नावाने ओळखतात. पुढे काकांनी लौकीक दृष्ट्या B. A. एवढे शिक्षण पूर्ण केले व कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी काकांनी नागपुर विद्यापिठात व ए. जी ऑफिसमध्ये नोकरी केली. परंतु हे करत असतांना प्रत्यक्ष टेंबे स्वामी महाराजांचे काकांना मार्गदर्शन व आदेश व्हायचे. नोकरीवर असतांना एक दिवस काकांना गुरु आज्ञा झाली व अनुष्ठानासाठी काका कुणालाही न सांगता अज्ञातवासात गेले. (प. पू. काकांच्या चरित्रात असे असंख्य प्रसंग आहेत जे आजवर अज्ञातच आहेच) सात महिन्यांच्या अज्ञातवासानंतर मार्च ७३ मध्ये काकांनी स्वेच्छेने नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर काकांनी थेट गरुडेश्वर (गुजरात मधील नर्मदा किनारी असलेले टेंबे स्वामींचे समाधी ठिकाण) गाठले. तो घटनाक्रम फारच विलक्षण व अनाकलणीय असा होता. स्वामी महाराजांनी आदेश देवून काकांच्या हातुन तेथे मोठे अनुष्ठान करवून घेतले. त्यानंतर काकांना नर्मदा परिक्रमा करण्याचा स्वामींनी आदेश दिला. काकांनी पूर्ण शास्त्र शुद्ध ३ वर्ष ३ महिने १३ दिवसाची नर्मदा परिक्रमा केली. प्रत्यक्ष दत्तप्रभू व नर्मदा मैयाने ती काकांकडून कृपापूर्वक पूर्ण करुन घेतली. परिक्रम पूर्ण झाल्यावर एक विलक्षण प्रसंग घडला तो असा की प. पू. काकांना टेंबे स्वामींनी संकेत दिला की आपले सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर, हे इंदूर येथे आहेत. तप:पुत, तेजस्वी काका नाना महाराजांना शोधायला इंदूर येथे गेले. प. पु. नाना व काकांची पहिली भेट ही इंदूर येथील हरिसीद्धी येथे झाली. तेव्हा प. पू. नाना महाराज काकांची वाटच पहात होते. प. पू. नाना महाराज पंडित काकांना म्हणाले, "या नर्मदे हर! तुमची परिक्रमा पूर्ण व्हायची होती म्हणून आम्ही गेली पाच वर्ष झालेत आपली वाट बघतोय. "पुढे प. पू. नाना महाराज पंडित काकांना म्हणाले, "जर कुणी विचारले तर सांगा की आमचा आणि तुमचा गेली तिन जन्म झाले गुरु-शिष्याचा संबंध आहे." अनुग्रहानंतर काकांना नाना महाराजांची सेवा, सानिध्य लाभले. थोड्याच कालावधीत काका नाना माऊलींचे प्रिय शिष्य बनले. (इथे सांगु इच्छितो की लौकीक दृष्ट्या बघितले तर इतर वेळी सद्गुरुंनी अनुग्रह केल्यावर तप करवून घेतात परंतु प. पू. काकांच्या बाबतीत तसे दिसुन येत नाही. काकांच्या हातुन प. पू. नानांनी आधिच कठोर असे अनुष्ठान, उपासना व तप करुन घेतले त्यामुळे आधिच तपाने तेजपुंज झालेले काका अनुग्रहानंतर अजुनच तेजस्वी झाले.)

प. पू. काकांनी थोड्याच कालावधीत पूर्ण गुरुकृपा संपादित केली. १९८७ च्या श्रीगुरुपौर्णीमेला प. पू. नाना महाराजांनी काकांना सांगितले की, "दत्तभक्ती संप्रदाय वर्धनाचे कार्य तुम्हाला आयुष्यभर करायचे असून त्यासाठीच तुमचा जिवीत हेतू आहे. तेव्हा आमचे आशिर्वाद आपल्या पाठीशी आहेतच परंतु त्याबरोबर मोठ्या महाराजांची (टेंबे स्वामींची) आज्ञा आहे असे समजावे" अशा प्रकारे सद्गुरु नानांनी सिंहासनाधिष्टित असतांना काकांना आज्ञा दिली. ती आज्ञा शिरसावंद्य मानून प. पू. पंडीत काकांनी आयुष्यभर ते कार्य अविरतपणे केले. नर्मदा मैयावर प. पू. काकांचे निरतीशय प्रेम होते, श्रद्धा होती. नर्मदा परिक्रमेनंतर `नर्मदा' ह्याच विषयावर काकांनी अखंड बारा वर्ष भाषण केले. जणू एक तपच त्यांनी अखंड नर्मदा मैयाची शब्द सेवा केली.बारा वर्ष काका फक्त आणि फक्त `नर्मदा' याच विषयावर बोलले.याद्वारे अनेक प्रांतात त्यांनी नर्मदा महात्म्य पोचविले. "नर्मदेसि अर्पियले जिव्हार" या त्यांच्या उपक्रमाला फारच छान प्रतिसाद लाभला. अशा प्रकारे काकांनी अखंड दत्त सेवा केली. काकांनी वाशिमला ज्या ठिकाणी प. पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची भिक्षा झाली होती त्या ठिकाणी पौ. शु. पंचमीला २५ डिसेंबर २००६ ला वासुदेव आश्रमाची स्थापना केली. आज त्याजागेवर भव्य असे दत्त नर्मदा मंदिर उभे आहे. जे सर्व साधकांसाठी एक श्रेष्ठ असे उपासना केंद्र आहे. काकांनी आपले संपूर्ण आयुष्य दत्तभक्तीचा प्रचार करण्यास समर्पित केले. जीवनात असंख्य यज्ञ संपन्न केले. प. पू. काकांचा ज्ञानपूर्वक कर्म करण्यावर विशेष भर होता. काकांनी आपल्या प्रत्येक भक्ताला वर्णाश्रम धर्माप्रमाणे कर्म करुन परमेश्वर प्राप्ती करण्याचा मार्ग दाखविला. प. पू. काका हे नैष्ठीक ब्रम्हचारी होते. प. पू. काकांचा आचार धर्मावर विशेष भर होता.

आचार प्रभवो धर्म: या उक्ती प्रमाणे प. पू. काकांचा कटाक्ष होता. आजही काकांनी आपल्या शिष्यांवर केलेले संस्कार आपल्याला वाशिमला वासुदेव आश्रमात पहावयास मिळतात. काकांनी आजिवन दत्त नर्मदा सेवा केली. काकांचे संपूर्ण आयुष्य हेच एक तप आहे. प. पू. पंडित काकांनी आपले शिष्योत्तम प्रिय अशा प. पू. विजय काका पोफळी यांना गुरुवार दि. १ नोव्हेंबर २००७ रोजी, अश्विन कृ. सप्तमी १९२९ (पूर्ण गुरुपूष्यामृत योग) गुरुपदी आरुढ केले. आपले उत्तराधिकारी म्हणून घोषीत केले. आज प. पू. विजय काकांच्या रुपात प्रत्यक्ष काकाच कार्यरत आहेत याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. अशा थोर संत सद्गुरु श्री पंडित काका धनागरे महाराज यांनी माघ कृ. पंचमी शके १९३३ दि. १२ फेब्रुवारी २०१२ रोजी आपला देह ठेवला व काका दत्त चरणी लिन झाले.

काका माऊली आपली कृपाच हा एकच आधार मज पामराला आहे माझे सर्व अपराध पोटी घ्या आणि आपले कृपा छत्र सदैव आम्हा सर्वांसोबत असु द्या. आपल्या श्री चरणांची अखंड सेवा घडु द्या हेच मागणे मागतो.

प. पू. काका माऊली विजयते !!!
नर्मदे हर हर हर !!!!
      ✍️✒️ अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

Saturday, February 19, 2022

३९२ वी शिवजयंती!!!🚩🌺🌸🙏

आज_शिवजयंती_शिवस्मरणाचा_पुण्यदिन :-
                  खरंतर छत्रपती शिवरायांचे स्मरण हे काही एक तारखेला ,एका तिथीला करण्यासारखे नाही.छत्रपती शिवराय तर आम्हाला नित्यस्मरणीय नित्यवंदनीय आहेत आणि त्यांच्या प्रज्वलित पवित्र अग्निरुप चरित्राचे चिंतन प्रत्येकाने रोजच करायला हवे.तरी आज थोरल्या महाराजांचा जन्म म्हणजे आम्हा लोकांचा सणचं आहे.श्रीसमर्थांनी थोरल्या महाराजांचे वर्णन अतिशय यथार्थ शब्दात केले आहे, 

या भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।। 
                            खरंच या शब्दांचे चिंतन केले तर लक्षात येतंच की आजवर छत्रपती शिवरायांच्या जन्मापासून ३९२ वर्ष झाले पण दुसरे कुणीही असा अलौकिक पराक्रम, अलौकिक चरित्र आणि एकमेवाद्वितीय लौकिक  मिळवू शकला नाही.हिरव्या गडद अंधारात जिथे कुठेही दुरपर्यंत धर्माच्या काजव्यांचा ही प्रकाश अस्तित्वात नव्हता तिथे थोरल्या महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे माॅं साहेबांचे स्वप्न बघितलेच नाही तर ते सत्यात उतरवले , हिंदवी स्वराज्याची स्थापना जी केवळ अशक्यप्राय गोष्टी होती ती साकार करुन दाखवली. "संभवामी युगे युगे" या गीतेतील भगवंतांच्या वचणाला सार्थ करणारे धर्मरक्षकचं महाराज होते यात शंका नाही. थोरल्या महाराजांचा जन्म जर झाला नसता तर आज हिंदू धर्माचे काय स्वरुप झाले असते याचा विचार ही करणे अवघड आहे. कवी भूषणांनी आपल्या शिवबावनी या रचनेत फारच सुंदर शब्दात थोरल्या महाराजांच्या चरित्राचे महत्व प्रतिपादन केले आहे ते म्हणतात,

पीरा पयगम्बरा दिगम्बरा दिखाई देत,
सिद्ध की सिधाई गई, रही बात रब की।
कासी हूँ की कला गई मथुरा मसीत भई
शिवाजी न होतो तो सुनति होती सबकी॥
कुम्करण असुर अवतारी औरंगजेब,
कशी प्रयाग में दुहाई फेरी रब की।
तोड़ डाले देवी देव शहर मुहल्लों के,
लाखो मुसलमाँ किये माला तोड़ी सब की॥
भूषण भणत भाग्यो काशीपति विश्वनाथ
और कौन गिनती में भुई गीत भव की।
काशी कर्बला होती मथुरा मदीना होती
शिवाजी न होते तो सुन्नत होती सब की ॥
    ‌
        या शब्दांचे गांभिर्य हे फक्त शिवचरित्राचे वाचन,चिंतन केल्याशिवाय लक्षातच येणार नाही.शिवप्रभुंचे रुप,त्यांचे जिवन , त्यांची धर्मनिष्ठा हे सर्व प्रत्येकाने अभ्यासलेच पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराज हे नुसते शिवगंध, गाडीवरील स्टिकर , राजकारण या दिखाव्यापुरतेच मर्यादित न राहता शिवचरित्र हे रक्तात भिनायलाच पाहिजे..कारण "ज्यांच्या रक्तात शिवचरित्र भिनले त्यांचे चरित्र उज्वल बनले" हेच एकमात्र सत्य आहे.शिवचरित्र हे धर्माभिमान, धर्मनिष्ठा, पराक्रम,शौर्य, कर्तुत्व आणि सकारात्मकतेची खाणचं आहे यात शंका नाही. शिवप्रभु हे आम्हा हिंदूंचे दैवत आणि आम्ही हिंदू आमच्या दैवतांचे जन्मदिवस नाही तर जयंती साजरा करतो ते ही तिथीनुसार . तरी मागे मी लिहिल्याप्रमाणे आम्हाला शिवजयंती तारीख आणि तिथीचे काय तर दिवस,वार, नक्षत्रानेही साजरी करायला हरकत नाही.एवढेच काय तर याच तारीख,दिवस आणि नक्षत्रावर आम्ही शिवजयंती ही दर महिन्याला साजरी करायला हवी कारण एक दिवस काय तर प्रत्येक क्षण हा छत्रपती शिवरायांच्या स्मरणांचा आहे.
      ✒️✍️अक्षय जाधव आळंदी ✍️✒️

||दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती
अष्टावधानजागृत अष्टप्रधानवेष्टीत न्यायालंकारमंडीत शस्त्रास्त्रशांस्त्रपारंगत
राजनीतीधुरंधर पौढप्रतापपुरंदर क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर
राजमान्यराजश्री अखंडलक्ष्मीअलंकृत महापराक्रमी महाप्रतापी जाणते राजे
महाराजाधिराज श्री श्री श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय||

विश्वभुषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंतीच्या सर्व बांधवाना हार्दिक शुभेच्छा..!

जय भवानी जय शिवराय 🚩🙏🌸🌺

Friday, February 18, 2022

सद्गुरु श्री गोविंद काका उपळेकर महाराज 🌸🙏🌺

स्वानंदचक्रवर्ती_समर्थ_सद्गुरु_श्रीगोविंदकाका_उपळेकर_महाराज :-
                         राजाधिराज योगीराज परब्रम्ह भगवान श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या परंपरेतील प्रभावळीतील अतिशय थोर ,लोकविलक्षण,सतत आत्मानंदात निमग्न असणारे सत्पुरुष ,थोर संत म्हणजे श्री गोविंद काका उपळेकर महाराज.परब्रह्म श्री स्वामी माउलींच्या प्रभावळीत अत्यंत शोभून दिसणारे संतरत्न असे श्री काका. प.पू.गोवींद काकांचे चरित्र अतिशय विलक्षण ,दिव्य आणि अलौकिक असे आहे. प.पू.काकांचा एका डॉक्टरांपासून ते संतत्वाचा अचाट जिवन प्रवास बघितला तर कुणीही थक्क,स्तिमीत होईल.
                       उपळेकरांचे घराणे हे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक या गावचे.प.पू्.श्रीगोविंद काकांचे वडिल श्री रामचंद्रपंत उपळेकर नंतर बारामती जवळील माळेगांव येथे आले.ते वकिलीचा व्यवसाय करीत.प.पू.श्रीगोविंदकाकांचा जन्म श्रीरामचंद्रपंत व सौ.जानकीबाई या सत्शिल दांपत्यापोटी माळेगावच्या वाड्यातच झाला. १५ जानेवारी १८८८ रोजी माघ शुद्ध द्वितीयेला पहाटे ४ वाजता,धनिष्ठा नक्षत्रावर प.पू.काकांचा जन्म झाला.त्या दिवशी संक्रांतीची कर म्हणजे किंक्रांत होती.प.पू.काका हे या दाम्पत्याचे पाचवे अपत्य होते.प.पू.काकांच्या जन्मानंतर लगेचच त्यांचे बिर्हाड हे फलटणला आले.काकांचे सुरुवातीचे शिक्षण हे फलटण येथेच झाले.पू.काका हे उपजतच एकपाठी आणि अत्यंत हुशार होते.श्रीमद् भगवद्गीता ते शेवटून सुरुवातीपर्यंत उलट्या क्रमाने म्हणू शकत असत.काकांचे सुरवातीचे शिक्षण हे फलटण येथील राजे मुधोजी हायस्कूल मध्ये झाले.त्यानंतर ते पुणे येथील नू.म.वी मध्ये दाखल झाले‌.पुढे ते बी‌.जि मेडिकल कॉलेजमधून १९१३ साली ते L.C.P & S ही डिग्री घेऊन डॉक्टर झाले.वयाच्या पंचविसाव्या वर्षी काकांचा विवाह दादोजी कोंडदेव यांच्या वंशातील कु.दुर्गा हिच्याशी १९१३ साली झाला.कु.दुर्गा ही लग्नानंतर सौ.रुक्मिणी झाल्या. कु.दुर्गा या दादोजी कोंडदेवांच्या वंशातील शेवटच्या एकमात्र व्यक्ती असल्यामुळे गडगंज संपत्तीच्या त्या एकमात्र वारस होत्या.त्यांना कोर्टामध्ये सांगावे लागले‌ होते की ,हा विवाह त्यांना मान्य असून कोणत्याही जबरदस्तीशिवाय त्या हे लग्न करीत आहेत.पुढे काकांसोबत संसारात सौ.रुक्मिणी मातोश्रींना लंकेची पार्वती होऊन रहावं लागले तरी त्यांनी काहीही कुरबुर न करता आनंदाने या महात्म्या सोबत संसार केला.लगेचच १९१४ साली सुरू झालेल्या पहिल्या महायुद्धात प.पू.काकांना सर्जन म्हणून रॉजल आर्मीत रुजु झाले.प.पू.काका हे सैन्यात भरती झाल्यावर त्यांचे पहिले पोस्टींग हे दक्षिण आफ्रिकेतील नैरोबी येथे झाले.त्यानंतर फ्रांस, इंग्लंड, रावळपिंडी येथे त्यांनी सेवा बजावली.शेवटच्या रावळपिंडी येथील पोस्टींग वेळी काकांमध्ये तिव्र मुमुक्षा निर्माण झाली.ते विचार करीत की,आपण एवढ्या देहांची चिरफाड केली तरी पण आत्मा  जो म्हणतात तो का आपल्याला दिसत नाही ? अशाप्रकारे ते शाश्वत सुखासाठी अतिशय तळमळू लागले, ईश्वराकडे ते करुणा भाकु लागले.त्याच सुमारास त्यांना अधूनमधून एका दिगंबर साधू चे दर्शन होऊ लागले.त्या अनामिक साधु बद्दल त्यांना अतिशय प्रेम,विलक्षण ओढ वाटु लागली. तिथे गेल्यावर मारुती मंदिरात उभ्या असलेल्या दिगंबर संतांना बघुन काकांना धक्काच बसला.कारण याच दिगंबर सत्पुरुषाला त्यांनी वारंवार दृष्टांतात आधी बघितले होते.ते दिगंबर सत्पुरुष म्हणजे पुसेसावळीचे अवधूत श्रीकृष्णदेव परीट होते.श्रीकृष्णदेव महाराज हे परब्रह्म भगवान श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या परंपरेतील एक अप्रसिद्ध महापुरुष होते.श्रीकृष्णदेव महाराजांची गुरुपरंपरा पुढीलप्रमाणे आहे-
परब्रह्म भगवान श्रीस्वामी समर्थ महाराज - श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराज (कुंभार स्वामी कोल्हापूर) - श्रीधोंडीबुवा महाराज ,पलूस - श्रीकृष्ण देव महाराज,पुसेसावळी. श्रीकृष्ण देव महाराज हे नित्य विदेही स्थितीत राहणारे विलक्षण अवलिया होते. सुट-बुटातील गोविंद काकांना बघून महाराज म्हणाले, "हे असले ध्यान इथे नको." या एका वाक्यातुन काकांना जे समजायचे होते ते त्यांना समजले व एका भारावलेल्या अवस्थेत ते फलटण ला परतले. दुसर्याच दिवशी नोकरी,वैभव,घरदार , ऐश्वर्य सर्व क्षणात सोडुन साध्या धोतर-उपरण्यातील वेषात पुसेसावळीला येऊन श्रीकृष्णदेवांच्या सेवेत ते रुजु झाले.त्यांची सेवा हे अतिशय मोठे दिव्य होते.श्रीकृष्णदेव महाराज उघड्या अंगाने भर दुपारी निखार्याप्रमाणे तापलेल्या वाळूत पडुन राहत.तासनतास ते ओढ्याच्या पाण्यात बसुन राहत,फड्या निवडुंगातून ते तासनतास लोटांगणे घालित असतं. लहानपणापासून सुखात वाढलेल्या डॉ उपळेकरांसाठी हा बदल नक्कीच सोपा गेला नसणार.पण प.पू.गोविंदकाकाही तयारीचे शिष्य होते त्यांनी ही गुरुचरणी देह झिजवून परमार्थातील अतिउच्च अवस्था गाठली.
[ पुढील प्रसंग हा प.पू.काकांचे पणतु श्रीरोहनजी उपळेकर यांनी लिहीलेल्या लेखातुन जसाच्या तसाच घेतला आहे.दादांनी अतिशय सुंदर आणि तंतोतंत शब्दात या प्रसंगाचे वर्णन केले आहे. ]
( पुसेसावळी गावातील लोकांना परदेशात राहून आलेल्या या डॉक्टरचे फार आश्चर्य वाटे. ते म्हणत की, वेड्या कृष्णा परटाच्या संगतीने या फलटणच्या डॉक्टरलाही बहुदा वेड लागले असावे. पण त्यांना काय कळणार की ते वेड किती अद्भुत होते !
पुसेसावळी येथील काही मोजक्या कुटुंबांमधील लोक मात्र सद्गुरु  श्रीकृष्णदेव व पू. काकांचा अधिकार जाणून होते व त्या दोघांचीही ते जमेल तशी काळजी देखील घेत असत. श्रीकृष्णदेव महाराजांनी पू. काकांची प्रचंड परीक्षा पाहिली. लोकांनी देवांना विचारावे, " या बामनाला का तरास देताय? " तर श्रीकृष्णदेवांनी उत्तर द्यावे, " हा माझं समदं डबुलं मागतुया ! " खरोखरीच, सद्गुरु श्रीकृष्णदेवांपाशी असलेले शांभव अद्वयानंदवैभवच तर हवे होते ना काकांना  ! पू. काकांनी तीन वर्षे मनापासून सेवा केली सद्गुरूंची. शेवटी ती दयाघन गुरुमाउली प्रसन्न झाली व एकेदिवशी पू. काकांच्या मस्तकावर कृपाहस्त ठेवून श्रीकृष्णदेवांनी आपल्या पर्यंत परंपरेने आलेले स्वामीकृपाधन पू. काकांना बहाल केले. पू. काकाही त्या कृपावर्षावात पूर्णपणे न्हाऊन निघाले, अंतर्बाह्य सुखरूप होऊन ठाकले. सद्गुरु श्रीकृष्णदेवांनी " आपणासारिखे करिती तात्काळ । " या संतवचनाची रोकडी प्रचितीच पू. काकांना एका क्षणात अनुभवाला आणून दिली. ये हृदयीचे ते हृदयी प्रतिष्ठापित केले.
पू. काकांनी केलेली गुरुसेवा फार अलौकिक आहे. भगवान श्रीमाउलींनी श्रीज्ञानेश्वरीत मांडलेली गुरुसेवा पू. काकांनी प्रत्यक्ष आचरून दाखवलेली आहे. खूप खडतर आणि अपार निष्ठेचीही कसोटी पाहणारी त्यांची गुरुसेवा खरोखरीच विशेष म्हणायला हवी. 
पू. काकांवर कृपा करण्याचे आपले भगवत्प्रदत्त कार्य संपन्न झाल्याने आता श्रीकृष्णदेवांची पैलतीराची ओढ बळावली होती. म्हणून श्रीभगवंतांच्याच प्रेरणेने श्रीकृष्णदेवांनी भाद्रपद कृष्ण त्रयोदशी, दि. ८ ऑक्टोबर १९२३ रोजी मध्यान्ही पुसेसावळीच्या ओढ्यात जलसमाधी घेतली. तत्पूर्वीच श्रीकृष्णदेवांनी आपल्या लाडक्या गोईंदाला मुद्दामच फलटणला घरी पाठवून दिले होते. )
              पुढे भाद्रपद कृष्ण त्रयोदशी ,दि.८ ऑगस्ट १९२३ रोजी मध्यान्ही पुसेसावळीच्या ओढ्यात जलसमाधी घेतली. तत्पूर्वीच महाराजांनी काकांना फलटण ला परत पाठवुन दिले.श्रीकृष्णदेवांच्या महासमाधीचे वृत्त समजताच ते लोटांगण घालीतच फलटण ते पुसेसावळीला गेले.हा प्रसंग अतिशय महत्वाचा आहे .प.पू.काकांची सद्गुरु चरणी असलेली अनन्य निष्ठा,अनन्य प्रेम या प्रसंगातुन दिसते.इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे पुसेसावळी ते फलटण चे अंतर हे जवळपास ८० किमी आहे‌.एकढे मोठे अंतर तेही लोटांगण घालीत पार करणे हा एक विलक्षणच प्रसंग आहे.पुसेसावळीला पोचल्यावर प.पू.काकांनी सद्गुरु श्रीकृष्ण देव महाराजांच्या समाधीवर जे डोके ठेवले ते तिन दिवसांनीच वर काढले.श्रीकृष्णदेवांच्या सगुण विरहाने काका अतिशय व्याकुळ झाले.तिथेच राहुन त्यांनी श्रीगुरुसेवेचा प्रारंभ केला. पुसेसावळीला राहुन त्यांनी लगेच "श्रीकृष्णदेव" हे दिव्य चरित्र लिहुन काढले.त्यालाच त्यांनी "हरिहर भेट" असेही नाव दिले होते.या चरित्र लेखनानंतर श्रीकृष्ण देव महाराजांनी पुर्वी सांगितल्याप्रमाणे काका भारतभ्रमणाला निघाले. इ.स १९२३ ते ३३ या दहा वर्षांच्या कालावधीत पू.काका हे अज्ञातवासात होते.मधूनच ते फलटणला घरी येत असत व कधीतरी मधूनच निघून जात.या दहा वर्षांच्या काळात काका मौनातच होते.या दहा वर्षांतील बहुतेक प्रसंग हे अज्ञातच आहे.जे काही माहिती आहे ते सर्व पू.काकांनीच आपल्या भक्तांना सांगितले आहे व त्यांचीच फक्त नोंद झाली आहे.या अज्ञातवासात काकांचे काही काळ  हिमालयात ही वास्तव्य होते.एके दिवशी त्यांनी आतुर संन्यास घेऊन हिमालयातील कड्यावरून उडी मारुन देहत्याग करण्याचा निश्चय केला होता.तसे करायला ते गेलेही पण त्यावेळी त्यांच्या समोर भगवान नर-नारायण प्रगट झाले.त्यांनी काकांना दर्शन देऊन त्यांच्या भावी कार्या संबंधी मार्गदर्शन केले. इ.स १९३३ साली प.पू.काका पुन्हा फलटण ला आले. पुढे काकांनी संसारातही लक्ष घातले. या कालावधीत पू.काकांनी एकून  ३१ ग्रंथ लिहिले. हे सर्व ग्रंथ काकांनी आपल्या उन्मनी ,अवधूत आनंदात लिहीले असल्याने ते सहजासहजी न समजण्यासारखे व गुढ असे आहे.श्रीज्ञानेश्वरी वरील 'श्रीज्ञानेश्वरी सुबोधीनी' हे अडीच हजार पेक्षा जास्त पृष्ठांचे विवेचन काकांनी केले.हे विवेचन एकूण १८ खंडांमध्ये प्रकाशित झाले आहे. त्याशिवाय 'सिद्धांत ज्ञानेश्वरी' चे चार खंड, 'सामोपचार परिहार' ,'आमोद' व 'ज्योतिज्योती' हे स्फुट निबंधवजा लेखांचे संकलन असलेले लघुग्रंथ , 'हरिपाठ सांगाती', 'नित्यपाठ' , 'विभूती' ,'श्रीज्ञानेश्वरी मार्गदर्शिका', 'श्रीज्ञानेश्वर प्रशस्ति' आणि 'श्रीभगवद गिता सुबोधिनी' असे प्रचंड व गुढ ,सारभूत वाङमय काकांच्या हातुन माउलींनी निर्माण करुन घेतले.
                     प.पू.काकांचे आजवर एकूण ७ चरित्र प्रकाशित झाले होते.आज ते उपलब्ध नाहीत. पण काकांचे पणतु रोहनजी उपळेकर यांनी काकांचे अतिशय सुंदर असे "स्वानंदचक्रवर्ती" हे चरित्र लिहीले आहे.अतिशय वाचनीय, चिंतनीय असे हे चरित्र आहे. दत्त संप्रदायाचे अध्वर्यू सद्गुरु श्रीशिरीष दादा कवडे यांनी या ग्रंथांच्या प्रस्तावनेत काकांचे महात्म्य अतिशय सुंदर शब्दात वर्णन केले आहे.  प.पू.श्री सद्गुरु दादा लिहीतात , "विसाव्या शतकात महाराष्ट्रात झालेल्या अग्रगण्य भगवद् विभूतींमध्ये पू.उपळेकर काकांची गणना होते. पू.काका संतत्वाचा उत्तुंग आदर्श होते. लौकिकातल्या कुठल्याही प्रसंगांत त्यांच्या अंत:करणाची ब्रह्मबैसका सुटलेली दिसत नसे. ते स्वानंदसाम्राज्याचे चक्रवर्ती सम्राटच होते. प्राप्त पुरुषाची ती समग्र दैवी सुलक्षणे त्यांच्या ठायी सुखाने, आपलेपणाने तिन्ही त्रिकाळ नांदत होती. सहज, अखंड समाधीचे शांभवी वैभव त्यांच्या सर्व लीलाव्यवहारांमधून सदैव ओसंडत असे !" प.पू.सद्गुरु श्री काका व प.पू.सद्गुरु श्री शंकर महाराज धनकवडी यांची अनेकदा भेट झाली आहे.श्रीरावसाहेब मेहेंदळे यांच्या घरी काही किर्तन ,प्रवचना प्रसंगी सद्गुरु शंकर महाराज हजर असत व सद्गुरु काका ही तिथे येऊन जात. प.पू.काकांच्या चरित्रात असंख्य अलौकिक प्रसंग आहेत. तरी पोस्ट मधील शब्दांच्या मर्यादेमुळे ते सर्व इथे मांडणे शक्य नाही.काकांचे संपूर्ण जिवन एकमेवाद्वितीयच आहे. प.पू‌ काकांनी आपल्या इच्छेने ठरवून देह ठेवला.८ ऑक्टोबर ही सद्गुरु श्री कृष्णदेव महाराजांची देहत्यागाची तारीख होती. तीच तारीख प.पू.काकांनी देह ठेवण्यासाठी निवडली. ८ ऑक्टोबर १९२३ रोजी सद्गुरु श्री कृष्णदेव महाराजांची देह ठेवला होता. ८ ऑक्टोबर याच दिवशी प.पू.काकांनीही देह ठेवला. अशा या अतिशय दिव्य महापुरुष, संतश्रेष्ठ सद्गुरु श्री गोविंद काका उपळेकर महाराज यांच्या चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏🌸🌺
        ✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

Wednesday, February 16, 2022

श्रीगुरुप्रतिपदा श्रीगुरुंचा निजानंदगमन दिन🙏🚩


 श्रीगुरुप्रतिपदा:- 🌸☘️🙏🏻
                   आपल्या श्रीदत्त संप्रदायात व संपूर्ण गुरु परंपरेत वर्षातील तिन तिथींना अनन्यसाधारण महत्व आहे.त्या तिथी म्हणजे गुरुपौर्णिमा, गुरुद्वादशी आणि गुरुप्रतिपदा. दत्त संप्रदायात या तिन्ही तिथींना सारखेच महत्त्व आहे तरी गुरुद्वादशी आणि गुरुप्रतिपदा या तिथींचा संबंध दत्तसंप्रदायाशी फार जवळचा आहे. सर्व दत्तक्षेत्री ही तिथी अतिशय मोठ्या प्रमाणात उत्सव रुपात साजरी केली जाते.त्याला प्रामुख्याने कारण ही तसेच आहे. 
                        आमचे परमाराध्य इष्ट दैवत द्वितीय दत्त अवतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी आपले नृसिंहवाडी येथील १२ वर्षाचे वास्तव्य पूर्ण करुन तिथे 'गुरुद्वादशी' या तिथीला "मनोहर" दत्त पादुकांची स्थापना केली व श्रीक्षेत्र गाणगापूर येथे प्रयाण केले.त्यानंतर श्रीगुरु महाराजांचे २४ वर्ष गाणगापूर येथे वास्तव्य होते.याकाळात श्रीगुरु महाराज हे भिमा-अमरजा संगमी वास्तव्यास होते .श्रीगुरु महाराज तेथील अश्वत्था च्या खाली बसून अनुष्ठान करीत व दूपारी गावात भिक्षे करीता येत.या अखंड २४ वर्षांच्या कालावधीत श्रीगुरु महाराजांनी गाणगापूर येथे अनंत कोटी जिवांचा उद्धार केला,अनंत जिवांचे त्रिविध ताप हरले‌ ,अनंत लिला केल्या.याचे विस्तृत वर्णन 'श्रीगुरुचरित्र' या अलौकिक ग्रंथात आले आहे.अनेक जिवांचा उद्धार करुन "श्रीगुरुप्रतिपदा" या तिथीला भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे निर्गुण मठात *निर्गुण पादुकांची* स्थापना केली व याच "गुरुप्रतिपदा" तिथीला आपले सगुण रुपातील अवतार कार्य पूर्ण करुन श्रीगुरु महाराजांनी आपल्या निजस्थानी निजानंदगमन केले.
गुरुचरित्रात याबद्दल श्रीगुरु सांगतात , 
"शिष्यांतें निरोपिती अवधारा । पुष्पांचें आसन त्वरित करा । जाणें असे पैलतीरा । ऐक्य होऊं मल्लिकार्जुनीं ॥"  श्रीगुरु महाराजांनी सुंदर व अलौकिक अशा पुष्पासनावर बसुन श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथुन दत्त लोकी गमन केले .
               या परमपवित्र दिना बद्दल श्रीगुरुचरित्रातील ५१ व्या अध्यात ही फार सुचक व सुंदर ओव्या आलेल्या आहेत.
कन्यागतीं बृहस्पति । बहुधान्य संवत्सरी ख्याति ।
सूर्य चाले उत्तर दिगंतीं । संक्रांति कुंभ परियेसा ॥३६॥
शिशिर ऋतु माघमासीं । असितपक्ष प्रतिपदेसी ।
शुक्रवारीं पुण्यदिवसीं । श्रीगुरु बैसले निजानंदीं ॥३७॥
श्रीगुरु म्हणती शिष्यांसी । जातों आम्ही निज मठासी ।
पावतां खूण तुम्हांसी । प्रसादपुष्पें पाठवितों ॥३८॥
येतील पुष्पें जाती शेवंती । घ्यावा प्रसाद तुम्हीं भक्तीं ।
पूजा करावी अखंड रीतीं । लक्ष्मी वसों तुम्हां घरीं ॥३९॥
                               वरील ओव्यांमधून श्रीगुरुंच्या शैलगमनाबद्दल आपल्याला स्पष्ट माहिती मिळते. दृष्य रुपातुन श्रीगुरु महाराज निर्गुण ,गुप्त रुपात चिरकाल  निर्गुण पादुकांच्या रुपाने गाणगापूरी अखंड वास्तव्य करते झाले.पुढे श्रीगुरु महाराजच आश्वासन दितात की , 
" जे भक्त असती माझ्या प्रेमी । त्यांसी प्रत्यक्ष दिसो आम्ही ।।" जो भक्त अनन्य प्रेमाने , श्रद्धेने आणि कळकळीने श्रीगुरु महाराजांना शरणं जातो त्याला आजही श्रीगुरु महाराज गाणापूरात भेटतात.आजही आपल्या अस्तित्वाची जाणिव खर्या भक्तांना देतातच.त्यामुळे आजच्या तिथीला आपल्या दत्तसंप्रदायात अनन्य साधारण महत्व आहे.श्रीक्षेत्र गाणगापूर, औदुंबर, नृसिंहवाडी ,कारंजा येथे हा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.श्रीक्षेत्र कारंजा येथे आज सबंद रात्रभर गावातून मिरवणूक काढली जातो.गाणगापूर येथे ही तिथी विशेष रुपाने साजरी करण्याची पद्धत आहे.आजच्या तिथीला निर्गुण मठात संतांचे, सत्पुरुषांचे दत्तरुपात यतीपुजन करण्याची पद्धत आहे.विविध संतांच्या पुजनाचा भव्य सोहळा या तिथीला गाणगापूर येथे केला जातो. 
दत्तावतारी परमसद्गुरु श्री नाना माउलींचे गाणगापूर येथे  झालेले यतीपुजन


                      आम्हाला ही तिथी विशेष प्रिय आहे कारण आमचे परमगुरु अधमोद्धारक दिनदयाळ समर्थ सद्गुरु माउली श्रीनाना महाराज तराणेकर यांचे यतिपुजन आजच्याच दिवशी गाणगापूरात झाले होते आणि विशेष म्हणजे २०१८ रोजी आजच्याच दिवशी आमच्या सद्गुरु माउली धर्मभूषण श्रीदत्तसंप्रदायवर्धक परम पूजनीय समर्थ सद्गुरु माउली श्री विजय काका पोफळी महाराज यांचे "यती पुजन" निर्गुण मठात झाले होते. हाच आनंद आज द्विगुणित झाला कारण यावर्षी म्हणजे २०२२ च्या गुरुप्रतिपदेलाही प.पू.सद्गुरु माउली काकांचे पुन्हा एकदा यतीपुजन झाले आहे.प्रत्यक्ष दत्त प्रभु असलेल्या काकांचे हे यतीपुजन आम्हा सर्व भक्तांसाठी अतिव आनंद आणि अभिमानाची बाब आहे.प्रत्यक्ष दत्तात्रेय प्रभूंनी पूज्य काकांच्या दत्तसंप्रदायाच्या वर्धन कार्याला दिलेली ही पोच पावतीच आहे.प्रत्यक्षात जरी आम्ही सर्व काकांच्या या पुजनाचा सोहळा बघू शकत नसलो तरी आमचे मन तिथेच प.पू.काकांच्या चरणी निर्गुण मठातच आहे आणि ही भावना माझी नाही तर प्रत्येकाची आहेच यात शंका नाही.
धर्मभुषण श्रीदत्तसंप्रदायवर्धक सद्गुरु माउली श्री विजय काकांचे गाणगापूर येथे झालेले यतीपुजन


       ✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी✒️✍️

स्वानंदसुखनिवासी सद्गुरु श्रीजोग महाराजांची १०२ वी पुण्यतिथी

🌺स्वानंदसुखनिवासी सद्गुरु श्रीजोग महाराज यांची १०२ वी पुण्यतिथी :-🌺💐🌸🙏

                         प्रात:स्मरणीय,नित्यवंदनीय सद्गुरु श्री जोग महाराज हे खर्या अर्थाने वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू आहेत.जगद्गुरु तुकोबारायानंतर खुप सत्पुरुष वारकरी संप्रदायात झाले , प्रत्येकाने प्रचंड कार्य केले आहेच , पण महाराजांनी केलेले कार्य हे एकमेवाद्वितीयच आहे यात तिळमात्र शंका नाही.तुकोबारायानंतर वारकरी संप्रदायाला नवचेतना,नवं ऊर्जा , नवसंजीवनी व दिशा देण्याचे अचाट कार्य महाराजांनी केले.श्रीमहाराजांनी वारकरी संप्रदाय हा तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे दिव्य कार्य केले.अज्ञानी ,निरक्षर लोकांपर्यंत वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान सहज,सोप्या भाषेत पोचवले.

                       श्रीमहाराजांच्या चरित्राचे चिंतन केल्यावर महाराजांनी केलेल्या कार्याची व समाजावर केलेल्या उपकाराची जाणीव कुणालाही झाल्याशिवाय राहणार नाही.या उपकाराचे मूर्त स्वरुप आजही शंभर वर्षा नंतर आपण "वारकरी शिक्षण संस्था आळंदी" या रुपाने बघु शकतो.या ज्ञानाच्या विद्यापिठातून,सागरातून ज्ञानाचे अमृतकण वेचुन आजवर हजारो,लाखो विद्यार्थांच्या जिवनाचे सोनं झाले आहे ,हे सर्व विद्यार्थी कृतकृत्य झाले आहेत.श्रीजोग महाराजांनी लावलेले बिज आज वटवृक्षाच्या रुपात बहरलय आणि या वटवृक्षाच्या छायेत आजही अखंड हजारो जिव ज्ञानप्राप्तीसाठी अलंकापुरीत येतात. श्रीविष्णूबुवा जोग महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आपल्याला त्यांच्या परमपावन चरित्राचे अल्पसे चिंतन करायचे आहे.श्रीमहाराजांचे स्वनामधन्य शिष्य आपल्या सर्वांचे लाडके प.पू.सोनु मामा दांडेकर यांनी लिहीलेले चरित्र हा एकच आपल्याला आधार आहे.अतिशय सुंदर अशा या चरित्रातुन ठरावीक अमृतकण वेचुन आपणं संक्षिप्त रुपात महाराजांच्या चरित्राचे अवलोकन करुयात.या चरित्र ग्रंथाचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प.पू.सोनु मामांनी यात अजिबात श्रीजोग महाराजांच्या जिवनातील चमत्कार , अलौकिक घटनेचा उल्लेख प्रकर्षाने टाळला आहे.त्याचे महत्वाचे कारण म्हणजे श्रीमहाराजांनाही त्याबद्दल असलेली अनास्था.श्रीमहाराजांच्या चरित्रात आपल्याला सत्कर्म,सदाचार ,स्वाध्याय,अध्यायन,वर्तन, चारित्र्य आणि नियमबद्ध जिवनाचेच दर्शन घडेल.महाराजांनी आजिवन याच तत्वाचा अवलंबन केलेले आपल्याला दिसतो.खरंतर महाराजांचा अधिकार आपल्याला त्यांनीच सांगितलेल्या एका वाक्याने लक्षात येईल ते म्हणजे , "गेल्या जन्मात आम्ही भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे भोई होतो आणि त्यामुळेच आम्हाला हा जन्म लाभला आहे." खरंच महाराजांचे जिवन ही तसेच भव्य आणि दिव्यत्वाने परिपूर्ण होते.

                       भाद्रपद वद्य प्रतिपदा शके १७८९ रोजी दिनांक १४ सप्टेंबर १८६७ या दिवशी पुणे येथे श्रीनरसोपंत आणि मातोश्री सरस्वती देवी या अतिशय सत्शिल आणि सुखवस्तु दाम्पत्या पोटी महाराजांचा जन्म झाला.या दाम्पत्याचे हे चवथे अपत्य. श्रीमहाराजांच्या आईकडे व वडिलांकडे दोन्हीकडेही पहिलवानकी पिढीजात होती.त्यामुळे या घराण्यातील मुलांवरही मल्लविद्येचे संस्कार हे आलेच होते.महाराजांचे मोठे भाऊ पांडोबा हे उत्तम नावलौकिक असलेले मल्ल तर होतेच आणि पुण्यातील नगरकर तालीमीचे वस्तादही होते.तसेच पांडोबा हे अतिशय धार्मिक,सत्शिल ,ब्रह्मचारी आणि शिस्तबद्ध व्यक्ती होते.त्यामुळे नकळत त्यांचा पुरेपूर प्रभाव हा प.पू.विष्णुबुवांवर झाला यात नवल ते काय? श्रीविष्णुबुवा जोग महाराजही मल्ल विद्येत पारंगत झाले. एक उत्तम मल्ल म्हणून महाराजांचा पंचक्रोशीत नावलौकिक होता.यानंतर एक महत्वाचा प्रसंग महाराजांच्या चरित्रात घडला ज्यामुळे श्रीमहाराज हे अंतर्मुख झाले. तो प्रसंग म्हणजे " पुण्यातील एका कुस्ती स्पर्धेत महाराज जिंकले ,सर्वांनी आनंद उत्सव करत महाराजांची मोठी मिरवणूक काढली.त्यावेळी तिथे एक साधु  ( श्री गंगाधर गोसावी असावे असा अंदाज आहे ) हे जोग महाराजांजवळ आले व म्हणाले "अरे या विजयाचा काय आनंद करतोय ,काळावर विजय मिळवशील तर तु खरा मल्ल आणि तोच खरा आनंद." त्यानंतर महाराज खर्या अर्थाने अंतर्मुख झाले आणि त्यांचे मन परमार्थाकडे खर्या अर्थाने वळले. ते आपले वडील बंधू पांडोबां समवेत वरचेवर श्रीक्षेत्र अलंकापुरीस ज्ञानेश्वर माउलींच्या दर्शनाला जाऊ लागले.हळूहळू ते माउलींचे व पांडुरंगाचे निस्सिम भक्त बनले.त्यांनी माउलींच्या समाधीवर माळ ठेवली व ती स्वतःच आपल्या हाताने गळ्यात घालून घेतली व ते वारकरी झाले.श्रीमहाराजांच्या चरित्रातील एक विशेष प्रसंग इथे मुद्दाम सांगतो ज्यातून त्यांच्या अधिकाराची जाणिव आपल्याला होते. एकदा महाराज नाशिकला रामकुंडावर गोदावरी गंगा स्नानासाठी गेले होते. ते गोदावरी मध्ये उभे होते व तिर्थोपाध्याय तिरावरुन संकल्प सांगू लागले , "पापोहं पापकर्माहं पापात्मा पापसंभव: ।।"  बुवा एकदम त्याच्यावर खेकसले, "मी पापीही नाही,पापकर्मीही नाही । दुसरे काय म्हणायचे असेल ते म्हणा , एवढा हा संकल्प उच्चारला, तर खबरदार !" या एका वाक्यातुन महाराजांनी त्यांच्या अवतारीत्वालाच जणू प्रगट केले आहे.महाराज निःशंक अवतारीच ,"आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी" या तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे महाराज ही वैकुंठातुन भगवत कार्याकरीताच जन्माला आले होते यात तिळमात्र शंका नाही आणि त्यांनी हे वेळोवेळी विविध गोष्टीतून दाखवून ही दिले आहे. श्रीमहाराजांनी कधीही कुठलेही विशेष साधन केल्याचे कुणीही बघितले नाही.उपरोक्त वाक्यातून एक गोष्ट लक्षात येतेच की सर्व साधन त्यांनी आधीच्या जन्मातच पूर्ण केले होते.फक्त ते आपले नित्य कर्म असलेली संध्यावंदन कधीही चुकवीत नसत.तसेच आपल्या खोलीतील आरशापुढे ते तासंतास आपल्या दिव्य आनंदात बसून राहत.यामागचे कारण त्यांनी कुणालाही सांगितले नाही व त्यांना विचारायचे कुणाला धाडसही झाले नाही.

आपल्या शिष्य पंचायत समवेत श्रीमहाराज

                           राहुरी या गावाजवळील एका योग्याने  श्रीमहाराजांना काही योगसाधनेतील आसन व साधना शिकवली.महाराज ती साधना करु लागले पण त्याचा विपरीत परिणाम होऊन त्यांच्या नाडीचा एक ठोका कमी पडू लागला.त्यानंतर श्री जोग महाराज आळंदी येथे येऊन राहिले होते.त्यावेळी महाराजांंनी अजान बागेत बसून ज्ञानेश्वरीचे अखंड पारायण अनुष्ठान सुरु केले.लोकांमध्ये महाराज सुप्रसिद्ध होतेच आणि आता त्यांच्या भोवती लोकांचा गलबला सतत वाढत चालला होता म्हणून महाराजांनी आपला मुक्काम श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे हलवला.पुढे जोग महाराजांना अजान बागेत अनुष्ठानादरम्यान करुणाब्रह्म श्री ज्ञानेश्वर माउलींचा दृष्टांत व दर्शना चा परम पुण्यलाभ झाला.भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी महाराजांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना कीर्तन, प्रवचन करण्याची आज्ञा केली आणि त्यांना पुढील कार्यासाठी मार्गदर्शन केले.त्यानंतरच महाराजांनी १९१७ साली 'वारकरी शिक्षण संस्थेच्या' स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली. तुकाराम गाथेचे टिपा, अन्वयार्थ सहीत,विषयवार वर्गीकरण असलेले महदकठीण काम महाराजांनी केले.हा सार्थ गाथा १९०५ साली त्रंबक हरी आवटे यांनी प्रकाशित केला.याआधी कुणीही हे काम केले नव्हते.प्रथमच सार्थ,विषयावार वर्गीकरण असलेला गाथा प्रसिद्ध झाला होता.महाराज आद्य साखरे महाराज प.पू.श्री नाना महाराज साखरे यांच्या तत्वज्ञान व ज्ञानेश्वरीचे प्रवचन ऐकायला ही जात असत. माउलींच्या दृष्टांतानंतर महाराजांच्या कार्यास खर्या अर्थाने वेग आला.श्रीगुरु जोग महाराजांनी गावोगावी फिरून संत वाङमयाचा कीर्तन, प्रवचनाद्वारे सर्वदूर प्रचार - प्रसार केला.आपल्या अमोघ वाणीने महाराजांनी तरुणांना संत साहित्याच्या अभ्यासाला उद्युक्त केले.यातुनच 'वारकरी शिक्षण संस्थेची" स्थापना झाली.त्याकाळात महाराजांनी या संस्थेच्या उभारण्यासाठी २५ हजार रुपयांची रोख रक्कम दिली होती.इ.स १९१७ सालीचे पंचवीस हजार म्हणजे आजचे किती रुपये होतील याचा अंदाज जरी केला तरी आश्चर्याने बुद्धी स्तिमीत झाल्याशिवाय राहत नाही.श्रीमहाराज हे नैष्ठीक ब्रह्मचारी होते.वैराग्यशिल असलेल्या श्रीमहाराजांचे संपूर्ण जिवन हे वारकरी संप्रदायाच्या वर्धिष्णू कार्यासाठीच समर्पित होते असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. किर्तन-प्रवचना साठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला.जोग महाराजांपूर्वी वारकरी कीर्तनाची धाटनी अत्यंत साधी व सरळ होती.श्रीजोग महाराजांनी तिला पंडिती पद्धतीच्या पूर्वपक्ष व उत्तरपक्षाची जोड दिली.

अत्यंत विनयशिलता,नियमशील , विशुद्ध असे आचरण,सत्यप्रियता आणि अत्यंत देशभक्ती या गुणांनी मंडीत असलेल्या श्रीमहाराजांचा समाजात अतिशय मान व प्रतिष्ठा होती. थोर देशभक्त श्री लोकमान्य टिळक हे महाराजांचे घनिष्ठ मित्र होते,टिळकांना महाराजांनी वेळोवेळी देशकार्यात मदत केली होती.ज्ञानेश्वरी,भागवत,गाथा या सर्व संत वाङमयावर महाराजांचे एवढे प्रखर चिंतन घडले होते की त्याकाळातील ह.भ.प पांगारकरांसारखे मोठ मोठे विद्वानही महाराजांच्या प्रवचनाला आवर्जून उपस्थित असत. श्रीमहाराजांनी आपल्यासारखेच वैराग्यशाली ,अत्यंत सत्शिल शिष्य आपल्या कार्यासाठी निवडले.त्यात प्रामुख्याने वै.ह.भ.प बंकटस्वामी महाराज, वै.ह.भ.प.लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, वै.ह.भ.प.मारोतीबुवा गुरव ,वै.ह.भ.प सोनोपंत दांडेकर तथा मामा साहेब दांडेकर हे प्रमुख होत.हे जणु श्रीमहाराजांचे शिष्य पंचायतनच.या सर्व शिष्य मंडळींच्या चरित्राचे जरी अवलोकन केले तरी महाराजांच्या अलौकिक चरित्राची कल्पना आल्याशिवाय राहणार नाही.श्रीमहाराजांना जातीभेदाचा आत्यंतिक टिटकारा होता.भगवान श्रीज्ञानेश्वर माउली ,तुकोबाराय ,सर्व संताकडून प्राप्त बोधाची श्रीमहाराजांनी मुक्त हस्ताने उधळन केली. श्रीमहाराजांनी संत वाङमयाचे अनेक ग्रंथ सार्थ टिपा प्रस्तावने सहीत प्रकाशित केले त्यात प्रामुख्याने सार्थ अमृतानुभव, निळोबाराय , ज्ञानेश्वर माउलींचा गाथा,सार्थ हरीपाठ,चांगदेव पासष्टी,एकनाथी भागवतादी सहा ग्रंथ,वेदान्त विचार ,महिपतीकृत ज्ञानेश्वरीतील सार्थ वेचे हे प्रमुख साहित्य आहे.

                      श्री जोग महाराजांना बुवावाजीची अतिशय चिड होती.असा कोणी ढोंगी महाराजांना दिसला की आपल्या हातातील काठी घेऊन त्याच्यावर ते तुटुनच पडत असत.एकदा पुण्यात असाच एक विदर्भातील बुवाबाजी करणारा तथाकथित साधु आला.त्याने अंतर्दुष्टीने एका भल्या माणसाची विधवा ही आपली गेल्या जन्मीची पत्नीच होती असे ओळखले होते म्हणे ! श्री जोग महाराजांना हे कळले तेव्हा महाराज उठले आणि आपला दण्ड घेऊन त्या साधूच्या मुक्कामी जाऊन उभे राहीले.त्यांनी त्या तथाकथित साधुला असे काही खडसावले, की लगेच त्याने आपला गाशा गुंडाळला आणि तो जे काही पळाला की  बुवा असे पर्यंत पुन्हा पुण्यात पाय ठेवण्याची त्याची हिम्मत झाली नाही. तसेच हरी किर्तनासाठी पैसे घेणे याची महाराजांना अतिशय चिड व विरोध होता. गीता- भागवत हे काही विकण्याचे साधन नाही असे महाराजांचे नित्य सांगणे होते. हरीकीर्तन करुन कुणी पैसे घेऊ लागला की ते त्याच्यावर संतापत."तर मग पोट भरण्यासाठी काय करु ?" असा जर कुणी प्रश्न केला तर ते या प्रश्नावर लगेच उत्तर देत की, "वाटेल ते कर! हमाली केली तरी चालेल पण हरीनाम असे विक्रिस काढू नकोस." महाराजांचा नेहमी आग्रह असे की ,भिक मागणारा आशाबद्ध वक्ता यथार्थ मार्गदर्शन करु शकत नाही! इतके स्पष्ट मत महाराजांचे होते आणि महाराज कुणाचीही भिड न ठेवता ते मत मांडत असत.

आजच्या काळातील एकंदरीत परिस्थिती बघितली तर महाराजांनी काय केले असते याचा विचारही करवत नाही.असो तो एक स्वतंत्र चिंतनीय विषय आहे या लेखात त्याचे प्रयोजन नाही.

            श्री जोग महाराजांचे भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींवर अनन्य साधारण प्रेम होते.याचे एक विशेष उदाहरण हे स्वतः प.पू.मामासाहेब दांडेकरांनी सांगितले आहे.एक दिवस श्रीमहाराजांनी सोनु मामांना आपल्याला आलेल्या पत्राचे उत्तर लिहायला सांगितले .नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पत्र लिहून झाल्यावर मामांनी पत्राच्या शेवटी 'आपला' असे लिहीले व श्रीमहाराजांपुढे सही साठी कागद केला.तेव्हा महाराज म्हणाले हे 'आपला' आधी खोड .आम्ही फक्त आणि फक्त ज्ञानदेवांचे आणि देवांचे आहोत ! हा प्रसंग छोटा जरी दिसत असला तरी यातुन महाराजांचे माउलींवरील अत्यांतीक प्रेम,अनन्य निष्ठेचे दर्शन झाल्याशिवाय रहात नाही.आपला देह आळंदी येथेच ठेवायचा हा महाराजांचा निर्धारच होता.श्रीमहाराजांचा कीर्तन प्रवचनासाठीचा प्रवास,दगदग हा अगदी अविरतपणे सुरू होता. त्यांना भगेंद्राचे दुखने झालेले असतांनाही त्यांची पंढरपुरची वारी आणि तिथली किर्तने चुकली नाहीत. त्या काळी बार्शी लाईट रेल्वेचा दगदगीचा प्रवास, पन त्यालाही ते जुमानीत नसत . महाराजांना शेवटचे दुखने झाले कफक्षयाचे . ह्या तापाने त्यांना फारच छळले, पन आजारांतही ते आत्मविश्वासाने म्हणत "आम्ही आळंदीशिवाय दुसरीकडे मरणारच नाही". श्री महाराजांचे ज्ञानेश्वरमाउलींवर अनन्यसाधारण- किंबहुना देवापेक्षांही अधिक प्रेम ! त्यामुळे आपला देह आळंदीस ज्ञानेश्वरांजवळ पडावा, अशी त्यांची इच्छा असणे स्वाभाविक होते.तसे त्यांनी ठरवून केलेही ही काय सामान्य बाबा नाही.

           १९२० सालची माघ शुद्ध दशमी जवळ आली. महाराज आळंदीला जायच्या गोष्टी बोलु लागले. पोर्णिमा उजाडली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पुणे सोडण्याचा महाराजांचा निश्चय जाहीर झाला. घोडा गाडीतुन त्यांना आळंदीला नेण्यांत आले. त्यावेळी मामासाहेब हे स्वतः रस्त्यावर चालत दगड धोंडे दूर करत होते.श्रीमहाराज मध्ये मध्ये विचारत होते की "आळंदी आली का रे?"

आळंदीला आल्यावर महाराज घासवाले धर्मशाळेत उतरले. मामासाहेबांना त्यांनी माउलींचे समाधी तिर्थ आणि इंद्रायणीचे तिर्थ आणण्यास सांगितले. सोनु मामांनी इंद्रायणीचे व ज्ञानेश्वर महाराजांचे तीर्थ त्यांना आणुन दिले तोपर्यंत साडेआठ वाजुन गेले. तिर्थ प्राशन केल्यावर मग महाराजांच्या आज्ञेवरून त्यांना बसविण्यात आल्यावर ते उत्तरेकडे तोंड करुन बसले - मामांना हाक मारली आणि डोळे मिटून म्हणाले, 'जातो-- ' आणि  त्यांनी देह ठेवला. माउलींच्या चिंतनात त्यांनी माउलींच्या चरणीच आपला देह विलीन केला.

श्री क्षेत्र  आळंदीत - त्यांच्या प्रिय उपास्यदैवताशेजारी, गुरुवारी, उत्तरायणांत, माघ वद्य प्रतिपदा म्हणजे गुरूप्रतिपदा, सकाळी नऊ वाजतां,गीतेत योग्यांच्या मरणाला जी शुभ वेळ सांगितली आहे, तीच घटिका नेमकी त्यांनी साधली. ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरीत सांगितल्याप्रमाणेच त्यांनी देह ठेवला‌.

"का झांकलीये घटीचा दिवा । नेणिजे काय जाहला केव्हां । या रिती तो पांडवा । देह ठेवी ।। ज्ञा ८-९८"

      श्रीमहाराजांच्या पुण्यतिथी च्या परमपावन दिनी महाराजांच्या श्रीचरणी प्रार्थना करतो की त्यांनी आम्हाला माउलींच्या श्रीचरणांचे  अखंंड स्मरण करण्याचे, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण करण्याचे सामर्थ्य द्यावे,नित्य हरीनाम कीर्तनात या जिवनाचा प्रत्येक क्षण व्यतित होऊन या जिवनाचे सोने होण्याचे वरदान द्यावे.मोडक्या तोडक्या शब्दात श्रीगुरु जोग महाराजांनी च बांधून घेतलेली ही शब्द सुमनांची महापूजा करुणा ब्रह्म माउलींच्या आणि श्री महाराजांच्या परम पावन चरणी अर्पण करतो.

✒️✍️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️


स्वानंदसुखनिवासी समर्थ सद्गुरु श्री विष्णुबुवा जोग महाराज की जय 🙏🚩🌸🌺

#राम_कृष्ण_हरी🙏🌸🌺

#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🌺

 

Sunday, February 13, 2022

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची १७७ वी जयंती.


 नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्तीं!!! 🙏🌺🌸🚩

              माघ शुद्ध द्वादशी प्रत्यक्ष मारोतीरायांचे अवतार,नामावतार सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची १७७ वी जयंती. श्री महाराजांचे नुसते स्मरण केले तरी सर्व जिवनपट हा डोळ्यापुढे तरळायला लागतो.महाराजांचे बालपण ,गुरुभेटीस्तव केलेला गृहत्याग, विविध अवतारी संतांच्या भेटी, सद्गुरु माउली तुकामाईंची भेट,परिक्षा , त्यानंतर तुकामाईंची पूर्ण कृपा ,तप,‌ गोंदवल्यात परतने ,तेथील विविध लिला,मातृ भेट,रामरायांचे आगमन , गृहस्थाश्रम,शिष्य परिवार, अन्न दान ,गोसेवा ,धाकट्या राममंदिराची स्थापना , महाराजांची दिव्य गुरुपरंपरा,अनन्य अशा ब्रह्मानंद बुवांची गुरुभक्ती,रामानंद बुवांचे अलौकिक चरित्र , प्रल्हाद महाराजांचे वैराग्य, तात्यासाहेब ते बेलसरे बाबांचे अतिशय मायाळू शब्द सर्व कसं एका परीकथे सारखं आश्चर्यकारक आहे.ही देव माणसं आपल्यात कधीतरी होऊन गेली, आपल्यासारखेच मानव देहात राहून गेली आणि हो तेही अगदी अलिकडच्या काळात यावर विश्वास बसत नाही."नामा शिवाय तरणोपाय नाहीच, कलियुगात नामस्मरण हीच कामधेनू आहे " या शास्त्रवचनाला सिद्ध करण्यासाठीच जणू मारोतीराय श्रीमहाराजांच्या रुपात अवतरले होते.

             श्रीमहाराजांचे चरित्र इतके विलक्षण आहे की यातला कुठला भाग मांडावा आणि काय वगळावे यांच्या विचारानेच मी पुरता गोंधळून गेलो.कारण ज्याला आपण ७/८ वर्षाचे बालपण म्हणतो त्या वयात श्रीमहाराजांनी प्रथम गृहत्याग केला,नंतर ९ व्या वर्षी परत त्यांनी गृहत्याग केल्याची हकिकत वाचली‌ तरी बुद्धी स्तिमीत झाल्या शिवाय राहणार नाही.गुरुभेटीस्तव इतक्या कमी वयात बाळ गणपतींनी संपूर्ण भारत पालथा घातला. कृष्णा-वारणा संगमापासून सुरु झालेला प्रवास पुढे मिरज येथील अण्णाबुवा, सटाणा येथील देव-मामलेदार,तेथून भगवान श्री अक्कलकोट स्वामी महाराज यांच्याकडे ,तेथून हुमनाबादला माणिकप्रभु महाराजांकडे, या सर्वांनी आशिर्वाद दिल्यावर महाराज अबू पर्वतावर काही काळ राहले.तिथे महाराज योग शिकले व पुढे काशीस आले.तिथे तैलंग स्वामींचा आशिर्वाद भेट घेऊन अयोध्या आणि मग नैमिषारण्यात आले.नैमिषारण्यात काही काळ‌ व्यतित केल्यावर महाराज भगवान रामकृष्ण परमहंस यांच्या भेटीसाठी कलकत्ता येथे आले.श्रीठाकुरांची भेट झाल्यावर महाराज दक्षिणेकडे वळले .तिथे त्यांना तुकामाईंकडे जाण्याचा आदेश झाला. श्रीमहाराजांचे वय या प्रवासात अवघे ११/१२ वर्षाचे होते.आपण नकाशा पुढे ठेऊन फक्त एकदा दृष्टीक्षेप जरी टाकला तरी लहानग्या गणपती बुवांनी गुरुभेटीस्तव केलेल्या या खडतर प्रवासाची प्रखरता आपल्याला लक्षात येईल. 

पुढे तुकामाईंची येहेळगावी झालेली भेट ,त्यांनी घेतलेली प्रखर परिक्षा आणि श्रीमहाराजांची विलक्षण गुरुसेवा हा तर श्रीमहाराजांच्या चरित्रातील‌ मेरुमणीच आहे.तुकामाईंनी घेतलेली परिक्षा इतकी विलक्षण आहे की वाचुनच आपला थरकाप उडतो.तुकामाईंनी वर्ष भर परिक्षा घेतल्यावर श्रीमहाराजांना अनुग्रह दिला .अनुग्रह देतांनी तुकामाईंनी श्रीमहाराजांना जो उपदेश केला तो पु.श्रीबाबा बेलसरे यांनी ज्या शब्दात लिहीलाय तो जसाच्या तसा पुढे देतो आहे. अनुग्रह देऊन तुकामाईंनी श्रीमहाराजांना सांगितले की, 

"प्रापंचिक लोकांना-विशेषत: मध्यम स्थितीतील लोकांना -आपल्या प्रपंचामध्येच परमार्थ कसा करावा हे शिकव.राममंदिराची स्थापना करुन राम नामाचा प्रचार कर.माझे महत्व वाढविण्यापेक्षा समर्थांचे महत्व वाढव.लोकांमध्ये भजनाचे प्रेम उत्पन्न होईल असा मार्ग दाखव.जे खरे दीन असतील त्यांची सेवा कर,आणि सर्व ठिकाणी प्रेम वाढेल असा उपाय कर." इतका उपदेश केल्यावर दोघेही परत घरी परतले.श्रीमहाराज आता गुरुकृपेने न्हाऊन निघाले होते.श्रीसद्गुरुंच्या कृपा अनुग्रहाने आता ते स्वत: सद्गुरु स्वरुप झाले होते. श्रीमहाराजांनी आपल्या सद्गुरुंचा हा उपदेश आपल्या संपूर्ण जिवन काळात तंतोतंत पाळला हे आपल्याला चरित्रातून लक्षात येईलच.पुढे अनुग्रहानंतर महाराजांनी सद्गुरुंच्या आज्ञेने तप करण्यासाठी हिमालयात प्रयाण केले.तिथे महाराजांनी प्रखर तप आचरले.तेथुन काही काळाने महाराज नैमिषारण्यात आले. श्रीमहाराज सलग दोन वर्ष नैमिषारण्यातील गुहेत साधनामग्न राहिले.इथेच त्यांची नानासाहेब पेशवे यांच्याशी भेट झाली.श्रीमहाराजांचे नैमिषारण्य हे स्थळ विशेष प्रिय होते. जिवनातील उत्तर काळात गोंदवले सोडून महाराज नैमिषारण्यातच जायला निघाले होते.हा प्रसंग सर्वश्रुत आहेच त्यावेळी रामराय,सितामाई आणि लक्ष्मणजींचे विग्रह रडल्यामुळे त्यांनी ते रहित केले.

               श्रीमहाराजांचे गोंदवल्यात परतने आणि पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश,प्रथम पत्नीचा मृत्यू पुन्हा दुसले लग्न आणि पुन्हा तुकामाईंचे दर्शन हा सगळा कथाभाग चरित्रात आला आहेच‌. श्रीमहाराजांच्या चरित्रातील माझा सर्वात आवडता भाग म्हणजे श्रीमहाराजांची व  ब्रह्मानंद बुवांची भेट.ब्रह्मानंदबुवा हे वेदमूर्ती ,शास्त्राभ्यासी आणि विद्वान म्हणून सर्वत्र प्रसिद्ध होते.त्यांनी या सर्वांचा केलेला त्याग व त्यांची महाराजांच्या चरणी असलेली अनन्य भक्ती ही एकमेवाद्वितीय आहे.तो भाग अतिशय चिंतनीय आणि आचरणीय आहे.ब्रह्मानंदबुवा हे श्रीमहाराजांपुढे कधीही अवाक्षर सुद्धा काढत नसत.आजही आपण श्रीमहाराजां समवेत असलेले ब्रह्मानंद बुवांचे छायाचित्र पाहिले तर ते प्रत्येक छायाचित्रात हात जोडून,खाली मान घालूनच उभे असलेले आपल्याला दिसतील.खरंच प्रत्येक गुरुभक्तासाठी किती चिंतनीय असा हा दृष्टांत आहे.श्रीमहाराजांचा अफाट असा लोकसंग्रह ,अचाट असे कथा प्रसंग आहेत,ज्यात त्यांच्या ठिकाणी झालेले मारोतीरायांचे दर्शन,थोड्याशा अन्नात हजारो लोकांना अन्नदान ,गोसेवा, मंदिर उभारणी व रामरायांचे आगमन अशा एक नाही तर हजारो लिलांचे भाग आहेत.प्रत्येक साधकाने तो भाग प.पू.बाबा बेलसरे यांनी लिहीलेल्या चरित्रात स्वतः वाचावा आणि त्याचा आनंद जरुर घ्यावा. एका लेखातून हे सर्व प्रसंग मांडणे केवळ अशक्य आहे.श्री महाराजांच्या चरित्रातुन त्यांनी दिलेली शिकवणीचे वाचन,मनन आणि चिंतन प्रत्येक व्यक्तीने आवर्जून केलेच पाहिजे कारण सर्व चरित्राचा ,लिलांचा तो गाभा आहे.

श्रीमहाराजांची शिकवण त्यांच्याच शब्दांत जशीच्या तशी  देतो आहे :-                 

              रामरायाला अनन्य शरण जाऊन अखंड त्याचे नाम घ्यावे.प्रत्येक माणूस या ना त्या मार्गाने समाधान शोधत असतो. पण सुख दु:खाचे हेलकावे देणे हा प्रपंचाचा मूळ स्वभाव असल्याने त्याच्या आहारी जाणाऱ्या माणसाला प्रापंचिक यश मिळून सुद्धा जीवनाच्या अखेर पर्यंत समाधान मिळत नाही. नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्यजन्माचे ध्येय नाही. जनावरे देखील आपापला प्रपंच करतात. आपल्या खऱ्या स्वरूपाचा म्हणजे भगवंताचा विसर पडणे हे सर्व असमाधानाचे मूळ आहे. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली, तरच प्रपंचातील कष्टांचे सार्थक होते. असे श्रीमहाराजांचे अनुभवसिद्ध मत आहे.


अंत:करण शुद्ध होऊन पूर्ण समाधानाचा व खऱ्या आनंदाचा साक्षात्कार होण्यासाठी संताची संगत व भगवंताचे नाम हे दोनच उपाय प्रापंचिकाच्या पचनी पडतात. त्यातदेखील संताची संगत मिळणे व टिकणे कठीण असते. परंतु नामस्मरणाला कसलीही अट नाही, कसलेही बंधन नाही, त्यातच सत्संगती लाभते व भगवंताचे चिंतन आपोआप घडते. चिंतनातून अनुसंधान उदय पावते आणि अनुसंधान पक्के झाले की स्वत:च्या हृदयात भगवंताचे दर्शन घडते. हे श्रीमहाराजांच्या उपदेशाचे सार आहे.


प्रपंचामध्ये का होईना, पण निष्कपट प्रेम करावयास शिकणे हे भगवंतावर प्रेम करावयास शिकण्याची पहिली पायरी आहे. घरच्या माणसांना दीनवाणे व कष्टी कधी ठेवू नये, त्यांची आबाळ कधी करू नये, असे सांगून श्रीमहाराज म्हणत की ज्या प्रपंचात राम नाही त्या प्रपंचात आराम होणार नाही! नवराबायकोमध्ये, आईबाप व मुलांच्यामध्ये, भाऊबहिणींच्यामध्ये निष्कपट प्रेम असले तर त्यांना त्याचे विशेष कौतुक वाटायचे. सासू-सून प्रेमाने राहिल्या तर ते दोघींचीही स्तुती करीत. ’आपला परमार्थ हा प्रपंचात मिसळला पाहिजे. प्रपंच करीत असताना कर्तव्याची जागृती राखून त्यामध्ये भगवंताची अखंड स्मृती ठेवली तर कोणालाही समाधानाची प्राप्ति होऊ शकते.’ असे महाराजांचे सांगणे आहे.

श्रीमहाराज सांगत,’ बाळ, भगवंताने प्रपंचामध्ये ज्या परिस्थितीत आपल्याला ठेवले आहे, तिच्यामध्ये समाधान मानावे आणि त्याच्या नामाला कधी विसरू नये. जो नाम घेईल त्याच्यामागे राम उभा आहे, नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो. एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका.’

       अशा नामावतार श्रीमहाराजांनीच आपल्याला नामाची कास धरायची बुद्धी द्यावी, प्रपंच करतांना त्या रामराया चे अखंड स्मरण राहण्याची बुद्धी द्यावी आणि नामावर, सद्गुरु चरणांवर आपल्या सर्वांची निष्ठा उत्तरोत्तर वाढत जाऊन ती दृढ व्हावी हीच अखंड प्रार्थना श्रीमहाराजांच्या सुकोमल चरणी करतो.

✍✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

  

 जयाचा जनी जन्म नामार्थ झाला !

   जयाने सदा वास नामात केला !

   जयाच्या मुखी सर्वदा नाम र्किर्ती !

   नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मुर्ती !!


            !! जय जय रघुवीर समर्थ !!

🙏🌸|| श्रीराम जय राम जय जय राम || 🌸🙏

Friday, February 11, 2022

माघ शुद्ध दशमी जगद्गुरु तुकोबारायांचा अनुग्रह प्राप्ती दिन

 #केला_अंगीकार_तुका_म्हणे 🙏🌸🌺

                       माघ शुद्ध दशमी तुकोबारायांच्या चरित्रातील अतिशय महत्वाचा आणि त्यांच्या अध्यात्मिक जिवनाला कलाटणी देणारा अत्यंतिक परम पावन दिन.याच तिथीला तुकोबारायांना सद्गुरुंनी अनुग्रह देऊन परमार्थात सनाथ केले, तुकोबाराय म्हणतात माझा अंगीकार सद्गुरुंनी केला.म्हणूनच या अनुग्रह प्राप्ती दिनाला संपूर्ण वारकरी संप्रदायात अतिशय महत्व आहे.आजच्याच तिथीला सद्गुरु श्रीबाबाजी महाराजांनी श्रीतुकोबांना गुरुकृपा पूर्वक सबिज नाम दिले.

सद्गुरुंनी "राम कृष्ण हरी" या महामंत्रात आपल्या गुरुकृपेचे बळ टाकून तेच तुकोबांना मस्तकावर हात ठेवून कृपा पूर्वक दिले.

श्रीतुकोबांची गुरुपरंपरा, श्री राघवचैतन्य - श्री केशवचैतन्य - श्री बाबाजी चैतन्य - श्री तुकारामचैतन्य अशी आहे. श्रीबाबाजींनी त्यांना 'रामकृष्णहरि' हा महामंत्र दिला होता. याच प्रसंगाचे वर्णन तुकोबारायांनी आपल्या अभंगातून शब्दबद्ध केले.


सत्य गुरुराये कृपा मज केली l

परि नाही घडली सेवा काही ll१ll


सांपडविले वाटे जाता गंगास्नाना l

मस्तकी तो जाणा ठेविला कर ll२ll


भोजना मागती तूप पावशेर l

पडिला विसर स्वप्नामाजी ll३ll


काय कळेल उपजला अंतराय l

म्हणोनि काय त्वरा झाली ll४ll


राघव चैतन्य केशव चैतन्य l

सांगितली खूण माळिकेची ll५ll


बाबाजी आपुले सांगितले नाम l

मंत्र दिला रामकृष्ण हरि ll६ll


माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार l

केला अंगीकार तुका म्हणे ll७ll


                         खरंतर अगदी क्वचितच ठिकाणी तुकोबारायांनी आपल्या सद्गुरुंच्या बद्दल वा श्रीगुरुंनी कृपा केली त्या स्वानुभवाचे वर्णन केलेले आहे.त्यातील हा अगदी महत्वाचा अभंग आहे. तसेच अजुन दोन अभंगांचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो तो म्हणजे,

"माझिये मनींचा जाणोनियां भाव । तो करी उपाव गुरुराजा ॥" आणि " लावूनियां हातें कुरवाळिला माथा । सांगितलें चिंता न करावी ॥"  हे दोन्ही अभंग मुख्य आहेत. तुकोबारायांनी आपल्यावर झालेल्या गुरुकृपेचे वर्णन या अभंगातून तंतोतंत मांडले आहे. वरील अभंगांत तुकोबा सांगतात की , सद्गुरुरायांनी स्वप्नात येऊन कसलीही सेवा न घेता माझ्यावर अनपेक्षितपणे कृपा अनुग्रह केला. स्वप्नातच मस्तकावर हात ठेऊन माझ्यावर कृपा करुणा पूर्वक अनुग्रह केला. तुकोबाराय म्हणतात माझ्या मनाचा भाव ,माझी गुरुप्राप्तीसाठीची तळमळ जाणून सद्गुरुरायांनी अंतिम कृपा करुणेचा उपाय केला.मला आपल्या मुखातून कृपा सिद्ध असे नामबिज दिले. याच अभंगात श्रीतुकोबारायांनी आपली गुरुपरंपरा ही सांगितली आहे राघवचैतन्या पासुन सुरु झालेली ही परंपरा पुढे केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य आणि हीच परंपरा पुढे तुकोबाचैतन्याला येऊन मिळाली.उपरोक्त अभंगात तुकोबांनी तिथी वार यांचाही उल्लेख केला आहे. 

                    या सर्व अभंगातून एक फार महत्वाची बाब सर्वांसाठी चिंतनीय आहे ती म्हणजे "आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी" म्हणणारे तुकोबा हे अवतारीच होते यात तिळमात्र शंका नाही ,तुकोबा जन्मसिद्ध महात्मे होतेच त्यामुळे खरंतर त्यांना वेगळ्या कृपेची आवश्यकता नाही असा विचार पुष्कळ लोकांच्या मनात येतोच  तरीही तुकोबांवर गुरुकृपा झाली आणि त्याची कृतार्थता तुकोबा आपल्या अभंगातून मुक्तकंठाने करतात हे विशेष. अगदी भगवान रामराय असोत,कृष्णचंद्रप्रभु असोत , दत्तप्रभु असोत प्रत्येकाने गुरुपरंपरेचाच अवलंबन केला आणि याच परंपरेतील एक भाग हे तुकोबाराय आहेत . तुकोबारायांच्या चरित्राचा विचार केला तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येईल की तुकोबांच्या ठिकाणी प्रखर वैराग्य उत्पन्न झाल्यावर त्यांनी भामचंद्र ,भंडारा आणि घोराडेश्वर डोंगरावर अतिशय कठोर अशी तपश्चर्या केली आहे.अगदी तहान ,भुक हरपून त्यांनी अखंड भगवन नामाचे चिंतन केले आहे आणि त्यानंतर सद्गुरुंनी त्यांना स्वतः येऊन अनुग्रह देऊन त्यांचा अंगीकार केला. तुकोबाराय म्हणतात की , मला सद्गुरुंनी माझ्या आवडीचाच "राम कृष्ण हरी" हा मंत्र दिला व सांगितले आता चिंता करू नकोस, हेच सद्गुरुंनी केलेल्या अंगीकाराचे गमक. गुरुकृपेनंतर झालेल्या आत्मानुभुतीचे वर्णन तुकोबारायांनी आपल्या गाथेत ठिकठिकाणी केले आहेच .अतिशय चिंतनीय असे हे स्वानुभवाचे अभंग आहेत. या सर्वातुन एक महत्वाची गोष्ट ध्यानी येते ती म्हणजे अगदी भगवान आदि शंकराचार्यांपासुन ते माउली ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत, सद्गुरु नामदेवरायां पासून ते जगद्गुरु श्रीतुकोबारायांपर्यंत प्रत्येक महापुरुषांला सद्गुरुंच्या कृपेची आवश्यकता होतीच आणि त्या गुरुकृपेचे वर्णन त्यांनी अनेक ठिकाणी मुक्त कंठाने केले आहे. असो या परम पावन दिनी श्रीतुकोबारायांचे स्मरण करून आपल्या सर्वांवर गुरुकृपेचा असाच वर्षाव होवो‌ हीच प्रार्थना श्रीचरणी करुयात.

     ✒️✍️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️

#राम_कृष्ण_हरी🙏🌸🌺

#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🌺

Wednesday, February 9, 2022

तुका आकाशा एवढा!!!

#वसंत_पंचमी🙏🌸🌺

            माघ शुद्ध पंचमी ही तिथी ज्याप्रमाणे भगवती श्रीशरदा मातेची प्रगट तिथी म्हणुन ओळखली जाते ,भारतात साजरी केली जाते त्याप्रमाणे ही तिथी आपल्या महाराष्ट्रात आणि सबंध जगात एका महान संत, तत्ववेत्ता, चिंतक , मार्गदर्शक असलेल्या जगद्गुरु श्रीतुकोबारायांची ही जन्मतिथी बद्दल प्रसिद्ध आहे.आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेल्या सकलसंतांचे चुडामणी असलेले श्रीतुकोबाराय हे लोकविलक्षण विभूती आहेत.श्रीतुकोबारायांच्या चरित्राचे स्मरण जरी केले तरी डोळ्यापुढे उभा राहतो त्यांचा विलक्षण जिवन प्रवास,अफाट आणि अचाट अभंग गाथा, तुकोबारायांनी  केलेले अपार कष्ट ,त्याग,जिवनातील दु:खद घटनांकडे तटस्थपणे सामोरे जाऊन अंगी प्रखर वैराग्य बाणवून अखंड भगवत स्मरणात कंठलेला काळ.या सर्व घटना बघितला तरी बुद्धी ,वाचा कुंठीत होते.

 "आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी " 

या सारख्या अभंगातून आपले अवतारित्व सांगणार्या तुकोबारायांनी भगवान श्री रामराया सारखे मानवी जिवन जगून दाखविले व त्यातून ब्रह्मस्थितीचा अनुभव घेऊन तो इतरांपर्यंत पोचविला ही ,तो अनुभव इतरांना ही करवीला. महाराजांच्या अलौकिक सामर्थ्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या द्रष्ट्या ,लोकराजालाही आपल्याकडे आकृष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबारायांनी मार्गदर्शन केले ,पुढील वाटचालीची दिशा दाखवली हे सर्वश्रुत आहेच. तुकोबारायांनी समाजाला दिशा तर दाखविलीच पण वेळेप्रसंगी समाजव्यवस्थेच्या विरोधात जाऊन 

"वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वाहावा भार माथा ।।" 

   असे पडखर बोल समाजाला ठणकावून सांगितले व दंभ,कर्मठता आणि पाखंडावर तिखट शब्दांत वेळोवेळी ताशेरे ओढले. श्रीतुकोबारायांनी आपल्या गाथेत लोकांना भक्तीचे महत्व तर प्रतिपादित केले आहेच पण त्याचबरोबर विलक्षण अशी लोकजागृती ही केली आहे. समाज हा बुरसटलेल्या ,भोंगळ अशा अंध भक्ती,दंभ,कर्मठता आणि पाखंडाच्या काळोखाखाली दबलेला होता त्या जळमटाला तुकोबारायांनी प्रकर्षाने दूर करण्याचे महान कार्य केले.याचे एक महत्वाचे कारण म्हणजे प्रत्यक्ष तुकोबारायांना या सर्व दिव्यातुन जावे लागलं होते.याची झळ तुकोबारायांना बसलीच होती. श्रीतुकोबारायांच्या कुळात त्यांच्या जन्माच्या आठ पिढ्या अगोदर पासून पंढरीची वारी होती हे सर्वश्रुत आहे.त्यांचे पूर्वज श्रीविश्वंभर बुवा यांच्या साठी प्रत्यक्ष भगवान पंढरीनाथ हे देहूत अवतरले होते.आज ही आपण जे मुळ स्वयंभू पांडुरंगाचे मंदिर देहूत बघतो,ज्या विठुरायाच्या सगुण विग्रहाचे दर्शन देऊळवाड्यात घेतो ते तुकोबांकडे वंश परंपरेने आले होते.त्यांचे माता-पिता श्री बोल्होबा व मातोश्री कनकाई हे पंढरीचे निष्ठावान वारकरी होते.अतिशय सत्शिल असे हे दाम्पत्य होते.आपल्या घरी असलेली वंशपरंपरागत ,पंढरीची वारी,विठुरायाच्या भक्तीचे वर्णन करतांना तुकोबाराय लिहीतात, 

" माझ्या वडिलांची मिरासी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा ".

   तुकोबांकडे जशी भक्ती ची परंपरा होती तसेच वंशपरंपरागत देहूचे महाजनपद ही होते.हे घराणे मुळचे सुखवस्तु , ऐश्वर्यसंपन्न असे होते. वयाच्या तेराव्या वर्षा पर्यंत तुकोबांचा काळ आई-वडीलांच्या छत्रछायेखाली अतिशय सुखात गेला.वयाच्या बाराव्या वर्षी लग्न झाले.पहिल्या पत्नीला दम्याचा आजार असल्याचे कळल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांचे दुसरे‌ लग्न लावून दिले.एकंदरीत सर्वसामान्य मानवाप्रमाणे तुकोबांचे सुखवस्तु असे जिवन होते.पण खरं दिव्य तर यानंतर सुरु झाले.आपल्याला तुकोबांचा सर्व जिवनभाग माहिती आहेच पण संकटकाळी खचुन न जाता ते वैराग्यशिल अंतःकरणाने त्याला सामोरे गेले.नुसते सामोरे गेले नाहीत तर अखंड प्रभु स्मरणात तल्लिन राहुन आत्मसाक्षात्काराची पातळी ही त्यांनी गाठली.

                   खरंतर तुकोबांना आत्मसाक्षात्कार झाला असे म्हणने ही चूकच ठरेल कारण "आम्ही वैकुंठवासी" म्हणानारे तुकोबा मुळातच आपल्याला "साच भावे वर्ताया" म्हणून फक्त जगुन दाखवायला,जगाला परमार्थाची वाट दाखवायला देह धारण करते झाले होते यात शंका नाही. आपल्या सर्वांना त्यांनी दाखवून दिले की इतक्या विपरीत ,भयावह आणि दु:खद परिस्थितीतही भगवंताला शरण जाता येतंच आणि ब्रह्मपदी पोचता येतं ‌.या परिस्थितीचे वर्णन मला कसे हितकारक ठरले याचे वर्णन तुकोबांनी आपल्या अभंगातुन केले आहे  ते असे की , "बाप मेला न कळता । नव्हती संसाराची चिंता ।।" आणि एका अभंगात ते म्हणतात ,"बरे झाले निघाले दिवाळे । बरी या दुष्काळे पिडा केली ।।" दु:खाकडेही इतक्या तटस्थ आणि उपकारक दृष्टीने बघणे हे खरंच एकमेवाद्वितीयच उदाहरण आहे .

एक - दोन नाही तर पहिले वडिल मग आई ,त्यानंतर भावजई ,मग भावाचा गृहत्याग,पहिली पत्नी ,नंतर पोटचे लाडके मुल या सर्वांचा एकापाठी एक झालेला मृत्यू त्यातचं आलेला भयावह दुष्काळ अशी संकटांची साखळीच सुरु झाली. जिचा डोळे बंद करुन विचार जरी केला तरी अंगावर काटा उभा राहतो.पण या प्रसंगी तुकोबांनी काय केले याचे जर प्रामाणिकपणे चिंतन केले तर जिवनात नैराश्य,दुबळेपणा याला कधीही सामोरे जावेच लागणार नाही. या काळात तुकोबांनी केलेले साधन इतके अफाट होते की याचा आपण नुसता विचारही करणे दुरापास्त आहे .आजही भामचंद्र,भंडारा डोंगरावर नुसते उभे जरी राहले आणि देहू गावाचे अवलोकन केले तर लक्षात येईल की त्या तिनशे/चारशे वर्षाआधीच्या काळी तुकोबा या जंगल सदृश भागात इतक्या उंचावर पैदल जायचे कसे,तिथे कसल्याही साधनांशिवाय तेरा -चौदा दिवस,महिनोन महिने राहायचे कसे सर्व कसे दंतकथेचा भागच वाटेल.आजही गाडीने जरी रोज या डोंगरावर जायचे म्हटले तरी कंटाळा येईल तिथे तुकोबांनी केलेली साधना ही खरंच एक आश्चर्य आहे.  श्रीतुकोबाराय पंढरीच्या वारीला आळंदीहून माउलींच्या पादुका घेऊन जायचे असे एकदा वाचनात आले होते.नक्कीच माउलींच्या चरित्राचा ,ज्ञानदेवीचा ,एकनाथ महाराजांचा व नाथ भागवताचे वाचन ,मनन, चिंतन तुकोबारायांनी केले असणार यात शंका नाही. वारकरी संप्रदायाला पुन्हा नव्याने नवजिवन ,नवचेतना व नवदिशा देण्याचे काम तुकोबांनी केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

                         वारकरी संप्रदायाचे नियम व आचारधर्म पाळणारेच खरे वारकरी याचे प्रतिपादन करतांना सडेतोड शब्दात तुकोबा लिहीतात, 

"एकादशीस अन्नपान । जे नर करती भोजन । श्वानविष्ठेसमान । अधम जन ते एक ।।"  तसेच एका ठिकाणी म्हणतात "नेम नाही जया एकादशीव्रत । जाणावे ते प्रेत इहलोकी" इतक्या स्पष्ट शब्दात त्यांनी वारकरी संप्रदायाचे नियमच अधोरेखित केले आहे. 

         तुकोबारायांवर बाबाजी चैतन्य महाराज यांची झालेला कृपा,अनुग्रह ,त्यानंतर अखंड हरीनाम स्मरण ,कठोर साधना त्यातून वेदाचे सारं असलेल्या गाथेचे प्रगटीकरण, आविर्भाव ,त्यानंतर धर्ममार्तंडांनी दिलेला त्रास , संपूर्ण अभंग गाथा इंद्रायणीत बुडविण्याचा आदेश ,पण भगवती इंद्रायणी मातेने लाह्या सारखे तारलेले अभंग ,शरणं आलेले धर्ममार्तंड ,ब्रह्मस्वरुप झालेले तुकोबा आणि सर्वांना सांगून झालेले वैकुंठगमन हा सर्व प्रवास एका लेखातुन  मांडणे केवळ अशक्यप्राय आहे.कारण हा प्रत्येक प्रसंग आपल्या जिवनात वाट दाखवणारा कवडसा आहे.या प्रत्येक प्रसंगातुन काहीतरी शिकवन मिळतेच मिळते.या प्रत्येकाचे स्वतंत्र चिंतन घडले‌ तर त्याचा उलगडा होईल.

"विदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा । इतरांनी वहावा भार माथा ।।" असे निक्षून सांगणार्या तुकोबांनी आपल्या अभंगातून याच वेदांचे सार मांडले आहे.एक एक अभंग एका एका प्रबंधासारखा ,टिके सारखा गहन आहे.एका एका अभंगावर एक एक लेख होऊ शकतो इतके ते सटिक ,गर्भरुप आहे. हे सर्व अभंग श्रीतुकोबारायांचे स्वानुभव आहे.ज्यात भक्ती , ज्ञान, वैराग्य, प्रबोधन,योग,नाम ,दंभ,धर्म ,नियम अशा विविध काय तर जगातील सर्व विषयांचा उहापोह केलेला आहे. शब्द मर्यादा लक्षात घेता लेखनीला विराम देतो पण एक सांगू शकतो की तुकोबारायांचे समग्र चरित्र हे आपल्यासाठी एक पथदर्शक दिपक आहे. थोड्या शब्दात जेव्हा मांडायला घेतलं तर ते अशक्यप्राय वाटुन मी न लिहायचे ठरवले होते पण परत श्रीतुकोबांरायांच्या सर्व जिवनाचे एकदा स्मरण केले आणि मला जे काही प्रसंग स्वतःला दिशा दर्शक वाटतात,मला ज्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे,ज्याने मन ,बुद्धीला स्तिमित केले तेच इथे मांडले आहेत.

              श्रीतुकोबाराय हे आम्हाला नित्य वंदनीय, आमच्या जिवनाचे आधाररुप आहेत त्यामुळे ही शब्द सुमनांजली वाहने हे माझे कर्तव्यच ठरते.कित्येक लोक जिवनातील कठीन प्रसंगी भंडारा डोंगर,देहूच्या इंद्रायणी घाटावर जाऊन तुकोबांच्या चरित्राचे नुसते स्मरण करतात आणि नवसंजीवनी घेऊन घरी परत येतात.हा माझाच काय आपल्यातील कित्येकांचा स्वानुभव आहे. बहुतेक गोष्टी किंवा क्रम हा अस्ताव्यस्थ, असंबद्ध वाटेल पण त्याला माझा नाइलाज आहे.कारण तुकोबांच्या चरित्र सागरातील मोती वेचायला माझी झोळी असमर्थ आहे.या फाटक्या झोळीत आजवर जे वेचायला जमले तेच इथे शब्दात मांडायचा प्रयत्न केला.


तुकाराम तुकाराम |

नाम घेता कापे यम ||धृ||

धन्य तुकोबा समर्थ |

जेणे केला हा पुरुषार्थ ||१||

जळी दगडासहित वहया |

जैश्या तरियेल्या लाहया ||२||

म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा |

तुका विष्णू नोहे दुजा ||३||

          एवढ्या अभंगाचे स्मरण करून तुकोबांच्या चरणी ही भावसुमनांजली अर्पन करतो...

      ✒️✍️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी✍️✒️

#रामकृष्णहरी🙏🌸🌺

#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🌺


कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...