Friday, September 30, 2022

"प्रणम्या मातृदेवता" माळ ६:- शक्तीस्वरुपीनी भगवती श्रीआनंदमयी माॅं🙏🌸🌺🕉️


"प्रणम्या मातृदेवता" माळ ६ 🌸🌿🙏🏻

🙏 शक्तीस्वरुपीनी भगवती श्रीआनंदमयी मॉं 🙏🌺


आज अश्विन शुद्ध चतुर्थी म्हणजे नवरात्रातील ६ वा दिवस.आपल्या या "प्रणम्या मातृदेवता" लेखमालेतील चतुर्थ शब्दसुमनांची माळ.ही माळ आपण प्रेमस्वरूपा शक्तीस्वरुपीनी भगवती श्रीआनंदमयी मॉं यांच्या सुकोमल चरणी अर्पण करतो आहोत.हिंदूस्थान ही संतांची भूमी ,देवभूमी आहे.आसेतू हिमालय आजवर लाखो संत या परम पवित्र भूमीवर अवतार धारण करुन आले,जगाला दिशा देण्याचे अफाट कार्य त्यांनी केले,अनेक मुमुक्षू ,आर्त जिज्ञासू,शरणागतांचे इह पारलौकिक कल्याण केले व आपल्या निर्गुण रुपात आजही आपल्या लिला स्थानी ,समाधी स्थानी विराजमान झालेले आहेत.अशाच जगविख्यात संतांपैकी एक असलेल्या महान विभूती म्हणजे "श्री आनंदमयी माॅं " या एक आहेत. मॉं म्हणजे प्रत्यक्ष भगवती होत्या याची प्रचिती त्यांच्या चरित्र वाचनानंतर आपल्याला येतेच.मॉं चा अधिकार इतका विलक्षण होता की त्यांच्या भेटीस्तव ,दर्शनाला अनेक साधू ,संत,संन्यासी, योगी ,सिद्ध ,साधक यायचे.मॉं च्या नुसत्या दर्शनाने ही कित्येक भक्त आनंदाची अनुभूती घेत असत.अशा या दिव्य विभुतीचे आज आपण संक्षिप्त चरित्र लेखातून स्मरण करणार आहोत.

                            

आनंदमयी मॉं चा जन्म वैशाख कृष्ण तृतीया ३० एप्रिल १८९६ रोजी त्रिपुरा जिल्ह्यातील खेओडा या गावात झाला होता ( आज हे गाव बांगलादेश चा भाग आहे.) त्यांच्या पिताश्रींचे नाव श्री  विपिनबिहारी भट्टाचार्य आणि मातेचे नाव मोक्षदा असे होते.त्यांनी मॉंचे नाव "निर्मला" असे ठेवले होते.मॉं चा असाधारण असल्याची जाणिव  ही त्यांच्या बाल्यावस्थेतच लक्षात येतं.त्या अतिशय हसमुख अशा होत्या.मॉं या जन्मसिद्धच असल्याच्या खुणा त्यांनी बालपणी केलेल्या अनेक लिलांवरुन लक्षात येते. कुठेही बालपणी किर्तन सुरु असले की त्यांची भावसमाधी लागत असे व ही हकीकत स्वतः मॉंनी सांगितलेली आहे.आनंदमयी मॉं यांना आपल्या अगदी एक वर्षापासून घडलेल्या घटना ,भेटलेल्या व्यक्ती लक्षात होते‌.खर तर मॉं चा हा दिव्य भाव पुढे नित्य कायम स्थिर होता.मॉं च्या बालपणी घडलेल्या सर्व घटना मोठ्या झाल्यावर त्या आपल्या आईला जशाच्या तशा सांगत असत.मॉंना  बसल्या बसल्या आकाशात बालपणी देवी देवतांच्या रुपाचे दर्शन होत असे.मॉंचे वडिल हे विष्णू उपासक होते.पण त्यांच्या घरची परिस्थिती काही विशेष ठिक नव्हती.मॉं चे लौकिक शिक्षण तसे बघता दोन वर्षांपासून सुरु झाले होते.सामान्य मुलांच्या शाळेत त्या काही दिवस शिक्षण घेण्यास गेल्या होत्या.त्यांची बुद्धीमत्ता अतिशय अलौकिक होती.त्या एकपाठी असल्याचा अनुभव त्यांच्या शिक्षकांना येऊ लागला होता.वयाच्या १२ व्या वर्षी मॉंचा ढाका विक्रमपूर येथील श्रीजगबन्धु चक्रवर्ती आणि त्रिपुरसुंदरी यांचे पुत्र रमणीमोहण चक्रवर्ती ज्यांना भोलानाथ या नावाने ओळखले जात असे यांच्याशी झाला.ते पोलिस विभागात काम करत होते.लग्न झाल्यावर माॅं पाच वर्ष आपल्या चुलत भावा कडे राहिल्या.त्यावेळी त्या जास्तीत जास्त ध्यान धारणा करु लागल्या.त्यांनी कसलेही वैदिक पद्धतीचे शिक्षण घेतले नव्हते तरी त्या अतिशय अचुक वैदिक पद्धतीचे देवपूजा करित असत.तसेच त्या ध्यानातून देवांशी वार्तालाभ ही करित असत.त्यांची अलौकिक व दिव्य भावावस्था बघून त्यांच्या एका सज्जन शेजार्याने त्यांना सर्वात प्रथम "मॉं म्हणून संबोधले होते.मॉं १७ वर्षांच्या झाल्यावर त्या ओष्ठ नावाच्या गावात १९१८ मध्ये आपल्या पती समवेत राहावयास गेल्या.


मॉं आपल्या पतिसोबत म्हणजे "भोलानाथ" यांच्याबरोबर राहू तर लागल्या. पण हा संसार असामान्य ठरला.त्यांचे पति जेव्हाही त्यांना स्पर्श करायचा प्रयत्न करित तेव्हा तत्क्षण त्यांचे शरीर हे मृतवत होत असे.एखाद्या प्रेतासारखी त्यातली चेतना शुन्य होत असे.ज्यावेळी मॉं चा‌ विवाह झाल्या त्याच्या आधीपासूनच त्या अत्यंत तेजस्वी व सामर्थ्य संपन्न होत्या.लग्न झाल्यावर त्यांचे पति त्यांना संसार- व्यवहार या सर्वांचे महत्व सांगू लागले, त्यांना आत्मस्थिती वरुन देहबुद्धी वर आणण्याचा प्रयत्न करु लागले.परंतु मॉं त्यांना संयम, परमार्थ,सत्संग यांची महिमा सांगत असत.आता मॉं प्रत्यक्ष आदिशक्ती होत्या त्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द हा ज्ञान प्रगट करण्याच्या ताकदीचा होता.झालेही तसेच त्यांच्या पति च्या ‌हृदयात हळूहळू तिव्र वैराग्याचा उदय व्हायला लागला.ही अतिशय असामान्य कृती मॉं नी फक्त आपल्या उपदेशातुन केली होती.त्यांच्या मनात विकार उत्पन्न झाली की मॉं आपल्या स्व:सामर्थ्याने तात्काळ तो दूर करीत असत.संसारात राहून कितीतरी महिने लोटले. एकदिवशी अखेर त्यांच्या पति ने त्यांना विचारलेच की, "तु माझ्याशी विवाह केला आहे तरी तु मला अशी दूर का ठेवते? तु मग विवाह तरी का केला ?" तेव्हा  मॉं  नी त्यांना उत्तर दिले की, " मी तुमच्याशी लग्न जरुर केले आहे.परंतु लग्नाचा खरा अर्थ हा आनंद आहे.वस्तुत: आनंद प्राप्त करण्यासाठी पति-पत्नीने एकमेकांना साह्यभूत ठरायला हवे ,शोषीक नाही!  काम विकारात लिप्त होणे हेच लग्नाचे फलित नाही आहे." अशा प्रकारे त्यांनी अनेक उपदेश करुन त्यांच्या ठायी विवेकाची जागृती केली.त्या संसारात वावरत तर होत्या पण संसारात राहून ही त्यापासून अलिप्त असत. त्यांची ही संसारातील अलिप्तता जणू चिखलातल्या कमळा सारखी होती.त्या त्यात कामळाप्रमाणे राहून आपल्या पतीची सेवा करित असत.पति नोकरीवरुन घरी आले की आपल्या हाताने अत्यंत स्वादिष्ट स्वैपाक करुन त्यांना खायला घालत असत.

            

ही सर्व जगरहाटी करित असतांना त्यांनी आपल्या ध्यानधारणेची बैठक मोडली नाही.त्या वेळ मिळेल तेव्हा एकांतात ध्यान मग्न होऊ लागल्या.कधी कधी तर त्या स्टो वर डाळ शिजायला ठेऊन छतावर येत व चंद्राकडे बघत त्राटक करित आणि त्यातून त्या प्रगाढ ध्यानात जात असत.त्यांना इतके प्रगाढ ध्यान लागत असे की स्टोवर ठेवलेली डाळ जळून अगदी कोळसा झालेली असे‌.असे अनेकदा होत असे व घरातील लोक त्यांच्यावर रागावले की त्या चुपचाप आपली चुक मान्य करित असत.पण त्यांना आतून ठाऊक होतेच की "आपण कुठल्याही वाईट मार्गावर नाही तर परम पवित्र अशा ईश्वरी मार्गावर मार्गक्रमण करीत आहोत." अशा प्रकारे त्यांना ध्यानाचा ,नित्य भजनाचा क्रम अखंड चालूच होता.याच ध्यानमग्न अवस्थेत अनेक दैवीय , अनाकलनीय घटना घडू लागल्या.त्यात एक विलक्षण प्रसंग घडला. मॉं जशाजशा साधना मग्न होऊ लागल्या तसे तसे त्यांच्यात दैवी शक्ती जागृत होऊ लागल्या.त्यांच्या ठिकाणी आदिशक्ती चे प्राकट्य होऊ लागले.एकदा श्रावण पौर्णिमेला एक विलक्षण घटना घडली.आपल्या या आत्मस्थितीत त्या आदिशक्तिशी इतक्या एकरुप झाल्या की मध्यरात्री त्या अचानक उठल्या.त्यांनी आपल्या पतिलाही जागे केले.मग आपल्या ठाई भगवती आई महाकाली चे दिव्य स्वरुप प्रगट केले आणि आपल्या पतिला आदेश दिला की , "महाकाली ची पुजा करा." असा आदेश मिळताच त्यांच्या पति ने त्यांची पूजा केली. तेव्हा मॉं च्या ठिकाणी त्यांना महाकाली चे सगुण दर्शन झाले होते.ते दर्शन होताच त्यांच्या पतिने त्यांना साष्टांग दंडवत घातला. तेव्हा आनंदमयी  मॉं त्यांना म्हणाल्या , "आता महाकालीला तर आईच्या नजरेनेच बघायचे आहे ना?" पतिने विचारले ,"हे काय आहे." तेव्हा मॉं त्यांना स्पष्टपणे म्हणाल्या, "तुमचे आज कल्याण झाले आहे."  मॉं नी आपल्या पतिला त्या पुढे काही दिवसांनी  दिक्षा दिली होती. हा दिक्षा अनुग्रह झाल्यावर असे म्हणतात की  मॉं नी आपल्या पतिला साधूच केले व उत्तर काशी ला आश्रमात पाठवून दिले. इ.स १९२२ ला मॉं चंद्राकडे त्राटक करुन ध्यान करत असता त्या गहन ध्यानात लिन झाल्या व त्या आत्मतत्वाशी एकरुप झाल्या.त्यावेळी त्या २६ वर्षांच्या होत्या.जणू याद्वारे त्यांनी आपले अवतार कार्य प्रगट रुपाने सुरु केले. मॉं चे तेज दिवसेंदिवस वाढत चालेले होते.त्या सहज भावसमाधीत स्थिर होऊ लागल्या.ज्याप्रमाणे कस्तुरीचा सुगंध लपवून ठेवता येत नाही त्याप्रमाणे मॉं चे हे दिव्यत्व ही लपून राहिले नाही.त्यांच्या जवळपासच्या अनेक लोकांना त्यांच्या ठाई असलेल्या सामर्थ्याची प्रचिती होऊ लागली.त्यांचे नाव तसे तर निर्मला पण त्यांच्या अधिकारामुळे त्यांचे शेजारी त्यांना मॉं म्हणूनच संबोधू लागले.हेच " मॉं " त्यांचे जगविख्यात नावच झाले.हा लेख जरी मराठीत असला तरी मी आई न वापरता " मॉं" वापरले त्याचे कारण ही  हेच आहे.


एक अलौकिक प्रसंग इथे मुद्दाम देतो आहे.हा प्रसंग माॅं नी आपल्या पतिला दिक्षा देण्या आधी घडला आहे.मॉं चे मामेभाऊ निशिकान्त जे त्यांच्यपेक्षा १०/११ वर्ष मोठे होते.ते रमणी बाबु तथा भोलानाथ (मॉं चे पति) यांना रागावून विचारु लागले की ,"तुम्ही तिला या असल्या ध्यान क्रिया ,अशा विक्षिप्त अवस्थेबद्दल विचारत का नाही."  त्यावेळी मॉं पदर घेऊन त्याच खोलीतील एका कोपऱ्यात ध्यानावस्थेत बसलेल्या होत्या.हे ऐकून त्यांचा भाव अचानक बदलून गेला.त्या आसनावर आपले शरीर ताठ करुन बसल्या, त्यावेळी डोक्यावर तोंड झाकायला घेतलेले वस्त्र ही खाली पडले.त्यांचे केस अस्ताव्यस्त झाले होते.शरीराचा काही भाग पदर खाली पडल्यामुळे उघडा दिसू लागला.त्या दिव्य अवस्थेत त्यांना कसलेही भान राहिले नाही.त्या अतिशय मोठ्या आवाजात आपल्या भावाकडे बघून ओरडल्या, "काय बोलतो आहेस रे?" त्यांचे हे प्रखर उद्गार ऐकून निशि बाबू कापायला लागले व मागे सरकले.मग मॉं नी त्याच अवस्थेत आपल्या डाव्या हाताने त्यांचा चेहेरा धरला व अतिशय वात्सल्य पूर्ण आवाजात म्हणाल्या,
"काय रे भिलास का? भिऊ नकोस,भिऊ नकोस!"
तेव्हा मग निशि बाबुंनी मॉं ना भित भित विचारले ,
"तुम्ही कोण आहात?"
मॉं गंभीर झाल्या व म्हणाल्या , "पूर्णब्रह्म नारायण."
हे ऐकून दोघेही चकित झाले.
मग भोलानाथ म्हणजे मॉं च्या पतीने विचारले , "तुम्ही कोण आहात?"
मॉं म्हणाल्या, "महादेवी,महादेव."
निशि बाबुंनी त्यांना विचारले "तुमची दिक्षा झाली आहे का?" 
मॉं म्हटल्या , "हो झाली आहे." परत ते म्हणाले, "रमणी बाबुची झाली का?"
मॉं म्हटल्या , "नाही .पाच महीने झाल्यावर रविवारी द्वितीयेला होईल.
खरंतर मॉं नी कधीही पंचांग पाहिले नव्हते त्यामुळे त्यांना हे माहित असण्याचा संभव नव्हतं.मॉं यापुढे काही संस्कृत मध्ये बोलल्या.पण कुणालाही ते समजले नाही.त्यामुळे मॉं नी शेजारी राहणाऱ्या जानकी बाबुंना बोलवा अशी आज्ञा केली. जानकी बाबु आले पण यावेळी नेहमी पदराखाली राहणार्या मॉं आज त्यांना वेगळ्याच अवस्थेत दिसल्या.त्यांना कसलेही बाह्य भान नव्हते‌.तेव्हा जानकी बाबुंनी विचारले, "तुम्ही कोण आहात?" मॉं म्हटल्या, "पूर्णब्रह्म नारायण."
जानकी बाबु म्हटले , "तुम्ही तर राक्षसी ताकद भासता आहात."
मॉं पुन्हा मोठ्याने म्हणाल्या , "नाही ,पूर्णब्रह्म नारायणी."
तेव्हा मग सर्वांनी मॉं ना आपला परिचय चांगल्या प्रकारे देण्याची प्रार्थना केली. तेव्हा मॉं आसनावर उभ्या राहिल्या.त्यांनी भोलानाथ म्हणजे आपल्या पतिच्या मस्तकावरुन ते पायापर्यंत आपली बोटे फिरवली.असे केल्या क्षणी त्यांचे डोळे अधांतरी स्थिर झाले.त्यांना काष्ठ समाधी लागली.या अवस्थेला  जवळ जवळ एक तास होऊन गेला.तेव्हा अचानक शाळेतून त्यांचा पुतण्या घरी आला.मॉं ची अवस्था ,त्याच्या काकांची काष्ठ समाधी बघून तो इतका बावरला की रडायला लागला.तेव्हा जानकी बाबुंनी मॉं ना भोलानाथ ला ठिक करण्याची प्रार्थना केली.मॉंनी परत मग आपल्या बोटांनी भोलानाथ ला स्पर्श केला व तात्काळ ते समाधी तून बाहेर आले.बाहेर आल्यावर ते म्हणायला लागले, "मी कुठे होतो.किती आनंद होता तिथे.त्या आनंदाचे वर्णन ही आपण करु शकत नाही." हा प्रसंग झाल्यावर मॉं चा एकमेवाद्वितीय अधिकार सर्वांना कळून चुकला.सर्व लोकांना त्यांच्या अलौकिक तत्वाची जाणून झाली.
पुढे उत्तर काळात एका शिष्याने मॉं ना प्रश्न विचारला ,"मॉं जर आपल्या ठाई असलेले पूर्ण ब्रह्म नारायण जर आपले शरीर सोडून गेले,तर मग आमचे कसे होईल?" तेव्हा मॉं नी दिलेले उत्तर विलक्षण आहे.मॉं म्हणाल्या , "अरे सोडून कोण जाईल.मीच तर ते प्रत्यक्ष स्वरुप आहे."
या प्रसंगावरुन मॉं चा अधिकार लक्षात येतो.मॉं च्या दर्शनाला हिमालयातील योगी ही यायचे त्याचे कारण ही हेच आहे यात शंका नाही.


त्यानंतर मॉं नी आपले कार्य प्रगट रुपाने सुरु केले. नंतर त्या नित्य दिव्य भावातच स्थिर झाल्या.त्यांना अनेक लोक शरणं यायला लागले.अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. १९२९ ला रमानी जवळील कालीमंदीर परिसरात मॉं नी आपला पहिला आश्रम स्थापन केला.एक वर्ष तर त्या अखंड मौनातच राहिल्या.त्या वेळी त्या एकांतवासात होत्या.मौन आणि समाधी बस एवढेच!त्यांचे पती हेच त्यांचे प्रथम शिष्य झाले.त्यानंतर भक्तोद्धारासाठी त्यांनी भारतभर भ्रमण केले.भारतातील त्याकाळी जगविख्यात असलेले हरी बाबा,उडीया बाबा,परमहंस योगानंद ,अखंडानंद सरस्वती हे मॉं वर आई सारखे प्रेम करायचे.परमहंस योगानंद व स्वामी शिवानंद तर त्यांना आत्मप्रकाशाने सुसज्ज व अत्यंत विकसीत आत्म पुष्प म्हणत असत.त्या सर्व संतांना मग ते अगदी त्यांच्यापेक्षा लहान वयाचे असले तरी "पिताजी" म्हणूनच संबोधन करित.त्यांना संतांवर विशेष प्रेम होते. भलेही भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी सारख्या मोठ्या मोठ्या लोकांकडून त्यांच्या चरणांची सेवा पुजा होत असे पण त्या स्वतः मात्र संतांची पुजा करुन अतिशय आनंदीत होत.श्रीअखंडानंद सरस्वती स्वामी महाराजांचा सत्संग त्या त्यांच्या चरणाशी बसुन ऐकत. मॉं चे चरित्र अतिशय दिव्य आहे .जवळपास ३ ते ४ हजार पृष्ठाचे व पाच खंडातील हे चरित्र इतके विस्तृत व‌ चमत्कारिक आहे की त्याची महती शब्दात मांडता येणार नाही.मॉं  नी वेळोवेळी केलेल्या लिला , केलेले उपदेश यांचा तो कोषच आहे .त्या सर्व लिला तर मी या ठिकाणी मांडण्यास असमर्थ आहे. पण भविष्यात त्यातील काही भाग जरुर निवडुन मराठीत शब्दबद्ध मॉं नी करवून घ्यावा ही माझी मॉं च्या चरणी प्रार्थना आहे. मॉं चे भ्रमण सर्व दूर असायचे.आपल्या महाराष्ट्रात मॉं  नेहमी येत असत.पुण्यात तर मॉं चा अतिशय भव्य दिव्य आश्रम आहे.या आश्रमात मॉं स्वतः बर्याच वेळा येऊन राहत असत.मॉं नी अशा प्रकारे अलौकिक कार्य केले ,अनेकांना दिक्षा दिली,अनुग्रह देऊन कृतार्थ केले.साधनेच्या प्रत्येक पातळीवरील साधकाला मॉं नी त्याच्या अधिकारानुरुप मार्गदर्शन केले.मॉं १९८२ ला हरिद्वार कनखल या ठिकाणी आपल्या दिव्य देहाचा त्याग करुन स्वधामी परतल्या.त्यांची समाधी कनखल या ठिकाणी आहे.देशविदेशात करोडो भक्तांना मॉं आजही कृपा दृष्टीने सांभाळत आहेत.आजही मॉं च्या कृपेची प्रचिती अनेकांना येते.जगभरात त्यांचे आश्रम आज स्थापन झाले आहेत.आजही हे सर्व भक्त मॉं नी दाखवलेल्या धर्माच्या, सदाचाराच्या मार्गावर मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करित आहेत.मॉं वर लेख लिहावा ही माझी अनेक दिवसांपासून ची इच्छा होती.आज आपल्या या "प्रणम्या मातृदेवता" लेख मालेच्या निमीत्ताने मॉं नी कृपा करुणा पूर्वक माझी ही इच्छा पूर्ण केली.त्यांच्या चरित्राचे स्मरण घडणे ही पण मी त्यांची परम कृपा करुणा समजतो.त्यांनीच लिहून घेतलेली ही शब्दसुमनांची त्यांच्याच श्रीचरणी अर्पण करतो.मॉं ना प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या सर्वांवर त्यांची करुणा मायेची सावली नित्य अखंड धरावी, आम्हालाही धर्माच्या ,सत्याच्या ,साधनेच्या मार्गावर चालण्याची बुद्धी देऊन ,आपल्या सद्गुरु माउलींची अखंंड सेवा करण्याची विवेक बुद्धी प्रदान करावी.
        ✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

श्रीदत्त: शरणं मम 🌿🌺🙏🌸

महाराज ज्ञानेश्वर माउली समर्थ🌿🌺🙏🌸

Thursday, September 29, 2022

प्रणम्या मातृदेवता माळ ५ :-कारुण्यसिंधू कलावती आई🌸🌺🌿🙏

 


"प्रणम्या मातृदेवता" माळ ५


🍃🌺🙏कारुण्यसिंधू कलावती आई🙏🌺🍃


आज शारदीय नवरात्राचा पाचवा दिवस,पाचवी माळ.हा दिवस ललिता पंचमी या नावाने ओळखला जातो.आज आपल्या "प्रणम्या मातृदेवता" या लेखमालेतील ही पाचवी माळ.ही माळ आपण परम पूज्य सद्गुरु माउली श्री कलावती आईंच्या श्री चरणी अर्पण करणार आहोत. परमपूज्य आई या आपल्या भारतात होऊन गेलेल्या अतिशय दिव्य संतमांदीयाळीतील एक अलौकिक संतरत्न आहेत.आईंनी शेकडो आर्त ,जिज्ञासू,मुमुक्षू लोकांना आपल्या कृपा छत्राखाली घेऊन त्यांना कृतार्थ केले आहे.आईंचा शिष्य परिवार व त्यांच्या वर प्रेम करणारा भक्त परिवार संपूर्ण जगभरात पसरला आहे.आईच्या कृपा सामर्थ्याची प्रचिती आजही अनेक भक्त घेत आहेच आणि आजही "हरी मंदिर" या शक्ती केंद्रातून प.पू.आईंनी घालून दिलेली उपासना पद्धती,साधना मार्ग अविरत ,अखंड सुरु आहे.आजही शेकडो लोक हरी मंदिरात जाऊन आईंच्या कृपा सामर्थ्याची प्रचिती घेत आहेत.आईंचे श्रीमती विशालाक्षी यांनी लिहिलेले "परमपूज्य आई" हे चरित्र अतिशय दिव्य आणि प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे आहे.त्याच चरित्रातील काही निवडक संक्षिप्त माहितीच्या आधारे आपण परम पूज्य आईंच्या दिव्य लिला चरित्राचे स्मरण करणार आहोत.

                         परम पूज्य आईंनी ज्या घराण्यात अवतार घेतला ते अतिशय सुसंस्कृत व सात्विक असे कल्याणपूरकरांचे घराणे होते.या घराण्यात श्रीमद् परमहंस शिवराम स्वामी हे थोर संन्यासी महापुरुष होऊन गेले.परहंस स्वामींना दोन चुलत बंधू होते‌.एक शामराव व दुसरे शांतमूर्ती.शामरावच्या पत्नीचे नाव रुक्माबाई होते. यांना एक मुलगा होता ज्याचे नाव बाबुराव.हे बाबुराव आपल्या आईंचे पिताश्री.परंतु शामरावाचे दुसरे बंधू शांतमूर्ती व त्यांच्या पत्नी पद्मावती यांना संतती नव्हती.बाबुराव वयात आल्यावर त्यांचे वडिल शामराव यांचे निधन झाले.पण त्यांना त्यांचे काका शांतमूर्तींनी वडिलाप्रमाणे प्रेम दिले.त्यांचे लग्न ही शांतमूर्तींनीच लावून दिले.बाबुरावांच्या पत्नीचे नाव होते सिताबाई‌.बाबुराव हो श्रद्धावान व सत्शिल असे व्यक्ती होते.लग्नानंतर आठ वर्ष झाल्यावरही संतती झाली नसल्याने त्यांनी इ.स.१९०७ साली श्रावण मासात ,सुपुत्रप्राप्तीसाठी सहस्त्रलिंगार्चन केले.त्याची समाप्ती अष्टमीस झाली. त्याच रात्री , "मी तुझ्या वंशात जन्म घेणार आहे" असा देवीने त्यांना दृष्टांत दिला‌.भगवतीचा आशिर्वाद फळाला आला व सिताबाईंना दिवस गेले.त्यांना जगावेगळे डोहाळे होऊ लागले.त्यांना तासंतास नामस्मरण करावे वाटत असे.प्रवचन,किर्तन ऐकत राहावे वाटू लागले.त्या सतत मंदिरात जाऊ लागल्या.संत साहित्याचे वाचन करु लागल्या.लवकर नऊ महिने पूर्ण झाले व इ.स १९०८ रोजी ऋषीपंचमीच्या शुभदिवशी ब्राह्म मुहूर्तावर या सत्शिल दाम्पत्याच्या पोटी कन्यारत्न जन्मास आले.बारावे दिवशी या अलौकिक कन्येचे नामकरण करण्यात आले व तिचे नाव "रुक्माबाई" ठेवण्यात आले.पण सर्व लोक तिला बाळ याच नावाने हाक मारित.बाळ जशी जशी मोठी होऊ लागली तसे तसे तिच्यातील अलौकिक गुण सर्वांना अनुभवास येऊ लागले.प्रथम जन्मदिवशी ती बोलायला लागली‌ व तिने पहिला उच्चारलेला शब्द होता "हरी".पुढे सहा महिन्यांत ती सर्व काही बोलु लागली.आई वडिलांना याचे अतिशय अप्रूप वाटू लागले.बाळ तिन वर्षांची झाल्यावर शांतमूर्तींनी गोकर्ण जवळ शेत घेतले व तेथेच घर बांधून राहावयास गेले.त्यांनी बाबुराव व पूर्ण परिवारास तेथेच राहण्यास बोलाविले.घरी रोज सायंकाळी हरीपाठ होत असे.घरातील एकंदरीत हरीभक्तीच्या वातावरणामुळे बाळचेही मन हरीभक्तीकडे वळले.लहानपणापासूनच ती अंतर्मुख होती.तिला बालपणी खेळण्यात भांडी कुंडी नाही तर देवांच्या मुर्तीच आवडत.तिला कृष्ण मुर्ती ही विशेष आवडत असे.ती मुर्ती मध्यभागी व इतर देवातांच्या मुर्ती गोलाकार ठेऊन बाळ त्या बरोबर खेळत असे.बाळचा आवाज अतिशय मधुर होता. वयाच्या पाचव्या वर्षीपासून ती कानडी ,मराठी,गुजराती भाषेत भजन म्हणू लागली.तिच्या आवाजातील गोडवा ,तिची श्रद्धेने भजन म्हणण्याची पद्धत बघून मोठ्या़ंना तिचे अतिशय कौतुक वाटत असे.वयाच्या सातव्या वर्षी बाळला शाळेत घातले गेले.सातव्याच वर्षी बाळला पूर्णानंद सरस्वती स्वामी महाराजांचे दर्शन व घडला होता.श्रीस्वामी महाराज बाळचा अधिकार जाणून होते.बाळचे सात्विक गुणांचे निरीक्षण ते नित्य करित असत.यामुळे त्यांनी आपल्या नित्य पुजेतील भगवान गोपाल कृष्णाची मूर्ती बाळला दिली होती.ही गोपालकृष्णाची मूर्ती बाळचे सर्वस्व झाली होती.बाळचा विलक्षण दैवी अधिकार कळणारा एक प्रसंग बालपणी घडला तो असा.पूर्णानंद स्वामी महाराजांकडे विनायक नावाचे एक भटजी राहत असत.त्यांच्या बायकोचे डोके एकदा फिरले.अनेक उपाय केले पण फरक न पडल्याने रोज डोक्यावर चाळीस घागरी थंड पाणी ओतण्याचा शेवटचा उपाय सुरु झाला.बरेच दिवस हे ही केले पण फरक पडला नाही.शेवटी तिला गोव्यास नेण्याचे ठरले.तेवढ्यात श्री स्वामी महाराजांनी, "येत्या सोमवारी तिच्या डोक्यावर बाळ कडून पाच तांबे पाणी घाल" असे सांगितले.विनू भटजीने तसे केले.त्यानंतर त्यांच्या बायकोचा त्रास हळूहळू कमी होत गेला.अशा प्रकारे बालपणीच बाळकडून अनेक प्रकारे विविध सेवा ,उपासना ,ग्रंथ वाचन ,श्रवण हे सर्व  घडत होते.जणू काही श्री भगवंत बाळकडून तिच्या हातून होणार्या दैवी कार्याची पूर्वतयारीच करून घेऊ लागले होते.बाळ या सर्वांत रमत असे.तिची मूळ प्रवृत्तीच या सर्व संस्कारात रममाण होण्याची होती यात शंका नाही.हरीदासांच्या किर्तनात ध्यानाची महती ऐकल्यापासून ती एकांतात ध्यान ही करु लागली.
{ आईंच्या चरित्रातील "प्रथमोल्हास" या प्रकरणात आईंच्या वयाच्या १५ वर्षांपर्यंतच्या सर्व लिलांचा समावेश करण्यात आला आहे.ही जवळ जवळ १०० पानांची दिव्य हकीकत आहे.यात आईंनी बालपणी केलेल्या लिला, त्यांच्या सवयी ,इतरांशी झालेलं संभाषण ,उत्कट कृष्ण भक्तीचे वर्णन व विविध प्रसंग यांचे वर्णन आहे.आईंचे कृष्ण प्रेम,भक्ती,तसेच सद्वर्तन , सद्विचार,सात्विक वृत्ती हा चरित्रात आलेला सुंदर भाग लिलेचा भाग अचंबित करणारा आहे.यातुन प्रत्येक सद्गुण हा सामान्य व्यक्ती व साधक या दोघांसाठी ही अतिशय चिंतनीय आहे.  }

                          वयाच्या १५ व्या वर्षी आईंचा विवाह ठरला.त्यांचा विवाह दक्षिण कर्नाटकातील कडलूर येथील पोलिस इन्स्पेक्टर एम.राजगोपाल यांच्याशी झाला.सासरी जातांना रस्त्यात हुबळी येथे सिद्धारुढ स्वामी महाराज यांच्या दर्शनास जा असे बाबुराव यांनी सांगितले होते.त्याप्रमाणे हे दाम्पत्य श्री सिद्धारुढ स्वामी  महाराज यांच्या कडे गेली.पुढे आईंना सिद्धारुढ स्वामी महाराजांचा अनुग्रह मिळला.त्यानंतर त्या अधिकच अंतर्मुख झाल्या.आता त्या अधिकाधीक कृष्ण ध्यानात निमग्न झाल्या.तसेच त्या अतिशय सुंदर व शिस्तबद्ध असा संसार करु लागल्या.त्यांचे सासरच्या मंडळी समवेत वागणे अतिशय आनंददायी होते व घरकाम ही त्या अत्यंत शिस्तबद्ध तर्हेने करित असत.रुक्माईंना वयाच्या १७‌ व्या वर्षी एक मुलगा झाला ज्याचे नाव बाळकृष्ण ठेवले होते.वयाच्या १९ व्या वर्षी त्या पुन्हा: त्या गर्भवती होत्या पण अचानक एक अघटित घडले.त्यांच्या पतीचे अचानक निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय लहानच होते.या घटनेमुळे त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला व‌ आता पतिराज्य गेले आणि यमराज्य आले.आता इथून पुढे काय मुलांना सांभाळत आपल्याला भगवंतांची सेवा करता येणार नाही असे वाटून त्या आत्महत्येस प्रवृत्त झाल्या.घराजवळील विहीरीत त्या आत्महत्या करायला गेल्या तोच तेथे एक जटाधारी साधू प्रगट झाले व म्हणाले, "माई ,थांब ! थांब ! आत्महत्या करण्याकरीता तु जन्माला नाही आलीस.जीव देणार्यांना वाचविण्यासाठी तुझा जन्म झाला आहे.तुझ्या दु:खाचा प्रळय होण्याचा वेळ आता अगदी जवळ येऊन ठेपली आहे.यापुढे तु तिळमात्र काळजी करु नकोस.लवकर हुबळीस जा.सिद्धारुढ महाराजांच्या कृपेने तू सुखरुप होशील." इतके बोलून ते साधू अदृश्य झाले.त्यानंतर मात्र त्या अगदी शांत झाल्या.त्यांना या वाक्याने आधार मिळाला व सद्गुरु नित्य पाठिशी असल्याची ग्वाही पण मिळाली.दोन महिन्याने त्यांना मुलगा झाला.तशातच त्यांचे वडील बाबुराव यांचे निधन  झाले त्यामुळे त्या अधिकच अंतर्मुख झाल्या.आपल्या एका वस्त्रानिशी त्यांनी घर सोडले‌ व त्या हुबळीला आल्या.तेथे गेल्यावर स्वामी महाराज त्यांची वाटच पहात होते.त्या स्वामींच्या आज्ञेने मठात राहून सेवा करु लागल्या.ही सेवा म्हणजे सद्गुरुंनी आईं कडून करुन घेतलेली तपश्चर्याच होती.आईंच्या ठाई अंतर्मुखता आता कडकडीत वैराग्याच्या रुपात प्रगट झाली.त्या एका लुगड्याचा अर्धा-अर्धा भाग करुन ते दोन भाग वापरीत.झोपायला पोते व उशीला विट घेत.दिवस रात्र त्यांच्या जिभेवर "ॐ नमः शिवाय" हा महामंत्र असे.कामाव्यतिरीक्त त्यांच्या हातत जपमाळ असायची.आहाराकडे लक्षही नसे.कुणी दिलेच तर फळ,पोहे खजूर खात नाहीतर आठ आठ दिवस पाण्यावर काढीत.आपल्या सेवेत त्यांनी कधीही खंड पाडला नाही.मठात पडेल ती सेवा आई करीत.त्या काम असेल तरच कुणाशी बोलत नाहीतर फक्त आणि फक्त नामस्मरण.रुक्माई म्हणजे आईंची निष्ठा,सेवा,शुद्ध भाव, प्रामाणिकपणा, कार्यतत्परता हे गुण बघून श्री स्वामी महाराज त्यांच्यावर अत्यंत खुष होते. इ.स १९२८ साली दसर्याच्या शुभ दिनी स्वामींनी त्यांच्यावर कृपा करुन त्यांचे नाव "कलावतीदेवी" असे ठेवले व त्यांना त्यानंतर निरुपण करण्याची आज्ञा केली.गुरु आज्ञेने आईंनी त्या दिवशी "नाम संकीर्तन साधन पै सोपे" या अभंगावर निरुपण केले.नंतर वेळोवेळी आईंना स्वामी मठात किर्तन करण्याची आज्ञा करित असत.पुढे एक दिवशी स्वामी महाराजांनी आईंच्या डोक्यावर हात ठेवत त्यांच्यावर पूर्णकृपा केली.त्या कृपेनिशी आईंच्या ठाई आत्मज्ञान जागृत झाले.त्या जवळ जवळ आठ तास प्रगाढ समाधीत स्थिर होत्या.समाधी उतरल्यावर त्यांना आपला जणू नवा जन्म झाल्याची जाणीव झाली.पुढे आईंना सर्व जन माताजी या नावानेच संबोधू लागले.

पुढे श्री स्वामी महाराज आईंना वेळोवेळी मठात किर्तन करण्याची आज्ञा देत.जणू काय आईंकडून होणार्या धर्मकार्याचा हा श्रीगणेशा होता.लवकरच श्रीस्वामी महाराजांनी आईंना "मी लवकरच आता समाधी घेणार आहे.त्यानंतर तु सहा महिने एकांतवासात राहून साधनाभ्यास कर.पुढे बारा वर्षांपर्यंत हरिनाम व विश्वप्रेमप्रसारार्थ गावोगावी प्रमाण कर.मी सदा सर्वकाळ तुझ्या पाठीशी आहे, सन्निध आहे" असे आश्वासन दिले.पुढे लवकरच श्रावणातील तिसऱ्या सोमवारी श्रावण वद्य प्रतिपदेला स्वामी महाराजांनी समाधी घेतली.आईंनी त्यानंतर एकांतवास सुरु केला .हे कठोर तप म्हणजे आईंनी केलेले दिव्यच होतं.त्यांनी या काळात इतके कठोर व त्यागमय काळ व्यतित केला की वाचुन ही आश्चर्य होते.पुढे सहा महिन्यांनी साधना पूर्ण करुन आई शिवरात्री उत्सवाला हुबळीला मठात आल्या.तिथेच उत्सवाला आलेले मद्रासचे रावबहाद्दूर एच.नारायणराव व त्यांच्या पत्नी गिरीजाबाई यांनी आईंना बेंगलोर ला येण्याची विनंती केली.ही महाराजांची इच्छाच मानून आई बेंगलोर ला गेल्या व आईंच्या प्रत्यक्ष लोककल्याणकारी कार्याला सुरुवात झाली.आई किर्तन करण्याचे कसलेही मानधन घेत नसत.या काळात आईंनी केलेले विविध चमत्कार वाचली तरी आश्चर्य होतं.आईंनी अनेकांना रोग मुक्त केले, त्यांचे दु:ख दूर केले.सामान्य लोकांना हरीनामाची गोडी लावली,तसेच लोकांना समतेची ,धर्माची शिकवण दिली.त्यांनी या काळात केलेला प्रचंड प्रवास व किर्तन बघितले तर थक्क व्हायला होतं.या काळात अनेक नाट्यमय घटना घडलेल्या आहेत.पण सद्गुरुंनी कृपा पूर्वक त्यांना त्यातून बाहेर काढले‌.
{ प.पू आईंनी केलेल्या विविध लिला ,किर्तन तसेच संवाद यांची माहिती चरित्र ग्रंथात अतिशय सुंदर पद्धतीने दिली आहे.शब्दमर्यादेस्तव इथे ते सर्व लिला अनुभव मांडता येणारा नाही. तरी आपण जरुर आईंचे चरित्र वाचाच. }
      
                            स्वामींची आज्ञा म्हणून आईंनी त्यांना एम.शिवराव यांनी दिलेली देणगी वापरुन "हरी मंदीर" या प्रधान साधना केंद्राची स्थापना केली.त्यानंतर मात्र आईंनी कधीही कुठल्याही प्रकारचे दान स्विकारले नाही.बारा वर्षात प्रवासात संग्रहित केलेले पदं अभंग एकत्र करुन आईंनी तो परमार्थ प्रदीपक या नावने छापला.आईंनी अनेक महत्वाचे ग्रंथ रचले ज्यात परमार्थ दर्शन,सिद्धारुढ वैभव, बोधामृत, बालोपासना, कथासुमनहार, श्रीकृष्ण प्रताप या ग्रंथाचा समावेश होतो.
त्यांनी शेकडो स्त्रीयांना भजनाचे महत्व पटवून देत त्यांना भजन शिकवीले.भजनाने संसारातील त्रिविध ताप ही दूर होतात याची जाणीव लोकांना करुन दिली व सर्वांना भजनाकडे वळविले.भजनाला येणार्या लोकांकडून औषधांसाठी खर्च होणार्या पैशाची बचत व्हावी म्हणून आईंनी त्यांना औषध देण्यास सुरुवात केली.एक विलक्षण अनुभव इथे मुद्दाम मांडतो आहे.एका गोकुळाष्टमीच्या उत्सवात एक फोटोग्राफर श्रीहरी मंदीरात आले.त्यांना आईंचे काही फोटो काढायचे होते.त्यांची तयारी बघून एक जन त्यांना म्हणाले, "प्रथम आईंची परवानगी घ्या.नाही तर फोटो निघेलच असे सांगता येत नाही असा पुष्कळांना अनुभव आहे." पण तो फोटोग्राफर अश्रद्ध आणि अहंकारी होता.तो म्हटला, "मी काही नव्यानेच फोटो काढीत नाहीये.आज चौदा वर्ष धंदा करत आहे." इतक्यात आई आसनावर येऊन बसल्या.लगेच त्याने फोटो काढण्याचा प्रयत्न केला पण फ्लॅश लाईटच लागेना‌.त्याचे कारण शोधून पहाण्यासाठी तो अंगणात गेला तोच तो लाईट लागला.त्याने एकापेक्षा एक महागडे कॅमेरे आणले होते.पण आईंचा फोटो घेऊ लागला की लाईट लागायचा नाही आणि अंगणात गेला की लागयचा.असे तब्बल आठ‌ वेळा घडले.त्या ठिकाणी जवळपास चारशे/पाचशे लोक जमले होते.सर्वांमध्ये आपला अपमान झाला आहे असे वाटून तो रडकुंडीला आला.अखेरीस तो आईंपुढे हात जोडुन उभा राहिला पण तोंडातून एक शब्दही निघाला नाही.तो कापायला लागला.हे पाहून आई त्याला म्हणाल्या," फोटो काढण्या आधी देवांची प्रार्थना करा.परमेश्वर आपला मायबाप आहे.तेव्हा त्यांची करुणा भाकणे आपले कर्तव्य आहे." त्यानंतर त्याला फोटो काढणे जमले व त्याने अनेक फोटो काढले. इतका विलक्षण आईंचा अधिकार होता.बेळगावात १९५७ साली फ्ल्यू ची साथ सुरु झाली.आईंचे भक्त असलेले बोहरी लोक आईंकडे तक्रार घेऊन आले.त्यांच्यातील पांडुरंग गजेश्वर हा जवळपास मृत्यू मुखी पडलाच होता तर आईंनी त्याला आपल्या स्वसामर्थ्याने नुसता अंगारा देऊन परत रोगमुक्त केले होते.बेल्लद गावातील एक कुलकर्णी बाई तिला सहा वर्ष अन्न जात नव्हते.अनेक दवाखाने केले पण काही केल्या निदान लागत नव्हते.एकदा ती तिच्या नणदे समवेत हरीमंदीरात आली तिथे तिला एकाएकी चक्कर यायला लागली.भजन आरती सुरु झाली तोच ती आळोखेपिळोखे घेऊ लागली.आई पुढे बसलेल्या होत्या त्यांनी तिला तसेच सोडण्यास सांगितले.ती अर्ध्या तासाने भानावर आली.अष्टक झाल्यावर ती घरी गेली.रात्री सर्वांसारखे जेवन केले.दुसर्यादिवशी पासून ती कामही करु लागली.पुढे ती ठिक झाली व नियमीत भजनाला येऊ लागली.पंधरा दिवसांत ती ठणठणीत बरी झाली व आईंचा आशिर्वाद घेऊन घरी गेली. (असे जवळपास शेकडो अनुभव आईंच्या चरित्रात आले आहेत.या भक्त कल्याणाकरीता केलेल्या लिला इतक्या विलक्षण आहेत की बुद्धी स्तिमीत होते.पण आपल्याला त्या या लेखात घेणे शक्य नाही.प.पू.आईंच्या कृपा करुणेची झलक या प्रसंगातुन आपल्याला मिळते.असे विविध लिला चमत्कार करुन आपल्याला शरण आलेल्या भक्तांना भजन व नामस्मरणाच्या मार्गांलाच लावले.जवळ आलेल्या दु:की,आर्त, जिज्ञासू, मुमुक्षू यांना त्यांच्या कलाने भजनाकडे व नामस्मरणाकडे वळविण्याची अतिशय दिव्य कला आईंकडे होती. पण आपल्या कडे येणार्यांचे कल्याण त्या करीतच असत.)


ईंकडे दु:खनिरसनार्थ सर्व जाती ,धर्म ,पंथाचे लोक येत असत.त्या सर्वांना आईंनी जवळ घेतले त्यांना दु:ख मुक्त केले व परमार्थ मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली .बोहरी जातीतील आदिवासी लोक ही आईंकडे यायची .आईंनी स्वच्छता ,आंघोळ यांचे महत्व त्या लोकांना समजावून सांगितले.आईंचे वर्तन परमशुद्ध असे होते.त्यांनी काही पद ही रचली आहेत तसेच त्यांनी बरेचसे ग्रंथ ही रचले आहेत.सन १९३० पासून ते १९४२ पर्यंत आईंनी कीर्तन भजनाद्वारे विश्वप्रेमाचा प्रचार करण्यासाठी त्यांनी आपली काया चंदनाप्रमाणे अविरत,अखंड झिजवली.आईंनी स्वतः साधन , नामस्मरण,शुद्ध आचरण स्वतः केले व नंतर दुसऱ्या कुणाला सांगितले.आईंच्या सहवासात कितीही दुर्गुणी वृत्तीचा प्राणी आला तर आई त्याला युक्तीने परमार्थाकडे वळविण्यासाठी सतत प्रयत्न करीत.त्यांनी कधीही कुणालाही दूर केले नाही.आईंची ही भक्तवत्सलताच अनेकांनी अनुभवली होती.त्यामुळेच अनेक लोक हळूहळू भजन ,नामस्मरण करण्यास उद्युक्त झाली.परम पूज्य आईंचे चरित्र हे संसार आणि परमार्थ यांचा परिपाक आहे.प्रत्येकाने प्रपंचाबरोबर परमार्थ कसा करावा याचा धडा आईंच्या चरित्रातून मिळतो.परम पूज्य आईंनी ८ फेब्रुवारी १९७८ माघ शुद्ध प्रतिपदा या दिवशी महासमाधी घेतली.आईंची समाधी बेळगाव ला श्रीहरी मंदीर येथे आहे.सद्गुरु श्री कलावती आईंनी हरी मंदीरातुन भजन ,जपाची सुरु केलेली परम सेवा आज सर्व दूर पसरली आहे.अनेक लोकांना आईंच्या कृपा सामर्थ्याची प्रचिती आजही येते.आईंचे चरित्र इतके अलौकिक आहे की त्यातुन प्रत्येक वेळी प्रत्येकाला काही तरी मिळतच मिळतं.आईंचे चरित्र जवळपास ७०० पानांचे आहे.त्यामुळे त्यातील आईंनी लोककल्याणासाठी किंवा भक्तांना दु:ख मुक्त करण्यासाठी केलेल्या दिव्य लिला या लेखात घेता आल्या नाही .तरी पुढे आईंच्या चरित्रावर लेख लिहीता आला तर त्यात काही ठळक व महत्वाचे प्रसंग जरुर मांडण्याचा प्रयत्न करेन.आज ललिता पंचमी सद्गुरु कलावती आईंच्या या दिव्य चरित्राचे स्मरण करुन त्यांनीच लिहून घेतलेली ही शब्दसुमनांची त्यांच्याच श्रीचरणी अर्पण करतो.आईंनी आपल्या सर्वांवर अखंड कृपा करुणा करावी हीच प्रार्थना करुन इथेच थांबतो.

            ✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

#श्रीदत्त_शरणं_मम🌺🌸🌿🙏

#महाराज_ज्ञानेश्वर_माउली_समर्थ🌺🌸🌿🙏


Wednesday, September 28, 2022

प्रणम्या मातृदेवता माळ ४ :-अलौकीक श्रीस्वामीतनया🌺🌸🙏🚩


प्रणम्या मातृदेवता :- माळ ४

   
    🍃🌺🙏 अलौकीक श्रीस्वामीतनया 🙏🌺🍃

आज अश्विन शुद्ध चतुर्थी म्हणजे नवरात्रातील ४ था दिवस.आपल्या या "प्रणम्य मातृदेवता" लेखमालेतील चतुर्थ शब्दसुमनांची माळ.ही माळ आपण भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या परंपरेतील अतिशय थोर संत ,महान विभूती असलेल्या भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु मातु:श्री श्री पार्वती देवी देशपांडे यांच्या चरणी अर्पण करणार आहोत.प.पू.पार्वती मातु:श्री या थोर दत्तावतारी महापुरुष योगीराज सद्गुरु श्री मामा साहेब देशपांडे महाराजांच्या आई आहेत.प.पू.सद्गुरु मातु:श्री या अतिशय प्रसिद्धीपराङमुख अशा विभूती होत्या.त्यांनी आपले दिव्यत्व कधीही कुणालाही कळू दिले नाही.त्यांचे "श्रीस्वामीतनया" हे दिव्य चरित्र प.पू.श्री मामा साहेब देशपांडे महाराजांच्या उत्तराधिकारी व परम शिष्या सद्गुरु मातु:श्री श्री शकुंतला ताई आगटे यांनी लिहिले आहे.एका संतांनी दुसर्या संताचे चरित्र लिहिलेले आहे यावरुन त्या चरित्राचे महत्व लक्षात येते.आपण जरुर एकदा ते चरित्र वाचाच असा मी आग्रह करेल इतके ते विलक्षण आहे.मी मातु:श्रींच्या लेखाला "अलौकिक श्रीस्वामीतनया" असे नाव दिले आहे.त्याचे कारण आपल्या मातु:श्रींचे चरित्र वाचल्यावर जरुर कळेलच.प्रत्यक्ष परब्रह्म श्रीस्वामीरायांनी ज्यांना "माझी लेक" म्हटले अशा मातु:श्रींनी केलेला संसार,केलेली उपासना, त्यांनी केलेली दिव्य साधना, त्यांचे साधनेप्रती असलेले नितांत प्रेम, ज्ञानेश्वरी वर असलेला अधिकार व एकंदरीतच त्यांचा असलेला दिव्य जिवन प्रवास बघितला तर हे कुणालाही अतिशय दिव्य आणि अलौकिकच भासेल.मातु:श्रींच्या या सुंदर चरित्राचे स्मरण आपल्या सर्वांना जिवनातील पाथेयच ठरणार आहे यात शंकाच नाही.या दिव्य चरित्राचे स्मरण करुन आपल्या या आगळ्या वेगळ्या उत्सवाच्या आनंद सोहळ्याला आज द्विगुणित करुयात.
                                    

परमपूज्य मातु:श्रींचे घराणे हे मुळचे अक्कलकोट येथील.त्यांचे वडिल श्री नारायण उमाकांत सोनटक्के हे अक्कलकोटच्या राजांचे दरबारी वाकनीसपदी कार्य करीत.ते अतिशय सात्विक वृत्तीचे व धर्मनिष्ठ असे व्यक्ती होते.याच काळात भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज हे सदेही अक्कलकोट येथे वास्तव्य करुन होते.श्रीनारायणराव सात्विक व धार्मिक असल्याने ते श्रीस्वामी चरणी अनन्य शरणागत झाले‌ व त्यांचे परमभक्त बनले.या नारायण रावांना एक मुलगा होता ज्यांचे नाव "नरहरी" व एक मुलगी जिचे नाव "बाई" असे होते.याच बाई म्हणजे आपल्या पार्वती मातु:श्री आहेत.स्वामी कृपेने नारायणभट्टांकडे उत्तम वैभव,संपत्ती स्थिर झाली होती.अंदाजे इ.स १८७७ या साली श्री नारायणभट्ट नेहमी प्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला गेले.त्यांनी स्वामीरायांचे दर्शन घेतले व ते हात जोडून बाजूला उभे राहिले.तोच स्वामी महाराजांनी त्यांच्या कडे बघितले व एकदम आदेश दिला, "ए नाऱ्या ! इथून ऊठ,निघ आणि जा पुण्याला.येथे राहू नकोस.!" नारायणराव हे तयारीचे शिष्य होते.आपल्या सद्गुरुंची आज्ञा त्यांनी तात्काळ मान्य केली.पण सद्गुरुंचा वियोग होणार या कल्पनेने त्यांना एकदम रडूच कोसळले.ते तात्काळ घरी आले व आल्या पत्नी ,मुलांना बरोबर घेऊन मठात परतले.उभयता दाम्पत्यांनी श्रीस्वामीरायांच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत घातला व पुण्यास जाण्याची आज्ञा मागितली.त्यांची निष्ठा बघून श्रीस्वामीरायांना अपार आनंद झाला.अतिव प्रेमाने त्यांनी नारायणरावांना जवळ घेतले व त्यांच्या मस्तकी पूर्ण शक्तीयुक्त कृपाहस्त ठेवला.त्याच वेळी त्यांनी नारायण भट्टांवर पूर्ण कृपा केली.तसेच परंपरेचे अधिकारही त्यांना स्वामींनी दिले होते.त्यांना आशिर्वाद, प्रसाद देऊन पुण्यास जाण्याची परवानगी दिली.तेवढ्यातच स्वामीरायांनी लहानग्या बाईस आपल्या उजव्या मांडीवर बसविले.कौतुकाने तिचा चेहेरा कुरवाळला व म्हणाले , "ही आमची पोर आहे बरे का!"  पुढे स्वामींनी अक्कलकोट संस्थानच्या महाराजांचे धाकटे बंधू तुळोजीराव यांना सांगून नारायणभट्ट व परिवाराची पुण्यात पूर्ण व्यवस्था करण्याची आज्ञा केली.पुण्यात कसबा पेठेतील अक्कलकोटकरांच्या वाड्यात ही सर्व मंडळी राहू लागली.श्रीनारायणराव येथेही आपल्या नित्य साधनेत,धर्मकार्यात मग्न असत.हेच संस्कार दोन्ही मुलांवर ही होत होते.बाईं तर आधीच सात्विक वृत्तीच्या होत्या त्यामुळे लहानपणीच त्यांना भगवद्गीता,रामरक्षा अनेक स्तोत्रे तोंडपाठ होते‌.आईने त्यांना कामात ही निष्णात केले होते. शके १८०० चैत्र वद्य त्रयोदशीला ,मंगळवारी सायंकाळी स्वामींनी आपला लौकिक दृष्ट्या देह ठेवला.त्यानंतर नारायण भट्टांना आपल्या दोन्ही पोरांना अनुग्रह दिक्षा देण्याची आज्ञा केली.एके दिवशी पुनर्वसु नक्षत्र होते.अतिशय उत्तम मुहूर्त होता.श्रीनारायण भट्टांनी आपल्या दोन्ही मुलांना म्हणजे बाईला व नरहरी ला शक्तिपात दीक्षा दिली.अनुग्रहा नंतर बाई साधनेत व ईश्वर स्मरणात राहू लागल्या.त्या अधिकच गंभीर व अंतर्मुख झाल्या.


यथावकाश बाईचे वय नऊ वर्षांचे झाले.त्यामुळे नारायणरावांना आता त्यांच्या विवाहाचा विचार करु लागले.शोधाशोध केल्यावर नसरापूरच्या राघो निळोपंत देशपांडे यांचे घराणे मिळाले .त्यांचा मुलगा "श्रीदत्तोपंत" हा अतिशय धार्मिक व सात्विक वृत्तीचा असल्याची माहिती नारायणरावांना मिळली.विवाहाची बोलणी सुरु झाली आणि बाईचा व दत्तोपंतांचा विवाह ठरला.बाई लग्न करुन देशपांडे यांच्या घरात सुन म्हणुन आल्या.लग्नानंतर गृहप्रवेश करतांना त्यांचे नाव "पार्वती" असे ठेवण्यात आले.श्रीदत्तोपंत हे अतिशय धार्मिक,सरळ व सात्विक वृत्तीचे होते.श्रीदत्तोपंतांना सर्व लोक "दत्तूअण्णा" म्हणत असत.पंचम दत्तात्रेय अवतार सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचा पूर्ण कृपानुग्रह त्यांना प्राप्त झाला होता.भोरच्या "दत्तमहाराजांकडे" त्यांचे वरचेवर जाणे असे‌.श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दर पौर्णिमेला वारीला जाण्याचा दत्तूअण्णांचा नित्यनेम होता.असे हे परम धार्मिक भगवंतांच्या स्मरणात रंगलेले दाम्पत्य आनंदी व समाधानी जिवन व्यतित करु लागले.पार्वती मातु:श्रींच्या सासुबाई जानकीबाई या अतिशय उत्तम व्यक्तीमत्वाच्या स्त्री होत्या.त्यांना समाजकार्य करण्याची अतिशय आवड होती.त्यांना औषधांचे उत्तम ज्ञान होते.त्या नाडी परिक्षण करुन अनेकांना औषध देत.त्यामुळे कित्येक लोकं व्याधीमुक्त झाले.पुढे त्यांनी ही आपली विद्या पार्वती मातोश्रींना दिली होती.एकदा त्यांनी परिक्षा घेण्याकरिता पार्वती मातोश्रींना विचारले, "तुला ह्यातले काय हवे ते सांग.मी देते.!" त्यावर  मातोश्री म्हटल्या , "सासूबाई ,मला तेवढी देव्हार्यातील मारुतीची मुर्ती द्याल का?" हे उत्तर ऐकून जानकी बाईंना सुखद धक्काच बसला.आपल्या सात्विक सुनेचे हे उत्तर ऐकून हीच आपली विद्या देण्यास योग्य आहे हे त्यांनी तात्काळ ओळखले.दत्तूअण्णांचा अधिकार इतका विलक्षण होता की ,ते पुजा करत असले की प्रत्यक्ष देव प्रगट होऊन त्यांच्याशी वार्तालाभ करित असत आणि मातोश्री त्यांचा हा संवाद नित्य ऐकत अस. पण या आनंदी संसाराला एकच शल्य होते ते म्हणजे यांना होणारी संतती ही अल्पायुषी ठरत होती.दत्तूअण्णांची नृसिंहवाडीची पौर्णिमेची वारी सुरुच होती.यावेळी ते पार्वती मातुश्रींना बरोबर घेऊन नृसिंहवाडी येथे गेले.उभयतांनी श्रीपादुकांसमोर आपल्या हृदयातील गार्हाने मांडले.मातोश्रींना तात्काळ श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांकडे जाण्याचा आदेश मिळाला.दोघेही ब्रह्मानंद स्वामींच्या मठात आले व त्यांनी आपल्या मनातील शल्य स्वामी महाराजांपुढे मांडले.त्यानंतर श्री स्वामी महाराजांनी उभयतांना , "काळजी करु नये.दिर्घायू अपत्यप्राप्ती होईल." असा आशिर्वाद दिला.पार्वती मातु:श्रींना काही काळाने गर्भ राहिला.यथावकाश प्रसुतीची वेळ आली.पोट दुखण्यास सुरुवात झाली.प्रसुती कळा असह्य झाल्यावर मातोश्रींनी श्रीस्वामी महाराजांचे स्मरण केले.तोच स्वामी महाराज मातु:श्री समोर प्रगटले व "गुरुवारी आमच्याच पूर्णांशाने मुलगा होईल.काळजी करु नकोस.त्याचे नाव श्रीपाद ठेवा!" असे सांगितले.इकडे नर्मदा तिरी ,स्वामी महाराज प्रतिपदा सुरु होताच समाधिस्थ झाले व इकडे त्याच क्षणी मातोश्रींनी एका मुलाला जन्म दिला.जे पुढे प.पू.श्रीमामा साहेब देशपांडे या नावे जगविख्यात झाले.मातु:श्रींना श्रीस्वामी महाराजांचा आशिर्वाद ज्ञात होताच आणि त्यांना माहिती होतेच की श्रीपाद हे स्वामी महाराजांचा आशिर्वाद आहे आणि पुढे जाऊन हा मुलगा मोठा थोर कार्य करणार आहे.


यानंतर ही मातु:श्रींचा नित्यनेम चालू होताच‌.त्या अतिथी अभ्यागताचे आगत्य सेवाभावाने करीत असत.सर्वांचे जेवण उरकल्यावर त्यांचा रोज नित्यनेमाने देवदर्शनाला जाण्याचा नेम होता.त्या रोज बनेश्वर महादेव व विठोबाच्या दर्शनासाठी जात.त्यांची कुत्री चंपा ही त्यांच्या बरोबर जात असे.मातु:श्री सोवळ्यात असल्याने चंपीला त्या न शिवण्याचे सांगत व ती कुत्री प्राणी असल्यावरही एखाद्या शहाण्या सारखे मातोश्रींचे ऐकत असे.परत येऊन घरातील आवर सावर झाली की मातोश्री एकांतात बसुन ध्यान,मनन,चिंतन करित असत.योग्यांची सर्व लक्षणे मातोश्रींच्या ठाई प्रगट रुपाने वास्तव्य करुन होते.त्या कुठल्याही स्थितीत अत्यंत शांत असत.त्यांची साधना कधीही कसल्याही प्रसंगी चुकली नाही.त्यांचा अधिकार इतका विलक्षण होता की श्री भगवंत त्यांच्या बरोबर नित्य अखंड असत.फावला वेळ मिळाला की त्या श्रीभगवंतांशी संवाद साधत असत.सद्गुरु मामांवर अतिशय कटाक्षाने त्यांचे लक्ष असे.आई वडिलांच्या उत्तम संस्कारात श्रीपादांची उत्तम प्रकारे जडण घडण होत होती.पार्वती मातु:श्रींचा अधिकार किती विलक्षण होता याचे एक उत्तम उदाहरण चरित्रात आले आहे.शेजारील नायगांव गावातील काही मंडळी एका मुलाला घेऊन पार्वतीबाईंकडे आली.तेव्हा तो मुलगा उपचारा पलीकडे गेला होता.तरी सुद्धा यावर एक विशिष्ट औषध मिळते का? हे बघण्यासाठी त्यांनी श्रीपादास गावात पाठवीले.ते न मिळाल्याने मातोश्रींनी गाणगापूर चे भस्म सद्गुरुंचे स्मरण करुन त्या मुलाला लावले व पुडी बरोबर दिली.याने मृत्यू च्या दारात गेलेला तो मुलगा काही वेळातच परतला.मंडळी हसत खेळत मुलाला घेऊन घरी परतली‌.त्या आपल्या या वैद्यकीय ज्ञानाने निःशुल्क सर्वांना मदत करित असत.तसेच दुपारी गावातील स्त्रीयांना त्या ज्ञानेश्वरी चा अर्थ अगदी सोप्या शब्दात समजावून सांगत असत.विशेष म्हणजे त्या हा अर्थ शिकायला कुठेही बाहेर गेल्या नव्हत्या.त्यांना हा गुढार्थ आपल्या अखंड चिंतन व मननातून उलगडला होता.साधनेतून याला त्यांना स्वानुभवाची ही जोडी मिळत गेली होती.लौकिकात तर पार्वती मातु:श्री निरक्षर होत्या.पण त्यांना ज्ञानेश्वरी वर बोट ठेवल्याबरोबरच कुरुक्षेत्रावरील दृश्य दिसत असे.हेच त्यांच्या निरीक्षर असुनही ज्ञानेश्वरी वाचता लिहीता येण्याचे गुढ होते व त्याचा अनुभव त्यांनी बाळ श्रीपादला ही दिला होता.अखंड साधना, तपश्चर्येमुळे मातु:श्रींना वाचासिद्धी प्राप्त झाली होती.आपल्या सासुबाईकडून त्यांना ज्योतिष विद्या मिळली होतीच.त्यामुळे त्यांचा होरा हा तंतोतंत खरा होत असे.


यथावकाश मोठा मुलगा गोविंद याचे लग्न झाले व सुन आली.मुलगी अनसुया यांचे लग्न बेळगाव येथील कुलकर्णी यांच्याकडे झाले.मातु:श्री प्रपंच अगदी नेटाने व शांत राहून करीत.कुठल्याही प्रसंगी त्यांचा समतोल ढळलेला दिसत नाही.हे सर्व त्यांनी अखंड साधनेने मिळवले होते.अखंड भगवद स्मरणात राहल्याने त्यांच्या वृत्तीही भगवतरुपच झाल्या होत्या.आपली आई एकांतात काय साधन करते हे मामांना बघायचे होते.त्यांनी रात्री एकांतात मातु:श्री जपास बसल्या की बघण्याचे ठरविले.रात्री बघतात तर मातु:श्रींच्या ठाई मोठा प्रकाश झोत प्रगट झालेला होता.त्या प्रकाशात भगवान श्रीकृष्ण गोपीकांसमवेत फेर धरुन नाचत होते‌ व त्यात मातु:श्री ही होत्या.मामांनी नंतर मातु:श्रींना याबाबत विचारले तेव्हा त्यांनी याची वाच्यता न करण्यास मामांना सांगितले.सन १९२८ साली दत्तूअण्णांनी देवांच्या आज्ञेनुसार योग मार्गाने आपल्या नश्वर देहाचा त्याग केला.त्यानंतर मातु:श्रींना आपल्या अंगावरील कपड्यानिशी घरदार सारे सोडावे लागले.पण इतक्या भिषण स्थितीत ही त्या डगमगल्या नाहीत. "हरीची इच्छा" असे म्हणून त्या शांत होत्या.अशातच भगवान अक्कलकोट स्वामी महाराज प्रगटले व मातु:श्रींना म्हणाले, "बाई आता तुला दारिद्र्याचे दशावतार बघायचे आहेत." त्यावर मातु:श्री म्हणाल्या, "देवा आपण सोबत असता मी दारिद्र्याचे दशावतार काय तर शतावतार ही आनंदाने बघेल." हे आपले शब्द मातु:श्रींनी तंतोतंत खरे करुन दाखविले.त्या मुठभर पोहे खाऊन राहिल्या ,वेळेप्रसंगी पाण्यावर राहिल्या पण त्यांनी कुणाही पुढे हात पसरविला नाही.घरातून निघाल्यावर मातु:श्री पुण्यात आपल्या भावाकडे आल्या.चहुकडून संकट कोसळत होते.दत्तूअण्णा गेलेले, दोन मुले १४ चा श्रीपाद आणि ५ वर्षांचा यशवंत,एक नातू घरात कर्ते कुणीही नाही .अशा परिस्थितीत त्यांनी मार्ग मिळावा यासाठी स्वामीरायांचे ध्यान आरंभिले.काही वेळाने स्वामी प्रगटले व "आम्ही पाठीशी आहोत" असे आश्वासन देऊन गुप्त झाले.मातु:श्रींना या मुळे मोठा धीर मिळाला .अशा बिकट परिस्थितीत ही त्या मामांना म्हणजे श्रीपादा ला उत्तम पारमार्थिक शिक्षण त्या देतच होत्या.अगदी समाधानी वृत्तीत मातु:श्री सर्व संसार करित होत्या.आलेल्या परिस्थितीला धीरोदात्त पद्धतीने सामोरे जाऊ लागल्या.मामा मोठे झाल्यावर वेगवेगळ्या नोकरी करुन आपल्या आईला हातभार लावू लागले.त्यानंतर थोडी परिस्थिती ठिक झाली. एवढ्या बिकट परिस्थितीत ही त्यांची बैठक साधना कधीही चुकली नाही.हीच साधनेची गोडी त्यांनी मामांनाही अनुभव देऊन लावली. नागपंचमीला नागनाथ पार येथे नाथपंथी साधुंना शिधा देण्याची प्रथा मामांकडे होती.नरहरी मामा ती शिधा नागनाथपार ला घेऊन जात असत.रात्री श्री स्वामी महाराज स्वतः मातु:श्रींकडे प्रगट होत व शिधा पोचल्याची पावती देत.मामांनी आपल्या आईला पार्वती मातु:श्रींना एकटे रिकामे कधीही बघितले नव्हते.त्या सदैव काहीतरी करत असत.त्यांचा रात्रीचा दिनक्रम असा की ,रात्री आठ‌ ते अकरा त्या वेळेस बैठकीस बसत असतं.अकरा वाजता उठून हातपाय धुवून थोड पाणी पित व नामस्मरण करित येरझारा घालित. परत रात्री साडेअकरा ते अडीच साधना मग परत पाणी पिऊन येरझार्या.त्यानंतर तिन ते पाच पुन्हा साधन. दत्तूअण्णा  गेल्यावर मातु:श्रींनी जमिनीला कधीही परत पाठ लावली नाही.इतके कठोर साधना त्यांनी आजिवन पुढे केले होते‌.मातु:श्री तिर्थयात्रेला गेल्यावर त्यांनी मामांना तेथुन ध्यानात आपली सर्व तिर्थयात्रा ,तेथील क्षेत्र दाखविले होते.त्यांनी मामांना ज्योतिष शास्त्राचे ही मार्गदर्शन केले होते.त्यांनी मामांचे त्याकाळी लग्नं ही लावून दिले होते.


एके दिवशी मातु:श्री विलक्षण आनंदात होत्या त्यांनी मामांना जवळ बसविले व डोळे मिटण्यास सांगितले."डोळे मिट"म्हटल्यावर मामांनी डोळे मिटले व मातु:श्रींनी त्यांच्या डोक्यावर आपला कृपेचा सिद्धहस्त ठेवला.तत्क्षणी मामांचे देहभान हरपले व ते प्रगाढ समाधीत स्थिर झाले.मामांना निर्विकल्प समाधी लागली होती.ते त्या अवस्थेत जवळपास पाच तास होते.त्यानंतर अतिव आनंदात त्यांनी डोळे उघडले व समोर बसलेल्या मातु:श्रींच्या चरणी आपले मस्तक ठेवले.पुढे बारा वर्षांनी तुला असाच अनुभव एका महापुरुषाच्या सानिध्यात येईल व‌ तेच तुझे सद्गुरु.स्त्रीयांना शक्तीपात दिक्षा देण्याचा अधिकार आहे पण बिज मंत्र देता येत नाही.त्यामुळे ते सत्पुरुष तुला परंपरेचा बिज मंत्र देतील व कृतार्थ करतील.मातु:श्रींचे दोनच शिष्य  होते एक तर झाडूवाली महारीण व दुसरे प्रत्यक्ष मामा.त्या झाडूवाल्या बाईचे निस्सीमपणे भगवत स्मरणात स्थिर असणे हा एक अलौकिक चमत्कारच होता. त्यांनी मातु:श्रींची कृपा संपादन केली होती. मोठ्या मोठ्या महापुरुषांनाही कठीण अशा प्रकारे मातु:श्रींनी योग मार्गाने देह ठेवला.
२७ नोव्हेंबर १९४१ साली मातु:श्री मामांना म्हणाल्या , "सख्या तुला योगी कसा देह ठेवतात हे पहायचे आहे ना? मग बस इथे निट ध्यान लावून बघ." स्वतः पार्वती माता ऊर्ध्व मुद्रा लावून बसल्या.थोड्याच वेळात त्यांच्या मस्तकातून एक निळ्या तेजाची ज्योत आकाशाकडे जाता़ंना दिसली.हा सर्व दुर्लभ सोहळा बघतांना ,मामांना कुठेही जाणवले नाही की हा तर "मृत्यू" आहे.त्यांच्या डोळ्यासमोर फक्त ते तेजच तरळत होते.यातून बाहेर आल्यावर त्यांच्या लक्षात आले की आपल्या मातु:श्रींनी सिद्धमार्गाने आपले प्राण अनंतात विलीन केले आहे.मामांवर जणू अचानक दु:खाचा डोंगरच कोसळला पण यातून ही सावरत त्यांनी आपल्या आईचे और्ध्वदेहीक यथाशास्त्र पार पाडले.मातु:श्रींची चिता जळत असतांना सबंध आसमंतात दिव्य चंदनाचा सुंगंध सुटला होता.तो सुगंध इतका तिव्र होता की दूरुन लोक तो सुगंध कुठून येतो आहे हे बघायला धावले. या दु:खाचा आवेग काही केल्या कमी होत नव्हता.अशा मनस्थितीत मामा एकदा नसरापूर येथील स्मशाना जवळील नदीकाठी जाऊन बसले.त्यांचा दु:खातिरेक कमी होत नव्हता तेव्हा अशातच त्यांच्या पुढे वृंदावनात सुरु असलेली भगवतांची रास लिला प्रगट झाली.मामांनी ते दिव्य दृश्य बघितल्यावर त्यांचे दु:ख कमी झाले.हे घडविण्यामागेही मातु:श्रींचीच लिला होती.पुढे ही मातु:श्री मामांना मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी त्यांना दर्शन ,दृष्टांत देत असत. पुढे बरोबर बारा वर्षांनी मामांना त्यांचे सद्गुरु योगीराज श्री गुळवणी महाराज भेटले व त्यावेळी ते मामांना म्हणाले होते की, "तुमच्यावर सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज व आपल्या मातु:श्रींची पूर्ण कृपा आहे!" अशा प्रकारे अनंत गुणांनी मंडित असलेल्या या मातु:श्री आपल्या सर्वांना साधना मार्गावर अविरत चालण्याची बुद्धी देवोत हीच माझी श्रीचरणी प्रार्थना.


          ✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️
  

#श्रीदत्त_शरणं_मम🌸🌿🙏🚩

#महाराज_ज्ञानेश्वर_माउली_समर्थ🌸🌿🙏🚩


Tuesday, September 27, 2022

प्रणम्या मातृदेवता माळ ३ 🌸कृपेची सावली :-श्रीजानकी आई🙏🌸

 


प्रणम्या मातृदेवता :- माळ ३

    🌸🙏कृपेची सावली :-श्रीजानकी आई🙏🌸

                              
आज अश्विन नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजेच तिसरी माळ.या परम पावन दिनी आपल्या या “प्रणम्या मातृदेवता” लेखमालेत आपण गुजरात मधील पण महाराष्ट्र जन्माला आलेल्या मराठी असलेल्या अतिशय अलौकीक संत सद्गुरु श्री जानकी मातोश्री यांच्या दिव्य चरित्राचे चिंतन,स्मरण करणार आहोत.सद्गुरु जानकी मातोश्रींना त्यांचे भक्त "बायजी" या नावाने संबोधतात. जानकी मातोश्री या अलिकडच्या काळात होऊन गेलेल्या अतिशय दैवी अशा आदिशक्ती अवतारच होत्या.ज्यांच्या चरणधुळीने गुजरातमधील गणदेवी हे छोटेसे गावही परम पवित्र तिर्थक्षेत्र बनले.

  
प.पू श्री जानकी मातोश्रींचा जन्म महाराष्ट्रातील महाड तालुक्यातील पोलादपूर या गावात झाला.त्यांचे नाव आई वडिलांनी "दुर्गा" असे ठेवले होते.या बाळ दुर्गेची आई लहानपणीच निवर्तल्यामुळे पुढे वडिलांनी तिला तिच्या आजी आजोबांजवळ मालुस्ते या गावी धाडले.आजी आजोबा बाळ दुर्गेवर अतिशय प्रेम करीत.चंद्रकलेप्रमाणे बाळ दुर्गा वाढू लागली. पण ती इतर तिच्या समवयस्क मुली प्रमाणे खेळण्यात रममाण होत नसे.तिची वृत्ती सदैव अंतर्मुख झालेली असे.तिला देवपुजा करायला फार आवडत असे.ती तासंतास देवपूजेत मग्न होई. मालुस्त्याची ग्रामदेवता मालजाई आई यांची नित्य पुजा करण्या करिता बाळ दुर्गा बालपणापासून जाऊ लागली.आजोबांकडून कधी कधी देवांकरीता दुर्गा दुध घेऊन जाऊ लागली.पुढे ती नित्य दुध नेऊ लागली.परंतु आजोबांना याबद्दल शंका आली व बाळ दुर्गा या दूधाचे काय करते हे बघण्यासाठी ते तिच्या मागे मागे जातात.बघताता तर आश्चर्याने ते स्तंभीतच झाले.देवीची पुजा केल्यावर बाळ दुर्गा ते दुध घेऊन शिवमंदिरात गेली,शिवमंदिरात गेल्यावर तिने ते दुध शिवपिंडी जवळ ठेवले.ठेवल्यावर एक मोठा भुजंग कुठूनतरी आला व त्याने ते दुध पिले व दुर्गाने त्या भुजंगाला नमस्कार केला व तो शांतचित्ताने निघून ही गेला. अशा प्रकारच्या अनेक दिव्य लिला मातोश्रींच्या चरित्रात घडल्या आहेत.त्यातील एक विलक्षण लिला म्हणजे, नवरात्रीचे दिवस आले.गावातील सर्व लहान मुले व दुर्गा ही खेळावयास गावाबाहेरील आळूच्या झाडाजवळ गेले.सायंकाळ झाल्यावर सर्व मुले आपल्या घरी परतले पण दुर्गा बाळ मात्र त्यांच्या बरोबर नव्हती.अंधार पडत चालला होता. अजुन दुर्गा घरी आली नाही म्हणून आजी आजोबांना चिंता वाटू लागली.गावकरी गोळा झाले,सर्वांनी शोधाशोध केली पण दुर्गा काही दिसली‌ नाही.लोकांना वाटले एखाद्या श्वापदाने दुर्गेला पळविले.घरी तर आकांत उठला होता.अशा प्रकारे काही दिवस लोटले तरी दुर्गेचा पत्ता लागला नाही,घरच्यांनी आशाच सोडली.तेवढ्यातच एका गावकर्याला बाळ दुर्गा कडाप्याच्या देवी मंदिरात दिसली.तो धावतच गावात आला व हे वृत्तांत आजोबांना सांगितले.सर्व धावतच मंदिरात पोचले.दुर्गा कालिका देवीजवळ गाढ झोपली होती.आजोबांनी तिला सावध केले व घरी घेऊन आले."बाळ तु कुठे गेली होती?" असे विचारल्यावर दुर्गा म्हटली, "मी आई जगदंबे सोबत खेळायला गेली होती.तिथे मला सर्व देवी भेटल्या.त्यांनी मला उचलून कडेवर घेतले व  त्यांच्या सोबत त्यांच्या स्थळी नेले.एवढ्या दिवस त्यांनी मला आपल्याकडेच ठेऊन घेतले होते.आम्ही सर्व रास-दांडिया खेळलो.त्यांनी मला मिष्ठान्न खावयास दिले.सर्व आनंदी आनंद चालला होता.मला घरी यायला नको वाटतं होते.मी मला परत न पाठविण्याचा हट्ट देवी जवळ केला तेव्हा आई जगदंबा म्हटली ,मी नित्य तुझ्या सोबत राहणार आहे.तुझ्यासोबत तुझ्या सुख दुःखाचा अनुभव घेईल.तुझी किर्ती मला डोळ्यांनी बघायची आहे.माझ्या आशिर्वादाने तुझी किर्ती जगभर गाजेल.असे सांगुन देवीने मला मंदिरात आणून सोडले.जेव्हा जाग आली तेव्हा तुम्ही समोर होते." त्या दिवशी पासून दुर्गेचे असामान्यत्वाची जाणिव सर्वांना व्हायला लागली.अशा प्रकारे विलक्षण बाल‌लिला  मातोश्रींच्या चरित्रात आल्या आहेत.
              
              

 शुक्ल पक्षाच्या चंद्राप्रमाणे दुर्गा वाढू लागली.दुर्गा मातोश्रींचे तारुण्यात पदार्पण झाल्यावर   आजोबांना त्यांच्या लग्नाची फार चिंता वाटू लागली.घरी अठरा विश्वे दारिद्र्य असल्याने त्यांच्या पुढे हा मोठा प्रश्न उभा राहिला.घरी इतके भिषण दारिद्र्य होते की एकवेळचे अन्नही काम केल्या शिवाय मिळत नसे.त्यामुळे आता उत्तम वर दुर्गेला कसा मिळेल याची काळजी आजी आजोबांना लागुन ते अगदी अस्वस्थ झाले होते.अशा ही परिस्थितीत दुर्गा समाधानी वृत्तीने राहत असे.हीच वृत्ती संत सखु,बहिणाबाई ,मुक्ताई ,जनाबाई या संतांचीही स्थिर होती.पुढे दुर्गा मातोश्रींना नाडसुरचे सुळे देशमुखांचे स्थळ स्वतः सांगून आले व यथाकाळी दुर्गामातोश्रींचा विवाह शांताराम सुळे यांच्याशी पार पडला.लग्न झाल्यावर सासरी दुर्गेचे आता जानकी हे नाव बदलण्यात आले.याच नावाने आज मातोश्रींची किर्ती गाजत आहे.लग्नानंतर घरी अठरा विश्वे दारिद्र्य होतेच.पण जानकी मातोश्री या ही परिस्थितीत समाधानी वृत्तीने राहत होत्या.एकीकडे पतिदेवांचा शिघ्रकोपी स्वभाव तर दुसरी कडे घरी दु:ख अशी दुहेरी परिस्थिती.पुढे कामास्तव जानकी आई आपल्या पति श्रीदादांबरोबर महाराष्ट्र सोडून गुजरात ला गणदेवी या गावी आले.येथे गणदेवींच्या आशिर्वादाने त्यांच्या पतिदेवांचे चांगले बस्तान बसले.पण सासरी बरेच आप्त येऊन राहत असत.त्यातच नणंदेचा अकस्मात मृत्यू झाल्यावर तिचे लेकरं ही जानकी मातोश्रींच्या घरीच आले.त्यामुळे दादा ( जानकी मातोश्रींचे पती) यांचा पगार अपुरा पडू लागला.इतक्या अडचणीच्या परिस्थिती ही मातोश्री शांत असत.कित्येक वर्ष मातोश्री एकच लुगडे नेसत,शिंप्याकडून चिंध्या आणून त्याची चोळी करुन घालत.एकदा जानकी मातोश्री आजारी पडल्या व त्यातुन परत ठिक झाल्या जणू ही त्यांच्या दिव्य कार्याची सुरूवातच ठरली.हळूहळू घरातील आर्थिक परिस्थिती ठिक होतं गेली.पुढे अनाकलनीय अशा लिला मातोश्रींच्या चरित्रात घडलेल्या होत्या.अनेक लोकांना मातोश्रींनी लिलया दु:खमुक्त केले.


पुढे दरुवाड्यात दादांनी घर घेतले व सर्व परिवार तेथे राहण्यास गेला.ते घर प्रशस्त जरी होते तरी आजुबाजुला कुणीही राहत नसत.त्याचे कारण म्हणजे सभोवतालच्या जागेवर भुतांचा वावर होता.जवळ असलेल्या राजपुतांच्या वस्तीतील लोकांचे पुर्वज युद्धात तेथे मरण पावले होते.तेच अतृप्त आत्मे तेथे भुतं म्हणून वावरत आणि लोकांना त्रास देत असत.याचा त्रास दादा व मातोश्रींना खुप दिवस झाला पण त्या स्वस्थ होत्या.पण अचानक एके दिनी दादांच्या जिवावर बेतले व त्यामूळे मातोश्रींना संताप आला.त्यांनी एका दृष्टीक्षेपात त्या सर्व भुतांना बंधन घातले व त्यांची सीमा नदीपलि कडे निश्चित केली.एकदा मातोश्री दारात उभ्या असता एक भविष्य वर्तवणारा व्यक्ती आला.तो मातोश्रींना भविष्य वर्तविण्यासाठी हात पुढे करण्यास म्हणू लागला.तोच मातोश्री म्हटल्या ,तो समोर व्यक्ती दिसतो आहे त्याचे भविष्य वर्तव.त्याने समोर बघितले तर समोर असंख्य भुते नाचत होती.तो ते दृश्य बघून किंचाळला ,त्याला घाम फुटला व भितीने त्याला कापराच सुटला.तो व्यक्ती तेथून निघून गेल्यावर मातोश्रींनी सांगितले की हे युद्धात मृत पावलेले अतृप्त आत्मे आहेत.हे आत्मे रोज सायंकाळी मातोश्रींना मुक्ती देण्याची प्रार्थना करित.पुढे जानकी मातोश्रींनी या सर्वांना मुक्ती प्रदान केली.एकदा गावात अचानक महापूर आला व सर्व पाणी गावात शिरले.त्या पाण्यासकट असंख्य सर्प ही वस्तीत शिरले.सर्व लोकांना बाहेर पाय ठेवणे ही कठीण झाले.तेव्हा गावातील सर्व स्त्रियांनी मातोश्रींकडे धाव घेतली.मातोश्रींनी देवांचे तिर्थ घेतले व फक्त सात पावले चालत पाण्यात गेल्या.त्यांनी ते तिर्थ पुरात सोडले व तत्क्षणी त्या सर्परुपी भूत प्रेतांना मुक्ती देऊन त्या पुराच्या पाण्याला कमी होण्याची आज्ञा केली.मातोश्रींनी आज्ञा करताच पाणी कमी झाले व सर्वत्र मातोश्रींच्या जयजयकार झाला.मातोश्रींची कीर्ती हळूहळू पसरत गेली.अनेक स्त्रिया मातोश्रींच्या दर्शनास येऊ लागल्या.मातोश्री येणार्या प्रत्येक स्त्रिची नारळाने ओटी भरत असत.घरातील एका कोनाड्यात नारळ ठेवलेले असत व त्यांना लागेल तेवढे नारळ त्या तेथून काढून घेत.एकदा कोनाड्यातला नारळ पाहून दादा कृद्ध झाले‌.त्यांनी तो नारळ उचलून फेकून दिला.पुन्हा पाहतात तर दुसरा नारळ तिथे दिसला.तो ही फेकला तर तिसरा तयार झाला,मग चौथा ,पाचवा असा ढीगच तयार झाला.दादांनी जानकी मातोश्रींजी क्षमा मागितली आणि त्यांनी वंदन ही केले.


मातोश्री अशिक्षित होत्या पण त्यांना जवळपास सर्व भाषा अवगत होत्या.त्यांच्या मुखातून विविध ओव्या आपसूकच सहजपणे बाहेर पडत.त्या आनंदात झोपाळ्यावर बसून ओव्या गात असल्या की अनेक लोकांना त्यांच्या ठाई भगवती आदिशक्ती दुर्गेचे दर्शन होत असे.पुढे अनेक दु:खी पिडीत लोक मातोश्रींना शरण येत व दु:खमुक्त होऊ लागले.मातोश्री ही या सर्वांवर कृपा करीत असत.काही दिवसांनी गावात प्लेगची साथ आली.सर्व लोक भितीने गर्भगळीत झाले.तेव्हा मातोश्रींनी सर्वांना धीर दिला.त्यांनी आपल्या हातात पिठ घेतले व ते गावाच्या सीमेवर टाकले.त्यानंतर गावात कुठेही प्लेगचा संसर्ग झाला नाही.ज्याला प्लेग झाला होता त्याला मातोश्रींनी स्वहस्ते उपचार करुन प्लेगमुक्त केले.असाच प्रसंग साईनाथांच्या ही चरित्रात ही घडला होता.
    
        

  मातोश्री जानकी आईंच्या चरित्रात इतके दिव्य व अनाकलनीय चमत्कार आहेत की बुद्धी स्तिमीत होते.एका शब्द मर्यादा असलेल्या लेखात या दिव्य लिलांचे चिंतन करणे तसेही अशक्यप्राय आहेत.त्यात मातोश्रींच्या चरित्रातील या प्रचंड अनाकलनीय लिलांवर जर चिंतन करण्याचा प्रयत्न केला तर निदान शंभर तरी लेख लिहावे लागतील इतके ते विलक्षण आहे.तरी मातोश्रींच्या अधिकाराची जाणीव होणार्या दोन घटना इथे मुद्दाम मांडतो.एकदा मातोश्रींची एक परिचीत स्त्री अंबाजी व इतर क्षेत्राच्या तिर्थयात्रेहून घरी आली व त्यांच्याकडे प्रवास वर्णन करु लागली.मातोश्रींच्या मुलांना ते अतिशय आवडले व आम्हालाही आई तिर्थयात्रेला घेऊन चल म्हणून ते जानकी मातोश्रींना हट्ट करु लागले‌.मातोश्रींनी त्यांना "माझ्या बरोबर तिर्थयात्रा करण्याचा तुम्हा लोकांच्या जिवनात योग नाही" असे म्हटले व त्या आपल्या कामात व्यस्त झाल्या.सायंकाळ झाल्यावर जानकी मातोश्री अंगणातून येतांना दिसल्या.त्यांच्या डोक्यावर लाल देवी पुजेत वापरतात ती ओढणी/चुनडी होती.त्यांचे ते रुप पाहताच त्यांच्या मुलीला हसायला आले व ती विचारु लागली की आज हे काय रुप घेतले आहे.तेव्हा मातोश्री म्हणाल्या , "मी माउंट अबू येथील अंबा माता मंदिरात जाऊन आली.तेथील जगदंबेने ही ओढणी मला भेट म्हणून दिली आहे.तेथे दर्शन घेऊन मी पावागड येथे गेले.महाकाली मातेस भेटून आत्ताच इथे पोचले आहे.तेथे ही आईने मला ओढणी ,पेढे ,बर्फी दिली व मला आलिंगन देऊन माझी ओटी भरली." आपल्या आईचा हा अधिकार बघून मुलीला अतिशय आनंद व आश्चर्य वाटले.पुढे जानकी मातेने ती ओढणी आपल्या मुलीला प्रसाद म्हणून दिली व ती आजही त्यांच्या घरी जपून ठेवलेली आहे.


एकदा जानकी मातोश्री खुशीत ओव्या पुटपुटत बसलेल्या होत्या.त्या ओव्यातून त्या आई कालीमातेचे वर्णन करत होत्या.ते वर्णन त्यांच्या कन्येने ऐकले व आपल्याला ही जिवनात एकदा तरी आई महाकाली चे असे दर्शन घडावे अशी आईजवळ विनंती केली.काही दिवसांनी मातोश्रींनी कन्येला बोलाविले व आपण तुझ्यासाठी काली मातेला घरी बोलावले आहे तेव्हा आता मनसोक्त दर्शन घे असे सांगितले.बघते तर पुढे अष्टभुजा,काळी कांती असलेली,जिभ बाहेर‌ असलेली, सालंकृत भगवतीची मूर्ती बघून कन्येला कापरा भरला ,भोवळ‌ येऊन ती त्याक्षणी खाली पडली.भगवती काली मातेचे ते दिव्य रुप ती नाही बघू शकली.काही वेळाने ती शुद्धीस आल्यावर तिने आपल्या मातोश्री जानकी आईंचे चरणच धरले व आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी कोटी कोटी धन्यवाद दिले.त्यानंतर ती आपल्या मातोश्रीस शरणं गेली व प्रत्यक्ष भगवती महाकाली ला आपल्या भेटीसाठी बोलावणार्या मातोश्रींचा अधिकार किती थोर असेल याचा विचार करून धन्य झाली.जानकी मातोश्रींचे एक गुप्ते नावाचे नातेवाईक होते त्यांना जन्मांध मुलगा झाला.त्याचा हा दोष घालविण्यासाठी त्यांनी अनेक उपाय केले पण सर्व व्यर्थ.मग त्यांनी जानकी मातोश्रींना बोलाविले.मातोश्रींनी त्या बालकाला मांडीवर घेऊन त्याला त्याच्या नावाने हाक मारली आणि नवलच घडले, जन्मांध असलेल्या बाळाला दृष्टी तक्षण आली.या अघटीत लिलेमुळे जानकी आईंचा सर्वत्र जयजयकार झाला.


प.पू.जानकी मातोश्री या जन्मसिद्ध होत्या .त्यांना या सर्व विद्या ,शक्ती व अधिकार हा जन्मतःच सिद्ध होता.याची प्रचिती अनेकाविध भक्तांना वेळोवेळी आली होती.त्यांचा विलक्षण अधिकार‌ बघून सर्वांना आश्चर्य होतं असे.
अशा प्रकारे अनंत चमत्कार /लिला जानकी आईंच्या चरित्रात आल्या आहेत.त्यांनी आपल्यातील असंख्य लोकांना आपल्या दिव्यत्वाची प्रचिती दिली, त्यांना सन्मार्गाला लावले.त्यांनी त्यांच्या ठाई असलेल्या सिद्दीचा वापर कधीही स्वतः साठी केला नाही तर त्या सदैव इतरांसाठी त्यांचा उपयोग करित.जानकी मातोश्रींनी सन १९४६ साली चैत्र वद्य नवमीला, रामनवमीच्या शुभ दिनी भरदुपारी आपली नश्वर देहाचा त्याग केला व त्या पुन्हा आपल्या मुळ स्थानी परतल्या.ती वेळ ,तिथी ,दिवस त्यांनी एका वर्षाआधीच पंचांगात लिहून ठेवले होते.जानकी मातोश्रींच्या समाधी नंतर अनेक भक्तांना त्यांच्या कृपेची सावली अनुभवायला मिळाली व आजही मिळते आहे.मातोश्री जानकी आई या वटवृक्षाच्या सावली प्रमाणे आपल्या कृपा करुणेची सावली आपल्या प्रिय भक्तांवर अखंड धरुन आहेत.मातोश्रींचे स्मरण करणार्या भक्तांच्या हाकेला त्या आजही धावतात व या प्रचितीचे अनेक उदाहरण आज आपल्या पुढे आहेत.पुढे कधी तरी त्यांचे ही स्मरण करुयात.अशा या दिव्य विभूती चरणी मी ही शब्दसुमनांजली अर्पण करतो व त्यांनी आम्हा सर्वांना सद्गुरु माउलींच्या कृपा करुणेची सावली मिळवण्यास पात्र करावं हीच शिरसाष्टांग दंडवत पूर्वक प्रार्थना श्रीचरणी करतो.
      ✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️


Monday, September 26, 2022

प्रणम्या मातृदेवता माळ २ :- 🌸🙏गौर कृष्ण की दासी मीरा 🙏🌸🚩

 


प्रणम्या_मातृदेवता :- माळ २

               

                 🌸🙏गौर कृष्ण की दासी मीरा 🙏🌸

                             

                                    आज अश्विन शुद्ध द्वितीया आपल्या "प्रणम्या मातृदेवता" या लेखमालेची द्वितीय शब्द सुमनांची माळ.ही शब्द सुमनांची माळ आपण भक्तीचे सगुण मुर्तिमंत रुप , गोपीका अवतार असलेल्या संतश्रेष्ठ श्री मीराबाई यांच्या लिला चरित्राने गुंफणार आहोत.महाराष्ट्रात ज्याप्रमाणे स्त्री संतांचे स्मरण केल्यावर सर्वप्रथम आदिशक्ती मुक्ताईंचे स्मरण होते तसे हिंदुस्तानातील स्त्री संतांच्या चरित्राचा विचार केला तर आपल्या डोळ्यापुढे उभी राहते ती कृष्णप्रेमात बेभान झालेली संतश्रेष्ठ मीराबाईंची परम सात्विक मूर्ती.सर्व जगात ज्यांच्या नावाचा डंका केली पाचशे वर्ष झाले अविरत गाजतो आहे अशा मीराबाईंचे अलौकिक आणि दिव्य चरित्र इतके विशाल आहे की बुद्धी स्तिमीत होते.मीराबाई या क्रांतिकारी संत होत्या. तत्कालिन समाजव्यवस्थेला झुगारुन एका राजघराण्यातील स्त्री आपल्या सर्व सुखाचा,राजवैभवाचा त्याग करुन आपल्या आराध्य असलेल्या भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभुंना शरणं जातात व एका साध्वीचे त्यागमय जिवन व्यतित करतात.या जिवनात त्यांना अनंत महाकठीण परिक्षेला सामोरे जावे लागले. पण आपल्या शुद्ध भक्तीच्या बळावर त्या या सर्व दिव्यातून लिलया पार झाल्या.त्यांनी भारतभर भ्रमण करुन कृष्ण प्रेमाचा ,भक्तीचा प्रचार केला.आपल्या सुंदर व रसाळ रचनेतून त्यांनी फक्त आणि फक्त विशुद्ध भक्तीचेच प्रतिपादन केले.संतश्रेष्ठ मिराबाईंचे चरित्र इतके विलक्षण आहे की आजही ते प्रत्येक साधकाला परमार्थ मार्गावर चालण्याचे पाथेय झाले आहे.आजच्या द्वितीय माळेला आपण मिराबाईंच्या अतिशय सुंदर व अलौकिक चरित्राचे स्मरण चिंतन करुयात व आपल्या या नवरात्रीच्या आगळ्या वेगळ्या स्त्री संत चरित्राच्या स्मरण उत्सवाला साजरा करुयात.

               
अशी मान्यता आहे की मीराबाई या द्वापर युगातील एक गोपी होत्या.त्यांनी आपल्या काही पदांमध्ये याचा उल्लेख ही केला आहे.एका ठिकाणी त्या म्हणतात,

   सतयुग में सोती रही त्रेता लियो जगाय ।
       द्वापर में जाण्यो नहीं अब कलियुग पहुंच्यो आय ।।

मीराबाई या अभंगात म्हणतात की सतयुगात माझी चेतना प्रसुप्त होती,पण त्रेतायुगात भगवंतांनी मला जागे केले.यातुन संकेत मिळतात की मीराबाई या रामावतारात ही हजर होत्या.पुढे त्या म्हणतात की मला द्वापारात जन्म मिळाला पण मी भगवंतांना प्राप्त करु शकले नाही तर आता कलियुगात जन्मास आले आहे.मीराबाईंच्या गोपी अवताराबद्दल एक विशेष आख्यायिका उत्तरेत फार प्रचलित आहे ती अशी की, नन्द गावातील एक गोप बालकाचा विवाह बरसाना गावातील एका गोपीका बरोबर झाला.लग्न झाल्यावर ती गोपीका ज्यावेळी सासरी नन्द गावात जाण्यास निघाली त्यावेळी रस्त्यातच प्रेम सरोवराजवळ भगवान गोपालकृष्ण गाई चारत झाडाखाली उभे होते.आपल्या गोप सख्याला बघून देवांनी त्याला प्रेमाने म्हटले, "तू आपल्या पत्नीला माझा चेहेरा नाही का दाखविणार?" त्यावर गोप म्हणाला, "ती तर तुझी वहिनी आहे,तू स्वतःच रथावर चढ आणि आपल्या वहिनीचा चेहेरा बघ.तू तर माझा प्राणसखा आहेस."  पण गम्मत अशी की या बरसानातील गोपीकाला तिच्या आईने आधीच सांगितले होते की ,"नन्द गावात नन्दराजांचा एक लाल म्हणजे मुलगा आहे.ज्याला लोक कन्हैया, श्यामसुंदर म्हणून ओळखतात.तो अतिशय खट्याळ आहे. तु त्याचा चेहेरा बघू नको आणि आपला ही चेहेरा त्याला दाखवू नकोस.त्याच्याकडे अशी काही जादू आहे की त्याला बघणारा व्यक्ती त्याच्या प्रेमात पडतो आणि वेडाच होतो." आपल्या आईचा सल्ला त्या भोळ्या गोपीने अगदी मनापासून ऐकला.श्रीबालकृष्ण ज्यावेळी रथावर चढले व तिचा चेहेरा पाहण्याचा प्रयत्न करु लागले तेव्हा तिने आपला चेहेरा पदराने घट्ट झाकून घेतला.खुप प्रयत्न करुनही देवांना तिने चेहेरा दाखविला नाही.शेवटी देव तिचा चेहेरा न बघताच निघून गेले‌.निघतांनी देव तिला म्हणाले, "आज तु मला तुझा चेहेरा दाखविला नाही पण लक्षात ठेव एक दिवस असा येईल की तु माझा चेहेरा बघण्यास तरसशील." काही दिवसांनी गोवर्धन लिला घडली.ज्यावेळी देवांनी गोवर्धन आपल्या करंगळीवर धारण केला त्यावेळी सर्व गावच त्याखाली आश्रयाला आले होते.ही गोपीका पण आपल्या पतीबरोबर तिथे उपस्थित होती.त्यावेळी सर्व लोक देवांच्या त्या अनाकलनीय लिलेकडे व रुपाकडे एकटक आश्चर्यचकित होऊन बघू लागले.त्यावेळी त्या गोपीकेनेही देवांचे ते श्यामसुंदर,गोवर्धनधारी अलौकिक रुप बघितले.ती देवांना बघून इतकी व्याकुळ झाली की तिला आपल्या हृदयात उचंबळलेल्या तिव्र आनंदाच्या भावना असह्य झाल्या व तिला तात्काळ भोवळ आली.लोकांनी तिला सावध केले त्यानंतर ज्यावेळी तिला शुद्ध आली तेव्हा तिने आपल्या नशिबाला दोष द्यायला सुरुवात केली.ती म्हणू लागली की , "माझ्या आईने माझ्याशी कुठल्या जन्माचे वैर काढले कुणास ठाऊक की आजवर व्रजगावात राहूनही मी या श्यामसुंदर कृष्णाचे हे दिव्य मनोहारी रुप बघू शकले नाही.माझा आजवरचा काळ व्यर्थ गेला." असे म्हणत ती रडु लागली,विलाप करु लागली.तीची ही व्याकुळ अवस्था बघून श्रीदेवांना तिच्यावर करुणा दया आली.त्यानंतर देव तिला म्हणाले, "तु माझा या देहाने तिरस्कार केला आहे त्यामुळे या जन्मात तुला माझी प्राप्ती होणार नाही परंतु पुढील कलियुगात तुझा गोपी-प्रेमाचे प्राकट्य करण्याकरिता जन्म होणार आहे त्यावेळी तु मला जरुर प्राप्ती करु शकशील आणि मी सदैव तुझ्या बरोबर असेन."  मग हीच व्रजगावातील गोपी पुढे मीराबाईंच्या रुपात अवतरली होती.या अवतारात ही गोपीका परमभक्त अशा मीराबाई झाल्या.त्यांनी या जन्मात उच्च कुळ मानल्या गेलेल्या राजपूत घरात जन्म घेतला होता व राणा वंशात लग्न झाल्या नंतर ही लोकलज्जा,कुळाची मर्यादा या सर्वांचा त्याग केला होता.मीराबाईंच्या आपल्या सर्व पदात याची छाप दिसून येते.त्यांनी आपल्या पदात "मीरा के प्रभू गिरधर नागर" असे नामाभिधान वापरले आहे त्याचे कारण ही तेच की ज्यांनी आपल्या करंगळीवर गीरीराज गोवर्धन धारण केला आहे अशा गीरधरांनी मला हे वरदान दिले आहे व त्यांचीच प्रतिमा माझ्या हृदयात विराजमान झालेली आहे.तेच माझे आराध्य माझे प्रभू आहेत.
मीरा सुधा सिंधू या राजस्थान सरकारने प्रसिद्ध केलेल्या चरित्र व पद संग्रहाच्या ग्रंथात या कथेचा उल्लेख आला आहे.
           
मीराबाईंचा जन्म राठौडांच्या मेडतिया शाखाचे प्रवर्तक राव दूदाजी चे द्वितीय पुत्र राणा रतनसिंह व त्यांची पत्नी कुसुम कुंवरी यांच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीया म्हणजे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सन १५५५ रोजी जोधपूर जिल्ह्यातील मेडता या गावी झाला.मीराबाईंना आपल्या आजोबांकडून म्हणजे दूदाजी यांच्याकडून बालपणीच प्रेमभक्तीचे धडे मिळाले होते.त्या पाच वर्षांच्या होत्या त्यावेळी पुष्कर यात्रेला जाणार्या संतांची एक टोळी मेडता या गावी आली.( मीरा सुधा सिंधू मध्ये हे स्थान डाकोर सांगितले आहे.) त्यावेळी त्या संतांसमवेत त्यांच्या पुजेची परमप्रिय कृष्ण मूर्ती होती.ज्यावेळी मीरा त्यांची पुजा बघायची त्यावेळी त्यांचे शरीर पुलकांकित होऊन त्यांना समाधी लागत असे.ते संत गावांतून जायला निघाल्यावर बाल मीरा व्याकुळ झाली तिने तो गोपालकृष्ण त्यांच्याकडे मागितला पण संतांनी हा बाल सुलभ हट्ट म्हणून त्याला नकार दिला.मीराबाई रात्रभर रडत राहिली,तिचे डोळे रडून सुजुन गेले.त्याच रात्री भगवान श्रीकृष्ण त्या संतांच्या स्वप्नात गेले व त्यांना‌ म्हणाले, "बाबा आता तुम्ही उशीर करु नका व मला लवकरात लवकर मीरे जवळ पोचवा.तिच्या पर्यंत पोचण्यासाठीच मी तुमच्याजवळ येऊन राहिलो होतो." सकाळ होताच ते संत ती मुर्ती घेऊन मीरे जवळ येतात व तिला ती कृष्ण मुर्ती देऊन त्यांची सेवा करण्याची आज्ञा देतात.पुढे बाल मीरा दिवस रात्र त्या गोपाल कृष्णाची अविरत अखंड सेवेत रममाण होऊ लागली. (त्यांची ही कृष्ण मुर्ती आजही उदयपूर मधील पीताम्बरराय मंदीरात विराजमान झालेली बघायला मिळते.) श्याम कुंज या राजवाड्यात अनेक साधू संत दूदा यांना भेटावयास वरचेवर येत असत.एकदा असाच सत्संग सुरु असतांना मीरे ने ऐकले की सद्गुरु शिवाय भगवंतांची प्राप्ती होत नाही.तेव्हा त्यांनी याबाबत आपल्या आजोबांना विचारले आजोबा दूदा यांनी सांगितले की तु याबद्दल तुझ्या गोपालकृष्णांना प्रार्थना कर.ते तुझ्या साठी अवश्य तुझ्या गुरुंना इथे बोलावतील.मीरा अत्यंत व्याकुळ अंत:करणाने भगवंतांना आळवू लागल्या.देवांनी ही मीरेची हाक ऐकली व गुरुपौर्णिमेला संत श्रेष्ठ श्री रवीदास जी पुष्कर यात्रेला जाण्याचे निमित्त करुन मीरेकडे आले.मीराबाईंनी आपल्या गुरुंना व रवीदासांनी आपल्या प्रिय शिष्येला तात्काळ ओळखले.रवीदासांनी मीराबाईंना अनुग्रह देऊन कृतार्थ केले. एकदा मेडत्यात एक वरात आली.ती वरात बघायला बाल मीरा घराबाहेर आली.तीने घोड्यावर बसलेला माणूस बघितला आणि आईला विचारले हा कोण आहे? आईने तो नवरदेव असल्याचे सांगितले.मग आपला नवरदेव कुठे ? असे मीराबाईंनी आईला विचारले.आईने गम्मत म्हणून तुझा गोपालकृष्णच तुझा नवरदेव असल्याचे सांगितले.पण मीराबाईंनी ही खुणगाठ हृदयाशी पक्की बांधली व त्या देवांची पतीभावातच पुजा करु लागल्या.हा भाव बाल्यकाळापासूनच वृद्धींगत होत गेला.मीराबाईंना बालपणीच भगवत कृपेचा अनुभव आला होता व याचे वर्णन त्यांनी आपल्या अभंगात केलेले दिसून येते. मीराबाईंच्या आत्या या चितौड येथील होत्या.त्यांचा पुतण्या भोजराज यांचा विवाह मीरेसोबत व्हावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती.ही गोष्ट मीराबाईला कळल्यावर त्यांना ती आवडली नाही.त्यांनी याबाबत आईला विचारले व  "आपले पती तर श्रीकृष्ण प्रभू आहेत.मग आता वेगळा विवाह कसा?" अशी शंका विचारली.तेव्हा आईने म्हटले की असेच गम्मत म्हणून म्हटले होते.लोकव्यवहार म्हणून लग्न तर करावेच लागेल.जर तु या स्थळाला नकार दिला तर चितौड सारखे बलवान राज्याशी वितुष्ठ होईल व ते लोक मेडता गावाचे अस्तित्वच संपुष्टात आणतील.त्यामुळे तुला विवाहाचा प्रस्ताव मान्य करावाच लागेल. पुढे आपल्या काकु ला घेण्याकरीता भोजराज मेडता गावी आले.त्यावेळी त्यांनी मीराबाईंचे सुमधुर भजन ऐकले व त्यांच्या दर्शनाने व भाव समाधीने आश्चर्यचकित झाले.ही जर कन्या आपल्या कुळात विवाह करुन आली तर आपल्या संपूर्ण कुळाचा ही उद्धार करेल.असा विचार त्यांच्या मनात आला.पण मीराबाईंना कुणाशीही विवाह करायचा नाही असे त्यांना कळले तेव्हा मीराबाईंना ते म्हणाले , "तुम्ही जर विवाह करुन आमच्या कुळात याल तर मी तुमच्या भक्तीला पुरक अशीच सर्व व्यवस्था ठेवेल व तुम्हाला स्पर्श सुद्धा करणार नाही." मुळातच भोजराज हे भाविक गृहस्थ होते आणि मीराबाईंच्या अलौकिक भक्तीने ते खुपच प्रभावीत झाले होते. त्यांनी मीराबाईंना वचन दिले की मी फक्त आपल्या सानिध्यात राहून कृष्ण प्रेम प्राप्त करेल.आपल्याकडून मला कसलीही संसारीक अभिलाषा नाही.मी आजिवन पुज्य भावाने आपले सानिध्य आणि दर्शन करेल.भोजराजांनी आपले हे शब्द तंतोतंत शेवटपर्यंत पाळले.त्याकाळी कुठलाही पुरुष तेही राजपूत पुरुष हे करणे अशक्यप्राय होते.यावरुन त्यांच्या पारमार्थिक अधिकाराची जाणिव झाल्याशिवाय राहत नाही.भोराजांनी आपल्या वैवाहिक जीवनाचा मीराबाईंच्या भक्तीप्रेमावर पूर्ण त्याग केला. भोजराजांचे हे वचन ऐकून मीराबाई आश्वस्थ झाल्या.भोजराज तेथून गेल्यावर त्या एकतारी घेऊन श्रीकृष्ण प्रभुं पुढे बसल्या.तेव्हा त्या भावसमाधीत गेल्या व त्यांना देवांचा आदेश मिळाला की, "तु काळजी करु नकोस.मीच तुझ्या पुढे लग्न वेदीवर उभा असेल.फेरे घेतानाही मीच तुझ्या पुढे असेन." विशेष म्हणजे आदल्या दिवशी देवांची वाट बघत मीराबाईंना झोप लागली.झोपेत त्यांना स्वप्न दिसले की श्रीकृष्ण प्रभु आपल्या गोप सख्यांची वरात घेऊन स्वतः घोड्यावर बसून लग्नास आले.सर्वांसमक्ष त्यांनी मीराबाईंशी विवाह केला,फेरे झाले.सर्व विधी यथासांग पार पडले.इकडे मीरांना अचानक जाग आली तो बघता तर हातावर सुंदर मेहेंदी,अंगाला हळद लागलेली,भांगेत कुंकू,गळ्यात नन्द बाबांनी दिलेले आभुषण हे सर्व प्रत्यक्षात दिसतं होते.दुसर्या दिवशी सन १५७२ ला त्यांचा विवाह युवराज भोजराजांशी मोठ्या धुमधामीत पार पडला.

लग्न झाल्यावर त्या जेव्हा सासरी आल्या तेव्हा पतीच्या दिर्घायुष्यासाठी सासुने त्यांना देवी पुजा करण्यास सांगितले.पण आपण तर आधीच आपले मस्तक कृष्ण चरणी वाहिले असल्याने तसे करण्यास त्यांनी नकार दिला.याचा महाराणीला खुप राग आला व त्यांनी ही हकिकत राणा सांगा यांना सांगितली.मीराबाईंच्या या वागण्याचा राजालाही खुप राग आला.त्यामुळे या दोघांनीही मीराबाईला धडा शिकविण्याचे ठरविले.त्यांनी मीराबाईंच्या भक्तीचे कारण सांगून त्यांना एक सुमसान ,उजाड व भुतं प्रेतांचा वास असलेला राजवाडा राहण्यास दिला.तेथे अनेक प्रेत, पिशाच्च वस्तीस होते.
राजवाडा साफ झाल्यावर मीराबाई आपल्या श्रीकृष्ण प्रभुंना घेऊन राजवाड्यात गेल्या.तेथे त्यांनी देवांची पुजा केली व त्यांच्या स्नानाचे जल हे शंखातून सर्व जागी शिंपडले.ते शिंपडल्यावर तेथील सर्व पिशाच्च व प्रेतांना तात्काळ मुक्ती मिळाली व ते सर्व मीराबाईंचा जयजयकार करत मुक्त झाले.मीराबाईंना तो महाल अतिशय आवडला व आता त्या तेथील एकांतात भजन,पुजन व सत्संग करीत रममाण झाल्या होत्या.पुढे त्यांचे पती भोजराज ही त्यांचा सत्संग ,भजन ऐकण्यासाठी त्या महालात येऊ लागले.ते इतके शुद्ध भाव व निर्मळ हृदयाचे होते की मीराबाईंच्या भजनामुळे ते अंतर्बाह्य बदलून गेले होते.मीराबाईंच्या सहवासात भोजराजांची साधना वाढतच गेली.दिवसेंदिवस त्यांचा सात्विक भाव वृद्धिंगत होत गेला.मीराबाईंना संत सहवास मिळावा म्हणून त्यांनी मीराबाईंच्या महाला बाहेर एक कृष्ण मंदिर ही बांधले व जवळच साधू संतांच्या निवासाची,थांबण्याची व्यवस्था केली.भोजरांजांचा पुढे एका लढाईत मृत्यू झाला.त्यांना मृत्यू समयी भगवान कृष्णांनी दर्शन दिले व "तू मीराची नाही तर माझीच सेवा केली आहे " असे म्हणून हृदयाशी लावले. भोजराजांच्या मृत्यूनंतर त्यांची आई ,बहिण ऊदा व त्यांचे सावत्र भाऊ मीराबाईंना खुप त्रास देऊ लागले.इथवर भोजराज त्यांची ढालच बनून राहिले होते पण आता परिस्थिती बदलली होती.मीराबाईंची ननद ऊद बाई यांनी, तुम्ही साधु ,संतांशी सत्संग करता त्यामूळे राणा कुळाला व आपल्या पित्याच्या कुळाला आपण कलंक लावता आहात असे सांगितले.पण त्यावर मीराबाई म्हणाल्या , "माझे प्राण तर साधू ,संताबरोबर वास करतात.त्यांच्या सहवासाने,सत्संगाने मला अपार सुखाची अनुभूती होते.ज्यांना माझ्यामुळे दु:ख होत आहे त्यांनी माझ्या दूर राहावे." मीराबाईं चे हे स्पष्ट शब्द राणा विक्रमसिंहाला पटले नाहीत.तो रागाने लालबुंद झाला व त्याने देवांचे तिर्थ म्हणून हलाहल विष मीराबाईंकडे पाठवीले.मीराबाईंना ते विष आहे हे माहिती असुनही तो पेला त्यांनी क्षणार्धात पिला .पण त्याचा विपरीत परिणाम झाला.मीराबाईंचे तेज अधिकच वाढले.मीराबाईला काही न झाल्यामुळे ते विष खोटे होते असा समज राणाचा झाला व त्याने तेच विष वैद्याला पिण्यास सांगितले.वैद्याने नुसता एक थेंब ओठांशी लावला तोच वैद्य गतप्राण झाला.मीराबाईंना ही वार्ता कळली त्यांनी ते वैद्याचे प्रेत देवांच्या पुढे ठेवण्याची आज्ञा केली व त्या पद म्हणू लागल्या .आश्चर्य म्हणजे काही वेळातच तो मृत झालेला वैद्य उठून बसला.यानंतर राणाने मीराबाईंच्या अनेक निष्ठूर परिक्षा घेतल्या.इतके चमत्कार घडून ही राणाच्या मनात मीराबाई बद्दल आत्यांतिक द्वेष होता.तसेच मीराबाईंचे भजन ऐकण्यासाठी अकबर बादशाह व तानसेन ही वेषांतर करून येऊन गेले होते.या काळात मीराबाईंना राणाने अतिशय त्रास दिला होता.त्यामुळे यातून मार्ग काढत मार्गदर्शन मिळवावे यासाठी त्यांनी संतश्रेष्ठ तुलसीदासांना पत्र लिहिले.तेव्हा तुलसीदासांनी त्यांना राम नामाचेच स्मरण करण्याचा उपदेश केला होता.तुलसीदासानी सांगितल्या प्रमाणे मीराबाईंनी चितौडचा त्याग केला व‌ त्या वृंदावन येथे गेल्या.तेथे पोचल्यावर त्यांनी संन्यासी असलेले श्री जीव गोस्वामीपाद यांची भेट घेण्याचे ठरविले.पण तेथे गेल्यावर ज्यावेळी शिष्य त्यांना सांगायला गेला की एक स्त्री आपल्याला भेटावयास आली आहे.तेव्हा संन्यास धर्माला अनुसरून त्यांनी भेटावयास नकार दिला.त्यावर मीराबाईंनी उत्तर दिले की, "माझा ही नियम आहे की मी गिरीधर कृष्ण सोडले तर कुणाचेही मुख बघत नाही.मी तर या साठी वृंदावनात आले की येथे वृंदावनात श्रीभगवान कृष्ण प्रभू सोडले तर बाकी सर्व गोपीका आहेत.पण आश्चर्य असे की आज देवांच्या व्यतिरिक्त एक अजुन पुरुष वृदांवनात राहतो आहे." तेव्हा ही कुणी सामान्य स्त्री नव्हे हे लक्षात आल्यावर ते. स्वतः बाहेर आले व पुत्री प्रमाणे मीराबाईंशी वार्तालाभ केला.त्यांनीच मीराबाईंना चैतन्य महाप्रभुंची वार्ता सांगितली.पुढे मीराबाई देवांच्या आज्ञेनुसार द्वारिका क्षेत्री आल्या.

इकडे मीराबाई चित्तौडला न गेल्यामुळे ते गाव श्रीहीन झाले.राणा एका सेवकाच्या हातून मृत्यू मुखी पडला.मीराबाईंनी पाठ फिरवली म्हणून चित्तौड ला अकाल पडला,महामारी पसरली.अनेक विद्वान ,संतांना बोलविले गेले.त्यांनी एकमुखाने मीराबाईंना परत चित्तौडला आणण्याचा एकमात्र उपाय सांगितला.राणा उदयसिंह याने आपले मंत्री व ब्राह्मण मंडळींना काहीही करुन मीराबाईंना चित्तौड ला परत आणण्यासाठी द्वारकेला पाठवले.त्यावेळी मीराबाई द्वारकेत अतिशय भक्ती पूर्ण आयुष्य जगत होत्या.तेथे पोचल्यावर ब्राह्मण मंडळींनी मीराबाईंना हात जोडून परत चलण्याची विनंती केली.आपल्या नसल्याने चित्तौड ची झालेली विदिर्ण अवस्था त्यांना वर्णन केली.पण मीराबाई तर अंतर्बाह्य कृष्ण प्रेमात न्हाऊन निघाल्या होत्या.त्या म्हणाल्या , "आता तर गंगा सागराला जाऊन मिळाली आहे.त्यामुळे आता मागे फिरणे अशक्य.त्यावर ब्राह्मण मंडळी अन्न पाणी सोडून उपोषणाला बसली.आता मीराबाईंपुढे पेच प्रसंग उभा‌ राहिला.त्यांचा हा निर्वाणीचा हट्ट बघून मीराबाई रडून त्यांना म्हणाल्या , "आपण मला परत माघारी येण्यास हट्ट करु नका.मला तर आता फक्त आणि फक्त या गोविंदाच्या चरणी वास हवा आहे." तरी ब्राह्मण आपल्या निश्चयावर अडीग राहिले.त्यावर मीराबाई म्हणाल्या , "तुम्ही एवढा आग्रह करता आहात तर मी एकदा द्वारकाधीशांना विचारते." सर्वांसमक्ष त्यांनी द्वारकाधीशांना म्हटले, "हे नाथ आपल्या जवळ आणून आता मला आपण परत संसारात ढकलून देत आहात.मला आता आपल्याला कुठेही सोडून जाण्याची इच्छा नाही."त्यानंतर मीराबाईंनी विव्हळ होऊन भगवंतांना आळवण्यास सुरवात केली.थोड्या वेळात मीराजींपुढे भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभु सगुण रुपात प्रगट झाले‌ व देवांनी त्यांना आपल्या कडे ये म्हणून आवाज दिला.तोच मीराबाई देवांकडे व्याकुळ अंत:करणाने धावल्या व बघता बघता हजारो लोकांपुढे आपल्या परमप्रिय द्वारकाधीशांच्या तेजरुपात प्रविष्ट झाल्या. या दिव्य गोपीका आपल्या प्रभु़च्या निजस्थानास निघून गेल्या.मीराबाईंनी जवळपास १५०० पदं लिहीले आहेत.सर्व पदांचा विषय म्हणजे कृष्ण प्रेम ,भगवंत प्रेम.त्यांनी आपल्या सर्वांच्या हृदयात श्रीगुरु प्रेमाचा ,श्री भगवद प्रेमाचा अंकुर रुजवावा व त्यातुन आपल्यालाही शुद्ध भक्तीची प्राप्ती व्हावी ही श्रीचरणी प्रार्थना करतो व ही शब्दसुमनांजली श्रीचरणी अर्पण करुन इथेच थांबतो.
        ✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

#राम_कृष्ण_हरी🌺🌿🙏

#श्रीदत्त_शरणं_मम🌺🌿🙏


Sunday, September 25, 2022

प्रणम्या मातृदेवता माळ_१ 🙏 धन्य ती मुक्ताई 🌸🚩

 




प्रणम्या_मातृदेवता  माळ_१  🙏🌸🚩

      

         🍃🌺🙏 धन्य ती मुक्ताई 🙏🌺🍃


"मुक्तपणे मुक्त ,श्रेष्ठपणे श्रेष्ठ। सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती ।।"


                              सर्वत्र वरिष्ठ अशा शब्दांत ज्यांचे महात्म्य प्रत्यक्ष एकनाथ महाराजांनी वर्णन केले आहे अशा आदिशक्ती ब्रह्मचित्कला मुक्ताई माउलींच्या चरित्राचे हे स्मरण.आपल्या "प्रणम्या मातृदेवता" या लेखमालेतील हे प्रथम पुष्प. भगवती आई मुक्ताई माउलींपासून आपण या लेखमालेची सुरुवात करतो आहे त्याचे एक विशेष कारण म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदा ही मुक्ताई महाराजांच्या जन्माची परम पावन तिथी.मुळात शक्ती ही येत ही नाही आणि जात ही नाही ती नित्य,अखंड सर्वत्र विश्व व्यापून आहे. ती शक्ती फक्त आपल्या संवेदनांपुढे प्रगट होते.तशीच ही ब्रह्मचित्कला मुक्ताई जिचे वर्णन 'सनकांडी' असे केले आहे. ती विद्युत तेजाप्रमाणे आली व तसेच काही काळ त्रिमुर्तीं समवेत या धरेला पावन केले व आपल्या निजस्थळी कुणाला न कळता निघून ही गेली.या आदिशक्तीचे आजच्या पहिल्या माळेला आपल्याला स्मरण व त्यांच्या दिव्य चरित्राचे चिंतन करायचे आहे.खरंतर मुक्ताईंचे चरित्र असे वेगळे लिहीता येणारच नाही कारण ज्ञानदेवादी या चारही भावंडांची लिला चरित्रे ही एकमेकांशी पूर्णपणे संलग्न आहेत.तरी आपण आज ‌या चारही भावंडांच्या चरित्रातील मुक्ताई चरित्राचे विशेष रुपाने चिंतन करुयात.त्यामुळेच या लेखाचा गाभा हा मुक्ताईंच्या चरित्रानेच मांडण्याचा बालप्रयत्न मी करतो आहे.

                              मुक्ताई व इतर तिन्ही भावंडे हे प्रत्यक्ष भगवंतांचे पूर्ण अवतार होते यात शंका नाहीच. आणि आपले हे अवताराचे तत्व प्रगट करण्यासाठी की काय ,या सर्वांनी विशिष्ठ तिथीलाच अवतार घेतला व मनुष्य देह धारण केला हे विशेष. निवृत्तीनाथांनी आपले शिवतत्वाचे संकेत सोमवारी जन्म घेऊन दर्शविले तर ज्ञानदेवांनी गोकुळाष्टमीला जन्म घेऊन आपणच ते महाविष्णु-कृष्ण तत्व आहोत हे निदर्शित केले.तर कार्तिक पौर्णिमेस सोपानदेवांनी अवतार घेतला व आपणच ते ब्रह्म तत्व असल्याची जाणिव करुन दिली आणि आदिशक्ती पराशक्ती भगवती मुक्ताईंनी अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी ज्या काळी आदिशक्ती अवतरली होती त्याच दिनी मुक्ताईंनी मनुष्य देह धारण करुन आपणच ती पराशक्ती ,विश्वजननी असल्याची जाणिव जगाला करुन दिली. बरं मुक्ताईंच्या अवतार काळातील अनेक प्रसंगावरुन आपल्याला त्यांच्या या विलक्षण अधिकाराची जाणिव झाल्याशिवाय राहत नाही. मुक्ताईंचा जन्म शके १२०१ प्रमाथीनाम संवत्सर ,अश्विन शुद्ध प्रतिपदा शुक्रवार या दिवशी झाला.निळोबारायांनी आपल्या चरित्रात मुक्ताईंचे वर्णन केले आहे त्यातुन मुक्ताईंच्या अधिकाराची जाणिव झाल्याशिवाय राहणार नाही. श्री निळोबाराय म्हणतात -

“मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी । आद्यत्रय जननी देवाचिये ॥

                      अशी ही आद्यशक्ती ,त्रयदेवांची जननी मुक्ताईरुपे लिला करती झाली.जन्म झाल्यावर काही काळानेच पिता विठ्ठलपंत व माता रुक्मिनी यांना लोकांनी वाळीत टाकल्यामुळे या सर्व बालकांना समाजात वावरता येत नसे. पुढे मुक्ताई आदी भावंडे आई वडिलांसमवेत त्रंबकेश्वर व इतर ठिकाणी तिर्थयात्रेस गेली.या ठिकाणी या सर्वांचा मुक्काम जवळ जवळ एक वर्ष होता.याच वेळी निवृत्तीनाथांना भगवान गहिनीनाथ महाराज यांनी व्याघ्र लिली करुन आपल्या गुंफेत आणले व त्यांच्यावर अनुग्रह केला.सात दिवस अहोरात्र त्यांना ज्ञानांचे प्रतिपादन केले व नाथपंथाची दिक्षा दिली.आपल्या नाथपंथातील शांभव तत्व निवृत्तीनाथांना देऊन हेच तत्व पुढे ज्ञानदेवांना देण्याचा आज्ञा केली व त्यांच्याकडून गिता तत्व पुन्हा प्रगट करण्याचा आदेश दिला.काही दिवसांनी निवृत्तीनाथ त्रंबकेश्वरातील आपल्या मुक्कामी परतले.आई-वडिलांना त्यांनी घडलेला वृत्तांत सांगितल्यावर सर्वांना अत्यंत आनंद झाला.पुढे निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना ब्रह्मगिरीवर नेऊन अनुग्रह दिला व त्यांच्याठाई आधीच विलसीत असलेले आत्मज्ञान प्रगट केले . अशा रितीने निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना अनुग्रह दिला व ते त्यांचे सद्गुरु झालेत. निवृत्तीनाथांनी हेच ज्ञान सोपानदेव व मुक्ताईंना देण्याची आज्ञा ज्ञानेश्वरांना केली.ज्ञानेश्वरांनी गुरुआज्ञा पाळली आणि सोपानदेव व मुक्ताईंना ब्रह्मविद्येचा उपदेश केला.पुढे सर्व जण यथाकाळी आळंदीस परतले. यापुढील देहांत प्रायश्चित्ताचा भाग आपल्या सर्वांना माहित आहेच त्यामुळे तो इथे गाळला आहे.आई वडिलांनी ज्यावेळी गृहत्याग करुन देहांत प्रायश्चित्त घेतले त्यावेळी सर्व भावंडे वयाने अगदी लहान होती. मुक्ताई तर अवघ्या ७ वर्षांच्या होत्या.यानंतर ही चारही भावंडे शुद्धीपत्र घेण्याकरीता पैठणास प्रयाण करते झाले.तेथील घडलेली लिली ही जगविख्यात आहे.ज्ञानदेवांनी तेथे रेड्यामुखी वेद वदविले होते,कृष्णाजीपंतांच्या घरी गावातील ब्राह्मणांचे सर्व पित्र स्वर्गातुन खाली जेवावयास बोलाविले होते.या अलौकिक लिलेमुळे सर्वांना या चारही भावंडांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली व सर्वलोक यांच्या चरणी नतमस्तक झाले. पुढे ज्ञानेश्वरादी तिघेही भावंडे तो वेद वदविलेला रेडा व शुद्धीपत्र घेऊन नेवासा या गावाच्या दिशेने मार्गस्थ झाले.नेवासा येथे पोचल्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी मृत झालेल्या व चितेवरील सच्चिदानंद बाबांना पुन्हा जिवंत केले.गावात शिरल्यावर निर्जीव मशिद बोलवली.त्यानंतर ही चारही भावंडे मोहिनीराजांच्या मंदिरात आले व तेथे पुढे दोन वर्ष राहिले.याच ठिकाणी माउलींनी ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थदीपिका या अलौकिक आणि एकमेवाद्वितीय ग्रंथाला आपल्या सर्वांच्या कल्याणाकरिता प्रगट केले.

     

त्यानंतर ही संतमंडळी प्रवास करीत चांगदेवाच्या गावाला म्हणजे पुणतांब्यास आली.तेथे चांगदेव महाराज समाधीतून उठल्यावर मेलेली माणसे जिवंत करित असत.पण त्यांचा समाधी अवस्थेतून उठण्याचा काळ निश्चित नसे.तोवर तेथे आलेले लोक सोबत आणलेले प्रेत वनस्पतींत व मसाल्यांत घालून ठेवीत.तेथे गेल्यावर हा प्रकार मुक्ताईंनी बघितला व त्यासंबंधी माहिती लोकांना विचारली.त्यावर लोकांनी सांगितले की , "चांगदेव समाधीतून उठले की प्रेताचे अवलोकन करतात व प्रत्येकाचे नाव घेऊन हाक मारतात.त्यांपैकी कोणी एखादाच जिवंत होतो व मग बाकीची प्रेते त्यानंतर जाळून टाकली जातात.कोण उठेल ,हे सांगता येत नाही,म्हणून हे सर्व आशा धरून येथे प्रेत आणून ठेवतात" .तेव्हा मुक्ताई म्हणाल्या,  "चांगदेव केव्हा समाधीतून उठतील?" तेव्हा चांगदेवांचा सेवक म्हणाला,अजून समाधीतून उठण्यास दोन महिने आहेत.मुक्ताई म्हणाल्या , "जर आताच प्रेते उठवून दिली ,तर काही हरकत आहे का?" त्यावर सर्व लोक म्हणाले , "आईसाहेब ! आपले फार उपकार होतील.आम्ही इथे पार हताश होऊन बसलो आहोत." मुक्ताईं त्यावेळी अगदी १०/ ११ वर्षाच्या कोवळ्या वयाच्या होत्या. चिमुकल्या मुक्ताईंचे बोल त्यावेळी सर्वांना एखाद्या सिद्धाप्रमाणे भासले व कुतुहल म्हणून पुढे काय होते हे बघण्यासाठी पुष्कळ लोक तेथे जमले. मुक्ताईंनी तेथील सर्व प्रेतांना एका ठिकाणी जमा करण्यास सांगितले त्याप्रमाणे ती सर्व प्रेते एका ठिकाणी लोकांनी एकत्र केली.मुक्ताईने तेथेच पडलेले एका मेलेल्या कुत्र्याचे हाड उचलून त्या सर्व प्रेतांवरुन ओवाळून फेकले.त्याबरोबर ती सर्व प्रेते जणू काही झोपेतून उठावे,त्याप्रमाणे गडबडीने उठली.कोणी आपले पागोटे सावरु लागला तर कोणी अंगरखे शोधू लागले,तर कोणी वस्त्र निट करु लागले तर कोणी कासोटा निट करु लागले.सर्वत्र एकच धांदल उडाली.हा सर्व विलक्षण प्रकार तेथील लोकांनी पाहिला व प्रत्येकाच्या आश्चर्याला पारावार उरला नाही.सर्वांनी मुक्ताईंचा जयजयकार केला.सर्व म्हणू लागले ,ही तर जगन्माता आदिशक्ती आहे.याप्रमाणे अनेक गावांतून प्रवास करित ही भावंडे आळे या गावी पोचली.या प्रवासात पैठणला वेद वदविलेला रेडा माउली आदी भावंडांबरोबरच होता.आश्चर्य म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा हा पहिला शिष्य ,पैठणला माउलींच्या कृपेने वेद म्हणणारा हा रेडा पुढे चार वर्ष अखंड वेद पठण करित होता.रेडा वेद पठण करतो आहे हे आळ्याच्या ब्राह्मणांना पाहवले नाही.त्यांना हे पाप वाटले व आपल्या कानावर हात ठेवून ही मंडळी ज्ञानेश्वर महाराजांकडे आली.ती सर्व वैदिक मंडळी माउलींना म्हणाली, "हे पाप आता आम्हांला ऐकवत नाही,रेडा वेद म्हणतो ,हे बंद करा." हे ऐकून ज्ञानेश्वर महाराज लगेच म्हणाले, "महाराज! आपण प्रत्यक्ष भूदेव आहात ,तुमची इच्छा पूर्ण होईल." असे म्हणत माउलींनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला.तसाच तो रेडा खाली बसला व "ॐ तत् सत् "असे उद्गार काढून त्याने आपला प्राण सोडला.नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी तेथेच त्याला समाधी दिली व समाधीजवळ स्वतः अजानवृक्ष लावला.आळेगावच्या ब्रह्मवृंदांना वेदांचा वीट आला होता, म्हणून ते वेदघोष बंद करण्यास आले,तर त्यांचाच कायमचा वेदघोष बंद झाला.अशी आख्यायिका आहे की, आळ्यास कोणी अजूनही वेद म्हणणारा वैदिक जन्माला येत नाही.


याप्रमाणे ही मंडळी प्रवास करता करता शके १२१२ला आळंदीस येऊन पोचली.पण गम्मत अशी की आळंदीच्या कर्मठ लोकांवर माउली आदी भावंडांनी पैठण व इतर ठिकाणी केलेल्या चमत्काराचा काही फरक पडला नव्हता.उलट ही सर्व ब्राह्मण मंडळी त्यांना अजुनच त्रास देऊ लागली.सर्व मंडळी या चारही भावंडांचा आत्यांतिक द्वेष करित होते.संपूर्ण गावाने त्यांना वाळीत टाकल्यामुळे मुक्ताई ज्ञानेश्वर आदी चारही जन गावाबाहेर जांबूळ बेटात राहत होते.परिस्थिती इतकी भिषण होती की ज्ञानेश्वर माउली भिक्षेस निघाल्यावर जर ते रस्त्यात दिसले तरी लोक रस्ता बदलत असतं वा कुणाच्याही घरी भिक्षेस गेले तर त्यांना चतकोर भिक्षा ही दिली जात नसे.एकदा माउली असेच भिक्षेला निघाले तो एक आळंदीचा ब्राह्मण आपल्या कन्येकरीता वर बघण्यासाठी निघाला होता.पण रस्त्यातच त्याला ज्ञानेश्वर महाराज प्रथम व्यक्ती दिसतात.चांडाळाचे दर्शन झाले ,हा फार मोठा अपशकून आहे,असे वाटून त्याला राग अनावर झाला.आपले काम आता नक्की होणार नाही.असा विचार करुन त्याचा पारा चढला व त्याने माउलींना अमाप शिव्या देण्यास सुरुवात केली.त्याचा आवाज ऐकून तेथे गावातील लोकं जमली.मग काय तर त्याने अधिकच ताव दाखवित माउलींना मारण्यास सुरुवात केली.त्याने माउलींना अर्थात त्या कोवळ्या ज्ञानेदेवांना खुप मारले.श्री माउलींनी त्याला काहीच उत्तर दिले नाही.पण सहनशीलतेची पराकाष्ठा झाली.जगाला आपला विट आला‌.नको ,आता आपण जगात राहणे.आपण अस्पृश्य तर काय पण अदर्शनीयही झालो की आपले दर्शनसुद्धा अशुभ आहे.आपल्या दर्शनाने जर लोकांस अशुभ होते ,तर जगण्यात काही अर्थ नाही.असे म्हणत ज्ञानदेव आपल्या ताटीत शिरले व रडत रडत त्यांनी आपल्या ताटीचे दार बंद केले व स्वतः ला आत कोंडून घेतले.त्यावेळी आदिशक्ती भगवतीने आपल्या मातृभावाचे प्राकट्य केले व "ताटीचे अभंग" या रुपात महासिद्ध महाविष्णू असलेल्या ज्ञानदेवांनाही उपदेश केला.तो उपदेश एकमेवाद्वितीय असाच आहे.माउलींना मुक्ताईंनी केलेला उपदेश हा इतका उच्च कोटीचा आहे की तो नुसता वाचला तरी त्यांच्या ठाई असलेले आदिशक्ती तत्व आपल्याला लक्षात आल्यावाचून राहणार नाही. "योगी पावन मनाचा" या कडव्या पासून सुरु झालेला उपदेश "तुम्ही तरुन विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।" या ओवीवर त्याची पूर्तता होते.तो संपूर्ण उपदेश जगातील प्रत्येक साधू ,संत व सिद्धांसाठी मुक्ताईंनी दिलेली आचार संहिताच आहे.ही आचार संहिता मांडणार्या मुक्ताई प्रत्यक्ष पराशक्तीच होत्या हे यावरुन लक्षात येते.त्यानंतर माउली ताटी बाहेर आले व मुक्ताईंनी त्यांना जेऊ घालून शांत केले ही कथा क्रमप्राप्त आहेच. पुढे मांड्यांची हकिकत घडली होती ती आपल्या सर्वांना श्रृत आहेच.माउलींच्या पाठीवर मुक्ताई मांडे भाजू लागल्या आणि हे दृष्य विसोबा चाट्याने लपून बघितले.हा अलौकिक चमत्कार बघून तो इतका गर्भगळीत झाला की त्यानंतर तो लागलीच झोपडीत आला व त्याने माउलींचे चरण धरले.( पूर्ण प्रसंग इथे देणे शब्द मर्यादेमुळे शक्य होणार नाही)

माउलींच्या व निवृत्तीनाथ, सोपान देवांच्या पात्रातील उष्टे जर खाल्ले तर आपला ही उद्धार होईल म्हणून तो त्या पात्रावरील उष्टे अधाशासारखे खाऊ लागला.त्यावेळी त्याचे खाणे भुतासारखे होते.भूता सारखे खातो म्हणून मुक्ताई म्हणाल्या , "विसोबा! तू पात्रातील उष्टे खातोस ! तू खेचर (म्हणजे भूत) आहेस का?"  शेवटी विसोबा मुक्ताईंना शरणं आला.त्याने मुक्ताईंचे पाय धरले व माझ्यावर कृपा अनुग्रह करा म्हणून तो कळवळीने प्रार्थना करु लागला.मुक्ताईंनी विसोबांवर अनुग्रह केला व त्याला उपदेश दिला.त्यानंतर त्यांचे नाव विसोबा खेचर असे ठेवले. 

                    पुढे १४ विद्या ६४ कलांचे ज्ञान असलेले चौदाशे वर्षांच्या चांगदेवांना १४ वर्षांच्या मुक्ताई अनुग्रह देऊन कृतार्थ करतात.प्रसंग मोठा असल्यामुळे तो अगदी संक्षिप्तातच मांडतो त्याबद्दल क्षमस्व.चांगदेव ज्यावेळी माउलींना कोरेच पत्र पाठवितात त्यावेळी मुक्ताई ते पत्र हातात घेऊन मागुन पुढून व्यवस्थीत बघतात.ते कोरे पत्र बघून चिमुकल्या मुक्ताई म्हणतात , "दादा, हा चांगदेव सर्व प्रकारच्या विद्या व अष्टांग योग शिकूनही कोरडाच राहिला,हा या पत्राचा अर्थ आहे." हे ऐकून निवृत्तीनाथ म्हणाले, "वारे! मुक्ताई खरी मर्मज्ञ आहे." पुढे चांगदेव वाघावर बसून ,आपल्या एक लाख शिष्यांचा लवाजमा घेऊन या भावंडांना भेटण्याकरीता निघाले.पण माउली आदीं भावंडे निर्जिव भिंतीवर बसुन त्यांना सामोरे गेले व त्याचा गर्वपरिहार केला हे आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे.पुढे ज्ञानदेवांनी सांगितल्यामुळे मुक्ताईंनी चांगदेवांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आत्मज्ञान दिले व चांगदेवांना पत्रात लिहीलेल्या पासष्ट ओव्यांचे मर्म,अर्थ समजावून सांगितला.यानंतर चांगदेव स्वत:स मुक्ताई पुत्र म्हणून घेऊ लागले. पुढे एकदा मुक्ताई स्नान करित असता अचानक तेथे चांगदेव गेले.मुक्ताईंना बघताच चांगदेव लाजून एकदम मागे फिरले.तेव्हा मुक्ताई "हात मेल्या निगुर्या" असे म्हणाल्या.मुक्ताई स्नान करुन ,वस्त्र नेसून बाहेर आल्यावर त्यांना चांगदेवांनी विचारले, "आईसाहेब! मला हात मेल्या निगुर्या" असे का म्हणाल्यात? त्यावर मुक्ताई म्हणतात, अरे तुझी अजून भेदबुद्धी गेली नाही.अजून तुला स्त्री-पुरुष भाव आहेच.असे म्हणून १४ वर्षांच्या मुक्ताईंनी १४ शे वर्षांच्या चांगदेवांना उपदेश केला व त्यांची देहाची भेद बुद्धी ही नासवली व आत्मसाक्षात्कार करविला.या वरुन आपल्याला भगवती आदिशक्ती मुक्ताईंच्या अधिकाराची फक्त पुसटशी कल्पनाच करता येईल. पुढे ही सर्व भावंडे पंढरीस गेली तेथे मुक्ताईंनी गोरोबा काकांना सांगून संत परिक्षण केले व नामदेवांना कच्चे मडके ठरविले.अर्थातच त्यामागचा उद्देश हा अतिशय गहन होता.प्रत्यक्ष पंढरीनाथ ज्यांना वश झाले होते अशा नामदेवरायांचा अधिकार किती थोर असेल याचा आपण विचारही करु शकत नाही. पण त्यांनाही विसोबांकडून अनुग्रह ज्ञान घेऊन आत्मज्ञानी करण्याची ही मुक्ताईंचीच लिला होती.विशेष म्हणजे मुक्ताई या नामदेवरायांच्या आजेगुरुच.पुढे ही सर्व मंडळी तिर्थ यात्रेस गेली तिथे मुक्ताईंनी एका बाळाला नुसती हाक मारुन जिवंत केले.तसेच चंद्रपूरच्या डोंगराळ भागातून जात असता सर्वांना खुप तहान लागली होती तेव्हा मुकताईंनी नुसते बसल्या ठिकाणचे दगड बाजुला सारले व तेथून शुद्ध गंगाजळ प्रगट केले.आजही ते स्थान चंद्रपूर जिल्ह्यातील एका खेड्यात बघावयास मिळते.तेथे आजही छोटी यात्रा भरते.अशा रितीने सर्व भावंडे नामदेवरायांसह तिर्थयात्रा पूर्ण करुन पंढरीस परतले.तेथे माउलींनी देवांना आपला समाधी घेण्याचा विचार सांगितला व समाधीचा दिवसही ठरविला.सर्व भावंडे , नामदेवराय आदी संत आळंदीत येऊन पोचले.इथे प्रत्यक्ष पंढरीनाथांच्या उपस्थितीत ,सकल संतांच्या उपस्थितीत माउलींनी संजिवन‌ समाधी घेतली .हे समाधी प्रकरण नामदेवरायांनी अतिशय सुंदर व विस्तृत रुपाने लिहीले आहे.ते आपण जरुर वाचा.पुढे सोपान काकांनी सासवड क्षेत्री देह ठेवला तेव्हा मुक्ताई तेथे हजर होत्या .काही दिवसांनी मुक्ताईंनी आपल्या लाडक्या मानस पुत्राला ,लाडक्या शिष्याला म्हणजेच चांगदेवांना तापी तिरी स्वत: समाधी दिली व त्या निवृत्तीनाथांसमवेत तापी तीरावर भ्रमण करत महतनगर येथे आल्या.तेथेच मग मुक्ताई अचानकपणे विजेच्या प्रकाशात गुप्त झाल्या.भगवती आई मुक्ताईं चे गुप्त होणे इतके अलौकिक होते की ते बघून उपस्थित सर्वांना जणू प्रलय येतो की काय असे वाटले.तो प्रसंग मी मुक्ताईंच्या अंतर्धान दिनी वेगळा व विस्तृत लिहीला आहे.या लेखात त्या जुन्या लेखाची लिंक देतो आहे तो लेख आपण जरुर वाचा.

https://akshayrjadhav.blogspot.com/2022/05/blog-post_49.html


कारण तो प्रसंग अतिशय दिव्य असा आहे. अशा प्रकारे ही भगवती आदिशक्ती, पराशक्ती, आद्यजननी माय मुक्ताई या धरेवर कार्य करून विद्युतलतेसारखी गुप्त झाली.आज अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे घटस्थापना .आपल्या "प्रणम्या मातृदेवता" या लेखमालेतील ही पहिली माळ परमप्रिय आदिशक्ती माय मुक्ताईंच्या सुकोमल चरणी अर्पण करतो व आपल्या सर्वांकडून शिरसाष्टांग दंडवत प्रणाम करुन सर्वांवर अखंड कृपा करुणा करण्याची प्रार्थना करतो.

            🖊️✍🏻त्यांचाच अक्षय जाधव आळंदी✍🏻🖊️

#श्रीदत्त_शरणं_मम🙏🏻🌸🌿
#महाराज_ज्ञानेश्वर_माउली_समर्थ🙏🏻🌸🌿

Tuesday, September 20, 2022

सिद्धयोगी,कलायोगी सद्गुरु श्रीशुभराय महाराज सोलापूर 🚩🌸🌺🌿

 


कलायोगी सिद्धयोगी सद्गुरु श्रीशुभराय महाराज सोलापूर यांची आज २०३ वी पुण्यतिथी:-

                                     "शुभराय मठ" ही वास्तु सोलापूर व सद्गुरु शंकर महाराज भक्त परिवारासाठी अतिशय परिचयाचे स्थान आहे.धनकवडीच्या सद्गुरु शंकर महाराजांचे आवडते स्थान म्हणून अनेक लोक या स्थळाला भेट देत असतात.येथील मठाधिपती वंदनीय शुभाताई म्हणजे आपल्या माई यांच्या प्रेमामुळे आज मोठा परिवार या स्थानाशी जोडला गेला आहे.वंदनीय माई या शुभराय मठ परंपरेच्या आजच्या आठव्या प्रमुख व‌ उत्तराधिकारी आहेत.अतिशय अलौकिक आणि दिव्य अशी ही एक परंपरा आहे.ज्यात आपल्याला जनार्दन बुवा म्हणजे आपले जनु काका व मधुकर बुवा म्हणजे मधु बुवा हे परिचयाचे आहेतच कारण हे दोघेही शंकर बाबांचे अंतरंग शिष्य होते.यांच्या करीता महाराज सोलापूरात प्रथम आले व इथेच ते सतत येत राहिले.याच गुरुपरंपरेचे अतिशय प्रमुख आणि आद्य गुरु असलेले सद्गुरु शुभराय महाराज यांची आज पुण्यतिथी त्यानिमित्त श्रीमहाराजांच्या अलौकिक आणि दिव्य चरित्राचे चिंतन आज आपण करुयात. 

                                         श्रीशुभराय महाराजांचा जन्म तामिळनाडू मधील मालूर या गावी एक सधन ब्राह्मण कुटुंबात झाला.महाराजांच्या आई वडिलांचे नाव श्री.गंगाधर व सौ.पनाम्मा असे होते.हे दांपत्य अतिशय धर्मपरायण आणि आचारनिष्ठ असे होते.यांच्या पोटी शालिवाहन शके १६५७ सन १७५० मध्ये शुभराय महाराजांचा जन्म झाला.यथावकाश बाळाचे बारसे झाले व बाळाचे नाव "सुब्बाराव" ठेवण्यात आले.शुक्लेंदूच्या कलेप्रमाणे बाळ वाढू लागले.बाळ सुब्बारावांची बुद्धी अतिशय कुशाग्र व तल्लख होती.वयाच्या आठव्या वर्षी त्यांचे मौंजीबंधन करण्यात आले व पुढील शिक्षणासाठी त्यांना गुरुकुलात पाठविण्यात आले.तेथील शिक्षण ,ज्ञान आपल्या कुशाग्र बुद्धीनी यांनी लवकरच आत्मसात केले व आपल्या प्रेमळ स्वभाव व बुद्धीमत्तेमुळे ते सर्वांचे लाडके झाले.शिक्षणाबरोबरच सुब्बाराव हे जन्मतःच उत्तम गात असत ,चित्र काढत असत.त्यांना हे कलेचे ज्ञान उपजतच लाभले होते.गुरुकुलातून घरी परतल्यावर लवकरच समाजातील रुढीप्रमाणे त्यांचा विवाह करण्याचे माता पित्यांनी ठरविले.सन १७७१ साली त्यांचा विवाह सुलक्षणी अशा कन्येशी झाला.श्रीमहाराज हे वेदशास्त्रसंपन्न तर होतेच पण त्याबरोबर कला व राजकारण यातही निष्णात होते व त्यांचे हे गुण कस्तुरीच्या सुगंधा प्रमाणे सर्वत्र दरवळू लागले.त्यांच्या या तेजाची व बुद्धीमत्तेची चर्चा मैसुरच्या सुलतान टिपू याच्या पर्यंत पोचली.सुलतान हा कलारसीक असल्यामुळे त्याने श्रीसुब्बारावांना आपल्या दरबारात बोलवून घेतले व आपल्या दरबारात सामिल होण्यास सांगितले.आपल्या वडिलांची आज्ञा घेऊन तरुण श्रीसुब्बाराव हे टिपू सुलतानच्या दरबारी रुजु झाले.आपल्या तल्लख बुद्धीमत्तेच्या जोरावर ते नायब दिवाणापर्यंत जाऊन पोचले.याच काळात श्रीमहाराजांनी अनेक भाषांचे ज्ञान अवगत करुन घेतले.मुस्लिम दरबारात कार्य करतांना ही त्यांची धर्मनिष्ठा व साधना खंडित झाली नाही.पहाटे ध्यान करुन देवांना "मला पुढील मार्ग दाखवा" अशी ते कळकळीने प्रार्थना करत असत.त्याकाळात होणारे परकीय आक्रमण व होणारे धर्मांतरे बघून त्यांचे मन अधिकच उद्विग्न झाले.गुरु भेटीसाठी त्यांचे मन आतुर होऊ लागले.अशा उद्विग्न मन:स्थितीत प्रपंचाचा त्याग करावा व आपले आत्मकल्याण करावे हा त्यांनी मनोमन निश्चय केला.आपल्या आराध्य श्रीहरी ला ते याबाबत कळकळीची प्रार्थना करु लागले.लवकरच त्या प्रार्थनेला श्रीहरींनी प्रतिसाद दिला व "आता येथे राहू नये ,सर्व संग परित्याग करावे". अशी आज्ञा दिली.लवकरच नेसत्या वस्त्रानिशी त्यांनी आपल्या माता-पिता,पत्नी ,धन ,संपत्ती यांचा त्याग केला.हा त्याग अनंत जन्माच्या तयारीचे द्योतकच आहे.ही इतकी सोपी गोष्टी नक्कीच नाही.घरात असलेली कट्यारधारी श्रीमारोतीरायांची मुर्ती फक्त त्यांनी सोबत घेतली व ते घोड्यावर स्वार होऊन निघाले.टिपु ने त्यांचा शोध घेतला व पण कुणाच्याही हाती लागले नाही.मजल दरमजल करत ते महाराष्ट्रात आले.अक्कलकोट तालुक्यातील म्हैसलगी या गावी ते सन १७७६ रोजी येऊन पोचले.


                                 तेथील गावकऱ्यांनी त्यांची राहण्याची व्यवस्था म्हैसलगी गावाचे ग्रामदैवत असलेल्या मारोतीरायांच्या मंदिरात केली. त्यावेळी त्यांची दाढी वाढली होती व हातातील पळी पंचपात्र,डोक्याचा पंचा,वैरागी वेश व मुखावरील तेज बघून सर्वांना त्यांच्यातील दिव्यत्व लगेच लक्षात येत असे.श्री महाराज तेथेच राहत मारोतीरायांची पूजा करत व गावात भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत.तेथे अनेक दिवस देवांची सेवा केल्यावर मारोतीरायांनी त्यांना कोल्हापूर ला जाण्याची आज्ञा केली.त्याप्रमाणे ते कोल्हापूरात आले.त्यांनी जगदंबेचे दर्शन घेतले व आईला पुढील मार्ग दाखविण्याची प्रार्थना केली.आईने त्यांना "तू पंढरपूरला जा" अशी आज्ञा केली.सन १७७९ रोजी महाराज पंढरपूर येथे पोचले.तिथे भगवंतांच्या स्मरणात ,अखंड भजनात ते तल्लिन झाले.लवकरच पंढरपूर येथे त्यांची आपले सद्गुरु थिमप्पा यांच्याशी भेट झाली.थिमप्पा हे रामदासी होते.त्यांनी श्री सुब्बारावांवर कृपा अनुग्रह केला.त्यांनी गुरु जवळ राहून मनोभावे सेवा केली.अनुग्रह कृपा झाल्यावर सद्गुरु थिमप्पांनी त्यांना "तू आता पंढरपूर येथे राहू नकोस! हे तुझे कार्यक्षेत्र नाही.पंढरपूर जवळील सोनलगी म्हणजे सोलापूर हे पवित्र क्षेत्र तुझे कार्य क्षेत्र आहे." गुरु आज्ञा प्रमाण मानून सन १७८० ला श्रीशुभरायांनी पंढरपूर सोडले व ते सोलापूर येथे येऊन पोचले‌.सोलापूरात आल्यावर ते हत्तीबावडी या विहिरीजवळ राहू लागले.तेथेच ते साधना ही करीत असत.पहाटे विहीरीच्या कपारीत बसून ते योगसाधना करु लागले.आपल्या मृदू वाणी ,प्रेमळ अंत:करणामुळे सर्व लोक त्यांना बाबा ,महाराज म्हणू लागले.आता त्यांच्या भोवती लोकांचा गराडा पडू लागला .लवकरच ते सुब्बारावांचे सर्वांचे शुभराय महाराज झाले.महाराज नित्य भिक्षा अन्नच घेत.गावातील श्रीपाणीभाते नावाच्या गृहस्थांची महाराजांच्या चरणी अनन्य निष्ठा जडली व त्यांनी महाराजांना राहण्यासाठी एक विठ्ठल मंदिर बांधले.महाराज अतिशय उत्तम भजन करत .महाराजांचे भजन ऐकण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी अनेक लोक मंदिरात येऊ लागले.महाराज त्यावेळी गावाच्या फार बाहेर राहात असत व त्यामुळे भिक्षेसाठी त्यांची बरीच पायपीट होत असे.अर्थातच महाराजांच्या लेखी त्याचा मागमूसही नव्हता तरी त्यांचे एक भक्त श्रीआबासाहेब कुंडले जे भुईकोट किल्ल्याचे किल्लेदार होते त्यांनी ही बाब हेरली.गावातील भक्तांशी चर्चा केली‌ व सर्वानुमते महाराजांना गावात येण्याची प्रार्थना केली‌. किल्ल्याजवळील चिंचवृक्षाची विस्तिर्ण जागा महाराजांना दान देण्याचे ठरले.जवळच सिद्धेश्वरांचे मंदिर व तलाव होते.महाराजांनी हीच जागा आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडली.याच जागेवर आज "शुभराय मठ" ही वास्तु उभी आहे.महाराजांनी आपल्या बरोबर आणलेली कट्टयारधारी मारोतीरायांची मूर्ती तिथे ठेवली व आता या स्थळी त्यांनी देवांची पूजा सुरु केली.महाराजांची देवपूजा,भक्ती व सद्गुरुंनी‌ दिलेले साधन अखंड सुरू होते.अशातच श्रीशुभराय महाराजांच्या कार्याला सुवर्ण झळाळी देणारी अलौकिक घटना घडली.एके दिवशी प्रभातकाळी श्रीशुभरायांपुढे भक्तवत्सल भगवान पंढरीनाथ सगुण रुपाने उभे राहिले.श्रीभगवंत शुभरायांना म्हणाले, "तुझी भक्ती पाहून मी संतुष्ट झालो आहे.आता तुझी अखंड भक्ती मिळावी अशी माझी इच्छा आहे.पंढरपूरच्या पुंडलिकाच्या डोहात मी आहे.चंद्रभागेच्या त्या डोहात मी वालूकामय मुर्ती रुपात आहे.ती मुर्ती तु इथे मठात घेऊन ये." आषाढ शुद्ध दशमी ला शुभराय महाराजांना हा साक्षात्कार झाला.देवांनी आपली पुजा आषाढी एकादशीला करण्याची आज्ञा केली.दुसर्या दिवशी सकाळी महाराजांनी हा दृष्टांत शिष्यांना सांगितला.परंतु एका रात्रीत विठ्ठल पंढरपूरातून आणणे ही सोपी गोष्ट नव्हती.पण शुभराय महाराजांनी "पंढरपूरात तात्काळ जाऊन माझा प्राणसखा असलेल्या विठ्ठलाला आणावे" अशी शिष्यांना आज्ञा केली.त्या शिष्यांमध्ये एक मल्लिकार्जुन शेटे नावाचे शिष्य होते.त्यांनी हे शिवधनुष्य उचलण्याची तयारी महाराजांपुढे विनम्रतेने दर्शविली व महाराजांनी ही सेवा घडवून घ्यावी याचा आशिर्वाद ही मागीतला.शेटेंना महाराजांनी आशिर्वाद दिला व ‌सकाळी निघण्याची आज्ञा केली.सर्व सोलापूरात ही बातमी पसरली व हाच सर्वांच्या चर्चेचा विषय बनला.देव पंढरीहून सोलापूरात येणार या बातमीने सर्वांचे चित्त भावविभोर केले.सर्व लोक देवांची डोळ्यात जिव ओतून प्रतिक्षा करत होते.इकडे शेटे सोलापूरात पोचले.त्यांनी चंद्रभागेत स्नान केले व पुंडलिकाच्या डोहात जाऊन देवांचे आवाहन केले.देवांचे नाम घेता घेता त्यांनी वाळूत हात घातला तर वाळून एक टणक भाग हाताला लागतात.तो‌ त्यांनी उचलला आणि बाजुला जाऊन बघतात तर का प्रत्यक्ष वालुकामय श्रीभगवंतांचा विग्रह.त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.त्यांना भावावस्थेत जणू समाधीचं लागली होती.त्यांनी नंतर विलंब न करता देवांना त्यांनी छातीला कवटाळले व ते तात्काळ सोलापूर ला‌ नाघाले.वेशीजवळ सर्व लोक देवांच्या स्वागतासाठी जमले होतेच.यथावकाश शेटे सोलापूरात येऊन पोचले.सर्वत्र आनंदी आनंद झाला.शेट्यांनी दुरुन महाराजांना हात दाखविला.जवळ पोचताच ते खाली उतरले‌ व त्यांनी देवांचा विग्रह महाराजांच्या हातात दिला.महाराजांच्या डोळ्यात अश्रू तरळले.त्यांनी तो विग्रह हृदयाशी लावला.महाराजांनी मग देवांना पालखीत बसवले.सुवासिनींनी देवांना ओवाळले.वाजत गाजत हरीनामाच्या गजरात देवांना मठात घेऊन आले.महाराजांनी देवांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. सन १७८५ ला श्रीपंढरीनाथांची शुभराय मठात प्रतिष्ठापना झाली.महाराजांनी पुढे देवांचे चरण धातुचे केले.देवांसाठी सुंदर देवघर बनविले.रोज ती मुर्ती ताम्हाणात घेऊन तिचा अभिषेक महाराज करत व सुंदर अलंकारांनी सजवून देवांना गाभार्यात विराजमान करीत.पुढे विस्तिर्ण मठाचे काम झाले.महाराजांना निवासासाठी एक खोली , सुंदर मध्यभागी देवघर बांधण्यात आले.महाराजांनी पांडुरंगाची सगुण उपासना सुरु केली.देवांची काकड आरती ते शेजारती यथासांग ते करु लागले.देवांची जयंती व संतांचे पुण्यतिथी उत्सव सुरु केले.उपजतच कलायोगी असलेले शुभराय महाराज आता देवापुढे आपली कला प्रगट करु लागले.देवांच्या विविध दशावतारांची चित्रे काढून त्याने देवांना सजवू लागले.( आजही ही अतिशय दुर्मिळ आणि सुंदर चित्रे बघायला मिळतात. आज हा एक अमुल्य ऐतिहासिक ठेवा झाला आहे.) पुढे श्री.हरिपंततात्या राळेरासकरांनी यांच्या सात पिढीतील प्रासादिक कालियामर्दनाची मूर्ती देवांच्या रथयात्रेसाठी उत्सव मूर्ती म्हणून ती महाराजांना दिली.आजही ती मूर्ती आपल्याला बघण्यास मिळते.गुरुदीनलाल कलवार यांनी महाराजांना लाकडी रथ अर्पण केला.हा रथ महाराजांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला होता.हा वैशिष्ट्यपूर्ण रथ बांधण्याचे काम महाराजांनी सोमवंशीय आर्य क्षत्रिय समाजाकडे महाराजांनी दिले.हा रथ आजही शुभराय मठात आहे. 

                       

शुभराय महाराज मोठे कलाप्रेमी होते.त्यांनी महाभारतातील प्रसंगावर अनेक वैशिष्ट्यपूर्ण असे सुंदर चित्र काढलेले आहेत.या चित्रांची किर्ती ऐकून पेशवे स्वतः मठात आले होते.पेशव्यांनी मठाला चाळीस सहस्र वतन दिले.पण निस्पृह महाराजांनी त्याचा स्विकार केला नाही.महाराजांना भेटायला थोर शाहिरी रामकवी हे ही आले होते.तसेच जगमान्य कविवर्य मोरोपंत व महाराजांची भेट झाली होती. 


सोलापूरच्या राम जोशी यांच्या तमाशात चिमाबाई नावाची नर्तकी होती.ती अधूनमधून महाराजांच्या दर्शनास मठात येत असे.तिच्याबरोबर तिची कुर्ती गुलबी ही येत असे.एक गृहस्थ तिला म्हणाले, "तुम्ही येता ते येता व बरोबर कुत्रीला ही आणता ,तिला नका आणत जाऊ." चिमाबाईला फार वाईट वाटले.परत येतांना त्यांनी त्या कुत्रीला बांधून ठेवले.ज्या वेळी ती महाराजांपुढे आलं ,तेव्हा महाराज म्हणाले, "आज तुझी गुलबी नाही आली?" ती म्हटली "ती येत होती मीच तिला बांधून ठेवले." महाराज तिला म्हणाले , "तुझी गुलाबी मोठी अधिकारी आहे.महाराजांनी तिला आज्ञा दिली की "उद्या तिला घेऊन ये." दुसर्या दिवशी चिमा गुलबीला घेऊन मठात आली.महाराजांनी गुलबीला आवाज दिला, "ये गुलबे ये.अशी आमच्या जवळ ये." गुलबी महाराजांच्या जवळ शेपटी हलवीत आली.महाराजांनी मोठ्या मायेनं तिला थोपटले.म्हणाले, "ऊठ बेटा ,संपला तुझा इथला वास ऊठ"गुलबी उठली. तिनं महाराजांना तीन प्रदक्षिणा घातल्या.तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत होतं.ती पुन्हा महाराजांच्या पायाजवळ आली.तिनं एकदा मुखाकडे पाहिलं आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं ते पुन्हा उचललंच नाही.गुलबीला महाराजांनी मुक्ती दिली होती.पुढे महाराजांनी चिमाबाईला ही अनुग्रह देऊन तिचा उद्धार केला होता. हुमणाबाद चे दत्तावतार माणिकप्रभुही सोलापूरात आले होते.ते शुभराय मठात आले.सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेतले .त्यांनी महाराजांची भेट घेतली होती.तसेच शंकराचार्य ही मठात येऊन गेले होते.शुभराय महाराजांच्या कार्याची व्याप्ती प्रचंड मोठी होती.अनेक लिला ,अनेकांचा उद्धार महाराजांनी केला.अनेकांचे कल्याण केले.एकदा मठात प्रवचन संपल्यावर महाराज उपस्थितांना म्हटले की आता देवांच्या आज्ञेनुसार हा देह ठेवायचा वेळ जवळ आला आहे.महाराजांचे हे शब्द जणू तप्त पार्यासारखे भक्तांच्या कानात पडले.सर्वांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले.ही वार्ता हा हा म्हणता सर्व सोलापूरात पसरली.सर्वत्र खिन्नतेचे वातावरण तयार झाले.सर्व शिष्यांना जवळ बोलावून महाराजांनी त्यांना आशिर्वाद दिले.शेवटी आपले अंतरंग शिष्य असलेल्या रावजी बुवांना महाराजांनी बोलाविले.बुवांचा अधिकार मोठा होता.त्यांनी महाराजांची खुप सेवा केली होती.महाराज त्यांना म्हणाले, "तुमची सेवा अशीच अखंड सुरु ठेवा.या मठातील प्रत्येक उत्सव व देवपूजेची जबाबदारी तुमच्यावर सोपवित आहे.बुवांच्या पत्नी लक्ष्मीबाईंना महाराजांनी आशिर्वाद दिला व काही मागण्यास सांगितले.तेव्हा त्या माऊली साश्रुनयनांनी थरथरत महाराजांना म्हणाल्या , "महाराज आमच्या शेवटच्या पिढीतील शेवटच्या माणसाने आपली आणि विठुरायाची भक्तीच करावी." महाराज आनंदाने तथास्तु म्हणाले.आजही बुवांची आठवी पिढी श्रीशुभांगी बुवा म्हणजेच माईंच्या रुपात शुभराय महाराजांची व विठुरायांची सेवा करत आहे.त्यानंतर सर्व शिष्य रडायला लागले.सर्वांच्या दु:खाचा बांधच मोडला.भाद्रपद वद्य दशमीचा दिवस जवळ आला.सकाळी महाराजांनी आपले आन्हीक केले.देवांची पुजा आरती केली.आनंदांने देवांचे दर्शन घेतली.या दिवशी महाराजांचे सर्व प्रिय शिष्य मठात हजर होते.माध्यन्ह आरती झाली महाराज मठातील आपल्या आसनावर जाऊन बसले.सन १८२० रोजी भाद्रपद वद्य दशमीला महाराजांनी माध्यान्हकाळी आपली प्राण ज्योत पांडुरंगाचे चरणी विलिन केले.आपल्या नश्वर देहाचा त्याग करुन महाराज वैश्विक निर्गुण रुप धारण करते झाले.महाराजांनी मठात फक्त उत्सव व अन्नदानचं केले नाही तर आलेल्या प्रत्येकाला आपले मानले.त्याला सतत उपदेश‌ देऊन त्याचे कल्याण व्हावे हीच अखंड भावना त्यांची असायची.असा हा सिद्धयोगी ,कलायोगी महापुरुष अनंत जिवांचा उद्धार करुन समाधिस्थ झाला.आजही अनेक लोकांना महाराजांच्या कृपेचा अनुभव येतो.महाराजांचे कार्य आजही मोठ्या प्रमाणात सुरु आहे याचा अनुभव भक्तांना येतो आहे.आजच्या पावन दिवशी ही शब्दसुमनांजली श्रीचरणी अर्पण करतो आणि इथेच थांबतो.श्री शुभराय महाराजांनी आपल्या सर्वांवर अशीच अखंड कृपा करुना करावी ,या जिवनात हरीभक्ती करण्याचे सामर्थ्य द्यावी ही श्रीचरणी प्रार्थना करतो .

      ✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

श्रीदत्त शरणं मम 🌿🌺🌸🙏🚩

राम कृष्ण हरी 🌿🌺🌸🙏🚩

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...