Friday, August 8, 2025

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

 

#कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-

             

ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-

                          नाथ संप्रदाय हा आपल्या भारतीय धर्म परंपरेतील एक परिवर्तनवादी व स्वतंत्र विचारांचा संप्रदाय आहे.संपूर्ण नाथपंथाने विशेष करुन भगवान श्रीमत्सेंद्रनाथ , भगवान गोरक्षनाथ यांनी रुढी, परंपरा, तथाकथित विषमता निर्माण करणारे नियम,रुढीवादी व अमानवी शास्त्र या सर्वांचा विरोध करुन स्वतःचे सर्वतंत्र स्वतंत्र असे मुक्त तंत्र ,मुक्त शास्त्र व मुक्त मार्ग निर्माण केले.शाबर मंत्र ,शाबर तंत्र ,सिद्धांत ग्रंथ ,योगपर ग्रंथ ,विविध पदरचना ही सर्व नाथसंप्रदायाची मिरासी आहे व ती भगवान गोरक्षनाथांनी सर्वां करिता प्रगट केली.भगवान गोरक्षनाथांनी व संपूर्ण नाथ पंथांने जे ज्ञान सामाजात आधी मुद्दाम कवाडबंद ठेवले गेले होते ते नाथसंप्रदायाच्या ज्ञानरुपी गंगा प्रवाहातून प्रवाहित केले. भगवान आदिनाथांनी हे ज्ञान पहिले दिले ते माता पार्वतीला. याच आहेत नाथ परंपरेतील पहिल्या नाथ , ज्यांना नाथ परंपरेत उदयनाथ म्हणून ओळखले जाते.हेच नाथ परंपरेचे वैभव पुढे ज्ञानदेवांच्या सर्व वाङ्मयातून प्रवाहित झालेले दिसते.सामाजिक अज्ञानाच्या स्थितीत बदल घडविण्यासाठी ज्ञानदेवांना नाथ परंपरा हाच उत्तम विचार प्रवाह का वाटला ? हाच उत्तम मार्ग का वाटला?  हा खरोखर सखोल अभ्यासाचा व चिंतनाचा विषय आहे.

  

अवतार जन्माला येण्यापूर्वी संपूर्ण कुळ हे परम पवित्र असणे गरजेचे असते व तो नियम ज्ञानदेवांच्या कुळातही चालून आला हे क्रमप्राप्तच ठरते.ज्ञानोबारायांच्या जन्मापूर्वी तिन पिढ्या आधीपासून नाथ परंपरेचे पूर्ण लक्ष व कृपा या कुळावर होती. हा काही निव्वळ योगायोग नव्हता तर ही नियतीची पूर्व योजना होती.भगवान गोरक्षनाथांना आपले विचार ,आपले स्वतंत्र शास्त्र तळागळात पोचवून त्यातून दिव्य असे आमूलाग्र बदल घडविण्याचे कार्य करुन घ्यायचे होते व ते त्यांनी करुन घेतले ही.जे आज वारकरी संप्रदायाच्या रुपात आपल्या सर्वांसमोर अनुभवरुपात प्रगट आहे. माउली ज्ञानोबारायांचे पंजोबा त्र्यंबकपंत यांच्यात भगवान गोरक्षनाथांनी हे नाथपंथाचे भक्ती बीज पेरले ,हेच बीज पुढे गोविंदपंतांच्या रुपात अंकुरित झाले, पुढे विठ्ठलपंतांच्या रुपात याचे वृक्षात रुपांतर झाले आणि अखेरीस निवृत्ती ,ज्ञानदेव ,सोपानदेव व मुक्तीईच्या रुपात या वृक्षाला अमृतमय असे फळ लागले.


आता आपण ज्ञानदेवांच्या पंजोबाचे म्हणजे त्र्यंबकपंतांचे चरित्र बघूयात.हेच पुढे माउलींच्या कुळाचे मुळपुरुष म्हणून प्रसिद्ध झाले.हे मोठे कर्तबगार व उत्तर काळात मोठे भगवद्भक्त झाले.त्र्यंबकपंतांचे मौंजीबंधन झाल्यावर ते देवगडास(आजचे देवगिरी) येथे वेदाध्ययनासाठी गेले.शास्त्रांचे ,वेदांचे अध्ययन पूर्ण झाल्यावर ते तिथेच राजे जाधवांच्या दरबारात सेवेकरिता रुजु झाले.यथाकाळी त्यांचा विवाह उमाबाईंशी झाला.पुढे त्यांना दोन पुत्र झाले ज्यात थोरले होते गोविंदपंत व धाकटे होते हरिहरपंत.त्र्यंबकपंतांचे दोन्ही पुत्र मोठे कर्तबगार होते.यातील थोरले जे गोविंदपंत होते त्यांनी आपेगाव येथील कुलकर्णी पद सांभाळले व धाकटे हरिहरपंत हे वडिलांसोबत राजदरबारी सेवेत रुजू झाले. त्र्यंबकपंतांचे चातुर्य , बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा, कामातील कौशल्य ,काटेकोरपणा व राजनिष्ठा या सर्व गुणांमुळे तत्कालिन सार्वभौम राजा जैत्रपाल उर्फ जैतुंगीने त्यांना बीड देशाचा राज्यकारभार सोपवला.राजाने त्यावेळी जो करारनामा त्र्यंबकपंतांना लिहून दिला तो बघितला तर लक्षात येईल की त्र्यंबकपंतांना एका राजाला साजेसे असे ऐश्वर्य,अधिकार,सैन्य व कार्य राजा जैत्रपालाने सोपवले होते. त्र्यंबकपंतांनी हा बीड भागातील कारभार अतिशय उत्तमरित्या चालविला.पुढे देवगिरीला जैत्रपालाचा मृत्यू झाला.त्याचा मुलगा सिंघल उर्फ सिंव्हल राजा हा राजगादीवर आला.याने त्र्यंबकपंतांचा धाकटा पुत्र हरिहरपंत याला आपला दुय्यम सेनापती नेमले.पण पुढे असे काही घटनाक्रम घडले की त्र्यंबकपंतांना प्रखर असे वैराग्य उत्पन्न होऊन ते अंतर्मुख झाले व परमार्थाकडे वळले.ती घटना अशी की, काही कालावधी नंतर देवगिरीच्या चाळीस कोस अंतरावर असलेल्या बालाघाट प्रदेशातील करंज देशमुखांनी राजद्रोह केला.तो राज्यावर ससैन्य चालून आला.तिन हजार सैन्य घेऊन त्याने राज्यात हलकल्लोळ माजवला,राज्यात धुमाकूळ घातला.त्याचा बिमोड करण्यासाठी सिंघण राजाने हरिहरपंतांना आपल्या वडिलांसह म्हणजे त्र्यंबकपंतांसह लढायला पाठवले.सोबत मोठे सैन्य घेऊन गेलेल्या त्र्यंबकपंत व हरिहरपंतांनी हे बंड मोडीत काढले. पण या लढाईत हरिहरपंत हे धारातिर्थी पडले.आपल्या कर्तबगार मुलाचा असा अवेळी मृत्यू पाहून त्र्यंबकपंतांना अतोनात दुःख झाले.त्यांना वैराग्य होऊन त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला व ते आपेगावी आले.पण आता संसारात ही मन रमेना प्रपंचात समाधान मिळत नव्हते.आपले जिवन व्यर्थ जात आहे असे त्यांना वाटू लागले व ते त्यानंतर हरिभक्तीत रत झाले.हिच ज्ञानदेवांच्या अवताराची पायाभरणीची सुरुवात.भगवान गोरक्षनाथांचे या कुळावर लक्ष होतेच कारण भविष्यात नाथपरंपरेचे वैभव त्यांना ज्ञानदेवांच्या रुपात प्रगट करायचे होते यात शंका नाही.भगवान गोरक्षनाथ भ्रमण करित आपेगावी आले. प्रखर वैराग्याने पवित्र झालेल्या त्र्यंबकपंतांवर त्यांनी कृपा अनुग्रह केला.सद्गुरु भेटीनंतर त्र्यंबकपंतांना खरे समाधान लाभले.दिवसेंदिवस त्यांची साधना वाढत गेली व ते आत्मानंदात रमू लागले.पुढे त्यांनी अखंड सद्गुरु व भगवत स्मरणात आपले जिवन व्यतीत केले.पुढे ईश्वरचिंतनातच त्र्यंबकपंतांनी देह ठेवला.विशेष बाब अशी की ज्यावेळी त्यांनी देह ठेवला त्यावेळी भगवान गोरक्षनाथ तेथे स्वतः हजर होते.त्यांनी स्वतः आपल्या या शिष्याला त्र्यंबकपंताला समाधी दिली. हिच खरी नाथपरंपरेच्या कृपेची सुरुवात.पुढील भागात आपण ज्ञानदेवांच्या पितामहांच्या म्हणजे गोविंदपंतांच्या चरित्राची माहिती घेऊयात….

                   ✍🏻त्यांचाच अक्षय जाधव पाटील आळंदी


संदर्भ ग्रंथ :- १) आदी,तिर्थावळी - नामदेवराय कृत

                  २) ज्ञानदेवलिलामृत

                  ३) भक्तविजय - महिपती कृत

                  ४) ज्ञानेश्वरविजय - निरंजन माधव

                  ५)ज्ञानदेवविजय - श्रीमामामहाराज देशपांडे कृत

                  ६)श्रीज्ञानेश्वर महाराज - ल.रा पांगारकर

                  ७)श्रीज्ञानदेव चरित्र - भिंगारकरबुवा

                  ८) ब्रह्मचित्कलामुक्ताई - वक्ते बाबा

Friday, August 1, 2025

कथा ज्ञानदेवांची 🙏🏻🌸☘️

 


#कथा_ज्ञानदेवांची_भाग१ :- 

अज्ञानाच्या गाढ निद्रेत निद्रिस्त झालेल्या समाजाला खडबडून जागे करणारा सुर्योदय ज्ञानोबांच्या रुपात महाराष्ट्राने बघितला.श्रीगीतेत भगवंतांनी म्हटलेच आहे की, “ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते,त्या त्या वेळी मी अवतार धारण करतो.” महाविष्णू ज्ञानदेवांचा अवतार ही भगवंतांच्या गीतेतील वचनाला सत्य करण्यासाठीच झाला होता हे त्रिकालबाधीत सत्य आहे. त्यांच्या अवतारासाठी समाजातील अशीच ग्लानी आणणारी परिस्थिती कारणीभूत ठरली.कर्मकांड,रुढी,परंपरा यांचा आधार घेऊन समाजातील अज्ञानी लोकांचे झालेले शोषण व या सर्वांमुळे समाजात विषासारखी पसरलेली विषमतेची दरी यामुळे समाज पोखरून निघालेला होता.धर्म फक्त शाब्दपांडित्याच्या दिखाव्याचा भाग झाला होता.शब्दापांडित्याने बरबटलेल्या लोकांमुळे मुळ धर्माच्या ज्ञानावर जणू अज्ञानाचे जळमट बसले होते.जणू काही हे धर्माला लागलेले ग्रहणच होते व या अज्ञानाच्या ,संशयाच्या ग्रहणाला दूर करण्यासाठी श्रीभगवंतच स्वतः ज्ञानदेवांच्या रुपात अवतरले. गेल्या हजार वर्षात महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होऊन गेलेलं हे अभिजात सुर्योदयाचे वरदान परमेश्वराकडून आपल्याला लाभले असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.असे ज्ञानदेव ,अशा ज्ञानदेवांचे चरित्र,अशा ज्ञानदेवांनी केलेले कार्य हे गेल्या हजार वर्षांतील एकमेवाद्वितीय असे आहे.ज्ञानोबांचा जन्म /अवतार हा फक्त ज्ञानेश्वरी पुरता मर्यादित नव्हता तर त्यामागची भूमिका,त्यामागचे त्यांच्या अवताराचे प्रयोजन,त्यामागे त्यांनी केलेल्या कार्याचा विस्तार,त्यांनी मांडलेला विचार व त्यांनी स्थापन केलेल्या संप्रदायाचा हेतू या सर्वांचे जर चिंतन आपण केले तर एक गोष्ट लक्षात येते की ज्ञोनोबांनी समाजाला,या व्यवस्थेला नवी दिशा दिली ,नवा सुर्योदय दिला.तर अशा ज्ञानदेवांचे चरित्र आजपासून आपण बघणार आहोत.

  

“शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी” असे जगद्गुरु तुकोबारायांचे वचन आहे आणि याचा प्रत्यय आपल्याला ज्ञानोबारायांच्या चरित्रातून दिसून येतो.ज्या कुळामध्ये अनेक पिढ्यांपासून भगवंतांच्या कृपेचे बी पेरल्या गेलेले असते,भगवद भक्तीच्या बीजाचे बीजारोपण झालेले असते त्याच कुळामध्ये भगवंत अवतार घेतात,त्याच कुळामध्ये भगवंतांचे अंश अवतरतात.हाच नियम ,निसर्गाची हिच सगळी क्रिया आपल्याला माउलींच्या कुळामध्ये बघायला मिळते.ज्ञानेश्वर माउलींच्या कुळामध्ये अनेक शूरवीर,थोर पुरुष होऊन गेले.या कुळातील सर्व थोर पुरुषांनी आपल्या शुद्ध कर्माने कुळाचे पावित्र वाढवले जणू काही ज्याप्रमाणे बी पेरण्यासाठी आधी शेतीची मशागत केली जाते त्याचप्रमाणे या सर्व पुरुषांनी माउलींच्या जन्माकरिता कुळाची शुद्धी केली ,एका पवित्र कुळाचे निर्माण केले. श्री ज्ञानदेवांचे मुळपुरुष माउलींपासून सहावे पुरुष म्हणजे माउलींच्या पंजोबांचे पंजोब श्रीहरिहरपंत. मुळचे हे कुटुंब पैठणपासून सात मैल अंतरावर असलेल्या आपेगावचे.हे शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन ब्राह्मण.यांचे गोत्र पंचप्रवरान्वीत वत्स होते.हरिहरपंतांकडे शके १०६० म्हणजे इ.स ११३२ च्या ही पूर्वीपासून पिढीजात कुलकर्णीपण होते.म्हणजे माउलींच्या जन्माच्या दोनशे वर्षापूर्वीपासूच हे कुळ आर्थिकदृष्ट्या सुखवस्तु होते.यांचे मुळ आडनाव हे “जावळे” पण पिढीजात कुलकर्णीपणामुळे हे कुळ कुलकर्णी या नावानेच विख्यात झाले.हरिहरपंतांच्या स्वच्छ वृत्ती व प्रामाणिकपणा यामुळे तत्कालीन राजे भिल्लम जैत्रपाल यांची त्यांच्यावर मर्जी बसली होती व त्यांना राजाश्रय ही मिळाला होता.या हरिहरपंतांना पुढे तिन अपत्ये झाली.पहिले थोरले रामचंद्रपंत ,मधले केशवपंत व धाकट्या कन्या मोहनाबाई. यापैकी मोहनाबाईंचा विवाह देवगिरीच्या नरहरपंत माचवे यांच्या मुलाशी झाला.मधल्या केशपंतांचा बालपणीच मृत्यू झाला.त्यामुळे हरिहरपंतांनंतर कुटुंबाची पूर्ण जबाबदारी ही रामचंद्रपंतावर येऊन पडली.रामचंद्रपंत पुढे सर्व कुलकर्णीपण बघू लागले.हे अतिशय सत्शील होते.यथाकाळी यांचा विवाह झाला व पुढे यांना गोपाळपंत नावाचा एक मुलगा झाला. गोपाळपंतांनी आपल्या वडिलांच्या मृत्युनंतर संपूर्ण कुटुंब व कुलकर्णींपणाचा भार सांभाळला. याच गोपाळपंतांचे चिरंजीव म्हणजे ज्ञानेश्वर माउलींचे आजोबा त्र्यंबकपंत.पुढे आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने व पवित्र चारित्र्याने त्र्यंबकपंत हेच ज्ञानोबांच्या कुळाचे मूळपुरुष म्हणून विख्यात झाले.त्यांचा राज्यकारभार तर दैदिप्यमान होताच पण हे थोर भगवदभक्त ही होते.यांच्या चरित्रा पासूनच माउलींच्या चरित्राची खरी सुरुवात होते किंवा ज्ञानेश्वर माउलींच्या चरित्राची मुहूर्तमेढ रोवली गेली असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.याचे कारण ही आपल्याला त्यांचे चरित्र जाणून घेतल्यावर होणार आहे.ही सर्व माहिती आपण पुढील द्वितीय लेखात बघूयात..

          ✍🏻त्यांचाच अक्षय जाधव पाटील आळंदी


संदर्भ ग्रंथ :- १) आदी,तिर्थावळी - नामदेवराय कृत

                  २) ज्ञानदेवलिलामृत

                  ३) भक्तविजय - महिपती कृत

                  ४) ज्ञानेश्वरविजय - निरंजन माधव

                  ५)ज्ञानदेवविजय - श्रीमामामहाराज देशपांडे कृत

                  ६)श्रीज्ञानेश्वर महाराज - ल.रा पांगारकर

                  ७)श्रीज्ञानदेव चरित्र - भिंगारकरबुवा

                  ८) ब्रह्मचित्कलामुक्ताई - वक्ते बाबा

Saturday, November 23, 2024

भगवान कालभैरव जयंती 🙏🏻🌸☘️🌹🔱🕉️



#भगवान_कालभैरव_जयंती :- 
                          कार्तिक कृष्ण अष्टमी कालाष्टमी ही भगवान शिवांचे पूर्ण अवतार असलेले भगवान श्रीकालभैरवांची प्राकट्य तिथी.आजच्या या परमपावन तिथीला आपण भगवान कालभैरव यांच्या प्राकट्याची कथा ,त्यांचा व शाक्त संप्रदाय,नाथ संप्रदाय संबंध ,तसेच भगवान कालभैरवांचे स्वरूप ,त्यांचे मुख्य प्रकार, त्यांची कुठल्या रुपात उपासना सर्वत्र प्रचलित आहे ,कालभैरवांचे मुख्य स्थान कुठले अशा अनेक विषयांवर आपण चिंतन करणार आहोत.  

                     भगवान भैरव हे तंत्रमार्गाचे अधिष्टात्री देवता आहेत.ते ज्ञानाचे अथांग सागर आहेत.ज्यांच्यापासून भयाची उत्पत्ती झाली आहे,जे भयाची वृद्धी करतात,जे भयावर शासन करतात व जे भयाचा नाश करतात असे भगवान भैरव हे काळाचेही राजे आहेत म्हणूनच त्यांना “कालराज” असे म्हटले जाते.तंत्रानुसार भैरवाचा अर्थ होतो जे स्वतः शिव आहेत.तंत्र मार्गाचे जे साधक ज्ञान घेत असतात,जे साधक सद्गुरु कडून तंत्रमार्गाची दिक्षा घेऊन तंत्राचा अभ्यास करित असतात त्यांना भैरव व भैरवी असे म्हटले जाते.भगवान भैरवांना काल ही भितो म्हणून त्यांना “कालभैरव” म्हटले जाते. प्राचिन ग्रंथ “विज्ञान भैरव” व “तंत्रलोक” नुसार भैरव हा शब्द भि व अव या धातुने तयार झाला आहे.ज्याचा अर्थ होतो भिषण,भय कारक तसेच जे साधकाचे संकटापासून रक्षण करतात असे भैरव. “वामकेश्वर” तंत्रात भैरव शब्दातील भ,र,व हे तिन जे वर्ण आहेत त्याचा अर्थ भरण,रमण व वमन असा होतो.अर्थात ज्या रुपात भगवान सदाशिव हे या विश्वाची उत्पत्ती ,पालन व संहार करतात ते भैरव. शाक्त संप्रदायात ,शाक्त तंत्रामध्ये भैरव उपासनेला अनन्यसाधारण महत्व आहे.शाक्त तंत्र ग्रंथामध्ये भगवान भैरव उपासनेशिवाय शक्ती तंत्रात पूर्णत्व प्राप्तच होत नाही असे सांगितले गेले आहे.भैरव उपासना ही शक्ती उपासनेचा अविभाज्य भाग आहे.रुद्रयामल तंत्रामध्ये ६४ भैरवांची चर्चा केली गेली आहे.या ६४ भैरवांच्या शक्तीलाच आपण ६४ योगीनी म्हणून ओळखतो. तसेच ५२ शक्तीपिठाचे रक्षणकर्ते देवता हे ५२ भैरव आहेत.दशमहाविद्या या विश्वाच्या आद्य शक्ती आहेत व त्या प्रत्येक महाशक्तीला एक स्वतंत्र भैरव आहे.अशा प्रकारे भगवान कालभैरव हे शक्ती उपासनेमध्ये मुख्य देवता आहेत. 

 भगवान कालभैरव यांच्या प्राकट्या संबंधी तिन कथा आपल्या विविध पुराण ,तंत्र ग्रंथात वाचायला मिळतात. त्या तिन्ही कथा आपण या लेखात बघणार आहोत.

 १) सत्य युगाच्या सुरुवातील भगवान ब्रह्मदेव सुमेरु पर्वतावर बसलेले असतात तेव्हा भगवान विष्णू व इतर देवता तिथे जाऊन त्यांना मुळ तत्वाचे ,परब्रह्म तत्वाचे वर्णन करण्याची ,स्तुती करण्याची विनंती करतात.पण शिव मायेने ब्रह्म देवांना अहंकार होतो व “मीच निर्गुण निराकार ब्रह्म आहे,मीच अजन्मा आहे,मीच या सर्व विश्वाचे कारण आहे.” असे म्हणतात.असे म्हटल्यावर भगवान विष्णू त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करतात की ,”माझ्यातूनच तुमचा जन्म झाला आहे.मीच तुमचा पिता आहे.” पण शिव मायेमुळे ब्रह्मदेवांना अहंकार होतो व त्यांचा आणि भगवान विष्णूंचा वाद होतो.या वादाचा काहीही निष्कर्ष निघत नाही.त्यामुळे भगवान ब्रह्म आणि भगवान विष्णू हे चारही वेदांचे आवाहन करतात.त्यावेळी तिथे दिव्य देह धारण करुन चारही वेद प्रगट होतात.भगवान विष्णू त्यांना परब्रह्म कोण व त्यांचे वर्णन काय असे विचारतात.त्याचे तुम्ही वर्णन करा म्हणून सांगतात.त्यावेळी ऋग्वेद , यजुर्वेद, अथर्ववेद व सामवेद हे मुक्तकंठाने भगवान रुद्राची म्हणजे भगवान महादेवांची स्तुती करतात. तरी ही भगवान ब्रह्मा व विष्णू हे कथन अमान्य करतात.त्यांच्यात परत वाद सुरु होतो.तेव्हा त्या दोघांच्या मधे एक तेजपुंज स्तंभ तयार होतो. त्या स्तंभातून भगवान शिव प्रगट होतात. पण त्यांना बघून शैव मायेने ग्रस्त झालेले भगवान ब्रह्मा भगवान शिवांना म्हणतात की , “मीच तुमचा पिता आहे,मीच तुमची उत्पत्ती केली आहे.त्यामुळे तुम्ही मला शरण यां!” असे म्हटल्यावर भगवान शिवांना खुप क्रोध येतो आणि ते आपल्या देहातून एक भयंकर ,प्रचंड व भिषण असे रुप ते प्रकट करतात.हेच भगवान भैरवांचे प्राकट्य.भगवान भैरव हे अतिशय प्रचंड ,भयंकर असतात.त्यांना बघून सर्वांचा थरकाप उडतो. भगवान शिव भैरवांना अहंकाराने ग्रस्त ब्रम्हाला शासन करण्याची आज्ञा करतात.भगवान भैरव तात्काळ आपल्या उजव्या हाताच्या बोटाच्या नखाने ब्रह्मदेवांच्या पाचव्या मुखाला कापतात.तात्काळ ते पाचवे मुख कापले जाते व खाली पडते.असे केल्या क्षणी ब्रह्म देवांना आपल्या चुकीची जाणीव होते व ते आणि इतर देवता मिळून भगवान शिवांना शरण येतात.सर्व देव भगवान शिवांची स्तुती करतात. त्यानंतर भगवान शिव प्रसन्न होऊन व सर्वांना अभय देतात.भिषण रुप व काळालाही ज्यांच्यामुळे भय उत्पन्न झाले असे भगवान भैरवांवर भगवान शिव प्रसन्न होतात व त्यांना “कालभैरव” हे नाम देतात. पण ब्रह्म हत्या केल्याने भगवान भैरव यांच्या हाताला ब्रह्म देवांचे मस्तक येऊन चिटकते. तेव्हा भगवान शिव कालभैरवांना आपल्या प्रिय वाराणसी ,काशीला जाण्याची आज्ञा करतात.त्याचवेळी भगवान शिव कालभैरवांना काशीचे अधिपती ,काशीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करतात. भगवान कालभैरव काशीला जातात.तिथे गेल्यावर त्यांच्या हाताला चिटकलेले ब्रह्म कपाल गळून पडते व ते ब्रह्महत्येपासून मुक्त होतात.हे जिथे घडले ते स्थान आज कपालमोचन तिर्थ म्हणून प्रसिद्ध आहे .

 २) दुसरी कथा अशी की सत्ययुगात अंधकासुर नावाचा राक्षस जन्माला येतो. हा भगवान शिवांचा भक्त असतो.कठोर तप करुन तो भगवान शिवांना प्रसन्न करुन घेतो.भगवान शिवांकडून त्रैलोक्य विजयाचे अभय वरदान तो मिळवून घेतो.त्यानंतर त्रैलोक्यवर त्याने हाहाःकार माजवला.सर्वत्र ऋषी मुनी ,देव त्रस्त झाले. यामुळे अंधकासुराचा अहंकार शिगेला पोचतो व अज्ञानी अंधकासुर आपले सैन्य घेऊन भगवान शिवालाच युद्धाला ललकारतो,आव्हान देतो.जेव्हा तो भगवान शिवांवर आक्रमण करतो तेव्हा भगवान शिवांच्या रुधिरापासून भगवान कालभैरव प्रगट होतात .भगवान कालभैरव तात्काळ अंधकासुराला शासन करतात व त्याचा वध करतात.ही कालभैरवांच्या प्राकट्याची दुसरी कथा.

 ३) तिसरी कथा अशी की भगवान ब्रह्मा चार वेदांना प्रगट करतात व त्यानंतर आपल्या पाचव्या मुखाने पंचम वेदांची रचना करण्यास सुरुवात करतात .त्यावेळी भगवान शिव तिथे प्रगट होतात व त्यांना तसे न करण्याची आज्ञा देतात.पण अहंकाराने ग्रस्त ब्रह्मा भगवान शिवांची आज्ञा पालन करत नाही.तेव्हा क्रोधायमान झालेल्या भगवान शिवांनी भगवान कालभैरवांना प्रगट केले.त्यानंतर भगवान कालभैरव आपल्या नखाने ब्रह्माचे पाचवे मुख कापतात व त्यांची अहंकारातून मुक्तता करतात. अशा या भगवान कालभैरवांच्या प्राकट्याच्या कथा आपल्या विविध ग्रंथातून वाचायला मिळतात.  

भगवान कालभैरव यांचे एकून ५२ रुप सांगितले जातात पण त्यातही आठ भैरव हे मुख्य समजले जातात.त्यात असितांग भैरव ,रुद्र भैरव,चंद्र भैरव,क्रोध भैरव,उन्मत्त भैरव,कपाली भैरव,भीषण भैरव,संहार भैरव यांचा समावेश होतो.नाथ संप्रदायात भगवान भैरवांची उपसना केली जाते.त्यांचे विविध शाबर मंत्र आपल्याला नाथ संप्रदायात वाचायला मिळतात.पण या सर्व शाबर मंत्राचा उपयोग सद्गुरु कडून माहिती करुन करावा लागतो. उपासनेच्या दृष्टीने भगवान कालभैरवांचे दोन रुप आपल्याकडे मुख्य समजले जातात.ते रुप म्हणजे बटुक भैरव जे भगवन कालभैरवांचे बाल्य रुप आहे व भगवान कालभैरव जे भगवान भैरवांचे उग्र स्वरुप आहे.भगवान कालभैरव हे तामसिक तंत्र देवता आहे तरी त्यांची उपासना ही सात्विक ,राजसिक व तामसिक मार्गाने केली जाते.खरंतर भगवान कालभैरवांचे विविध मंत्र ,बिज मंत्र ,कवच ,स्तोत्र हे आपल्या तंत्र ग्रंथात,पुराणात वाचायला मिळतात.पण या मंत्राचा जप वा उपासना ही सद्गुरु कडूनच घ्यावी लागते.त्या मंत्राचा जप आपण स्वतः करु नये.आता भगवान कालभैरव यांचे दोन स्तोत्र फार सोपे व प्रत्येकाला रोज म्हणता येतात.ते म्हणजे भगवान आदी शंकराचार्य यांनी रचलेले “कालभैरवाष्टक” आणि “बटुक भैरव अष्टोत्तरशत नामावली”. हे दोन्ही स्तोत्र भगवान भैरवांच्या उपासनेत आपण म्हणू शकतो. भगवान कालभैरवांचे मुख्य स्थान हे काशीला आहे.काशीचे कोतवाल ज्यांना आपण म्हणतो तेच भगवान कालभैरवांचे मुख्य व प्रथम स्थान आहे.तसेच अवंतिकापुरी म्हणजे भगवान महाकालेश्वराची उज्जैनी येथील क्षेत्र रक्षक भगवान कालभैरव हे अत्यंत प्राचिन व ज्वलंत स्थान आहे.दिल्ली येथील किलकारी भैरव यांचे स्थान हे महाभारत कालीन आहे.पांडवांना मदत करण्यासाठी भगवान कालभैरव तिथे प्रगट होतात व किलकारी देऊन दानवांचा संहार करतात म्हणून त्यांना किलकारी भैरव म्हटले जाते.हे भगवान कालभैरवांचे मुख्य स्थान आहे.चौथे स्थान महाराष्ट्रातील अमरावती परतवाडा येथील बहिरम हे स्थान.बहिरम हा भैरव या शब्दाचा अपभ्रंश आहे.हे भगवान कालभैरवांचे जागृत स्थान आहे.आपल्या महाराष्ट्राचे आराध्य ,कुलदैवत असलेले भगवान खंडोबा हे मार्तंड भैरव आहेत.भैरव उपासना आसेतू हिमाचल आपल्या भारतात केली जाते.भगवान भैरवांची उपासना ही साधकाला निर्भय बनवते.साधकाचे ,भक्तांचे रक्षण करणारे भगवान कालभैरव हे अत्यंत कृपाळु ,कारुण्यसिंधू आहेत. आजची ही शब्द सेवा भगवान कालभैरवांच्या चरणी अर्पण करतो व त्यांनी आपल्या सर्वांवर अखंड कृपादृष्टी ठेवेवी ही प्रार्थना करतो. 

             🖋️✍🏻त्याचाच अक्षय जाधव आळंदी

Monday, March 25, 2024

गौर पौर्णिमा भगवान श्रीचैतन्य महाप्रभुंचा आविर्भाव दिन🌸❤️

 


गौर पौर्णिमा भगवान श्रीचैतन्य महाप्रभुंचा आविर्भाव दिन🌸❤️

                             

नमो महावदान्याय,कृष्ण प्रेम प्रदायते ।

कृष्णाय कृष्ण चैतन्य,नामने गोर-तविशे नमः ॥


हे परम दानी अवतार ! आपण स्वतः श्री कृष्ण चैतन्य महाप्रभुंच्या रुपात प्रगट होणारे कृष्ण आहात.आपणच श्रीराधारानीचा सुवर्ण रंग धारण केला आहे आणि आपणच श्रीकृष्ण प्रभुंच्या शुद्ध प्रेम भक्तीला व्यापक रुपाने वितरीत करत आहात.आम्ही आपल्याला सादर प्रणाम करतो.


वैष्णव भक्ती योग मार्गाचे परमोच्च प्रचारक ,प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण व राधारानींचे संयुक्तिक अवतार,कृष्ण भक्तीचे परम प्रचारक व कृष्ण नाम संकिर्तनाचे आद्य आचार्य भगवान श्रीचैतन्य महाप्रभु हे १४ व्या शतकात होऊन गेलेले एक दिव्य भगवत अवतार आहेत.श्रीप्रभुंबद्दल ,त्यांच्या अवतार लिलां बद्दल चैतन्य चरितामृत ,चैतन्य भागवत या ग्रंथात विस्तृत पणे लिहीले गेले आहे.महाप्रभुंच्या चरित्रातील एक एक घटना इतकी दिव्य आहे की कुणालाही आनंददायक आश्चर्याची अनुभूती होईल.चैतन्य महाप्रभुंचा अवतार हा राधा-कृष्णांचा संयुक्तिक अवतार मानला गेला आहे.त्याची अनुभूती ही अनेक संतांना आली आहे व त्याला सर्व संतांनी एकमुखाने दुजोरा ही दिला आहे.श्रीप्रभुंचे महान कार्य म्हणजे कलियुगात सर्वांना नाम संकीर्तनाची दिक्षा महाप्रभुंनी दिली.श्रीकृष्ण नाम संकीर्तन प्रत्येकाला मोक्ष मार्गावर नेणारी नाव आहे व त्या शिवाय दुसरा तरणोपाय या कलियुगात नाही ही शिक्षा महाप्रभुंनी दिली.समाजातील दुषित मतभेद,वैषम्य ,रुढीं व कर्मठतेला फाटा देत श्रीप्रभुंनी उपनिषदातील अठरा शब्दीय बत्तीस अक्षर महामंत्र ( हरे कृष्ण ) याचे प्रगटीकरण केले व याचेच नाम संकीर्तन करुन सर्वांचा उद्धार केला.


चैतन्य चरितामृताच्या आधारे श्रीमहाप्रभुंचा जन्म सन १४८६ ला फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला पश्चिम बंगाल मधील नवद्विप नावाच्या गावात झाला होता.ज्याला आपण मायापुर म्हणून ओळखतो.श्रीमहाप्रभुंचा जन्म सिंह लग्नात चंद्रग्रहनाच्या वेळी झाला.त्यावेळी सर्व लोक हरीनाम घेत गंगास्नानास जात होते.श्रीमहाप्रभुंच्या वडिलांचे नाव जगन्नाथ मिश्र व आईचे नाव शची देवी होते.परम धार्मिक ,महावैष्णव असे हे दाम्पत्य होते.जणू यांच्या जन्मो जन्मीच्या भक्तीचे फळच महाप्रभुंच्या रुपात यांना लाभले होते.महाप्रभुंची कुंडली तत्कालिन विद्वानांनी बघितली तेव्हाच सर्वांनी भविष्य वर्तविले होते की हे बालक आजन्म श्रीहरी नाम संकार्तनाचा प्रचार प्रसार करेल.श्री महाप्रभुंचे पाळण्यातील नाव विश्वंभर असे ठेवले गेले. परंतु सर्व लोक महाप्रभुंना निमाई म्हणत असत.तसेच प्रभुंचा रंग हा सुवर्णासम होता म्हणून त्यांना गौरांग ,गौर हरी,गौर संदर ही म्हटले जात असे.चैतन्य भागवत व चैतन्य चरित्रामृतात श्रीमहाप्रभुंच्या अतिशय दिव्य अशा बाललिला वर्णन केल्या आहेत.भगवान श्रीकृष्णासमच श्रीमहाप्रभुही अतिशय खट्याळ व दिव्य अशा बाललिला करते झाले.श्रीगौरांग महाप्रभु बालपणापासूनच विलक्षण प्रतिभा संप्पन्न होते.तसेच ते अत्यंत सरळ ,प्रेमळ व भावुक स्वभावाचे होते.ते जेव्हा विविध बाल लिला करित असत तेव्हा प्रत्येक व्यक्ति त्यांच्यापुढे हतप्रभ होत असत.महाप्रभुंचे व्रतबंध व इतर सर्व संस्कार यथायोग्य वेळी संपन्न झाले .त्यानंतर त्यांची शिक्षाक्रम,अध्ययन सुरु झाले.अगदी कमी वेळात गौरांग महाप्रभु न्याय व व्याकरणादी शास्त्रीत पारंगत झाले.त्यांनी कमी वयातच मायपूर मध्ये शाळा ही काढले व काही काळ अध्यापकाचे काम ही केले.तरीही बालपणापासून महाप्रभु राम-कृष्णाच्या स्तुती करण्यात मग्न राहत असत.त्यांना त्याचेच अत्यंत प्रेम होते. वयाच्या १५ व्या वर्षी महाप्रभुंचा विवाह लक्ष्मीप्रिया यांच्याशी झाला.पण काही वर्षातच सर्पदंश झाल्याने त्यांचा मृत्यु झाला.वंश वृद्धी करिता त्यांच्या वडिलांनी गौरांग प्रभुंचा दुसरा विवाह करुन दिला.तो नवद्विपचे राजपंडित सनातन यांच्या पुत्री विष्णुप्रिया यांच्याशी झाला.महाप्रभुंचे जिवन आता तारुण्यवस्थेला आले अशातच त्यांच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले.


श्रीगौरांग प्रभु आपल्या वडिलांचे श्राद्ध करण्याकरिता गया श्रेत्री गेले होते.त्यावेळी त्यांची भेट ईश्वरपुरी नावाच्या संतांशी झाली.त्यांनी गौरांग प्रभुला दशाक्षरकृष्णमंत्राची दिक्षा दिली.दिक्षा देल्याबरोबर श्रीमहाप्रभु मूर्च्छित झाले व जमिनीवर पडले.त्यादिवसानंतर महाप्रभुंचे संपूर्ण जिवनच बदलले.ते प्रत्येक क्षण कृष्ण स्मरणात लिन राहू लागले.कृष्ण नाम घेता क्षणी त्यांचे तिव्र अष्टसात्विक जागे होऊ लागेल.हे कृष्ण प्रभु म्हणत ते जोरात हसत ,तर कधी रडत.कधी बेहोश होत तर कधी पळत.श्रीमहाप्रभुंची अवस्था एखाद्या वेड्या व्यक्ति समान झाली.कृष्ण भावनेचा तिव्र उगम श्रीमहाप्रभुंच्या ह्रदयात भरुन वाहू लागला.महाप्रभु त्या कृष्ण स्मरण अमृताने पार प्रेम वेडे झाले.तेव्हा तात्काळ आता व्रज ,गोकुळात जाऊन कृष्ण प्रेमातच जिवन व्यतीत करावे असे प्रभुंवा वाटू लागले पण तेवढ्यातच “वृंदावन ,गोकुळात जायला अजून अवकाश आहे” अशा आकाशवाणी झाली त्यामुळे मग प्रभु आपल्या गावी परतायला निघाले.ईश्वरपुरी महाप्रभुंना दिक्षा दिल्यानंतर अंतर्धान झाले.पुढे ते कुठे गेले याची त्यांनी कुणालाही माहिती होऊ दिली नाही कारण स्वयं भगवान राधा कृष्ण गौरांग रुपात आपले शिष्य झाले .आता जर आपण प्रगट रुपात राहलो तर शिष्य म्हणून गौरांग प्रभु आपल्याला नमस्कार करतील व ते आपल्याला सहन होणार नाही .म्हणून ईश्वर पुरी महाराज गुप्त झाले. महाप्रभु नवद्विपला आल्यानंतर त्यांची कृष्ण प्रेमातील जी अवस्था झाली होती ती अतिशय दिव्य अशा होती.”हे कृष्णा,मायबापा तु कुठे आहेस? मला का भेटत नाहीस ? मज पाप्यावर दया कर! मला भेट दे! “ असे म्हणून रडत असत,मुर्च्छित होत असत. श्रीमहाप्रभुंचा हा प्रेमावेश इतका तिव्र व प्रचंड असे की त्याचे वर्णन करण्यास कुणातही सामर्थ्य नाही. श्रीमहाप्रभुंचे दिव्यत्व इतके अनाकलनीय होते की या प्रेमावेशात महाप्रभुंना जो कुणी स्पर्श करित असे त्याला ही त्या प्रेमावेशाची अनुभूती होत असे. पुढे महाप्रभुंचे चित्त संपूर्ण कृष्णमय झाले होते.त्यांना इतर कुठल्याही गोष्टींचे भान राहिले नाही.त्यामुळे त्यांची पाठशाळा ही बंद झाली. आपल्या विद्यार्थांना घेऊन सर्वात प्रथम गौरांग महाप्रभुंनी 

“हरे हरये नमः कृष्ण यादवाय नमः ।

गोपाल ग़ोविन्द राम श्रीमधुसूदन ॥ 

या नामाचे संकीर्तन केले.ही महाप्रभुंच्या संकीर्तनाची सुरुवात होती.यापुढे कृष्ण नाम संकीर्तनाने महाप्रभुंनी त्रिभुवन भरुन टाकले होते. काही कालावधीनंतर महाप्रभुंनी भक्त भावाचे प्रगटीकरण केले.भक्तीत असणाऱ्या सेवा ,प्रेम ,करुणा ,नम्रता असा अनेक गुणांचे प्रत्यक्ष प्रगटीकरण महाप्रभु करु लागले.प्रभुंचे हे दिव्य आचरण बघून लोक अचंबित होत असत.यापुढे महाप्रभुंमध्ये भगवंतांच्या विविध भावाचे प्रगटीकरण होत होते.विविध भावाने महाप्रभुंनी अनेक भक्तांवर कृपा केली .प्रत्येक प्रसंग अतिशय दिव्य आहे पण शब्द मर्यादेस्तव आपल्याला ते येथे घेणे शक्य होणार नाही. पण महाप्रभुंनी आपल्या जवळ येणाऱ्या प्रत्येकाला हरीनामाचे अमृत प्रदान केले व त्यांना नाम संकीर्तनाला लावले.महाप्रभुंनी पुढे गृहस्ताश्रमाचा त्याग केला व संन्यास आश्रमाचा स्विकार केला.त्यांचे संन्यास आश्रम स्विकारल्यानंतरचे नाव “श्रीकृष्ण चैतन्य भारती “ असे होते. श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभु आता काषाय वस्त्र परिधान करते झाले.पहिलेच स्वर्ण कांती असलेले महाप्रभु आता काषाय वस्त्राने अधिकच तेजस्वी दिसू लागले.प्रभुंच्या चरित्रात अनेक लिलाप्रसंग आहेत ज्यात त्यांचा दंड त्याग ,भक्त उद्धार ,प्रेमावेश असे अनेक प्रसंग आहेत. एकदा प्रभु संकीर्तन करत करत एका घनघोर जंगलातून जात होते .श्री महाप्रभुंच्या कृष्ण प्रेमाच्या तेजामुळे जंगलातील सर्व हिंस्र प्राणी ,पशु,पक्षी महाप्रभुंच्या नामसंकीर्तनाच भाग घेऊन नाचु लागले ,डोलू लागले होते.यावरुन आपल्याला प्रभुंच्या सामर्थ्याची कल्पना येईल.

हरे राम हरे राम राम राम हरे हरे । 

हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥ 

या उपनिषदातील महामंत्राला उलटे करुन ,


“हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । 

हरे राम हरे राम राम राम हरे हरे ॥” 

                  या १८ शब्दांच्या महांत्राला श्रीमहाप्रभुंनी सर्व सामान्य जनांसाठी प्रगट करुन आपल्या सर्वांवर अनंत कोटी उपकार केले आहेत.या महामंत्राचा जप व संकीर्तन करण्याची आज्ञा महाप्रभुंनी सर्वांना केली.या महामंत्राचे कलियुगातील हे दिव्य प्रगटीकरण ही महाप्रभुंची या त्रिविध तापात अडकलेल्या जिवांना उद्धाराची परमोच्च कृपा करुणा आहे.संन्यास आश्रम घेतल्यानंतर महाप्रभु प्रथमच भगवान जग्गनाथ पुरीच्या दर्शनाला गेले.तेव्हा श्रीभगवंतांना बघून महाप्रभु नाचायला लागले ,ते इतके भाव विभोर झाले की त्यांना तात्काळ मुर्च्छा आली व ते खाली पडले.पुढे पुरीचे प्रकांड पंडित सार्वभौम भट्टाचार्य यांना महाप्रभुंनी भक्तीचे परमोच्च महत्व पटवून दिले व षड्भूजरुपात दर्शन दिले.त्यानंतर सार्वभौम भट्टाचार्य महाप्रभुंना शरण आले व त्यांचे शिष्य झाले.महाप्रभुंवर लिहीलेले प्रसिद्ध काव्य “चैतन्य शतक” हे त्यांनीच लिहीले आहे.तसेच पुरीचे राजे सम्राट गजपती हे ही महाप्रभुंचे अनन्य भक्त बनले. पुढे महाप्रभुंनी दक्षिणेची यात्रा केली .श्रीरंग ,रामेश्वर,पंढरपुर ,जेजुरी असा लाखो स्थानी जाऊन त्यांनी या स्थानांना उर्जीत अवस्था प्रदान केली.लाखो लोकांना नाम संकीर्तनाला लावले.ही यात्रा करित असता ते कार्तिक पौर्णिमेला वृंदावनात येऊन पोचले.आजही वृंदावनात या पौर्णिमेला गौरांग प्रभुंचा आगमनोत्सव साजरा केला जातो.वृदांवनात महाप्रभुंनी अक्रुर घाट व ईमली घाट येथे वास्तव्य केले.प्राचिन वृंदावनाला प्रगट करण्याचे श्रेय महाप्रभुंकडेच जाते.श्रीचैतन्य महाप्रभुंनी दक्षिणेकडील यात्रा केली ,पश्चिम भारताकडे कृष्ण नाम संकीर्तनाचा प्रचार केला .प्रचंड अशी तिर्थयात्रा ,प्रचार प्रसाराचे कार्य करुन श्रीमहाप्रभु जगन्नाथ पुरी महाश्रेत्री आले.बराच काळ श्रीमहाप्रभु पुरीत वास्तव्य करुन होते व पुढे सन १५३३ ला वयाच्या ४७ व्या वर्षी भगवान जगन्नाथ महाप्रभुंच्या रथ यात्रेपुढे संकीर्तन करित असता जगन्नाथ प्रभुंच्या विग्रहा विलीन झाले. असा या दिव्य भगवत अवताच्या चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी प्रणिपात.आजच्या या पुण्यपावनी गौर पौर्णिमेला ही शब्द सुमनांजली श्रीचैतन्य महाप्रभुंच्या चरणी अर्पण करतो व श्रीमहाप्रभुंच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या वर ही श्रीकृष्ण प्रेमाचा परम कृपा अनुग्रह करावा. 


वैराग्य-विद्या-निज-भक्ति-योग-शिक्षार्थम एकः पुरुषःपुराणः ।

कृपांबुधिर यस् तम अहं प्रपद्ये ॥


स्वतः जगतगुरु भगवान कृष्ण हेच कलयुगातील जीवांमध्ये श्रीकृष्ण चेतना,भक्ति , संकीर्तन  निष्ठा व वैराग्य उत्पन्न करण्यासाठी चैतन्य देवांच्या रूपात अवतरित झाले.त्या अकारण करुणासिन्धु कल्किपावनावतार ,कृष्ण नाम संकीर्तन सुधासिन्धु मध्ये नित्य निमग्न, भगवान चैतन्य महाप्रभु गौरांग हरींचा मी अनन्यभावाने शरणागत आहे.


    🖋️✍🏻 त्यांचाच अक्षय जाधव आळंदी

Tuesday, February 13, 2024

जगदगुरु श्रीतुकोबारायांची जयंती🙏🏻🌸☘️

 


#वसंत_पंचमी🙏🌸🌺

            माघ शुद्ध पंचमी ही तिथी ज्याप्रमाणे भगवती श्रीशरदा मातेची प्रगट तिथी म्हणुन ओळखली जाते ,भारतात साजरी केली जाते त्याप्रमाणे ही तिथी आपल्या महाराष्ट्रात आणि सबंध जगात एका महान संत, तत्ववेत्ता, चिंतक , मार्गदर्शक असलेल्या जगद्गुरु श्रीतुकोबारायांची ही जन्मतिथी बद्दल प्रसिद्ध आहे.आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेल्या सकलसंतांचे चुडामणी असलेले श्रीतुकोबाराय हे लोकविलक्षण विभूती आहेत.श्रीतुकोबारायांच्या चरित्राचे स्मरण जरी केले तरी डोळ्यापुढे उभा राहतो त्यांचा विलक्षण जिवन प्रवास,अफाट आणि अचाट अभंग गाथा, तुकोबारायांनी  केलेले अपार कष्ट ,त्याग,जिवनातील दु:खद घटनांकडे तटस्थपणे सामोरे जाऊन अंगी प्रखर वैराग्य बाणवून अखंड भगवत स्मरणात कंठलेला काळ.या सर्व घटना बघितला तरी बुद्धी ,वाचा कुंठीत होते.

 "आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी " 

या सारख्या अभंगातून आपले अवतारित्व सांगणार्या तुकोबारायांनी भगवान श्री रामराया सारखे मानवी जिवन जगून दाखविले व त्यातून ब्रह्मस्थितीचा अनुभव घेऊन तो इतरांपर्यंत पोचविला ही ,तो अनुभव इतरांना ही करवीला. महाराजांच्या अलौकिक सामर्थ्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या द्रष्ट्या ,लोकराजालाही आपल्याकडे आकृष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबारायांनी मार्गदर्शन केले ,पुढील वाटचालीची दिशा दाखवली हे सर्वश्रुत आहेच. तुकोबारायांनी समाजाला दिशा तर दाखविलीच पण वेळेप्रसंगी समाजव्यवस्थेच्या विरोधात जाऊन 

"वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वाहावा भार माथा ।।" 

   असे पडखर बोल समाजाला ठणकावून सांगितले व दंभ,कर्मठता आणि पाखंडावर तिखट शब्दांत वेळोवेळी ताशेरे ओढले. श्रीतुकोबारायांनी आपल्या गाथेत लोकांना भक्तीचे महत्व तर प्रतिपादित केले आहेच पण त्याचबरोबर विलक्षण अशी लोकजागृती ही केली आहे. समाज हा बुरसटलेल्या ,भोंगळ अशा अंध भक्ती,दंभ,कर्मठता आणि पाखंडाच्या काळोखाखाली दबलेला होता त्या जळमटाला तुकोबारायांनी प्रकर्षाने दूर करण्याचे महान कार्य केले.याचे एक महत्वाचे कारण म्हणजे प्रत्यक्ष तुकोबारायांना या सर्व दिव्यातुन जावे लागलं होते.याची झळ तुकोबारायांना बसलीच होती. श्रीतुकोबारायांच्या कुळात त्यांच्या जन्माच्या आठ पिढ्या अगोदर पासून पंढरीची वारी होती हे सर्वश्रुत आहे.त्यांचे पूर्वज श्रीविश्वंभर बुवा यांच्या साठी प्रत्यक्ष भगवान पंढरीनाथ हे देहूत अवतरले होते.आज ही आपण जे मुळ स्वयंभू पांडुरंगाचे मंदिर देहूत बघतो,ज्या विठुरायाच्या सगुण विग्रहाचे दर्शन देऊळवाड्यात घेतो ते तुकोबांकडे वंश परंपरेने आले होते.त्यांचे माता-पिता श्री बोल्होबा व मातोश्री कनकाई हे पंढरीचे निष्ठावान वारकरी होते.अतिशय सत्शिल असे हे दाम्पत्य होते.आपल्या घरी असलेली वंशपरंपरागत ,पंढरीची वारी,विठुरायाच्या भक्तीचे वर्णन करतांना तुकोबाराय लिहीतात, 

" माझ्या वडिलांची मिरासी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा ".

   तुकोबांकडे जशी भक्ती ची परंपरा होती तसेच वंशपरंपरागत देहूचे महाजनपद ही होते.हे घराणे मुळचे सुखवस्तु , ऐश्वर्यसंपन्न असे होते. वयाच्या तेराव्या वर्षा पर्यंत तुकोबांचा काळ आई-वडीलांच्या छत्रछायेखाली अतिशय सुखात गेला.वयाच्या बाराव्या वर्षी लग्न झाले.पहिल्या पत्नीला दम्याचा आजार असल्याचे कळल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांचे दुसरे‌ लग्न लावून दिले.एकंदरीत सर्वसामान्य मानवाप्रमाणे तुकोबांचे सुखवस्तु असे जिवन होते.पण खरं दिव्य तर यानंतर सुरु झाले.आपल्याला तुकोबांचा सर्व जिवनभाग माहिती आहेच पण संकटकाळी खचुन न जाता ते वैराग्यशिल अंतःकरणाने त्याला सामोरे गेले.नुसते सामोरे गेले नाहीत तर अखंड प्रभु स्मरणात तल्लिन राहुन आत्मसाक्षात्काराची पातळी ही त्यांनी गाठली.

                   खरंतर तुकोबांना आत्मसाक्षात्कार झाला असे म्हणने ही चूकच ठरेल कारण "आम्ही वैकुंठवासी" म्हणानारे तुकोबा मुळातच आपल्याला "साच भावे वर्ताया" म्हणून फक्त जगुन दाखवायला,जगाला परमार्थाची वाट दाखवायला देह धारण करते झाले होते यात शंका नाही. आपल्या सर्वांना त्यांनी दाखवून दिले की इतक्या विपरीत ,भयावह आणि दु:खद परिस्थितीतही भगवंताला शरण जाता येतंच आणि ब्रह्मपदी पोचता येतं ‌.या परिस्थितीचे वर्णन मला कसे हितकारक ठरले याचे वर्णन तुकोबांनी आपल्या अभंगातुन केले आहे  ते असे की , "बाप मेला न कळता । नव्हती संसाराची चिंता ।।" आणि एका अभंगात ते म्हणतात ,"बरे झाले निघाले दिवाळे । बरी या दुष्काळे पिडा केली ।।" दु:खाकडेही इतक्या तटस्थ आणि उपकारक दृष्टीने बघणे हे खरंच एकमेवाद्वितीयच उदाहरण आहे .

एक - दोन नाही तर पहिले वडिल मग आई ,त्यानंतर भावजई ,मग भावाचा गृहत्याग,पहिली पत्नी ,नंतर पोटचे लाडके मुल या सर्वांचा एकापाठी एक झालेला मृत्यू त्यातचं आलेला भयावह दुष्काळ अशी संकटांची साखळीच सुरु झाली. जिचा डोळे बंद करुन विचार जरी केला तरी अंगावर काटा उभा राहतो.पण या प्रसंगी तुकोबांनी काय केले याचे जर प्रामाणिकपणे चिंतन केले तर जिवनात नैराश्य,दुबळेपणा याला कधीही सामोरे जावेच लागणार नाही. या काळात तुकोबांनी केलेले साधन इतके अफाट होते की याचा आपण नुसता विचारही करणे दुरापास्त आहे .आजही भामचंद्र,भंडारा डोंगरावर नुसते उभे जरी राहले आणि देहू गावाचे अवलोकन केले तर लक्षात येईल की त्या तिनशे/चारशे वर्षाआधीच्या काळी तुकोबा या जंगल सदृश भागात इतक्या उंचावर पैदल जायचे कसे,तिथे कसल्याही साधनांशिवाय तेरा -चौदा दिवस,महिनोन महिने राहायचे कसे सर्व कसे दंतकथेचा भागच वाटेल.आजही गाडीने जरी रोज या डोंगरावर जायचे म्हटले तरी कंटाळा येईल तिथे तुकोबांनी केलेली साधना ही खरंच एक आश्चर्य आहे.  श्रीतुकोबाराय पंढरीच्या वारीला आळंदीहून माउलींच्या पादुका घेऊन जायचे असे एकदा वाचनात आले होते.नक्कीच माउलींच्या चरित्राचा ,ज्ञानदेवीचा ,एकनाथ महाराजांचा व नाथ भागवताचे वाचन ,मनन, चिंतन तुकोबारायांनी केले असणार यात शंका नाही. वारकरी संप्रदायाला पुन्हा नव्याने नवजिवन ,नवचेतना व नवदिशा देण्याचे काम तुकोबांनी केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

                         वारकरी संप्रदायाचे नियम व आचारधर्म पाळणारेच खरे वारकरी याचे प्रतिपादन करतांना सडेतोड शब्दात तुकोबा लिहीतात, 

"एकादशीस अन्नपान । जे नर करती भोजन । श्वानविष्ठेसमान । अधम जन ते एक ।।"  तसेच एका ठिकाणी म्हणतात "नेम नाही जया एकादशीव्रत । जाणावे ते प्रेत इहलोकी" इतक्या स्पष्ट शब्दात त्यांनी वारकरी संप्रदायाचे नियमच अधोरेखित केले आहे. 

         तुकोबारायांवर बाबाजी चैतन्य महाराज यांची झालेला कृपा,अनुग्रह ,त्यानंतर अखंड हरीनाम स्मरण ,कठोर साधना त्यातून वेदाचे सारं असलेल्या गाथेचे प्रगटीकरण, आविर्भाव ,त्यानंतर धर्ममार्तंडांनी दिलेला त्रास , संपूर्ण अभंग गाथा इंद्रायणीत बुडविण्याचा आदेश ,पण भगवती इंद्रायणी मातेने लाह्या सारखे तारलेले अभंग ,शरणं आलेले धर्ममार्तंड ,ब्रह्मस्वरुप झालेले तुकोबा आणि सर्वांना सांगून झालेले वैकुंठगमन हा सर्व प्रवास एका लेखातुन  मांडणे केवळ अशक्यप्राय आहे.कारण हा प्रत्येक प्रसंग आपल्या जिवनात वाट दाखवणारा कवडसा आहे.या प्रत्येक प्रसंगातुन काहीतरी शिकवन मिळतेच मिळते.या प्रत्येकाचे स्वतंत्र चिंतन घडले‌ तर त्याचा उलगडा होईल.

"विदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा । इतरांनी वहावा भार माथा ।।" असे निक्षून सांगणार्या तुकोबांनी आपल्या अभंगातून याच वेदांचे सार मांडले आहे.एक एक अभंग एका एका प्रबंधासारखा ,टिके सारखा गहन आहे.एका एका अभंगावर एक एक लेख होऊ शकतो इतके ते सटिक ,गर्भरुप आहे. हे सर्व अभंग श्रीतुकोबारायांचे स्वानुभव आहे.ज्यात भक्ती , ज्ञान, वैराग्य, प्रबोधन,योग,नाम ,दंभ,धर्म ,नियम अशा विविध काय तर जगातील सर्व विषयांचा उहापोह केलेला आहे. शब्द मर्यादा लक्षात घेता लेखनीला विराम देतो पण एक सांगू शकतो की तुकोबारायांचे समग्र चरित्र हे आपल्यासाठी एक पथदर्शक दिपक आहे. थोड्या शब्दात जेव्हा मांडायला घेतलं तर ते अशक्यप्राय वाटुन मी न लिहायचे ठरवले होते पण परत श्रीतुकोबांरायांच्या सर्व जिवनाचे एकदा स्मरण केले आणि मला जे काही प्रसंग स्वतःला दिशा दर्शक वाटतात,मला ज्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे,ज्याने मन ,बुद्धीला स्तिमित केले तेच इथे मांडले आहेत.

              श्रीतुकोबाराय हे आम्हाला नित्य वंदनीय, आमच्या जिवनाचे आधाररुप आहेत त्यामुळे ही शब्द सुमनांजली वाहने हे माझे कर्तव्यच ठरते.कित्येक लोक जिवनातील कठीन प्रसंगी भंडारा डोंगर,देहूच्या इंद्रायणी घाटावर जाऊन तुकोबांच्या चरित्राचे नुसते स्मरण करतात आणि नवसंजीवनी घेऊन घरी परत येतात.हा माझाच काय आपल्यातील कित्येकांचा स्वानुभव आहे. बहुतेक गोष्टी किंवा क्रम हा अस्ताव्यस्थ, असंबद्ध वाटेल पण त्याला माझा नाइलाज आहे.कारण तुकोबांच्या चरित्र सागरातील मोती वेचायला माझी झोळी असमर्थ आहे.या फाटक्या झोळीत आजवर जे वेचायला जमले तेच इथे शब्दात मांडायचा प्रयत्न केला.


तुकाराम तुकाराम |

नाम घेता कापे यम ||धृ||

धन्य तुकोबा समर्थ |

जेणे केला हा पुरुषार्थ ||१||

जळी दगडासहित वहया |

जैश्या तरियेल्या लाहया ||२||

म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा |

तुका विष्णू नोहे दुजा ||३||

          एवढ्या अभंगाचे स्मरण करून तुकोबांच्या चरणी ही भावसुमनांजली अर्पन करतो...

      ✒️✍️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी✍️✒️

#रामकृष्णहरी🙏🌸🌺

#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🌺

Thursday, February 1, 2024

सद्गुरु भालचंद्र महाराज कनकवली यांची १२० वी जयंती🙏🏻🌸🚩🕉️





सद्गुरु भालचंद्र महाराज कनकवली यांची १२० वी जयंती :- 

                                महाराष्ट्र ही संत भूमी ,अवधूतांची भूमी आहे.या भूमीत आजवर अनेक संत ,महापुरुष ,सिद्ध , अवलिया, अवधूत, योगी होऊन गेलेत.अशाच या अवधूतांच्या मांदियाळीत गेल्या काही शतकापूर्वी होऊन गेलेले एक अलौकिक संत म्हणजे भालचंद्र महाराज कनकवली. कोकणाच्या पुण्यभूमीत आजवर अनेक महापुरुष होऊन गेले, या पुण्यपावन असलेल्या भगवान परशुरामांच्या भूमीत त्यांच्या तेजाने जणु अनेक संतांच्या रुपात देह धारण करुन लोककल्याण केले.टेंब्ये स्वामी महाराज,साटम महाराज,राऊळ महाराज असे अनेक महापुरुष हे याच कोकणातील होते. सद्गुरु साटम महाराज हे कोकणातील दानोलीचे अवतारी सिद्ध योगी ज्यांच्या अलौकिक लिला आजही कोकणात घराघरातून स्मरण केल्या जातात.त्यांच्या कृपा कटाक्षाने , अनुग्रह प्रसादाने अनेक सिद्ध योगी तयार झाले होते असा विलक्षण अधिकार महाराजांचा होता.सद्गुरु साटम महाराजांच्या  याच अलौकिक शिष्य मांदियाळीतील एक महापुरुष म्हणजे सद्गुरु श्रीभालचंद्र महाराज कनकवली.आज आपण याच अवधूत महात्म्ये असलेल्या भालचंद्र महाराजांच्या दिव्य चरित्राचे स्मरण करणार आहोत.

श्रीभालचंद्र महाराजांचा जन्म कोकणातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात असलेल्या पाया नावाच्या एका लहान खेड्यात देशस्थ ब्राम्हण कुटुंबात दिनांक ८ जानेवारी १९०४ रोजी पौष कृष्ण षष्टी ला झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव परशुराम ठाकुर असे होते.यांचे मुळपुरुष हे महान शिवभक्त होते.श्रीमहाराजांचे वडिल हे गावाचे कुलकर्णी होते व अत्यंत सत्शिल व धार्मिक गृहस्थ होते. महाराजांचे बालपण हे अलौकिक असेच होते.त्यांना बालपणापासून देवभक्ती करायला आवडत असे.त्यांचे बालपणीचे खेळ ही तसेच विलक्षण होते.घरातील वातावरण ही तसेच देवभक्तीचे होते.आपल्या बाल सवंगड्यांना गोळा करुन बाल भालचंद्र दगड गोळा करुन त्यांची परमेश्वर रुपात पुजा करित असे. असे आनंदात ,खेळण्यात दिवस जात असता अचानक एक अघटित घडले.वयाच्या पाचव्या वर्षीचं त्यांचे आई व वडिल हे लागोपाठ स्वर्गवासी झाले.अगदी बालवयातच महाराज मातृपितृ छत्राला पोरके झाले.आई वडिलांच्या जाण्याने बाल भालचंद्रावर दुःखाचा डोंगरच कोसळला.पुढे ते त्यांच्या काका काकी जवळ म्हापण या गावी राहायला आले.तेथेच ते प्राथमिक शाळेत ही जाऊ लागले. बाल भालचंद्र शिक्षणात अतिशय हुशार होता.त्यामुळे संपूर्ण गावात त्याची ख्याती झाली. पुढे इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी ते मुंबईला आपल्या मावशीकडे राहायला गेले.मॅट्रीक चे शिक्षण सुरु होते पण परिक्षेत अपयशाचे कारण झाले व त्यांची वृत्ती अचानक अंतर्मुख झाली. ते बाह्य जगताचे भान विसरले.सामान्य लोकांना ते वेडे वाटू लागले पण यांना जणु आपल्या जन्माचे रहस्य ,मुख्य कार्यच गवसले होते.काही काळ ते म्हापण गावी आपल्या काका काकी कडे येऊन राहिले पण मुक्त जीवाला बंधनात किती दिवस करमेल? आधी काही काळ ते अखंड नामस्मरणात काळ व्यतीत करु लागले.पण काही कालातच ते घर सोडून दुरवर निघून गेले. बराच काळ कोकणात ते फिरले ,अनेक ठिकाणी राहीले व फिरत फिरत कोल्हापूरातील गारगोटी येथील आपल्या चुलत्याकडे आले.भालचंद्रांची अस्ताव्यस्थ अवस्था पाहून सर्वलोक अचंबित झाले.चुलतीने त्यांना आंघोळ घातली ,नवे कपडे घातले व त्यानंतर ते काही महिने तिथेच व्यवस्थितपणे राहिले.पण पुन्हा ते तिथेही न राहता दूर निघून गेले.बराच काळ भालचंद्र बाबा त्या अवस्थेत अनेक ठिकाणी फिरत राहिले.देहातीत अवस्थेत त्यांना बाह्य जगताचे भान राहिले नाही.कुणी दिले तर खात नाहीतर सतत चालत राहत.वाट्टेल तिथे झोपायचे पुन्हा चालत राहायचे असा त्यांचा अखंड क्रम सुरु झाला.या ही अवस्थेत त्यांचे अखंड नामस्मरण सुरु होते.पण त्यांच्या बाह्य वेषावरुन लोकांना ते वेडे वाटत होते.जवळपास सहा महिने ते गारगोटी च्या परिसरात देहभान हरपून फिरत असता त्यांची गाठ गारगोटी चे थोर सत्पुरुष सद्गुरु श्री मुळे महाराज यांच्याशी पडली.श्रीमुळे महाराजांनी त्यांना ताबडतोब “इथे न थांबता लगेच दानोलीच्या सद्गुरु योगीराज श्रीसाटम महाराजांकडे जा व त्यांची सेवा कर”असा आदेश दिला.मुळे महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानून बाल भालचंद्र गारगोटी ते दानोली पायीच निघाले.अंबोलीचा अवघड घाट पायीच पार करुन ते श्रीसाटम महाराजांच्या दर्शनास दानोलीत येऊन पोचले. सद्गुरु श्रीसाटम महाराजांना आपल्या प्रिय शिष्याला ओळखायला वेळ लागला नाही. श्रीसाटम महाराजांनी बाल भालचंद्रावर तात्काळ कृपा अनुग्रह केला व त्यानंतर भालचंद्र महाराज श्रीमहाराजांची सेवा करत दानोलीत काही काळ राहिले.

दानोलीत सद्गुरु सेवा करित असता एक दिवस साटम महाराजांनी भालचंद्र बाबांना आता दूर जाण्याची आज्ञा केली.मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही त्याप्रमाणे सद्गुरुनी आपल्या प्रिय शिष्याला केलेली ही आज्ञा होती.सद्गुरु आज्ञा होताच भालचंद्र महाराज लगेच भ्रमंती करायला निघाले व फिरत फिरत कनकवली या गावी येऊन पोचले. कनकवलीत जेव्हा भालचंद्र महाराज आले तेव्हा ते दिगंबर अवस्थेत होते.त्यांची दाढी ,जटा ,नखे वाढलेली होती.मौन मुद्रा व दिगंबर अवस्था बघून प्रथमतः हा कुणी वेडा मनुष्य आहे अशीच कनकवलीच्या लोकांची धारणा झाली.लोक वेडा म्हणून त्यांना हिणवू लागले,लहान मुले ही त्यांना त्रास देऊ लागली.पण महाराज मात्र आपल्या निर्वीकल्प वृत्तीच स्थिर झाले होते.या बाह्य उपाधींचा त्यांना काहीही फरक पडत नव्हता .आत्मानंदात स्थिर झालेल्या महात्मांना याचे भान ही कसे राहिल.एकदा एका झाडाखाली महाराज लोकांच्या छळाल विटून ध्यान लावून बसले.तिथेच जवळ काळ्या मुंग्याच्या वारुळातील मुंग्या महाराजांच्या कडे आल्या व ध्यानमग्न देहावर जणू त्यांनी आक्रमण केले.मुंग्या कडाडून चावा घेत होत्या पण ध्यानाच्या गुढ विश्वात स्थिर झालेल्या महाराजांना याचे साधे भान ही नव्हते.गम्मत म्हणजे हे बघून ही लोकांना महाराजांचा अधिकार लक्षात आला नाही.पुढे महाराज कणकवलीतील काशीविश्वेश्वर मंदिराजवळ असलेल्या मारुती मंदिरात वास्तव्य करु लागले.ते अखंड एकाच जागी अन्न पाणी सोडून ध्यान मग्न अवस्थेत बसून होते.त्यांची ही अवस्था लोकांना त्रासदायक वाटू लागली .काही मंडळींनी महाराजांना मारहान ही केली. पण त्यांच्यावर काहीही प्रतिक्रिया न देता महाराज आपल्या आनंदात निमग्न होते.पुढे कणकवलीत प्लेग ची साथ पसरली सर्व गाव दूर गेले पण महाराज मात्र गावातच होते.तरीही महाराजांना काहीही झाले नाही. बारा तेरा वर्षाचा खडतर काळ कणकवलीत गेला तरीही महाराजांचा अधिकार ,त्यांची महती कुणालाही कळली नाही.मारोती मंदिरात राहत असता लोकांनी महाराजांना तिथून ही काढून दिले.महाराज त्यानंतर कामत महाराज या समाधी मंदिरात येऊन राहिले.तिथेही लोकांनी त्यांना राहू दिले नाही.तेव्हा रामचंद्र कामत यांनी महाराजांना एक पडवी बांधून दिली तिथेच महाराज बरेच वर्ष ध्यान करित पडून राहत. वर्षामागून वर्ष जात होते.महाराजांची ब्रह्म बैसका कधीही मोडली नाही.ते अखंड ध्यानावस्थेत होते.कुणी त्यांना वंदन करी ,कुणी टिंगल पण महाराजांना या सर्व बाह्य गोष्टींनी काहीही फरक पडत नव्हता. लोकांची हेटाळणी,टवाळी ,छळ काही केल्या कमी झाला नाही.पण महाराज मात्र आपल्या ध्यानात अखंड निमग्न होते.आपल्या शिष्याची अशी हेटाळणी सद्गुरूंना कशी बरे सहन होईल? सद्गुरु साटम महाराज हे कोकणातील त्यावेळी सर्वात विलक्षण व प्रसिद्ध सत्पुरुष .महाराज आपल्या शिष्याकरिता अचानक ऐके दिवशी कणकवली येथे आले.महाराजांनी आपल्या या प्रिय शिष्याला ह्रदयाशी कवटाळले,त्यांना कुरवाळले.साटम महाराज आपल्या प्रिय शिष्याशी संवाद साधते झाले. हा प्रसंग ,ही भेट झाल्यावर लोकांच्या लक्षात आले की ऐवढे मोठे महापुरुष जर भालचंद्रांच्या भेटीला आले म्हणजे हे नक्कीच कुणी सामान्य व्यक्ती नाहीत.त्यानंतर मात्र कणकवलीवासी भालचंद्र महाराजांना पुज्य भावाने बघायला लागले.लोक त्यांना नमस्कार करायला लागले. लोक त्यांना आता नागडे बाबा म्हणून ओळखू लागले.

नागडे बाबांची किर्ती दिवसेंदिवस पसरू लागली.लोकांना त्यांच्या दिव्य अधिकाराची प्रचिती यायला लागली.भालचंद्र बाबांच्या दर्शनाला लोकांची रिघ लागली.लोक त्यांची आरती करु लागले.सावंतवाडी संस्थानाचे राजे बापुसाहेब भोसले व राणी पार्वतीबाई हे ही खास महाराजांच्या दर्शनाला येत असत.महाराजांच्या दर्शनास्तव लोक दूरदूरुन येत व गर्दी करत.भालचंद्र बाबा जवळपास तिन तपे मौन धारण करुन होते.त्यांच्या नुसत्या दर्शनाने लोकांचे दुःख ,दैन्य दूर होत असत.महाराजांनी कधी कुणाला उपदेश केला नाही तर ते अखंड नामस्मरण करित असत.महाराजांना देहाचे भान नव्हते त्यामुळे खाने-पिने, स्नान अशा गोष्टीकडे त्यांचे लक्ष नव्हते. एकदा गारगोटीचे मुळे महाराज कणकवलीत आले .त्यावेळी ते भालचंद्र बाबांकडे आले ,त्यांना पाहताच मुळे महाराजांना खुप आश्चर्य वाटले .त्यांनी कणकवलीतील आंवडाबाई या स्त्रीला महाराजांची सेवा करण्याची आज्ञा केली.त्यानंतर काशीबाई,मालीनीबाई या थोर गुरुभक्त स्त्रियांनी महाराजांची सेवा शुद्ध अंतःकरणातून केली.उत्तर भारतातील धर्मराज नावाच्या व्यक्तिने ही महाराजांची खुप खुप सेवा केली.तो महाराजांची सर्व प्रकारे सेवा सुश्रुशा करित असे. अनेक भक्त बाबांची सेवा अखंड करित असत. बाहेर गावची मंडळी महाराजांना आपल्या बरोबर गाडीत घेऊन जात.मुंबई ,पुणे अशा विविध ठिकाणाहून महाराजांना आपल्या घरी ,गावात घेऊन जाण्यासाठी लोक आसुसलेले असत.अशातच महाराजांची अंतरंग वृत्ती कधाही ढळली नाही. महाराजांनी अनेक लोकांचे दुःख ,दैन्य ,कष्ट दूर केले.अनेकांवर नुसत्या दृष्टीक्षेपानेच कृपा अनुग्रह केला. या दरम्यान महाराजांचा खुप प्रवास होत असे. अनेक लोक त्यांना आपल्याकडे घेऊन जात असत.असेच मुंबईच्या भक्ताकडे महाराज गेले असता अघटित घडले.महाराजांना दर्शन कार्यक्रमासाठी लालबाग येथे मारोती मंदिरात भक्तांनी आणले होते.तो दिवस होता १६ डिसेंबर १९७७ .लोकांची दर्शनाला प्रचंड गर्दी झाली होती.भक्तांचे भजन सुरु होते. महाराज नामस्मरण करित बसले होते.रात्रीचे सुमारे आठ वाजले होते.अचानक बाबांनी आपल्या प्राण ब्रह्नरंध्रात नेऊन सर्वांसमक्ष देह ठेवला ..महाराजांनी देह ठेवला ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली.सर्व भक्त मंडळीच्या दुःखाला पारावार उरला नाही.महाराजांचा देह गाडीतून कणकवलीला आणण्यात आला.मार्गशिर्ष शुद्ध सप्तमी या दिवशी महाराजांच्या देहाची पुजा करुन कणकवली येथील आश्रमात महाराजांच्या देहाला मध्यभागी समाधी देण्यात आली. आज ही महाराजांची कृपा अनेक लोकांना अनुभवायला मिळते. नुसत्या दर्शनाने आजही लोकं दुःख मुक्त झाल्याचे अनेक उदाहरण आहेत. आज महाराजांच्या समाधी मंदिराला भव्य दिव्य असे रुप प्राप्त झाले आहे.अनेक लोक महाराजांच्या समाधी दर्शनाला दुर दूरून कणकवलीत येतात.अशा सद्गुरु भालचंद्र महाराजांचा कृपा आशिर्वाद आपल्या सर्वांच्या सदैव पाठिशी राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो व ही शब्द सुमनांजली श्रीचरणी अर्पण करतो…
                 🖋️✍🏻 त्यांचाच अक्षय  जाधव आळंदी

Monday, December 11, 2023

झाले_ब्रह्मरूप_ज्ञानदेव भाग ३ 🙏🏻🌸☘️❤️

 



#झाले_ब्रह्मरूप_ज्ञानदेव भाग ३-:

     

 “नामा म्हणे आता लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधिस्त ।।”

                         

आज कार्तिक कृ्ष्ण त्रयोदशी आज करुणाब्रह्म कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती सद्गुरु भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींचा संजीवन समाधी सोहळ्याचा मुख्य दिवस. आजच्याच तिथीला म्हणजेच शके बाराशे अठरा कार्तिक वद्य १३ गुरुवार आंग्ल दिनांक १५ ॲाक्टोबर इ. सन १२९६ या दिवशी संजीवन समाधी घेऊन आपले हे अलौकिक अवतार कार्य दृष्य रुपातून गुप्त केले. त्या वेळी माउलींचे वय होते २१ वर्षे ३ महिने व ५ दिवस. म्हणजे हा माउलींचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळा. वयाच्या १५ व्या वर्षी भावार्थदिपीके सारखे ब्रह्मज्ञान प्रगट करणारा हा महायोगी , हा योगीराज , योगीयांचा शिरोमणी,योगीयांचा चक्रवर्ती सम्राट व आमच्या अनाथांचा मायबाप समाधीस्त झाला .खरंसांगू तर हा प्रसंग वाचतांनाही डोळे भरुन येत आहेत. माझ्यासाठी जीवनात माउलींचे समाधी प्रकरण व छत्रपती शंभु महाराजांचे देह ठेवणे हे दोन अत्यंत व्यथित करणारे व अगदी मन हलवून सोडणारे अत्यंत गंभीर ,दुःखद व शब्दांच्या कक्षेत न मावणारे प्रसंग आहेत. शंभु महाराजांचे शेवटचे ४० दिवस तर वाचणे ही अवघड. माउलींनी देह ठेवला तेव्हा “शांतीची पै शांती” असे वर्णन असलेले जगद्गुरु निवृत्तीनाथ ही कळवळले , त्यांच्या ही अश्रुंचा बांध फुटला . जिथे आपल्या लाडक्या ज्ञानेबांचे समाधीत जाणे परब्रह्म भगवान पांडूरंगाला ही सहन न झाल्याने ते ही दुःखाने व्याकुळ झालो तिथे माझ्यासारख्यांचे घुंगरड्याचे काय सांगावे ? आम्हा सर्वांसाठी तर आमच्या ज्ञानाबाई ,आमचे मायबापच आज स्थूल रुपाने अदृष्य झाले. संतकुळ शिरोमणी ज्ञानदेव हे जगातील एकमात्र पुरुष आहेत ज्यांना “माउली” असे संबोधले जाते.कारण ज्ञानोबा माझ्या तुमच्या सारख्या अज्ञानी जीवांच्या उद्धारासाठी अवताराला आले ,आपले संपूर्ण जीवन जे अवघे २१ वर्षाचे होते ते लोकोद्धारासाठी जगले, तुमच्या माझ्या सारख्या अज्ञानी जीवास भावार्थदिपीकेतून ,हरीपाठातून ज्ञानाचा अनुग्रह केला व आपले कार्य पूर्ण होताच समाधीत विश्वरूप झाले. माउलींनी आम्हालाला उद्धाराचा मार्ग दिला ,तो दाखविला व त्यावर चालण्याचा अधिकार दिला म्हणून ही आई आहे जिने प्रत्येकाला आपल्या करुणेच्या पदराखाली घेतले , प्रत्येकाचा उद्धारच केला व आज ही करित आहेत. असो आज आपल्याला माउलींच्या समाधी दिवसाचा प्रसंग बघायचा आहे.त्याचे स्मरण करायचे आहे.त्या दिवशी चे जे वर्णन भक्तशिरोमनी नामदेवरायांनी केले ते बघायचे आहे.


ज्ञानेश्वरीतून जगाला ब्रम्हविद्या सुलभ करुन दिली ,जगातील प्रत्येकाला  ज्ञानाचा अधिकार देऊन उद्धाराचा मार्ग दाखविल्यावर , “आपले सर्व अवतार कार्य पूर्ण झाले आता मला सिद्धक्षेत्र अलंकापुरीस समाधी घेण्याची आज्ञा द्यावी” अशी विनंती ज्ञानोबाराय भगवान पंढरीनाथांकडे करतात.तेव्हा आपण स्वतः रुक्मिणी मातेसह आळंदीला ज्ञानोबांना समाधी देण्याकरिता येऊ असे भगवान पंढरीनाथांनी ठरवले. देवांच्या बरोबर तेव्हा त्यांचे सर्व पार्शद आले. गरुड -हनुमंत ,भक्त पुंडलिक -परिसा भागवत व नामदेवराय, देव -गंधर्व , ऋषी-मुनी ,सर्व संत मंडळींसह देव कार्तिक अष्टमीस आळंदीला येऊन पोचले.या सर्वांना घेण्यासाठी , तसेच देवांना सामोरे जाण्यासाठी सोपानदेव पुढे गेले. सोपानदेवांनी देवांना , माता रुक्मिणीस साष्टांग दंडवत घातला व ते सर्वांना घेऊन आळंदीत दाखल झाले.नामदेवरायांनी नारा ,विठा ,गोंदा ,महादा या आपल्या मुलांना समाधी सोहळ्यासाठी काय काय साहित्य लागते ते सर्व आणायला सांगितले. तेव्हा त्याचे प्रमाण व त्याची निवड काय करायची याचे मार्गदर्शन स्वतः भगवान पंढरीनाथांनी केली. आता आपला ज्ञानोबा समाधीस्त होणार या विचाराने ही नामदेवरायांना अपार दुःख होत होते. 

( नामदेवरायांच्या मनःस्थितीचे वर्णन त्यांच्या समाधी प्रकरणात वाचल्यावर आपल्याला खरोखर त्या दुःखाची ,व्याकुळतेची कल्पना आल्याशिवाय राहत नाही.) स्वतः भगवान पांडुरंगांनी सर्वांना सांगितले की आता दशमीला बाहेर प्रदक्षिणेसाठी निघून एकादशीला रात्रंदिवस हरिनामाचा जागर करा आणि त्यानंतर द्वादशीला पारणे करा. या वेळी स्वःता श्रीहरी सर्व सोहळ्यात ज्ञानोबाराय ,नामदेवरायांसह हजर होते. सर्वात दिव्य आणि अलौकिक बाब अशी की द्वादशीचे पारणे करण्यासाठी स्वतः माता रुक्मिणी ,गंगा , गिरीजा ,सत्यभामा या सर्व स्वयंपाकासाठी सिद्ध झाल्या .त्यांनी आपल्या या साऱ्या लाडक्या लेकरांसाठी विविध खाद्यपदार्थ केले. सर्व लोक इंद्रायणीवर स्नान करुन आले . सर्व वैष्णवांच्या पंक्ती पिंपळाच्या पाराजवळ बसविल्या. स्वतः भक्तवत्सल पांडुरंग परमात्मा सोवळे नेसून सर्व भक्तांना वाढायला लागले. देवांनी रुक्मिणी मातेला ज्ञानोबांच्या ताटात भरभरून वाढायला सांगितले. सर्वांचे जेवणे झाली ,या पंक्तीत देवांनी आपल्या हाताने ज्ञानोबांना भरविले व हे सर्व बघून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रु उभे राहिले.


त्यानंतर सर्व लगबगीने सिद्धेश्वरापाशी आले. देवांनी सिद्धेश्वराचा नंदी बाजूला करुन ज्ञानदेवांचे अनादी असे हे सिद्ध स्थान सर्वांना आधीच दाखविले होते. जेव्हा सर्व मंडळी आत गेली तर तिथे आधीच धुनी,आसन ,मृगाजिन अंथरलेले होते. भगवान श्रीहरी तेव्हा या स्थानाचे रहस्य प्रगट करुन नामदेवरायांना सांगतात की “हे माझेच सर्वात जुने असे समाधीचे स्थान आहे.” ज्ञानेश्वर माउली त्यानंतर आपले ज्येष्ठ बंधू व आपले सद्गुरु श्री निवृत्ती दादांपुढे हात जोडून उभे राहतात.निवृत्तीदादांनी आपल्या या लाडक्या ज्ञानोबाला प्रेमाने आलिंगन दिले. त्यांच्या भावनांचे बांध नेत्रावाटे वाहायला लागला. त्यांची हे ह्रद्य भेट बघून सर्वांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. भगवान परब्रह्म पंढरीनाथांनी सोपानदेव ,मुक्ताईला जवळ घेतले व ते त्यांचे सांत्वन करु लागले. त्यांनी ज्ञानदेवांना आश्वासन दिले की आम्हा स्वतः यांना ब्रह्मस्वरुपाला पोचवू. हे कार्य मी माझ्याकडे घेतो.( त्यामुळे ज्ञानोबांच्या समाधी या तिघाही भावंडांच्या समाधी वेळी भगवान पंढरीनाथ स्वतः हजर होते.)  


पुढे गरुड - हनुमंत, मुक्ताई- सोपान, देव- साधूजन, सकल संत -वैष्णव पताक्यांचे भार घेऊन ज्ञानोबांच्या पुढे मागे चालू लागले. ज्ञानदेवांना मध्यभागी घेऊन मिरवणूक निघाली. टाळ ,मृदुंग,वीणे यांच्या साथीने गायन कीर्तन सुरु झाले.सर्व मंडळी आपल्या लाडक्या ज्ञानोबांना घेऊन समाधी विवराभोवती बसली. ज्ञानेश्वर माउली समाधी साठी सिद्ध झाले. तेव्हा एक नवल घडले. माउलींनी आपल्या हातातील एक काठी मातीत रोवली व ती रोवल्या बरोबर त्याला पालवी फुटली. ती काठी होती अजान वृक्षाची. ज्या काठीला पालवी फुटली तो आपण आज बघतो आहे तो अजानवृक्ष आहे. राही , रखुमाबाई , सत्यभामा यांनी ज्ञानोबांना ओवाळले.या प्रसंगी ज्ञानोबांनी देवांची पाद्यपुजा केली व ते पदतीर्थ प्राशन केले. त्यानंतर स्वतः भगवान पंढरीनाथांनी ज्ञानोबांची पाद्यपूजा केली व त्यांचे पदतीर्थ स्वतः प्राशन केले.भगवंतांनी भक्ताचे पदतीर्थ प्राशन करावे हा जगातील एकमात्र  प्रसंग असावा.


नारा ,विठा,गोंदा,महादा या नामदेवरायांच्या पुत्रांनी ज्ञानोबाची भेट घेतली.विसोबा खेचर,चांगा वटेश्वर ,परसा भागवत सर्व संतांनी ज्ञानोबांना नमस्कार केला.या प्रसंगी सावता माळी महाराज,गोरोबा काका लहान लेकरासारखे तळमळत होते. ज्ञानदेवांनी समाधी स्थानाची प्रदक्षिणा केली. देवांनी व निवृत्तीनाथांनी ज्ञानोबांचे दोन्ही हात धरले व आता ते समाधीत जाण्यासाठी सिद्ध झाले.हे दृष्य बघून सर्वत्र दुःखाश्रुंचा बांध फुटला. लहानगे सोपानदेव-मुक्ताईंना अतिशय दुःख झाले.देवांनी आपल्या प्राणसख्या ज्ञानोबांना समाधी स्थानी आसनावर बसविले. नंतर ज्ञानदेवांनी देवांना त्रिवार नमन केले आणि मग आपले डोळे झाकून घेतले. या प्रसंगांचे वर्णन करतांना नामदेवराय म्हणतात “नामा म्हणे आता लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधिस्त॥” हा ज्ञानप्रकाश तेज सूर्य आज लोपला ,आज दृष्टीआड गेला . हा आमचा बाप ज्ञानदेव आज समाधिस्त झाला.


ज्ञानदेव समाधीस्त झाल्यावर पांडूरंग व निवृत्तीनाथ विवराच्या बाहेर आले .त्यानंतर समाधीची शिळा बंद करण्यात आली.सोपानदेव , मुक्ताईंनी नंतर जमिनीवरच अंग टाकले. निवृत्तीनाथांनी ही ज्ञानोबांच्या नावाने टाहो फोडला. देवांनी या सर्वांना पोटाशी धरले व सर्वांचे सांत्वन केले.आता लवकरच संवत्सरगावी म्हणजे सासवडला जाण्याचा संकेत या भावंडांना दिला. तेव्हा ही सर्व भावंडे शांत झाली. त्यानंतर सर्व इंद्रायणीवर आले , सर्वांनी आचमन केले. अमावस्येला गोपाळकाला करण्यात आला. हा सर्व सोहळा पाच दिवस झाला. त्यानंतर भगवान पंढरीनाथ व सर्व संत मंडळी आपल्या स्वस्थानी परतली. आपला प्राणसखा असलेल्या ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यामुळे भगवान पंढरीनाथ खुप व्याकूळ झाले.ते मंदिरात न जाता चंद्रभागेच्या काठी वनात जाऊन खिन्न वदनाने जाऊन बसले होते. ज्यांच्या समाधीमुळे भगवंतांनाही दुःख झाले अशा ज्ञानोबांची ख्याती आपण काय वर्णन करणार. खरं सांगू तर हे समाधी प्रकरण माझ्या कडून लिहीले जाईल का? हीच मला शंका होती पण त्या मायबाप ज्ञानोबांनी ही सेवा घडवून आणली .या लेखाचा शेवट नामदेवरायांच्या अभंगाने करतो.

( वेळे अभावी व शब्द मर्यादेस्तव हे समाधी प्रकरण अगदी थोडक्यात मांडले आहे.खरंतर संपूर्ण समाधी प्रकरणावर अनेक लेख होतील इतका तो विलक्षण आहे.) तरी ही मोडकी तोडकी सेवा ज्ञानाईच्या चरणी अर्पण करतो व इथेच थांबतो.


काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती । वेद म्हैशामुखीं वदविले ॥१॥

कोठवरी वानूं याची स्वरुप स्थिती । चालविली भिंती मृत्तिकेची ॥२॥

अविद्या मायेचा लागों नेदी वारा । ऐसें जगदोद्वारा बोलविलें ॥३॥

नामा म्हणे यांनीं तारिले पतित । भक्ति केली ख्यात ज्ञानदेवें ॥४॥


             ✍🏻🖋️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी

Sunday, December 10, 2023

झाले_ब्रह्मरूप_ज्ञानदेव भाग २ 🙏🏻🌸☘️🌺

 



#झाले_ब्रह्मरूप_ज्ञानदेव भाग २-:

                              *करुणाब्रह्म* कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती सद्गुरु भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींचा संजीवन समाधी सोहळा म्हणजे आळंदीची कार्तिक वारी . हा प्रत्येक वारकऱ्यासाठी,वैष्णवासाठी जिव्हाळ्याचा, प्रेमाचा आणि दिव्यानंदाचा उत्सव आहे.आषाढी वारी झाली की प्रत्येक वारकरी हा आळंदीच्या वारीची वाट बघत असतो, माउलींच्या आळंदीला येण्यासाठी आतुरलेला असतो.आळंदीच्या पुण्यपावन भूमीत येऊन एकदा आपल्या लाडक्या ज्ञानाबाईला बघून,त्यांच्या समाधीवर मस्तक ठेवून हा प्रत्येक वारकरी  कृतकृत्य होतो.*करुणाब्रह्म* सद्गुरु भगवान श्रीज्ञानेश्वर महाराजांची समाधी आळंदीत आहे ही सामान्य बाब नक्कीच नाही.माउलींनी आळंदीत समाधी का घेतली ? आळंदी हे श्रेत्र का वैशिष्ट्यपूर्ण आहे? या क्षेत्राचे काय महात्म्य आहे? या क्षेत्राचा इतिहास काय? हे क्षेत्र किती जुने आहे ? या क्षेत्राला शिवपिठ का म्हणतात? याचा आणि माउलींचा कसा अनादी संबंध आहे? अशा अनेक प्रश्नांचा उलगडा आपण आज करणार आहोत.

               *आळंदी* हा शब्दच अगदी वैशिष्टपूर्ण आहे. "अलं ददाति इति आलंदि" अशी आळंदी शब्दाची फोड आहे.जी आनंद देते ,जी साधकाला ,भक्ताला तोवर देते जोवर तो पुरे म्हणत नाही.(अर्थातच ही बाब आपल्यासारख्या विषयी लोकांसाठी नाही तर ती साधक,मुमुक्षू जनांसाठी आहे हे विसरुन चालणार नाही.) अशी ही माउलींची दिव्य आळंदी आहे.करुणाब्रह्म ज्ञानोबाराय हे विष्णू अवतार आहेत नव्हे नव्हे तर ते प्रत्यक्ष महाविष्णूच आहेच यात दुमत,शंका असण्याचे कारणच नाही.पण माउलींचे हे आळंदी क्षेत्र वैकुंठासमान दिव्य ,एकमेवाद्वितीयच आहे .मी तर त्या ही पलिकडे जाऊन म्हणेन की महाविष्णू ज्ञानोबारायांचे हे भूवैकुंठ आहे. माउलींचे निजस्थान असलेली ही अलंकापुरी काही आत्ताची नाही , तर प्रत्यक्ष पंढरीनाथ सांगतात की ,”ऐसे हे अनादी ठाव असे” म्हणजे जे अनादी आहे, ज्याच्या प्रारंभाचा ठाव कुणीही घेऊ शकत नाही.कारण असे म्हटले जाते की माउली प्रत्येक कलीयुगात याच क्षेत्रात अवतार धारण करतात आणि तो कलीयुगातील अवतार येथेच अलंकापुरीतील आपल्या निजस्थानी समाधिस्थ करतात.म्हणूनच आळंदीला *अनादी* क्षेत्र म्हटले जाते.आळंदी क्षेत्र हे चार ही युगापासून स्थिर व माउलीचे निजस्थान आहे. चार ही युगात नित्य असलेल्या या क्षेत्राला ज्ञानेशकन्या गुलाबराव महाराजांनी “नित्यतिर्थ” म्हटले आहे ते याच कारणाने.आळंदीचा प्रलयात ही लोप होत नाही म्हणून नामदेवरायांनी एका अभंगात हे अलंकापुरीचे महात्म्य शब्दबद्ध केले ते असे की,


देव म्हणे नामयां ब्रह्मक्षेत्र आदी । येथेंची समाधि ज्ञानदेवा ॥१॥

चौयुगां आदिस्थळ पुरातन । गेले ते नेमून मुनिजन ॥२॥

चालिले सकळ जाले ते विकळ । अनादि हें स्थळ ज्ञानदेवा॥३॥

नामा म्हणे आम्हां सांगितले हरी । दीर्घध्वनि करी वोसंडोनी॥४॥


आळंदी ही चारही युगात विविध नावाने ओळखली गेली. कृतयुगात आळंदीला आनंदवन असे नाम होते तर त्रेतायुगात वारुणीक्षेत्र.द्वापारयुगात आळंदीला कपिल क्षेत्र हे नाव होते तर कलीयुगात अलकावती .ज्याला पुढे अलंकापुर व सांप्रत काळात आळंदी हे नामाभिधान आहे. मुमुक्षांना ,साधकांना आनंद देते ते हे आनंदवन.आदीयोगी भगवान शिवांनाही या क्षेत्राने आपल्या दिव्य आनंदाने भुरळ घातली व देव ही या क्षेत्रात वास्तव्य करुन राहिले असे हे अलौकीक क्षेत्र. स्कंदपुराणातील अलंकापुरी महात्म्यात या संदर्भातील कथा आहे. एकदा भगवान शिव व माता पार्वती आकाश विहार करित असता या आनंदवनात उतरले.भगवान शिव या क्षेत्रात उतरल्याबरोबर आनंदाने भावविभोर झाले.त्यांनी या क्षेत्राला साष्टांग दंडवत घातला,त्यांचे अष्टभाव दाटले,इथली माती ही देवांनी आपल्या सर्वांगाला लावली,ते आनंदाने भावविभोर होऊन टाळी पिटू लागले व नंतर ते निचेष्टीत होऊन या अलंकापुरीच्या भूमीवर पडून राहिले. अशा प्रकारे आदियोगी आदिनाथ भगवान शिव ,जे आनंदाचे निजस्थान आहेत त्या आशुतोष महादेवांनाही जे क्षेत्र आनंद देऊ शकते त्याचे महात्म्य काय असेल याचा आपण विचारही करु शकत नाही. त्यावेळी भगवती माता पार्वती हे सर्व आश्चर्यचकीत मुद्रेणे पहात होती.बराच काळ भगवान महादेव या आनंद समाधीत होते ,तेव्हा माता पार्वतीने त्यांना सावध केले.त्यानंतर त्यांनी देवांना असे का झाले?आपण इतके आनंदविभोर का झालात ? हे प्रश्न विचारले. तेव्हा देवांनी पार्वती मातेला सांगितले की “हे माझे अनादी असे मुळपीठ आहे.येथे कालांतराने महाविष्णु अवतार धारण करणार आहेत.ही परमपवित्र अशी अनादी भूमी ,अनादी क्षेत्र मला अत्यंत प्रिय आहे.” भगवान शिवांनाही परमप्रिय असे हे अलंकापुर क्षेत्र आहे. कुबेराने या ठिकाणी कठोर असे तप केले होते.याच क्षेत्री कुबराने अष्टसिद्धीचे प्रतिक व त्या सिद्धीने युक्त असलेल्या दिव्य अष्टलिंगाची स्थापना केली होती. तसेच या संपूर्ण क्षेत्राखाली कोटी लिंग गुप्त झालेले आहे.म्हणून “शिवपीठ हे जुनाट” असे नामदेवराय ही म्हणतात. 

                                            अलंकापुरीतील सिद्धबेट हे स्वयं सिद्ध क्षेत्र आहे.या सिद्धबेटात देव ,ऋषी ,मुनी,संतांनी तप केले आहे व ते आजही गुप्त रुपाने या क्षेत्री वास करुन आहेत.नामदेवरायांनी तर आपल्या अभंगात वर्णन केले आहे की सिद्ध बेट हे भगवान शिवांच्या कैलासापेक्षा व भगवान विष्णूंच्या वैकुंठापेक्षाही श्रेष्ठ असे क्षेत्र आहे.ऐवढेच काय तर आळंदीजवळील पांच कोसा वरील सर्व भूमीसुद्धा सिद्ध क्षेत्र आहे.या अलंकापुर क्षेत्रात देवराज इंद्राने मोठा यज्ञ केला होता.या ठिकाणी दक्षिणाभिमुख वाहणारी इंद्रायणी ही कोटी तिर्थात,प्रयाग व काशीत केलेल्या तिर्थ स्नानाचे फळ प्रदान करणारी गंगाच आहे. असे हे अनादी शिवपीठ असलेले दिव्य क्षेत्र .या क्षेत्राचे महात्म्य सर्व संतांनी एकमुखाने केले आहे. माउलींनी याच क्षेत्री का समाधी घेतली हे आज आपण बघितले तर उद्या कार्तिक कृष्ण त्रयोदशी म्हणजे माउलींचा समाधी दिवस. हा समाधी प्रसंग कसा होता,त्यावेळी नक्की काय घडले,त्यावेळी आळंदीत कोण कोण उपस्थित होते या सर्व घटनांचा विचार उद्याच्या लेखात करुयात.माउलींचे समाधी प्रकरण दिव्य व खरोखर मन हेलावणारे आहे.पंढरीनांथांकडे विश्वात्मक मागणे मागून हे ज्ञानीयांचे राजे त्रयोदशीला विश्वरूप झाले.त्यांनी संजीवन समाोधीत समाधीस्थ होणे ही गेल्या हजार वर्षात झालेली अलौकिक ,शब्दातीत व विलक्षण दैवी घटना आहे. नामदेवरायांच्या अभंगावरून आपण उद्या समाधी क्षणाचा शब्दाद्वारे अनुभव घेऊ. मायबाप ज्ञानेश्वरा तुम्ही रेड्यामुखी वेद वदविता.हे शब्द ही आपलीच प्रेरणा आहे.हे आपले देणे आहे जे असेच आपल्या चरणांशी अर्पण करतो.

             ✍🏻🖋️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी

Saturday, December 9, 2023

झाले ब्रह्मरूप ज्ञानदेव भाग १ 🙏🏻☘️🌸🌺



झाले ब्रह्मरूप ज्ञानदेव भाग १-:

                              आज कार्तिक कृष्ण एकादशी, आजची एकादशी ही *करुणाब्रह्म* कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती सद्गुरु भगवान श्रीज्ञानेश्वर महाराजांची एकादशी म्हणून सर्वश्रुत आहे."आळंदीची कार्तिक वारी" म्हणून प्रसिद्ध असलेल्या या माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे. कार्तिक वारीतील ही एकादशी का *विशेष* आहे ? या एकादशीचे काय वैशिष्ट आहे ? ही माउलींची एकादशी का आहे? अशा अनेक प्रश्नांचा उलगडा आपण आज करणार आहोत.

                           करुणाब्रह्म सद्गुरु भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींची संजीवन समाधी ही जगातील एकमेवाद्वितीय व अलौकीक अशी  समाधी आहे. माउलींच्या जा समाधीला संजीवन समाधी म्हटले जाते. संजीवन या शब्दाला इथे विशेष महत्व आहे कारण माउलींनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केलाच नाही तर एका विशिष्ठ प्रक्रियेद्वारे त्यांनी आपल्या देहाला चिदाकाशात विलीन केले आहे. हा भाग आपण पुढच्या लेखात सविस्तर बघणार आहोतच. आपल्या अवताराचे मुख्य प्रयोजन म्हणजे “भावार्थदिपीका” या आपल्या ग्रंथातून गीतेची ब्रह्मविद्या सर्वसामान्यांसाठी प्रगट केल्यावर माऊलींनी अनुभवामृत , हरीपाठ , अभंगाद्वारे आत्मज्ञानाची शब्दरुपात मांडणी केली व त्यानंतर आता समाधी घेण्याची वेळ जवळ आली आहे याची कल्पना आपले *ज्येष्ठ* बंधू ,आपले सद्गुरु श्रीनिवृत्तीनाथांना दिली होती. आळंदी हे सिद्धपीठ, शिवपीठ आहे, हे माउलींचे निजस्थान आहे, प्रत्येक कल्पात माउली याच *ठिकाणी* समाधिस्थ होतात अशा अनेक दिव्य गोष्टी या अलंकापुरीशी निगडीत आहेत. याच कारणाने माधानच्या ज्ञानेशकन्या सद्गुरु श्रीगुलाबराव महाराजांनी आळंदीला “नित्यतीर्थ” असे म्हटले आहे. 

                            श्रीज्ञानेश्वर माउलींनी पांडूरंगाजवळ आपल्या या निजस्थानी आता समाधी घ्यायची आहे हा विचार व्यक्त केला व त्यानंतर मग सर्वांना एक कल्पना नक्की आली की करुणेचा-प्रेमाचा हा सगुण पुतळा आता आपल्या दृष्टीआड होणार आहे. माउलींच्या सगुण रुपात काय प्रेम , करुणा , वात्सल्य असेल याची आपण कल्पनाही करु शकणार नाही . कारण त्यांनी समाधी घेतल्यावर प्रत्यक्ष परब्रह्म पंढरीनाथ ही रडले ,ते बराच काळ पंढरपूरात एकांतात असलेल्या वनात जिथे आज आपण विष्णुपद बघतो त्या ठिकाणी जाऊन राहिले होते. ही गोष्ट ज्ञानोबांच्या अधिकाराची , त्यांच्या अवताराची आपल्याला कल्पना देण्यास पुरेशी आहे असे मला वाटते. माउलींनी समाधी आळंदीलाच का घेतली यामागे प्राचीन व दिव्य असा इतिहास आहे.आजच्या लेखाचा तो विषय नसल्याने एवढेच सांगतो की आळंदी अर्थात ही अलंकापुरी माउलींचे नित्य लिलाक्षेत्र आहे,माउलींचे निजस्थान आहे.माउली प्रत्येक अवतारात याच ठिकाणी समाधिस्थ होतात.पुढच्या द्वितीय भागात आपण याच अलंकापुरी महात्म्याचा उहापोह करुयात.

                                  माउली ज्ञानोबारायांनी देह ठेवला त्यावेळी प्रत्यक्ष परमात्मा पंढरीनाथ व *रुक्मिणी* आईसाहेब सर्व संत मंडळींसह आळंदीत आले होते. याला प्रमाण म्हणजे त्यावेळी स्वतः उपस्थित असलेल्या नामदेवरायांनी माउलींचे केलेले चरित्र वर्णन, समाधी प्रकरण. यात नामदेवरायांनी प्रत्येक घडामोडीचे अत्यंत सुंदर व इथ्यंभूत असे वर्णन केले आहे. नामदेवराय एका ठिकाणी म्हणतात,

“ विठ्ठल रुक्मिणीसहित गरुड हनुमंत । आणिक संत महंत जमा झाले” 

श्रीनामदेवराय सांगतात श्रीभगवान पंढरीनाथ सर्व संत मंडळींसह माउलींना घेऊन दशमीला अलंकापुरीत दाखल होतात. तेव्हा सर्वत्र गंभीर पण दिव्य चैतन्याचे भारलेले वातावरण निर्माण होते. गंभीर का ? तर प्रत्येकाला ठाऊक असते की आता हा आपला ज्ञानोबा ,ज्ञानदेव ,हा *ज्ञानियांचा* राजा आपल्या दृष्टीआड होणार आहे. खरं सांगू तर या प्रसंगांचे वर्णन वाचले तरी ह्रदय भरुन येतं.पुढे भगवान पंढरीनाथांनी नामदेवरायांना माउलींचे निजस्थान म्हणजे त्यांच्या समाधीच्या विवराचे , गुंफे चे स्थान दाखविले . त्याचे रहस्य सांगितले. मग नारा, विठा, गोंदा या नामदेवरायांच्या पुत्रांना त्या समाधी विवरात उतरुन सर्व जागा साफ करण्याची आज्ञा देव करतात. आश्चर्याची बाब अशी की जेव्हा ही मंडळी समाधी विवरात जातात तेव्हा तिथे मृगाजिन ,रुद्राक्ष माळ ,धूनी असे सर्व साहित्य आधीच ठेवलेले होते. तेव्हा देव नामदेवरायांना सांगतात , “ अष्टोत्तरशें वेळा साधिली समाधी । ऐसे हे अनादी ठाव असे॥” म्हणजेच या ठिकाणी १०८ वेळा आधीच समाधीलीला झाली आहे व हे ज्ञानदेवांचे अनादी असे निजस्थान आहे. यावरुन आपल्याला या स्थानाचे महात्म्य लक्षात येतेच येते. तर आता आपण आजच्या लेखाच्या मुख्य विषयाकडे वळूयात ,की ही एकादशी माउलींची का ? या एकादशीला ऐवढे महत्व का? 

           दशमी ,एकादशी व द्वादशी चे व्रत पूर्ण करुन त्रयोदशीचा परम पावन पण तेवढाच सर्वांचे मन हेलावणारा,दुःखद दिवस पुढे येऊन ठेपला .तेव्हा माउलीं ज्ञानराजांनी भगवान पंढरीनाथांकडे , सद्गुरु निवृत्तीदादांकडे समाधी घेण्याची आज्ञा मागितली. देवांनी आज्ञा दिली व स्वतः ते ज्ञानदेवांना घेऊन समाधी विवराजवळ आले. पुढे गेल्यावर भगवान पांडूरंग ज्ञानोबांना म्हणतात “ज्ञानदेवा आता सावध हो” पण या सावध हो शब्दामागे मोठे रहस्य दडलेले आहे.सावध हो म्हणजे नक्की काय ? तर देहातच ब्रह्मस्वरुप झालेले ज्ञानोबा हे समाधी अवस्थेला आधीच प्राप्त झालेले होते. ते देहातच समाधी अवस्थेला गेले होते, त्या स्थितीत स्थिर झाले होते. त्या समाधी अवस्थेत स्थिर झालेल्या ज्ञानोबांचे मन हे विश्वमनाशी केव्हाच एकरूप झाले होते. ते देहात असून ही देहातीत झालेले होते. देहाच्या , मनाच्या , बुद्धीच्या ही पलिकडे गेलेले ज्ञानोबा हे देहातच विश्वरूप झाले होते.त्यामुळे त्यांना पंढरीनाथांनी “सावध हो” म्हटले आहे. जे नित्य ब्रह्मरुपाशी एकरूप झालेले असतात ,जे तुर्यातीत अवस्थेच्या ही पार गेलेले असतात त्यांना देहभावाला येण्यासाठी फार कष्ट पडतात *असे* ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात .त्यामुळे ज्ञानोबांना देहभावावर आणण्यासाठी भगवंत ज्ञानदेवा सावध हो असे म्हणतात .ज्ञानदेवांना सावध हो म्हणून भगवान पंढरीनाथ म्हणतात की , “आता मला काहीतरी वरदान माग”. देवांनी ज्ञानोबांना वरदान मागण्यास सांगितले तेव्हा जगाची माउली असलेल्या ज्ञानोबांनी देवांकडे एक वैशिष्ठ्यपूर्ण मागणे मागितले .ते म्हणाले ,”देवा ! कार्तिक महिन्यातील शुद्ध पक्षांतील एकादशी चे व्रत हे तुमच्या अधिकारातले व्रत आहे.पण माझें एक मागणे आहे की याच महिन्यांतील कृष्ण पक्षातील एकादशी व्रताचा मान मला मिळावा.ते घडले की माझी इच्छा पूर्ण झाली.” बरं माउलींचे हे मागणे ही जगातील प्रत्येकाच्या उद्धारासाठी,कल्याणासाठीच आहे. देवांना हे ज्ञानोबांनी मागितल्यावर पंढरीनाथ अत्यंत आनंदीत झाले व त्यांनी वरदान दिले की, “जो भक्त आळंदी क्षेत्री कीर्तन करील ,त्याला वैकुंठाचा लाभ होईल. *माणूस* श्रद्धावान असो वा अश्रद्ध त्या दोघांनाही परब्रह्मस्वरुप करण्याचे सामर्थ्य या इंद्रायणीच्या पवित्र जलामध्ये आहे. जे लोक या पुण्यसलिला इंद्रायणीत स्नान करतील व ज्ञानोबांपुढे नतमस्तक होतील,त्यांच्यापुढे किर्तन ,भजन करतील त्यांच्या कोट्यावधी कुळांसह मी त्यांचा उद्धार करीन. जिथे ज्ञानदेव असतील तिथे मी अहोरात्र असेनच.” देवांचे हे आश्वासन ऐकून सर्वत्र आनंदी आनंद झाला. त्यामुळे मग कार्तिक कृष्ण पक्षातील या एकादशीला माउलींची एकादशी असे म्हटले जाते. म्हणून या एकादशीला आळंदीला येऊन प्रत्येक वारकरी माउलींच्या परमपावन चरणी नतमस्तक होऊन धन्य होतो. म्हणून माउलींच्या या कार्तिक वारीला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे. 

उद्याच्या भागात आपण माउलींच्या या परमप्रिय ,निजस्थान असलेल्या अलंकापुरीचे महत्व ,माउलींनी याच ठिकाणी का समाधी घेतली त्याचे कारण व माउलींच्या समाधी घेण्याआधी काय घडामोडी घडल्या, त्याचे नामदेवरायांनी काय वर्णन केले हे बघूयात. वदवून घेणारे , लिहून घेणारे माझे मायबाप ज्ञानदेवच आहेत तरी त्यांनीच करुन घेतलेली ही सेवा त्यांच्याच परममंगलकारी ,परमपावन चरणी अर्पण करतो.

                 ✍🏻🖋️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी

Monday, November 27, 2023

सद्गुरु शंकर महाराजांचे प्रिय शिष्य जयकृष्ण बुवा तथा मधु बुवांची जन्म शताब्दी🙏🏻🌸


 

सद्गुरु शंकर महाराजांचे प्रिय शिष्य श्री मधु बुवांची १०० वी जयंती :-

                             भगवान अक्कलकोट स्वामी महाराजांच्या परंपरेतील थोर सत्पुरुष आणि सद्गुरु शंकर महाराजांचे परमप्रिय शिष्य , सोलापूर च्या शुभराय मठाचे मठाधिपती सद्गुरु श्रीजयकृष्ण बुवा तथा मधु बुवा यांची आज १०० वी जयंती. सद्गुरु शंकर महाराजांचे वास्तव्य सर्वात जास्त कुठे झाले असेल तर ते म्हणजे सोलापूर ला व सोलापुरातील शुभराय मठात.शंकर महाराज तब्बल २७ वर्ष येऊन जाऊन शुभराय मठात वास्तव्यास होते.मठातील प्रत्येक स्थान,प्रत्येक व्यक्ती ही महाराजांच्या परम पवित्र स्पर्शाने पावन झाली होती व आहे.आज या पुण्य पर्वावर आपण महाराजांच्या सहवासाने ,कृपा अनुग्रहाने पावन झालेल्या श्रीमधु बुवांच्या चरित्राचे चिंतन करुयात.

                                प.पू.मधु बुवांच्या या भक्तीमय जीवनाचा विचार करण्याअगोदर आपण या कुळाची पूर्वपीठिका लक्षात घेतली पाहिजे.हे संपूर्ण कुळ भगवान श्रीपंढरीनाथ, सद्गुरु श्रीशुभराय महाराज,भगवान सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी महाराज व सद्गुरु शंकर महाराजांच्या कृपा आशिर्वादाने पवित्र झाले होते.मधु बुवांच्या आजोबांना प्रत्यक्ष भगवान अक्कलकोट स्वामी महाराज भेटायला आले होते ,त्यांना आशीर्वाद देऊन आपली अंगठी,पादुका प्रसाद रुपाने देऊन गेले होते.त्यानंतर सद्गुरु शंकर महाराजांनी तर आपले प्रगट रुपाने कार्यच शुभराय मठातून सुरु केले होते.आपले परम प्रिय जनु काका म्हणजे महाराजांचे प्रिय बुवा हे तर महाराजांचे ह्रदयच.महाराजांची पूर्ण कृपा जनु काकांवर होती हे आपल्या सर्वांना श्रुतच आहे.

प.पू.जनार्दन बुवांचे चरित्र व त्यांचा शंकर महाराजांसोबतचा काळ हा सुवर्ण काळच होता व तो आपण पुढे कधीतरी बघणार आहोतच.आज आपण प.पू मधु बुवांच्या जन्म शताब्दी च्या सुवर्ण योगावर त्यांच्या चरित्राचे चिंतन करणार आहोत.

 प.पू जनु काकांचे पुत्र म्हणजेच मधु बुवा. श्रीमधु बुवांचा जन्म हा इ.स १९२३ साली कार्तिक वद्य प्रतिपदा या दिवशी विजापूर येथे झाला.त्यावेळी इकडे शुभराय मठामध्ये जनु काका म्हणजे जनार्दन बुवा देवांसमोर किर्तन करितं होते.त्याचवेळी मठात जनार्दन बुवांना पुत्र रत्न झाल्याची बातमी आली व सर्वत्र आनंदी आनंद झाला.मधु बुवा हे अत्यंत भाग्यवान होते कारण जन्मताच त्यांना सद्गुरु शंकर महाराजांचा परिस स्पर्श लाभला होता.मधु बुवा दिसायला गोरेपान, सुंदर व सुदृढ शरीरयष्टी लाभलेले होते.सद्गुरु शंकर महाराज मठात आले ते साल होते १९२२ व मधु बुवांचा जन्म झाला तो १९२३ साली म्हणजे जन्मतःच मधु बुवा शंकर महाराजांच्या कृपादृष्टीने कृतार्थ झाले असणार यात शंका नाही.मधु बुवांना सद्गुरु प्राप्तीसाठी कुठे जाऊन तप करावे लागले नाही किंवा त्यांना काही विशेष साधन करावे लागले नाही.ते तर महाराजांच्या कृपेने सिद्ध झालेले कृपासिद्ध महात्मे होते.मधु बुवा लहानपणी शंकर महाराजांच्या मांडीवर खेळत असत व‌ महाराज ही आपल्या या प्रिय शिष्याचे सर्व लाड पुरवीत असत.महाराज म्हणजे आपल्या घरातील व्यक्तीचं आहेत असे या लहानग्या मधु बुवांना वाटत होते व ते वस्तुतः खरे ही होते.पुढे आठ वर्षाचे झाले असता मधु बुवांची मुंज पार पडली.या मौंजीबंधनाच्या कार्यक्रमात सद्गुरु शंकर महाराज स्वतः हजर होते.आपले वडील प.पू जनु काकांनी त्यांना गायत्रीचा उपदेश केला.त्यानंतर सद्गुरु शंकर महाराजांनी मधु बुवांना आपल्या जवळ बोलावले व आज्ञा केली की, "हे बघ आज तुझी मुंज झाली.आता उद्यापासून संध्या करायची आणि आई-वडीलांचे चरणतीर्थ रोज घ्यायचे.खंड पाडायचा नाही." मधु बुवांनी महाराजांचे हे शब्द तंतोतंत पाळले व ते त्याप्रमाणे रोज संध्या व तीर्थ प्राशन करु लागले. बालपणापासूनच मठात येणार्‍या सर्व थोर मंडळींचा सहवास मधु बुवांना व त्यांच्या भावंडांना लाभला‌ होता.शंकर महाराज मठात आले, की त्यांची सर्व शिष्य मंडळी ,इतर संत मंडळी त्यांना भेटायला शुभराय मठात येत व या सर्वांचे निरिक्षण मधु बुवा‌ बालपणापासून करित असत.हे सर्व सुरु असतांनाच मधु बुवांचे शालेय शिक्षण ही सुरु होतेच.मधु बुवा‌ इयत्ता १० वी पर्यंत शिकले.

                      असे सर्व दिवस आनंदात जात असता अचानक इ.स १९३८ ला प.पू श्री जनार्दन बुवांनी देह ठेवला.हा प्रसंग खरोखर मन हेलावणारा आहे.त्यावेळी मधु बुवांचे वय फक्त १५ वर्ष होते.पुढे मठ कोण सांभाळणार?आता मठाची पुढील व्यवस्था काय?  मठाधिपती च्या गादीवर आता कोण बसणार? हे प्रश्न सर्वांपुढे उपस्थित होतेच.पण याचे नियोजन सद्गुरु शंकर महाराजांनी आधीच लावून ठेवले होते असे दिसते.पुढे मधु बुवांच्या गळ्यात माळ घातली गेली. महाराजांनी त्यांना स्वतःच्या मांडीवर बसवून तारक मंत्राचा (परंपरेचा गुरुमंत्र) उपदेश केला.मधु बुवांना महाराज स्वतः घडवत होते ,त्यांच्या जीवनाला आकार देत होते हे यातुन स्पष्टच होते.मधु बुवा अतिशय सुंदर पूजा करीत असत.मठाचे सर्व उत्सव आनंदाने साजरे करीत असत.प.पू.जनु काकांनी देह ठेवल्यावरचा प्रसंग आहे.मठात उत्सवाची समाप्ती होती आणि उत्सवाची समाप्ती ही काल्याच्या कीर्तनाने होत असते.सद्गुरु शंकर महाराज मठातच होते.पण आता काल्याचे कीर्तन कोण करणार? हा प्रश्न सर्वांपुढे होता.तेव्हा सद्गुरु शंकर महाराजांनी मधु बुवांना जनु काकांच्या कीर्तनाचे सामान आणायला सांगितले.महाराज मधु बुवांना म्हटले, "मला कफनी घाल,फेटा बांध आणि चिपळ्या हातात दे." मधु बुवांनी तसेच केले.श्रीशंकर महाराज कीर्तनकाराच्या वेशात सजले.सर्वांना वाटले आता महाराज कीर्तन करतील पण झाले अलौकिकच.महाराजांनी मधु बुवांना पुन्हा म्हटले , "आता हे कपडे काढ आणि तू घाल." महाराजांची आज्ञा म्हणून मधु बुवांनी तसेच केले.ते कपडे मधु बुवांनी घातल्यावर महाराजांनी त्यांच्या हातात चिपळ्या दिल्या . स्वतः महाराजांनी "जय जय रामकृष्ण हरी" म्हणायला सुरुवात केली व पुढे "तुला कीर्तन करायचे आहे" ही आज्ञा मधु बुवांना केली.अचानक कीर्तनाच्या आज्ञेने मधु बुवांची थोडं चलबिचल अवस्था झाली पण महाराजांची आज्ञा प्रमाण मानून ते कीर्तनाला उभे राहिले.त्या दिवशी मधु बुवांनी अलौकिक असे कीर्तन केले.महाराजांनी आपली शक्तीच जणू त्यांच्यात प्रवाहीत केली होती.पुढे मधु बुवा उत्तम कीर्तन शिकले.एवढेच काय तर त्यांनी पुढे राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून पाच वर्षे काम ही केले होते.हा सर्व महाराजांच्या कृपेचा ,प्रेमाचा परिपाकच होता.

                                एकदा शंकर महाराज शुभराय मठात आलेले होते.महाराज मठात आलेले आहेत ही बातमी दूरवर पसरल्या मुळे बाहेरगावची काही मंडळी महाराजांच्या दर्शनासाठी शुभराय मठात आली.त्यावेळी त्या मंडळींनी शंकर महाराजांना अनुग्रह द्यावा म्हणून कळकळीने प्रार्थना केली.सद्गुरु शंकर महाराजांनी जवळच असलेल्या मधु बुवांना हाक मारली.मधु बुवा लगेच महाराजांच्या समोर येऊन उभे राहिले.महाराज म्हणाले, "मधु ,या मंडळींना अनुग्रह दे." मधु बुवा म्हणाले, "महाराज मला‌ यातले काहीच कळत नाही." तेव्हा शंकर महाराजांनी मधु बुवांना आपल्या अगदी जवळ बसविले व त्यांना उजवा कान पुढे करायला सांगितला.त्यावेळी महाराजांनी मधु बुवांना तारक मंत्राचा उपदेश केला.त्यांना महाराजांनी आज्ञा केली की आता हा मंत्र जसाच्या तसा या पुढील मंडळींच्या कानात सांगायचा.मधु बुवांनी त्यावेळी महाराजांनी जसे सांगितले तसेच केले.ही मंडळी गेल्यावर महाराज मधु बुवांना म्हणाले ,"आता तुला‌ पुढील व्यक्ती योग्य वाटला‌ की त्यांना तु अनुग्रह द्यायचा.आम्ही आजपासून तुला हा अधिकार देतो आहोत."

पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली‌ पाहीजे की महाराजांनी याद्वारे मधु बुवांना गुरु पदावरुन बसविले होते.याद्वारे शंकर महाराजांनी आपल्या प्रिय मधु बुवांना परमार्थात एका विशिष्ट उंचीवरच नेऊन ठेवले होते.महाराजांनी ललिता पंचमीला नवरात्रात मधु बुवांच्या पाठीवर जगदंबेच्या रुपात नृत्य केलेला प्रसंग सर्वश्रुत आहेच.

           १९३० सालची गोष्ट महाराज शुभराय मठात बसले होते.तेव्हा बोलता बोलता ते म्हटले की आता आमची देह ठेवण्याची वेळ जवळ आली आहे.हे सर्व ऐकून भक्तांना गहिवर आला.पण मधु बुवांवर हे ऐकून जणू आभाळच कोसळले.महाराजा आपल्याला सोडून जाणार ,आपल्याला अनाथ करुन जाणार हा विचार ही त्यांना सोसवला नाही.त्यांना या विचारानेच चक्कर आली व ते भोवळ येऊन पडले.हे सर्व पाहिल्यावर महाराजांनी मधु बुवांचे डोके आपल्या मांडीवर घेतले त्यांना पाणी पाजले व शुद्धीवर आणले.त्यांना अतिव प्रेमाने कुरवाळत जवळ घेतले.त्यांना आपल्या ताटात जेवायला बसवून,

मुखात घास भरवुन महाराज मधु बुवांना म्हणाले, "अरे वेड्या मी दगडात गेलो,मातीत गेलो ,मसणात गेलो तरी मी तुझ्याबरोबर आहे.हे लक्षात ठेव."पण महाराजांनी आपल्या या प्रिय शिष्याला समाधी घेतांना दूर ठेवले होते.

खरं ही आहे प्रत्येक सत्पुरुष आपल्या प्रिय शिष्यांना देह ठेवतांना आपल्यापासून दूर ठेवतोच.पण पुढे महाराजांच्या या शब्दाची प्रचिती प्रत्येक क्षणाला मधु बुवांना येत असे. सद्गुरु शंकर महाराजांच्या सर्व शिष्य मंडळींचे मधु बुवांवर प्रेम होते.राम मास्तर कोराड,रुद्रकर बाबा, भाऊसाहेब राऊत,कडलासकर काका(पेंटर काका), अण्णासाहेब भावे,जक्कल कुटुंबीय, मोहनसिंग बायस ही सर्व भक्त मंडळी शुभराय मठात येत असत.मठातील सर्व उत्सवात मधुबुवांसह आनंदाने सहभागी होत असत. जनु काकां नंतर मधु बुवांनी तब्बल ६० वर्षे मठाची धुरा सांभाळली.ही केवळ असाधारण गोष्ट आहे. सन १९४८ साली बुवांचे लग्न ही झाले.पू.शुभांगी बुवा म्हणजे आपल्या सर्वांच्या माई या बुवांच्या एकमात्र अपत्य. पैजारवाडीचे चिले महाराज,विडणीचे श्रीशिवाजी महाराज,मालाड चे कुलकर्णी मास्तर , श्रीकान्हेरे गुरुजी , पू.डॉ धनेश्वर अशी सर्व मंडळी मधु बुवांना भेटायला शुभराय मठात येऊन गेली होती. मधु बुवांना महाराजांनी जसे जीवन जगायला सांगितले बुवा तसेच जीवन तंतोतंत जगले.इतरांना संकटात बघून त्यांना फार वाईट वाटे.त्यामुळे पुढील व्यक्ती सुखी व्हावा,संकटमुक्त व्हावा यासाठी अनेकांकडे जाऊन ते दैवी उपाय योजना करायचे.अनेकांना स्वतः बोलावून अनुग्रह द्यायचे,विविध उपासना करायला सांगायचे.या द्वारे त्यांनी अनेकांना संकटमुक्त केले,अनेकांवर कृपा केली. कोल्हापूर चे श्रीकाटकर साहेब हे प.पू मधु बुवांचे शिष्य.काटकर साहेबांची बुवांच्या चरणी अत्यंत निष्ठा व प्रेम. प.पू.मधु बुवा आजीवन शंकर महाराजांनी दाखविलेल्या मार्गावर भक्तिपूर्ण जीवन‌ जगले.त्यांनी महाराजांची कृपा आशिर्वादाची उधळण मुक्त हस्ताने सर्वांवर केली.सर्वांना आपल्या जवळील अध्यात्मिक अमृत मुक्त हस्ताने वाटले.अशा या थोर शिष्याने ,थोर सत्पुरुषाने २८ जुलै १९९८ ला दुर्गाष्टमीच्या पुण्यपर्वावर आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. आज मधु बुवांची शताब्दी जयंती.सद्गुरु शंकर महाराजांच्या या थोर शिष्योत्तमाच्या चरणी ही शब्दसुमनांजली अर्पण करुन प्रार्थना करतो की त्यांनीच आम्हा सर्वांना महाराजांच्या चरणांवर नतमस्तक होण्याचे सामर्थ्य  द्यावे.परम पूज्य श्री सद्गुरु मधु बुवांच्या चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो आणि विराम घेतो.

            ✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी


Thursday, June 15, 2023

सद्गुरु निवृत्तीनाथांचा समाधी दान🙏🌸🌿


 सद्गुरु_श्रीनिवृत्तीनाथ_दादांचा_७२८_वा_समाधी_दिन 🙏🏻


द्वादशी समाधी दिधली निवृत्तिसी ।

झाले उदासी अवघे जण ॥ 


आज जेष्ठ वद्य १२ सकल वारकरी संप्रदायाचे लाडके निवृत्ती दादा , आपल्या परमप्रिय ज्ञानेश्वर माऊलींचे सद्गुरु ,ज्ञानेबांचे जेष्ठ बंधू ,प्रत्यक्ष भगवान आदिनाथ महादेवांचा अवतार सद्गुरु श्रीनिवृत्ती नाथांचा समाधी दिन.श्रीनिवृत्ती नाथांवर माऊलींनीच लिहावं ,माऊलींनीच त्यांचे वर्णन करावं.खरंतर माऊलींनी आपल्या सद्गुरुरायाचे केलेले वर्णन संपूर्ण जगातील साहित्य क्षेत्रात व ग्रंथात ऐकमेवाद्वितीय असेच आहे.माऊलींनी भावार्थदिपीकेत/ ज्ञानदेवीत केलेले आपल्या सद्गुरुंच्या गुणांचे ,त्यांच्या प्रती श्रद्धेचे वर्णन नुसते वाचले तरी अवाक व्हायला होतं.कारण हे शब्द एका महायोगी, महासिद्ध , प्रत्यक्ष महाविष्णु अवतार असलेल्या ज्ञानदेवांचे आहे.मी तर म्हणेन की माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील सद्गुरु वर्णानाच्या ओव्या जर काढल्या तर ज्ञानेश्वरी निरस होईल. प्रत्येक ओवीत सद्गुरु निवृत्तीनाथांच्या करुणेचाच आविष्कार आहे.आपल्या सद्गुरूंचे महात्म्य वर्णन करतांना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात , “शांतीची पै शांति निवृत्तिदातारु । हरिनाम उच्चारु दिधला तेणें ॥” 

                                     माऊली हे भगवान विष्णूंचे अवतार आहेत व त्यासाठी “ज्ञानेशो भगवान विष्णूः” असे म्हटले जाते.त्याच प्रमाणे श्रीगुरु निवृत्तीनाथ हे भगवान आदिनाथ शंकर आहेत व त्यांच्यासाठी “निवृतीर्भगवान हर:” असे म्हटले जाते. विशेष म्हणजे निवृत्तीनाथांचा जन्म हा सोमवारी ,प्रदोषकाळीच झाला होता. जणु भगवान शिवांनी आपला इष्ट दिवसच अवतार धारण करण्यास निवडला होता.शांतिब्रह्म एकनाथ बाबा आपल्या मधूर शब्दात म्हणतात, 


“धन्य धन्य निवृत्ती देवा । काय महिमा वर्णावा ।।१।। 

शिवे अवतार धरून । केले त्रैलोक्य पावन ।। २ ।। 

समाधी त्र्यंबकशिखरी । मागे शोभे ब्रम्हगिरी ।। ३ ।। निवृत्तीनाथांच्या चरणी । शरण एका जनार्दनी ।। ४ ।।” 


खरंतर निवृत्तीनाथ व या सर्व भावंडांचे चरित्र वेगळे मांडणे शक्यच नाही कारण या चारही भावंडांचे चरित्र एकमेकांशी संलग्नच आहेत.माऊलींच्या चरित्रात या सर्व चरित्रांचा भाग येतोच आणि तो आपल्याला माहिती आहेच त्यामुळे त्या प्रसंगाची पुनरावृत्ती करत नाही. पण ज्या वेळी श्री विठ्ठलपंत आपल्या परिवारासह ब्रह्मगिरीच्या यात्रेसाठी जातात त्यावेळी घडलेली हकीकत आज विस्तृत बघूयात कारण त्या प्रसंगानंतरच बाळ निवृत्ती हे योगसिद्ध ,नाथपंथी सद्गुरु श्री निवृत्तीनाथ झाले होते. निवृत्तीनाथांच्या वडिलांना म्हणजे विठ्ठलपंतांना आपण सहपरिवार त्रंबकेश्वरी जाऊन काही अनुष्ठान करावे असे वाटले व ते आपल्या सर्व परिवारास घेऊन त्रंबकेश्वरी आले. तेथे ते जवळपास सहा महिने राहिले होते.एकदा त्रंबकेश्वरी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करीत असता एक मोठा  वाघ या सर्व कुटुंबापुढे आला . वाघ बघताच जो तो वाट काढत पळु लागला. त्याच वेळी जिव वाचविण्यासाठी निृत्तीनाथ ही पळाले पण त्यातच ते एका गुहेजवळ येऊन पोचले. ती गुहा होती भगवान गहिनीनाथांची. निवृत्तीनाथांना अनुग्रह देण्यासाठी व या चारही भावंडांचे अवतार कार्य सुरु करण्यासाठी नाथांनी केलेली वाघाची ही एक लिलाच होती. गुहेत गेल्यावर गहिनीनाथांनी निवृत्तींना आपल्या नाथ परंपरेचे वैभव असलेले शांभवी ब्रह्मविद्या शिकविली. “जीवब्रह्मैक्यज्ञान” सांगितले.नाथ परंपरेचे सर्व योग व विद्या जवळपास तिन महिने अखंड निवृत्तीनाथांना शिकविली. आपल्या कृपा अनुग्रहाचे शक्ती बिज त्यांना देऊन त्यांना सनाथ केले व समाधीच्या आत्मानंदात स्थिर केले. इकडे विठ्ठलपंत व माता रुक्मिनी ला आपल्या बाळ निवृत्तीचा वाघाद्वारे घात झाला असा समज होऊन ते विलाप करु लागले. पण याच काळात निवृत्तीनाथांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली व ते जिवनमुक्त अवस्थेला पोचले. पुढे भगवान गहिनीनाथांनी शिष्य निवृत्तीला त्याच्या जिवन कार्याची दिशा सांगितली ,त्यांना कृष्ण भक्तीचा प्रचार करण्याची आज्ञा केली ,कृष्ण नामाचा उपदेश केला व परत पाठविले.तिन महिन्यांनी निवृत्तीनाथ आपल्या मुक्कामी त्रंबकेश्वरी परतले.त्यांना बघून सर्वांना अत्यानंद झाला.निवृत्तीनाथांनी आपल्या आई वडिलांना ,भावंडांना घडलेली सर्व हकिकत सांगितली.त्यानंतर हे सर्व मंडळी आळंदीस परतले. पुढे आळंदी ब्रह्मसभेचा निर्णय ,माऊलींच्या आई-वडिलांचा देहत्याग हा सर्व घटनाक्रम आपल्याला माहित आहेच.


एक विशेष असे की माऊलींनी निवृत्तीनाथांची आज्ञा घेऊन रेड्यामुखी वेद वदविले आणि त्यानंतर त्यांना पैठनची विद्वतसभा, ब्रह्मसभा शरण आली. त्यांनी या चारही भावंडांना शुद्धीपत्र दिले व त्यांचा मौंजीबंधनाचा मार्ग मोकळा झाला.पण निवृत्तीनाथांनी मुंज करण्याचे नाकारले.आम्हाला मुंज करण्याची गरज नाही.या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा अभंग नामदेवरायांच्या गाथ्यात येतो तो असा,


नाही जातीकुळ वर्ण अधिकार । क्षेत्री वैश्य शूद्र द्विज नव्हे ॥१॥

नव्हे देवगण यक्ष ना किन्नर । ऋषि निशाचर तेही नव्हे ॥२॥

ते आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट । निजबोधें इष्ट स्वरुप माझे ॥३॥ 

नव्हे आप तेज वायु व्योम नही । महत्तत्वी तेही विराट नव्हे ॥४॥ 

नव्हे मी सगुण नव्हे मी निर्गुण । अनुभूतीं भजन होऊनी नव्हे ॥५॥ 

निवृत्ती म्हणतसे ऐक ज्ञानेश्वरा । माझी परंपरा ऐसी आहे ॥६॥

                                   या अभंगावरून निवृत्तीनाथांच्या अंतकरणाच्या स्थितीची आपल्याला पुसटशी कल्पना येऊ शकते.पुढे ज्ञानेश्वर माऊलींनी निवृत्तीनाथांच्या आज्ञेने आपले गीतेवरील दिव्य भाष्य पूर्ण केले. त्यानंतर सर्वात आधी ज्ञानेश्वर माऊलींनी ,त्यानंतर सोपानकाकांनी ,नंतर ब्रह्मचित्कला मुक्ताईंनी समाधी घेतली. या तिनही भावंडांच्या समाधी वेळी त्यांचे वडिलभाऊ व सद्गुरु श्री निवृत्तीनाथ स्वतः हजर होते.त्यावेळी निवृत्तीनाथांची झालेली अवस्था वाचली तरी ह्रदय पिटाळून निघते. इतका ह्रदयद्रावक तो प्रसंग आहे.

पुढे निवृत्तीनाथ सप्तश्रृंग गडांवर आले.तिथे त्यांनी नाथपंथाची कुलस्वामिनी भगवती सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले.तिथे ते तिन दिवस मुक्कामी होते.पुढे ते विसोबा खेचर,परिसा भागवत यांच्यासह  पंचवटीस आले व दशमीच्या दिवशी त्रंबकेश्वरी पोचले.तेथे पोचल्यावर जेष्ठ वद्य एकादशीला निवृत्तीनाथांचा उत्सव सोहळा स्वतः भगवंतांनी केला.द्वादशीला सर्व वैष्णवांनी पारणे सोडले.पांडूरंगांनी सर्व संतांची पूजा केली.स्वतः देवांनी निवृत्तीनाथांच्या समाधीची तयारी केली.मग निवृत्तीनाथ त्रंबकेश्वराची पूजा करुन तेथून पश्चिम दिशेला ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी गेले.तेथे एक पुष्करणी आहे.त्याच्या पश्चिमेस पूर्वीचे प्राचीन,अनादी स्थळ असून तेथे गुप्त असे भूयार होते,म्हणजेच समाधी घर होते.सर्व संतांनी त्याची शिळा काढून द्वार उघडले .हे निवृत्तीनाथांचे अनादी स्थान होते.आत अनादी कालापासून दिवा व धुनी चालूच होती.नामदेवरायांच्या मुलांनी ती समाधीची जागा साफ केली.देवांनी सर्वांना पत्रावळी टाकून वाढले.आपल्या हाताने निवृत्तीनाथांना भरवले.नंतर क्षिरापतीचे किर्तन झाले.त्यानंतर निवृत्तीनाथ सर्वांना कडाडून भेटले व आपल्या समाधीकडे जाण्यास निघाले.सर्वांच्या डोळ्यात अश्रुधारा वाहत होत्या.पांडुरंग व पुंडलिक निवृत्तीनाथांना भुयारात नेण्यास सज्ज झाले. निवृत्तीनाथांनी पांडुरंगाचे पदतिर्थ घेतले.पांडुरंगाने निवृत्तीनाथांचा उजवा हात धरला व पुंडलिकाने डावा हात धरला व निवृत्तीनाथ समाधी विवरात उतरले.निवृत्तीनाथ आसनावर स्थिर झाले.त्यांनी एकवार पांडुरंगाला पाहिले व आपले नेत्र मिटले.थोड्याच क्षणात निवृत्तीनाथांनी आपली आत्मज्योत ब्रम्हरंध्रात स्थिर केली व चिर समाधी धारण केला.सर्व जन दुःखाने रडू लागले.विठोबाचे ह्रदय भरुन आले .पुढे देवांनी स्वतः समाधीचे द्वार शिळा लावून बंद केले.देव सर्वांसह दशमी ते अमावस्या असे पाच दिवस त्रंबकेश्वरी राहिले व अमावस्येला काला करुन प्रतिपदेला पंढरपुरी परत आले.

अशा प्रकारे आपल्या ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरवून सद्गुरु निवृत्तीनाथ आपल्या निजस्थानात स्थिर झाले.ही शब्द सुमनांजली श्रीसद्गुरु माऊली निवृत्तीनाथांच्या चरणी अर्पण करतो.ज्ञानोबा आपल्या सर्वांची आई/माऊली त्यानुसार त्यांचे सद्गुरु आपले गुरु आजोबा झाले आणि आजोबाला आपल्या नातवावर काकणभर अधिकच प्रेम असतं.मी निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी आमचे सर्व अपराध पोटी घालून आम्हालाही त्यांच्या कृपा ,करुणेला पात्र करावं आणि सदैव ज्ञानोबांच्या सेवेत राहणाचे भाग्य प्रदान करावे.

       ✍🏻🖋️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी🖋️✍🏻

Thursday, February 23, 2023

श्रीअक्कलकोट स्वामी महाराजांचे उत्तराधीकारी श्रीबाळप्पा महाराजांची पुण्यतिथी🌿🌸🙏🌺

 



भगवान_श्रीअक्कलकोट_स्वामी_माउलींचे_उत्तराधीकारी_श्रीबाळप्पा_महाराजांची_पुण्यतिथी🙏🌸🌺

                               पूर्ण दत्तावतार भक्तवत्सल भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचे शिष्योत्तम,पार्शद,स्वामी गादीचे उत्तराधिकारी सद्गुरु श्री बाळप्पा महाराज यांची आज ११३ वी पुण्यतिथी.श्रीस्वामी माउलींच्या शिष्य प्रभावळीतील अतिशय विलक्षण थोर सत्पुरुष ज्यांच्या थोर अधिकाराने त्यांनी स्वामीरायांच्याही प्रेमाचा अधिकार प्राप्त केला,ज्यांना स्वामीरायांनी आपली समाधी लिला करण्यापूर्वी आपल्या समक्ष आपल्या गादीवर बसवून पुढे संप्रदाय वाढविण्याचे ,चालवण्याचे कार्य सोपवले.असा दृश्य स्वरुपात झालेले अतिशय विरळच प्रसंग स्वामी चरित्रात घडलेले आहे.जणु त्यांना अक्कलकोट ला आपल्या सिंहासनावर स्वामीरायांनी पट्टभिषेक करुन आसनस्थ केले.अशा या अनन्य स्वामीदासांची आज पुण्यतिथी.गुरु शोधार्थ घर सोडून निघालेले बाळाप्पा ते प्रत्यक्ष परब्रह्म स्वामी समर्थ माउलींचे उत्ताराधीकारी बाळप्पा महाराज असा विलक्षण जिवन प्रवास आपण संक्षिप्त स्वरुपात बघुयात.प.पू.श्री बाळप्पा महाराजांचा जिवन प्रवास नक्कीच गुरुसेवा ही काय असते,कशी असती आणि किती कठीण असते याचा विवेक आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही.

                            बाळाप्पा महाराजांचा जन्म कर्नाटकातील धारवाड येथील हावेरी या खेड्यात एक सुखवस्तु सावकारी सराफी व्यवसाय असलेल्या धनिक संपन्न अशा यजुर्वेदी ब्राह्मण घरात झाला. बालपणापासुनच वैराग्यशिल आणि धार्मिक अशी बाळप्पांची वृत्ती होती.पुर्वीच्या रिवाजाप्रमाणे त्यांचे बालपणीच लग्न झाले‌.यथावकाश त्यांना दोन मुलगे आणि एक कन्या अशी अपत्येही झाली.परंतु मुळातच विरक्त असलेल्या बाळप्पांचे मन संसारात रमले नाही.आपल्या कन्येचा विवाह त्यांनी केला व दोन्ही मुलांचे उपनयन संस्कार पार पाडले व आता ते घर सोडण्याचा विचार करु लागले. आपण का जन्माला आलो? आपल्या जन्माचे प्रयोजन काय ? केवळ प्रपंच हाच आपला अंतिम उद्देश आहे का? असे अनंत विचार त्यांच्या मनात घोळत होते.या प्रश्नांची उकल करण्यासाठी आता सद्गुरु चरणांचा आश्रय घ्यावा असे त्यांना सतत वाटु लागले.वयाच्या तिसाव्या वर्षी शेवटी त्यांनी सद्गुरु शोधास्तव‌ गृहत्याग केला.त्यांनी आधी शिवचिदंबर महाप्रभुंच्या मुरगोड कडे प्रस्थान केले.तिथे त्यावेळी महाप्रभुंचे चिरंजीव हे गादीवर होते.तेथील पुजार्यांनी महप्रभुंच्या झालेल्या दिव्य लिलांचे वर्णन केले ते ऐकून बाळाप्पा थक्क झाले.पुजार्याकडून त्यांना चिदंबर महाप्रभु आणि अक्कलकोट स्वामी महाराज यांच्या भेटीची हकिकत कळली.अजानुबाहु स्वामी हे अजुनही सदेही अक्कलकोट येथे वास्तव्यास आहेत ही ही कळले.पण त्यांच्या मनात आधी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे जाऊन अनुष्ठान करावे हा विचार होता.त्यामुळे ते गाणगापूर ला गेले. श्रीक्षेत्र गाणगापूर येथे प्रखर कठोर असे अनुष्ठान केल्यावर त्यांना दत्तप्रभुंचे स्वप्न दर्शन झाले पण स्पष्ट आज्ञा नसल्या कारणाने त्यांनी अनुष्ठान सुरुच ठेवले.पुढे एक ब्रह्माण स्वप्नात आला व "तुम्ही अक्कलकोटला जावे" असा स्पष्ट आदेश त्यांना मिळाला.दोन महिने संगमावर अनुष्ठान झाल्यावर त्यांना तिथेच पहाटे संगमस्नान करण्यास गेले.तिथे काठावर धोतर ठेवले होते.आल्यावर उचलले तर त्याखावी लाल असा विंचु दिसला.त्यांनी त्यास न मारता ते आपल्या नित्यकर्मात गुंग झाले.त्याच रात्री त्यांना भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन घडले व त्यांना अक्कलकोट ला येण्याचे संकेत स्वामींनी दिले.स्वामीरायांच्या दर्शनानंतर दुसर्या दिवशी त्यांना माधुकरी या वेळी पाचही घरी पुरणपोळीच मिळाली.हा शुभसंकेत लक्षात घेऊन त्यांनी त्याच दिवशी अक्कलकोट ला प्रस्थान केले.

                              चैत्र शुद्ध दशमी शके १७८८,२५ मार्च १८६६ या दिवशी बाळप्पा अक्कलकोटला आले. तेथील मुरलीधर धर्मशाळेत आपले सामान ठेवून त्यांनी स्नान उरकले‌ व एक पैशाची खडीसाखर घेऊन स्वामी दर्शनासाठी निघाले.स्वामी स्वारी त्यावेळी खासबागेत आपल्याच मस्तीत दंग आनंदात निमग्न होती.स्वामीरायांपुढे पोचल्यावर ते बेभान होऊन श्रीचरणांकडे जाऊन पोचले.श्रीस्वामीरायांच्या सुकोमल चरणांवर शिर ठेवले.नंतर खडीसाखर स्वामींपुढे ठेवली व बाजुला झाले.हे सर्व झाल्यावर स्वामीदेवांची पहुडलेली स्वारी उठली त्यांना इतका आनंद झाला होता की तो आनंद प्रत्येकाला जाणवत होता.स्वामी ऊठुन झाडाजवळ गेले व प्रत्येक झाडाला प्रेमाणे आलिंगन देऊन लागले.जणु यातुन त्यांनी आपले बाळाप्पा वरील जन्मोजन्मीचे प्रेमच व्यक्त केले.त्यानंतर बाळप्पा महाराज हे अक्कलकोट लाच अनुष्ठानरत झाले.रोज स्वामी दर्शनाचा त्यांनी नियम केला.पण या काळात त्यांच्या मनात एक रुखरुख लागली होती ती म्हणजे त्यांना कधीही काहीही केल्या स्वामींच्या हाताने प्रसाद मिळाला नाही.एकदा गर्दीतुन चोळप्पांनी बाळप्पांच्या हातावर खारकांचा प्रसाद टाकला.प्रसाद मिळता क्षणी बाळाप्पा धावतच सुटले तोच स्वामींनी चोळप्पांना रागविले आणि प्रसाद परत आणावयास सांगितले.सेवेकर्यांनी धावत जाऊन प्रसाद परत आणला.या सर्व घटनेने बाळाप्पा खुप खिन्न झाले.पण त्यांना काय ठाऊक स्वामी माउली त्यांना आपल्या स्वानंद सिंहासनावर विराजमान करणार आहेत ते.पुढे बाळप्पांना द्वारकेला जाण्याची आज्ञा झाली व तिर्थयात्रेहून परत आल्यावर त्यांना स्वामींनी आपल्या हातातील तुळशीची माळ दिली.हा पहिला प्रसाद बाप्पांना लाभला.त्यानंतर चैत्र महिन्यात बाळप्पांनी मुरलीधर मंदिरात आपले पहिले अनुष्ठान केले.पण त्यावेळी त्यांचे आपले अधेमधे मन लागत नसे.रोज ते माधुकरीला जाण्याआधी श्रीस्वामीरायांच्या चरणी आपले मस्तक ठेवत व मनसोक्त दर्शन घेत असत.यावेळी स्वामी दर्शनास गेले असता.श्री स्वामी महाराजांनी त्यांच्या पाठीवर जोरदार हाताचा फटका दिला.पण या प्रसादाने पुढे त्यांचे चंचल मन अगदी स्थिर झाले‌.या आगळ्या वेगळ्या स्वामी प्रसादाच्या लाभाने त्यांचे अनुष्ठान फळाला आले. पुढे बाळप्पा जास्तीत जास्त स्वामी सेवेत रत होऊ लागले.चोळप्पांच्या संमतीने लवकरच इतर सेवेकर्‍यांसमवेत ते स्वामींची अखंड सेवा करण्यासाठी पेठेत राहण्यास गेले.बाळप्पा अगदी निस्सिम व समर्पणाने स्वामी सेवा करू लागले.एक दिवस अचानक त्यांच्या बेंबीतून रक्त येऊ लागले.काही वेळात बेंबीतून एक कागदाची पुडी पडली .ती बाळप्पांनी उघडली‌ तर त्यात विष होते.बाळप्पांची निस्सिम सेवा बघून कुणी नतद्रष्टाने मत्सरापोटी बाळप्पांना विष दिले होते.तरीही पुढे त्यांची स्वामी सेवा उत्तरोत्तर वाढतच आणि दृढ होत गेली.एकदा स्वामी देवांनी बाळप्पांना आवाज दिवा‌ व आपल्या जवळ बोलावले.त्यावेळी स्वामीराय खडीसाखर खात होते.ती तोंडातील खडीसाखर त्यांनी काढली व आपल्या हाताने बाळप्पांना खाऊ घातली.बाळप्पा स्वामी प्रसादासाठी आसुसले होतेच त्यांनी क्षणाचाही विचार न करता ती खडीसाखर क्षणात खाऊन टाकली.जणू या प्रसादाद्वारे स्वामी रायांनी बाळप्पांच्या शरीरात आपल्या कृपेचा प्रत्यक्ष अंशच रुजविला.तरीही या दरम्यान अनेक सेवेकर्‍यांनी बाळप्पांचा अतोनात छळ केला,त्यांना अक्कलकोटहून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले पण श्रीस्वामीरायांनी आपल्या या पट्टशिष्याला आता सख्य भक्तीचे दानचं दिले त्यामुळे कुणीही त्यांनी तेथून हलवू शकले नाही.पुढे सुंदराबाईंनी बाळप्पांना हरएक प्रकारे त्रास दिला.या त्रासाला कंटाळून बाळप्पांनी अक्कलकोट सोडण्याचा विचार केला तोच स्वामी महाराजांनी बाळप्पांना एका सेवेकर्‍या करवी मृगाजिन व व्याघ्राजिन दिले.चाणाक्ष बाळप्पांना लगेच कळले की स्वामीरायांची आपल्याला अक्कलकोट सोडण्याची आज्ञा नाही.नंतर स्वामी आज्ञेनी‌ त्यांनी अक्कलकोटातील जागृत असलेल्या हाक्याच्या मारोती जवळ अनुष्ठान सुरु केले.सुरुवातीला बाळप्पा गणेशाची अथर्वशीर्ष म्हणून उपासना करीत.तर स्वामीराय एका सेवेकर्‍याला बाळप्पांना उद्देशून म्हणाले "तो तरटी वाणित आहे". बाळप्पांना याचा गुढार्थ लगेच कळला व त्यांनी ते अनुष्ठान बंद केले‌ व "श्री स्वामी समर्थ" या स्वामी मंत्राचे जप अनुष्ठान सुरु केले.त्यावेळी स्वामींना एका सेवेकर्‍याने विचारले की आता बाळप्पा काय विणतो आहे तर स्वामी राज म्हटले, "आता तो कांबळी विणीत आहे." स्वामीरायांनी बाळप्पास जपाचा हिशोब ठेवण्यास सांगितले होते.त्याप्रमाणे ते तो हिशोब चोख ठेवीत. या अनुष्ठाना दरम्यान सुंदराबाईंनी स्वामी रायांपुढे बाळप्पांच्या अनुष्ठानाचा विषय काढला‌ तर स्वामीराय म्ह्टले, "तो कुलदीपक आहे." या स्वामीरायांच्या एका वाक्यातच त्यांनी बाळप्पांचा अधिकार ,त्यांच्यावरील आपली कृपा सर्वांना दाखवून दिली होती.आता आपल्या गादीचा वारसदार कोण यावर या द्वारे स्वामींनी शिक्कामोर्तब केला होता. पुढे बाळप्पांच्या या अनुष्ठानाची सांगता स्वतः स्वामीरायांनी एका भक्ताद्वारे ब्राह्मणभोजनाने केली. पुढे सन १८७४ ला श्रावण वद्य १ ला स्वामी सुतांनी आपला देह मुंबईत ठेवला आणि बरोबर एक वर्षांनी स्वामी देवांनी आपली समाधी लिला करण्याचे योजले.

                            स्वामी समर्थांनी आपल्या सर्व भक्तांना काही दिवस आधी जवळ बोलावून काही तरी वस्तू प्रसाद रुपाने दिली.पण बाळप्पांना मात्र नेहमी प्रमाणे काहीच दिले नाही.पण न राहवून बाळप्पांनी काकूळतीला येऊन , "महाराज ,सर्वांना प्रसाद दिलात,मला आपण काय देणार?" हा प्रश्न विचारला.त्यावेळी श्रीस्वामी महाराजांनी आपल्या उजव्या हातातल्या करंगुळीत असलेली "श्री स्वामी समर्थ" ही अंगठी काढली व ती स्वहस्ते बाळप्पांच्या हातात घातली व महाराज उद्गारले, "माझे शिक्कामोर्तब तुला देत आहे.माझा शिक्का यआवच्चंद्रदइवआकरौ तू पुढे चालव." असा आशिर्वाद मिळताच बाळप्पा गदगदीत झाले , कृतकृत्य झाले.त्यांनी स्वामी चरणांना मिठीच मारली.श्री स्वामीरायांनी बाळप्पास आपल्या जवळ बसविले.आपल्या कंठातील रुद्राक्ष त्यांच्या गळ्यात घातला.अंगावर छाटी घातली.हातावर भगवे निशाण दिले.प्रासादिक चरणपादुका दिल्या व  मस्तकावर वरदहस्त ठेवून, "औदुंबर छायेत बस.स्वतंत्र मठ स्थापन करुन पादुकांची प्रतिष्ठापना कर.बाग करुन त्यात फुलझाडे लाव व वार्षिक ठरलेले उत्सव करीत जा."अशाने सुयोग्य फळ मिळेल." या अर्थाचा श्रीमद भागवताचा एक श्लोक ही स्वामी रायांनी म्हटला. लगेच चैत्र वद्य १३ शके १८०० ,सन १८७८ ला स्वामीरायांनी आपली समाधी लिला केली. पुढे तीन वर्ष स्वामी आज्ञेने बाळप्पा निराशन व्रत करुन राहिले पण स्वामी विरहाने ते अतिशय व्याकुळ झाले.त्यांनी अन्न तर त्यातले होते पण आता फराळ आणि पाणी ही त्यागले व विरहाकुल ते समाधी पुढे दिवसरात्र बसून राहिले.काही काळाने श्री स्वामी भगवंत बाळप्पांच्या पुढे प्रगट झाले व म्हटले, "तुला  मी ज्या पादुका दिल्या आहेत,तेथे चैतन्य रुपाने मी प्रत्यक्ष वास करीत आहे.या पुढे मी तुझी सेवा तेथेच घेईन.पूर्वीप्रमाणे माझी सेवा करीत जा." या नंतर मात्र बाळप्पांच्या मनातील सर्व संदेह पूर्ण मिटला.त्यांनी त्या प्रसाद पादुका पेटीतून बाहेर काढल्या व त्यांची स्थापना चौरंगावर केली.जवळच भगवे निशान ठेवले.महाराजांना प्रत्यक्ष जे उपचार करीत ते या दिव्य  पादुकांवर सुरु केले.पण स्वामींनी आपल्यावर सोपवलेले कार्य पूर्ण करण्यास आपण खरंच समर्थ आहोत का? अशी शंका त्यांना आली तोच स्वामींनी त्यांना प्रगटून पुन्हा अभय दिले की , "इथे तू काही करत नसून,जरी मी देहाने अंतर्धान पावलो तरी तुझ्या द्वारे मीच कार्य करणार आहे.सर्वत्र माझी सत्ता आहे.तू केवळ निमित्तमात्र आहेस.पादुकांच्या द्वारा सर्वत्र संचार करुन लोकसंग्रह करावा." सुरवातीला पेठेतील पुजार्‍याकडे बाळप्पांचा मुक्काम असायचा.तेथेच ते नित्य पूजा व उत्सव करीत असत.पुढे स्वामी कार्यास्तव बाळप्पा महाराजा वर्‍हाड,खानदेश,विदर्भ,, कोल्हापूर,पुणे, मुंबई आदी प्रांती भ्रमण करु लागले. प.पू.बाळप्पा महाराजांनी अखंड फिरून स्वामी नामाची ध्वजा सर्वत्र फडकवीली.स्वामी नामाच्या ते अखंड स्मरणात असतं.शरण आलेल्या भक्तांना ते स्वामींचे तिर्थ आणि अंगारा देत व त्यांना संकटातून,आधी-व्याधीतून मुक्त करत.बाळप्पा महाराजांनी अनेक स्वामी मठाची स्थापना केली.त्यांना अनेक भक्त शरणं आले व शिष्य संप्रदाय मोठ्याप्रमाणात वाढला.बाळप्पा महाराजांच्या अनेक दिव्य लिला चरित्रात आल्या आहे.त्यांना शरणं आलेल्या आर्त,अर्थार्थी,मुमुक्षु ,ज्ञानी ,जिज्ञासु साधकाला ते त्यांना समजेल असे मार्गदर्शन करीत व मार्ग दाखवित.पुढे त्यांनी गंगाधरपंत शिगवेकर यांची आपले उत्तराधिकारी म्हणून निवड केली.पुढे सन १९०१ ला बाळप्पा महाराजांनी स्वतंत्र मठाची स्थापना केली.हा मठ आज गुरुमंदीर या नावाने आपल्या सर्वांना श्रुत आहेच.पुढे माघ शुद्ध चतुर्थी शके १८२६  ,सन १९०४ ला बाळप्पा महाराजांनी चतुर्थाश्रम धारण केला‌ व ब्रह्मानंद सरस्वती हे नाम धारण केले. श्री बाळप्पा महाराजांनी स्वामी आज्ञेनंतर कधीही अन्न प्राशन केले नव्हते पण त्यांनी केलेले कार्य ,प्रवास बघितला तर बुद्धी सुन्न होते.पुढे पौष‌ पौर्णिमा ,शके १८३१ ,सन १९१० रोजी श्री ब्रह्मानंद सरस्वती तथा बाळप्पा महाराजांनी प्रिय शिष्य गंगाधरपंत यांना गुरुगादीचे सर्व अधिकार विधीपूर्वक बहाल केले.आज्ञापत्रही दिले.त्यांना स्वामींचा दंड,छाटी व माळ दिली‌ व आपण अखेरची निरवा निरव करु लागले. अखेर फाल्गुन मास उजाडला.चतुर्थीचा दिवस ,मंगळवार अंगारक योग.पहाटेच्या सुमुहूर्तावर श्री ब्रह्मानंद सरस्वती तथा बाळप्पा महाराज उर्ध्व दृष्टी लावून बसले.त्यानंतर त्यांनी स्नान केले.मग आपल्या आसनावर न बसता गाभार्‍यात गेले.तिथे स्वामी पादुकांना डोळे भरुन पाहिले.पुढे आसन स्वामी प्रतिमेपुढे घेण्यात आले.त्यावर येऊन बसल्यावर श्री बाळप्पा महाराज हातात जपमाळ घेऊन अखंड स्वामींकडे बघत होते.हळूच ते म्हटले, "अरे असे पाहता काय! मी कोठेच जाणार नाही.या आसनावरुन उठेन व आत जावून बसेन." असे म्हटल्यावर काही काळ स्वामी नाव घेत घेत अचानक ओंकाराचा उच्चार करीत स्वामी चरणी लीन झाले.पुढे बाळप्पा महाराजांच्या देहाची यथासांग पूजा करण्यात आली.महाराजांची मिरवणूक काढण्यात आली.वटवृक्ष देवस्थानात व पेठेतल्या समाधी मठात मिरवणूक नेण्यात आली.त्यानंतर गुरुमंदिरातील चैतन्य पादुकांसमोरच ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराज तथा बाळप्पा महाराजांना समाधी देण्यात आली.अशा या अतिशय अलौकिक,दिव्य व थोर स्वामी शिष्याची आज पुण्यतिथी.श्री बाळप्पा महाराज म्हणजे स्वामी सेवेचे सगुण मूर्तीमंत रुपच होते.प्रत्येक स्वामी भक्ताने,गुरुभक्ताने कशाप्रकारे गुरुसेवा करावी याचा हे चरित्र परीपाठच आहे.या मंगल दिनी ही माझी शब्द सुमनांजली मी स्वामी चरणी ,बाळप्पा महाराजांच्या चरणी अर्पण करतो व आपल्या सर्वांकडून ही स्वामी चरणांची अखंड सेवा घडावी ही कोटी कोटी प्रार्थना करतो.

    ✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

                  फाल्गुन शुद्ध चतुर्थी


#श्रीस्वामीसमर्थजयजयस्वामीसमर्थ 🙏🌸🌿

#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🌿

#महाराज_ज्ञानेश्वर_माउली_समर्थ 🙏🌸🌿

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...